कोई ना संग मरे ….

कोई ना संग मरे …

दिवस संपत येतो. संध्याकाळी, कातरवेळी नकळत मनाला अनंताचे, क्वचित अद्वैताचे वेध लागतात. दिवस कसा सरला हेच लक्षात येत नाही. दिवसभराच्या धांदलीत मन सैरभैर होवून गेलेले असते. आपण नक्की क़ाय करतोय? कश्यासाठी जगतोय? कुठल्या आशेने पुन्हा-पुन्हा जगण्याच्या, जीवनाच्या मोहपाशात गुरफटत जातोय….? कश्याचेच भान उरत नाही. आणि अचानक एखादे दिवशी संध्याकाळच्या निवांत वेळी कुठल्यातरी विचारात मन गुरफटलेले असताना रफीचा आर्त, थेट आरपार जाणारा, अंतर्बाह्य हलवून सोडणारा स्वर कानामार्गे सगळ्या गात्रा-गात्रांतुन, कायेच्या रंध्रा-रंध्रातुन अलगद झिरपत जातो….

मन रे ! तू काहे ना धीर धरे

ब्रह्मानंदी टाळी लागणे कश्याला म्हणतात याचा जिवंत साक्षात्कार असतो तो. काही गाणी मुळातच मर्मबंधातली ठेव बनून येतात. येताना स्वर्गीय सौन्दर्याचं लेणं लेवुन येतात. नक्की कश्यासाठी गाणं ऐकावं असा प्रश्न पडण्याच्या सांप्रत काळात कश्या, कश्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा ऐकावं असा मनाला प्रश्न पाडणारं, ‘वो निर्मोही मोह ना जाने जिनका मोह करे’ म्हणताना मनाला स्वतःच्याच (गाण्याच्या) मोहात पाडणारं हे गीत. साहीरचे मोजक्या शब्दात जिवनाचे सार मांडणारे गहन पण प्रभावी शब्द, रोशनचं स्वर्गीय संगीत आणि ….

थेट काळजाला येवून भिड़णारा मनाला थेट ब्रह्मतत्वात विलीन करण्याचं सामर्थ्य असणारा मानवी रफीचा दैवी, आर्जवी यमन कल्याण ! रफी जीव ओवाळून टाकावा असे गात असतो…..

मन रे ! तू काहे ना धीर धरे

साहिरचा एकेक शब्द काळजाला स्पर्शत एकाच वेळी जगण्याचे सार आणि त्याच्या बद्दलच्या मोहाची निरर्थकता या दोहोंवर समर्थपणे भाष्य करत असतो.

परिवर्तन, बदल हा निसर्गनियम आहे. इथे काहीही चिरंतन नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तुला, प्रत्येक जिवाला, जीवाच्या प्रत्येक गुणधर्माला, स्वरूपाला कधी ना कधी बदलाच्या, परिवर्तनाच्या अवस्थेतुन जावेच लागते. इथे काहीही शाश्वत नाही. कभी ना कभी हर किसीको फना होना ही है . एक मानवी आशा, मोह…; सोडले तर बाकी सर्व काही नश्वर आहे. उतार-चढ़ाव हा स्वभाव आहे निसर्गाचा. मानवी जीवनही त्याला अपवाद नाही. त्यात सतत परिवर्तन होत राहणारच. त्यात कितीही ठरवले तरी आपण ढवळाढवळ करू नाही शकत. मग जे कधी आपल्या हातातच नव्हते त्यासाठी वृथा खंत कश्याला? आणि तरीही मन मोह काही सोडत नाही. देह असो वा आत्मा, भौतिक असो वा आध्यात्मिक कश्या ना कश्याच्या आसक्तीत गुंतून राहते. त्याला साहिर विचारतो…

इस जीवन की चढ़ती ढलती धुप को किसने बाँधा
रंग पे किसने पहरे डाले रूप को किसने बाँधा
काहे ये जतन करे

साहिरसारखा कवि दूसरा झाला नाही या भारतवर्षात. माझं हे विधान काही जणांना खटकेल कदाचित. कारण या देशाला अनेक समर्थ कविंची परंपरा लाभलेली आहे. एकाहुँ एक उत्कृष्ट कविवर्य या मातीने दिलेले आहेत. नावे घ्यायला गेलो तर दिवस पुरणार नाही. तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. कारण साहिर कमालीचा प्रॅक्टीकल माणूस होता. त्याच्या कवितेतला रोमांस देखील प्रॅक्टीकल असायचा आणि तरीही तो कधी खटकला नाही किंवा भरकटला नाही. इथेही पाहा ना, तो कळवळून सांगतोय की….

उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे

बाबारे, इथे कुणी कुणाचा नाहीये. ज्याचा जेवढा सहवास मिळाला तेवढाच आपल्या नशिबात होता असे समजायचे आणि पुढे निघायचे. “जन पळभर म्हणतील हाय हाय” हेच क़ाय ते सत्य आहे. इथे कुणी कुणाचा नाही. जो तो फक्त स्वतःच्याच विश्वात रमलेला. स्वत:पुरताच विचार करणारा. जन्म-मृत्यु , इथली माया, इथली मत्ता, इथली सत्ता सबकुछ मिथ्या है ! निव्वळ भ्रम आहे, सोड हे सगळे इथेच.

इथे साहिर एक त्रिकालाबाधित सत्य सांगून जातो, जे आपण कायम विसरतो किंवा विसरण्याचा प्रयत्न करतो..

जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई ना संग मरे !

रफीच्या धीरगंभीर , आर्त स्वरात ही ओळ ऐकताना अंतर्बाह्य थरथरायला होतं. किती महत्वाची गोष्ट सांगून गेलाय साहिर. जे काही आहे, जे कोणी आहे ते फक्त कुडीत श्वास असेतोवरच. एकदा श्वास संपला की सगळी नाती, मोह, बंध संपतात. कितीही प्रेम असले, माया असली तरी ती तुमच्या जीवात जीव असेपर्यंत. तुमच्यासाठी तुमच्याबरोबर मरायला कोणी तयार होत नाही. आणि तुमच्यानंतर काही काळात विसरुनही जातात लगेच. म्हणून साहिर प्रत्येकाला ठणकावून सांगतो…

वृथा मोह नको, कोई ना संग मरे !

वो निर्मोही मोह ना जाने
जिनका मोह करे
मन रे ! तू काहे ना धीर धरे ….! (इथे

© विशाल कुलकर्णी

2 thoughts on “कोई ना संग मरे ….”

  1. वा! मला आवडणारं अर्थपूर्ण गीत, गेल्या पन्नास वर्षांत किती वेळा ऐकलं असेल! त्यात हे रसाळ रसग्रहण. सोन्याहून पिवळे झाले हो.🙏

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s