Category Archives: व्यक्तीचित्रणपर लेख

” येरगुंडे गुरुजी “

हं तु उभा राहा रे, नवीन आलाहेस ना? नाव काय तुझं?

अं..गुर्जी माझं नाव विशाल कुलकर्णी आहे!

कानफटात आवाज काढीन ! बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? पुर्ण नाव सांग. आणि गुरुजी म्हणावं राजा, गुर्जी नाही, समजलं ?

हो गुरुजी. माझं नाव विशाल विजय कुलकर्णी. आधी पुण्याला होतो, वडिलांची बदली झाली म्हणुन इथे कुर्डुवाडीला आलो. आज पहिलाच दिवस आहे शाळेत माझा.

हं, ठिक आहे. पाटी बघु तुझी.

गुरुजींनी माझी पाटी घेतली, माझ्याच पेन्सीलने त्यावर एक ओळ लिहीली….ते मोत्यासारखे अक्षर मी पाहातच राहीलो.

हे घे, आता या ओळी सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिही आणि नंतर सगळे मिळुन तास काढा. शेवटचे वाक्य सगळ्या वर्गाला उद्देशुन होते.

गुरुजी, तास म्हणजे? ….. मी

अरे हो, तु नवीन आहेस ना ! तास म्हणजे फळ्यावर लिहीलेल्या ओळी पाटीवर पाच वेळा काढायच्या.

पा…..च वेळा?

गुरुजींनी माझ्याकडे रागाने बघीतले, “तु आता दहा वेळा काढशील! समजले?”

मी गपचुप मान डोलावली आणि माझ्या अक्षरात फळ्यावर लिहीले.

“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे !”

गुरुजींनी एकदा फळ्याकडे पाहीले, मग हळुच माझ्या खांद्यावर हात ठेवला.

दहा जावु दे तु सात वेळाच लिही. तुला कळालं का मी तुला इतरांपेक्षा जास्त वेळा का लिहायला सांगतोय ते?

हो गुरुजी, माझी आई नेहेमी सांगते, मोठ्यांना प्रतिप्रश्न करु नये, त्यांचा अनादर केल्यासारखे होते ते. चुक केलीय तर शिक्षा भोगायची लाज का वाटावी? मला मान्य आहे.

शाब्बास, आत्ता मी दहावरुन पुन्हा तुला सातच वेळा का लिहायला सांगितले ते सांग बरं.

ते मात्र मला नाही समजलं गुरुजी. कदाचित तुम्हाला माझी दया आली असेल.” मी एवढेसे तोंड करुन खालमानेने म्हणालो.

तसे गुरुजी खदखदुन हसले, “अरे वेड्या, हा तास लिहायचा प्रपंच कशासाठी तर तुम्हाला लिहीण्याची, सुवाच्य आणि शुद्ध लिहीण्याची सवय लागावी म्हणुन. आणि तु फळ्यावर लिहीलेली अ़क्षरे बघताना लक्षात आले की तुला हे तास लिहायची गरज नाहीये. पण तरीही हे हस्ताक्षर असेच टिकावे म्हणुन तास काढणे आवश्यकच आहे आणि प्रत्युत्तर केल्याची शिक्षा म्हणुन दोन वेळा जास्ती लिहायला लावले. समजले?

तुझं अक्षर छान आहे रे विशाल, ते असंच टिकव शेवटपर्यंत. सुंदर अक्षर हा खुप मोठा दागिना आहे लक्षात ठेव. समजलं?

त्यांना बहुदा प्रत्येक वाक्यानंतर समजलं ? म्हणुन विचारायची सवयच होती. हसताना मात्र त्यांच्या तोंडाचे बोळके होत होते. त्यांचे पुढचे, वरच्या रांगेतले दोन आणि खालच्या रांगेतला एक असे तीन दात पडलेले होते. पण ते हसणे…, ते हसणे मात्र एखाद्या निरागस बाळासारखे गोड होते.

येरगुंडे गुरुजींची आणि माझी ही पहिलीच भेट. पण पहिल्याच भेटीत माझ्या हस्ताक्षरामुळे मी त्यांच्या मर्जीस उतरलो आणि त्यांची शाबासकी मिळवली. आमच्या आईसाहेबांची कृपा. ती मला रोज सकाळी उठले की काहीतरी लिहायला बसवायची. काहीही लिही पण नीट लिही, शुद्ध लिही हा तिचा आग्रह असे. पुण्यातील पाषाण येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर ति. आण्णांची कुर्डुवाडीला बदली झाली आणि कुर्डुवाडीच्या सरकारी शाळेत चौथीला प्रवेश घेतला. तिथला पहिल्या दिवसाचा हा प्रसंग. पुढे आयुष्यात खुप चांगले शिक्षक भेटले, खुप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडुन. नांदी कुर्डुवाडीत झाली होती येरगुंडे गुरुजींच्या हाताखाली. खुप गोड होता हा माणुस. जातिवंत शिक्षक … आजच्यासारखे ट्युशन्सवर जगणारे शिक्षक नव्हते आमचे येरगुंडे गुरुजी. तो माणुस खुप मोठा होता…. अगदी आभाळाएवढा.

गुरुजींनी फक्त अभ्यासक्रमातलेच धडे नाही शिकवले. त्यांनी जगण्याचे धडे दिले, जगणं समृद्ध कसं करावं ते शिकवलं. त्यावेळेस ते कळायचं नाही, कधी कधी तर जाचक वाटायचं पण आज ते दिवस आठवले की वाटतं गुरुजी किती पुढचा विचार करायचे. आता बर्‍याचवेळा कार्यालयीन कामात काही अडचणी निर्माण होतात. क्षणभर मेंदु ब्लॉक होवुन जातो. पण मग आपसुकच येरगुंडे गुरुजींची आठवण येते आणि मग जाणवतं की अरे हे तर गुरुजींनी शिकवलं होतं, सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेली उदाहरणे वेगळी असतील, संदर्भ वेगळे असतील पण निष्कर्ष तेच होते. अगदी साध्या साध्या गोष्टीतुन शिकवायचे ते.

एक प्रसंग आठवतो, शाळा सुरु झाल्यावर काही दिवसांनी गुरुजींनी सांगितलं की उद्यापासुन तु ही इतरांबरोबर शिकवणीला येत जा. माझ्या अंगावर काटाच आला. शिकवणीला जायचं म्हणजे २०-२५ रुपये महिना फ़ी भरणं आलं, आणि घरची परिस्थिती मला माहीत होती. आण्णा नाही म्हणाले नसते पण मग मला त्यांची पार्श्वभागावर ठिगळे लावलेली पॆंट आठवली. तिच्यावर अजुन एक ठिगळ नको होते मला. मी परस्परच गुरुजींना सांगुन टाकले की घरच्यांनी शिकवणीला नकार दिलाय म्हणुन. पण इतक्यात ऐकतील तर ते येरगुंडे गुरुजी कसले त्यांनी दुसर्‍या एका विद्यार्थ्याला घरी पाठवुन माहीती काढली आणि माझ्या दुर्दैवाने आण्णांनी त्याला सांगितले की काही हरकत नाही उद्यापासुन विशुलाही घेवुन जात जा शिकवणीला म्हणुन. दुसर्‍या दिवशी पहाटे साडे पाच वाजता वर्गातली चार दांडगी मुलं घरापाशी हजर झाली आणि चक्क माझा मोरया करुन शिकवणीला आणले. गुरुजींनी समोर उभे करुन विचारले

“का रे खोटे का बोललास? मला सगळ्या चुका चालतील पण माझा विद्यार्थी खोटे बोलतो हे नाही चालणार, समजले?”

मी रडतरडत मनातलं कारण सांगितलं तसे गुरुजी हसायलाच लागले. “इकडे ये!”

मी जवळ गेलो,

” वेड्या, तुला कुणी सांगितलं की या शिकवणीची फ़ी द्यावी लागेल म्हणुन? अरे जी मुलं खरोखर अभ्यासु आहेत आणि ज्यांना ज्यादा अभ्यासाची गरज आहे अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी मी या शिकवण्या घेतो. इथे कसलीही फी नाहीय, असली तर फक्त नियमीत हजेरी आणि मनापासुन अभ्यास बस्स .”

मी गुरुजींकडे बघतच राहीलो. आजही माझ्याकडे दर शनिवार रवीवार आमच्या सोसायटीच्या मागे असलेल्या झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य. या सगळ्यांची पाळंमुळं बहुदा येरगुंडे गुरुजींनीच रुजवली असावीत.

तर माझी शिकवणी सुरु झाली. पहीले काही दिवस गेल्यावर गुरुजींनी एकदम शिकवणीची जागा बदलली. आधी ते शाळेतच शिकवणी घेत होते. पण आता त्यांनी सांगितलं की उद्यापासुन माझ्या घरी या. सकाळी साडे सहा वाजता. गुरुजींचं घर गावाबाहेर, कुर्डु रोडला आंतरभारती शाळेपाशी त्यांचं घर होतं. आम्ही राहायला गावाच्या दुसर्‍या टोकाला. गुरुजींकडे साडे सहाला पोचायचे म्हणजे घरातुन साडेपाचला निघणे आले. त्यासाठी कमीत कमी साडे चारला तरी ऊठणे आले. पण जवळ जवळ ८-९ जणांचा गृप होता. त्यामुळे आम्ही उत्साहाने लवकर उठुन गुरुजींच्या घराकडे पळायला लागलो. साडे पाचलाच आम्ही तिथे हजर असायचो. मग गुरुजी सांगणार,

“माझी पुजा व्हायची आहे अजुन, तोपर्यंत समोरच्या मैदानावर खेळा. ”

मग सहा – सव्वा सहाला माई मैदानावर यायच्या बोलवायला. माई म्हणजे गुरुजींच्या पत्नी. गुरुजींचेच दुसरे रुप. साडे पाच फुटाची सावळ्या रंगांची माई मला अजुन आठवते. घरात गेलो की आधी गुरुजी तिला ऒर्डर सोडायचे.

“माई, पाखरं खेळुन दमलीत. आधी त्याना काहीतरी खायला दे. हात पाय धुवुन घ्या रे आधी.”

मग कधी बटाट्याचे पापड, कधी मटकीची उसळ, कधी ताक भाकरीचा काला असा पौष्टिक, सात्विक आहार पोटात पडायचा. त्यानंतर गुरुजी आधी एखादा श्लोक शिकवायचे आणि मग शिकवणीला सुरुवात व्हायची. माझी मुंज तशी उशीराच झाली पण गायत्री मंत्रापासुन मृत्युंजयमंत्रासकट सगळे मंत्र गुरुजींनी आम्हाला चौथीतच शिकवले होते. रामरक्षा, हनुमान स्तोत्र, मनाचे श्लोक त्या काळी आम्हाला मुखोद्गत असायचे. अजुनही म्हणायला सुरुवात केली की डोळ्यासमोर गुरुजींची बुटकेली, गौरवर्णीय मुर्ती उभी राहते. श्लोक म्हणताना चुकले की वटारलेले डोळे अजुनही कुठलीही चुक झाली की डोळ्यासमोर येतात आणि आपोआपच ती चुक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी अभ्यासापासुन ते शारिरीक मैदानी खेळापर्यंत सगळ्या चांगल्या सवयी त्यावेळी गुरुजींनी आम्हाला लावल्या होत्या. खरेच त्यावेळी जर गुरुजी भेटले नसते तर……..! आज कदाचित विशाल कुणी वेगळाच असला असता.

कुर्डुवाडीत जास्त वर्षे नाही राहीलो आम्ही. दिड वर्षे असु फार तर. त्यानंतर दौंडला बदली झाली आण्णांची. मला फार राग यायचा त्यावेळी. कुठेही व्यवस्थित शाळा सुरु आहे म्हटले की आण्णांची बदली झालीच. माझे प्राथमिक शिक्षण (पहिली इयत्ता ते पाचवी इयत्ता) एकुण चार ठिकाणी मिळुन झाले. आता कुठे नवीन मित्र होताहेत म्हटले की निघालो नवीन गावाला. मला आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीचा फार राग यायचा. मी रागाने म्हणायचो की चुकुनही पोलीसात जाणार नाही.

येरगुंडे गुरुजींना सोडुन जायचे खरेच जिवावर आले होते. अवघ्या एक वर्षांचा त्यांचा सहवास होता, पण त्या माणसाने वेड लावले होते. कुर्डुवाडी सोडायच्या आधी मी गुरुजींना भेटायला गेलो. खुप रडलो आणि नेहेमीप्रमाणे आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीला शिव्या दिल्या. तसे गुरुजींनी मला जवळ घेतले आणि मला म्हणाले…ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले आहेत जणु.

“असं म्हणु नये राजा, अरे त्यांचं पोलीस खातं आहे म्हणुन आपण आरामात, बिनधास्तपणे सुखाने जगु शकतो. तुझ्या आण्णांची दर एक दिड वर्षांनी बदली होते याचं कारण माहीत आहे तुला?

वेड्या .. पोलीसात दोन प्रकार असतात

१) खाकी वाले : यांचा आपल्या खाकी गणवेशावर विश्वास असतो, निष्ठा असते. त्याच्यासाठी, त्याचा मान राखण्यासाठी ते आपलं सर्वस्व पणाला लावतात.

आणि

२) खा ……की वाले: यांच्यासाठी खाकी म्हणजे भ्रष्टाचार, शक्य होईल तेवढे खावुन घ्यायचे, लोकांना लुबाडत राहायचे हाच त्यांचा धर्म बनतो. आणि अशी माणसं मग वर्षानुवर्षे एका ठिकाणी चिकटुन राहतात.

सुदैवाने तुझे आण्णा पहिल्या वर्गात म्हणजे खाकीवर निष्ठा असलेल्यात मोडतात. पण त्यांचा हा प्रामाणिकपणाच त्यांना एका जागी टिकु देत नाही. पण म्हणुनच मला खुप अभिमान वाटातो तुझ्या आण्णांचा आणि तुलाही वाटायला हवा, समजलं ?

मी मान डोलावली …….

हे आणि असंच बरंच काही गुरुजींनी त्यावेळी सांगितलं. शब्द वेगळे असतील त्यांचे पण मतितार्थ हाच होता. खरेतर त्यावेळी मला काहीच कळालं नव्हतं. मी फक्त मान डोलावत होतो. मला फक्त एवढेच कळाले की आण्णा काहीतरी चांगलं काम करताहेत ज्याचा गुरुजींनासुद्धा अभिमान , आनंद वाटतोय. गुरुजींच्या त्या बोलण्याचा अर्थ आज खर्‍या अर्थाने कळतोय मला.

त्यानंतर परवा एक दोन तीन वर्षापुर्वी एकदा कुर्डुवाडीला गेलो होतो तेव्हा गुरुजींचं घर शोधत गेलो होतो. पण तिथे आत्ता एक मोठी सोसायटी उभी राहीलेय. गुरुजींच घर मला कुठे दिसलच नाही. शाळेत जावुन विचारले तर त्यांच्याकडेही गुरुजींचा सद्ध्याचा पत्ता मिळाला नाही. पण मला माहीत आहे , गुरुजी जिथे कुठे असतील तिथे आजुबाजुची चार मुले जमवुन त्यांना शिकवीत असतील.

सद्ध्या कंपनीतल्या कामगारांची बाजु घेवुन मी जेव्हा आमच्या मॅनेजर्सबरोबर वाद घालतो तेव्हा माझे सहकारी म्हणतात…

“यार विशाल, तेरेको क्या पडी है ! वो लोग निपट लेंगे उनका, क्युं अपनी नोकरी खतरेमें डाल रहे हों !”

त्यांना कसं सांगु ? हे मी नाही करत. माझ्या मनातला माझ्या आण्णांबद्दलचा आदर, येरगुंडे गुरुजींनी अंगात भिनवलेला आदर्शवाद हे करतोय. ते माझं कर्तव्य आहे, ते टाळायचे म्हणजे, यदाकदाचित कधी गुरुजी कुठे भेटलेच तर त्यांना तोंड नाही दाखवु शकणार मी.

अहं …. जर गुरुजी भेटलेच तर त्यांची नजर चुकवुन जाणे मला नाही जमणार, कदापी नाही.

अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील…

“विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !”

विशाल

“संभा”

“संभा…या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा…..!”

संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे…………..!

संभा……काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत………!

संभाजी…..अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही…!

संभा….दोन चहा……………!

संभा……तो कालचा ड्राफ्ट चेक केलास….प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला…?

संभा………….?

हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल. मुळात संभा कोण…हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच म्हणा. तरी देखिल सांगतो. संभा आमच्या ऑफिसचा प्युन कम क्लार्क कम टेलिफोन ऑपरेटर कम पोस्ट्मन कम……..बरंच काही.

संभाजी तुकाराम जाधव. ७-८ वर्षांपुर्वी सातार्‍याजवळच्या कुठल्याशा खेड्यातुन नोकरीच्या शोधात संभा मुंबईला आला. गावाकडे तीन एकर शेती ( बहिणीच्या लग्नात गहाण पडलेली)..दोन खोल्यांचं एक जुनाट घर…आणि त्या घराइतकीच जुन, जर्जर झालेली, थकलेली वृद्ध आई.
वडील संभाच्या लहानपणीच………………………
एका तमासगिरीणीच्या नादी लागुन परागंदा झालेले.

गावातल्या शाळेत कसे बसे एस. एस. सी. करुन संभा नोकरीच्या शोधात मुंबईला मामाकडे आला होता. परळच्या बी.डी. डी. चाळीत मामाच्या घरी…घरी म्हणण्यापेक्षा घरासमोरच्या बाल्कनीत राहात होता. बिचारा मामा तरी काय करणार, त्याची स्वतःची तीन लेकरे, बायको…….
अगदी सख्खा भाच्चा असला तरी एकुलत्या एक खोलीत किती जण राहणार…! मामी बिचारी रोज वेळेवर जेवायला वाढत होती हेच नशीब. पण संभा बहुदा हे सगळं गृहित धरुनच आला होता.

तेव्हा मी ठाण्याच्या एका छोट्याशा फर्ममध्ये सेल्स/सर्व्हिस इंजिनीअर म्हणुन काम करत होतो. तो दिवस अजुनही आठवतो. दुपारी एक- दिड वाजला होता. आम्ही सगळे डबे उघडुन उदरं भरणंचे पवित्र कार्य आटपत बसलो होतो. एक काळा सावळा, किडकिडीत मुलगा आत आला. त्यावेळचं आमचं ऑफीस म्हणजे १५ X २५ चा एक लंबुळका हॉल होता. एक पार्टिशन घालुन बॉसची केबीन बनवली होती. बाकी टेबलच्या दोन रांगा..एकुण पाच टेबलं….आणि आणखी एक पार्टिशन घालुन दर्शनी बाजुला रिसेप्शनिस्ट्चे टेबल. त्यामुळे कोणीही आले की लगेच दिसायचे. अशात तो आला..साहेबांना भेटायचेय म्हणाला. त्याला बसायला सांगुन आम्ही पुन्हा एकदा डब्यावर तुटुन पडलो.
मध्येच मला काय वाटले कुणास ठाउक मी त्या मुलाला हाक मारली, नेहेमीच्या सवयीप्रमाणे …

” या जेवायला,” ..

मी आपला सहजच म्हणालो होतो, पण तो खरोखरच आला आणि चक्क जेवायला बसला…

बाकीची चांडाळ चौकडी ” असंच पाहिजे…कुणी सांगितला होता नसता आगावुपणा…?” या अविर्भावात माझ्याकडे पाहत होती. तो व्यवस्थित जेवला. जेवता जेवताच कळालं कि तो नोकरीच्या शोधात आलाय म्हणुन. मग तर ….., नंतर आमचा छान उद्धार होणार हे भवितव्य मला कळुन चुकले.

तो साहेबांना भेटला. त्याचं नशीब खरोखर जोरावर असावं, आधी फुकटचं जेवण आणि आता तर दरमहा आठशे रुपये (?) पगाराची नोकरी. उद्यापासुन येतो म्हणुन तो गेला.

जेवण करुन मी आमची धोकटी उचलली आणि बाहेर पडलो. तर तो खालीच उभा होता. मी साहजिकच रेंगाळलो..तो पुढे आला…

“खुप उपकार झाले साहेब. तुम्हाला वाटले असेल..ओळख ना पाळख, बोलावले कि आला अन बसला जेवायला. पण काय करु साहेब, सकाळपासुन फिरतोय. खिश्यात होते तेवढ्या पैशात दादर पासुन ठाण्यापर्यंतचं तिकीट काढलं…भुक लागली होती पण…..तशात तुम्ही बोलावलं…खुप लाज वाटली पण मन घट केलं अन तसाच निर्लज्जासारखा जेवलो. आता इथुन परळपर्यंत चालत जायचं म्हणजे अंगात ताकद पायजे ना? येतो साहेब…उद्यापासुन येतोय कामाला. तो निघाला..

मला काय वाटलं कोण जाणे पण त्याला म्हंटलं चल कुर्ल्यापर्यंत सोडतो तुला. त्यावेळेस माझी चेतक होती.
“हमारा बजाज.”. कुर्ल्याला जाईपर्यंत तो अखंड बडबड करत होता.
आपल्या पळुन गेलेल्या बापाबद्दल आणि अडकुन बसलेल्या आईबद्दल सांगत होता.
उतरताना मी त्याला १०० रुपये दिले आणि सांगितलं .” महिन्याचा पास काढुन घे ट्रेनचा, पुढच्या महिन्यात पगार झाला की दे परत”.त्याने फक्त हात जोडले.

आता विचार केला कि माझं मलाच आश्चर्य वाटतं, कसलीही ओळख नसताना, त्याची कसलीही माहिती नसताना मी त्याला तेव्हा कसे काय पैसे दिले असतील? कारण मी तसा काटकसरी माणुस आहे. (आता माझ्या मित्रांची काटकसरीपणाची व्याख्या कंजुष अशी आहे, यात माझा काय दोष?)

पण त्यानंतर संभा आमच्यात रुळला. इतका रुळला की त्याच्यावाचुन आमचं पान हलेना झालं. झलक वर दिलेली आहेच. शिक्षण फारसं नव्हतं एवढंच काय ते त्याचं न्युन. पण त्याचं त्यामुळे काहीही अडत नसे. हळु हळु बॉसला सुद्धा संभाची सवय लागत गेली. तो हुशार तर होताच. पण पडेल ते काम करायची तयारी आणि नविन गोष्टी शिकुन घ्यायची ईच्छा या मुळे हळु हळु तो सगळ्यांचाच लाडका बनला. दोन वर्षे हा हा म्हणता निघुन गेली.

एके दिवशी संभा पेढे घेवुन आला…..विशाल सर बारावी झालो…६५% मिळाले.
“अरे तु अभ्यास कधी केलास, परिक्षा कधी दिली?..पण ग्रेट यार….मानलं तुला………!
“सर, रात्रीच्या शाळेतुन शिकतोय. आता पण एखाद्या नाईट कॉलेजमध्ये अँडमिशन घेवुन पुढे शिकायचं ठरवलंय…!”
मी अवाक झालो. मी कधी पासुन ठरवतोय बाहेरुन ME करायचं म्हणुन , पण मुहुर्त लागत नाही…आणि हा………………….ग्रेट !
असेच काही दिवस गेले, मी त्याला विद्यापिठात घेवुन गेलो आणि पाठक सरांशी ओळख करुन दिली. आमच्या कंपनीने मुंबई विद्यापिठात काही फॅक्स मशीन्स विकली होती, त्याची सर्व्हिसिंग मीच पाहायचो. त्यामुळे सरांशी जुजबी ओळख होती. सरांनी प्रयत्न करुन संभाला अँडमिशन मिळवुन दिली. फी चे पैसे देखिल मी आणि सरांनी मिळुन भरले.
“आता नाईट कॉलेज मध्ये जावुन जागरणं करायची गरज नाही. आणि काही पैसे वगैरे लागले तर सांगत जा…!”
त्याची नेहेमीचीच प्रतिक्रिया…डोळे भरलेले आणि हात जोडलेले….!

त्या कंपनीत वर्षभर होतो मी त्यानंतर. मग मध्येच हि सद्ध्याची OmniSTAR B.V. ची ऑफर आली. आणि मी ती कंपनी सोडली. जाताना संभाला सांगुन गेलो होतो कि काही लागलं तर फोन कर म्हणुन.

वर्षभर संभाचे फोन येत राहिले. खुशाली कळवणारे. मागणी मात्र कधीच नव्हती. ते त्याच्या स्वभावातच नव्हतं म्हणा. नंतर हळु हळु फोन बंद होत गेले. माझाही व्याप वाढत होता , पगाराबरोबर दौरेही वाढले होते. मी ही हळु हळु विसरुन गेलो. मागे एकदा असेच ठाण्याला गेलो असता जुन्या ऑफिसमध्ये चक्कर टाकली तेव्हा कळले की संभाने नोकरी सोडली. परिक्षेच्या वेळेस त्याला एक महिन्याची सुटी हवी होती अभ्यासासाठी. कंपनीने नाकारली….
संभाने नोकरी सोडली यात मला काही विशेष वाटले नाही. कारण त्याचे शिक्षणाचे वेड मला चांगले माहित होते.

त्यानंतर असेच काही दिवस / महिने गेले. आमचे दोनाचे चार हात झाले. कुर्ल्याहुन मी खारघरला शिफ्ट झालो.
आणि एके रविवारी सकाळी सकाळी संभाची स्वारी अगदी आईसोबत माझ्या दारी अवतिर्ण झाली.
आल्या आल्या माझ्या आई आण्णांच्या पाया पडला. माझ्याकडे यायच्या आधीच मी खुर्चीवर मांडी घालुन बसलो.

“कुर्ल्याला गेलो होते सर. तिथे शेजारी समजलं की तुम्ही खारघरला शिफ्ट झाला आहात म्हणुन मग शोधत शोधत इथे आलो. आई हेच ते विशालसर , ज्यांच्या बद्दल मी नेहेमी बोलत असतो.”

त्या माऊलीने हात जोडले..” लई उपकार जाले सायेब, तुमच्यामुळं माज्या पोराची जिनगानी सुदरली..”

मला उगाच लाजल्यासारखं झालं. आई आण्णांना तर काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. मी त्यांना हळुच खुणावलं..नंतर सांगेन म्हणुन….

“विशालसर बी. ए. झालो, इंग्लिश घेवुन. तुमची खुप मदत झाली सर “, त्याने नेहेमीप्रमाणेच भरल्या डोळ्यांनी हात जोडले. मी त्याचे हात हातात घेतले आणि म्हणालो..

“संभाजीराव श्रेय द्यायचे असेल तर ते तुमच्या आईंना, त्यांच्या आशिर्वादाला, मेहनतीला द्या. मी फक्त हातचं काही न राखता शक्य तेवढी मदत केली. बाकी सगळं श्रेय तुझी चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाचं आहे. असो..आता पुढं काय करणार आहेस.”

“सर, विवेकानंद केंद्र , कन्याकुमारीच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एकुण अठरा निवासी शाळा आहेत. त्यापैकीच एका शाळेत इंग्लिश शिकवायला चाललोय. शिक्षणाचं महत्व मला कळालंय. त्याचा फायदा तिथल्या गरिब मुलांना झाला तर बघतो. पगार नाही मिळणार फार..पण मी ठरवलंय लग्न करायचं नाही म्हणुन. आणि मी व माझी आई….आम्हा दोघांना असं कितीसं लागतंय. येतो सर. तुम्हाला न भेटता गेलो असतो तर मनाला खात राहिलं असतं..आता चिंता नाही.”

त्या माय लेकांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना मला माझा खुजेपणा अगदी प्रकर्षाने जाणवला. मी नकळतच हात जोडले.

विशाल.