आज्जीबाई …

आज ट्रैकवर एक आज्जी होत्या बरोबर. मी मध्येच मोबाईल उघडून पाहत होतो. दहा-पंधरा राऊंड झाल्यावर बेंचवर बसलो. थोड्या वेळाने आज्जीसुद्धा येवून बसल्या. आणि एकदम फ़ायरींग सुरु…

आज्जी: चालायला येतो का मोबेल बघाला रे पोरा?

आता कुठे आजीकडे नीट पाहिलं. सत्तरीच्या पुढे तरी नक्की असणार माऊली. नऊवारी साड़ी, पदर कंबरेला बांधलेला. पायात स्पोर्ट शूज , कानाला हेडसेट. काळा सावळा पण प्रसन्न चेहरा. एवढे चालून सुद्धा थक़वा म्हणून नाही.

म्हटलं ,”आज्जे, एकदम मॉडर्न आज्जी हाएस की!”

आज्जी, कुणाला म्हणतो रे? आताशिक सत्तर अन एक झालेत. बूटाडं आन फोन नातवानं घिवून दिलाय… इति आज्जी

बरं रायलं, आज्जे नायतर आये म्हणतो. चालल ना?
क़ाय ऐकायलीयस?

तुझ्यावानी पिच्चरची गानी नाय आयकत. देवाची गानी हायती. … लैच कड़क प्रकरण होतं. मी म्हटलं..

‘आये, अगं मी सुद्धा भजनच ऐकतोय. ऐकती का? म्हणत माझा हेड सेट तिच्या कानात अडकवला. नेहमीप्रमाणे कुमारजीची निर्गुणी भजने चालू होती. नेमके ‘हंस अकेला’ लागले होते. आज्जी खुश…

क़ाय कड़क आवाज लेकरा, बुवाचा. कंचं बुवा म्हणाचं हे? कूटं आसत्यात?

आये, अगं बुवा आजकाल वरल्या आळीत आसत्यात. बोलताना बोट वर केलं तशी आजी खळखळुन हासली. ‘सुटला बिचारा, आता इन्दरदेवा समुर सेवा बजावत आसल.’

एकदम लगेच आणि सटीक प्रतिक्रिया होती. मी चाट पडलो.

आसा क़ाय बगाला रे पोरा? परतेकाला कंदी ना कंदी जायचा हाय. त्येनं मनाव घेतलं त उद्या म्या बी आसन तितं बुवाचं गानं ऐकाया.
आणि स्वतःच जोरजोरात हसायला लागली.

म्हटलं, गपे आये, आत्ताच तर ओळख झालीय तुझी. एवढ्या लवकर नाही सोडत मी तुला?

मग हळूच विचारलं तिनं. रोज आसतुस का? उद्या बी ऐकव बुवाचं गानं. कडकय एकदम.

मग तिच्याकड़चा मोबाईल घेतला. नातवंडाचा जीव असावा आजीवर. चांगला रेड मी चा फोन होता. इंटरनेट चालू करून आधी शेयर इट इंस्टॉल केलं आणि मग माझ्याकडं होता नव्हता तो सगळा खजिना ट्रांसफर केला. अगदी वसंतराव , भिमाण्णा पासून कुमारजी, बाबूजी सबकुछ. गाणी चालू केल्यावर शफल होवून पहिलंच ‘कानड़ा राजा पंढरीचा’ लागलं भीमण्णाचं आणि आज्जी खुश. माझ्या डोक्यावर हात फिरवून स्वतःच्या कानशिलावर कडा कडा बोटं मोडली. तेवढ्यात मी ही तिच्या पायाला हात लावून घेतला.

चल, उन्द्याचाला भेट परत. म्हणून आज्जी घरी गेली. मीही सुखी माणसाचा सदरा लेवुन घरी आलो. 😊😍

© विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s