आता नक्की आठवत नाही, पण बहुदा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असताना सर्वात प्रथम हि कविता वाचली, वाचली कसली? चाळली होती. अमरावतीचं एक इरसाल पात्र वर्गात होतं. अर्थात नाना तेव्हा इरसाल वाटायचा. भर क्लास चालू असताना गुपचूप बेंचखाली हात नेवून तंबाखू चोळणारा, ती चिमूट दाढेखाली दाबून बिनधास्त गप्पा मारणारा नाना जगताप. त्याचे खरे नाव काय होते की, पण नाना पाटेकरांसारखी दाढी वाढवलेली, बोलणे-वागणेही तसेच फटकळ. त्यामुळे आम्ही त्याला नाना म्हणायचो. खरेतर आज तो पुरेसा आठवतही नाही. पण त्या दिवसात त्याने एका जबरदस्त माणसाची ओळख करून दिली होती. खरेतर त्या माणसाच्या कवितेची….
राया, तुला रे काळयेळ नाहीं
राया, तुला रे ताळमेळ नाहीं
थोर राया तुझे रे कुळशीळ
रानारानांत गेली बाई शीळ !
कविवर्य ना. घ. देशपांडे यांनी साधारण १९२९ च्या काळात लिहिलेली हि कविता. त्यावेळी आम्ही पूर्णतया गुलजारच्या काव्याने भारलेले होतो. त्यामुळे वाचताना पूर्णपणे गावरान मराठीच्या बाजात गुंफलेली हि कविता फार काही विशेष वगैरे वाटली नव्हती. एकदा चाळून सहज विसरूनही गेलो. पण नंतर एकदा कधीतरी रेडिओवर जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा मात्र भारावून गेलो. गायक संगीतकार गोविंद नारायण उर्फ जी. एन. जोशी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आणि गायलंसुद्धा आहे. ठरवून गाणं करायच्या हेतूने काहीतरी लिहिणे, मग त्यावर मेहनत घेऊन त्याचे गाणे करणे हे सर्वमान्य आहे. पण एखादी कविता पाहिल्यावर तिच्यासाठी चाल सुचणे आणि एखाद्या दिग्गजाने ती गावरान कविता चक्क शास्त्रीय संगीताच्या ढंगात बांधणे आणि गाणे म्हणून ती प्रचंड लोकप्रिय होणे हा प्रकार तसा विरळाच. जोशीसाहेब हि कविता वाचल्यावर तिच्या प्रेमातच पडले आणि त्यांनी ती गाण्यात बांधूनही घेतली. पुढे त्या गाण्याची ध्वनिफितही निघाली आणि भावगीतगायनाच्या प्रकारामध्ये अजरामर स्थानही मिळवून गेली. या गाण्याने जोशीसाहेबांना भावगीतगायक म्हणून नाव तर मिळवून दिलेच पण त्या काळाची विक्रीचे सगळे विक्रम मोडणारी ध्वनिमुद्रिका म्हणून नावही मिळवले. ना.घ. आणि जोशी अगदी घराघरात पोचले. या गण्यानंतर ना.घ. सरांना जाहीर काव्यवाचनाची आमंत्रणे यायला लागली.
एका आतुर प्रेयसीच्या मुखातून आलेले साधे सरळ तक्रारवजा शब्द. साजणाच्या अधीर, उतावळ्या प्रेमाचे तक्रारवजा कौतुक या शब्दात होते. १९२९ चा काळ पाहता अशा प्रकारचे शब्द हे एक धाडसच होते. पण कवितेचा एकंदर सूर हा कोवळ्या, नाजूक प्रीतीचा होता. त्यामुळे बघता बघता गाणे तरुण मंडळींच्या ओठावर रुळून गेले.
वाहे झरा ग झुळझुळवाणी
तिथं वार्याची गोडगोड गाणीं
तिथें राया तुं उभा असशील
रानारानांत गेली बाई शीळ !
प्रेमाचा थेट उल्लेख न करता निसर्गात आढळणाऱ्या विविध जिवंत प्रतीकांचा सढळ हस्ते वापर हे ना.घ. सरांच्या कवितेचं वैशिष्ठय होतं. आता जे गाणे आंतरजालावर उपलब्ध आहे त्यात ही पूर्ण कविता येत नाही. त्यात पहिली ३-४ कडवीच उपलब्ध आहेत. पण माझ्या सुदैवाने एकदा साक्षात ना.घ. सरांच्या घरीच हे जोशीसाहेबांनी गायलेलं पूर्ण गाणं ध्वनीमुद्रिकेवर ऐकण्याचा योग्य आला. अर्थात २००३ साली जेव्हा मी त्यांचे घर शोधत पोहोचलो तेव्हा सर या जगात राहिलेले नव्हते. २००० सालीच ते नियंत्याला आपली कविता ऐकवायला निघून गेले होते.
शीळ : कविवर्य ना. घ. देशपांडे
रानारानांत गेली बाई शीळ,
रानारानांत गेली बाई शीळ!
राया, तुला रे, काळयेळ नाही,
राया, तुला रे, ताळमेळ नाही,
थोर राया, तुझं रे कुळशीळ,
येडयावानी फिरे रानोवना,
जसा काही ग मोहन कान्हा,
हांसे जसा ग, राम घननीळ,
वाहे झरा ग झुळझुळवाणी,
तिथं वारयाची गोड गोड गाणी,
तिथं राया तुं उभा असशील,
तिथं रायाचे पिकले मळे,
वर आकाश शोभे निळे,
शरदाच्या ढगाची त्याला झील,
गेले धावून सोडुन सुगी,
दुर राहून राहिली उगी,
शोभे रायाच्या गालावर तीळ,
रानीं राया जसा फुलावाणी,
रानीं फुलेन मी फुलराणी,
बाई, सुवास रानीं भरतील,
फिरु गळ्यात घालून गळा,
मग घुमव मोहन शीळा,
रानीं कोकिळ सुर धरतील,
“रानारानांत गेली बाई शीळ!”
मूळ ध्वनीमुद्रिकेवर हे शेवटचे कडवे ऐकणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. भावगीत जरी असले तरी त्याकाळी असलेला शास्त्रीय संगीत आणि नाट्यगीतांच्या वेडामुळे गाण्यात शास्त्रीय संगीताचा प्रभाव जाणवत राहतो. पिलू रागात बांधलेले हे गीत आहे. कुठे जर पूर्ण गाणे (मूळ ध्वनिमुद्रिका) ऐकायला मिळाली तर नक्की ऐका. शेवटच्या कडव्यातील “फिरू गळ्यात घालून गळा” या ओळीतल्या गळा नंतर घेतलेली तान, त्या मुरक्या आणि शेवटी ‘शीळ’ या शब्दातली ‘मिंड’ हा एक अफाट अनुभव आहे. निदान त्यासाठी तरी हे मूळ गाणे मिळवून ऐकाच.
© विशाल विजय कुलकर्णी