Category Archives: सहज सुचलं म्हणुन….

सहज सुचलं म्हनून …
चालु घटना, घडामोडींवर भाष्य..!

रिकामटेकड्याची डायरी – दिवस १ आणि २ (Corona Lockdown)

कोरोना लॉकड़ाऊन – दिवस पहिला

पहिला दिवस सगळा विचार करण्यातच गेला. क़ाय क़ाय करायचे? कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या अडगळीत टाकायच्या? काहीं नविन लेखन, काही जुन्या कथा… 😜

माझ्या लेकीचा हा दुसरा गुढीपाड़वा. खरेतर काही प्लान्स होते, काही कल्पना होत्या डोक्यात. अमुक करायचं, तमुक करायचं. माऊला हा ड्रेस घालायचा वगैरे अनेक कल्पना शिजत होत्या. पण मध्येच कोरोना काकुंनी घोळ घातला आणि सगळाच बट्टयाबोळ !

तश्यात काल शेजारच्या सोसायटीचा वॉचमन सांगतं आला की काल रात्री एकच्या दरम्यान कुणीतरी गेस्ट आलाय आणि त्याच्या हातावर स्टैम्प आहे. आणि मग तंतरली. कोण आहे माहीत नाही, कुठे आहे माहीत नाही. बरे असेही नाही की इन्फेक्टेडच असेल. एअरपोर्टवरुन बाहेर पड़णाऱ्या प्रत्येकाच्या हातावर स्टाम्प मारला जातोच. नॉट नेसेसरी की हातावर स्टाम्प असलेला प्रत्येक जण इन्फेक्टेड असेलच असे नाही. रादर त्या व्यक्तीला बाहेर सोडलेय त्या अर्थी लक्षणे नसणार. पण या आजाराची लक्षणे असेही पहिल्या सात-आठ दिवसानंतरच दिसायला लागतात. त्यांमुळे सगळेच अंधारात. मग उगाच भलते विचार मनात आणून दिवस कश्याला खराब करा?

शेवटी ठरवलं. सण नेहमीप्रमाणेच मनसोक्त साजरा करायचा. कोण जाणे ही सुद्धा एक परीक्षा असेल आमच्यासाठी आणि माऊसाठी सुद्धा. तेव्हा उगाच कोरोना कोरोना करत बसण्यापेक्षा या एकविस दिवसात कुछ तो करोना, असं स्वत:लाच समजावलं. अनेक प्लान्स आहेत. कदाचित वर्तुळही.. 😜

त्यात कौत्याचा फोन आला होता. त्याने दोन प्लॉट्स ओतलेत डोक्यात. त्यापैकी एक तर सॉलिड इंटरेस्टिंग वाटतोय. मर्डर मिस्टरी आहे. मजा येईल लिहायला. काही अपूर्ण राहिलेल्या कविता- गझलासुद्धा पूर्ण करायच्यात. स्केचेज़ पेंडिंग आहेत. काही नवीन घेतलेली पुस्तके अजुन उघडलेली नाहीयेत. काही लॉन्ग प्लान्ड वेब सीरीज बघायच्या बाकी आहेत. लॉट मोअर थिंग्स टू डू !

चलो, कामाला लागुयात ! आज क़ाय केलं ते उद्या सांगेन !

#रिकामटेकड्याची डायरी

© विशाल कुलकर्णी

****((((*******(((((**********((((

कोरोना लॉकड़ाऊन – दिवस दुसरा
रिकामटेकड्याची डायरी

आजचा दिवस फार संथ, कंटाळवाणा गेलाय राव. ज्या दिवसाची सुरूवातच सोसायटीच्या कचरा कॉन्ट्रेक्टरच्या चेकवर सही करून होते त्या दिवसात क़ाय घडणार अजुन?

८.३० ला बोका उठला. किमान तास-दोन तास तरी गुरगुरत, मस्ती करत होता. मग काहीतरी खावून लाडोबा झोपला पुन्हा. तेव्हाच वाचायला बसलो बहुदा.

एक -दिडच्या दरम्यान कधीतरी फ्री झालो आणि सेटी (settee) उघडली. असं विचित्र तोड़ नका करू. माझी पुस्तके सद्ध्या सेटीतच असतात.

तर धों. वि. देशपांडे यांचं जीएंच्या कथा – एक अन्वयार्थ वाचत होतो. जीए हे न सुटणारं व्यसन आहे राव. ऑस्कर वाईल्ड ‘तथाकथित विचारवंत लोकांच्या वैचारिक कल्हईगिरीबद्दल’ बोलताना म्हणतो, “They are not thoughts but mere opinions.” जीए या सर्वांपेक्षा वेगळे आहेत कारण ते मते सांगत नाहीत, तर ते एक विचार मांडतात. जीए आपल्या अनुभवातुन लाभलेली दृष्टी वापरून जीवनाची कोड़ी सोड़वण्याचा प्रयत्न करतात. जीवनाचे सगळे पैलू पाहण्याचा, डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातून मिळालेली उत्तरे आपल्या कथातुन मांडतात.

जीएंच्या प्रत्येक साहित्यिक कलाकृतीला स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते, एक तर्कशास्त्र असते. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही कथेच्या अंगभूत तर्कावर तीचे चांगले असणें किंवा नसणे ठरत असते. (अर्थात एखादे पुस्तक किंवा कथा लोकांना आवडणे- न आवड़णे हे त्याच्या तर्कशास्त्रावर किंवा चांगले-वाईट असण्यावर अवलंबुन नसतें.) पण जीएंच्या सर्व कथांना, सर्व पात्राना तर्कशास्राची एक ठाम बैठक आहे. त्यांची पात्रे मानसशास्त्राचे सर्व नियम पाळतात, त्यांमुळेच जीवंत वाटतात. गूढ़ भासली तरी आपली वाटतात. मग तो विदूषक असो नाहीतर प्रदक्षिणामधले शांतक्का असो किंवा कवठे मधला दामू असो. जीए या पात्राना अगदी जीवंत करून आपल्यासमोर ठेवतात. त्यांच्या वेदनेची धग आपल्याला जाणवते.

पण तरीही जीए दुर्बोध, अगम्य, गहन का वाटत असावेत? मुळात जीए वाचायची सुद्धा एक पद्धती आहे. त्यासाठी आधी जीएंच्या विचारसरणीचा अभ्यास करावा लागेल. पण मुळातच मानवाला गूढतेचं एवढं आकर्षण का असतं? साध्या-सरळ गोष्टी सोडून कायम क्लिष्टतेकडे ओढ़ा का असतो त्याचा? मला अजुनही आठवते, लहानपणी शाळेत परीक्षेत सुद्धा हुकमी, सोपे, उत्तरे येत असलेले प्रश्न समोर असताना आधी अवघड प्रश्न सोड़वण्याकडे माझा कल असायचा, ज्यात माझा बराच वेळ जायचा आणि शेवटी मग सोपे, उत्तर माहीत असलेले प्रश्न सुद्धा राहून जायचे खुपदा.

आता इथलंच बघा ना सद्ध्या. या कोरोनापासून संरक्षणाचा सगळ्यात सोपा उपाय आहे विलगीकरण,स्वयं-विलगीकरण ! पण बऱ्याच लोकांना अजुनही ते पटत नाहीये. कुठले कुठले अवघड उपाय केले जाताहेत. (काही जण तर चक्क संस्कृतमधले मंत्र, श्लोक पाठ करताहेत, जपासाठी.) पुन्हा भरकटलो बघा. जाऊ दे, उद्या बोलूच पुन्हा…

शुभरात्री 🙏

© विशाल विजय कुलकर्णी
#रिकामटेकड्याचीडायरी

‘हमरा लाईफ कौनो लाईफ नही है कां?’

लेकीच्या लग्नात मंगळ आडवा येतोय हे कळाल्यावर कुठल्यातरी कुडमुड्या ज्योतिषाच्या सांगण्यावरुन आधी तिचे लग्न एका कुत्र्याच्या पिल्लाबरोबर लावुन द्यायला निघालेल्या आईला खडसावून विचारणारी बिनधास्त, सुशिक्षीत विंध्या हे तिची भूमिका करणाऱ्या रीयल लाईफ दिव्याचे रील लाईफमधले अगदी तंतोतन्त जुळणारे पात्र असावे.

प्रत्यक्षातही दिव्या तशीच बोल्ड, बिनधास्त, फटकळ आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येला, संकटाला हासत हासत जिद्दीने सामोरे जात बॉलिवुडमध्ये आज आपली एक जागा निर्माण केलीय तिने. हिंदी, पंजाबी, मलयालम, इंग्रजी अश्या विविध भाषातुन , विविध जॉनरच्या भूमिका करत आपल्या भूमिकात कायम एक वैविध्य आणि सातत्य राखणारी अभिनेत्री आणि तरीही दुर्लक्षीत राहिलेली एक अतिशय गुणी अभिनेत्री 👍

images (3)

१९९४ साली आलेल्या माहरुख मिर्झाच्या इश्क में जीना इश्क में मरना मधुन तिने पदार्पण केलं होतं. पण पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला. नंतर आलेल्या सल्लुमियाच्या वीरगतीने मात्र तिला हात दिला. यात ती भाईची बहीण बनली होती. त्यानंतर आली झैनब . शहीद ए मूहब्बत बूटासिंग या सत्यकथेवर आधारीत चित्रपटातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आलेली एक मुस्लिम पत्नी आणि शिख पती यांची सुंदर प्रेमकथा असलेला हा पंजाबी चित्रपट अनपेक्षितरित्या प्रचंड मोठा हिट ठरला. विशेषतः यातील गाण्यांनी पंजाब दुमदुमलं. गुरुदास मान, आशाताई, अनुराधा पौडवाल आणि दस्तूरखुद्द नुसरतसाहेब यांनी गायलेल्या गाण्यांनी कहर केला. विशेषतः नुसरतसाहेबांचे ‘इश्क दा रुतबा’ प्रचंड गाजले. याच चित्रपटकथेवर नंतर अनिल शर्माच्या गदरने इतिहास रचला.

पण याचा दिव्याला म्हणावा तसा फायदा झाला नाही. नाही म्हणायला तिला सहाय्यक भूमिका मिळू लागल्या. दिव्याकडे चेहरा आणि अभिनय दोन्हीही होते. तिने सहाय्यक भूमिकांचे सुद्धा सोने करायला सुरुवात केली. २००४ साली आलेल्या वीर-झारामधली तिने साकारलेली झाराची चुलबुली सखी ‘शब्बो’ कोण विसरु शकेल. या भूमिकेची प्रचंड प्रशंसा झालीं. दिव्याला अनेक पुरस्कारांची नॉमिनेशन्स सुद्धा मिळाली. त्यानंतर २००८ साली आलेल्या वेलकम टू सज्जनपुरची बिनधास्त विंध्या तिने भन्नाटच रंगवली. स्त्रियांना कायम दुय्यम वागणूक देणाऱ्या समाजावर व्यंगात्मक पद्धतीने कोरडे ओढ़णारी ही भूमिका होती. दिव्याने विन्ध्या अगदी मनापासून साकारली. चित्रपट फ़ारसा चालला नसला तरी याही भूमिकेचे भरपूर कौतुक झाले.

images (6)

images (4).jpeg
मग २००९ साली आला “दिल्ली ६” , राकेश ओमप्रकाश मेहराच्या या चित्रपटाने दिव्याला तिचा पहिला मानाचा आणि महत्वाचा आयफा पुरस्कार मिळवून दिला, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या श्रेणीत. या चित्रपटात तिने रंगवलेली मेहतरानी ‘जलेबी’ प्रचंड नावाजली गेली. अस्पृश्य असल्याने कायम सगळ्याच्या घृणेचा, तिरस्काराचा विषय ठरलेली, तरीही आपला आब राखून असलेली जलेबी अतिशय ताकदीने उभी केलीय दिव्याने. ती मोजक्याच भूमिका करत असते, पण प्रत्येक भूमिका अगदी चौखंदळपणे निवडलेली असते. मग स्टॅनले का डब्बामधली गोड रोझी मिस असो की हिरोईनमधली पल्लवी नारायण.

हिरोईनमधल्या पल्लवी नारायणला कोण विसरु शकेल? माहीची (करीना कपूर) प्रसिद्धी प्रमुख म्हणून असलेली आणि नंतर चांगली मैत्रीण झालेली, तिला पुन्हा टॉपला नेण्यासाठी जंग जंग पछाड़णारी पल्लवी कायम लक्षात राहील. दिव्याने हे पात्र अक्षरशः प्रचंड ताक़दीने उभे केलेय. पल्लवीच्या स्वभावातले अनेक कंगोरे, तीचे भारलेपण, माहीला स्टेज करण्यासाठी तिने केलेली प्रचंड धडपड दिव्याने अफाट ताक़दीने जीवंत केली होती.

images (7).jpeg

आणि मग आला ‘भाग मिल्खा भाग’ , यातली मिल्खाची बहीण दिव्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर समर्थपणे उभी केलीय. आपल्या वाटणीचं दूध मायेने मिल्खाला पाजताना तिच्या डोळ्यातलं आईपण आपल्यालाही जाणवतं. नवऱ्याशी भांडुन भावाला जपणारी वत्सल बहीण, नवरा की भाऊ या विलक्षण कात्रीत अडकलेली एक असहाय्य पत्नी, भावाला नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी आपली कर्णफुले काढून देणारी, नंतर भावाचे इंडियन आर्मीचे जर्किन घालून अभिमानाने मिरवणारी, त्याने आणलेल्या सोन्याच्या बांगड्या पहिल्यावर मुक्तपणे त्याच्या कुशीत शिरून रडणारी इशरी सिंग ज्या ताक़दीने दिव्याने उभी केली आहे त्याला तोड़ नाही. या भूमिकेने दिव्याला अनेक पुरस्कार, अनेक नॉमिनेशन्स मिळवून दिली. तिचा दूसरा आयफा पुरस्कार सुद्धा याच भूमिकेने मिळवून दिला तिला.

त्यानंतरही दिव्या बहकली नाही. अगदी चौखंदळपणे भूमिका निवडत शांतपणे काम करत राहिली. भारतीय राज्यघटनेवर आधारीत शाम बेनेगल यांच्या Samvidhaan: The Making of the Constitution of India मालिकेमधली पूर्णिमा बॅनर्जी असो वा इरादा या २०१७ साली आलेल्या अपर्णा सिंगच्या चित्रपटामधली मधली मुख्यमंत्री रमणदीप असो. तीची प्रत्येक भूमिका वेगळी आहे. इरादामध्ये तिने प्रथमच निगेटिव्ह भूमिका साकारली आणि इतक्या उत्कटतेने साकारली की तिला तिच्या आयूष्यातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून गेली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तिला या भूमिकेसाठी.

1_16a08386475.1978911_2909921910_16a08386475_medium.jpg
आपल्या वैयक्तिक आयूष्यात सुद्धा दिव्या तशीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. फटकळ आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तिच्या फोटोवर असभ्य कमेंट करणाऱ्या एका विकृताला तिने जे काही फटकावलेय की यंव रे यंव !

काही दिवसांपूर्वी नंदिता दासने ‘मंटो’ केला तेव्हा त्यातील मन्टोच्या बहुचर्चित ‘ठंडा गोश्त’ या कथेतील मनस्वी ‘कुलवंत कौर’च्या आव्हानात्मक आणि वादग्रस्त ठरू शकणाऱ्या भूमिकेसाठी नंदिताच्या डोळ्यासमोर पहिले नाव आले ते दिव्याचेच आणि ती छोटीशी इंटिमेट भूमिकासुद्धा दिव्याने अफाट ताक़दीने उभी केली.

Still there is long way to go Divya and horizons are the limits. पूढच्या कारकिर्दीसाठी दिव्याला मनःपूर्वक शुभेच्छा !
नाही, आज काही तिचा वाढदिवस वगैरे नाहीये. पण कुणालाही विशेषतः दिव्यासारख्या आवडत्या अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी मुहूर्त कशाला हवाय?

#CinemaGully
#विशालकुलकर्णी