(मायबोली लेखनस्पर्धा २०१४ साठी लिहीलेला हा लेख. स्पर्धेत ’नंबरात’ काही येवु शकला नाही. मात्र स्पर्धेच्या परीक्षक श्रीमती सुजाता देशमुखयांनी स्पर्धेनिमीत्त मांडलेल्या त्यांच्या मनोगतात इतर काही वाचनीय लेखांसह “वाचलेच पाहीजेत असे लेख” या नावाखाली या लेखाचाही उल्लेख केला. त्याबद्दल त्यांचे आणि मायबोली प्रशासनाचे मन:पूर्वक आभार !
*********************************************************
रंग्याने त्याच्या दप्तरातून सतरंजीची पट्टी बाहेर काढली आणि भिंतीच्या बाजुला बसलेल्या एका पोरावर खेकसला…
“ए जाड्या, सर तिकडं. माझी जागा हाये ही. ”
तसं ते पोरगं बाजूला सरकलं आणि रंग्याने आपली सतरंजी (पट्टी) तिथे अंथरली. अर्ध्या पट्टीवर स्वतः बसत, डोळ्यानीच मला पण बसायला सांगितलं. मी जरा घाबरतच खाली बसलो…..
नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावी गेलो होतो. गावातल्या शाळेला अजुन सुट्टी लागलेली नव्हती. रंग्याबरोबर गावच्या शाळेत त्याच्या वर्गात येवून बसलो होतो. त्यांचे शिक्षक काय म्हणतील याची भिती होती, पण त्यावर रंग्याचे एकच उत्तर ,”पतुदेवाचा पुतण्या आहे म्हणून सांग”, मास्तर त्यांच्या खुर्चीवर सुद्धा बसवतील. पतुदेव उर्फ प्रताप प्रल्हाद कुलकर्णी, माझे काका ! गावातल्या शिवसेनेच्या शाखेचे अध्यक्ष होते……..
“एक साथ नमस्ते” चा गजर झाला. आत आलेल्या मास्तरांनी आपल्या काखेत अडकवलेली पिशवी टेबलावर टाकली. डाव्या हातातली दोन पुस्तके, एक वही आणि फळा पुसायचा लाकडी डस्टर अशी चवड तिथेच टेबलवरच मांडली आणि खुर्चीवर बसता-बसता खिशातुन एक खडू बाहेर काढून कटकन मधोमध मोडला आणि वर्गाच्या मागच्या बाजुच्या कोपर्याकडे जोरात भिरकावला.
“उठा गोपीनाथराव, सकाळ झाली.”
त्या कोपर्यात बसलेल्या, बसलेल्या म्हणण्यापेक्षा बसून पेंगणार्या त्या पोराला पटकन जाग आली. आजुबाजुला बघत, ओशाळवाणं हासत त्यानं एकट्यानेच “एक साथ नमस्ते” केलं. मी त्याच्याकडे टक लावून बघतोय तोवर माझ्या गालावर खटकन त्या खडुचा दुसरा तुकडा येवून आदळला.
“काय वो रावसाहेब, कोण तुम्ही?”
हातातल्या दुसर्या एका खडुला, त्याच्या मध्यावर, टेबलाच्या कडेवर घासत मास्तरांनी अस्मादिकांना उद्देशून विचारलं. बहुतेक खडु हा फळ्यावर लिहिण्यासाठी नसून पोरांना फेकुन मारण्यासाठीच असतो असा मास्तरांचा घट्ट समज असावा. मी काही बोलायच्या आधीच…
“पतुदेवाचा पुतण्या हाये त्येनी. कुरुडवाडीला असतय, कालच आलय. हुनाळ्याच्या सुट्टीसाटनं .”
मी आवाजाच्या दिशेने बघीतलं….
त्येच ते मघाच्ं कळकट पोरगं आपले पिवळेजर्द दात दाखवत मास्तरांना सांगत होतं.
” अस्सं होय्य, नाव काय बाबा तुझं? कितवीला आहेस ? कुठल्या शाळेत जातोस कुर्डुवाडीत?
“विशाल विजय कुलकर्णी, सहावीची परीक्षा दिलीय, आंतरभारती प्रशालेत आहे. ”
’बरं असुदे.. बस आता. पण गपचूप बसून राहा.’ मास्तरांनी सांगितले आणि ते हातातल्या डस्टरने फळा पुसायला लागले. मलाही तेच हवे होते, त्या कळकट्ट पोराने माझी उत्सुकता चाळवली होती. याला माझ्याबद्दल एवढी माहिती कशी? माझ्या डोळ्यातलं आश्चर्य रंग्याला जाणवलं असावं. त्याने माझ्या पोटात आपलं कोपर रुतवलं, माझं लक्ष आपल्याकडे वेधत म्हणाला…
“त्ये येडं गोप्या हे गायकवाडाचं, येडछाप आहे एकदम, सोड जाऊदे. ”
मी मान वाकडी करून गोप्याकडे पाहीलं तर तो माझ्याकडेच बघत होता. डाव्या हातात लाकडी फुटपट्टी धरुन तिच्या साहयाने निवांतपणे पाठ खाजवीत माझ्याकडे पाहात त्याने आपले पिवळेजर्द दात पुन्हा एकदा दाखवले.
“तसलंच आहे ते. खरजुळं, रोगट लेकाचं. म्हणून तर गुर्जींनी तिकडं कोपर्यात बसवलय त्याला. सदानकदा कुठं ना कुठं खाजवतच असतय?”
रंग्या करवादला पण माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मी टक लावून गोप्याकडे बघत होतो. त्याचं अगदी इमानदारीत पाठ खाजवणं चालू होतं. मधली सुट्टी होइपर्यंत कसाबसा दम काढला मी तिथे. त्यानंतर मी घरी जातो असे सांगून शाळेचा निरोप घेतला.
इनमिन तीन – साडे तीनशे उंबरठ्याचं आमचं गाव. त्यातही म्हातारी कोतारीच जास्त. तरणीताठी माणसं रोजगाराच्या शोधात पोटासाठी दाही दिशा करत भ्रमंती करणारी. गावातली शाळा सातवीपर्यंतच, त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तेथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘साडे’ या गावात जावे लागत असे. पहिले ते चौथीच्या वर्गांना एकच कॉमन शिक्षक होते. त्यापुढच्या वर्गांसाठी मात्र स्वतंत्र व्यवस्था होती. (स्वतंत्र व्यवस्था म्हणजे प्रत्येक वर्गाला एक किंवा दोन शिक्षक स्वतंत्रपणे दिलेले. तेच सगळे विषय शिकवत. त्यात दुष्काळी भाग असल्याने सगळीच वानवा. पोरं सकाळी शाळा करुन दुपारी आई-वडीलांना शेतावर मदत करणे, गुरे राखणे असली कामे करत. गोप्या पण त्यापैकीच एक होता. गावची शाळा थोडी गावकुसाच्या बाहेरच्या बाजुला होती. मरिआईच्या देवळापाशी सुरू होणारं माझं गाव, अर्धा-पाऊण मैल अंतरावर असलेल्या मारुतीरायाच्या देवळापाशी संपतं. त्या देवळापासून मधला एक ओढा ओलांडून पाच मिनीटाच्या अंतरावर शाळा. गावातली सगळी रिकामटेकडी टाळकी मारुतीरायाच्या पारावर पडीक. आजही मी शाळेतून परत निघालो. टिवल्या-बावल्या करत मारुतीच्या पारावर पोचलो तर तिथं आधीच गोट्यांचा डाव रंगलेला …….
आणि गंमत म्हणजे तिथे गोप्या होता. आता मला त्याला नीट पाहता आलं. साधारण पावणेपाच-पाच फुट उंची, काटकुळा या वर्णनाला जास्त न्याय देणारा देह. लांबूनसुद्धा हाता-पायावरच्या जखमांचे (खाजवून -खाजवून झालेल्या) ठळकपणे होणारे दर्शन, अगदी बारीक कापलेले केस , अंगात एक ठिगळे लावलेला पण चक्क स्वच्छ गंजीफ्रॉक (शर्ट काढून तिथेच एका झुडपाला अडकवलेला ) आणि कंबरेला तशीच ठिगळे लावलेली खाकी रंगाची अर्धी चड्डी. मारुतीच्या पाराच्या भींतीपाशीच एक छोटासा खड्डा (गल) खणून गोप्याचा गोट्यांचा खेळ रंगलेला.
“आन कुठली मारु रं?” तेवढ्यात गोप्याचं माझ्याकडे ल़क्ष गेलं आणि त्याने मला सरळ हात केला , जणु काही आम्ही गेली ४-५ वर्षे एकमेकाला ओळखतोय.
“का रं इशुनाथ, कटाळला का आमच्या साळंला? गोट्या खेळतू का? ”
खेळणारी इतर पोरं माझ्याकडे बघायला लागली. मी जरा परग्रहावरून आल्यासारखाच होतो तिथे. बहुतेकांच्या अंगात तेच कपडे पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. त्यातही बरेचजण दिवसभर तेच घालायचे कपडे आणि रात्री धुवून दुसर्या दिवशी पुन्हा वापरायचे असा परिस्थितीतली. त्यामुळे टीशर्ट घातलेला मी तिथे परग्रहवासी ठरलो नसतो तरच नवल.
“तू शाळेत होतास ना मघाशी? मग आता इथे काय करतोय? शाळा सुटली का?” मी थोडा आश्चर्यचकीत अवस्थेत…..
“हल बे, मलाबी कटाळा आला म्हुन आलु गपचिप मागल्या दारानं पळून. न्हायतरी ते मास्तर काय शिकवायलय ते हितं कुणाला कळतय? त्यापरीस म्हसरं घेवून रानाकडं गेलेलं काय वायट?”
“आणि उद्या मास्तरांनी विचारलं तर काय सांगणार?”
“त्येनी बी शाणे हायेत रे इशुनाथ, इच्यारत न्हायती आता. सरळ फोकानं छड्या मारत्यात न्हायतर आंगटं धरुन हुबं करत्यात. पैल्यांदी तर वर्गाच्या भायीर आंगटं धरुन हुबं करायचं मला. म्या बी लै शाणा. भायेरच्या भायेर पशार व्हयाचो. दे टाळी….”
खदखदा हासत गोप्याने टाळीसाठी हात पुढं केला आणि मी टाळी देणार तेवढ्यात त्याच वेगाने मागं ही घेतला. ” का रे? टाळी का नाही घेतलीस?”
गोप्याचे डोळे आणि ‘आ’ दोन्ही वासले. त्याने बिचकत हात पुढे केला मी त्यावर टाळी दिली. तसा त्याचा चेहरा फुलला. कुजकट हासत तो म्हणाला,
” आजुन नवा हायेस, म्हायती न्हाय तुला कायबी. पर उंद्याच्याला मला टाळी द्यायाला तू बी नको म्हणशील बग.”
वाक्य संपताना मात्र त्याच्या चेहर्यावर त्या कुजकट हासण्याच्या ऐवजी रडके भाव होते.
” हे बघ गोपीनाथ, मला माहीती आहे तुझा खरजेचा रोग आणि खाजवायची सवय. पण मला नाही फरक पडत. जोपर्यंत तुझ्या जखमेला थेट स्पर्श होत नाही तोवर संसर्गाची भीती नाही. त्यामुळे मी टाळी द्यायला नाही म्हणणार नाही कधीच, किमान जोपर्यंत तुझ्या तळहाताला जखमा होत नाहीत तोवर तरी नाहीच नाही.”
मी हसून सांगितलं, तसा त्याचा चेहरा आधी आश्चर्याने आणि मग आनंदाने फुलला. पोरं मात्र तोंडं लपवून हसायला लागली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीले.
“ध्यान नगो दिवूस त्यांच्याकडं. तू मला गोपीनाथ म्हनलास, त्यांच्यावाणी गोप्या नाय म्हनलास म्हनुन हसायलेत भाडकाव.”
गोपाने अगदी सहजपणे सांगीतले. “अरे हेच काय, माझी आय दिकून गोप्याच म्हनती मला. गेल्या धा-बारा सालात तू पैलाच भेटलास गोपीनाथ म्हुन हाक मारनारा. त्ये मास्तरडं बी गोप्याच म्हनतय. पर खरं सांगु इशुनाथा…. लै ग्वाड वाटलं तुज्या तोंडातुन ‘गोपीनाथ’ आइकताना. ठ्यांकु रं…”
विषाद आणि आनंद दोन्हीने भरलेली अवस्था होती त्याची.
पण कसं कुणास ठाऊक? माझं आणि गोपीनाथाचं (पुढे मैत्री झाल्यावर मी त्याला ‘गोपा’ म्हणायला लागलो) मैत्र आणि बहुदा गोत्रही जुळलं. गोपाचे वडील तो (गोपा) लहान असतानाच घर सोडून परागंदा झालेले. गावातली काही माणसं सांगत की म्हातारा शेजारच्याच एका गावात दुसर्याच बाईबरोबर राहतोय. पण गोपाच्या आईने त्याचा नाद सोडलेला. नवरा सोडून गेला तेव्हा पदरात ४ वर्षाचा गोपा आणि पोटात सहा महिन्याची चंदी अशी दोन लेकर्ं त्या मर्दिनीनी आयुष्यभर स्वत्;च्या जिवावर सांभाळली. हो .. आयुष्यभरच. गोप्या हा असा रोगट, जनावरं राखण्यापलीकडे त्याचा काहीही उपयोग नाही आणि त्याची धाकटी बहीण चंदी ती अर्धवट, गतीमंद असलेली. त्या माऊलीने हे भोग आजन्म भोगले कसलीही तक्रार न करता. गोप्याच्या रोगट शरीरामुळे त्याला कुणी जवळ करायचे नाही. पण कडब्याच्या ताटापासून खेळण्यातल्या बैलगाड्या बनवणं, जनावरं बनवणं हा त्याचा आवडता उद्योग. सगळ्या गावची पोरं त्याच्या पाठी असायची बैलगाडी करुन दे, सायकल करुन दे म्हणत. हा येडा पण आनंदाने पाहीजे ते करुन द्यायचा. पण हीच पोरं त्याच्यापासून कायम फुटभर अंतरावरच….. कुठेतरी खटकायचं त्याला. पण रडणं, खंत करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. जन्मल्यापासून दुखणी आणि रोग यांच्याशी झगडतच मोठा झालेला. त्यामुळे झुंजणं रक्तातच होतं. शरीराने नसला तरी गोपा मनाने भक्कम होता. पुढे कधीतरी मी त्याला त्याची खेळणी तालुक्याच्या बाजारात विकता येतील हे दाखवून दिले. एकदा त्याच्याबरोबर करमाळ्याला जावून ती विकुनही दिली. ते विकून आलेले १२ रुपये आईला देताना धाय मोकलून रडलेला गोपा आजही डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहतो. आणि पुन्हा वर त्याचं त्ये पिवळेजर्द, किडलेले दात दाखवत ‘ठ्यांकु रं’ म्हणत जोरजोरात खिदळणं.
एकदा असाच सुट्टीचा गावी गेलेलो. दोन दिवस गोपा दिसलाच नाही. रंग्याला विचारलं तर तो म्हणाला,
” येडं हाये ते. गृहपाठ केला नाही म्हणून मास्तरनी मारलं. मास्तरनी मारलं म्हणून आईनंबी मारलं. तर हे येडं पळूनच गेलय बघ.” मला धक्काच बसला.
पण सुदैवाने दुसर्या का तिसर्याच दिवशी गोपा परत गावात हजर झाला. मी आलोय हे कळल्यावर घराकडं आला भेटायला.
“काय रे मुर्ख, मास्तरांनी मारलं म्हणून घर सोडून पळून जात असतेत काय? त्या चंद्रभागेचा (गोपाची आई) जीव एवढासा झाला होता मुडद्या.” त्याला आज्जीने फैलावर घेतलं.
” न्हाय वो बामणीन काकी, मास्तराच्या माराचं कुणाला भ्याव वाटतय हितं. न्हानपनापास्नं सगळ्यांचा मारच खातुया, दगुड झालाय अंगाचा… काय बी वाटत न्हाय आता.” गोपा नेहमीप्रमाणेच खिदळत बोलला.
“काकी आवो तकडं सापटण्याला एक बाबा लाकडाची खेळण्या कराया शिकिवतो आसं कळ्ळं म्हुन गेलतो शिकायला. पायच धरले बगा गेल्या-गेल्या त्याचे. म्हन्लं बाबा रे तुला द्यायला पैका न्हाय माझ्याकडं. पर तू म्हनशील ते काम करीन पर येवडी इद्या मला शिकीव. माझ्या असल्या रगतपितीकडं बघून आदी तयारच न्हवता त्यो. पर दोन दिस ततंच बसून र्हायलो दारात त्येच्या, तवा शिकीवलं बगा समदं. थोडी हत्यारं बी दिल्याती. त्येच्या बदल्यात म्या त्येला ३०-४० खेळण्या बनवून दिलो बगा. आता ह्योच धंदा कराचा. तेवढाच आवशीला आदार.”
१६ वर्षाचा होता तेव्हा गोपा. पण आपल्या पदरी नियतीने काय वाढून ठेवलय याची जाणीव होती त्याला. आपली बहीण वेगळी आहे, इतरांसारखी नाही हे त्याला खुप आधीच कळलं होतं. त्यामुळे तिला फुलासारखं जपायचा गोपा. खेळणी विकून कमावलेल्या पैश्यातून चंदीवर इलाज करीन म्हणायचा. शेरगावातल्या मोट्या , भारी डाक्टरकडं घिवून जाणार चंदीला म्हणायचा. चंदीवर त्याचा खुप जीव होता.
“इशुनाथा, तू बगच. येक ना येक दिस चंदी नक्की बरी व्हयील. मग म्या तिला चांगल्या साळंत घालीन, करमाळ्याच्या न्हायतर सोलापूरच्या. लै शिकवीन तिला. मंग कुनीतरी शिरिमंत माणुस बगुन तिचं लगीन लावून दिन.”
रिकामा असला की त्याचं स्वप्नरंजन चालु व्हायचं. मग कुणीतरी खोचकपणे विचारायचा..
“आन न्हायच झाली ती बरी, येडीच र्हायली. तर रं, मंग काय कर्नार?”
तसा गोपा संतापाने उसळून उठायचा. “आरं म्या जित्ता हाये ना अजुन. मरं पत्तुर संबाळीन माझ्या भनीला. तुझ्या गांडीला का म्हुन खाज उठाय लागली रं. ”
आणि मग अचानक त्याचे डोळे भरुन यायचे. माझ्याकडे वळुन म्हणायचा…
“इशुनाथा, मला सांग म्या , माझ्या मायनं, माझ्या चंदीनं आसं काय मोटं पाप क्येलं व्हतं म्हुन ही असली जिनगानी वाट्याला आलीय?”
अर्थातच त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसायचं. मी फ़क्त शांतपणे त्याच्याकडे बघत बसुन राहायचो. पण हे क्षणभरच असायचं. काही क्षणातच त्याच्यातला खट्याळ, खोडकर ’गोप्या’ उसळी मारायचा आणि ……
त्यानंतर मग माझंही गावाकडं जाणं – येणं कमी व्हायला लागलं. आधी शिक्षणाच्या आणि नंतर नोकरीच्या निमीत्ताने गावी जाण्ं कमी झालं. दोन तीन वेळेला तर सकाळी-जावून संध्याकाळी परत अशी धावती भेट झाली. या भेटीत गोपा मात्र भेटला नाही. काही वर्षांपूर्वी गावी गेलो होतो असाच. हंबीरकाकाच्या घरापाशी गाडी पार्क केली आणि बॅग घेवुन घराकडे निघालो. मध्येच समोर एक म्हातारा येवून उभा राहीला. क्षणभर माझ्या डोळ्यात रोखून बघीतलं आणि मग अचानक कुठेतरी शुन्यात बघत म्हणाला …
“न्हाय… तू नसशील त्यो. तू चांगला बाबा दिसतुयास. तू कशाला मारशील माज्या चंदीला?”
आणि आकाशात बघत, विचित्र हातवारे करत तो निघून गेला. आधी मला काही कळेचना. पण शेवटच्या वाक्यावरून माझी ट्युब पेटली आणि मी मागे वळत त्याला हाक मारली…
“गोपा…..!”
तसा तो घाबरला आणि जोरात ओरडला, ” न्हाय्…. न्हाय, म्या कायबी नाय केलं? म्या काय बी करणार नाय? मला मारु नगासा………
आणि अतिशय वेगाने तिथून पळत सुटला….
मी वेड्यासारखा त्याच्या, माझ्या बालपणीच्या मित्राच्या, गोपीनाथाच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात वेड्यासारखा उभा राहीलो. माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेल तो फारतर. पण ऐन चाळीशीत त्याला साठी आली होती. आणि वागणं ……
“तू आला नाहीस विशु बर्याच वर्षात गावाकडं. इथे फार काही घडून गेलय गेल्या ४-५ वर्षात. चंदी मतीमंदच होती रे. तिच्या मतीमंद असण्याचा गावातल्या टग्यांनी फायदा घेतला. गावातले काही जण आणि आजुबाजुच्या गावकुसातल्या काही जणांनी मिळुन त्या अजाण, निरागस लेकराच्या चिंध्या केल्या. महिनाभर गायबच होती पोर. लेकरानं किती दिस छळ सोसला कोण जाणं? पण महिन्याभरानंतर दुधाळ्याच्या माळावर प्रेत सापडलं तीचं. तिची अवस्था बघून चंद्रभागानं गळफास लावून घेतला. गोप्या तर वेडापिसाच झाला होता. त्यानं पोलीसात तक्रार सुद्धा केली. पण त्यानंतर अचानक एक दिवस गोप्या पण गायब झाला. परत सापडला तेव्हा कुणीतरी त्याला बेदम मारला होता. जिवंत राहीला हेच विशेष…
तेव्हा पासून असाच फिरत असतो गावात, “त्यांना” शोधत. कुणालाच ओळखत नाही. फक्त अभागी चंदी तेवढी आठवते त्याला……
माझा दोस्त कुणी मोठा माणुस नाहीये. त्याला लक्षात ठेवावं असं काही विशेषही नाही त्याच्यात. पण तरीसुद्धा मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. आता ही गावी गेलं की कधी-मधी भेटतो मारुतीच्या पारामागं.. आकाशात डोळे लावून बसलेला गोपा.
मी त्याच्या नजरेला नजर मिळवीत नाही. मला भीती वाटते. कदाचित त्याने मला ओळखलं आणि विचारलं…
“इशुनाथा, मला सांग म्या , माझ्या मायनं, माझ्या चंदीनं आसं काय मोटं पाप क्येलं व्हतं म्हुन ही असली जिनगानी वाट्याला आलीय?” .
तर……?
विशाल कुलकर्णी
Like this:
Like Loading...