सुरुवात….!

एक पत्रकार या दृष्टीकोनातुन पाहीले तर ही संपुर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी. पण जेव्हा सुखदेवकाकांबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन या रणरागिण्यांना भेटलो,

त्यांच्या या जगावेगळ्या संघर्षाची कथा ऐकली तेव्हा थक्कच झालो. सुखदेवकाका आणि भारतीताईंबरोबर त्या दिवशी अंजनाबाईंना आणि त्यांच्या सहकारी भगिनींना भेटलो. त्यांच्याच तोंडून त्यांची कर्मकहाणी ऐकली ……..
………………………………………………………………………………………………

“आता काय करायचं वो यशोदाताई? समदे रस्ते अडवुन धरलेत त्यांनी. भरीत भर म्हुन शांताक्का सकट इकत्या जनांना पोलीसांनी धरलय? मला तं कायबी सुचत न्हाय? ”

राधाबाईंच्या डोळ्यात पाणी उभे होते. केलेले साहस अंगावर तर येणार नाही ना याची भिती होतीच. वर पोलीसांची वक्रदृष्टी आपल्याकडेपण वळली तर. आधीच तर अकरा बायकांना आणि काही पुरूष सहकार्‍यांना सुद्धा अटक झाली होती. त्यात घरची माणसंपण बिथरलेली.

“तुला काय करायच्यात गं लष्करच्या भाकरी? म्हणे दारुबंदी करा. लै मजा वाटली होती ना बायका जमवुन फुकटच्या घोषणा देयाला. आता कुनी निस्तरायची ही भानगड? आता गुमान घरात बसायचं, पुन्यांदा जर का चळवळीचं नाव काडलस तर तंगडी मोडुन हातात दीन, सांगुन ठिवतो.” राधाबाईंच्या नवर्‍याने असा हाग्यादम दिलेला.

यशोदा शुन्यात नजर लावुन बसली होती.

“अगं, ताये.. म्या काय म्हनतीया?” राधाबाईनं तिला पुन्हा एकदा हलवलं तशी यशोदा भानावर आली.

“अं …. काय म्हणलीस गं राधामावशी? अगं, काही सुचेनासं झालय बघ. हे सगळं अगदीच अनपेक्षित नव्हतं पण अगदी या थराला जाईल असंपण वाटलं नव्हतं. पोलीस दंगलीच्या आरोपाखाली थेट बायकांना अटक करतील असं नव्हतं वाटलं! पण ठिक आहे.”

यशोदापण थोडी निराश झाली होती. गेला महिनाभर ती गावातल्या बायकांना भेटत होती. सगळ्यांना हजारवेळा समजावुन, धीर देवुन तयार केलं होतं तिनं. पण आता अचानक झालेल्या या अटकांमुळे सगळ्या बायका मुळातुनच घाबरल्या होत्या. साहजिकच होतं आयुष्यात नेहेमी खाकी कपड्यातल्या पोस्टमनपासुनसुद्धा दोन हात दुर राहणार्‍या या बायकांना थेट अटकेलाच सामोरे जावे लागले होते.

“नाही, राधामावशी असं हात पाय गाळुन नाही चालणार. काहीतरी करायलाच हवं. काय वाट्टेल ते करु. वेळ पडल्यास एखाद्या वर्तमानपत्राकडे जावु, जिल्हाध्यक्षांना जावुन भेटु पण आपल्या या वाघीणींना आणि वाघासारख्या भावांना सोडवुन आणुच.” यशोदा तिरीमिरीतच उठली.

“आता गं, कुठशिक चाल्ली आत्ता? भर दोपारची येळ आहे. उलीसक खाउन घे काय बाय.” राधा मावशी घाबरुन उठली.

“नाही मावशी, मला जेवण नाही जायचं अशा परिस्थितीत.मी बघते काय करता येतय ते. संध्याकाळी सगळ्यांना पुन्हा चावडीवर जमायला सांग. पुढे काय करायचं ते तिथेच ठरवु. आता माघार नाही. या कामासाठी आपल्या माय माउल्या, घरची माणसं जेलमध्ये गेली आहेत मावशे. आता माघार घेवुन त्यांचा अपमान नाही करायचा.” यशोदा उठली.

उंबर्‍यापासली स्लिपर तिने पायात सरकवली आणि क्षणभर त्या उंबर्‍याकडे पाहात उभी राहीली.,

” खुप झाले तुझे लाड, आता थांबणे नाही.”

आणि चटाचटा पाय वाजवीत भराभर ग्रामपंचायतीच्या दिशेने चालु लागली.

राधाबाई डोळे फाडुन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहातच राहील्या.

“जशी माय तशी लेक. यश्वदे, तुजं नाव दुर्गी ठिवायला पायजे हुतं गं अंजाक्कानं. माय ततं जेलात बसलीया चळवळीसाठी आन पोर भायेर लडतीय. न्हाय पोरी, आता मालकांनी तंगडी तोडली तर खुरडत यिन तुझ्या मागं पन मागं न्हाय फिरनार. काय व्हयाचं आसल ते हु दे आता! ”

राधाबाई तिरीमीरीत उभ्या राहील्या. या क्षणी हातात घेतलेल्या कामासाठी घर, संसार सगळं पणाला लावणार्‍या झाशीच्या राणीचा त्वेष त्यांच्या चेहर्‍यावर होता. गेल्या काही दिवसातल्या सगळ्या घटना एखाद्या चित्रासारख्या त्यांच्या डोळ्यासमोर तरळायला लागल्या.
…………………………………………………………………………………………

कोळेगाव बुदृक, फार – फार तर दहा एक हजाराची वस्ती असलेलं गाव. गाव तसं बर्‍यापैकी सधन. तसा गावचा धंदा हातमागावर कापड विणण्याचा. इथल्या कशिदाकाम केलेल्या शाली सगळ्या देशात जायच्या. प्रचंड मागणी होती देशभरात कोळेगावच्या शालींना. घरटी हातमाग होते पुर्वी. आता त्यांची जागा पॉवरलुम (यंत्रमाग) नी घेतली होती. त्यामुळे गावात बर्‍यापैकी सधनता होती. लोकांच्या हातात पैसा खेळत असायचा. साहजिकच पैशाला पाय फुटतील अशा गोष्टीही होती. त्यातच बीअर बार, दारुचे गुत्ते यांची भरमार होती. दारुच्या गुत्त्यावर होणारी भांडणे, मारामार्‍या गावाला नवीन नव्हत्या. रोज कुणीना कुणी दारु पिऊन गोंधळ घालायचा, बायकोला-मुलाबाळांना मारहाण करायचा. पैसा माणसाला कुठे घेवुन जाईल काही सांगता येत नाही!

या सगळ्या भानगडीमुळे सगळेच त्रस्त होते पण पुरुषमंडळी मनावर घेत नव्हती. कारण दारुची दुकाने किंवा बीअरबार बंद होणे त्यांना मानवणारे नव्हते, परवडणारे नव्हते.  शेवटी मुरलीतात्यानेच पुढाकार घेतला. मुरलीतात्या म्हणजे मुरलीधर डोकरे, तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष. पाच सहा महिन्यांपुर्वी गावातील काही सुज्ञ सहकार्‍यांना बरोबर घेवुन गावात दारुबंदी करण्याचा विचार सर्वप्रथम ग्रामपंचायतीसमोर मांडला. ग्रामपंचायतीतील पुरूष सदस्यांनी या प्रस्तावाला हरकतच घेतली, पण महिला सदस्यांनी मात्र प्रस्ताव सहर्ष डोक्यावर घेतला. दुसर्‍याच दिवशी ग्रामपंचायत सदस्या सौ. अंजनाबाई जाधवांनी ग्राम – पंचायतीच्या सभेत दारुबंदीचा प्रस्ताव मांडला. ग्रामपंचायतीतील इतर महिला सदस्यांनीदेखील ठरावाला अनुमोदन, पाठिंबा दर्शविला. विशेष म्हणजे काही पुरूष सदस्यांनी देखील आपला पाठिंबा दाखवला. खरेतर हा खुप विषम लढा होता. पण अंजनाबाई त्यासाठीच प्रसिद्ध होत्या पंचक्रोशीत. गेली तीन वर्षे ग्राम पंचायतीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अंजनाबाई आणि त्यांची कॉलेजात शिकणारी लेक यशोदा हा गावातील महिलांचा खुप मोठा आधार होता. कुठल्याही छोट्या मोठ्या समस्येसाठी त्यांचे पुर्ण सहकार्य, पुर्ण मदत असायची. एकदा हे ठरले की त्यानंतर लगेचच आठवड्याभरात गावातल्या आणखी काही भगिनींना तयार करुन अंजनाबाईंनी एक दारुबंदी कृती समीती स्थापन केली आणि या समितीतील सदस्यांच्या सह्यानी जिल्हाधिकारी महोदयांना कोळेगावातील दारुचे गुत्ते, बीअर बार तसेच दारुची दुकाने यावर बंदी आणण्यासाठी सर्व-सहमतीचे एक निवेदन देण्यात आले.

२५ मार्च २००८ च्या शासन कायद्यानुसार गावातील एकुण महिला मतदारांच्या संख्येनुसार त्यांच्या उपस्थितीत  साधारण बहुमताने विधिवत ठराव पारीत करुन घेतल्यास संबंधित बार किंवा विक्रेत्याची दारुविक्रीची परवानगी, अधिकार रद्द केला जावु शकतो. लढ्याची सुरुवात फारशी कठीण नव्हती….. ! पण ही तर फक्त सुरूवात होती.

आज सोमवार, आठवड्याची सुरुवात. आज ग्रामसभा भरणार होती. सकाळी दहाच्या सुमारास गटविकास अधिकारी, दारुबंदी अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेची सुरूवात झाली. गावात महिला मतदारांची संख्या जेमतेम तीन हजाराच्या घरात होती. सरकारी अधिनियमानुसार दारुबंदीचा ठराव पारीत करून घेण्यासाठी किमान दिड हजार महिलांच्या उपस्थितीची आवश्यकता होती. अंजनाबाई आणि यशोदा सकाळपासुनच हजर होत्या. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर गावातल्या भगिनींचा महासागर उसळला होता. ही घटना त्यांच्यासाठी केवढी क्रांतिकारक होती. सगळे आयुष्य रांधा, वाढा आणि उष्टी काढा यात गेलेले. चुल आणि मुल एवढेच काय ते या बायकांचे विश्व! आयुष्य सगळे आधी माहेरी आणि मग सासरी घरच्या पुरूषमंडळींची तळी उचलण्यात आणि राबण्यात गेलेले. त्या पार्श्वभुमीवर आयुष्यात पहिल्याप्रथमच त्या सर्व आपल्या घराचा उंबरठा ओलांडुन बाहेर पडलेल्या. आत्तापर्यंत मना-मनावर पडलेले रुढी, परंपरांचे जोखड झुगारुन स्वत:च्या न्याय हक्कासाठी, सुखी संसारासाठी नव्हे आपल्या अस्तित्वासाठी मोकळ्या आणि स्वतंत्र आकाशाखाली एकत्र आलेल्या. मनात एक जिद्द होती, नेहेमीच्या रहाटगाडग्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी भव्य दिव्य करायची. फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या त्यांच्या. कुठलेही साम्राज्य जिंकायचे नव्हते किंवा उभेही करायचे नव्हते. फक्त आपल्या संसाराला लागलेली दारुच्या जिवघेण्या विषाची किड कायमची नाहीशी करायचा हा निर्धार प्रत्येकीच्या मनात आणि चेहेर्‍यावर ठामपणे प्रतिपादीत होत होता. मनात एक हुरहूरही होती. आपला लढा यशस्वी होईल का? जरी यश मिळाले तरी त्यानंतर आपल्याच घरातुन कशी वागणुक मिळेल? नवर्‍याची प्रतिक्रिया काय असेल हे तर बहुतेकींना माहीतच होते. काहीजणींनी तर या ठरावानंतर नवर्‍याची मारहाणही सहन केली होती. घरच्यांकडुन मिळणारे शाब्दिक आहेर तर नित्याचेच झाले होते पण सगळ्या आपल्या भुमिकेवर ठाम होत्या. कारण या एका निर्णयावर त्यांचे, त्यांच्या चिमुरड्यांचे भवितव्य आधारले होते.

प्रत्यक्ष मतदानाला अजुन वेळ होता. ग्रामपंचायत कार्यालयात संबंधीतांची बैठक चालु होती. ग्रामपंचायतीच्या बाहेर जमलेल्या महिलांच्या विशाल समुदायाकडे बघुन यशोदा भारावुन गेली होती. स्त्रीशक्तीची ही विलक्षण चुणुक पाहुन तिला गहिवरल्यासारखे झाले होते. उर अभिमानाने भरुन आलेला. समोरच्या समुदायामधुन जोरजोरात दारुबंदीच्या घोषणा दुमदुमत होत्या. शेवटी गटविकास अधिकार्‍यांनी मतदानाला सुरुवात करण्याची सुचना केली. ग्रामसेवक पुढील व्यवस्थेला लागले. थोड्याच वेळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक टेबल मांडण्यात आले. ग्रामसेवक स्वत: काही कर्मचार्‍यासहीत तिथे बसुन महिलांच्या मतदानाची नोंद घेणार होते. एकच टेबल मांडलेले पाहील्यावर मात्र यशोदा थोडी अस्वस्थ झाली.

“साहेब, अहो पुढचा घोळका तरी बघा. एकच टेबल कमी पडेल असे नाही वाटत तुम्हाला? हे खुप वेळखाऊ होइल साहेब. बायका आपली घरातली सगळी कामे सोडून इथे आल्या आहेत. निदान अजुन एक टेबल तरी मांडायला सांगा ना!”

ग्रामसेवकाने अशा काही नजरेने तिच्याकडे बघितले की यशोदा घाबरुनच गेली.

“यशोदाबाई, एवढी घरची काळजी होती तर सांगितले कुणी होते या लष्कराच्या भाकरी भाजायला? जे सामान उपलब्ध आहे, जेवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यानुसार एकच टेबल लावणे शक्य आहे. जमत असेल तर मतदान करा नाहीतर घरी जा, कुणी अडवलेले नाही तुम्हाला; समजले?”

यशोदा मनोमन समजुन गेली. असहकाराला सुरुवात झाली होती. ती होणारच होती, कारण इथे सगळ्यांचेच हितसंबंध अडकलेले. दारुची दुकानं बंद झाली, गुत्ते थंड पडले तर यांची पण फुकटची आवक बंद होणार होती ना!

“तुमी काय बी काळजी करु नगासा ताय, आमी थांबताव ना! कितीबी येळ लागु दे, आज आमी आमचं मत टाकुनच जाणार! हे इख मुळातुन उखडलंच पायजे. लागु द्या काय येळ लागायाचा हाये त्यो. काय गं बायांनो?” समोरच्या गर्दीतुन एक आवाज आला आणि लगेचच एका मोठ्या प्रतिसादाची ललकारी घुमली.

“व्हय, लागु दे काय येळ लागायचा त्यो, आता माघार न्हाय!”

यशोदेचे डोळे भरुन आले. स्त्रीशक्तीचा हा महान अविष्कार अनुभवताना आपणही एक स्त्री आहोत याचा अभिमान तिच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे उमटला. बघता बघता ती भुतकाळात शिरली ……… गेल्या काही दिवसातले एकेक प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले.

“गंगे, सपष्ट सांगतुय तुला. काय मत-बीत द्यायाला जायाचं न्हाय. गपगुमान घरी बसायचं. न्हायतर माझ्याशी गाठ हाय!”

“तुमी काय बी म्हना धनी, आता ही दारुची हडळ गावातुन कायमची हाकलल्यावाचुन दम नाय पडनार आमास्नी. काय होयाचं हाय ते व्हवु द्या. तुमास्नी काय कराचं हाय ते करा. आता आमी गप बसणार न्हाय. यशोदाताय, मी मत देणारच गं. माझ्या समद्या संसाराची वाट लावलीय या दारवेनं. तिला तडीपार केल्याबगर चैन न्हाय पडनार आता.” पन्नाशी ओलांडलेल्या गंगाकाकी ठामपणे सांगत होत्या आणि यशोदेच्या अंगावर खिनभर मास चढत होते.

एकच का? अशाच प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मनात घेर घरला होता. अगदी यशोदेच्या बापानेसुद्धा याला विरोधच केला होता.

“अंजे, यश्वदे लै झाली थेरं! आजपातुर झाली ती गावाची शेवा लै झाली. हे अती व्हतया. अंजे लक्षात ठिव, जर का ही दारुबंदी झाली तर दुसया दिशी घराभायीर काडीन दोगीनाबी. त्यादिशी आपला संसार सपला समज!”

यशोदेच्या बापाने तर अंजनीबाईंना सरळ काडीमोडाचीच धमकी दिली होती.

“मालक इकत्या बायकांचं आविष्य जर सुदरणार आसल तर मले त्ये बी मंजुर हाय! म्या बी बगते कसा काडीमोड देतासा त्ये. कायदा काय झोपलेला नाय. आन आज म्या हाये म्हुन घरात हे चार सुकाचे दिस दिसत्यात. फुकट बसुन खातायसा, इसरला का ते दिस? पाटलाच्या खळ्यावर दोन-चार रुपड्याच्या बदल्यात दिसभर राबत व्हता समदे. पुन्यांदा त्येच करायचं आसल तर व्हवुन जावद्या यकदाचं! माज्या कुकवापरीस गावातल्या बायकांची आविष्यं, त्येंच्या पोरांची भविष्यं लै म्हत्वाची हायेत. आता म्हागारी न्ह्याय फिराची म्या!”

यशोदा आपल्या आईकडे पाहातच राहीली होती. आईच्या जागी तिला साक्षात आदिमातेचाच भास होत होता.

हे सगळं कमी होतं की काय म्हणुन एक वेगळीच अडचण उभी राहीली होती काही दिवसांपुर्वी. ठराव मांडल्यानंतर गावातल्या बायकांना या चळवळीचे महत्व समजावुन द्यायचे म्हणुन मुरलीतात्याने गावातल्या निवडक बायकांची एक बैठक घेतली होती. सगळ्या बायका वेळेवर जमा झाल्या. मुरलीतात्या बोलायला उभे राहीले आणि त्यांच्या लक्षात आले की समोर बायकांचे दोन वेगवेगळे घोळके आहेत. एकमेकांपासुन थोडेसे अंतर ठेवुन हे दोन घोळके बसले होते. तात्यांनी या प्रकाराचं कारण विचारलं तर जे बाहेर आलं ते धक्कादायकच होतं. समोर बसलेल्या घोळक्यातल्या सुगंधाबाई म्हनली…

“तात्या, आवो त्या खालच्या जातीतल्या बाया हायती. आमी कुणबी , त्ये गावकुसाभायेरचे लोक!”

ती बैठक हा भेदाभेद नाहीसा करण्यातच खर्ची पडली होती. शेवटी सुगंधाबाई भरल्या डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने गायकवाडाच्या रंगुच्या गळ्यात पडुन रडली. ती घटना आठवली आणि नकळत यशोदेच्या डोळ्यात पाणी आले.

“रडु नगो पोरी, समदं ब्यास व्हईल बग!” एका म्हातारीने तिच्या गालावरुन आपला खरबरीत सुरकुतलेला तळवा फिरवला आणि यशोदा भानावर आली.

“होय  गं आज्जे, तसंच होईल! देव आहे आपल्या पाठिशी!”

आणि यशोदा कुठल्याशा निर्धाराने मागे वळाली आणि मुरलीतात्याकडे जावुन तिने आपली टेबलाबद्दलची तक्रार मांडली. मुरलीतात्याने हा मुद्दा दारुबंदी अधिकार्‍यांसमोर मांडला. त्यांनी लगेच अजुन दोन टेबले मांडण्याच्या सुचना दिल्या. ग्रामसेवकाला नाईलाजाने अजुन दोन टेबले मांडावी लागली. त्या गुश्शातच त्याने यशोदेला ऐकवले…..

“तुम्ही काहीपण करा, पण शेवटी तेच होणार आहे, जे आम्हाला हवे आहे. समजलं?” तशी यशोदेची काळजी अजुन वाढली, हे लोक कुठल्याही थराला जावु शकतात याची तिला पुर्ण खात्री होती. आणि तसेच झाले..

साडे बारा वाजता फक्त ९३० बायकांची नोंदणी झाल्याचे जाहीर करण्यात आले. तशा उपस्थीत बायका संतापल्या. जवळजवळ १६०० बायका उपस्थित होत्या, ज्यांना मतदानाचा हक्क नाही अशाही काही बायकांनी उत्साहाने आपली उपस्थिती नोंदवली होती. मग उपस्थिती एवढी कमी कशी काय भरेल?

झाले …..इतके दिवस मनात खदखदत असलेल्या संतापाला तोंड फुटले. संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी आणि दारुबंदी अधिकार्‍यांना जाब विचारायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात अचानक दगडफेक सुरु झाली. ती कोणी सुरु केली याचा विचार न करता पोलीसांनी सरळ महिलावर लाठीमार सुरु केली.

“यशोदे, आता गं कसं व्हायचं?”, राधाबाई खुप घाबरल्या होत्या.

“हे सगळं ठरवुन करण्यात आलय मावशी. इतक्या सहज नाही सोडायचं.” यशोदाने सगळ्या बायकांना एकत्र केलं.

“माय-मावश्यांनो, बघितलत ना! हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे. हा अत्याचार आपण, आपल्या कित्येक पिढ्या भोगत आलेल्या आहेत. हे थांबायलाच हवं. साथ देणार ना माझी?”

या आवाहनाचं उत्तर म्हणुन जमलेल्या बायकांनी तिथेच रस्त्यावर बैठक मारली. जवळ जवळ दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पोलीस आणि दारुबंदी अधिकारी यांनी संगनमताने महिलांची कमी उपस्थिती दाखवली आणि सभा उधळुन लावली असा आरोप महिला दारुबंदी समितीने केला. झाले.., ठिणगी पडली. चिडलेल्या पोलीसांनी गटविकास अधिकारी आणि दारुबंदी अधिकार्‍यांकडुन महिला दारुबंदी समीतीविरुद्ध एक तक्रार नोंदवुन घेतली. आणि त्याच्या बळावर दंगलीच्या गंभीर आरोपाखाली काही महिलांसकट दारुबंदी समर्थक पुरुषांनाही अटक करण्यात आली. आता मात्र सगळ्यांचाच धीर सुटला. आत्तापर्यंत सगळे ठिक होते. ठराव, मतदान पण आता एकदम अटक म्हणजे……

“यश्वदे, आता गं? अगं अंजाक्कासकट मुरलीतात्याला बी धरुन नेलया पुलीसांनी. आन आत्ता कसं व्हयाचं? मला तं काय बी सुचत न्हायी.” म्हातार्‍या आवडामावशीनं विचारलं. तशी यशोदापण विचारात पडली. प्रकरण या थराला जाईल याचा तिनं विचारच केला नव्हता. पण काहीतरी करायला हवं होतं.

यशोदा पोलीसचौकीत जावुन आईला भेटली………….

“ए येडे, येवड्यावरच हारलीस व्हय, अगं ही तर सुरवात हाये पोरी. अजुन लै झगडायचय. आत्तापासनंच धीर सोडुन बसलीस तर त्या  बायकांनी कुणाकडं बगायचं. मर्दिणी, डरायचं नाय, आसं कायतरी हुणार हे म्हायतच व्हतं गं मला. ही ठिणगी इझु देवु नगो पोरी. माजी काळजी नगो करु. एक दोन दिसात जामीन मिळंल आमाला. पण या संधीचा फायदा ऊठव पोरी. रान ऊठवा. सगळं गाव पेटुन उठु दे. जावु दे सगळ्या मराठवाड्यात ही बातमी. तु बघच पोरी आता आपली जीत नक्की हाय. आता आडवी बाटली झाल्याबिगर दम नाय खायाचा.”

यशोदा आपल्या आईकडे पाहातच राहीली. शाळेची चार बुकंही न शिकलेल्या आपल्या आईला ही हिंमत कशाच्या जोरावर मिळाली असावी हेच तिला कळेना. केवळ समाजाबद्दलची आत्यंतिक कळकळ, अन्यायाविरुद्धची मनस्वी चिड आणि प्रचंड आत्मविश्वास ही अंजाक्काची धारधार हत्यारं होती.

ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे चाललेल्या यशोदेला हे सगळं सगळं आठवत होतं. आपल्या दुर्गेसारख्या आईचे ते शब्द तिच्या मानसिक शक्तीला आणखी बळ देत होते. यशोदा तशीच तडक ग्रामपंचायतीत येवुन पोहोचली. तिला बघुन ग्रामपंचायतीतली माणसं खुसखुसायला लागली.

“का गं यशोदे, उतरला का सगळा माज? आलात जमीनीवर? दारुबंदी हवी म्हणे. आता सड म्हणाव आईला जेलात.”

ग्रामसेवकाने न राहवुन पिंक टाकलीच.

“साहेब, तुमची मदत मागायला किंवा माफी मागायला नाही आले मी. इशारा द्यायला आले आहे. हे इतक्यात संपणार नाही. मी रान पेटवणार आहे आता. माझ्या माय मावल्या साथीला आहेत. वर्तमानपत्रे, स्त्री मुक्ती संघटना सगळीकडे मदत मागेन. गरज पडली तर मंत्रालयावर पण धडक देइन पण आता थांबणार नाही. तुमची घटका भरली एवढं ध्यानात ठेवा.”

आणि नव्या निर्धाराने यशोदा मागे फिरली.

त्यानंतरचे दिवस जबरदस्त धामधुमीचे होते. दोन दिवसात अटक झालेल्या बायकांना जामीनावर सोडण्यात आले आणि मग सुरू झाली एक नवी लढाई. या रणरागिण्यांचा आणि त्यांच्याबरोबर अटक झालेल्या पुरुष सहकार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गावातल्या महिला दारुबंदी समीतीच्या सदस्य भगिनी नवीन लढ्यासाठी नवे डावपेच आखण्यात मग्न होत्या. एक दिवस…..

अंजनाबाई इतर सदस्यांबरोबर पुढची रणनीती ठरवीत होत्या. त्यानुसार वर्तमानपत्रे आणि स्त्री मुक्ती संघटनांची मदत मागण्याचे ठरले. एवढ्यात दारात एक जीप येवुन थांबली आणि जीपमधुन दारुबंदी समीतीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुखदेवकाका समेळ उतरले. त्यांच्याबरोबर आणखीही दोन बायका आणि काही पुरुषमंडळी होती.

“नमस्कार अंजाक्का, सर्वात आधी तुमच्या धाडसाबद्दल, जिद्दीबद्दल तुम्हा सर्व भगिनींचे मनापासुन अभिनंदन. एवढं झाल्यावरदेखील घाबरुन न जाता तुम्ही लढा पुढे चालु ठेवायचा निर्धार कायम ठेवलात हे कौतुकास्पदच आहे. पण आता हा लढा एकट्या कोळेगावच्या भगिनींचा नाही. आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे. आता थांबणे नाही. अब आर या पार, फांदी तुटो वा पारंबी आता मुळावरच घाव घालायचा. आपण जिल्हापातळीवर, वेळ पडल्यास राज्यपातळीवर धडक मारु. सगळ्या मराठवाड्यात रान पेटवुन देवु. आता आपल्याबरोबर दै. जनसत्ताचे वृत्त प्रतिनिधी देखील आहेत. या भारतीताई केंजळे,  “सखी स्त्री मुक्ती संघटनेच्या सदस्य देखील आपल्यासोबत या लढ्यात उतरल्या आहेत. आता थांबणे नाही, आता आराम तो थेट कोळेगावात दारुबंदी झाल्यावरच. चला कामाला लागु या.

अंजनीबाई आणि यशोदेबरोबरच उपस्थित सर्वच बायकांचे चेहरे उजळुन निघाले. त्यांच्या प्रयत्नांनी  भ्रष्ट शासन यंत्रणेच्या पोलादी कोटांना आता तडे जाणार होते. यशाची कवाडे किलकीली झाली होती.

“उठा बायांनो, अगं फाट झालीया, ही तर फकस्त सुरुवात आहे, लै काम पडलय. आता कंबर कसायलाच हवी.”

उत्साहाने सळसळलेल्या अंजाक्का नव्या उमेदीने ऊठल्या. कोळेगावच्या या रणरागिण्या एक नवीन इतिहास लिहायला सिद्ध झाल्या होत्या. युद्धाचा बिगुल वाजला होता. एक नवी सुरुवात झाली होती. माझ्या पत्रकार म्हणुन आजपर्यंतच्या कारकिर्दीत ही घटना एक नवीन पर्व घेवुन येणार होती.

(मराठवाड्यातील एका छोट्याशा गावात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत काल्पनिक कथानक!)

समाप्त.

विशाल विजय कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s