वर्तुळ : भाग ४

नमस्कार मंडळी

सर्वप्रथम मन:पूर्वक क्षमस्व ! वर्तुळ – भाग ३ नंतर हा पुढचा भाग लिहायला खुप वेळ लागला. पण काही कारणामुळे नाही लिहू शकलो. या दरम्यान शेकडो वाचकांनी फ़ोन केले, इमेल पाठवल्या, इथे तिसर्या भागावर शंभरच्यावर प्रतिसाद आले पुढील भागाची विचारणा करणारे. खरेतर चौथ्या भागातच संपवायचा विचार होता पण हा भाग खुप लांबला, मोठा व्हायला लागला. म्हणून यानंतर अजुन एक भाग लिहून कथा संपवेन. पुढील भाग येत्या चार-पाच दिवसात खात्रीने पोस्ट करेनच.

तोपर्यंत पुनश्च एकवार क्षमस्व आणि धन्यवाद !

सस्नेह

विशाल कुलकर्णी

********************************************************************************

वर्तुळ : भाग १

वर्तुळ : भाग २

वर्तुळ : भाग ३

आण्णांनी हलकेच माझ्या मस्तकावर थोपटले.

“काळजी करु नकोस ताई. माऊली आहेत ना तुझ्या पाठीशी आणि आता मी आहे, भास्करदादा आहेत, आमचा तुका आहे. आता फक्त एक करायचं, भास्करदादांना घेवुन घरी जायचं, तुझं ३-४ दिवसांचं सामान घेवुन थेट इथे राहायला यायचं. शक्य असेल तर ३-४ दिवसांसाठी रजेचा अर्ज देवुन टाक ऑफीसमध्ये. हे ३-४ दिवस खुप धोकादायक असणार आहेत आणि तुला तिथे असुरक्षीत अवस्थेत सोडून मला त्यांच्याशी लढताही येणार नाही. या इथे, या मठीत मात्र तू सुरक्षीत राहशील. सगळं काही स्थीर स्थावर झालं की ४-५ दिवसात मीच नेवुन सोडेन तुला तुझ्या घरी किंवा नव्या घरी. ओक्के?”

जय जय रघुवीर समर्थ !

आण्णा, आतल्या खोलीत निघुन गेले. हॉलमध्ये मी आणि भास्करदादा दोघेच होतो. एक विलक्षण शांतता पसरली होती. पण ही वादळापुर्वीची शांतता होती. येणारे काही दिवस माझं आणि त्याचं भवितव्य ठरवणार होते. मनात एकच विचार होता..

“देव न करो, पण जर आण्णांना या युद्धात यश नाही मिळालं तर.”

आता इथून पुढे…

****************************************************************************************************************

“भास्करदादा, तुम्हाला काय वाटतं? कसला धोका असेल तिथे? आणि त्या जुन्या झाडापाशी काय दडलेलं असेल? मी गेले होते तेव्हा सुद्धा मला फ़ार भीतीदायक अनुभव आला होता त्या झाडाचा.”

भास्करदादा नुसतेच हसले.

“हे बघ बेटा, या बाबतीत मी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवलेली आहे. आण्णा जेव्हा अमुक एक गोष्ट कर म्हणून सांगतात तेव्हा ती निमुटपणे आणि नि:शंक मनाने करायची. कुठलेही वाक्य उच्चारण्यापूर्वी आण्णानी त्याच्यावर मुळापासून विचार केलेला असतो आणि त्याच्या सर्व परिणामांची पुर्ण जबाबदारी स्वीकारलेली असते. तेव्हा बाकी कुठलाही विचार न करता आता आपण तुझ्या घरी जाऊयात, तुझे सामान घेवू. तेथुन माझ्या घरी…….

इतक्यात आतल्या खोलीत गेलेले आण्णा अचानक बाहेर आले आणि…

“दादा, नाहीतर असं करा. आजची रात्र तुम्ही ताईला घेवून तुमच्या घरीच राहा. उद्या सकाळीच इकडे या. वहीनीला माझा एक निरोप द्यायला मात्र विसरू नका नेहमीप्रमाणे.”

” ’चिंता करू नकोस, रघुराया आपल्या पाठीशी आहे!’ हाच ना. ते तिला पाठ झालय आता, त्यामुळे ती विचारायच्या भानगडीत पडत नाही. आणि मी तुमच्याबरोबर आहे म्हंटल्यावर पुर्णपणे सुरक्षीत आहे याची तिला आपल्या श्वासोच्छासापेक्षाही जास्त खात्री आहे.”

भास्करदादा हासून म्हणाले.  

 आणि आम्ही मारुतीरायाच्या प्रतिमेला नमस्कार करून घराबाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी आण्णांनी दादांच्या कानात काहीतरी सांगितले.

इतक्यावेळ हसतमुख असलेले भास्करदादा घराबाहेर पडल्यावर मात्र गंभीर झाले होते. त्यांच्या मुद्रेवर काळजी झळकत होती.

पण मला काही विचारायचे धैर्य झाले नाही. आम्ही माझ्या घरी पोचलो. कुलूप उघडून मी आत शिरले. पहिले पाऊल ठेवणार तोच मला पुन्हा एकदा ती जाणिव झाली आणि त्याच क्षणी दादांनी माझ्या हाताला धरून मला खसकन मागे ओढले. मी आश्चर्यचकीत होवून त्यांच्याकडे पाहायला लागले.

“तू बाहेरच थांब बेटा. मी तूला बेटा म्हणले तर चालेल ना. माझ्या मुलीसारखीच आहेस तू. तुझं काय सामान घ्यायचं ते मला सांग, मी ते घेवून येतो. सद्ध्या ही जागा तुझ्यासाठी सुरक्षीत राहीलेली नाहीये. आत्ता मला कळले, आण्णांनी मला तुझ्याबरोबर का पाठवले ते? त्यांनी मघाशी माझ्या कानात ’तुला तुझ्या घरात प्रवेश करु देवु नको’ हेच सांगितले होते. “

“पण का?”

“ते आण्णांनाच माहीती ! पण इथे आता शिरल्यावर मला जे काही जाणवतय त्यावरून ही जागा नक्कीच सुरक्षीत राहीलेली नाहीये. आण्णांबरोबर राहून थोड्याफ़ार प्रमाणात माझेही सहावे इंद्रीय जागृत झालेले आहे कदाचित. “

मी त्यांचे म्हणणे प्रमाण मानून बाहेरुनच त्यांना काय-काय बरोबर घ्यायचे आणि ते कुठे आहे त्या जागा सांगितल्या. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व सामान बरोबर घेतले. पण तिथुन निघताना त्यांची मुद्रा थोडी त्रासल्यासारखी वाटत होती.

“आण्णा शक्यतो असे करत नाहीत. आजपर्यंत कधीच त्यांनी कुठल्याही कामगिरीच्या वेळी मला दूर ठेवलेले नाहीये.”

भास्करदादा स्वतःशीच पुटपुटले.

मला थोडेसे आश्चर्यच वाटले. कारण आण्णांनी तर सकाळी आम्हा दोघांनाही बरोबर बोलावले होतेच की त्यांच्या कुटीवर. ते कुठे आम्हाला दूर ठेवत होते? मग दादा स्वत:शीच असे का पुटपुटले असतील? पण मी गप्पच राहीले.

थोड्याच वेळात आम्ही दादांच्या घरी पोचलो. छोटासा तीन खोल्यांचा फ्लॅट होता. त्यांच्या पत्नी प्रसन्न मुद्रेने समोर आल्या. मला कळेना त्यांना काय नावाने हाक मारावी? वहिनी म्हणावे तर त्या माझ्यापेक्षा बर्‍याच मोठ्या दिसत होत्या. दादांच्या बाबतीत एक ठिक होतं, दादा काय आपण वडीलांनाही म्हणतोच की. मी नुसतेच हात जोडले.

“ये बाळ आत ये, हातपाय धुवून घे. तोपर्यंत मी चहा ठेवते.”

मी त्यांना प्रथमच भेटत होते. ओळख नाही, पाळख नाही. माझेही नावही त्यांना माहीत नाही. आपल्या नवर्‍याबरोबर ही कोण परकी बाई दिसत्येय? असली कुठलीही आश्चर्याची किंवा अनोळखी माणुस घरात शिरल्यावर आपोआप होणारी तिरकसपणाची भावना नाही. होता तो निव्वळ आपलेपणा, प्रेम. त्याच क्षणी जाणवलं की हे घर आपलं आहे.

“मी तुम्हाला माई म्हटलं तर चालेल?”

“आई म्हटलीस तरी माझी काही हरकत नाही.”

त्या हसून म्हणाल्या आणि मी आश्वस्त झाले. हात-पाय धुवून चहा प्यायला स्वयंपाकखोलीत आले. साधंच घर होतं. कट्ट्यापाशी उभ्या असलेल्या माईंनी तिथेच भिंतीला तेकून ठेवलेला एक पाट माझ्याकडे सरकवला..

“बस गं. चहा घेतला की जरा बरे वाटेल तुला.”

“दादा कुठेयत? ते आले की बरोबरच घेवुयात ना चहा?”

“ते नाहीत घ्यायचे आता चहा. ते आंघोळ करुन थेट देवघरात शिरलेत.”

“अय्या, तुमचं देवघर कुठेय खरं? मी पण आलेच नमस्कार करुन.”

त्या तीन खोल्यांपैकी एका खोलीतल्या कोपर्‍यात दादांनी आपले देवघर मांडले होते. भिंतीवर एक-दोन मोजके फोटो. समर्थ रामदास स्वामी आणि मारुतीराया होतेच. लहानश्या लाकडी देवघरातसुद्धा एक स्वामी समर्थांची मुर्ती, शिवलिंग, एक बाळकृष्ण आणि अजुन एक बहुदा दुर्गेचा टाक एवढेच. मला बघताच दादांनी हसुन स्वागत केले.

“ये गं…, चहा घेतलास? आमची ही चहा एकदम फक्कड करते बरं का!”

मी नुसतीच हसले…

“तुम्ही नाही का घेणार चहा?”

“नाही बेटा, आता उद्या सकाळीच घेइन. तू झोप जावून आता. सकाळी लवकरच निघुयात.”

त्यांनी देवघरातला कसलासा अंगारा माझ्या कपाळावर टेकवला आणि पुन्हा देवघराकडे वळले. मी तशीच बघत उभी…, त्यांना ते जाणवले असावे.

“शेवटच्या क्षणी आण्णांनी आपला निर्णय बदलून मला, तुला माझ्याघरी घेवून जायला सांगितले. याचा अर्थ तुझ्या लक्षात आला का?”

मी प्रश्नार्थक मुद्रेने नकारार्थी मान हलवली… तसे ते चिंतेच्या स्वरात म्हणाले.

“याचाच अर्थ असा होतो की आण्णा आज रात्री पुन्हा एकदा तिथे जायचा प्रयत्न करणार. ज्याअर्थी त्यांनी मला दुर ठेवलय, त्या अर्थी तिथे नेहमीपेक्षा जास्त धोका आहे. त्यांनी संकटाला एकट्यानेच सामोरे जायचे ठरवलेले दिसतेय.”

मला काय बोलायचे ते सुचेचना. “मग? आता काय? आपण जावुया का परत तिथे? मला माहिती आहे ‘त्या’च्या घराचा रस्ता. आपण लगेचच जावुयात तिकडे.”

तसं भास्करदादांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे भाव झळकले.

“गुड, संकटात पलायन न करण्याची तुझी वृत्ती पाहून छान वाटले. पण आण्णांनी दुर राहायला सांगितलेय, ते काही विचार करुनच सांगितले असणार. काही हरकत नाही, तू आराम कर. आपण इथूनच आपल्या परीने आण्णांना हातभार लावुयात.”

“म्हणजे? तुम्ही नक्की काय करणार आहात? काही होम – हवन वगैरे…?”

“नाही गं बाळा ! मी असलं काहीही करणार नाहीये. फक्त सकाळपर्यंत इथेच बसून श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अघोरकष्टोद्धारण स्तोत्राचा पाठ करणार आहे.”

भास्करदादांनी डोळे मिटून हात जोडले आणि मुखाने खणखणीत स्वरात स्तोत्र म्हणायला सुरूवात केली…

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव | श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव ||
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं | त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम ||
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||

त्यांच्या धीरगंभीर आवाजात अघोरकष्टोद्धारण स्तोत्राची आवर्तने त्या खोलीत घुमायला लागली आणि मलाही भान विसरायला झाले. मी चहाचा कप विसरून तिथेच मांडी घालून बसले. मला काही हे स्तोत्र पाठ नव्हते. पण मग मी मनातल्या मनात स्वामींच्या तारकमंत्राचा जप सुरू केला…

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता मी ’त्या’च्यासाठी नाही तर आण्णांसाठी प्रार्थना करीत होते. इतक्या थोड्याश्या कालावधीत किती लळा लावला होता आण्णांनी.

****************************************************************

भास्करदादा तिच्याबरोबर घराबाहेर पडले. तसे आण्णांनी एक नि:श्वास सोडला. उद्या परत आल्यावर भास्करदादांना तोंड द्यायचे हे आज त्या शक्तीशी लढण्यापेक्षा जास्त कठीण आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. पण दुसरा पर्यायच नव्हता. यावेळी प्रतीस्पर्धी तुल्यबळ होता, खरेतर कांकणभर सरसच होता. आजपर्यंत ते हस्तकांशी, साधकांशी लढत आलेले होते. इथे सामना प्रत्यक्ष ‘त्या’च्याशी होता. मघाशी ते ‘तिथे’ जावून आले तेव्हाच त्यांचा निर्णय झाला होता. याठिकाणी इतर कुणालाही गोवणे धोकादायक होते. तसं पाहायला गेले तर भास्करदादा आतापर्यंत बर्‍यापैकी तयार झालेले होते. पण इथे जे काही होतं ते विलक्षण घातक, दाहक होतं. सर्वसामान्य माणसांची मने कचकड्यासारखी वितळून टाकण्याइतकं सामर्थ्यशाली होतं. त्याचा नि:पात करायचा म्हणजे त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक होतं.

आण्णांनी पुन्हा एकदा विहीरीतलं पाणी काढून स्नान केलं आणि ओलेत्यानेच देवघरात श्री मारुतीरायांच्या मुर्तीसमोर येवून पद्मासन घातले.  तत्पुर्वी मारुतीरायाला साष्टांग नमस्कार घालायला ते विसरले नव्हते. समोर तेवणार्‍या अक्षय निरांजनाची वात त्यांनी थोडी सारखी केली, त्यात अजुन पुरेसे तेल घातले आणि डोळे मिटून मनातल्या मनात ‘त्या’ वर्णमालांची उजळणी सुरू केली. एकेक अक्षर महासामर्थ्यशाली होते. त्यात प्रलय थांबवण्याची शक्ती तर होतीच, पण प्रलयाला जाग आणण्याचे सामर्थ्यही होते. योग्य वेळ आणि योग्य उच्चार जर साधला नाही तर सगळेच उध्वस्त करण्याची शक्ती त्या वरवर क्षुद्र भासणार्‍या ‘अक्षरांमध्ये’ होती. ‘त्या’ वर्णांची उजळणी झाल्यावर, त्यांनी समाधी लावली आणि भुतकाळाकडे प्रवास सुरू झाला…..

नक्की काळ नाही सांगता येणार, पण काही ‘शे’ , कदाचित काही ‘हजार’ वर्षांपूर्वीचा तो काळ असावा…..

अमावस्येची रात्र ! संथपणे वाहणारी ती अनामिक नदी. पाणी फारसे नव्हतेच. पण पात्रात काही ठिकाणी खोल डोह मात्र तयार झालेले होते. नदीपात्रापेक्षा किनार्‍यावरचे लांबपर्यंत पसरलेले वाळवंटच मोठे होते. सगळं कसं शांत-शांत, अगदी वाराही स्तब्ध. जणू काही स्मशान शांतताच. हो… स्मशानशांतताच होती ती. नाही म्हणायला नदीकाठच्या त्या वठलेल्या वृक्षाशेजारी जळणारी ती चिता, तिच्या भडकलेल्या ज्वाला. हे ही आश्चर्यच….. कारण वारा अगदीच स्तब्ध होता, तरीही चितेच्या ज्वाळा मात्र भडकलेल्या. थोडं नीट लक्ष देवून पाहीलं तरच लक्षात आलं असतं …

चितेच्या पलिकडे कुणीतरी मांडी ठोकुन बसलेले होते. बसलेले असल्याने नक्की लक्षात येत नसले तरी किमान सहाफुट उंची असावी. खदिरांगारासारखे डोळे. ती व्यक्ती मुखाने कसल्यातरी अनामिक भाषेत काही मंत्रोच्चार करत, दोन्ही बाजुला ठेवलेल्या दोन पत्रावळीमधून काहीतरी उचलून समोरच्या चितेत टाकत होती.  कदाचित त्यामुळेच ती चिता अजुनही भडकत असावी. सगळ्या वातावरणात चितेवर जळत असलेल्या प्रेताचा अतिशय उग्र असा दुर्गंध पसरलेला होता. पण त्या दुर्गंधाचा त्या अघोर साधकावर काहीच परिणाम होत नसल्याचे जाणवत होते. मध्येच आपले मंत्रोच्चार थांबवून त्या व्यक्तीने आपले दोन्ही हात वर केले, तशी नदीपात्रात कसलीतरी खळबळ झाली. पुढच्याच क्षणी नदीच्या त्या पात्रातील एका डोहातून एक स्त्री बाहेर पडली. नक्कीच कोणी उच्च दर्जाची अघोरपंथी साधिका असावी, अन्यथा इतका वेळ पाण्याखाली राहणे म्हणजे खेळ नव्हे! नदीतून बाहेर पडून ती थेट चितेच्या रोखाने निघाली. शरीरावर चिंधीसुद्धा नव्हती. कमरेच्या खाली रुळणारे लांबसडक केस आणि मुखाने कसलेतरी मंत्रोच्चार हीच काय ती तिच्या अस्तित्वाची ओळख जाणवत होती. त्याच अवस्थेत ती चितेसमोर बसलेल्या त्या अघोरीपाशी जावून पोचली. सरळ दंडवत घालून, नंतर त्याच्याच बाजुला चितेकडे तोंड करून बसली. थोड्याच वेळात इतका वेळ शांतपणे चाललेले त्याचे मंत्रोच्चार पुन्हा चालू झाले. आता तिनेसुद्धा त्याच्या स्वरात आपले स्वर मिसळले होते. हळुहळू तो आवाज वाढायला लागला. तिथली स्मशान शांतता भंग पावली होती. वातावरणातला स्तब्धपणा जावून त्याची जागा भयाणपणाने घेतली. आजुबाजुचे वातावरण आपोआप तप्त व्हायला सुरूवात झाली. झाडांच्या पाना-पानातून शांतपणे स्थिरावलेल्या पक्ष्यांना सर्वात आधी त्या बदलाची जाणीव झाली आणि अतिशय कर्कश्य आवाजात त्यांचा किलबिलाट सुरू झाला.  पण तो किलबिलाट नेहमीप्रमाणे नैसर्गिक नव्हता तर त्यात कसलीशी अनामिक भीती दडलेली होती. काहीतरी नकोसं असलेलं, निसर्गाच्या निर्मीतीपेक्षा वेगळं असलेलं , कुठल्यातरी दुसर्‍याच मितीतून या मितीत येवू पाहत होतं. त्याच्याच आगमनाची ती चाहूल होती. समोरची चिता अजुनच भडकली. पण आता त्या ज्वाला नेहमीप्रमाणे राहीलेल्या नव्हते. त्यांच्यातून वेगवेगळे आकार तयार व्हायला लागले होते. त्या दोघांचाही मंत्रोच्चार थांबला. त्या अघोरी साधकाने सहेतुक आपल्या साथीकडे एक कटाक्ष टाकला. तिची सुंदर मुद्रा याक्षणी कमालीची भेसूर दिसत होती. त्याच्या कटाक्षाचा अर्थ ओळखून ती उठली. त्या अघोरीच्या सामानातले एक धारदार तलवारीसारखे शस्त्र उचलून ती त्याच्या मागे येवून उभी राहीली.

” जमेल ना सगळं नीट? थेट चितेतच जावून पडायला हवे. नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. ही संधी गेली तर अशी संधी मिळण्यासाठी पुन्हा शेकडो वर्षे वाट पाहावी लागेल.” तो उद्गारला…

ती नि:शंक होती.

“तू फक्त खुण कर. मी तयार आहे.”

त्याने पुन्हा मंत्रोच्चाराला सुरूवात केली. तिने दोन्ही हातांनी तलवार नीट पेलून धरली. काही क्षणातच त्याचा मंत्रोच्चाराचा वेग वाढला. समोरची आग आता आकाशाशी स्पर्धा करू पाहत होती. आसमंतात कसले-कसले भीतीदायक हुंकार ऐकु यायला लागले होते. सगळा आसमंत त्या रौद्र हुंकारांनी ढवळला गेला होता. हवेतील दुर्गंध वाढत चालला होता. कुठल्यातरी विवक्षित क्षणी त्याने मंत्रोच्चार थांबवले आणि एक हात वर केला. त्या क्षणी तीने पुर्ण ताकदीने तलवारीचा वार त्याच्या मानेवर केला. या क्षणाची तयारी करण्यासाठी आजपर्यंत तीने कितीतरी दुर्दैवी माणसांचे बळी घेतलेले होते. तलवारीचा घाव त्याच्या मानेवर बसला तशी मानेतून रक्ताची धार उसळली, धडापासून वेगळे झालेले ते शिर वेगाने चितेच्या दिशेने उडाले. ते त्या चितेत पडणार इतक्यात….

इतक्यात काहीतरी झाले. नक्की काय झाले ते तिलाही कळाले नाही. पण आसमंतातला रौद्र हुंकार तिला काहीतरी चुकले असल्याचे जाणिव करुन देता झाला. ते जे काही होते ते संतप्त झाल्यासारखे भासत होते. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यावर एखादे श्वापद जसे गुरकावेल तसा तो आवाज होता.

तिच्या साथीदाराचे शिर चितेत न पडता, चितेजवळच धुळीत पडले होते. इतक्या वर्षांच्या आपल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे हे लक्षात येण्यापूर्वी शेवटचे जे दोन शब्द तीने ऐकले होते, ते होते….

“अल्लख निरंजन !”

तिचा संताप अनावर झाला….! त्या आवाजाच्या दिशेने तिने पाहीले. समोर एक नाथपंथी उभा होता. कंबरेला गुडघ्यापर्यंत येणारे काशाय वस्त्र, दंडाला तसेच वर छातीपर्यंत गुंडाळलेला दोरखंडाचा विळखा. हातातला त्रिशूल बहुदा नुकताच बाजुच्या जमीनीत रोवला असावा त्याने. डाव्या हातात कमंडलु धरून उजव्या हाताच्या ओंजळीत कमंडलूतले पाणी घेवून जणु काही युद्धाच्या पवित्र्यातच उभा होता तो.

“कोण आहेस तू? आमच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फ़िरवलेस. माझ्या गुरुंच्या बलिदानाची माती केलीस. आज जर सगळं व्यवस्थित पार पडलं असतं तर ’धनी’ खुश झाले असते. आम्हाला अफाट सामर्थ्याचे, अमरत्वाचे, चिरतारुण्याचे वरदान मिळाले असते. सगळ्या विश्वाचे साम्राज्य धनी आम्हाला देणार होते. का असा मध्येच कडमडलास तू?”

तो शांतपणे उभा होता. त्याच्या चेहर्‍यावर एक दयार्द्र भाव उमटला.

“हिच श्रद्धा, हिच भक्ती जर त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पणाला लावली असतीस तर त्याने सगळी सुखे तुझ्या पायाशी ओतली असती. पण तू आणि तुझ्या गुरूने चुकीच्या ठिकाणी आपले ज्ञान, आपले सामर्थ्य वापरले. त्याला गुरू तरी कसे म्हणू? शिष्याला चुकीच्या मार्गावर नेणारा अधम, तो ‘गुरू’ कसा असु शकेल?”

तिचा चेहरा जणु आग ओकत होता….

“पण धनी जागृत झालेले आहेत. आज ना उद्या मी परत नव्याने साधना करेन. मला हवे ते मी मिळवेनच. आज तू आहेस, पण तेव्हा या विश्वाला आमच्यापासून वाचवायला कोण असेल?”

दुसर्‍याच क्षणी तिने तीच तलवार स्वतःच्या मानेवरून फिरवली. शेवटच्या क्षणी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तीने, पण शब्द अडकले गळ्यातच. पण ती नक्कीच मी परत येइन हेच सांगत होती. त्या नाथपंथीने एकदा तिच्या तडफडणार्‍या देहाकडे पाहीले…..

“तुला आणि तुझ्या गुरूला अग्नि देवून मुक्ती देवू शकलो असतो मी. पण तुम्ही हे जे काही जागृत केलेय त्याला शांत करायला परत तुमची उपस्थिती आवश्यक आहे आणि याक्षणी त्याला तोंड देण्याइतके सामर्थ्य माझ्यात नाही. त्यामुळे आता तुझ्या परत येण्याची वाट पाहाणे आले. मी नसेन कदाचित तेव्हा, पण कुणीतरी असेलच …. कुणी ना कुणी नक्की असेल.”

“अल्लख निरंजन” … पुन्हा एकदा जयघोष करीत त्याने चितेकडे पाठ वळवली. जमीनीत रोवलेला आपला त्रिशूल काढून घेतला आणि तो आल्या दिशेने चालायला लागला.”

***************************************************************

आण्णांनी अलगद डोळे उघडले. सारे शरीर घामाने डबडबले होते. त्या कुठल्यातरी अनामिक मितीतून शेकडो वर्षांपुर्वी मुक्त झालेली ती अघोरी शक्ती गेली कित्येक वर्षे मुक्तच होती. आता तिची शक्ती नक्कीच प्रचंड प्रमाणात वाढलेली असणार होती. ज्याअर्थी त्या सिद्ध नाथपंथीला सुद्धा त्या शक्तीचा, त्या वेळी प्रतिकार करणे अशक्य वाटले होते. आता इतक्या वर्षानंतर ती शक्ती प्रचंड प्रमाणात सामर्थ्यवान झालेली असणार. आता तिच्याशी लढा देणे अजुनही कठीण होणार. त्यातल्या त्यात एक आशेचा किरण असा दिसत होता की इतक्या वर्षानंतर अजुनही ती शक्ती फारशी कार्यरत झाल्याचे जाणवत नव्हते. कदाचित एखाद्या बळीची वाट पाहात असावी. एखाद्या खास बळीची……..!

क्रमश:

पुढील आणि अंतीम भाग येत्या काही दिवसातच ….

विशाल….

113 thoughts on “वर्तुळ : भाग ४”

      1. मला असं वाटतंय कि 2018 पण असाच निघून जाणार
        पण विशाल सर काही वर्तुळ पूर्ण करणार नाहीत
        असं तडपवत ठेवणं बरं नाही विशाल सर
        देवाला घाबरा
        तुम्हाला शपथ वगैरे द्यावी लागेल असं दिसतंय

        Like

  1. खूपच वेळ लावला तुम्ही पण एकदम झकास….एकदम जखडून ठेवल्या सारखं वाटल….लवकर पुढील भाग पोस्ट करा..धन्यवाद…….

    Like

  2. Pls post next part

    2014-10-14 15:22 GMT+05:30 sheetal shinde :

    > sir,
    > pls post next part at the earliest. there should be continuity in such
    > stories
    >
    > We all are waiting very eagerly
    >
    > Rgards
    > Sheetal SS
    >
    >
    > 2014-09-30 11:09 GMT+05:30 “” ऐसी अक्षरे मेळवीन !”” comment-reply@wordpress.com>:
    >
    >> विशाल विजय कुलकर्णी posted: “नमस्कार मंडळी सर्वप्रथम मन:पूर्वक
    >> क्षमस्व ! वर्तुळ – भाग ३ नंतर हा पुढचा भाग लिहायला खुप वेळ लागला. पण काही
    >> कारणामुळे नाही लिहू शकलो. या दरम्यान शेकडो वाचकांनी फ़ोन केले, इमेल
    >> पाठवल्या, इथे तिसर्या भागावर शंभरच्यावर प्रतिसाद आले पुढील भागाची विचारणा
    >> करण”

    Like

      1. चालेल…….. विशालराव.परंतु शेवट मात्र अत्यंत थरारक व उत्कंठावर्धक असावा..एवढीच विनंती

        Like

      2. चालेल…….. विशालराव.परंतु शेवट मात्र अत्यंत थरारक व उत्कंठावर्धक असावा..एवढीच विनंती ☺☺☺

        Like

      3. विशाल राव किती वर्ष झाली… कथेचा शेवट कसाही असुद्या पण तो पोस्ट करा राव.. लागला तर नंतर आपण बदलून टाकुयात … पण कृपा करून लिहा..

        Like

      4. Feel some guilt or shame…. It’s almost end of year 2021…..Corona pandemic also has *almost* ended….. Today is 15 October 2021.
        Taking undue advantage of love & liking & follow up of readers who are eagerly waiting….. If you don’t have full story, please don’t post even the 1st part. Keep start to end parts ready & then post it please.

        Like

      5. You can’t understand the pain of having the story completed and still can’t complete it. You can’t understand the pain of someone stealing your efforts and put it on social media in his own name. You can’t understand the pain that even after getting caught the bastard replies you that this is internet, if you can’t stop me stealing ur writings then it’s your problem. You can’t understand the pain when you know someone is stealing your credit and despite of knowing his name you can’t do anything.
        I have the story, but I shall publish it in my book only. I know there are many friends like you who really like my stories, for them it’s completely unfair move from me. But I am helpless. I don’t let anybody steal my efforts, my writings. Hope you understand my problem.

        Like

  3. कधी होणार आहे वर्तुळ पुर्ण? अहो सर तीन वर्ष झाली वाट पाहतोय. प्लिज लवकर पोस्ट करा. खुप उत्सुकता आहे शेवटच्या भागाची.

    Like

  4. विशाल……
    नमस्कार……
    कथा अप्रतिम आहे. कथा वाचताना त्यात हरवून गेले मी. कथा वाचताना कथेतील प्रत्येक प्रसंग जणू काही आपल्या नजरे समोर, आपल्या अवती भवती घडतो आहे असे मनाला जाणवले. जणू मी एक पात्रच झाले त्या कथेतील. कथेत पुढे काय होईल…… ह्याची मनाला आस लावणारी आणि विचारणा चालना देणारी हि कथा आहे. कथा, कथेतील तुमचे शब्द आणि प्रसंग मनाला थेट भिडणारे आहेत. तुम्ही केलेले हे लेखन खरंच खूप सुंदर आहे. भाग ४ संपून वर्षे उलटले. तरी भाग ५ काही प्रसारित झाला नाही. आम्ही सर्व तुमच्या ह्या कथेच्या भाग ५ ची आतुरतेने वाट पाहत आहोत.
    आमच्या आतुरतेचा शेवट न पाहता लवकरात लवकर भाग ५ लिहून तो वाचण्यासाठी उपलब्ध करावा कि नम्र विनंती.

    तुमची वाचक,
    ऋतुजा

    Like

      1. व्यर्थ हा फुका अभिमान
        इतके लोक वाट पाहत आहेत
        लेखक स्वर्गात गेले असतील तर तसं सांगा ना राव
        2 आसवे आम्ही पण गाळू
        पण फाट्यावर वगैरे मारणे हे शोभत नाही तुम्हाला
        बिचारा वाचक वाट बघून बघून थकला पण तुम्ही काई ऐकत नाही राव
        नेहमी 4 भाग वाचतो मी 5 वा भाग मिळत नाही म्हटल्यावर त्रास होतो
        म्हणून तो बिचारा बोलला कि delete करा ब्लॉग तर त्यात इतकं राग यायचं काही काम नाही
        आम्ही कदर करतो चांगल्या लेखनाची आणि लेखकाची बस इतकंच
        टाका 5वा भाग

        Like

  5. खूपच खूपच खूपच छान लेखनशैली चा वापर आपण केला आहात विशाल सर. मराठी कादंबरी वाचताना अगदी न राहवून थ्री डायमेन्शचा आनंद घेता आला .पुढील भागाची मृगजळाप्रमाणे वाट पाहत आहोत. कृपया लवकर तहान भिजवावी.

    Like

Leave a reply to Sheetal उत्तर रद्द करा.