Category Archives: लेख

एक चुटपुट लावून गेलेली मैफ़ल…

काही दिवसांपूर्वी आमच्या एक कॉन्फरन्सच्या निमीत्ताने दिल्लीत तीन-चार दिवस मुक्कामाचा योग होता. ‘वर्ल्ड जिओस्पॅच्युअल फोरम’ च्या वतीने जगभरातील जी.पी.एस. आणि जी.आय.एस.  शी संबंधीत जगभरातील कंपन्यांचे प्रदर्शन आणि काही तज्ञ व्यक्तींची संबंधीत विषयांवरील लेक्चर्स असा विषय असतो या कॉन्फरन्सचा. मॅप इंडीया, मॅप वर्ल्ड आणि जिओ इंटेलिजन्स इंडीया अशी तीन वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शन कम कॉन्फरन्स ही संस्था आयोजीत करते. यापैकी “जिओ इंटेलिजन्स ” हे फक्त भारतीय लष्करासाठी (यात तिन्ही सैन्यदले येतात) असते. दर वर्षी दिल्लीत हॉटेल ग्रॅंड अशोक मध्ये ही छोटीशी कॉन्फरन्स भरते. आमच्या कंपनीचा (ट्रिंबल) बुथ असतो्च. यंदा आमच्या ओम्नीस्टार सर्व्हीसेससंदर्भात मलाही एक छोटेसे प्रेझेंटेशन करायचे होते. कंपनीने राहायची सोय अशोकमध्येच केली होती. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासुन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत प्रदर्शन स्थळीच होतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी सगळ्या निमंत्रीतांसाठी म्हणून अशोकमध्येच एक स्वागत भोजनाचा बेत होता. पण दिवसभर स्टॉलवर उभे राहून कंटाळलेलो असल्याने मी त्या स्वागत भोजनाच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले होते. फारशी भुकही नव्हती, त्यामुळे रुमवरच उपलब्ध असलेली फळे खाऊन वसंतरावांना ऐकत शांत पहुडलो होतो.

तेवढ्यात कुठून तरी कानावर बागेश्रीचे सुर आले. क्षणभर चमकलो कारण मी तर ‘घेई छंद ऐकत होतो’ आणि मध्येच बागेश्री ? मला एसीचा त्रास होतो म्हणून एसी बंद करुन एका बाजुची खिडकी थोडी उघडली होती, तिकडुनच सुर येत होते. मी खिडकीत जावून बघीतले तेव्हा लक्षात आले की खालच्या मजल्यावर असलेल्या हॉलमधुन ते सुर झिरपत होते. राहवलं नाही आणि कपडे करून तसाच खाली आलो. हॉलवर पाटी पाहीली …

Geo-spatial World Forum welcomes you !

म्हटलं चला आपल्याला इथे कोणी अडवणार नाहीये. आत शिरलो. प्रशस्त हॉल होता. मोजक्या टेबल – खुर्च्या मांडलेल्या, लोक बसलेले. काही जण मागे उभे राहून ऐकत होते. मंचावर कुणीतरी बेभान होवून गात होतं

ए पिहरवा गरवा लागे रे …

मी तिथेच उभा राहून ऐकत राहीलो. गाणारा कोण होता कुणास ठाऊक पण साला नशा होता त्यांच्या आवाजात.

“बडा उमदा गाते है ना राशिद अली खानसाहब?”

शेजारून पृच्छा झाली आणि माझे लक्ष गेले, माझ्या मागचा बार काऊंटरवरचा माणुस विचारत होता. मी नुसतेच त्याच्याकडे पाहून हलकेच हसलो.

“कुछ लेंगे सर?”

“white wine should be fine!”

हातात ग्लास आला आणि मी तिथल्याच एका टेबलाशेजारी असलेली खुर्ची पटकावून बसलो. अतिशय उमदं आणि देखणं व्यक्तीमत्व लाभलेला हा तरुण गायक. खाली अंथरलेल्या गादीवर त्यांनी बैठक लावली, साथीदारांना काही सुचना दिल्या आणि सुरांना साद घातली…

“आओगे जब तूम ओ साजना, अंगना फूल खिलें…..”

‘खमाज’ मधलं ते गाणं साकारताना त्यांनी आलाप घेतला आणि तो क्षण जणू तिथेच थांबला. माझ्या डोक्यात टण्ण करुन घंटी वाजली… “राशिद अली खाँसाहब” ! सिनेमा थिएटरमध्ये, टिव्हीवर, मोबाईलवर हे गाणे खुप वेळा ऐकले होते. पण प्रत्यक्ष खाँसाहेबांच्या तोंडून त्यांच्या समोर बसून हे गाणे ऐकण्याचा नशा, तो मझा काही औरच होता.

इथे ऐका

आओगे जब तुम ओ साजना…
अंगना फूल खिलेंगे…
बरसेगा सावन… बरसेगा सावन…
झूम झूम के॥
दो दिल ऐसे मिलेंगे॥

त्या सुरातून दुरदेशी गेलेल्या त्या साजणाबद्दलची ओढ तर व्यक्त होत होतीच, पण तो जवळ नाहीये याची वेदना जास्त तीव्रतेने जाणवत होती. तू असतास तर काय झाले असते हे सांगताना, त्यात कुठेही नसलेले तू नसल्याने काय झालेय हेही तितक्याच समर्थपणे केवळ त्या सुरांमधून थेट आतपर्यंत पोचत होते. तू नाहीयेस तर हा श्रावण पण रुसून बसलाय हे ठळकपणे जाणवत होते.

नयना तेरे कजरारे है॥
नयनो पे हम दिल हारे है॥
अंजाने ही तेरी नैनो ने॥
वादे किये कई सारे है॥
सांसो की लय … मत्थम चले॥
तोसे कहे….
बरसेगा सावन …बरसेगा सावन॥

त्या सुरांमध्ये प्रीयेच्या काळ्याभोर, कृष्णकमळासारख्या डोळ्यांचे कौतुक तर होतेच, पण तुझ्या डोळ्यांच्या जादुत मी माझे हृदयही हरवून बसलोय ही लाडिक तक्रारही होती. कळत-नकळत तुझ्या डोळ्यांनी दिलेली अनेक वचने आठवताहेत. कसं असतं ना? प्रिय व्यक्तीच्या आठवणीत रमताना सगळं काही विसरायला होतं. एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या व्यक्ती सुद्धा क्षणभर आपलं अस्तित्व विसरून प्रियाच्या आठवणीत भान हरपून बसतात. कधी नव्हे ती श्वासांची गतीसुद्धा हळुवार झालेली असते, आपण आपल्याच त्या जुन्या स्मृतींमध्ये हरवत जातो आणि अचानक कानावर सुर येतात…

चंदा को ताकु रातो मैं …
है जिंदगी तेरी हाथोमे…

किती सोपी पण सार्थ शब्दरचना. दुसरं काही करण्यासारखं उरलेलं नसतंच हो. रात्र जाता जात नाही, मनात तीचेच विचार. तरी बरं, कविंनी, शायरांनी कायम प्रियेचे प्रतिक म्हणून गौरवलेला चंद्रमा आकाशात मंदपणे तेवत असतो. त्याच्याकडे कुठल्यातरी एका अनावर ओढीने पाहात असताना जाणीव होते की आता करण्यासारखं आपल्या हातात काहीच उरलेलं नाही. आपलं सर्वस्व आपण कधीच तिच्या डोळ्यांमध्ये हरवून बसलोय. जणु काही आपलं सगळं आयुष्यच तिच्या हवाली केलं असावं…. आपल्याही नकळत आपलं मन आतुरतेने तिला साद घालायला लागतं…

पलकोंपे झिलमिल तारे है
आना भरी बरसातो मै
सपनोका जहाँ…
होगा खिला खिला…
बरसेगा सावन … बरसेगा सावन…झूम झूम के…
दो दिल ऐसे मिलेंगे..
आओगे जब तुम ओ साजना…

खाँसाहेब गात होते. मस्त समा सजला होता. लोकांच्या हातातले ग्लास अजुन तसेच होते. माझ्या ग्लासमधली वाईनही 😉 शेजारी बसलेले एक सदगृहस्थ अगदी तल्लीन होवून ऐकत होते. योग्य त्या जागी मनापासुन दादही देत होते. मला राहवेना, गाणे संपेपर्यंत मी वाट पाहिली आणि त्यानंतर शेजार्‍याला विचारलेच…

“गुस्ताखी माफ, सरजी, लेकिन आप क्लासिकल संगीत के जानकार लगते है, बुरा ना मानें तो एक बात पुंछू?  ये ‘राग खमाज’ ही है ना, बतायेंगे जरा?”

तशी ती व्यक्ती हंसली. ते बहुदा राजस्थानी होते.

“बेटे, राग तो पक्के तौर पर मै भी नही बता सकता, पर ये गीत बहुत ही सुंदर है और खमाज राग परही आधारित लगता है . क्योंकि आरोह मे ‘रे’ वर्जित कर हम सीधे ‘ग’ लेते हैं ,अवरोह मे तार ‘रे’ ले रहे है, सा ग म प ध ,ग म ग और कोमल नी का प्रयोग है | ये सभी लक्षण खमाज के हैं . इस राग का फिल्मि संगीत मे बहुत उपयोग होता है, क्योंकि स्वर मिला कर इसे मिश्र खमाज भी कह देते हैं. ये चंचल प्रकृति का राग है.”

मला ‘खमाज’ माहीत होता पण खमाजची ही लक्षणं, हे बारकावे मात्र ठाऊक नव्हते. मी कौतुकाने आणि आदराने मान तुकवली.

“शुक्रिया सरजी” म्हणत मी त्या व्यक्तीला माझी ओळख करुन दिली, माझे बिझनेस कार्ड दिले. तशी त्यांनीशी त्यांची ओळख करुन दिली. ते सदगृहस्थ भारतीय लष्करामध्ये कर्नलच्या पदावर कार्यरत होते. कर्नल रुपसिंग राणावत, सद्ध्या कश्मिर प्रांतात पोस्टींगवर होते. तेवढ्यात कुणीतरी माझ्या पाठीवर थाप मारली…

“हाय फिशाल…”

मी मागे वळून बघीतले तर ‘वोल्कर’ होता. ‘वोल्कर वॅगेनेर’ आमचा भारतासाठीचा कंट्री मॅनेजर. ‘वोल्कर’ हॉलंडमध्ये असतो. मग थोडा वेळ त्याच्या बरोबर गप्पा रंगल्या. ओमनीस्टारची भारतातील सद्ध्याची अवस्था, काँपिटिशन, मार्केट शेअर या विषयावर चर्चा सुरू झाली. आता वाईनचे ग्लास पटापट संपायला लागले होते. त्यांच्याबरोबर हातातला ग्लास सांभाळत बाहेर पडलो. बाहेरच्या कॉरीडॉरमध्ये फेर्‍या मारत आमची चर्चा सुरू झाली. साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर वोल्करच्या हातातल्या ग्लास संपला आणि..

“ओके फिशाल, सी यु टुमारो मॉर्नींग अ‍ॅट द बुथ!” म्हनून स्वारी निघून गेली.

मी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघून फक्त बोटे मोडायचीच काय ती बाकी ठेवली होती. माझी एक अप्रतिम मैफील अनुभवण्याची संधी वाया घालवली होती नालायकानं. मी तसाच घाई घाईत हॉलकडे परतलो आणि माझे टेबल गाठले, सुदैवाने माझी खुर्ची रिकामीच होती. कर्नलसाहेब तल्लीन होवून ऐकत होते. मला बघताच हसुन म्हणाले…

“अरे आप कहा चले गये थे बेटे, बहुत कुछ मिस कर दिया आपने.”

“क्या करें सर, वो मेरे बॉस थे, उन्हे कुछ बात करनी थी, ना नहीं कर पाया. क्या क्या गाया राशिद अली खाँ साहबने?”

“जो गया वो भूल जाऊ, अब बैठकर सुनो. आखरी गीत याने ‘भैरवी’ गा रहे है  खाँ साहब!”

मी सरसावून बसलो…. खाँ साहेबांनी सुर लावला…..

“का करु सजनी…. आये ना बालम !”

मैफल हातातून की कानातून गेली होती, पण निदान भैरवीला तरी पोचलो याचे समाधान लाभले. उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या सर्वात प्रिय आणि लोकप्रिय ठुमरीने मैफलीची सांगता होत होती. राशिद अली खाँसाहब खुप उत्कटतेने ‘सिंध भैरवी’ रागातली ही ठुमरी आळवत होते. पण मझा येत नव्हता…

माझ्या कानात शेकडो वेळा ऐकलेले ‘बडे गुलाम अली खाँसाहेबांचेच’ सुर रेंगाळत होते. डोळ्यासमोर तीच खाँसाहेबांची भारदस्त, पण तरीही अतिशय साधी मुर्ती उभी राहिली होती. खाँसाहेबांचा तो धीर गंभीर, मोक्षानंदी टाळी लावणारा आवाज…

इथे ऐका

आये ना बालम
का करू सजनी
आये ना बालम
तरपत बीती मोरी उनबिन रतिया॥
रोवत रोवत कल नाही आवै
उनबिन मोरा जियरा जलावै
याद आवत है उनकी बतिया ॥

‘आये ना बालम’ म्हणताना ज्या पद्धतीने बडे मिया ‘आये’ वर जोर देतात. ती त्यांची उच्चारणाची पद्धत मला नेहमीच वेड लावत आलेली आहे. पटियाला घराण्याची ही खास चीज ऐकावी तर बडे गुलाम अली खाँसाहेबांच्याच आवाजात. मागे कधीतरी त्यांच्या शिष्या ‘कनिका मित्रा’ यांच्या आवाजातही ऐकली होती. ती पण तेवढीच खास जमलेली. पण त्यानंतर कुणाच्या तोंडी ‘आये ना बालम’ म्हणताना तो दर्द, ती नशा, ती कसक कधी जाणवलीच नाही. शब्द, स्वर सगळ्यालाच कसा तो खाँसाहेबांचा दैवी स्पर्श लाभलेला. त्यामुळे इतर कुणाच्या तोंडून ती ऐकताना ‘तो मज्झा’ नाही येत अनुभवाला. ती विरहाची अतीव वेदना नाही प्रत्ययाला येत.

विरहाची वेदना अधिक उत्कट, अधिक तीव्र करणारा सिंधू भैरवीतला तो सुप्रसिद्ध दादरा म्हणजे ‘आये ना बालम’ ! नुसता कल्पनेने देखील सर्वांगावर शहारा उभा राहावा असे ते सुर.

तरपत बिती मोरी, तुमबिन रतिया….

एका एका अक्षराच्या, शब्दांच्या उच्चाराला, उचलण्याला, स्वरांच्या हेलकाव्यांना, उस्तादजींच्या आलापांना, आणि दोन आलापांच्या मधल्या शांततेला, मुरक्यांना, झटक्यांना, तानांना झालेल्या खाँसाहेबांच्या गंधर्वीय स्पर्शाचं सामर्थ्य ही ठुमरी ऐकताना पदोपदी जाणवत राहतं. सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो अगदी सुरुवातीला हे गाणं ऐकलं तेव्हा. हा नक्की दादराच आहे की केरवा (केहरवा?) ? पण मध्ये मायबोलीवरील एक लेखिका दाद यांच्या याच गाण्यावरील एका लेखात अवचितपणे या प्रश्नाचे उत्तर मिळून गेले.

मायबोलीकर दाद म्हणतात…

“मुळात ह्याला “दादरा” म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे. “दादरा” ही गायनप्रकार दादरा तालात (सहा मात्रा) किंवा दादर्‍याच्या ठेक्यात म्हटला जातो. माझ्या ऐकण्यात ही ठुमरी केहरव्यात किंवा केहरव्याच्या ठेक्यात (आठ मात्रा) च आहे. पण त्यांनी आवर्जून हा दादरा असल्याचं सांगितलं…. अन तरीही केहरव्याच्या तालात म्हटली. मुळात भैरवी जरी शेवटी मैफिलीला पूर्णविराम देण्यासाठी गायली जाण्याची रीत असली तरी, ज्या पद्धतीनं गावा तशा भावनेचं अवगुंठन घेऊन, हा राग उभा रहातो. म्हटलं तर भक्तिरस, म्हटलं तर शृंगार किंवा ह्या दादर्‍यात साकारलेली अतीव विरहाची वेदना.”

त्यांच्या या मताला अनुमोदन देताना अजुन एका मायबोलीकराने एक माहिती पुरवली होती… त्याचे नाव आता मला आठवत नाही, पण ते वाक्य मी कॉपी करुन ठेवले होते.

wikipedia :
In this context dadra is a light classical vocal form in Hindustani classical music, mostly performed in Agra and in Bundelkhand region. It was originally accompanied by dadra tala (from where the term for the genre was borrowed), but later dadra compositions are often found in other light talas (such as kaharva).

राशिद अली खाँसाहेबांची भैरवी ऐकत असताना मायबोलीवर झालेल्या या सगळ्या चर्चेची वारंवार आठवण होत होती. न राहवून मन समोर चालु असलेल्या गायकीची बडे गुलाम अली खाँसाहेबांच्या गायकीशी तुलना करायला लागलं आणि….

मी मैफल तिथेच सोडून तडक रुमवर निघून आलो. चुक केलं की बरोबर माहीत नाही. पण ती मैफल , ती भैरवी अर्धवट सोडून आल्याची चुटपुट कायमची मनाला लागून राहीलीय हे मात्र खरं…..

विशाल…

हे देशाचे भावी रक्षक…… (?)

कुठल्याही देशासाठी त्यांचे लष्कर हा अतिशय अभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा विषय असतो. रस्त्याने जाताना कुणी मिलिटरी, नौसेना अगर वायुसेनेचा जवान अथवा अधिकारी दिसला की मान आपोआपच आदराने लवते. कारण देशाचे सैन्य, देशाचे सैनिक हे काय्म देशाच्या पर्यायाने देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत असते. मिलिटरी असो, नौसेना असे वा वायुसेना यापैकी कुठल्याही दलाचा विचार मनात आला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे या विविध सैन्यदलांतर्फे पाळली जाणारी विलक्षण शिस्त, त्यांची शिस्तबद्धता. आपण येता जाता म्हणत असतो की माणसाला जर शिस्त लावायची असेल, शिकवायची असेल तर त्याला आयुष्यातले एक वर्षका होइना सैन्यात घालवायला हवे. आणि हे म्हणणे म्हणजे अगदीच अतिशयोक्ती नसते. या सर्व सैन्यदलांत पाळली जाणारी शिस्त ही कायम सर्वसामान्य नागरिकांच्या अभिमानाचा, आदराचा विषय असते. आपल्यासाठी ते शिस्तीचे आदर्श असतात. आपण आपल्या मुलांना शिस्तीबद्दल सांगताना, शिकवताना देखील नेहमी सैन्याचे, एन्.डी.ए. आणि तत्सम सैन्य प्रशिक्षण संस्थांचे उदाहरण देत असतो. पण गेल्या काही वर्षात काही वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. काही वर्षापुर्वी देहुरोड भागत मद्यधुंद लष्करी जवांनाच्या एका गटाने घातलेल्या गोंधळाची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती आठवण जरा जुनी होत नाही तोवर आता कालची पुण्यातील संभाजी पुलावरील घटना….

काल रात्री लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ऑफिसर-कॅडेट्सनी लकडी पुलावर पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण-शिविगाळ करीत मंगळवारी रात्री धुडगूस घातला. पुण्यातील डेक्कनजवळील लकडी पुलावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही, वाहतुकीचा गोंधळ होवु नये म्हणुन या मार्गावर दुचाकी वाहनांना मनाई आहे. दुचाकी वाहनांसाठी खास वेगळे मार्ग आहेत. लकडी पुलावर रात्री नऊ वाजेपर्यंत टू-व्हीलरला मनाई आहे. तरीही ‘सीएमई’तील हे अधिकारी-कॅडेट्स तेथून आले. ते पाहून संभाजी चौकीतील वाहतूक पोलिस आणि अधिकारीवर्गाने त्यांना अडविले. लकडी पुलावर दुचाकीला मनाई असल्याकारणाने त्यावेली तिथे ड्युटीवर हजर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांचा रस्ता रोखुन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीची किल्ली काढून घेण्यात आली. ते पाहून लष्कराच्या या अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिविगाळ करीत पोलिसांवर हात उचलला. त्या पोलीसाने हटकल्याचा राग येऊन या अधिकारी – कॅडेटसनी चक्क पोलीसांनाच मारहाण सुरु केली आपल्या इतर मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. काही वेळातच ४०च्या वर सैनिकी विद्यार्थी हजर झाले आणि त्यांनी पोलीसांना तसेच उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे हिसकावून घेत फोडले. महिला पत्रकारांना अर्वाच्य शब्दांत दम भरण्यात आला. तसेच लष्कराच्या दहा गाड्यांचा ताफा मागवून दमदाटी करण्यात आल्याने या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

या प्रकारला विरोध करणार्‍या उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनाही दमबाजी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार पाहून संतप्त नागरिकांनी या लष्करी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. दरम्यान, या अधिकाऱ्यांना ‘कुमक’ मागवून घेतली आणि काही वेळातच लष्करी पोलिसांच्या आठ-दहा गाड्या लकडी पुलावर दाखल झाल्या. संतप्त जमावासह पोलिसांशीही हुज्जत घालण्यास प्रारंभ करण्यात आला. अगदी हात काट देंगे वगैरे धमक्याही देण्यात आल्या. या घटनेचे मोबाईलने फोटो काढण्याचे प्रयत्न करणार्‍या सामान्य नागरिकांचे फोन हिसकावून घेण्यात आले. त्यातील मेमरी कार्ड काढून घेवुन मोबाईल फेकुन देण्यात आले.

या घटना लष्करी अधिकार्‍यांच्या माजोरीपणाचे तर द्योतक नाहीत ना? पुन्हा समस्या अशी आहे की लष्करी अधिकार्‍यांवर कसलीही कारवाई करण्याचा अधिकार पोलींसाना नाही असा लष्कराचा दावा असतो. त्याच्या जोरावर हे देशाचे तथाकथीत रक्षक हवा तसा धुडगुस घालायला लागतात. आता या अशा घटना अपवादात्मक असतात हे जरी खरे असले. तरी हे भारतीय लष्कराच्या परंपरेला आणि किर्तीला अतिशय घातक आहे.

या घटनेसंदर्भात लष्कराच्या प्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. प्रश्न असा आहे की यापद्धतीने कायदा हातात घेणार्‍या त्या मग्रुर सैनिकी अधिकार्‍यांवर – कॅडेटसवर काही कारवाई होणार की नाही? झाल्यास ती लष्करच करणार की पोलीस? अगदी ते भारतीय लष्कराचे सैनिक – विद्यार्थी असले तरी याच देशातील कायद्याच्या प्रतिनिधीवर हात उचलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? माझ्यामते तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना – अधिकार्‍यांना पोलीसांच्या ताब्यातच देण्यात यावे आणि नागरी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तुम्हाला काय वाटते?

संदर्भ :

१. दै. सकाळ – पुणे आवृत्ती

२. दै. महाराष्ट्र टाईम्स – पुणे ई आवृत्ती

विशाल कुलकर्णी