Category Archives: शतशब्द कथा

शतशब्द कथा : म्हैलादिन

महिलामंडळाने ठाण मांडलय,
फाटक्या “चिंधीच्या” तुटक्या झोपडीसमोर…

तीन दगडाची चुल, मोडकी ट्रंक,
आजारी सासू, तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं !

तिला जाणीव करून देणार, तिच्या हक्कांची, अधिकारांची
आजचा शेवटचा टास्क…
सकाळपासुन चार “क्लायंट” केलेत, हा शेवटचाच !
बर्गर, पाच-सहाच इडल्या, सकाळी घेतलेला ज्युस,बस्स
उन्हे तापलीयेत, फ्रीजमधली चिल्ड बिअर वाट पाहतेय…

चिंधी कुठे उलथलीय कोण जाणे?
एक दिवस नसती गेली कामाला, काय बिघडणार होते?
किती वाट पाहायची या उन्हात अजुन?

उकिरड्याआड लपलेली चिंधी…
बाया काय जायाला न्हायी,
दाल्ल्याने हाग्यादम भरलाय, गोडधोड कर सांजच्याला
येक चिपटीबी आन सरपनाच्या पैक्यातुन गुत्त्यावरनं
नर्सबायनं सांगटलय…

म्हैलादिन का काय म्हंत्यात ते हाय म्हनं आज!

विशाल कुलकर्णी