RSS

डेमाँस्ट्रेशन…

09 सप्टेंबर

सप्टेंबर २०१०

भल्या पहाटे आठ-साडे आठच्या दरम्यान मोबाईल बोंबलला.
“च्यामारी, सकाळ सकाळ कोण पेटलाय आता. घरी बायको उठवते सकाळी सकाळी, निदान घरापासुन दुर आल्यावर तर निवांत झोपू द्या लेको!”

मी तणतणतच उठलो आणि फ़ोन घेतला.

“विशल्या, पशा बोलतोय, आलास का बे दिल्लीत?”

“प्रसन्ना, तू आहेस होय? साल्या एवढ्या सकाळी उठवत असतेत होय रे. एकतर काल रात्री १ वाजला हॉटेलवर यायला. मीरतवरुन दिल्लीलाच पोचलो साडेअकराला, तिथुन टॅक्सी वगैरे ठरवून गुरगावला हॉटेलवर येइपर्यंत दिड वाजला. झोपायला दोन आणि सकाळ होत नाहीतर तू उठवतोयस्.कुठे फेडशील ही पापे? साल्या तुझ्या सात पिढ्या नरकात जातील.”

“सॉरी यार, राहवलं नाही. इतक्या दिवसांनी भेटतोयस भXX ! बरं ते सोड, किती वाजता भेटतोयस ते सांग?”

“अरे सकाळी एक डेमो आहे माझा. आता ९.३० वाजता गाडी येइल. १० वाजता क्लायंटच्या हापिसात, ११ वाजेपर्यंत डेमो आटपेल त्यानंतर डेटा डाऊनलोड करुन द्यायला ५-१० मिनीट. १०-१५ मिनीट बिनकामाच्या गोष्टी डिस्कस करुन झाले की मी रिकामा. साधारण १२-१२.३० पर्यंत कॅनॉट प्लेसला पोहोचेन. तू तिथेच भेट मला. ओक्के?”

“डन, माय डिअर! आय एम लै एक्सायटेड यार विशल्या. साल्या ११ वर्षांनी भेटतोय आपण्.माहितीय?”

“खरच रे, कॉलेज संपल्यानंतर काळ कसा गेला काही कळालेच नाही. आपण भेटू यार नक्कीच. मी गुरगाववरून निघताना फोन करेन.”

त्यावेळी जर माहीत असतं की आजची संध्याकाळ पश्याच्या शिव्या खाण्यात जाणार आहे तर ……

********************************************************************************************************
फ्लॅशबॅक….

३१ ऑगस्ट २०१० च्या सकाळी १० वाजता मुंबईहुन उडालो, दिडच्या दरम्यान (एअर ट्रॅफिकचा नेहमीचा घोळ) दिल्लीत उतरलो. तरी बरे वातावरण बर्‍यापैकी शांत होते वर. निळे पांढरे ढग मस्त दिसत होते…..
मेघदुत

पाठीवरची लॅपटॉपची सॅक सांभाळत कन्वेयर बेल्टपाशी लगेज ताब्यात घेण्यासाठी हजर झालो.
दुपारी ३.२५ ची नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन डेहराडुनला जाणारी जनशताब्दी पकडून मीरत गाठायचे होते. १५ मिनीटे बेल्टपाशी उभा होतो,  सगळे जण आपापल्या बॅगा घेवुन जात होते. आता बेल्टवरच्या बॅगाही कमी-कमी होत संपत आल्या होत्या. आमच्या लगेजचा पत्ताच नाही. जाम तंतरली. माझ्या हार्डकेसमध्ये जवळपास १४ लाखाची डिजीपीएस युनीटस होती हो….

तेवढ्यात एक पोर्टर सांगत आला.

“मुंबईसे आयी हुयी IC flight का कुछ लगेज बेल्ट नंबर तीन परभी आ रहा है!”

आम्ही धावत पळत तिथे…, माझी केस दिसली आणि जिवात जिव आला. केस आणि ट्रायपॉड (मेटॅलिक स्टँड) ताब्यात घेतले आणि प्रिपेड टॅक्सीच्या बुथ कडे धाव घेतली. वेळ झाली होती २ वाजुन २५ मिनीटे! हुश्श… बर्‍यापैकी वेळ हातात होता अजुन. अर्थात दिल्लीमधल्या ट्रॅफिकचा काही भरवसा देता येत नाही. त्यात विमानतळापासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता तर अगदीच गजबजीचा. टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले….

“भैय्या पहले ए.सी. चालु करो और नई दिल्ली चलो. सवा तीन बजे से पहले पहुंचना है!”

आत्ता माझ्या लक्षात आले, सकाळी मुंबईत धो धो पाऊस होता आणि इथे ३३-३४ तापमान होतं.  तो पठ्ठ्या मात्र तयारीचा होता. ३.१० ला गाडी टच केली हिरोने. परत नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यावर तेवढ्यातल्या तेवढ्यात हमालाशी घासाघिस करुन मी माझा मराठी बाणा घासुन पुसुन लखलखीत करुन घेतलाच.कसेतरी करून गाडी पकडली. डेस्टिनेशन मीरत…..!

रात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी कस्टमरकडे गेलो…अर्थात डेमोसाठी!

****************************************************************************************
१ सप्टेंबर २०१०

मघापासुन मी डेमो-डेमो करतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल कसला डेमो? तर आमची कंपनी डिजीपीएस सिस्टीम्स बनवते, विकते.
DGPS stands for Differential Global Positioning system.

सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास जीपीएसचा वापर मॅपींग (नकाशे) साठी केला जातो. मग त्यात रोड सर्व्हे, पाईपलाईन सर्व्हे, जी.आय.एस. (geographic information system as an framework for managing and integrating data) सर्व्हे, एअरो फोटोग्राफी अशा विविध कारणासाठी केला जातो.

जीपीएस अर्थात ग्लोबल पोजिशनींग सिस्टीम काय करते?

तर एखाद्या स्पेसिफिक जागेचे कॉर्डिनेटस अर्थात अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे अ‍ॅटलासवरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस सिस्टीम ५ ते १० मिटर किंवा जास्तच अ‍ॅक्युरेसी देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या पॉईंटपासुन ती नेमकी जागा ५-ते १० मिटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अ‍ॅक्युरेसी वाढवण्यासाठी डिफरंशिअल सर्व्हिस वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. सिस्टम्स वापरुन त्यांच्यापासुन मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अ‍ॅक्युरेसी मिळवली जाते.

So here comes OmniSTAR! Our company!

ओमनीस्टारने जगभरात जवळपास १२० बेस स्टेशन्स बसवली आहेत अद्ययावर जी.पी.एस. सिस्टम्ससहीत. ही बेस स्टेशन्स कायम २४/७ , विविध सर्व्हे सॅटेलाईटकडुन कच्चा डेटा (raw data)  गोळा करत असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या डिफेन्स सर्व्हिसेससाठी काही (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकुण संख्या ३२च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टीम या उपग्रहांकडुनच पृथ्वीचा सर्व भौगोलिक डेटा जमा करत असते. तर ओमनीस्टार बेस स्टेशनदेखील हा डेटा सतत गोळा करत असतात. हा सर्व डेटा नंतर ओमनीस्टार नेटवर्क कंट्रोल सेंटरला पाठवला जातो, जिथे तो आणखी अ‍ॅक्युरेट बनवण्यासाठी रेक्टीफाय (in technical language it is called as Post processing) केला जातो. नंतर ओमनीस्टारच्या जिओ-स्टेशनरी सॅटेलाईटसच्या साह्याने तो पुन्हा जगभरातील ओमनीस्टार बेस स्टेशन्सला पुनः प्रक्षेपित केला जातो. भारतामध्ये ओमनीस्टार डेटा एशिया पॅसिफिक सॅटेलाईट या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केला जातो. मग त्या त्या भागातील बेस स्टेशनच्या परिसरात काम करणार्‍या जी.पी.एस, सिस्टीम्स हा डेटा मिळवु शकतात. आता मात्र या डेटाची अ‍ॅक्युरेसी १०-१५ सेंटीमिटर इतकी असते.

सर्वसाधारण प्रोसेस….
OmniSTAR

मला वाटतं एवढं पुरेसं आहे, हुश्श !

तर मी मीरतला डेमोसाठी पोहोचलो….!

पण इथे परिस्थिती वेगळीच होती. जी.पी.एस.साठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे जीपीएसला उपग्रहाचा क्लिअर व्ह्यु असणे आवश्यक असते. जर मोठी झाडे, टोलेजंग इमारती किंवा इतर काही अडथळा जीपीएस अँटेना आणि उपग्रह यांच्यामध्ये आला की मग मात्र अ‍ॅक्युरेसीची वाट लागते. इथे जी डेमोची जागा मला देण्यात आली होती ती आजुबाजुला मोठ मोठ्या इमारती आणि झाडीने वेढलेला होता. त्यामुळे वाईट अवस्था झाली. दहा मिनीटात होणार्‍या कामासाठी दोन तास वेळ द्यावा लागला. पण एकदाचा डेमो आटपला…

दुपारचे अडीच वाजले होते. माझी परतीची ट्रेन रात्री ९.३० ची होती. म्हणुन आमच्या स्थानिक ड्रायव्हरला पटवून त्याला गाडी “काली पलटन” मंदीराकडे घ्यायला लावली.

“काली पलटन मंदीर”

प्रत्येक देशभक्त भारतीयासाठी हे मंदीर म्हणजे काशी विश्वेश्वरापेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरावे. कारण १८५७ च्या स्वातंत्र्य समराची सुरुवात इथुन झाली होती. या समराचे सगळे नियोजनच मुळी या मंदीरात केले गेले होते.

त्याकाळी बहुदा ते एक छोटेसे अघोरनाथ शिवशंकराचे मंदीर असावे. पण आज त्या ठिकाणी मोठे मंदीर बांधण्यात आले आहे. इथे शिवशंभुची स्वयंभु पिंडी आहे. मंदीरात पिंडीबरोबरच शिव पार्वतीच्या मुर्तीदेखील आहेत.

इथुन दर्शन घेवून गाडी ‘शहीद पार्क’ कडे घेतली.

१० मे १८५७ रोजी अवघ्या ८५ सैनिकांनी इथे सदर बझार विभागात ब्रिटीशांवर हल्ला चढवला होता. त्यापुर्वी हुतात्मा झालेला मंगल पांडेदेखील याच पलटणीचा सैनिक होता. ही पलटण काली पलटन या नावाने ओळखली जाते. आई कालीमातेच्या नावाने. इथे हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा तसेच एक वस्तु संग्रहालयदेखील आहे. या संग्रहालयात १८५७ च्या स्वातंत्र्यसमरासंबंधीत वस्तु, छायाचित्रे यांचे संग्रहण आहे. इथेच मला नानासाहेब पेशवा तसेच तात्या टोपे यांचीही छायाचित्रे बघायला मिळाली.

हुतात्मा मंगल पांडेंचा पुर्णाकृती पुतळा

हुतात्मा सैनिकांचे स्मारक…

श्रीमंत नानासाहेब पेशवा आणि वीर तात्या टोपे

संध्याकाळी ६-६.३० पर्यंत सगळे आटपून पुन्हा एकदा हॉटेल गाठले आणि पोटपुजा आटपुन घेतली. कारण एकदा स्टेशनवर गेले की मग सगळे सामान वागवत पुन्हा जेवणासाठी म्हणुन शहरात येणे शक्य नव्हते. साडे सातच्या दरम्यान ड्रायव्हरने मला स्टेशनवर परत सोडले.

जोगिंदर… माझा स्टायलिश ड्रायव्हर !

रात्री ९.२५ ला येणारी डेहराडुन शताब्दी चक्क….. ९.२५ ला स्टेशनवर हजर होती. (अर्थात नंतर ती गाझीयाबादच्या परिसरात अडकुन माझी वाट लावणार होती ही गोष्ट अलाहिदा). तर आम्ही दिल्लीकडे मार्गक्रमण करते झालो. मधला गाझियाबादचा अडथळा धरुन गाडी १२-१२.३० च्या दरम्यान (दिल्लीत पोहोचायची तिची वेळ १० वाजताची आहे) दिल्लीत पोचली. माझे हॉटेल गुरगावमध्ये होते. मग पुन्हा टॅक्सीवाल्याशी घासाघिशी. सुरुवात साडे आठशे रुपयांपासुन झाली. मी माझे सगळे सेल्सचे कौशल्य वापरुन त्याला ४७५ रुपयात पटवला आणि हॉटेल गाठले. रात्रीचा दिड वाजला होता.

**********************************************************************************************************
२ सप्टेंबर २०१० : पुन्हा वर्तमानात…..

मारे ऐटीत पशाला सांगितले होते की जास्तीत जास्त साडे बारा पर्यंत त्याला कॅनॉट प्लेसला भेटेन पण मला कुठे माहित होते माझे बारा कस्टमरच्या रिसेप्शनमध्येच वाजणार होते. ज्याला डेमो द्यायचा होता तो त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजरच आला खुप उशीरा. आल्या आल्या त्याने बॉंम्ब टाकला.

“विशाल, मेरेको डेमो ऑन साईट चाहिये! It’s something 32 kms from here. Is that Ok with you?”

नाही म्हणुन सांगतो कुणाला? तेवढ्यासाठी एवढा खर्च, एवढा आटापिटा करुन इथपर्यंत आलो होतो.
थोड्याच वेळात आमचे वर्‍हाड (मी, माझे दोन सहकारी, कस्टमरचा प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्याची ७-८ जणांची टीम) डेमोच्या स्थळाकडे निघाले. गुरगावपासुन साधारण २६ किमी अंतरावर सोना (Sohna) म्हणुन एक छोटेसे उपनगर आहे. तिथुन पुढे दहा किमी अंतरावर एक घाटाचा रस्ता आहे. तिथे त्यांनी ऑलरेडी काही पाँईंट्स मार्क करुन ठेवले होते. त्या पॉईंट्सवर माझ्याकडुन मिळालेले अक्षांश, रेखांश त्यांच्या डेटाशी टॅली करुन मग माझ्या साधनाची उपयुक्तता ठरवण्यात येणार होती. हे पॉईंट्स त्यांनी टोटल स्टेशन वापरुन जमा केलेले होते. टोटल स्टेशन देखील अतिशय चांगली अ‍ॅक्युरेसी देते, अगदी मिलीमिटरमध्ये ! पण त्या सर्व्हेला खुप वेळ लागतो. ते पंधरा पॉईंट्स टोटलस्टेशनने मार्क करायला त्यांना दोन दिवस लागले होते, जे मी त्यांना माझ्या डि.जी.पी.एस. अडीच ते तीन तासात देणार होतो.

आम्ही सुरुवातीच्या पॉईंटपाशी पोहोचलो.

“विशाल, यहा तुम्हे पहला पॉईंट लेना है! और यहासे चलते हुये बिचमें खाईमें कुछ पॉईंट और आखरी पॉईंट वहा होगा!” इति  प्रोजेक्ट मॅनेजर.
मी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि मोबाईल बाहेर काढून पशाला फोन लावला.
“पशा, आपण संध्याकाळी भेटू बे, सहाच्या नंतर, मी इथे अडकलोय.”

आणि मोबाईल स्विच ऑफ करुन डेमोला सुरुवात केली.
कुठलाही डिफरेंशिअल जी.पी.एस. सुरू केल्यावर हवी ती अ‍ॅक्युरेसी मिळवण्यासाठी थोडा वेळ initialize करावा लागतो. आपण मोबाईल चार्ज करतो तसे. क्लायंटने त्यांचे टोटल स्टेशन फिक्स करायला सुरूवात केली आणि मी माझा डि.जी.पी.एस. initialization ला लावला.
टोटल स्टेशन सेट-अप

ओमनीस्टार डि.जी.पी.एस. सेट्-अप

हा तो पुर्ण पॅच जिथे आम्ही आमचा डेमो सर्व्हे केला.(पुर्ण सर्व्हेचा गुगल अर्थवरुन घेतलेला अंदाजे फोटो…)

आणि हा  पॉईंट लोकेशनसहीत गुगल अर्थ फोटो….

जी.पी.एस. इनिशियलाईझ करायला ठेवला आणि मी आजुबाजुला उंडगायला लागलो. त्यासाठी किमान १५-२० मिनीटे लागणार होती.

आमचा डेमो बघायला काही प्रेक्षकही लाभले होते. हे साहेब त्यापैकीच एक…

घाटातले वरचे काही फोटो घेवून मग खाली दरीत उतरायला सुरूवात केली.

ट्रेकिंगचा अनुभव होता पाठीशी, पण खांद्यावर जी.पी.एस. युनिट आणि हातात रेंज पोल घेवून दरी उतरणे , पुन्हा चढणे हा अनुभव भन्नाटच होता. त्यातच मध्ये असे काही अफलातून रॉक पॅचेसही होतेच.

शेवटचा पॉईंट इथे घेतला.

दुर्दैवाने अस्मादिकांचे सारे फोटो पाठमोरेच आले आहेत. एखादाच कॅमेर्‍याकडे थोबाड करून असेल.

एकेक करत एकुण पंधरा पॉईंटस मार्क केले. मध्येच काही वेळा सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने पुन्हा इनिशियलाझेशन करावे लागले. पुन्हा त्यात वेळ गेला. सगळे पॉईंट्स मार्क करेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. त्यानंतर अर्थातच जेवणाची वेळ झाली. दरीत चढ-उतार करुन सगळेच हाडाडलेले होते. त्यामुळे समोर आले त्याच्यावर सणकुन आडवा हात मारला.

पुढचे काम सोपे होते. तिथुन क्लायंटच्या ऑफिसमध्ये परत आलो. डेटाकंट्रोलरवरचा डेटा लॅपटॉपवर डाऊनलोड करुन घेतला. अ‍ॅनालाईज करुन क्लायंटच्या स्वाधीन केला, साधारण १२-१३ सेंटीमिटर अ‍ॅक्युरेसी दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. इथे कस्टमरच्या एका अतिशहाण्या सर्व्हेयरने पुन्हा गोची केली. त्याने सगळा डेटा गुगल अर्थवर टाकला, तिथे साधारण एक मिटरची एरर दिसत होती. म्हणलं बोंबलली सगळी मेहनत.

होते काय की हे सर्व्हेयर लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक असतात. गुगल अर्थ तुम्हाला तुमच्या घराचाही एरियल फोटो देवू शकते, तेव्हा ते अ‍ॅक्युरेट असलेच पाहीजे असा बहुतेकांचा गोड गैरसमज असतो. पण मुळात गुगल अर्थ ची अ‍ॅक्युरेसी साधारणपणे ५० ते ६० मिटर किंवा त्यापेक्षाही कमी असु शकते. या सगळ्या गोष्टी त्या शहाण्या (अति म्हणा, दिड म्हणा) सर्व्हेयरला समजावून सांगण्यात पुन्हा एक तास गेला.

सगळं यशस्वीरित्या आटोपून परत निघालो तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. मोबाईल काढला, पशाला फोन केला…

“पशा, जाम थकलोय यार! मला नाही वाटत आज यायला जमेल म्हणुन.”

“हरकत नाय यार, मी पण सिविल इंजीनीअर आहे, मला माहीतीय सर्व्हेचे काम कसे आणि काय असते ते. तुझ्या हॉटेलचा पत्ता दे, मी येतो. तिथेच बसु गप्पा मारत.”

आणि मग त्या रात्री जी काही मैफिल जमली कि विचारु नका !अर्थात फक्त गप्पां आणि शाकाहारी जेवणाची, कारण आम्ही दोघेही श्रावण पाळतो. गप्पा मात्र शाकाहारी नव्हत्या बरं !

पण आता मी ठरवलय, कुठे डेमाँस्ट्रेशनला जायचे असेल तर आधीच क्लायंटला लोकेशन नीट विचारून घ्यायचे……!
पुढच्या महिन्यात बहुदा राजस्थानचा दौरा आहे. पुढचे डेमाँस्ट्रेशन बहुदा जेसलमेर, राजस्थान…….!

विशाल कुलकर्णी

 

11 responses to “डेमाँस्ट्रेशन…

 1. महेंद्र

  सप्टेंबर 9, 2010 at 2:50 pm

  सही रे.. मी मिल्ट्रीच्या ए आरपी च्या ट्रायल्स मधे इन्व्हॉल्व्ह होतो इंजिनिअर असतांना, तेंव्हा पण अशीच मजा यायची. प्रत्येक गोष्ट एंजॉय करायला शिकतो माणूस मार्केटींग मधे असला की.
  मी तर ट्रॅफिक जाम मधे पण बोअर होत नाही हल्ली.. 🙂

   
 2. विशाल कुलकर्णी

  सप्टेंबर 9, 2010 at 4:04 pm

  धन्यवाद दादा !

   
 3. जयंत

  सप्टेंबर 9, 2010 at 10:24 pm

  विशाल,

  छान लिहीले आहेस. जेव्हा GPS भारतात पहिल्यांदा आले तेव्हा मी आर्य ब्रिंक्स साठी त्यांच्या कॅश व्हॅन साठी ट्रॅकर बनवला होता त्याची आठवण झाली. गंमत म्हणजे मला त्या बद्दल ओ का ठो माहीत नव्ह्ते. 🙂

  जयंत कुलकर्णी.
  एक अनाहूत सल्ला. अशा लेखात आपल्या customer ची नावे देऊ नयेत.

   
  • विशाल कुलकर्णी

   सप्टेंबर 10, 2010 at 9:31 सकाळी

   नमस्कार जयंतदादा,

   अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार ! आपला सल्ला यापूढे ध्यानात ठेवीन.

   सस्नेह,
   विशाल

    
 4. Aparna

  नोव्हेंबर 19, 2010 at 2:02 सकाळी

  I liked this post as I am myself a telecomm enggineer with long lost contact with telecomm (and I know its a shame) but I still could tell myself how interesting it is to read all that…Its tiring but a pretty intersting job you have….
  याआधी नासाच्या केंद्राला भेट दिली होती फ्लोरिडामध्ये तेव्हा telecomm ला असाच मिस केल होत…..:(

   
 5. विशाल कुलकर्णी

  नोव्हेंबर 19, 2010 at 10:00 सकाळी

  धन्स अपर्णा 🙂

   
 6. mandar kulkarni

  फेब्रुवारी 22, 2011 at 4:09 pm

  Nice narration.I feel very nice to reading it since I am also Civil Engineer & presently working as Asst.Manager-Planning. I was associated with your client Gammon India Ltd 4 years before. Keep It up, I like your blog very much!!!!

   
 7. full2dhamaal

  फेब्रुवारी 4, 2012 at 1:47 pm

  फार सुंदर माहिती….

  मी टेबलाच्या तुसर्या बाजूला बसतो…..तरी पण मी तुमचा त्रास समजू शकतो…..काम करून घेणाऱ्या माणसाने जर वेळ पाळली तर खूप गोष्टी सुरळीत होतात…

  मार्केटिंग वाले बर्याच वेळा अव्वाच्या सव्वा गोष्टी सांगून ओर्डर मिळवतात आणि त्रास मात्र फिल्ड वर्क करणार्या दोन्ही बाजूंना होतो….

  त्यामुळे मी तरी मार्केटिंग आणि फिल्ड वर्क करणारा दोघांना एकत्रच बोलावतो….सगळे मिळून साईट विजीट देतो…आणि मगच कामाची यादी करतो….

  निदान पहिले २/३ तास तरी पेपर वर्क….तुमचे काय आणि आमचे काय….तिसर्या पार्टीची मदत….कोण घेणार…कशी घेणार..कधी घेणार….इ.

  माझे ९०% काम तरी व्यवस्थित होते….(१०% देवाचे….म्हणजे हवेतील बदल,आजारपण,गाडीचा अपघात इ.)

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: