झक मारते राव तुमची स्कॉच !

गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक – दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे ‘पळी’ गावापाशी एक पाटी बघीतली होती…

“डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स….!”

कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे. इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सोडा मिळतो, त्यातही आईसक्रीम सोडा नावाचा एक मस्त प्रकार प्यायला मिळतो. तेव्हा ठरवले की यावेळी अलिबागला जावू तेव्हा भेट द्यायची.

काल परवा परत एकदा नागाव बीचला चक्कर झाली.

नागावचा देखणा सागर किनारा

माझी फ़ोटोग्राफी

साहजिकच यावेळी परत नागाव बीचला गेलो तेव्हा त्या पाटीसमोरून जाताना भुवया उंचावल्या आणि आपोआप गाडीचे ब्रेक लागले.

एक छानसी कोकणातल्या एखाद्या वाडीतले घर शोभावे असे वाटणारी (निदान बाहेरुन तरी) अशी ही छोटीसी वास्तु आहे. आत गेलो तर काही लाकडी टेबल आणि खुर्च्या (खरे म्हणाल तर बाकडी) मांडलेली होती. समोर कुणीच दिसत नव्हतं….

डि. सॅमसन कोल्ड्रिंक हाऊस
डि. सॅमसन कोल्ड्रिंक हाऊस-क्लोज अप

मी “नमस्कार, कुणी आहे का?” म्हणून हाळी दिली. तसे एक सदगृहस्थ समोर आले. आम्ही बसल्या बसल्या समोरच्याच भिंतीवर लावलेला श्री.  डि. सॅमसन उर्फ़ सॅमसन दिगोडकर यांचा फ़ोटो दिसला.

डि. सॅमसन उर्फ़ श्री. सॅमसन दिगोडकर : आईसक्रीम सोड्याचे जनक

त्यांच्याकडे मिळणार्‍या विविध सोड्यांचे दरपत्रक दाखवणारा बोर्ड दिसला.

दरपत्रक

आमचे आकर्षण अर्थातच तिथला “आईसक्रीम सोडा” होते. पण तिथली यादी पाहताना साहजिकच आत्तापर्यंतचा आवडता सोड्याचा प्रकार म्हणजे आमचा लाडका गोटी सोडा आठवला.

गोटी सोडा {छायाचित्र आंतरजालावरुन साभार}

देशावरच्या बहुतेक सर्व बस स्टँडच्या बाहेर सायकलवर मागच्या कॅरियरला लावलेल्या स्टँडवर अडकवलेले ते हिरव्यागार काचेच्या बाटल्यांचे क्रेट, बाटल्यांवर ठेवलेली कधी हिरवीगार तर कधी पिवळीशार लिंबं. सायकल मिडल स्टँडला लावून एका अंगाने तिच्या मधल्या नळीला आपल्या कंबरेचा आधार देत समोरच्या गिर्‍हाईकाला खुश करणारा तो आतिथ्यशील (?) सोडा विक्रेता.

अर्थात त्यातल्या त्यात व्यवसायात सेटल झालेला एखादा गोटी सोडावाला आपला स्वतःचा स्टॉल ताकण्यात यशस्वी होतो, पण गोटी सोडा प्यावा तो सायकलवरच्या विक्रेत्याकडुनच. कारण त्याच्या वागण्या-बोलण्यात अजुन ती दुकानधारक झाल्याची गुर्मी आलेली नसते.

{छायाचित्र आंतरजालावरुन साभार}

ती हिरव्या रंगाची काचेची बाटली. मग त्याचे ते बाटली जोरजोराने हलवून काचेच्या बाटलीच्या तोंडाशी असलेली काचेची गोटी अंगठ्याच्या साहाय्याने खाली बाटलीत पाडणे आणि फसफसणारा सोडा स्टीलच्या किंवा काचेच्या ग्लासात ओतून मग त्यावर थोडेसे मीठ किंवा मसाला भुरभुरून गिर्‍हाइकाला प्यायला देणे. एकदा का तो फसफसणारा गोटी सोडा तोंडाला लावला की….

झक मारते राव तुमची व्हिस्की आणि स्कॉच !

तर सांगायची गोष्ट अशी की आम्हाला सवय गोटी सोड्याची!

त्यानंतर कधीतरी कुर्ल्याला स्टेशनवर मसाला सोडा पिलेला, तोही आवडला होता. एका काचेच्या ग्लासात तो मशिनमधला फ़ाऊंटन सोडा घेवून ( पुष्कळ विक्रेते स्प्राईट ही वापरतात, त्यात मस्तपैकी लिंबू आणि गिहाईकाच्या मागणीनुसार जलजीरा पावडर मिक्स करुन दिलेला तो फ़सफ़सणारा सोडादेखील खुप आवडायचा.

त्यानंतर एकदा माथेरानला एका अशाच कोल्ड्रिंक स्टॉलवर गटागट पिलेले “मसाला थम्स अप” हे देखील भन्नाटच रसायन होते. बाटलीतले थम्स अप ग्लासमध्ये काढून त्यात लिंबू आणि चाट मसाला मिक्स करुन तो प्यायला दिला जातो. त्याचीही चव फंडु असते. तिथेच लिची सोडादेखील ट्राय केला होता.

माथेरानचे ’मसाला थम्स अप’ हा पण एक मस्त अनुभव असतो.{छायाचित्र आंतरजालावरुन साभार}

त्यामुळे आता आईसक्रीम सोडा काय आहे, हे जाणून घ्यायची इच्छा होती. ग्लास तोंडाला लावला, एका दमात संपवला, दुसरा मागवला…तोही संपला आणि जाणवलं की फारसं वेगळं नसलं तरी हे प्रकरण आपल्याला आवडलंय. थोडासा स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसारखा लागणार गोडसर फ्लेवर होता, फार काही विशेष नव्हते पण आतापर्यंत पिलेल्या सोड्यापेक्षा हा प्रकारच वेगळा होता. खास म्हणजे सोडा पिताना छातीत होणारी जळजळ अजीबात जाणवत नव्हती तरीही सोडा पिताना मिळणारा आनंद मात्र तसाच होता. त्यानंतर साहजिकच तिथले आणखी एक्-दोन प्रकार ट्राय करुन झाले. पण आईसक्रीम सोड्याची चव त्याला नव्हती. तृषाशांती झाल्यावर आता लक्ष इकडे तिकडे वळले. भिंतीवर सगळीकडे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून डि. सॅमसन यांच्या या सोडा फॅक्टरीबद्दल छापून आलेले लेख फ्रेम करुन चिकटवलेले / अडकवलेले होते. ते वाचताना मिळालेली माहिती अशी…

१९३८ साली डि. सॅमसन यांनी सोड्याची ही फॅक्टरी ‘पळी’ या गावात सुरू केले. दिगोडकर कुटूंबीय मुळचे ज्यु इस्त्रायलचे पण पिढ्यानुपिढ्या महाराष्ट्रात स्थायिक झालेले. महाराष्ट्रात अलिबाग मधील दिगोडे या गावी स्थायिक झाल्यामुळे बहुदा त्यांचे आडनाव दिगोडकर पडले असावे. बहुदा स्वातंत्र्यपूर्व काळात अलिबागच्या परिसरात ब्रिटीश अधिकार्‍यांचा पर्यटनस्थळ म्हणुन राबता असावा. त्याकाळी एतद्देशियांना ‘सोडा’ हे नाव देखील माहीत असण्याची शक्यता कमीच होती. पण सॅमसन यांनी ब्रिटीश अधिकार्‍यांची हि गरज ओळखुन पळी येथे ही सोडा बनवण्याची फॅक्टरी सुरू केली आणि बघता बघता सॅमसन यांच्या आईसक्रिम सोड्याची लोकप्रियता मुंबईच्या परिसरात सर्वत्र पसरली. त्यावेळी आत्ताचे तीन वीरा धरण अस्तित्वात नव्हते त्यामुळे बहुदा त्यांनी पाण्यासाठी एक विहीर बांधुन घेतली. मुळ पेट्रोमॅक्स आणि स्टोव्ह रिपेयरींगचा व्यवसाय करणारे सॅमसन दिगोडकर या सोडा फॅक्टरीच्या व्यवसायात आले आणि मुळ व्यवसाय मागेच पडला. त्यांच्यानंतर त्याचे चिरंजीव श्री. डॅनियल दिगोडकर यांनी ही फॅक्टरी अजुन वाढवली. साधारण १९५२ च्या दरम्यान बॉटलिंग मशिन घेवून व्यवसाय वाढवला. श्री. डॅनियल यांच्या मृत्युनंतर त्यांच्या भगिनी येलिझाबेन हा व्यवसाय सांभाळत होत्या. त्यांच्याबद्दल अद्ययावत माहिती नाही मिळू शकली. आजही अलिबाग, मुरूड कडे जाणारे पर्यटक इथे थांबून आईसक्रिम सोड्याचा आस्वाद घेतात. बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात (जवळ जवळ ५०% कमी) विकली जाणारी इथली थंडपेये खरोखर तहान भागवणारी, थकल्या जिवाला शांत करणारी अशी आहेत. विशेष म्हणजे कुठल्याही पेयाचा दर रुपये १० पेक्षा जास्त नाही. तुम्हाला बरोबर घेवून जायचे असल्यान पॅक (पेट) बॉटल्सदेखील मिळतात. किंमत साधारण २५ रुपये.

डि. सॅमसन यांनी १९३८ साली रुजवलेल्या या छोट्याश्या रोपट्याची ख्याती आज महाराष्ट्रभर झाली आहे.

मग कधी जायचं “पळी” गावचा डि. सॅमसन यांचा ‘आईसक्रीम’ सोडा प्यायला?

विशाल कुलकर्णी.

20 thoughts on “झक मारते राव तुमची स्कॉच !”

  1. सोडा पुराण छान झालंय. आमचा आणि सोड्याच संबंध केवळ डायलूशन साठीच. तसा एक सिकेपी मित्र वांग्याची भाजी आणायचा डब्यात, ज्या मधे सोडे घातलेले असायचे.
    गोटी सोडा हा प्रकार तर अफलातून. अजूनही नाशीक रस्त्यावर मिळतो रस्त्या शेजारी फक्त मसाला सोडा मिलतो.

    Like

  2. धन्स दादा. बरेच दिवस लिहीन म्हणत होतो पण वेळच होत नव्हता. आज जरा मोकळा वेळ मिळाला टंकून टाकलं झालं. मी बाकी काही घेत नाही (गेल्या ३-४ वर्षापासुन 🙂 ) पण सोडा मात्र भयंकर आवडतो, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळ्या प्रकारचा सोडा ट्राय करायला आवडते मला.

    Like

  3. विशालदादा,
    अरे हे लय भारी दिसतंय प्रकरण! स्टेशनवरच्या जलजीरा सोड्याचा मी पण पंखा आहे! मी घरी बी बनवतो (इथे म्युनिसिपल पाणपोईवर सोडा भरण्याचीसुद्धा सोय आहे). बाकी पेयांचा मी आस्वाद घेत नाही 🙂
    मस्तच लिहिलंयस!

    Like

  4. हे हे हे शाळेत असताना गोटी सोड्याच खूप आकर्षण होत रे …….

    आता अलिबाग ला गेलो की आईस्क्रीम सोडा मारून येतो …;)

    Like

    1. धन्स रे मंदार. मुळातच सोडा हा आवडता प्रकार असल्याने (त्याच्यापुढे आपली मजल जावु शकत नाही म्हणुन आवडतो 😉 ) लिहील्याशिवाय राहीले नाही. 🙂

      Like

  5. मला सोडा तर खुपच आवडतो, त्यात गोटी सोडा. १ नंबर.
    कल्याण ला कर्णिक रोडवर असाच सोडा विकणारा आहे. मस्त मजा होती जेव्हा मी तिथे राहायचो.

    अजून पुण्यात नाही सापडलं एखादं दुकान…

    Like

  6. Mitra, barech divas jhale aaple darshan naahi jhale,

    Govinda Gela, Ganapati Aale, Navratra yenar aahe,

    Pan aapli bhet kadhi honar aahe….

    Aayushya he aasech chalnar aahe, chal naa yaar yeto naa tu bolnar aahes,

    pan vel sarte, maitri kadhi sarat naahi…

    “Atavanit MHATARPAN kadhi yeil hehi sangata yet naahi.. ”

    Suhas for you.. Please read it …. and phone me afterwards for this KAVITA…

    Like

  7. मला बाबा लहान असताना सर्दी झाली की आईस्क्रीम सोडा प्यायला न्यायचे …..अरे काय मस्त लागतो…तेवढ्यासाठी सर्दी मला आवडायची….बरेच दिवसांनी आठवण झाली या सोड्याची….

    Like

  8. मागच्याच रविवारी अलिबाग ला गेलो होतो. सकाळी जाताना दुकान बंद होत. पण येताना मुद्दाम थांबून सोडा पिऊन आलो. खरा तर तुडुंब जेवल्यामुळे जास्त भूक नव्हती पण आईस्क्रीम सोडा घशाखाली गेला आणि जे काही बर वाटलंय त्याला तोड नाही.

    Like

Leave a reply to विशाल कुलकर्णी उत्तर रद्द करा.