श्रद्धा , भक्ती आणि असंच काही……

मुळात श्रद्धा किंवा भक्ती ही देवाची, धर्माची किंवा एखाद्या संतपदी पोहोचलेल्या व्यक्तीचीच करायला हवी हेच मला मान्य नाही. श्रद्धा कुठल्याही चांगल्या गोष्टीबद्दल असु शकते, एखाद्या स्वच्छ, समाधान देणार्‍या स्थानाबद्दल असु शकते. मला वाटते कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी श्रद्धा किंवा भक्तीमागची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही. पण मंदीरात जायला मलाही आवडतं….

काही ठराविक मंदीरांमधल्या काही ठराविक गोष्टी खुप काही देऊन जातात आपल्याला. त्यासाठी त्या देवतेवर श्रद्धा, भक्ती असण्याची गरज नसते. आपण जे काही करतोय त्यातुन आपल्याला मनाला समाधान मिळतेय की त्रास होतोय हे जर ठरवत आले तर मग ते प्रसंग मनापासून उपभोगता येता, जगता येतात.

हे असं बर्‍याचवेळा होतं माझं ! मग तो पंढरीच्या विठुच्या पावलांचा स्पर्श असो… वा शिवथरघळीतलं प्रसन्न वातावरण असो. असाच अनुभव मला अक्कलकोटी माऊलींच्या समोर उभा राहील्यावरही येतो. मी नास्तिक नाहीये पण देवभोळाही नाही. अधुनमधुन बायकोबरोबर सिद्धीविनायकाला जावे लागते, तेव्हा तासनतास त्या रांगेत उभे राहून दर्शन घेण्यापेक्षा मी कळसाला नमस्कार करून बाहेर वाट बघत बसतो. पण देवदर्शनाला लागलेल्या त्या रांगा बघितल्या की असे वाटते, बहुदा माणसाला कुठेना कुठे श्रद्धा ठेवायलाच हवी. केवळ देव म्हणुन नव्हे तर एक ‘सत’ म्हणून. जेव्हा जेव्हा तुम्ही बेचैन होता तेव्हा हि श्रद्धाच तुम्हाला आधार देते, आसरा देते, धैर्य देते.

मी सहसा देवळात जाणे टाळतो. पण साधी ठेच जरी लागली तरी ‘आई गं’ बरोबर स्वामी समर्थ हे शब्द तोंडातून येतातच येतात. गंमत म्हणजे सोलापुरकर असुनही मी फारसा अक्कलकोटच्या मठात जात नाही. मी बुद्धीप्रामाण्यवादी नाही, तरीही स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय काही गोष्टी कराव्याशा नाही वाटत. (अपवाद : सदोदीत ओठावर असलेले स्वामी समर्थांचे नाव ). देवावर माझा विश्वास आहे का नाही हे मलाच अजून नीटसे कळलेले नाही. देवळात जाताना काही विशिष्ट भाव,मागणी,लीनता,शरणागतता वगैरे मनात असते असेही काही नाही. या सर्व भक्तीभावापेक्षा माझे तथाकथित बुद्धिवादी मन(?) ईश्वरप्रतिमा आणि संकल्पनेच्या शास्त्रिय, ऐतिहासिक, सामाजिक व्युत्पत्ती,दैवतशास्त्र, मिथ्यकथा यात जास्त रमते.मात्र या वृत्तीमुळेच मला वेगवेगळ्या देवळात जायला फ़ार आवडते. (हे (ठळक केलेले) वाक्य एका जवळच्या मित्राकडुन – सत्यजीत सलगरकर, ढापलेले आहे, पण मला मनोमन पटलेले आहे 😉 )

मागे एकदा पावसला गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका गुरुजींनी सांगितलं होतं. देव का जवळ करायचा तर मोक्ष मिळावा म्हणुन. मोक्ष म्हणजे काय तर अशी एक अवस्था जिथे मनातल्या सर्व भावना, आशा अपेक्षा, वासना विरून जातात. आपण त्या निराकाराशी एकरुप होवून जातो. अशा अवस्थेला पोचायचे तर कुठल्यातरी सत गोष्टीवर श्रद्धा ठेवायलाच हवी. तदाकार होण्यासाठी एकाग्रता लागते, ती अंगी बाणवण्यासाठी तसे वातावरण लागते, त्यासाठी म्हणून खरेतर मंदीरांची संकल्पना आहे. (आजकाल बहुतांश मंदीरे व्यापारकेंद्र बनलीत हा भाग अलाहिदा) पण तिथली प्रसन्न शांतता तुम्हाला निराकारतेकडे, तथाकथित मोक्षाकडे घेवून जावू शकते, मदत करते. पण त्यासाठी मंदीरच हवे अशातला भाग नाही. मनात श्रद्धा असेल तर माणुस कुठेही एकाग्र होवू शकतो. अगदी खचाखच गर्दी असलेल्या लोकलमध्येही. पण हे प्रत्येक सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही. त्यासाठी मग देव, देऊळ या संकल्पना अस्तित्वात आल्या. ग्रेट ना!

त्या मानाने मला कोकणातली छोटी-छोटी मंदीरे खुप आवडतात. तिथे अजुनही दक्षीणेतल्या किंवा उत्तरेतल्या किंवा अगदी आपल्या देशावरल्या मंदीरांप्रमाणे (किंवा फ़ारतर तितक्या प्रमाणात म्हणु आपण) व्यापारीकरण झालेले नाही. अशा ठिकाणी शांतपणे त्या मंदीरातील छोट्याश्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना भान विसरायला होते.

आमच्या सोलापूरात, बाळीवेशेत मल्लिकार्जुनाचं एक हेमाडपंथी मंदीर आहे, कधी सोलापूरला गेलो की तिथे एक चक्कर नक्की टाकतो मी. अतिशय शांत आणि थंड असे वातावरण असते तिथे नेहमी. तसेच कधी तुळजापुरला गेलो की तिथे गावाबाहेर ‘पापनाश तिर्थ’ म्हणून एक स्थळ आहे. ते पण खुप सुंदर आहे. किंवा ‘माचणूर’चे शिवशंभोचे मंदीर. या मंदीरात तर आत शिरले की सभागृहाच्या ऐवजी एक प्रशस्त गोड्या पाण्याचे कुंड आहे. चारी बाजुने ओवर्‍या आहेत, आत उतरता येते. त्याला लागुनच गाभारा असल्याने कायम थंड असे वातावरण असते.

कोकणातील आंबोलीपाशी असलेले राघवेश्वराचे स्थान माझे अतिशय आवडते आहे. कोळीसरे येथील लक्ष्मी-केशवाचे मंदीर हाही असाच एक सुंदर अनुभव असतो. मी या ठिकाणी गेलो की गाभार्‍यात फार कमी डोकावतो, पण मंदीराचा परिसर मात्र भान विसरायला लावणारा असतो.

राघवेश्वराच्या शांत परिसरात अस्मादिक..
आंबोलीनजीक असलेल्या राघवेश्वराच्या शांत परिसरात अस्मादिक…

मला त्यातलं (अध्यात्मातलं) काही कळत नाही. माझ्या अल्पमतीनुसार मी अध्यात्माचा अर्थ काढलाय तो असा…
शब्दशः अध्यात्म या शब्दाचा विग्रह केला कि आधि + आत्म असा होतो. आधि म्हणजे आत , आत्म म्हणजे ‘मी’. माझ्या आत दडलेला जो मी आहे त्याला शोधणे, त्याला स्वतःपासुन दुर करणे, वेगळा करणे म्हणजे अध्यात्म. वर पावसच्या त्या गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे अंतीम ध्येय काय तर मोक्ष..ती निराकार अवस्था ! मानवी जिवनाची प्रत्येक गोष्ट, आशा, अपेक्षा, वासना, अभिलाषा, महत्वाकांक्षा ही त्याच्या ‘मी’ शी जोडलेली असते. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर हे विकार या ‘मी’ ला लागुनच येतात. तो ‘मी’ आपल्यातून काढून टाकला की जे उरते तो मोक्ष. निदान मलातरी या जन्मी तरी ते साध्य होइल असे वाटत नाही, पण प्रयत्नशील राहणे आपले काम आहे आणि आपण ते करत राहूच. काय?

आणि यासाठी तरी चांगला भक्त होणे फ़ारसे आवश्यक नसले, तरी एक सश्रद्ध, चांगला माणुस असणे फ़ार गरजेचे आहे असे मला वाटते. 🙂

विशाल..

9 thoughts on “श्रद्धा , भक्ती आणि असंच काही……”

  1. विशाल दा…अगदी मनातलं लिहलं आहेस…. माझी पण स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे….कधी कधी मनात एक वेगळचं द्‍वंद्वं चालु असत… देव म्हणजे नक्की काय….देव खरोखर आहे का? तो संकटकाळी आपल्याला खरोखर मदत करतो का? मग मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवते….मला सायकल शिकायची होती तेव्हा खुप भिती वाटायची पण बाबा जर सोबतीला असतील तर काहीच वाटायच नाही….त्यांनी पाठीमागे सीट पकडलेली असलेली की मस्त सायकल चालवायचो…एकदा त्यांनी नकळत सीट पकडलेली सोडुन दिली…अन मी आपला माझ्या नादात सायकल चालवत गेलो…पण ज्या क्षणी हे समजल की पाठीमागे बाबा नाही आहेत तेव्हा मात्र मी घाबरलो अन माझा सायकली वरुन तोल गेला.फ़क्त त्यांच असणं माझ्यासाठी किती महत्वाच होतं. मला आयुष्य पण असच आहे सायकल सारखं…जेव्हा कधी तुमचा तोल जायला लागतो तेव्हा तुमची कुणावर तरी असणारी श्रध्दा किंवा भक्ती तुम्हाला एक आंतरिक शक्ती देते :):)

    Like

    1. जेव्हा कधी तुमचा तोल जायला लागतो तेव्हा तुमची कुणावर तरी असणारी श्रध्दा किंवा भक्ती तुम्हाला एक आंतरिक शक्ती देते …..

      प्रचंड सहमत रे भावा ! धन्यवाद 🙂

      Like

  2. होत जाते , हळू हळू किंवा एकदम , अचानक किंवा टप्प्या टप्प्यात , वेळ यावी लागते म्हणजे सुख व दुखाचे जे भोग भोगायचे आहेत ( या जन्मात ) ते बर्यापैकी संपावे लागतात . मग कुलदेविकडे माणूस वळतो . कोणीतरी , काहीतरी कारण होते पण तिचा नाद करतोच . मग टप्प्या टप्प्याने श्री दत्त महाराज कोणातरी अधिकारी व्यक्तीच्या ( गुरु ) रुपात आपल्या आयुष्यात प्रवेश करतात . ते दत्त महाराज परत त्या भगवतीला म्हणजेच कुल देवीला जागृत करतात . गम्मत आहे कि नाही ???? कोंबडी आधी कि अंडे आधी सारखाच खेळ आहे हा . गुरु व भगवती कुंडलिनी ची जोड . कुणामुळे कोण जागृत होते ??? हे मला अजून तरी समजले नाही . आणि टी भगवती कुंडलिनी कुलदेवी जेंव्हा जागृत होते तेंव्हा तुम्ही जसे म्हणता तसे विचार , विकार , अहं सगळे लय पावू लागतात . मग गुरूंनी दाखवलेला मार्ग भक्ती , कर्मकांड , ध्यानयोग कोणताही असो . हि जोड जोवर जमून येत नाही तोवर सगळे व्यर्थ आहे . आणि प्रारब्द्ध कमी होत नाही तोवर हि जोड काही आपल्याकडे लक्ष देत नाही . व तोवर गेल्या अनेक जन्मातील साधनही अशी तडफड निर्माण करत राहते . मायेतील सगळे असूनही मधेच तीव्रतेने वाटते कि व्यर्थ आहे सगळे माझा उद्देश काही वेगळाच आहे . असो हा न संपणारा विषय आहे .

    Like

यावर आपले मत नोंदवा