All posts by अस्सल सोलापुरी

It's all about me and my passion for poetry, prose, travel, friends and a lot more...

जिगरी

आजही माझ्या डोळ्यासमोर आहे तो गोरा-गोमटा , घाऱ्या डोळ्याचा , लुकडेला मुलगा. कपडे साधेच असायचे, बहुतांशी इस्त्री नसायचीच, पण कपड्यावर कुठे थोडी सुद्धा अस्वच्छता असेल तर शपथ ! नीटनेटकेपणा हा तेव्हाही त्याचा स्थायीभाव होता, आजही आहे. एकदा त्याच्याबरोबर गिरीमला गेलो होतो, सायकलवर डबल सीट आणि नेमकी सायकल मध्येच कुठेतरी पंक्चर झाली आणि मग आम्ही दोघे आळीपाळीने सायकल ओढत कसेबसे गिरीमला पोचलो…

आयुष्य किती साधं आणि सरळ होतं. कदाचित म्हणूनच अधिक सुंदर होतं. मी, मन्या आणि संदीप, सगळ्यात समोर, एकाच बेंचवर बसायचो. कै. काकडेबाईंची तंबीच होती तशी. चुकून एखादे दिवशी समोर नाही दिसलो तर बाई ओरडायच्याच. कौतुकही करून घेतलं आणि खूपदा मारही खाल्ला बाईंचा , पण सारं एकत्रच. We were the three idiots of STV.

सोमा,रावसो, अज्जू, रवी ही त्यावेळची वर्गातली स्कॉलर गॅंग. त्यांच्याशी दोस्ती होतीच, पण आधी मन्याशी आणि मग कदाचित त्याच्यामुळेच संदिपशी दोस्ती झाली. कदाचित मन्या आणि सँडीभोवती, सोमासारखे हुशार मुलगा हे वलय नव्हते, त्यामुळे माझ्यासारख्या टवाळ मुलाला त्याच्याशी कनेक्ट होणे जास्त सोपे गेले असावे. नंतर तर एकदम जिवलग मैत्रीच झाली. सोमा, रावसो किश्या पम्या हे सुद्धा नंतर खूप घट्ट मित्र बनले. पण शाळेत ज्यांच्याशी खऱ्या अर्थाने प्रथम बंध जोडले गेले ते मन्या आणि संदीपच होते. त्यानंतर एका राखी पोर्णिमेला शोभाने राखी बांधली आणि कुटुंबात अजून एक भर पडली. शाळेच्या हॉस्टेलशी खऱ्या अर्थाने संबंध आला तो संदीपमुळे आणि मग सगळीच गॅंग मित्र झाली. आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा शाळेतले सगळे मित्र सोबत आहेत, त्याला सहाय्यभूतही संदीपच आहे.

दहावीनंतर फाटाफूट झाली आणि त्यानंतर संदीप भेटला तो थेट पुण्यात धनकवडीत. एका कटींग सलूनमध्ये. And I was like, हा संदीप? How’s that possible? कारण आता माझ्यापुढे उभा असलेला माणूस कोणी वेगळाच होता. गोलमटोल, डोक्यावरच्या केसांनी फारकत घ्यायला सुरुवात केलेली. पोटाचा घेर वाढलेला. लहानपणीच्या केस चापून बसवलेल्या, तेलकट चेहऱ्याऐवजी एक देखणा चेहरा. चेहऱ्याकडे पाहताना डोळ्याकडे नजर गेली आणि लगेच ओळख पटली. ‘साल्या, बघतोयस काय नुसता? म्हणत त्याने कडकडून मिठी मारली आणि क्षणात मधली २०-२५ वर्षे गायब झाली. आता माझ्यासमोर तोच संदीप होता, रूप वेगळे होते पण तोच होता.

संदीप साधा, सरळ तेंव्हाही नव्हता. पण चालू सुद्धा कधीच नव्हता. माझा मित्र तेव्हाही अतिशय धोरणी, जिद्दी होता. स्पष्ट होता, आहे. पण महत्वाचे म्हणजे मन तेव्हाही मोठे होते आता ही आहे. अगदी त्याच्या पोटाच्या घेरापेक्षाही खूप मोठे 😀

आपल्याला काय करायचं आहे? हे त्याला पक्कं ठाऊक होतं. घरची परिस्थिती, सतत कष्ट करणारी आई कायम डोळ्यासमोर होती. त्यामुळे आपलं उद्दिष्ठ त्याने तेव्हाच पक्कं केलेलं होतं. आणि आज त्याने ते पूर्ण केलंय. He has reached his goal. He’s achieved what he had decided. But that’s not the beauty… आपले गोल्स आपल्यापैकी बहुतेकांनी अचिव्ह केलेले आहे.

पण संदिपचे वेगळेपण म्हणजे त्याने आपल्या बरोबर आपल्या सर्व मित्रांनाही कायम सोबत घेऊन वाटचाल केलेली आहे, करतोय. आजही आम्ही भेटलो की त्याच्या बोलण्यात ग्रुपसाठी विशेषतः ग्रुपमधल्या तुलनेने आर्थिक दृष्ट्या कमजोर मित्रांसाठी काय करता येइल कसे करता येईल याचेच विचार असतात. कुणाचाही वाढदिवस असो, एनिवर्सरी असो सर्वात पहिला फोन, पहिला मेसेज माझ्या या दोस्ताचाच असतो.

मेरा यार, यारोंका यार है ! आज त्याचा वाढदिवस आहे. देव करो आणि त्याला अपेक्षित ते सर्व प्राप्त होवो. सुख, समृद्धी समाधान आणि मित्र-मंडळी कायम त्याच्या आयुष्यात राहोत हीच सदिच्छा 😍😘

Many many happy returns of the day Sandy ! Love you dost. You are one of the biggest and precious boons in my life that I have received from god. Be there always my dear ! 🎂🍷🌹💐

तुझाच

विशल्या

आज्जीबाई …

आज ट्रैकवर एक आज्जी होत्या बरोबर. मी मध्येच मोबाईल उघडून पाहत होतो. दहा-पंधरा राऊंड झाल्यावर बेंचवर बसलो. थोड्या वेळाने आज्जीसुद्धा येवून बसल्या. आणि एकदम फ़ायरींग सुरु…

आज्जी: चालायला येतो का मोबेल बघाला रे पोरा?

आता कुठे आजीकडे नीट पाहिलं. सत्तरीच्या पुढे तरी नक्की असणार माऊली. नऊवारी साड़ी, पदर कंबरेला बांधलेला. पायात स्पोर्ट शूज , कानाला हेडसेट. काळा सावळा पण प्रसन्न चेहरा. एवढे चालून सुद्धा थक़वा म्हणून नाही.

म्हटलं ,”आज्जे, एकदम मॉडर्न आज्जी हाएस की!”

आज्जी, कुणाला म्हणतो रे? आताशिक सत्तर अन एक झालेत. बूटाडं आन फोन नातवानं घिवून दिलाय… इति आज्जी

बरं रायलं, आज्जे नायतर आये म्हणतो. चालल ना?
क़ाय ऐकायलीयस?

तुझ्यावानी पिच्चरची गानी नाय आयकत. देवाची गानी हायती. … लैच कड़क प्रकरण होतं. मी म्हटलं..

‘आये, अगं मी सुद्धा भजनच ऐकतोय. ऐकती का? म्हणत माझा हेड सेट तिच्या कानात अडकवला. नेहमीप्रमाणे कुमारजीची निर्गुणी भजने चालू होती. नेमके ‘हंस अकेला’ लागले होते. आज्जी खुश…

क़ाय कड़क आवाज लेकरा, बुवाचा. कंचं बुवा म्हणाचं हे? कूटं आसत्यात?

आये, अगं बुवा आजकाल वरल्या आळीत आसत्यात. बोलताना बोट वर केलं तशी आजी खळखळुन हासली. ‘सुटला बिचारा, आता इन्दरदेवा समुर सेवा बजावत आसल.’

एकदम लगेच आणि सटीक प्रतिक्रिया होती. मी चाट पडलो.

आसा क़ाय बगाला रे पोरा? परतेकाला कंदी ना कंदी जायचा हाय. त्येनं मनाव घेतलं त उद्या म्या बी आसन तितं बुवाचं गानं ऐकाया.
आणि स्वतःच जोरजोरात हसायला लागली.

म्हटलं, गपे आये, आत्ताच तर ओळख झालीय तुझी. एवढ्या लवकर नाही सोडत मी तुला?

मग हळूच विचारलं तिनं. रोज आसतुस का? उद्या बी ऐकव बुवाचं गानं. कडकय एकदम.

मग तिच्याकड़चा मोबाईल घेतला. नातवंडाचा जीव असावा आजीवर. चांगला रेड मी चा फोन होता. इंटरनेट चालू करून आधी शेयर इट इंस्टॉल केलं आणि मग माझ्याकडं होता नव्हता तो सगळा खजिना ट्रांसफर केला. अगदी वसंतराव , भिमाण्णा पासून कुमारजी, बाबूजी सबकुछ. गाणी चालू केल्यावर शफल होवून पहिलंच ‘कानड़ा राजा पंढरीचा’ लागलं भीमण्णाचं आणि आज्जी खुश. माझ्या डोक्यावर हात फिरवून स्वतःच्या कानशिलावर कडा कडा बोटं मोडली. तेवढ्यात मी ही तिच्या पायाला हात लावून घेतला.

चल, उन्द्याचाला भेट परत. म्हणून आज्जी घरी गेली. मीही सुखी माणसाचा सदरा लेवुन घरी आलो. 😊😍

© विशाल कुलकर्णी