RSS

तर आमची सायकल पंक्चर झाली …

तर आमची सायकल पंक्चर झाली !!

हसायाला काय झाले तुम्हांस? मला माहीत आहे की आता तुम्ही म्हणाल ,’सायकल पंक्चर झाली’ यात विशेष ते काय? सायकली का कधी पंक्चर होत नाहीत? अहो , सायकलीच सहसा पंक्चर होतात, त्यात एवढे दुःख व्यक्त करायची किंवा त्यावर चक्क या पद्धतीने सार्वजनिक व्यासपीठावर व्यक्त होण्याची काय आवश्यकता आहे? पण ते तसं नसतं हो. ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरं….

“अहो ऐकलं का? प्रोपेसरांची सायकल म्हणे पंक्चर झाली?” इति चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरच्या डाव्या कोपऱ्यातल्या चवथ्या म्हणजे थ्री झिरो फोर क्रमांकाच्या खोलीतल्या सौ. धांदरफळे (काकू म्हणायचं होतं मनात, पण मग सायकलबरोबर आमचाही उद्धार झाला असता. तसेही त्यांना आत्ता कुठे त्रेसष्ठावे लागलेय)

हि बातमी त्या चाळीच्या पाचव्या मजल्यावरच्या उजव्या कोपऱ्यातल्या फायु झिरो शेवन क्रमांकाच्या खोलीतल्या गंभा ‘दिवे’कर आज्जींना , आपल्या घरासमोरच्या कॉमन सज्जाच्या बोळकांडीमधून आपले डोके अंमळ बाहेर काढून सांगत होत्या. त्यामुळे अर्थातच ती बातमी सगळ्या बिल्डिंगच्या रहिवाश्यापर्यंत पोचली. (इथे सगळ्या बिल्डिंगच्या हाच बरोबर शब्द क्रम आहे, :बिल्डिंगच्या सगळ्या’ हा नव्हे. आमच्या चाळीच्या एकूण तीन बिल्डींगी आहेत, इंग्रजी शी (C) आकारामध्ये. नाहीतर यायचे लगेच धावत भाषा पंडित आमचं व्याकरण सुधारायला). आज्जींनी लगेच उत्तर दिले…

“अगं बाई, आता गं. आता गं कसं करायचं? भेटायला जावूयात का?”

एकतर ‘दिवे’करआज्जींना आधीच कमी ऐकू येते (त्यांचे आडनाव खरेतर दिवाकर आहे, पण त्या त्यांना काहीही सांगायला गेले की ‘दिवे ओवाळा, दिवे” अशी एक्शन करून दाखवतात म्हणून आम्ही त्यांना दिवेकर म्हणतो. कृगैन.) त्यात आज्जींना अगदी ‘आज्जी, विन्स्टन चर्चिलच्या घरातल्या कामवालीच्या मुलीला पडसे झालेय’ हे जरी सांगितले तरी त्यांची प्रतिक्रिया वरच्यासारखीच असते. तर ते असो…

“वैकुंठवासी नाही झाली बरे अजून. हि मेली सगळ्यांना पोचवायलाच बसलेली असते” हे कोण म्हटले असेल ते सांगणे नलगे. ‘लाज आणता अगदी तुम्ही’. (हे सुभाषित आमच्यासाठी )

“इश्श, अशी कशी पंक्चर झाली गं प्रोफेसरांची सायकल? आणि पंक्चर व्हायला त्यांनी ती स्टॅंडवरून काढली कधी होती?” इति तळमजल्यावरच्या वन झिरो…. जावूदे, एका खोलीतल्या मास्टर धुंडीराजांची सुबक ठेंगणी !

हुश्श… अजून बरेच काही आहे हो. पण ते असोच. सांगायचे असे की आम्ही प्रो. गणपतराव धोंडोपंत सरमळकर. हयात सगळी पोष्टात गेली हो आमची, शिनियर हेड कारकून होतो म्हटलं. तरुणपणी गावातल्या एका महाविद्यालयाने चुकून आमची नेमणूक केली होती प्रोफेसर म्हणून. एका आठवड्यातच तिथल्या टारगट पोरटयांनी आमचा आणि व्यवस्थापनाचा गैरसमज दूर केला आणि आम्ही महाविद्यालयाला सोडचिठ्ठी दिली व थेट पोस्टात रुजू झालो. पण तेव्हापासून नावामागे जे प्रो. लागलं ते लागलंच.

बाकी तुम्हालाही शंका आली असेलच. धुंडीराजांची सुबकठेंगणी म्हणतेय त्याबद्दल. तसे तिला सगळे चंपुताई म्हणतात, आम्हीsss नाही. बाकी चंपूचे नाव नयन आहे ही आतल्या कंपूतली खबर हो. (आमच्या हिच्यापासून जपावं लागतं हो………… स्वतःला). तर जी शंका सुबक ठेंगणीला आली तीच आम्हालाही आली होती. आम्ही गेल्या सहा महिन्यात सायकल फक्त साडेतीन वेळा स्टँडवरून काढलीय. तीन वेळा असेच तिला फिरवून आणायला म्हणून चाळीच्या फाटकापर्यंत आणि एकदा फक्त शास्त्रापुरती स्टँडवरून काढली आणि परत लावली म्हणून एकूण साडेतीन. नाही नाही, तिला म्हणजे आमच्या हिला नाही हो, सायकलला फिरवून आणायला. (आमची हि एकदाच बसली होती सायकलच्या करिअरवर आणि त्याने राम म्हंटला. गेली तीन वर्षे व्यवस्थित सांभाळलं होतं हो, काथ्याने बांधून बांधून)

बरं ते जावू द्या, तरीही सायकल पंक्चर झाली. कुणीतरी गुपचूप नेऊन वापरली असावी असा आम्हाला संशय आहे. अडीच वर्षांपूर्वी तिच्या चाकात बांधायची साखळी (कुलुप होतं तसं सायकलला, पण आम्ही ते वापरत नाही) एका ठिकाणी गंजून तुटल्यामुळे आम्ही ती साखळी सुतळीच्या एका मजबूत तोड्याने बांधून ठेवली होती. कुणा नतदृष्ट शर्विलकाने चक्क तो सुतळीचा तोडा कापून सायकल नेली आणि पंक्चर करून पुनश्च आणून ठेवली. वर सिटला एक चिठठी सुद्धा लावून ठेवली होती. काय तर म्हणे.
“उस्मान भंगारवाल्याला द्या, तो देईल काही आणे हिच्या बदल्यात. काय तर म्हणे घंटी सोडून सगळे वाजतेय. वाट बघ म्हणावं उस्मानला. मी देतोय … घंटा !

“फिस्स्स, आता प्रोफेसरांच्या घरात किमान तीन दिवस आमटीतल्या डाळीचे प्रमाण कमी होणार तर.”

इति चाळीच्या मधोमध असलेल्या रिकामटेकड्या पेन्शनर्सच्या कट्टयावर कायम मक्षिकाघात करण्यात व्यस्त धांदरफळे गुरुजी ( एम्मे विथ हॉनर्स, रिटायर्ड शिक्षक फ्रॉम वडाची वाडी, उच्च माध्यमिक शाळा) एकदाचे पचकलेच हों..

“अरे हाsssड, यांना असे वाटतेय कि जणू काही आम्ही लगोलग पंक्चर काढूनच घेणार आहोत सायकलचे? अहो या देशाचे राष्ट्रपिता बापूसुद्धा कुठल्या कुठे चालायचे म्हंटलं, मग आम्हास नाही का जमणार ते?  राहता राहिली पंक्चर काढायची गोष्ट तर ते कधी काढायचे हे आम्ही ठरवू आणि खरे सांगायचे तर काही पंक्चर्स तसेच ठेवलेलेच बरे काही काळासाठी. भ्रम कायम ठेवायला मदत होते. ”

तसेही आमची हि म्हणतच असते की आमचे वजन अंमळ वाढलेच आहे आजकाल.

ता. क. प्रत्येक लेखात पंच शोधणाऱ्या संकुचित मनोवृत्तीच्या मूढमती फेसबुकी समीक्षकांनो. प्रत्येक लेखनात पंच असायलाच हवा का? सामान्य माणसाने सरळ साधा अनुभव लिहूच नये का? परमेश्वर करो आणि आमच्या लेखनात पंच शोधणाऱ्याच्या डोक्यावर तीन-तीनशे पौंडांचे पाच पाच पंच बसोत.

आणि प्लिजच बर्कां , वर्तमान परिस्थितीशी लेखाचा काहीही संबंध नाहीये.

आपलाच
प्रो. गणपतराव धोंडोपंत सरमळकर

 

माणसं …

माणसं !

१९९७ साली सोलापूरसारख्या तुलनेने छोट्या शहरातून मुंबईत आलो. शिक्षण आणि आई-वडिलांनी दिलेला आत्मविश्वास एवढी शिदोरी होती जवळ. सुरुवातीला मिळेल ती कामे केली. मग त्यात अगदी इलेक्शन ड्युटीवर प्रगणक, डेटा एंट्री ऑपरेटर, चेकर (ओल्ड कस्टम हाऊससाठी) हे सुद्धा केलं. सकाळसाठी काही काळ वाचक संपर्क प्रतिनिधी म्हणून काम केलं. काही ठिकाणी इन्व्हर्टर्स, फॅक्स, कॉपीअर मशिन्ससाठी सर्व्हिस इंजिनिअर म्हणून राबलो. कॉइन बॉक्सेस, एसटीडी मॉनिटर्स विकले. वेइंग स्केल्स विकले. संगणक रिपेअरिंग, सर्व्हिसिंगची कामं केली.

या सगळ्यातून पैसा फारसा नाही मिळाला. पण माणसं समजायला लागली, हा मात्र मोठा फायदा झाला. तसेही पैसा फक्त सोय करतो, सुविधा पुरवतो. समाधानासाठी माणसेच उपयोगी पडतात. पहिला जॉब डेली ११७₹ पगारावर केला होता तेव्हाही विवंचना होत्या आणि आता महिना लाखाच्या वर कमावतो आजही विवंचना आहेतच. पण या प्रवासात जी माणसं भेटली ती या सगळ्यापेक्षा खूप मोठी होती, आहेत. नोकरीच्या निमित्ताने फिरती चालूच असते.

जगभर फिरलो … ! रंग बदलतो फक्त आणि काही प्रमाणात भाषा. पण माणसे तीच असतात. तुमच्यावर प्रेम करणारी, तुमचा तिरस्कार किंवा हेवा करणारी. बाह्यरंग, दर्शन बदलत राहते पण अंतर्यामी तोच साक्षात्कार होत राहतो. यात सोलापूरचा माझा जिवलग मित्र राजा असतो. माझ्या तथाकथित सॉफीस्टिकेटेड सर्कलमधले लोक राजाला टाळायचे पण त्यामुळेच कदाचित मी जास्त अटॅच होत गेलो राजाबरोबर. केत्यासारखा (अमोल केत) मित्र आज सनदी अधिकारी होवून मोठ मोठी पदे भुषवतोय. पण भेटला कि आजही तो आमचा केत्याच असतो. आजही मी त्याला न लाजता, न संकोचता एक कचकचीत सोलापूरी शिवी हासडू शकतो. यात अजून खूप नावं राहिलीयेत पण ती नातीसुद्धा तितकीच मजबूत आहेत. यात शाळेतली रावशा , सँडी, मन्या, किश्या , सोमा आणि कॉलेजातील श्रीनी हि अंतरंगी माणसं आजही माझ्या आयुष्यात आहेत यापरीस वेगळं काय हवं? भंडारीमध्ये भेटलेला दादूस, दोन किंवा तीन वेळा फार फार. पण तेवढे पुरेसे असते नाते जुळायला !

हॉलंडमध्ये भेटलेले कोर लॅण्डस्मन किंवा मॅक्स बोर्जरसारखे मित्र आज सहा सहा वर्षे भेट नसूनही रेग्युलर संपर्कात राहतात तेव्हा पटायला लागतं कि माणसे माणसेच असतात, तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जा. ऑस्ट्रेलियात भेटलेली जिवलग मैत्रीण कॅरेन तिच्या गोड लेकीचे फोटो आठवणीने पाठवते. करायकल सारख्या देशाच्या एका कोपऱ्यातल्या बंदरावर तीन चार दिवस बरोबर असलेला , माझी भाषाही न समजणारा जेट्टीवर काम करणारा फोरमन मुथ्थु आज ही आठवणीने फोन करतो आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगतो, ‘स्सार, वि मिसेस यु लाट!” तेव्हा वाटून जातं की अरे आपण उगीचच देवाच्या आणि देवाच्या नावाने कुरकुर करतो. त्याने भरपुरच दिलंय कि आपल्याला.

कुठल्यातरी वळणावर भेटलेला स्वतःला निवांत पोपट म्हणवणारा अवलिया, थोड्याशा सहवासाने आयुष्य समृद्ध करून गेला माझं. अशोक पाटील नावाचं एक अतिशय लाघवी व्यक्तिमत्व कुठल्यातरी बेसावध क्षणी आयुष्यात येतं आणि तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातं.

पुण्यात भेटलेला आमचा ‘म्हातारा’ , प्रसन्नदा, आजवर फक्त एकदाच भेटलेला गुऱ्या, स्वाम्या, सातारकर, सोत्रि, अण्णा आणि अर्ध्या हि मंडळी नकळत आयुष्याचा एक अभिन्न भाग बनून जातात. सी एल, कौत्या, सई, क्रान्तिताई, पराग, पल्ली, दक्षी, हर्षद, इन्ना आणि ‘आरती’ यांच्यासारखी माणसे आयुष्यात आनंदाचे झाड बनून येतात ! माझ्याच गावचा असलेला अभ्या ऑस्ट्रेलियात भेटतो आणि एकाच भेटीत त्याच्या प्रेमात पाडून जातो. माणूस माणूसवेडा असणं हि किती सुखाची, आनंदाची गोष्ट असते ना?

सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जवळची झालेली मेव्हणी (हे काही जणांना आश्चर्यकारक वाटेल, पण आहे) आणि आमच्या सगळ्या समस्यांमध्ये ठामपणे आमच्या पाठीशी उभा राहणारा तिचा नवरा पशा उर्फ प्रसाद, सगळ्यात महत्वाचे म्हणजे निव्वळ तथाकथित संस्कार न करता, संस्काराचा अर्थ समजावून जगण्याचे गाणे शिकवणारे जन्मदाते आईवडील आणि निव्वळ बायको न राहता सखी झालेली जोडीदारीण या सगळ्यात मोठ्या भेटी असतात आयुष्याने दिलेल्या.

जगण्याची लढाई चालू आहे, चालू राहीलच. पण सुरुवातीला वाटायची तशी भीती आता वाटत नाही. कारण आता मी एकटा नाहीये !

फार काही नाही. आभार प्रदर्शन तर मुळीच नाही. असलंच तर हे माझ्या श्रीमंतीचं प्रदर्शन आहे. कुणाला हेवा वाटला तर वाटू द्या, त्यात वाईट काहीच नाही. तो हेवाच आपल्याला अजून माणसं जोडायला शिकवेल. सद्ध्या इतकंच.

बोलत राहू ….

विशल्या सोलापूरकर

 
 
%d bloggers like this: