मला भावलेली आंबोली ….

कोल्हापूरहुन सकाळी सव्वा सहाची आजरामार्गे सावंतवाडीची बस पकडली, बसची एकंदरीत अवस्था पाहून धडकीच भरली होती. सगळेच ऐनवेळी ठरल्याने हॉटेल सोडले तर इतर कसलेच आरक्षण नव्हते. हॉटेलची सुद्धा सोय झाली ती मायबोलीकर सुनील गावडे उर्फ सुन्या आंबोलीकर यांच्या कृपेने. (हल बे, धन्यवाद वगैरे म्हणणार नाहीये मी :-P)

धडक-धडक करत लाल डब्बा निघाला. दोन अडीच तासानंतर वातावरण बदलायला लागले…., निसर्गराजाने आज माझा मुड ठिक आहे हे सांगायला सुरुवात केली होती.

दहा-साडे दहाच्या दरम्यान गाडी आंबोलीत पोहोचली. हॉटेलवर जावुन फ्रेश झालो, चहापाणी आटोपले आणि बाहेर पडलो. सुन्याने आंबोलीबद्दल जे काही सांगितले होते त्यातली सत्यता पटायला सुरूवात झाली होती. स्थानिक भटकंतीसाठी एक गाडी ठरवली, पण तो दुपारी ३ च्या नंतर येणार होता. म्हणुन तोपर्यंत पायीच घाटाचा रस्ता धरला.

घाटात सगळीकडे प्रचंड धुकाळ वातावरण होतं. दरीत खाली डोकावुन बघितलं तरी काही दिसत नव्हतं.

या हसर्‍या फुलांनी मात्र मनापासुन स्वागत केलं…

जोडीला फुलपाखरेही होतीच…

शेवटी १२ च्या दरम्यान परत फिरलो, पोटात कावळे ओरडायला लागले आहेत याची आठवण बदललेल्या वातावरणाने आणि या एकाकी मित्राने करुन दिली.

जेवणानंतर थोडा आराम करुन साडे तीनच्या दरम्यान परत उंडगायला निघालो. यावेळी अनिल आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड बरोबर होता. पहिला मोहरा वळवला तो हिरण्यकेशीकडे. इथे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे म्हणे. मी फार खोलात गेलो नाही, मला ती जागा मात्र आवडली.

पुढे राघवेश्वर येथील स्वयंभु गणेशाचे मनोभावे दर्शन घेवुन ….

लगेचच कावळेसाद पॉईंट गाठला. इथे मला काही बेस्ट लँडस्केप लोकेशन्स मिळाल्या.

दुसरा दिवस तळकोकणात उतरायचे असल्याने स्थानीक स्थळे आज उरकायचीच असे ठरवले होते. दोन दिवस पुर्ण आराम आणि दोन दिवस भटकंती असा बेत होता. त्यामुळे लगेचच पुढच्या पॉईंटकडे ‘नांगरतास धबधबा’ निघालो.

मला या धबधब्याला काही एका फोटोत बसवता आले नाही.


तिथे जवळचे कुरकुरे आणि वेफर्सची पाकीटे गमवावी लागली. तरीपण ही बया अजुन आशाळभुतासारखी बघतच होती.


तिथुन निघालो ते थेट महादेव गड पॉइंट गाठला. हा स्पॉट मात्र खरोखर वेड लावणारा होता.


मलाही मग मोह आवरला नाही…

त्यानंतर मात्र अनिलने गाडी थेट आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे काढली. आता फारसे पाणी नाहीये पण जे होते ते देखील माझ्यासारख्या मुंबईकरासाठी खुप होते.


तिथुनच पुढच्या वळणावर आणखी एक मस्त नजारे मिळाले..

वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. क्षणापुर्वी स्वच्छा झालेला आसमंत परत धुक्याने भारला गेला.

काही क्षणापुर्वी वरचं हे धुकाळलेलं झाड असं दिसत होतं…

हळु हळु भास्कररावांनीपण परतीचा मार्ग धरला होता. धुक्यामुळे त्यांना टाटा पण करता आले नाही.


आता मात्र पर्जन्यराजाने देखील हजेरी लावली आणि आम्ही आजच्यापुरती माघार घेतली. नुकत्याच काही महिन्यापुर्वी घाटात कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अजुनही रस्त्यावरुन हलवलेला नाहीये त्या पार्श्वभूमीवर माघार घेणेच शहाणपणाचे होते. आणि ते शहाणपणाचे होते हे नंतर दोन-अडीच तास कोसळलेल्या सडाक्याने सिद्ध केले.

बाकी कोकणाचे इतर फोटो पुन्हा कधीतरी. सद्ध्यापुरते एवढेच बास्स…. 🙂

विशाल

5 thoughts on “मला भावलेली आंबोली ….”

यावर आपले मत नोंदवा