चिन्यांचा आवडता भारतीय मित्र and a bridge forever….

डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

मार्क्सवाले कितीही हिंदी-चिनी भाई भाई म्हणून छाती पिटोत पण सार्‍या जगाला माहीत आहे चीन आणि भारत यांच्यामधून विस्तव जात नाही ते. मग अक्साई चीनचा वादग्रस्त मुद्दा असो वा सियाचेनच्या ग्लेशियर्सचा. पण एक गोष्ट रादर एक व्यक्ती अशी होवून गेली की जी भारतीय असुनही तिचे नाव आले की प्रत्येक चिनी मस्तक आदराने नमतेच नमतेच.

“नवतेची महान मुल्ये जिवापलीकडे जतन करीत, चीनच्या युद्धभुमीवर जपानी आक्रमक सैन्याशी झुंझ देता देता जखमी झालेल्या शेकडो-हजारो चिनी सैनिकांना आपल्या वैद्यकीय उपचारांनी अक्षरशः नवजीवन मिळवून देणारा आम्हा सर्वांचा लाडका मित्र” अशा गौरवपुर्ण शब्दात चीनचे तत्कालिन सर्वेसर्वा माओ-त्से -तुंग यांनी ज्या भारतीयाचे कौतुक केले ते ध्येयवेडे, कर्तव्यनिष्ठ आपल्या पेशाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहीलेले , रुग्णांची सेवा करता करताच आपले प्राण ठेवलेले डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस. सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटूंबात १० ऑक्टोबर १९१० रोजी जन्मलेल्या डॉ. कोटणीसांची आज जन्मशताब्दी आहे.

१९३६ साली मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधुन द्वारकानाथ कोटणीसांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि तिथेच निवासी डॉक्टर म्हणुन रुजु झाले. थोरले बंधू मंगेश आणि दोन्ही छोट्या बहिणी या आपापल्या संसारात स्थिर स्थावर झालेल्या असल्याने डॉ. कोटणीसांच्या मागे कसलीच जबाबदारी नव्हती, त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले होते. पण त्यांच्या भविष्यात सटवाईने काही वेगळेच लिहून ठेवले. डॉ. द्वारकानाथ कोटणीस हा माणूस काही वेगळेच नशीब घेवून जन्माला आलेला होता. घरात वडील सामाजिक कार्यात कार्यरत असल्याने डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवा लहानपणापासूनच अतिशय प्रगल्भ आणि सकारात्मक होत्या. त्यामुळेच त्यांनी सेवेसाठी म्हणुन ओळखला जाणारा वैद्यकीय पेशा आपल्या जीवनाचे भागध्येय म्हणुन निवडला होता.

सन १९३७-३८ च्या दरम्यान शेजारच्या चीनवर जपानी सैन्याने युद्ध पुकारले होते. युद्ध दिवसेंदिवस अधिक तिव्र होते चाललेले. युद्धभुमीवर लढणार्‍या चीनी सैनिकांना तज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय उपचारांची नितांत आवश्यकता भासत होती. त्या वेळी अजुनही भारतात ब्रिटीश सरकारचा अंमल होता. तरीही तत्कालीन चीनी सत्ताधार्‍यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला मदतीचे आवाहन केले. मग पं. नेहरुंच्या पुढाकाराने डॉ. जीवराज मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समीती स्थापन करून या समीतीमार्फत पाच डॉक्टरांचे एक मदतपथक चीनला पाठवण्याचे ठरवण्यात आले आणि तसे भारतातील डॉक्टरांना एक विनंती निवेदन पाठवण्यात आले. “सेवा” हेच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवलेल्या डॉ. कोटणीसांनी या आवाहनाला सहर्ष प्रतिसाद दिला नसता तरच नवल. खरेतर त्यावेळी डॉ. द्वारकानाथांना पुइरेसा अनुभवही नव्हता. पण मनातली सेवाभावना प्रखर होती, आपल्या वैद्यकीय पेशावरची निष्ठा प्रखर होती. शेवटी त्या पाच जणांच्या समितीमधून डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस चीनच्या धगधगत्या रणांगणावर लढणार्‍या शुर सैनिकांच्या मदतीसाठी म्हणुन जावून पोचले. या समितीतले इतर सदस्य होते नागपूरचे डॉ. एम्.आर. चोलकर, अलाहाबादचे डॉ. मोहनलाल अटल, ढाक्याचे डॉ. बिजोयकुमार बसू आणि कोलकत्याचे डॉ. देवेन मुखर्जी. १ सप्टेंबर १९३८ रोजी ही पाचजणांची समिती चीनच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन चीनला रवाना झाली. त्यावेळी चीनच्या “यानान” प्रदेशात युद्धाचा जोर प्रचंड होता. डॉ. कोटणीसांनी आग्रहाने त्याच भागातील नेमणुक मागून घेतली आणि स्वतःला जखमी सैनिकांच्या सेवेत जुंपून घेतले. यानानच्या लष्करी इस्पितळात ते शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणुन काम पाहू लागले. विशेष म्हणजे जखमी सैनिकांबरोबरच ते सर्वसामान्य चिनी जनतेवरही अतिशय आस्थेने , मायेने उपचार करत. त्यांच्या जनसेवेची ख्याती साक्षात माओ-त्से-तुंग यांच्या पर्यंत पोहोचली आणि माओ ने त्यांना आपल्यासोबत जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांचा यथोचीत सत्कारही केला. आता चिनमधले लोक डॉ. कोटणीसांना “कोटीहुआ दाय फू” या नावाने ओळखायला लागले होते. कुणाच्याही अडी अडचणीला, मदतीला कधीही धावून जाणारे डॉ. कोटणीस दारिद्र्यात खितपत पडलेल्या सर्वसामान्य चिनी माणसांना देवासारखे वाटले नसते तरच नवल. डॉक्टर प्रसंगी जखमी जवानांवर थेट युद्धभुमीवर जावून तिथेच औषधोपचार करत असत. स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता जखमी सैनिकांवर औषधोपचार करून त्यांची सेवा करणार्‍या या भारतीय डॉक्टरने अल्पावधीतच चिनी सैनिकी अधिकार्‍यांपासुन ते सामान्य सैनिकांपर्यंत आणि सर्व सामान्य गरीब चिनी जनतेपासून ते माओ-त्से-तुंगपर्यंत सर्वांच्या मनात आपले स्वतःचे असे धृवपद निर्माण केले. १९३९ मध्ये त्यांनी माओ झेडाँग यांच्या नेतृत्वाखालील “एट्थ रुट आर्मी” जॉइन केली. त्या दरम्यान त्यांनी हजारो सैनिकांवर उपचार केले आणि जवळजवळ ८०० मेजर ऑपरेशन्स केली. ऐन युद्धकाळात, युद्धभुमीवर किंवा तिच्या जवळपासच्या क्षेत्रात अवघ्या १-२ वर्षात ८०० शल्यचिकित्सा ऑपरेशन्स हे खुप मोठं आणि महत्त्वपुर्ण कार्य होतं. तो एक विक्रमच होता असे म्हणले तर ते चुक ठरू नये.

त्यांची डॉ. बेथ्युन इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलच्या डायरेक्टरपदी नेमणुक झाली. इथेच डॉ. बेथ्युन यांच्या वैद्यकीय शाळेत आणि इस्पितळात परिचारिका म्हणुन काम करत असलेली “गो-किंगलान” नावाची एक चिनी तरुणी डॉक्टरांच्या जीवनात आली. त्यावेली खरेतर त्यांना भारतात परत जाण्याची परवानगी चिनी सरकारकडुन मिळाली होती पण डॉक्टरांनी अजुन काही काळ चिनमध्येच आपले सेवाकार्य करत राहण्याचा निर्णय घेतला. १९४० च्या नोव्हेंबर मध्ये मिस किंगलॉन मिसेस कोटणीस झाली. त्यांना एक मुलगा पण झाला . त्यावे नाव त्यांनी यिनहुआ असे ठेवले होते. {which means India and China (‘Yin’ means India and ‘Hua’ means China)}. यिन हुआ सन १९५८ मध्ये भारतातील सोलापूरातील आपल्या आजोळी भेट देवून गेले. पण डॉ. कोटणीसांना मात्र जास्त काळ संसारसुख अनुभवता आले नाही. रणभुमीवर जखमी सैनिकांच्या सेवेचे आपले व्रत निभावता निभावत कुठल्यातरी एका बेसावध क्षणी डॉ. कोटणीसांना ‘एपिलेप्सी’ सारख्या रोगाने गाठले. हजारो चिनी सैनिकांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या बळावर जीवनदान देणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्वतःच मृत्युच्या कराल दाड्गेकडे वाटचाल करू लागले. अखेर सारा भारत १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात असताना “९ डिसेंबर १९४२” रोजी हा महामानव हे जगच सोडून गेला. कर्तव्यकठोर म्हणून ओळखल्या जाणार्‍या चिनचे सर्वसर्वा माओ-त्से-तुंग तसेच चाऊ-एन्-लाय यांच्यासारख्यांनी देखील डॉक्टरांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. यानान आणि शांक्सी प्रांतातील सर्वसामान्य चिनी जनतेला झालेले दु:ख मात्र यापेक्षा फार मोठे होते. आपल्याच घरातले एक जवळचे माणुस गेल्याची भावना डॉक्टरांच्या मृत्युने त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

उत्तर चिनच्या हेबेइ प्रांतात, शिजियाझुयांग शहरात एक लोकप्रिय हुतात्मा स्मारक उद्यान आहे. या उद्यानाच्या चार भागापैकी उत्तर्-दक्षीण भाद कोरियन आणि जपानी युद्धातील वीरांना समर्पित आहे. तर पश्चिम भाग डॉ. नॉर्मन बेथ्युन, एक कॅनेडियन डॉक्टर आणि पुर्वेकडचा भाग डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला आहे. इथे डॉक्टरांचा एक पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

डॉक्टर कोटणिसांचा पुर्णाकृती पुतळा

तिथेच एक छोटेसे म्युझियमही आहे डॉक्टरांना समर्पित केलेले. या संग्रहालयात डॉ.नी स्वतः लिहीलेले काही त्यांच्या हस्ताक्षरातले कागदपत्र, त्याकाळी शल्य चिकित्सेसाठी त्यांनी वापरलेली विविध साहित्यं आणि खुपसे चिनी डॉक्टर्स, अधिकारी आणि अर्थातच माओंच्या फोटोंचा संग्रहदेखील आहे.

समाधीस्थान

पण त्या प्रांतातली चिनी जनता आपल्या या “कोटीहुआ दाऊ फू” ला विसरली नाही. आजही डॉ. बेथ्युन इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलमध्ये डॉ. कोटणीसांच्या नावाने एक भव्य शल्यचिकित्सा दालन उभे केले आहे.

त्यावेळी चिनी सरकारने डॉक्टरांवर एक लघुपटही काढला होता. तर भारतात श्री. व्ही. शांताराम यांनी “डॉ. कोटणीस की अमर कहानी” हा चित्रपट काढून डॉ. कोटणीसांच्या त्यागाची, कार्याची कहाणी घरोघर पोहचवण्याचे महत्कार्य केले.

डॉ. कोटणीसांच्या मृत्युनंतर जवळजवळ ५१ वर्षांनी, ९ डिसेंबर १९९३ रोजी भारतीय टपाल खात्याने डॉ. कोटणीसांच्या नावाने एक खास टपाल तिकीट प्रसृत केले.

चिनने देखील डॉक्टरांच्या ४० व्या एक आणि ५० व्या मृत्युदिनी एक अशी दोन टपाल तिकीटे त्यांच्या नावाने प्रसृत केली.

२३ नोव्हेंबर २००६ रोजी भारताच्या दौर्‍यावर आलेले चिनचे राष्ट्राध्यक्ष श्री हू जिंताओ यांनी डॉ. कोटणीसांच्या सद्ध्याच्या कुटुंबियांची अगदी आवर्जुन भेट घेतली आणि अभिमानाने सांगितले की चिनी माणुस डॉ. द्वारकानाथ कोटणीसांवर अजुनही तेवढेच प्रेम करतो, त्यांनी चिनी जनतेसाठी केलेले कार्य चिन कधीही विसरणार नाही. त्यांनी डॉक्टर कोटणीसांचा उल्लेख “भारत आणि चिन यांच्यामधील पुल” असा केला. चिनमध्ये डॉक्टर कोटणीस ही एवढी आदरणीय व्यक्ती समजली जाते की ज्या ज्या वेळी कुणी चिनी उच्चाधिकारी भारतात येतो तेव्हा तो डॉ. कोटणीसांच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा तरी व्यक्त करतो किंवा किमान त्यांना फुले तरी पाठवतो. यात १९५४ साली आलेले चौ – एन्-लाय तसेच १९९६ चिनचे राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन, २००१ मध्ये लि पेंग आणि २००२ मध्ये आलेले चौ रोंगजी देखील सामील आहेत.

डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांचे थोरले बंधू श्री. मंगेश कोटणीस यांनी डॉक्टर कोटणीसांचे चरित्रही लिहीले आहे…”Bridge Forever”  या नावाने. काळच्या ओघात कदाचीत भारतीय डॉ. कोटणीसांना विसरून जातील, कदाचीत चिनी सत्ताधारीही विसरून जातील. पण चिनी लष्कर आणि यानान तसेच शांक्सी प्रांतातील सर्वसामान्य चिनी रयत मात्र डॉ. कोटणिसांना कधीच विसरणार नाही.

देवाला कोणी विसरतं का?

डॉक्टर, आज तुमच्या  जन्मशताब्दीनिमित्ताने हा लेख लिहीताना स्वतःही एक अस्सल सोलापूरकर आणि मुलतः एक भारतीय या नात्याने मला तुमचा विलक्षण अभिमान वाटतो.

संदर्भ : दै. लोकसत्ता, दि. १०-१०-२०१०

विशाल कुलकर्णी

7 thoughts on “चिन्यांचा आवडता भारतीय मित्र and a bridge forever….”

यावर आपले मत नोंदवा