Category Archives: सहज सुचलं म्हणुन….

सहज सुचलं म्हनून …
चालु घटना, घडामोडींवर भाष्य..!

हम आज अपनी मौत का सामान ले चले ….

आज सकाळी ऒफ़ीसला येताना, मध्येच एका ठिकाणी सिग्नल लागल्याने थांबावे लागले. बाईकचे इंजीन बंद केले आणि आपली पाळी येण्याची , सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहात थांबून राहीलो. शेजारी एक रंग ओळखू न येणारी डबडा मारुती ८०० येवुन उभी राहीली. मी एकदा तिच्या एकंदर बाह्यरुपाकडे बघितलं आणि नाक मुरडलं. एकदर रंग करडा किंवा तत्सम कुठलासा होता. आणि मालकाने बहुदा तीला गेल्या महिन्या-दोन महिन्यात साफ़ करण्याची तसदी घेतली नव्हती. मी तोंड वाकडे करत खिडकीतून आत डोकावलो. एक साठीच्या घरातले काका गाडी चालवत होते. त्याच्याकडे पाहताना माझ्या लक्षात आले की गाडीत अगदी हळु आवाजात कुठलंसं जुनं गाणं लागलय. मी जरा लक्ष देवून ऐकायचा प्रयत्न केला आणि बोल कळाले…

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

तेवढ्यात हिरवा सिग्नल लागला आणि काकांनी गाडी भरकन पुढे काढली. मीही निघालो. पण त्या गाण्याच्या ओळी कानात गुंजत होत्या. त्या गाण्यासाठी म्हणून मी काकांचा गाडी साफ़ न करण्याचा गुन्हा सहज माफ़ करून टाकला होता.

५० च्या दशकात आलेला ’आन’ , दिलीपकुमार, नादीरा, प्रेमनाथ, निम्मी असे सगळेच आवडते कलाकार. माझ्या पेक्षा जवळजवळ २२ वर्षांनी मोठा असलेला हा बोलपट मला खुप आवडला होता. पुढे १९४० मध्ये औरत आणि १९५७ ला एक दंतकथा बनुन गेलेला ’मदर एंडिया’ दिलेल्या मेहबुब खान यांनी १९५२ मध्ये आपल्या या चित्रपटातून नादीराला पहिल्यांदाच ब्रेक दिला होता.

"आन"चे रंगीत पोस्टर

विशेष म्हणजे ’आन’ हा मेहबुबखानचा पहिलाच रंगीत चित्रपट होता. या चित्रपटाचे पहीले रिलीज त्याने लंडनमध्ये केले होते. एक सामान्य राजनिष्ठ माणुस आणि एक निष्ठूर, क्रूर राजकुमार यांच्यातली जुगलबंदी या चित्रपटात रंगवली होती. असो…

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण होते ’नौशाद’चे कर्णमधुर संगीत.

असे म्हणतात की या चित्रपटाच्या संगीतासाठी नौशादने १०० जणांचा ओर्केस्ट्रा वापरला होता, जी त्याकाळी फ़ार नवलाईची गोष्ट होती. स्व. मोहम्मद रफ़ी आणि लतादीदी तसेच शमशाद बेगम यांचे दैवी स्वर वापरून नौशादने यात एकुण दहा गाणी दिली होती.

आग लगी तन-मन में, दिल को पड़ा थामना : शमशाद बेगम

आज मेरे मन में सखी बाँसुरी बजाए कोई : लतादीदी

गाओ तराने मन के जी, आशा आई दुलहन बन के जी : मो.रफ़ी, लतादीदी, शमशाद आणि शाम

चुपचाप सो रहे हैं वो आनबान वाले, आख़िर गिरे ज़मीं पर ऊँची उड़ान वाले : लतादीदी, मो. रफ़ी

मान मेरा अहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार : मो. रफ़ी

मुहब्बत चूमे जिनके हाथ जवानी पाओं पड़े दिन रात : मो. रफ़ी आणि शमशाद

सितमगर दिल में तेरे आग उलफ़त की लगा दूँगा, क़सम तेरी तुझे मैं प्यार करना भी सिखा दूँगा : मो. रफ़ी

दिल को हुआ तुम से प्यार, अब है तुम्हें इख़्तियार, चाहे बना दो, चाहे मिटा दो : मो. रफ़ी

खेलो रंग हमारे संग : शमशाद बेगम आणि लतादीदी

तुझे खो दिया हमने पाने के बाद : लतादीदी

आणि शमशाद बेगमनेच गायलेलं “मै रानी हूं राजेकी…..!”

सगळीच गाणी शकील बदायुनी यांच्याकडून लिहुन घेण्यात आलेली होती.

(ज्या गाण्यांच्या लिंक्स मी इथे देवू शकलो नाही, त्या कुणाकडे असल्यास कृपया इथे देणे ह विनंती.)

याच कर्णमधूर मैफ़ीलीतलं हे एक सदाबहार गीत…

दुडक्या चालीने चालणारी घोड्याची बग्गी, मागे नाक फ़ुगवून (अक्षरश: नाक फ़ुगवुन) बसलेली नादीरा …आणि चढवलेल्या खोट्या दाढीमिशा भिरकावुन देवुन ” दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले ” म्हणत मिश्किलपणे नादीराला छेडणारा देखणा “जय” उर्फ़ दिलीपकुमार ! नौशादसाहेबांनी अशी कित्येक सुंदर गाणी देवून आपल्याला अक्षरश: उपकृत करुन ठेवले आहे.

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले…!

गीतकार : शकील बदायुनी

संगीतकार : नौशाद

दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
उलफ़त की राह में
मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
वो ले चले हैं आन तो हम जान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
क़िसमत के खेल का
मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
कर दे जो दिल का ख़ून वो मेहमान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले

त्या सगळ्या जुन्या सुगंधी आणि मधुर आठवणी छेडणारी ती डबडा मारुती ८०० आणि ते म्हातारे काका यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आता कुठे शोधू?

विशाल.

कलि … (?)…

एकदाचा कोर्टाने निकाल दिला…अ‍ॅड. उज्वल निकमांच्या कारकिर्दीत अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला.

’कसाब’ ला फ़ाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एकुण चार गुन्ह्यांसाठी मरेपर्यंत फाशी आणि पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.

फाशी : १६६ निरपराधांची हत्या व हत्येचा कट, हत्येसाठी मदत करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कृत्य इ. गुन्ह्यांसाठी फ़ाशी.
जन्मठेप : हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान व स्फोटकेविषयक कायदा याच्याशी संबंधीत पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायमुर्तींनी कंदाहार प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणुन लवकरात लवकर कसाबला फाशी देण्याची शिफारसही केली….

शिक्षा ऐकली आणि त्या २६/११ च्या त्या तीन दिवसात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या पत्थरदील कसाबचा घसाच कोरडा पडला. शिक्षेच्या सुनावणीच्या दरम्यान खाली मान घालून बसलेला ‘कसाब’ शिक्षेची कल्पना आल्यावर चक्क रडायला लागला. शिक्षा सुनावण्यात आल्यावर त्याने पाणी मागितले.

गंमत वाटली, शेकडो लोकांना हसत हसत मृत्युमुखी धाडणारा, सहजपणे लहान मुले, वृद्ध, स्त्री, पुरुष कसलाही विचार न करता सरसकट सगळ्यांवर निर्विकारपणे गोळीबार करणारा कसाब, केसची सुनावणी चालु असताना निर्लज्जपणे हसणारा कसाब… स्वतःचा मृत्यु समोर दिसायला लागल्यावर मात्र चक्क रडला. मग नक्की कुठला कसाब खरा? निर्विकारपणे शेकडो निरपराधांची हत्या करणार क्रुर ‘कसाब’ किं स्वतःचा मृत्यु समोर दिसल्यावर रडणारा, मृत्युला भिणारा एक भित्रा माणूस (?) अतिरेकीही शेवटी माणुसच असतो….!

इथे मला कसाबचे किंवा दहशतवादाचे समर्थन करायचे नाहीय. पण एक गोष्ट निश्चित की मृत्युची भीती त्याला देखील वाटते. इतके दिवस उसने अवसान आणुन बसलेल्या ‘कृरकर्मा’ कसाबला स्वतःचा मृत्यु डोळ्यासमोर दिसला आणि इतका वेळ रोखुन धरलेली भीती बाहेर आली. त्याला त्या क्षणी डोळ्यासमोर आपणच मारलेल्या शेकडो निरपराध माणसांची प्रेते दिसली असतील का? त्यांच्यामध्ये स्त्री, पुरूष, लहान मुले कदाचित एखादी गरोदर स्त्री, एखादे आज्जी-आजोबाही असतील. त्या सगळ्यांची रक्तबंबाळ प्रेते, हाडा मासाचा तो छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकावर पसरलेला सडा त्याला आठवला असेल का? कदाचित त्याला त्याचे वृद्ध आई-वडील आठवले असतील का?

का रडला असेल कसाब?

स्वतःच्या मृत्युच्या कल्पनेने? की आपण केवढा भयानक , नृशंस म्हणता येइल असा संहार केलाय याची कल्पना येवून त्याला रडू फुटले असेल? मला मान्य आहे, या क्षणी त्याच्या रडण्याबद्दल कुणालाही सहानुभूती वाटणार नाहीये, मलाही वाटत नाहीये. त्याने कृत्यच एवढे भयानक केलेय की ज्याला क्षमा नाहीच. पण त्या रडण्यामागे फक्त मृत्युची भीतीच असेल का? अगदी एक टक्का सुद्धा पश्चातापाची भावना असण्याची शक्यता आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मृत्यु ही खरोखर त्याच्यासाठी योग्य शिक्षा ठरेल का? मला मान्य आहे की भारतापुढे कायम टांगती तलवार बनुन लटकत असणार्‍या दहशतवादाला, अतिरेक्यांना एक धडा घालून देण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी म्हणु हवे तर, एक इशारा देण्यासाठी म्हणू हवे तर कसाबला फाशी होणे आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा त्यातुन चुकीचा संदेश जावून दहशतवाद आणि दहशतवादी अजुन उन्मत्त होण्याची शक्यता आहे. पण कसाबला फाशी देणे हा आजच्या दहशतवादावरचा तोडगा आहे का? माझे स्वतःचे मत त्याला फाशीच द्यायला हवी असेच आहे, पण मी चुकीचा असु शकतो. पण पुन्हा पुन्हा तोंड लपवुन ढसाढसा रडणारा कसाब डोळ्यासमोर उभा राहतो आणि एक मन विचारायला लागते….

असे किती कसाब आपण अजुन पाहणार आहोत? या ‘कसाबांना’ कधीच अंत नाही का? हा दहशतवाद कधीच संपणार नाही का? पुन्हा पुन्हा हे असे कसाब जन्माला येतच राहणार का?

कसाबचे अश्रु…..! ते नक्की काय होते? कसाबचे रुदन किं नियतीचा उपहास? माझ्याकडे सगळ्यांना सारखा न्याय आहे. केलेल्या प्रत्येक गोष्टींचा हिशोब तुम्हाला इथे, या पृथ्वीतलावरच द्यावा लागतो असे तर नियती सांगत नाहीय ना?

कसाब नक्की कसा आहे. किती खरा किती खोटा? न्यायालयासमोर उसने अवसान आणुन बसलेला, प्रत्येक गोष्टीवर उपहासाने हसणारा, टर उडवणारा कसाब खरा किं शेवट जवळ आला हे कळल्यावर गर्भगळीत होवून रडणारा कसाब खरा? अगदी परवा परवा पर्यंत तो अगदी हसत असायचा. जणु काही आपल्या न्यायव्यवस्थेचीच टर उडवत असावा तसे. बहुदा त्याने विचार केला असेल.

“अरे ये हिंदुस्थान की अदालत है! कमसे कम १०-१२ साल केस चलेगा! उसके बाद ,…. तब का तब देखा जायेगा!”

जर असा विचार कसाबने केला असेल तर त्यात खोटे, चुकीचे काय आहे? आजही आपल्या न्यायालयांतून शेकडो, हजारो केसेस विलंबीत अवस्थेत पडून आहेत. मुंबई बॉम्ब स्फोटाचा निकाल लागायला जवळपास सतरा वर्षे वाट पाहायला लागली. अफजल गुरु सारख्या कितीतरी देशद्रोह्यांना सरकार फुकट पोसतेय. अशा अवस्थेत कसाबने स्वतःच स्वतःला १०-१२ वर्षाची खात्री दिली असेल तर त्यात नवल ते काय? पण तसे असेल तर कादाचित कसाबला माहीत नसावे की भारतात जोपर्यंत गुन्हा साबीत होवून शिक्षा होत नाही तोपर्यंत तो कैदी कच्चा कैदी म्हणून ओळखला जातो. आणि त्याला कैद्याला लागु असलेल्या कुठल्याही सवलतींचे फायदे मिळत नाहीत. (मी चुकत असेन तर कृपया तज्ञांनी चुक सुधारावी ही विनंती.) कच्चा कैदी असणे हा प्रकार किती भयानक असतो, किंबहुना फाशीपेक्षाही भयानक असतो हे मुंबई बाँबस्फोट प्रकरणातले आरोपी ( खरे आणि संशयितही) सांगतील. पण कसाबला तर अगदी राजेशाही ट्रीटमेंट मिळतेय. त्याला सुरूवातीपासुनच सर्व सोयी पुरवल्या जात होत्या. चिकन मटण पुरवले जात होते. का करतो आपण लाड या असल्या कृर पशुंचे?

आता येणारे काही आठवडे पुढच्या प्रक्रिया चालू राहतील. विशेष कोर्टाच्या या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्का मोर्तब होणे अत्यावश्यक आहे. कसाबने अपील केले नाही तरी त्याच्याविरुद्धचे पुरावे तपासून फाशीच्या योग्यायोग्यतेची तपासणी हायकोर्टाला करावी लागेल. त्याच्याही नंतर कसाबला सुप्रीम कोर्ट आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज असे पर्याय असतीलच. तेव्हा प्रत्यक्ष शिक्षेच्या अंमलबजावणीला अजुन किती वाट पाहावी लागेल? फाशीची शिक्षा प्रत्यक्षात येइल का? आलीच तर त्याला अजुन किती वर्षे जावी लागतील. (आपले सरकार मारे ऐटीत सांगतेय या वर्षाअखेरीपर्यंत कसाबची फाशी प्रत्यक्षात यायला कसलीच अडचण नाही म्हणुन, पण ती प्रत्यक्षात येइल तेव्हा खरे.) आणि महत्वाचे म्हणजे कसाबला फाशी होइपर्यंत असे अजुन किती कसाब आपल्याला पाहावे लागतील? असे अनेक प्रश्न सद्ध्यातरी अनुत्तरीतच राहणार आहेत. पण या सर्व घडामोडीत एक विचार मनात आल्यावाचून राहवत नाही…

कुठलीही व्यक्ती इतक्या थराला कशी काय जावू शकते? ‘कसाब’ किंवा कुणीही अतिरेकी इतक्या कृरपणे आपल्याच सारख्या इतर मानवांची हत्या कशी काय करू शकतात? प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या आईच्या पोटातून जन्म घेतलेला असतो. प्रत्येकामध्ये कुठेतरी मानवी अंश असतोच असतो. प्रत्येकाला एक मन असते. पण मग ही माणसे आपले माणुसपण का विसरतात? त्यांची मने दगडाची कशी काय बनतात? विशेष म्हणजे मध्ये कसाबने एक वेगळाच स्टँड घेतला होता. (अर्थात ते त्याला त्याच्या वकीलाने सुचवले असणार) . तर त्यानुसार कसाब म्हणे मुंबई फिरायला आला होता. आणि २६/११ च्या काही दिवस आधीच पोलीसांनी त्याला चौपाटीवरुन ताब्यात घेतले होते. नंतर कोणी सापडत नाही म्हटल्यावर त्याला बळीचा बकरा म्हणुन पुढे करण्यात आले. आता हा डाव ‘कसाब’चा असेल तर एकवेळ समजण्यासारखे आहे, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो शक्य ते सारे प्रयत्न करणारच. पण जर ते त्याला त्याच्या वकीलाने (भारतीय) सुचवले असेल…
तर करकरे, कामटे, साळसकर, ओंबाळे आणि अशा अनेक ज्ञात – अज्ञात वीरांच्या बलिदानाचा अपमान करण्याच्या आरोपाखाली त्या वकीलाला देखील फाशीची शिक्षा का सुनावू नये?… असे विधान तो करुच कसे शकतो?… आणि तेही इतका ठळक पुरावा असताना…..

kasab.jpg

“नैनं छिंदंती शस्त्राणी……..” हे कितीही मान्य केलं तरी त्या आत्म्याला जोपर्यंत कुडीची साथ असते तोपर्यंत त्याला काहीतरी अस्तित्व असतं. ओळख असते. ती ओळख, ते अस्तित्व मिटवण्याचा अधिकार माणसाला कोणी दिला? आपल्याच सारख्या माणसांवर शस्त्र उगारताना, त्याचं रक्त सांडताना काहीच भावना निर्माण होत नाहीत का मनात? देवाची, गेलाबाजार पोलीसांची भीती एकवेळ वाटत नाही असे म्हणता येइल्…पण तुमची सद सद विवेक बुद्धी ? तिचे काय?

काल ऑफीसमध्ये एका सहकार्‍याबरोबर माझा थोडासा वाद झाला. मी रागाच्या भरात त्याला “तु गप बे भें….!” म्हणून शिवी दिली. तर काल रात्री बराच वेळ झोप नाही आली मला. आम्हा दोघांच्या भांडणात त्याच्या किंवा कुणाच्याच बहिणीला आणण्याचा काय नैतिक अधिकार होता मला? मला खरेच झोप आली नाही. कितीतरी वेळ या अंगावरचे त्या अंगावर होत राहीलो. शेवटी त्या सहकार्‍याला रात्री २.३० वाजता “सॉरी यार!” म्हणून समस केला. त्यानंतर कुठे डोळा लागला.

मग माझ्याच सारखा एक माणूस इतक्या निर्विकारपणे शेकडो जणांच्या हत्या कशा काय करू शकतो? बरं.. या हत्या करताना त्याच्या चेहर्‍यावर कुठलीही अपराधीपणाची भावना नसते. अर्थात अनेक कारणे असु शकतात याची, धर्मांधता, एखादा पुर्वग्रह, दुराग्रह, ब्रेन वॉशिंग ई.ई…..

मला त्यांच्या मुळाशी जायचे नाहीय. माझा प्रश्न असा आहे की मुळात परमेश्वर अशी शक्यताच कशी निर्माण करू शकतो? (जर तो असेल तर.) त्यानेच निर्माण केलेले एक अस्तित्व दुसर्‍या अस्तित्वाच्या मुळावर उठलेय की कल्पना त्याला सहनच कशी होते? (अर्थात परमेशराने सृष्टीच्या बाबतीत निर्माण केलेले जिवन चक्र हा वेगळा विषय आहे.) माणसाचा असा राक्षस का होतो?

कलि .. कलि म्हणतात तो हाच का?

ता.क. अ‍ॅड. उज्वल निकम यांनी दिलेल्या माहितानुसार कसाब रडला ही बातमीच खोटी आहे, प्रसारमाध्यमांनी रंगवलेली की बनवलेली आहे. अ ओ, आता काय करायचं

विशाल कुलकर्णी