Category Archives: व्यक्तीचित्रणपर लेख

’अय स्साला… कोई शक्क?’ अर्थातच..: मा्झं दुसरं व्यसन :)

मायबोली.कॉम आयोजित ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं द्वितीय पारितोषिक : अय स्साला… कोई शक्क? अर्थातच…….

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि. यांच्या सहकार्यानं मायबोली.कॉमनं १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२ या कालावधीत ’गाथाचित्रशती लेखनस्पर्धे’चं आयोजन केलं होतं.

स्पर्धेसाठी एकूण तीन विषय होते, व एकूण ६३ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.

विषय पहिला – माझी आवड / आठवण.
विषय दुसरा – गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल
विषय तिसरा – माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट

वीणा जामकर यांनी पहिल्या, गणेश मतकरी यांनी दुसर्‍या व गिरीश कुलकर्णी यांनी तिसर्‍या विषयासाठी परीक्षक म्हणून काम केलं.

मी या स्पर्धेतील पहिल्या विषयासाठी प्रवेशिका दिली होती. माझा विषय होता ’अय स्साला… कोई शक्क?’ अर्थातच माझे आवडते ’मिथुनदा’ ! आजपर्यंत मला कधीही निराश नाही केलेलं मिथुनदांनी, मग तो त्यांचा ’मृगया’ असो, ’तहादेर कथा’, ’गुरू’ असो वा तद्दन ’गुंडा’ असो. इथेही त्यांनी मला निराश नाही केलं. या स्पर्धेत माझ्या ’मिथुनदांवर’ लिहीलेल्या लेखाला द्वितीय पारितोषिक मिळालं.

मायबोलीवरील या स्पर्धेच्या निकालाचा दुवा

*****************************************************************************************************
एक-दिड वर्षांपुर्वीची गोष्ट…

स्थळ : सोलापूरच्या भागवत थिएटर्समधील ’चित्रमंदीर’ हे चित्रपटगृह

आणि अवघे ४० रुपये बाल्कनीचे तिकीट असताना पिटातले तिकीट काढून बसलेला मी.

टायटल्स संपतात, चित्रपटाला सुरुवात होते. पिटातल्या त्या प्रेक्षकांमध्ये (माझ्यासकट) प्रचंड चलबिचल.

कधी येणार बे त्येनं? च्यायला मुंग्या आल्या बुडाला? (चित्रपट सुरू होऊन पाच मिनीटेही झालेली नसतात). तेवढ्या एक पिवळ्या रंगाची मेटॅडोरवजा स्कुल बस पडद्यावर दिसते. एका जुनाट घराच्या अंगणात ही स्कुलबस थांबते आणि त्यातून ड्रायव्हरच्या वेशातला, थकल्यासारखा वाटणारा, चेहर्‍यावर प्रचंड सुरकुत्या बाळगणारा एक म्हातारा खाली उतरतो आणि पब्लिक जल्लोश करतं…

“आला बघ..चित्ता !”

दुसर्‍याच क्षणी पडद्यावर चिल्लर उधळली जाते, कुणीतरी त्यातल्या त्यात पैसेवाला माणुस दोनच्या, पाचच्या नोटासुद्धा उधळुन देतो. कदाचित त्याने गेल्या आठवडाभराच्या बुट पॉलीशच्या पैश्यातून त्या बाजुला काढून ठेवलेल्या असतात. सगळीकडे शिट्ट्यांचा गजर चालु असतो. सगळा संकोच बाजुला ठेवून मीही एक शिट्टी त्या गजरात मोकळेपणाने वाजवून टाकतो.

चित्रपट होता ‘गोलमाल-३’ ! चित्रपटात इतरही तगडे हिरो असताना एका म्हातार्‍याचे असे स्वागत आमच्या सोलापूरातच होवू शकते.आणि तो चित्ता म्हणजे…, आता सांगायलाच हवं का? तरीही सांगतो… “अय स्साला..कोई शक?”

असाच अजुन एक (प्रातिनिधीक म्हणावं का? डोळा मारा ) चित्रपट ! नावाला महत्त्व नाही…

उगाचच (वजन थोडं जास्त असलं आणि फारतर गुड्डी मारुतीची लहान बहीण वाटत असली तरी) मादक दिसू पहाणारी एक मुलगी रस्त्याने चालली आहे. शहर असो वा गाव? कुठले का असो? तिचा पोशाख मात्र घागरा-चोलीच असनार. तर मधेच रस्त्यात काही गुंड तिला आडवे येतात आणि त्रास देऊ लागतात. कोणीतरी तिची एक बाही फाडतो (चक्क फाडतोच) तेवढ्यात… अचानक कुठून तरी एक बाटली घरंगळत येताना दिसते किंवा त्रास देण्यात जरा ढ असल्यामुळे मागे राहीलेल्या एका गुंडाच्या गालावर जोरदार ठोसा बसतो किंवा त्रास देणारा गुंड एकदम १०० फुट आकाशात उडून ५०० फुटावरची एखादी विटांची (नुकतीच बांधली आहे हे जाणवून देणारी) भिंत तोडून कोसळलेला दिसतो. सगळे त्या दिशेने बघतात. कोणी तरी विचारतो, “कौन हे बे तू?”. पलीकडे तो उभा असतो…

मैं हू तुम जैसों से नफ़रत करने वाला …
गरीबों के लिए ज्योती, गुंडो के लिए ज्वाला ,
तुझे बनाके मौत का निवाला ,
तेरे सिने में गाड दूंगा मौत का भाला .

पिटात सगळी कडे शिट्ट्या आणि टाळ्या… पुढची सगळी मारामारी नुसता गोंगाट, कुणी शर्ट फिरवतंय कुणी टोप्या उडवतंय तर कुणी चक्क नाणी पडद्यावर फेकतंय! चित्रपटाचं नाव काहीही असो जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. आणि कोणी तरी ओरडतो… “आला बघ्…चित्ता!”

या पब्लिकच्या लेखी अमिताभ बच्चन काय आणि रजनीकांत काय दोघेही चिल्लर असतात. त्या स्पेसिफीक क्षणी मीही त्यांच्यातलाच एक असतो.

कारण? फक्त एकच… कोई शक?

मला मिथुन चक्रवर्ती नामक या महामानवाचं व्यसन कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण ज्या वयात चित्रपटात घडतं ते सगळं खरंच असतं असं वाटायचं तेव्हापासून ते आजच्या वयात अगदी ‘नाना’सुद्धा फारच भडक अभिनय करतो ना असं वाटायच्या दिवसातदेखील माझं हे व्यसन कमी झालेलं नाहीये. मुळात ज्या वयात ते लागलं त्यावेळी इतर कुठली व्यसनं नव्हती अगदी कवितेचंही नव्हतं. कदाचित त्यामुळे त्या वेळी त्या एकाच व्यसनावर लक्ष जास्त केंद्रीत झालं असावं आणि मग हळु हळु ते रक्तात भिनत गेलं. पुढे या व्यसनाचं रुपांतर भक्तीत होत गेलं आणि ते अधिकच पक्कं झालं.

“बाबु मोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही” म्हणत वेड लावणार्‍या राजेश खन्नाच्या प्रेमात पडण्याचे ते दिवस होते. हळु हळु अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारभोवतीही आमच्या सार्‍या इच्छा-आकांक्षा, सारी स्वप्ने घोळका करुन उभी राहायची. तशातच एक दिवस टिव्ही वर “हम पांच” पाहण्यात आला. महाभारताचं कथानक घेवून सद्यस्थितीवर भाष्य करणारा ‘बापु’चा हा चित्रपट ! गेलो होतो संजीव कुमारला बघण्यासाठी म्हणून. जेव्हा परत आलो तेव्हा डोक्यात पक्की जागा करुन बसले होते ते अमरिश पुरी आणि अर्थातच ’भीमा’ उर्फ़ मिथुन चक्रवर्ती.
200px-HumPaanch5.jpg
अमिताभ ओळखला जातो तो त्याच्या डोळ्यातल्या अंगारासाठी ! ज्या कुणी हम पांच बघीतला असेल त्याला जाणवले असेल की ’हम पांच’ने अमिताभच्या डोळ्यातल्या प्रखर अंगाराला एक सशक्त पर्याय सुचवला होता. जेव्हा संतापलेला भीमा आपल्या मालकाला अमरिश पुरीला सांगतो, ” अब किसीको मारनेको मत बोलना. हम अपनीपें आ गये तो आपकोही गाड के रख देंगे” त्या वेळी लक्षात येते की इंडस्ट्रीत अजुन एका अँग्री यंगमॅन ची एंट्री झालेली होती. चित्रपटात नसीर, शबाना, दिप्ती, अमरिश पुरी आणि दस्तुरखुद्द संजीव कुमारप्रभुती दिग्गज असतानाही ठळकपणे लक्षात राहतो तो मिथुनचा ‘भीमा’! मुळात लहानपणापासुन ‘भीम’ हे महाभारतातलं आवडतं पात्र. त्यामुळे त्याच्यासारखाच खोडकर, अन्यायाने पेटुन उठणारा ‘भीमा’ आवडला नसता तरच नवल.

कदाचित मिथुन चक्रवर्ती या माणसाच्या प्रेमात पडायला तेव्हाच सुरूवात झाली असावी. त्यावेळी इंटरनेट नावाचा प्रकार नव्हताच (मुळात संगणकच माहीत नव्हता) आणि आम्ही राहायचो दौंडमध्ये. तिथे इन मीन दोन चित्रपटगृहे. एक ‘हिंद टॉकीज’ आणि दुसरं नुकतंच सुरू झालेलं ‘पंचशील’ ! पंचशीलला सगळे नवे चित्रपट असायचे आणि हिंदला विश्वजीतच्या जमान्यातले. त्यामुळे बाबाचे (ऐलान नामक एका चित्रपटातील त्याच्या ‘बाबा सिकंदर’ या खलनायकी भुमिकेपासुन आम्ही मिथुनला ‘बाबा’ही म्हणायला लागलो) चित्रपट अभावानेच लागायचे. संजय दत्तला ‘बाबा’ म्हणणार्‍यांची त्यामुळेच मला किव येते. अरे कुठे आमचा “मिथुनदा” आणि कुठे हा सदैव तारवटलेल्या डोळ्यांनी वावरणारा संजयदत्त ! मी तर म्हणेन भारतात जसे हिंदु, मुस्लीम किंवा इतरही Ism’s आहेत, तसेच एक ‘मिथुनिज्म’ सुद्धा आहे. आणि या धर्माचे लोक भारतातल्या प्रत्येक धर्मात आहेत. असो, मुद्दा भरकटतोय.

तर दौंडमध्ये वर उल्लेख केलेली दोनच चित्रपटगृहे होती आणि तिथेही मिथुनदांचे चित्रपट अभावानेच लागत, त्यामुळे तोपर्यंत प्रभुजींबद्दल फक्त आकर्षण होते. त्यानंतर कधीतरी उन्हाळ्याच्या सुटीसाठी म्हणुन सोलापूरात आलो. सातवीत किंवा आठवीत असेन बहुदा. दुसर्‍याच दिवशी मावशीच्या मुलाने मिथुनदांचे चित्रपट बघायला मिळतील अशा एका साधनामंदीराची ओळख करुन दिली. ‘पाकिझा व्हिडीओ सेंटर’ ! विजापूर रोडवरच्या रसुल हॉटेलच्या वरच्या मजल्यावर एका बोळकांडीवजा खोलीत थाटलेलं हे व्हिडीओ सेंटर. तिथे आम्ही मिथुनदांचा ‘कसम पैदा करने वालें की’ बघीतला. लगेच संध्याकाळी ‘डिस्को डान्सर’ ! पाकिजावालासुद्धा आमच्यासारखाच प्रभुजींचा भक्त होता. आठवड्यात किमान तीन दिवसतरी प्रभुजींचेच चित्रपट असायचे. ‘हम पांच’ मधल्या ‘भीमा’नंतर एकदम डिस्को डान्सरच्या रुपात “आय एम अ डिस्को डान्सर” म्हणत बेभान नाचणार्‍या बाबाला पाहीले आणि आम्ही चाटच पडलो. तिथेच शेजारी बसलेल्या कुणा बाबाभक्ताने भक्तीभावाने सांगितले ‘डिस्को डान्स आणि कराटे’ ही हिंदी फिल्मसृष्टीला प्रभुजींचीच देणगी आहे. मग तर आम्ही अजुनच भारावून गेलो. मग त्यानंतर धडाकाच सुरू झाला. सोलापूर असो वा दौंड वा कुठलेही गाव. तिथे गेलो की आधी गावातली व्हिडीओ सेंटर्स शोधून काढायची आणि त्यावर नजर ठेवायची. मिथुनदाचा चित्रपट लागला रे लागला की आम्ही पहिल्या रांगेत हजर !

या आधी प्रभुजींनी बोटावर मोजण्याइतके चित्रपट केलेले होते. त्यांना पहिल्याच ‘मृगया’ साठी राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालेले होते. पण व्यावसायिक दृष्ट्या मृगया अपयशीच ठरला होता. अगदी १९७९ साली आलेले सुरक्षा आणि थोडा फार चाललेला ‘तराना’ सोडला, तर प्रभुजींवर फ्लॉप हिरोचाच शिक्का लागलेला होता. पण ‘हम पांच’ चालला, प्रचंड चालला आणि ‘मिथुन चक्रवर्ती’ नामक ‘गरीबांच्या अमिताभचा’ जन्म झाला. त्यानंतर आलेले टॅक्सी चोर, उन्नीस्-बीस, वारदात, शौकीन , सितारा वगैरे चित्रपट पुन्हा अपयशीच ठरले. त्या कालावधीतला अपयशी ठरलेला पण तरीही उल्लेखनीय ठरलेला प्रभुजींचा एक चित्रपट म्हणजे ‘ द नक्षलाईट्स’ ! नक्षलवादाच्या वास्तवावर भाष्य करणारा, प्रभुजींच्या सुरुवातीच्या वैयक्तीक आयुष्याशी निगडीत असलेला हा चित्रपट, कै. स्मिता आणि मिथुनदा असुनही अपयशीच ठरला. त्यानंतर १९८२ साली ‘डिस्को डान्सर’ चित्रपटगृहांमधून झळकला आणि मग मिथुनदांचे युग सुरू झाले. एकीकडे अमिताभसारखा जबरदस्त ताकदीचा कलावंत, तरुणाईला भुरळ घालत असताना, त्यांच्या साम्राज्याला तडा देण्याचे काम डिस्को डान्सरपासून सुरु झालेल्या मिथुनयुगाने केले.

त्या काळात बाबाचे अनेक चित्रपट गाजले पण त्यातल्या त्यात भक्त मंडळीच्या मुखात हरिनामासारखे वसणारे चित्रपट म्हणजे…

प्यार का मंदिर,
प्यार झुकता नहीं,
सुरक्षा (आणि प्रभुजींचे सर्व गन मास्टर जी. नाइन सिरीजचे चित्रपट)
डिस्को डांसर,
कसम पैदा करने वालेकी…
डान्स्-डान्स
रावण राज,
चाण्डाल,
प्रेम प्रतिज्ञा
अग्निपथ,

एकदा बोलता बोलता कोण श्रेष्ठ यावर वाद सुरू झाला होता. बहुमत अमिताभ बच्चनला होते. आम्ही नेहमीप्रमाणे भिडस्तपणा पत्करुन तळ्यात-मळ्यात करत होतो. एवढ्यात मिथुनदाच्या बाजुने भांडणार्‍या भिडुने विचारले… तुमच्या बच्चनला एकतरी नॅशनल अवार्ड आहे का? (अग्निपथ अजुन प्रदर्शित व्हायचा होता तेव्हा) मिथुनदाला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवार्ड मिळाले होते. आहात कुठे? ही बातमी आमच्यासाठी नवीन होती. मग सुरु झाला एक अनंत शोध..मृगयाचा ! (मृगया मी तीन वर्षापुर्वी २००९ साली बघीतला शेवटी, पण बघीतलाच) तोपर्यंत मिथुनदांच्या नॅशनल अवार्डसची संख्या तीन वर जावून पोहोचली होती.

1977 – सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार मृगया साठी
1993 – सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार तहादेर कथा साठी
1996 – सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार स्वामी विवेकानंद साठी
पुढे जाण्यापूर्वी या तीन चित्रपटांबद्दल बोलणे आवश्यक आहे, कारण याबद्दल बोलल्याशिवाय प्रभुजींच्या अभिनयप्रवासाचा आलेख अधुरा आहे.

पुढच्या कारकिर्दीत मिथुनदांनी अनेक पुरस्कार मिळवले. बॉलीवुड, बंगाली सिनेमा तसेच भोजपूरी सिनेमातही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. पण बॉलीवुडने मात्र त्यांच्यातल्या अस्सल कलावंताला, त्यांच्या खर्‍या क्षमतेला खुपच कमी आणि अभावानेच वाव दिला असा माझा आरोप आहे.

असो, तर १९७७ साली आलेला कै. मृणाल सेन यांचा ‘मृगया’ हा प्रभुजींचा पहिलाच चित्रपट होता आणि पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शिकारीची आवड असलेला एक ब्रिटीश अधिकारी आणि निष्णात तिरंदाज असलेला एक आदिवासी तरुण शिकारी यांच्यातल्या अनोख्या मैत्रीवर बेतलेला हा चित्रपट. ब्रिटीशांच्या अन्याय्य राजवटीविरुद्ध चालु असलेल्या चळवळीच्या पार्श्वभुमीवर तत्कालीन देशी सत्ताधार्‍यांकडून होणार्‍या अत्याचाराला बळी पडलेला एक आदिवासी तरुण त्याची ही कथा होती.
Mrigaya.jpg
शिकारीची आवड हे एवढे आणि एवढे एकच साम्य असलेल्या दोन व्यक्तींमध्ये निर्माण झालेले मैत्रीचे नाते. ते जपण्यासाठी धडपडणारा निरागस आदिवासी ‘घिनुआ’ आणि आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर सुडाने पछाडलेला, गावातील तत्कालीन ब्राह्मण सत्ताधार्‍यांना अक्षरसः सोलणारा घिनुआ. ही दोन अतिशय वेगळी पात्रे मिथुनदांनी प्रचंड ताकदीने उभी केली होती. हा चित्रपट खरेतर ‘स्पृष्य्-अस्पृष्यतेच्या’ समस्येवर प्रकाश पाडणारा सामाजिक चित्रपट होता. कै. मृणाल सेन यांच्यासारख्या गुणी माणसाने मिथुनदांसारख्या दुसर्‍या गुणी माणसाला ही भुमिका देवून खरेतर त्या भुमिकेचे सोनेच केले होते. दुर्दैवाने ‘मृगयाने’ त्यांना पुरस्कार मिळवून दिला, नाव दिले पण काम मात्र नाही मिळवून दिले आणि नुसत्या पुरस्काराने पोट भरता नाही येत. जगण्यासाठी पैसाही तितकाच आवश्यक असतो, मग मिथुनदांनी मिळतील ते चित्रपट स्विकारायला सुरुवात केली. अंगी चोखंदळपणा असला तरी तो दाखवायची, माज करायची सोय नियतीने ठेवलेली नव्हती. त्यानंतर कालौघात पायाखालून बरेच पाणी वाहून गेले. मिथुनदा मेन स्ट्रीममधून बाहेर पडून त्यांच्या त्या वाईट कालावधीतले बी-ग्रेड चित्रपट करत होते. पण त्यांच्यातला कलावंत हिंदी चित्रसृष्टीने दुर सारलेला असला तरी बंगाली चित्रसृष्टीने कधीच नाकारलेला नव्हता. १९९३ साली आला ‘तहादेर कथा’ !

‘शिबनाथ’ नावाच्या एका क्रांतिकारकाची ही कथा. एका ब्रिटीश अधिकार्‍याचा खुन केल्याच्या आरोपावरुन अकरा वर्षे तुरुंगात काढून भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच शिबनाथही बाहेर येतो.
220px-Tahader_Katha.jpg
पण बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येते की ज्या देशासाठी आपण तुरुंगात गेलो, ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला तो देशच आपला राहीलेला नाही. फाळणीने देशाचे दोन तुकडे केलेले आहेत. खुद्द त्याचे स्वतःचे गावदेखील नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. स्वांतंत्र्यापुर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतर दोन तुकडे झालेला भारत. बदललेली परिस्थीती, कधी काळी त्याच्या बरोबर ब्रिटीशांविरुद्ध लढलेला त्याचाच एक सहकारी आता पक्का व्यावसायिक झालेला आहे. राजकारणात आपली जागा निर्माण करण्यासाठी तो शिवनाथच्या तेजस्वी भुतकाळाचा स्वार्थी उपयोग करुन घेवु पाहतो. अकरा वर्षाच्या तुरुंगवास आणि आत्यंतिक छळाने कमजोर झालेला शिबनाथ, त्याच्यापुढे एक नवे द्वंद्व उभे राहते. सद्ध्याच्या परिस्थितीशी जुळते घ्यायचे की आपली तत्त्वे जपत अज्ञातात विरून जायचे? बुद्धदेव दासगुप्ताच्या या चित्रपटाने प्रभुजींना पुन्हा एकदा त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीच्या अभिनेत्याची ओळख करुन दिली. ही भुमिका मिथुनदांनी प्रचंड मेहनतीने साकारली आणि त्यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार देवून गेली.

त्यानंतर १९९५ साली आलेल्या ‘स्वामी विवेकानंद’ या चित्रपटात मिथुनदांनी स्वामी रामकृष्ण परमहंस’ यांची भुमिका केली. ही भुमिका मिथुनदा अक्षरशः जगले आहेत. या भुमिकेने त्यांना त्यांचा ‘तिसरा राष्ट्रीय पुरस्कार’ मिळवून दिला.
backtu.jpg

ऐशीचं दशक खर्‍या अर्थाने गाजवलं ते मिथुनदांनी. ‘आय एम ए डिस्को डान्सर’ किंवा ‘जिमी जिमी ..आजा आजा’ किंवा ‘याद आ रहा है…. तेरा प्यार’ म्हणत सगळी तरुणाई आपल्या तालावर नाचवत मिथुनदांची क्रेझ थेट चीन, रशीयापर्यंत जावून पोहोचली. तो काळ नि:संशयपणे मिथुनचा होता. अगदी अमिताभ सारख्या महानायकाचे चित्रपट बरोबर असताना देखील मिथुनदाचे चित्रपट १००% गर्दी खेचायचेच. कारण मिथुन म्हणजे ‘गरीबांचा अमिताभ’ होता. भलेही ही पदवी कुणा मिथुन द्वेष्ट्याने मिथुनला हिणवायचे म्हणून दिली असेल पण तेच सत्य होते. काळा-सावळ्या रंगाचा, उंच, सदपातळ पण पिळदार बांध्याचा, गर्दीत सहजपणे सामान्य म्हणुन खपून जाईल असा हा बिनचेहर्‍याचा कलाकार, दोन वेळच्या भाकरीसाठी दिवस दिवस राबणार्‍या सामान्य जनांना आपला वाटला नसता तरच नवल. राज-दिलीप-देव या त्रयीचं एक युग होतं ज्याला राजेश खन्नानं तडा दिला. राजेश खन्नांची मक्तेदारी ‘जाओ..,पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथपें ये..ये..(मेरा बाप चोर है) लिख दिया था’ म्हणत सर्वसामान्यांच्या हृदयातला अंगार प्रथमच पडद्यावर ओतणार्‍या ‘अमिताभ बच्चन’ नामक महानायकाने संपवली. अमिताभ नंतर अनेक जण आले स्वतःला सुपरस्टार म्हणवणारे, पण आजही अमिताभला पर्याय नाही. पण त्या काळातही जेव्हा अमिताभ बच्चन नावाचं या देशातील तरुणाईवर प्रचंड गारुड होतं तेव्हाही स्वतःचं असं एक समांतर साम्राज्य उभं केलं होतं ते म्हणजे मिथुनदाने. अगदी ‘अग्नीपथ’ मध्ये जेव्हा मिथुनदा बच्चनसमोर उभा राहीला तेव्हा देखील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची, आपल्या ताकदीची दखल घ्यायला भाग पाडून गेला. दुर्दैवाने ‘पहिल्यापासुनच’ मारधाडपटांचीच मोठी रांग असल्याने हिंदी चित्रसृष्टीने आपोआपच मिथुनदाला ‘बी’ग्रेड अ‍ॅक्टर च्या कॅटेगरीत उभे केले होते. हा खरे तर मिथुनदासारख्या अष्टपैलु कलावंतावर खुप मोठा अन्याय होता. या शिक्क्यामुळे त्याला चित्रपटही तसेच मिळत गेले. पण त्यातही मिथुनदांनी अनेक हिट दिले.
Disco-Dancer.jpg

या कालावधीत मिथुनदांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या भुमिका केल्या. डिस्को डान्सरमधला डान्सचे प्रचंड वेड असलेला आणि सुडाने पेटलेला नायक रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये पाश्चिमात्य नृत्य म्हणजे चा-चा-चा किंवा फार तर बॉल डान्स एवढेच ठरलेले होते. पण मिथुनदांनी सर्वप्रथम डिस्को या पाश्चिमात्य नृत्यप्रकाराला इथे स्थान आणि मान दोन्ही मिळवून दिले. फार कशाला जपानी कराटे आणि चिनी कुंग फू यांचे मिश्रण असलेली, खास बॉलीवुड टच असलेली एक नवी युद्धपद्धती मिथुनदांनीच हिंदी चित्रपटात प्रथम आणली. खर्‍या अर्थाने ज्याला कराटे म्हणता येइल ती युद्धविद्या प्रथम मिथुनदांच्याच चित्रपटात दिसली. त्या आधी हिंदी चित्रांतील ‘कराटे’ म्हणजे (असलेच तर) नुसते दोन्ही तळहात छातीसमोर ताठ आडवे करुन आरडा-ओरडा करत हातवारे करण्याचा एक कवायत प्रकारच होता. (डान्सच्या बाबतीतही हाच मानदंड लावता येइल). डिस्को डान्सरने मिथुनदांना नाव, ग्लॅमर आणि पैसा या तिन्ही गोष्टी मिळवून दिल्या. त्यानंतर मग रीघच लागली….

डिस्को डान्सर यायच्या आधी गाजलेला एकमेव चित्रपट म्हणजे गनमॅन जी-९ सिरीजचा सुरक्षा ! ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आजकालच्या पोरा-सोरांना भारतीय फिल्मसृष्टीच्या या पहिल्या वहिल्या बाँडपटांबद्दल काहीच माहीती नाही. नाही म्हणायला जितेंद्रचा ‘फर्ज’ नावाच एक चित्रपट येवून गेला होता म्हणा, पण त्यात जितेंद्र कुठल्याच अँगलने बॉंड वाटत नाही. हिंदी चित्रपटातल्या या पहिल्या वहिल्या देशी बाँडबद्दल आजच्या लोकांना काही माहिती नसेल पण, त्या काळी त्याच्यासाठी, त्याच्या हेअर स्टाईलसाठी वेडे झालेल्यांना त्याचा विसर कसा पडेल? आमच्या त्या बाँडने भलेही खास त्याच्यासाठी शिवलेले स्पेशल करामती असलेले सुट्स वापरले नसतील, ब्रॉस्ननसारख्या खास बाँडसाठी बनवलेल्या गाड्या उडवल्या नसतील, पण म्हणून काय झालं?
Suraksha3.JPG

मिथुनदांच्या भक्तांनी त्यांचं हे ही रुपडं डोक्यावर घेतलं. सुरक्षा, वारदातसारख्या तद्दन मारधाडपटांनाही सुपर हिट बनवलं. काय नव्हतं ‘सुरक्षा’मध्ये.? बाँडपटातच शोभतील असे कारचे चित्तथरारक पाठलाग, सुंदरींच्या ताफ्याबरोबर कंबर हलवणारे प्रभुजी, आपल्या लोखंडी हाताला कॅल्कुलेटर फिक्स करुन त्यातुन घातक रेडीओ वेव्ज (?) डोळा मारा सोडणारा खतरा खलनायक, वु डु , कुंग फु, रोमान्स आणि मिथुनदांचा डान्स फ्लोअरवरचा सिग्नेचर डान्स. पण भक्तांनी ते सगळं चालवून घेतलं कारण….
“अय स्साला, कोई शक?” अगदी आजचा स्टार असलेला सलमानखान देखील ‘सुरक्षा’च्या प्रेमात आहे. काही दिवसांपुर्वीच एका सभेत त्याने निखिल अडवाणीला बरोबर घेवुन ‘सुरक्षा’ परत एकदा करणार असल्याचं कबुल केलय आता बोला.

माझ्यासारख्या शाळकरी मुलांसाठी मिथुन चक्रवर्ती हे नाव म्हणजे जणु काही एक माईल स्टोन बनलं होतं तेव्हा. त्यावेळी मिथुनदासारखी हेअर स्टाईल करायची हे एक स्वप्नच होतं आमच्यासाठी. जे अखेरपर्यंत स्वप्नच राहीलं कारण आमच्या नशिबी कायम दौंडच्या एस.आर.पी. कँपच्या हजामाने केलेला सोल्जर कटच होता. जेव्हा स्वतःची हेअरस्टाईल कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार मिळाला, तोपर्यंत मिथुनदांची हेअर स्टाईल इतिहासजमा झाली होती. त्यामुळे ती कानावर येणारी झुलपे आणि त्यातुन हात फिरवत ‘अय स्साला’ करायचं स्वप्न, स्वप्नच राहुन गेलं. पुढे काही वर्षानंतर जेव्हा आमच्या गनमॅनचं महत्त्व कमी व्हायला लागलं, त्यांना कामे मिळेनाशी झाली. कारण तोपयंत इंडस्ट्रीत अनेक कोवळी पोरं येवुन दाखल झाली होती. कक्क्क्क्क किरण करणारा शाहरुख असो की ‘पापा कहते है’ म्हणत एंट्री घेतलेला ‘आमीर’ असो… प्रभुजींचे चित्रपट कमी होत गेले. तरीही अधुन मधुन ‘मुजरीम’, प्रेम प्रतिज्ञा सारखे चित्रपट येतच होते आणि हिटही ठरत होते. असंख्य चित्रपट आले मिथुनदांचे त्या दिवसात. पण हे सरसकट मिथुनपटच होते. रोमान्स, हाणामार्‍या, डिस्को, मिथुनदांची डान्सची ती सिग्नेचर स्टेप, सुडकथा. सगळे एकाच टाईपचे चित्रपट. पण पब्लिक डोक्यावर घेत होतं. नाही म्हणायला अधुन मधुन प्रयोगही चालुच होते. “आधी स्वतःला स्थापीत करा आणि मग हवे ते प्रयोग करा’ हा मिथुनदाचा सिद्धांत त्यांनी स्वतःही व्यवस्थित जपला आणि सिद्ध करुन दाखवला. एकीकडे तद्दन मसालापट कसत असताना हा मनस्वी कलावंत मधुनच एखादा गुलामी, प्रेमप्रतीज्ञा, शौकीन सारख्या वेगळ्या भुमिकाही करत होता. ‘गुलामी’मधला ‘जावर’ असो वा प्रेमप्रतिज्ञाचा ‘राजा भैय्या’ या भुमिका खास मिथुनदाच्याच भुमिका होत्या. अशात १९९० चा ‘अग्निपथ’ आला. ‘आय्यम कृष्णन अय्यर एम्मे नारियलपानीवाला’ म्हणत लुंगीला गाठ मारत हा कळकट वाटणारा, काळासावळा नारियलपानीवाला आपल्या समग्र शक्तीनिशी महानायकासमोर उभा राहीला आणि हा हा म्हणता उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेयर पटकावून गेला.
agneepath.jpg

पण मिथुनदांचे मेनस्ट्रीममधले दिवस संपले होते हेच खरे. बॉलीवुडमध्ये काम मिळेनासे झाल्यावर मग या ‘गरिबांच्या अमिताभने’ नाईलाजाने स्वतःहुनच मेनस्ट्रीममधून एक्झीट घेतली आणि प्रभुजींनी बँगलोरमध्ये एक पंचतारांकित हॉटेल सुरु केले. पण चित्रपट, अभिनय रक्तात मुरलेला होता. इथुनच मिथुनदाच्या आयुष्यातील दुसरी इनींग्ज सुरु झाली. हा पडता काळ होता. हिंदीमध्ये टी.एल्.व्ही. प्रसादच्या, कांती शाह यांना जोडीला घेत साहेबांनी तद्दन बी-ग्रेड चित्रपटांचा चित्रपटांचा कारखानाच सुरु केला. बाकी आमचे मिथुनदा म्हणजे पक्के बिझनेस ओरियंटेड बरं का ! त्यामुळे चित्रपटाचा हिरो ‘तेच’, बाकी कलाकार मग असेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीने टाळलेले, बहिष्कृत केलेले, कुणीतरी अशीच स्वस्तातली हिरोइन असायची. प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये बसुन कथा लिहील्या (पाडल्या) जायच्या. शुटींगही ६० % तिथेच , प्रभुजींच्याच हॉटेलमध्ये. क्रुची राहण्याची सोय ही तिथेच. कसलं खतरा कॉस्ट कटींग होतं प्रभुजींचं. जेव्हा बॉलीवूडमधे सिंगल शेड्युल शूटींग म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हा हे लोक २० एक दिवसात सगळं शूटींग उरकत होते. डबिंग, जमलं तर एडीटींग करुन ३० दिवसात सिनेमा बाजारात सुद्धा!!! बरं प्रकरण इथेच थांबायचं नाही तर लगेच पुढच्या चित्रपटाचं काम सुरु! जेव्हा हे सगळं जोमात चालू होतं तेव्हा त्या ड्रीम फॅक्टरीतून १० वर्षात १००+ चित्रपट बाहेर पडले होते! आणि हा २००+ चित्रपटांचा नायक बनला होता…! त्या काळात प्रभुजींचे चित्रपट म्हणजे माझ्यासारख्या चाहत्यांवर खरोखर अत्याचार होते. पण चाहत्यांनी (मी सुद्धा) ते देखील सहन केले. फार नाही, त्या काळातील दोनच चित्रपटांबद्दल लिहीतो. त्यावरुन त्या वेळी मिथुनदा काय काय करत होते याचा अंदाज येवु शकेल.

लोहा आणि गुंडा !
मिथुनदांच्या सच्च्या चाहत्यांना हे चित्रपट म्हणजे रामायण, महाभारताइतके प्रिय असावेत. मला वाटतं ‘लोहा’ आणि ‘गुंडा’ या चित्रपटांनी जेवढा पैसा कमावला तेवढा ‘डिस्को डान्सर’ने पण कमावला नसेल. ‘लोहा’ या चित्रपटात मिथुनदा स्वतःची जी ओळख करुन देतात ती ऐकुनच मन भरुन येते.

दिखने में बेवडा, भागने में घोडा और मारने में हथौडा ।
मोजक्या शब्दात योग्य परिचय !! प्रभुजींच्या श्रीमुखातले काही काळीज कंठाशी आणणारे संवाद पाहा…

धोबी घाट पे, टूटेली खाट पे,
लेटा लेटा के मारूँगा ।

लोहा हो या फ़ौलाद,
या हो पहाडों की औलाद,
जमके फ़टके लगाऊँगा,
यहाँ मेरी हुकूमत है….तेरे छक्के छुडाउँगा ।

जिन्दगी चाहते हो तो हमसे बचकर रहना,
जहाँ नींबू नहीं जाता वहाँ नारियल घुसेड देते हैं ।

असो, तर यानंतर आला ‘गुंडा’ ! हा तर सगळ्यात कळस होता. मिथुन चक्रवर्ती आणि शक्ती कपुर नावाची दोन माणसे किती आचरटपणा करु शकतात याचे एक जिवंत उदाहरण होते हा चित्रपट म्हणजे. नमुन्यासाठी त्यातली मिथुनदांची ओळख वाचा..

मैं हूँ जुर्म से नफ़रत करने वाला,
दोस्तों के लिये ज्योति, दुश्मनों के लिये ज्वाला ।
नाम है मेरा शंकर और हूँ मैं गुण्डा नंबर वन ।

मिथुनदांचे हे चित्रपट ज्यामुळे चालायचे त्या कारणांमध्ये ‘बशीर बाबर’चे हे भन्नाट संवादही होते. हाहा

बरं हे चित्रपट पडायचेच असेही नाही, तर ते चालायचे आणि चालायचेच. कारण बॉलीवुडने जरी नाकरलेलं असलं तरी भक्तांनी आपल्या देवावरची माया अजिबात पातळ केलेली नव्हती. प्रभुजींनी जे दिलं ते त्यांनी प्रेमाने स्विकारलं, डोक्यावर घेतलं मग ते अगदी कितीही निकृष्ट पातळीवरचं असो. हे चित्रपट इतके चालायचे की त्या दहा वर्षातली ५-६ वर्षे आमचा हा नायक देशातला सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता बनला होता. गंमत बघा, जेव्हा बॉलीवुडमधल्या तथाकथीत सुपरस्टार्सवर कर चुकवल्याच्या केसेस दाखल होत होत्या, तेव्हा आमचे प्रभुजी सगळ्यात जास्त कर भरणारा अभिनेता म्हणुन ओळखले जात होते.

कधी-कधी खरोखर आश्चर्य वाटतं. कारण एकाच वेळी मिथुनदांचा समांतर प्रवास सुरू होता. एकीकडे लोहा, गुंडा, चिता, रावणराज, जल्लाद, यमराज, चांडाल असले तद्दन मारधाडपट करत असतानाच हा माणुस बंगाली फिल्म इंडस्ट्रीत मात्र एकाहून एक सुंदर विषयांवर काम करत होता. ‘२००८ साली आलेला ‘एक नादिर गल्पो’ (A tale of a river) पिता-पुत्रीमधल्या तरल आणि कोमल नात्यावर आधारीत सुंदर चित्रपट होता. नदीत बुडून मरण पावलेल्या आपल्या मुलीचे नाव तिच्या स्मरणार्थ त्या नदीला देण्यासाठी धडपडणार्‍या बापाची अतिशय हृदयद्रावक अशी ही कथा होती. अर्थात तिथेही (बंगाली फिल्म्समध्ये) त्यांनी अन्याय अभिचार, स्वर्ण तृष्णा, जोबन युद्धो यासारखे अ‍ॅक्शनपट केलेच. पण त्याबरोबर नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर असलेले ‘तहादेर कथा’ , त्रोयी, स्वामी विवेकानंद, गौतम घोषचा गुडीया, रितुपर्णो घोषचा तितली असे सहज सुंदर चित्रपटही केले. ‘तितली’मध्ये त्याने बॉलीवुडच्या सुपरस्टारची भुमिका केलेली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘शुकनो लंका’मध्ये आयुष्याची तीस वर्षे अभिनयक्षेत्रात संघर्ष करणार्‍या एका कलावंताची भुमिका होती. तर ‘लाल पहारेर कथा’ मध्ये ‘छाऊ’या ओरिसातील आदिवासी नृत्यप्रकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी धडपडणार्‍या एका कलाकाराची व्यथा होती. शुकनो लंका या चित्रपटाला अगदी परदेशातील वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये परदेशी रसिकांनी अतिशय नावाजले, पण दुर्दैवाने भारतात हा चित्रपट अजुनही रिलीजच झालेला नाहीये. आपल्या महेश मांजरेकरने काढलेल्या ‘आमि सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटात (२०११) मिथुनदांनी रंगवलेला ‘देबब्रत बाशु’ नुकत्याच येवुन गेलेल्या ‘मी शिवाजीराजे…’ च्या स्टोरीलाईनवर आधारीत होता. तिकडेही तो प्रचंड चालला. यात फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ ऐवजी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ नायकाला भेटतात आणि त्याला क्रांतिला प्रेरीत करतात असे कथानक होते. याच वर्षी (२०१२) रिलीज झालेला ‘नोबेल चोर’ हाही असाच एक अप्रतिम चित्रपट. २००४ मध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या चोरीला गेलेल्या ‘नोबल पुरस्कारा’भोवती या चित्रपटाची कथा फिरते. ‘आमि सुभाष बोलची’ प्रमाणे ही देखील एक फँटसीच आहे. यातही मिथुनदांची सुंदर भुमिका आहे. फँटसीच असल्याने चोरीला गेलेले नोबलचे पुरस्कार पदक एका गरीब शेतकर्‍याला मिळते आणि तो ते विकुन किंवा परत करुन थोडेफार पैसे मिळवण्यासाठी म्हणुन कलकत्यात येतो आणि नकळता नोबेल चोरीच्या या प्रकरणात अडकतो. टागोरांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारसरणीच्या वर्तमानकाळात असलेल्या महत्त्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची सोळाव्या ‘लंडन फिल्म फेस्टीवल’साठी निवड झालेली आहे.

सुदैवाने बॉलीवुडला परत मिथुनदांची आठवण आली. मग पुन्हा ऐलान, लक किंवा नुकताच आलेला हाऊसफुल्ल-२, गोलमाल-३ अशा चित्रपटात मिथुनदा परत झळकायला लागले आहेत. यापैकी एक टाळता न येणारा उल्लेख म्हणजे ‘मणी रत्नम’चा ‘गुरू’. या चित्रपटात परत एकदा मिथुनदांच्या अभिनयसामर्थ्याचा साक्षात्कार बघायला मिळतो. ‘स्वतंत्रता’ नावाचे एक वर्तमानपत्र चालवणार्‍या नानाजी उर्फ माणिक दासगुप्ता नामक एका तत्त्वनिष्ठ, गांधीवादी संपादकाची भुमिका मिथुनदांनी या चित्रपटात केली आहे. एकीकडे ‘गुरु’ उर्फ ‘गुरुकांत देसाई’ (अभिषेक बच्चन) वर पोटच्या मुलासारखे प्रेम करणारा एक प्रेमळ बाप आणि गुरुकांतच्या गैरव्यवहारांवर कसलीही दया माया न बाळगता अतिशय कठोरपणे टीका करणारा, आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातुन तुटून पडणारा एक ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ संपादक या दोन्ही भुमिका मिथुनदांनी प्रचंड ताकदीने उभ्या केलेल्या आहेत. आपल्या वर्तमानपत्रातुन गुरुभाईवर चौफेर टीका करताना, त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांना उखडून काढण्याचा प्रयत्न करतानाच गुरुभाई गलितगात्र होवून दवाखान्यात पडलाय हे कळल्यावर व्याकुळ होणारा पिता अतिशय समर्थपणे उभा केलाय मिथुनदांनी. खास करुन तो श्याम (माधवन) आणि गुरुभाई दोघांनाही बोलावून घेतो आणि श्यामला विचारतो ‘इसके खिलाफ लिखोगे?” तो प्रसंग तर अप्रतिमच झाला आहे.

कदाचित ही अतिशयोक्तीही वाटेल पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की ज्या काळात मिथुनदांनी मेनस्ट्रीम सोडून त्यांची फिल्म फॅक्टरी सुरू केली त्या काळात जर बॉलीवुडने त्यांना ‘गुरु’ मधल्या नानाजीसारखे रोल्स देवु केले असते तर आजही मिथुनदा अमिताभला टक्कर देताना दिसले असते. कोणी काहीही म्हणो पण मला अजुनही असे वाटते की त्यांच्या संपुर्ण क्षमतेचा बॉलीवुडने वापरच केला नाही. किंवा आधी अमिताभ आणि नंतर आलेली तरुण पिढी यांच्या झंझावातात मिथुनदांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष्य झाले. भलेही अमिताभवर आमचे कितीही प्रेम असो, आमच्या साठी मिथुनदाच आमचा अँग्री यंग मॅन होते आणि राहतील. सुदैवाने पुन्हा एकदा मिथुनदा मेन स्ट्रीममध्ये परतले आहेत. यावेळी तरी बॉलीवुडला सुबुद्धी येवो आणि मिथुनदांना त्यांच्या अभिनयक्षमतेचा पुर्ण वापर करता येइल असे चित्रपट, अशा भुमिका मिळोत हिच सदिच्छा. मिथुनदांच्या चित्रपटांनी आम्हाला काय दिले असे जर कोणी विचारले तर त्याला माझे एकच उत्तर असेल…. संदेश द्यायला राज कपूर प्रभुती दिग्दर्शक, बलराज सहानीसारखे समर्थ कलाकार होतेच की. पण काही काळ का होइना स्वतःच्या समस्या, स्वतःची दु:खे विसरून आम्हाला अँग्री यंग मॅन बनवणार्‍या मिथुनदांच्या चित्रपटांनी आम्हाला काही दिले असेल तर, स्वप्ने दिली. काही क्षणाकरता का होइना पण आम्हाला हीमॅन, सुपरमॅनच्या शक्ती दिल्या. आपली असहायता, आपले दौर्बल्य विसरण्याची ताकद दिली. मिथुनदा, तुमच्या कडून कसल्याही भव्य दिव्य अपेक्षा कधीच ठेवल्या नव्हत्या. अपेक्षिला होता तो केवळ निखळ आनंद आणि तो तूम्ही भरभरुन दिलात आणि कायम देत राहाल याबद्दल कसलीही शंका नाही.

माझा एक मित्र आंतरजालीय ब्लॉगर मित्र, विद्याधर भिसे याने तर आपल्या ब्लॉगला ‘बाबाची भिंत’ असे नावच दिले आहे. त्यावर बाबाबद्दल बोलताना विभि म्हणतो…

“मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण…वाटो.”
मी एवढेच म्हणेन, “विभि, आपलं गोत्र जुळतय रे. कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण वाटो….

अय स्साला… कोई शक्क?

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
आभार : मायबोलीकर आगाऊ आणि जालावरील एक मित्र अमित पाटील

विशाल कुलकर्णी.

सर, तूम्ही परत या….

ये पावसा!

जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा
अश्रूंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबाथेंबातये पावसा!

धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतूनी
जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा!

सभोती पहा रूक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते-कोरडे
निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा!

दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकूळ झाली गुरे-वासरे
त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा!

अता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके
घरा अंगणा जीवना शांतवाया तू देवतारूप ये पावसा!

तुला आण आहे तॄणांची,फुलांची,सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची
कवितेतूनी माझिया भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा!

काही दिवसांपूर्वी जेव्हा वरुणराजाने अचानक हजेरी लावली तेव्हा सरांची ही कविता आठवणे अगदी साहजिकच होते. प्रत्यक्ष सरांच्या मुखातून, त्यांच्या समोर बसून ऐकलेली ही कविता. खरेतर ही कविता सरांकडून ऐकताना तीचे शब्द ऐकण्याची गरजच पडली नव्हती. त्या विलक्षण प्रेमळ आणि कनवाळू माणसाच्या चेहयावर या कवितेचा सगळा भाव जणू दृष्यमान झाला होता. आज सरांच्या पश्चात हा लेख लिहीताना असं वाटतय की सर अजुनही कुठेतरी आसपासच असतील. अगदी उद्या जरी त्यांच्या घरी गेलो तरी नेहमीप्रमाणे, मनापासून ’या देवा’ अशी हृदयापासून हाक मारून स्वागत करतील.

कविवर्य कै. दत्ता हलसगीकर सर
कविवर्य कै. दत्ता हलसगीकर सर

कविवर्य कै. दत्ता हलसगीकर यांच्या ’चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहामधली ही कविता. सोलापूरी असण्याचे मला जे काही फ़ायदे मिळाले आहेत त्यापैकी एक अतिशय महत्वाचा लाभ म्हणजे सरांचा आशिर्वाद. यात माझे दोन शिक्षक येतात. एक म्हणजे ज्या तंत्रनिकेतनातून माझे शिक्षण झाले त्या एस.ई,एस. तंत्रनिकेतनाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. जीवन औरंगाबादकर सर आणि दुसरे म्हणजे कविवर्य दत्ता हलसगीकर. खरेतर हलसगीकर सरांची ओळख औरंगाबादकर सरांमुळेच झाली. प्रथमवर्षाला असताना आम्ही काही मित्रांनी मिळून कॉलेजचे पहीले हस्तलिखीत काढले ‘ज्ञानदीप’ या नावाने. त्यात माझी एक कथा आणि एक कविता दिली होती मी. ती कविता वाचून औरंगाबादकर सरांनी मला हलसगीकरांकडे पाठवले. त्यावेळी खरे तर प्रचंड दडपण होते मनावर. कारण मी लिहीत असे, पण त्यावेळी माझी कविता अगदीच बाल्यावस्थेत होती. त्याउलट हलसगीकर सरांचे नाव खुप मोठे होते. त्यामुळे पहिल्या भेटीत मी प्रचंड घाबरलेलो होतो. पण सोलापूरातील, सिद्धेश्वर नगरातल्या त्यांच्या घराची बेल वाजवली आणि आता कोण आपण? काय काम आहे? अशा प्रश्नांची अपेक्षा असताना अचानक समोरुन सरांच्या खळखळत्या, स्नेहाने-मायेने ओतप्रोत भरलेल्या शब्दात ‘या ss देवा’ म्हणून साद ऐकली आणि सगळं भय, सगळं दडपण दूर झालं. त्या दिवसापासून सरांशी ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली कविता. कविता कशी जगायची? याचा अनुभव, सगळंच कसं अगदी विलक्षण होतं.

आमचं सोलापूर पहिल्यापासूनच अतिशय समृद्ध अश्या साहित्यिक वारशाचे जडजवाहीर अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आलेलं आहे. त्यातही काव्याच्या बाबतीत सोलापूरचं भूषण म्हणजे कविवर्य संजीव, कविवर्य रा. ना. पवार आणि कविवर्य दत्ता हलसगीकर ही विलक्षण कवित्रयी! या तीन कवींमुळे स्वातंत्र्योत्तर कवितेच्या प्रांतात सोलापूरचा नावलौकिक वाढला होता. पण कवी संजीव किंवा रा. ना. पवार हे फारसे कुणात मिसळत नसत. आपल्याच कवितेच्या विश्‍वात ते रममाण होत असत. हलसगीकर सर मात्र विलक्षण माणुसवेडे कवि. माझ्यासारख्या कित्येक नवकविंचे आधारस्तंभ! कुणाही नवीन कवीला कवितेच्या रस्त्यावरचे खाचखळगे दाखवून त्याची वाटचाल सुलभ करुन देणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. माझ्यासारख्या कित्येकांच्या कवितेला वळण लावण्याचे काम त्यांनी केले. खरं तर चार-पाच पिढ्यांतील कवींच्या कवितांवर त्यांनी संस्कार केले म्हणायला हरकत नाही.

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत

त्यांची ही कविता जणु त्यांनी स्वत:च्या स्वभावात भिनवून घेतली होती. तसं पाहायला केलं तर त्यांनी कधीच कुणाच्याच कवितेत कसलेही फारसे फेरफार केले नाहीत. परंतु ही कविता कशी फुलवायची ? कवितेची बिकट वाट वहिवाट कशी बनवायची हे त्यांनी शिकवले. सरांची भेट होइपर्यंत माझी कविता, केवळ सुचतय म्हणून खरडायचं एवढीच होती. पण सरांनी कवितेकडे गांभिर्याने बघायला शिकवलं. तिच्या अंतरंगात शिरायचं कसं हे दाखवून दिलं. त्यांचं, इतके श्रेष्ठ आणि जेष्ठ कवि असणं त्यांच्या आणि माझ्यासारख्या नवोदितांच्या नात्याआड कधीच आलं नाही. पोटच्या लेकराला समजवावं तसं ते आम्हाला शिकवत राहीले. त्यांच्या त्या वृत्तीला साजेश्या त्यांच्या ‘उंची’ या कवितेत त्यांनीच म्हटलं आहे.

आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे

सरांचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची कविता अगदी साधी असे. कसलाही अभिनिवेश न बाळगणारी. अगदी सर्वसामान्यांना कळतील, पोचतील असे बोलीभाषेतील साधे सरळ पण थेट हृदयापर्यंत पोचणारे शब्द. एखादी निसर्ग कविता असो, किवा समाजाच्या वाईट रुढींवर प्रहार करणारे टीका काव्य असो सरांची कविता कधीच बोचली नाही. त्यांना कवितेतुन जे म्हणायचे असे ते अगदी तिसरी चौथी पास असणार्‍या माणसापर्यंतही सहज पोहोचत असे ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कुठल्याही उपमा नाहीत, प्रतिमा नाहीत, कसलेही शब्दांचे अवडंबर नाही. महत्त्वाचे म्हणजे हा साधेपण केवळ त्यांच्या कवितेतच नाही तर आयुष्यात सुद्धा तितकाच भिनलेला होता. त्यांच्या घराचे दार येणार्‍या प्रत्येकासाठी कायम उघडे असे.

असीमासी जवळीकता
सीमा गेल्या विरघळून
मिळे समुद्राला थेंब
थेंब गेला समुद्रून

किती साधे परंतू परिणामकारक शब्द ! सरांनी अनेक प्रकारचे लेखन केले. निसर्ग, सामाजिक कवितांबरोबरच बाल कविताही लिहील्या. झोका, आई, जादूची पेटी, सुटी आली रे सुटी, रंग झेलू गंध झेलू हे त्यांचे बाल कवितांचे संग्रह तसेच पाझर आस्तेचे, तरुणांसाठी दासबोध, बहिणाबार्इंची गाणी, शब्दरूप मी, कवितेतील अमृतघन, मनातले काही, स्वस्तिंकाची पाऊले, उमाळे अंतरिचे, मन करावे समर्थ, परखड तुकाराम असे नानाविध विषयांवरील स्फुट – ललित लेखन. आषाढघन, उन्हातल्या चांदण्यात, सहवास, करुणाघन, कवडसे, चाहूल वसंताची हे काव्यसंग्रह असे विपूल लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘चाहुल वसंताची’ काव्यसंग्रहाला मराठी साहित्य परिषदेचाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार’ ही मिळाला होता. पण सर अशा पुरस्कारांच्या मोहात कधीच अडकून पडले नाहीत. वर दिलेल्या ‘उंची’ या कवितेची तर देशभरातल्या जवळ जवळ २२ भाषातून भाषांतरे झाली आहेत.

सरांच्या ‘चाहूल वसंताची’ या काव्यसंग्रहातील एक कविता त्यांच्याच आवाजात ऐका. http://youtu.be/Ggney47smbs

(छायाचित्र व ध्वनिचित्रफ़ीत आंतरजालावरून साभार)

असा हा माणुसवेडा कवि काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झाला. कोण जाणे तिथेही सरांकडे नवोदितांची रांग लागली असेल आणि सर आपले हात उंचावून येणार्‍या प्रत्येकाला प्रेमाने, मायेने पुकारत असतील..

“या देवा….!”

सर, ते शब्द पुन्हा एकदा तुमच्या तोंडून ऐकायचेत. तूम्ही परत याच……….

विशाल कुलकर्णी