खानदेशी मांडे – पुरणपोळी

मागच्या आठवड्यात कोथरुड मधील गांधीभवनजवळ भरलेल्या एका महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. विविध स्टॉल्स होते. पण त्यातल्या एका स्टॉलवरच्या काकुंनी माझे लक्ष वेधून घेतले.

पिंपरीहून आलेल्या सौ. ललिता दि. तरवटे यांनी हा स्टॉल लावला होता. काकु दिवसभर येणार्‍या-जाणार्‍यांना गरमागरम खानदेशी पद्धतीचे मांडे (पुरणपोळी) करुन खायला घालत होत्या. एका नगाची किंमत ६०.०० रुपये फक्त. ते वाचल्यावर मी थोडा चमकलो. म्हटलं चितळ्यांची पुरणपोळी सुद्धा १५-२० रुपयाला मिळते, मग यात असं काय विशेष होतं की ज्यासाठी ६० रुपये मोजावेत. पण जेव्हा थोडा वेळ थांबून ते तयार करण्याची एकंदर प्रक्रिया आणि त्यामागची मेहनत बघीतली, त्या मांड्यांचा आकार बघीतला आणि अर्थातच त्याची मनसोक्त चव घेवून बघीतली तेव्हा मनोमन वाटुन गेलं..

साठच काय शंभर रुपये जरी किंमत लावली असती तरी योग्यच होती.

पुरणपोळीला लागणारे साहित्य आणि कृती सर्वांना माहीतच असते त्यामुळे ती लिहीत बसण्यात वेळ घालवीत नाही. फोटो सगळी कहाणी स्वतःच सांगतील. फक्त एवढेच सांगतो की मांड्यांचे पीठ तयार करताना गव्हाची कणिक आणि मैदा समप्रमाणात मिश्रण करुन वापरलेला असल्याने पिठाला मस्त कन्सिस्टन्सी (पर्यायी मराठी शब्द काय?) आली होती.

काकुंनी केलेली पुर्वतयारी…

१. मांड्यांसाठी गव्हाचे पिठ आणि मैद्याचे योग्य प्रमाणात मिश्रण करुन तयार केलेली कणिक
२. पुरण (कमी गोड – गुळ वापरून केलेले)
३. पोळपाटाऐवजी पालथी ठेवलेली एक मोठी परात
४. शेगडी चालू करून त्यावर पालथी ठेवलेली एक मोठी कढई

यावरून अंदाज आला असेलच…
ये चीज कुछ हटके है….  🙂


वर सांगितल्याप्रमाणे कणिक तयार करुन आधी काकुंनी परातीवर त्याच्या दोन लाट्या तयार करुन घेतल्या.

त्यानंतर त्यापैकी एका लाटीवर पुरणाची लाटी (गोळा) ठेवून दुसरी लाटी त्यावर लावून एकजिव करुन घेतले आणि लाटायला सुरुवात केली.

लाटी बर्‍यापैकी म्हणजे परातीच्या आकाराची लाटून झाल्यावर पुढची जी कमाल काकुंनी केली ती केवळ फोटोतून कळण्यासारखी नाही. मी जे म्हटलं की याला साठ काय शंभर रुपये सुद्धा कमीच आहेत ते एवढ्याचसाठी…

कृपया खालील चित्रफीत पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लाटी पुरणाने भरलेली आहे 🙂

लाटी पुरेशी पसरवल्यावर काकुंनी ती शेगडीवर पालथ्या घातलेल्या परातीवर टाकली. विशेष म्हणजे हे सगळे करत असताना कुठेही पोळीचा (मांड्याचा) आकार बिघडला नव्हता आणि कुठुनही पुरण चुकुनही बाहेर आले नाही.

Hats off to you Kaku  :wave

थोड्यावेळाने मस्त भाजले गेलेले मांडे..

भाजल्यानंतर छान घडी करुन ठेवलेले मांडे..


अर्थात अस्मादिकांनी मनसोक्त ताव मारला हे सांगणे नलगे. आता बहुदा येत्या ११ तारखेपासून बालगंधर्वच्या आवारात असेच एक प्रदर्शन भरणार आहे. तरवटे काका-काकु तिथेही असतीलच. ज्यांना मांडे खायचे (प्रत्यक्षात, मनातल्या मनात नव्हे) इच्छा आहे त्यांनी या प्रदर्शनाला जरुर भेट द्यावी.

सौ. तरवटे काकु वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खानदेशी मांडे करुन देण्याच्या ऑर्डर्सदेखील घेतात.
इच्छुकांसाठी संपर्क : सौ. ललिता दि. तरवटे : ९४२२३२५२२८/ ९६२३१३९१६०

विशाल….

9 thoughts on “खानदेशी मांडे – पुरणपोळी”

    1. धन्यवाद मृदुला ! माझ्या ब्लॉगवर उजव्या बाजुच्या साईडबार वर ’मराठी टायपिंग’ म्हणुन एक कॉलम आहे बघ. त्यातील क्वालिपॅड एडीटर वापरून इथे लिहु शकशील. किंवा बरहा आणि गमभन यांचाही वापर करता येइल. त्याच्या डाऊनलोड लिंक्स तिथेच आहेत बघ.

      Like

  1. superb !!!!!!!!!!!!!!!खानदेशी मांडे एकदम चविष्ठ पदार्थ…. पण तय्यार करण्यासाठी गृहणीचे पाककौशल्य पणास लागते…..आणि आजच्या टू मिनट्स च्या जमान्यात स्पर्धेच्या युगात हा पदार्थ करण्यास गृहणीना वेळ नाही….हा पदार्थ तसा इतिहासजमा च झाला…. पण….बचतगटाच्या मध्यमा मुळे याची चव आज जिभेचे लाड पुरवते….हे ही नसे थोडके.

    Like

यावर आपले मत नोंदवा