Category Archives: माहीतीपर लेख

सर्व प्रकारच्या राजकीय, अराजकीय घडामोडी, तसेच तत्कालीन घटनांवर,
सामाजिक, आरोग्य संबंधीत बाबींवर प्रकाशझोत टाकणारे लेख.

मेरा सुंदर सपना बीत गया….

ती म्हणजे एक न उलगडलेलं कोडं होतं. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक…, जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य केलं.

तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे.
‘सुजाता’ मध्ये एक गाणं आहे. ‘तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!
सचीनदेव बर्मन यांनी हे गाणं तिच्याबरोबरच आशाबाईंकडुनही गाऊन घेतलं होतं. ऐनवेळी सचीनदांनी तिच्या आवाजातलं गाणं फायनल केलं. पण रेकॉर्ड बनवताना ग्रामोफोन कंपनीला ‘आशाबाईंचं’ नाव चुकून पाठवलं गेलं. आणि त्यानंतर जवळ जवळ सत्तावीस वर्षे हे गाणं आशाबाईंच्याच नावाने वाजत राहीलं. बर्‍याच वर्षांनी अमेरिकन रेडीओने घेतलेल्या एका मुलाखतीत तिथल्या निवेदकाने आशाबाईंना हे गाणं ऐकवलं आणि विचारलं ,” हे गाणं कुणी गायलय? हा कुणाचा आवाज आहे?”

आशाबाईचं उत्तर होतं…

“गीता दत्त!”

2

एखादं गाण्याचं श्रेय, मुळ गायिका जिवंत असताना सत्तावीस वर्षे दुसर्‍याच गायिकेला मिळण्याचं हे एकमेव उदाहरण असेल.

‘कागज के फुल’ साठी गुरुदत्तने तिच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं होतं. ‘वक्तने किया..क्या हंसी सितम, हम रहें ना हम्….तू रहें ना तू..!” जणु काही या गीतातून ‘गीता दत्त’ची वेदनाच व्यक्त झाली होती. गीताच्या बाबतीत काळाने खरंच खुप मोठा अन्याय केला आहे, तिच्या हयातीत आणि तिच्या मृत्युनंतरही. तीचं प्रचंड गाजलेलं, पहीलं लोकप्रिय गाणं होतं…” मेरा सुंदर सपना बीत गया” …

ते गीत गाताना तिला तरी कुठे माहीत होतं की ही वेदना यापुढे आयुष्यभर आपली सोबत करणार आहे. १९७२ च्या जुलैमध्ये म्हणजे जवळ जवळ ४० वर्षांपूर्वी गीताने या आभासी जगाचा शेवटचा निरोप घेतला. पण आजही तिचे अस्तित्व तिच्या गाण्यातुन जाणवत असते. कुठे ना कुठे, एखादा रेडीओ , एखादा टेपरेकॉर्डर आर्तपणे तिची वेदना आळवत असतोच…

‘वक्त ने किया क्या हँसीं सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम…

सर्वात आधी गीता दत्तचे सुर कानावर आले ते १९४६ साली आलेल्या ‘भक्त प्रल्हाद’ या चित्रपटातील काही गाण्यांमध्ये. पण यात तिचा वाटा कोरसमधल्या दोन ओळींचा होता फक्त. त्यामुळे गीता दत्त (त्यावेळची गीता रॉय) पडद्यामागेच राहीली. १९४७ मध्ये गीताला महत्त्वाचा ब्रेक मिळाला. चित्रपट होता ‘दो भाई’ . या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीला एका जबरदस्त ताकदीच्या गायिकेची ओळख करुन दिली. गंमत म्हणजे या चित्रपटात गीताने गायलेल्या गाण्याने सचीनदांनाही स्वत:ची अशी एक नेमकी ओळख मिळवून दिली. हे गाणं होतं….”मेरा सुंदर सपना बीत गया…

राजा मेहंदी अली खान यांनी लिहीलेल्या या गाण्याने गीता दत्तला लोकप्रियतेचा उच्चांक गाठुन दिला.

मेरा सुंदर सपना बीत गया…
मै प्रेम में सब कुछ हार गयी
बेदर्द जमाना जीत गया..
मेरा सुंदर सपना बीत गया ( http://youtu.be/zaka9-uC0S4 )

जणु काही गीताचं भवितव्यच या गाण्याने सांगितलं होतं. या गाण्यातली वेदना पुढे आयुष्यभर तिची साथसंगत करत राहीली. सांप्रत काळात बांग्लादेशाचा भाग असलेल्या फरीदपुर या गावच्या एका गर्भश्रीमंत जमीनदाराच्या घरात १९३० साली जन्माला आलेलं हे सुंदर पण करुण स्वप्न पुढची कित्येक वर्षे रसिकांच्या काळजाला हात घालत राहीलं आणि यापुढेही घालत राहील. १९४२ साली जेव्हा गीता बारा वर्षाची होती, तेव्हा तिचं कुटूंब मुंबईतल्या दादर इथे स्थलांतरीत झालं. इथुन पुढे गीताचं आयुष्य एक वेगळा आकार घेणार होतं.

मग १९५० साली आला ‘जोगन’ !

दिलीप कुमार आणि नर्गीसच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला ‘जोगन’ १९५० चा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळी एक कोटीच्या वर व्यवसाय केलेला होता असे मानले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे शिल्पकार होते संगीतकार ‘बुलो सी रानी’ आणि गायिका ‘गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता रॉय उर्फ गीता दत्त’. या चित्रपटातील गाण्यांनी गीताला एका उच्च स्थानावर नेवून बसवले. मीराबाईंची आर्त आळवणी गीताच्या स्वरातून रसिक श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचली आणि जणु काही विरह भावनेलाच एक अतिशय उच्च स्थान देवुन गेली. ‘घुंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे’ (http://youtu.be/QRzES82UPyc ) तसेच ‘मै तो गिरीधर के घर जाऊ, तसेच ‘जरा थम जा तू..ऐ सावन…, मेरे साजन को आने दे’ या गाण्यांनी गीताच्या आवाजाची ताकद रसिकांच्या मनापर्यंत पोचवली.

“‘जरा थम जा तू..ऐ सावन…,” मध्ये तर एकाच गाण्यात गीताने विरही मनाच्या अनेक अवस्थांचे इतके सुंदर दर्शन घडवून आणले आहे की पुछो मत. (http://youtu.be/gJ_CYMsQ84A)

ती मुक्त स्वरात गाऊन गेली… ‘घूँघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे’ .., दुर्दैवाने तिचा पिया तिला तिच्या आधीच (१९६४ साली) सोडून गेला आणि गीता आर्तपणे गात राहीली… ”

जोगी मत जा पाँव पड़ूँ मैं तोरी
मत जा मत जा मत जा जोगी (http://youtu.be/72a1dxaXdPw )

याबाबतीत तिचा पिया म्हणजे गुरुदत्तही दुर्दैवीच ठरला. गीता दत्त, पुर्वाश्रमीची गीता रॉय तिच्या आवाजातल्या आर्ततेमुळे त्याच्या आयुष्यात आली. काही दिवस गुरुदत्तचे आयुष्य गीताच्या सहवासाने आणि तिच्या गीतांनी सुंदर बनुन गेले आणि मग आली वहिदा. वेड्या गुरुने ‘कागज के फुल’ चं रुपांतर ‘चौदहवी का चांद’मध्ये केलं, पण बिचारा शेवटपर्यंत ‘प्यासा’च राहीला. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी वहिदादेखील त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि शेवटी वहिदा आणि गीता दोघीही त्याच्या आयुष्यातून दुर-दूर होत गेल्या. बहुतेक त्या एकाकीपणालाच कंटालून त्या मनस्वी कलावंताने मृत्युला साद घातली असावी.

याच वर्षी आलेल्या ‘बावरे नैन’ मध्ये देखील गीताने संगीतकार रोशन यांच्यासाठी मुकेशच्या बरोबरीने एक निरतिशय सुंदर गाणे दिले होते.

खयालोंमे किसीके इस तरहा आया नही करते.. (http://youtu.be/6gDnijylB4k )

१९५१ साल तिच्या वैयक्तीक आयुष्यात एक नवं, सुंदर पर्व घेवुन आलं होतं. (ज्याचा अंत एका न संपणार्‍या विरहात होणार होता) ‘बाजी’ या चित्रपटाच्या दरम्यान तिची ओळख गुरुदत्तशी झाली आणि याच चित्रपटातील एका प्रचंड गाजलेल्या गीताच्या रेकॉर्डींगच्या वेळी गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला. गाणं होतं…

“तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले.., एक दांव लगा ले” (http://youtu.be/cgwfvDh7cPc )

सर्वस्व गमावून बसलेला, निराश झालेला नायक (देव आनंद) आयुष्याप्रती एकदम उदासीन होवून हार मानून परत निघालेला असतो. तेव्हा गिटारच्या धुंद करणार्‍या साथीत अवखळ नायिका (गीता बाली) त्याच्यातल्या हिंमतीला कर्तुत्वाला आव्हान करते. स्वतःवर विश्वास असेल तर अजुन एक संधी घेवून बघायला प्रेरीत करते. ‘बाजी’ हा चित्रपट खरेतर गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांसाठीसुद्धा एक जुगारच होता. त्या आधी दोघेही आपापल्या आयुष्यात खुप संघर्ष करुन थकले होते. असे म्हणतात की आपल्या संघर्षाच्या काळात या दोन मित्रांनी एकमेकांना वचन दिले होते की त्यांच्यापैकी जो कुणी प्रथम चित्रपट बनवेल , तो दुसर्‍याला आपल्या चित्रपटात संधी देइल. म्हणजे ‘देव’ने चित्रपट केला तर दिग्दर्शक गुरुदत्त असेल आणि गुरुदत्तने चित्रपट केला तर नायक ‘देव’ असेल. संधी ‘देव आनंद’ला मिळाली आणि त्याने आपले वचन पाळले. ‘बाजी’ हा चित्रपट व्यावसायिक यशाच्या पातळीवर देव आणि गुरुदत्त दोघांसाठी देखील एक पहिली आणि शेवटची संधीच होता. पण या संधीचे गुरुदत्तने सोने केले. या गाण्याने तर लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडले. आणि याच गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यान गीता त्याच्या आयुष्यात आली.

3

आपल्या नशिबावर आणि गुरुदत्तच्या प्रेमावर विश्वास ठेवून तिने हा डाव खेळला. कुठल्यातरी क्षणी ती देखील गुरुदत्तच्या प्रेमात पडली आणि १९५३ मध्ये तीने गुरुदत्तबरोबर विवाह केला. प्रथमदर्शनी तरी असेच भासले की तिने खेळलेला हा नशिबाचा डाव कमालीचा यशस्वी ठरला. बाजीच्या यशाने गीताला पार्श्वगायिका म्हणून पक्के स्थान मिळवून दिले. बाजीनंतर गुरुदत्तच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात गीता गायली आणि जिव तोडून गायली. गुरुदत्त आणि गीताने या काळात एकाहुन एक सुंदर अशी अनेक कर्णमधुर गाणी दिली.

सचीनदा एकदा म्हणाले होते, “वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!”

‘बाजी’ असो वा ‘आरपार’, ‘प्यासा’ असो वा ‘कागज के फुल’ , सी.आय.डी. असो वा ‘चौदहवी का चांद’ ! गीताने आपल्यापाशी जे काही सर्वोत़्कृष्ट गाणं होतं ते गुरुदत्तच्या पदरात टाकलं. या गाण्यांनी इतिहास घडवले. आजही भारतीय आणि अभारतीय रसिकसुद्धा गीताच्या आवाजातील या वैविध्याने भारलेले आहेत. तिच्या मनाचा अस्वस्थपणा, तिची वेदना, तिची तडफड, तिचा एकटेपणा तिच्या आवाजातून, तिच्या गाण्यातून थेंबाथेंबाने बरसत राहीला, झिरपत राहीला….

‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना…हाँsssss बड़े धोखे हैं…बड़े धोखे हैं, इस प्यार में’ ( http://youtu.be/A35PbjcKoBA) ती जिव तोडून गात राहीली. पण तिच्या नशिबात तेच होते. तिच्या वैयक्तीक आयुष्यात देखील तिला तिच्या प्रेमाने धोकाच दिला. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी आपलं सर्वोत्कृष्ट गाणं दिलं तो गुरुदत्तच वहिदाच्या नादाने तिच्याकडे पाठ फिरवून निघून गेला आणि तरीही गीता गातच राहीली…

‘ये लो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे।‘ ( http://youtu.be/piSnt5pj5XI )

गीताने आपल्या कारकिर्दीत जवळ-जवळ सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत. पण तिच्या गाण्यांमध्ये जास्त प्राधान्य दिसून येतं ते प्रेम आणि विरहभावनेला. मग ते ‘भाई-भाई’ मधलं ‘ए दिल मुझे बता दे..तू किसपें आ गया है’ असो वा प्यासातलं ‘आज सजन मोहे अंग लगा ले’ असो, गीताने आपल्या प्रत्येक गाण्याला नेहमीच पुर्णपणे न्याय दिलेला आहे. पण ‘गीता’ स्वतः मात्र आयुष्यभर एकच गीत मनोमन गात राहीली असावी…

‘कैसे कोइ जिये, जहर है जिंदगी’ (http://youtu.be/oXLtgfjSAbQ )

त्या दु:खातच कधीतरी, कुठल्यातरी बेसावध क्षणी ती नकळता मद्याच्या आहारी गेली आणि त्यातच शेवटी बुडून गेली. ‘साहिब, बीबी और गुलाम’ हा चित्रपट जरी ‘मीनाकुमारीच्या’ अभिनयासाठी ओळखला जात असला तरी या चित्रपटाच्या गाण्यात खरं त्याचं यश सामावलं होतं. पतीने केलेला विश्वासघात, एकटेपणाची ती आर्तता, ‘छोटी बहु’ची वेदना ‘गीता’च्या आयुष्यात भरून सामावलेली होती. साहजिकच सगळा दर्द तिच्या गाण्यात उतरला नसता तरच नवल. आपली सगळी वेदना एकवटून गीता गायली…

“न जाओ सैय्या…, छुडाके बैय्या, कसम तुम्हारी मै रो पडूंगी…जाने ना दूंगी..” ( http://youtu.be/TCDbIT13MRY )

या गाण्याने मीनाकुमारीला हिंदी सिनेसृष्टीत आणि रसिकांच्या मनात अजरामर केले पण एवढी आर्त आळवणी करुनही गीताचा पिया काही तिच्याकडे राहीला नाहीच. तो आधी वहिदाकडे आणि नंतर काळाच्या गर्तेत दूर कुठेतरी तिला एकटीला सोडून निघून गेला.

त्यानंतर आलेलं १९५६ साल गीताच्या कारकिर्दीत अतिशय महत्त्वाचं ठरलं. ‘हावडा ब्रीज’ साठी ओ.पी. नय्यरने एक वेगळीच पण कठीण धुन तयार केली. त्याने गीताला हे गाणे देवु केले. खरेतर गीताला स्वतःलाच ती या गाण्याला न्याय देवु शकेल याबद्दल खात्री वाटत नव्हती. कारण पाश्चात्य संगीताबरोबर स्वतःचे सुर जमवून घेण्याचा प्रसंग आजवर कधी आलाच नव्हता. पण ओपीला पुर्ण विश्वास होता की या गाण्याला कोणी व्यवस्थीत न्याय शकेल तर फक्त ‘गीता दत्तच’. ओपीवर विश्वास ठेवुन गीताने हे आव्हान स्वीकारले. त्यासाठी तीने अनेक पाश्चात्य गायिकांची गाणी अगदी बारकाईने ऐकली, अभ्यासली. पण ते बारकावे तसेच्या तसे आपल्या गाण्यात न आजमावता तीने ते आपल्या गायनशैलीनुसार बदलून घेतले आणि जन्माला आलं एक अफलातुन गाणं…

“मेरा नाम चुन चुन चू…, चुन चुन चू…, रात चांदनी मै और तू, हॅल्लो मिस्टर हाऊ डु यु डू?” ( http://youtu.be/lVKEMOenP-o ) आपण या पद्धतीची गाणीदेखील गाऊ शकतो ही गोष्टच तीला प्रचंड आत्मविश्वास देवुन गेली. ओपी ने खर्‍या अर्थाने गीता दत्तला तिच्या ताकदीची जाणिव करुन दिली असे म्हणायला हरकत नसावी. या जोडीने हिंदी सिनेसृष्टीला आणि आपल्यासारख्या सामान्य रसिकांना एकाहुन एक अजरामर गीते दिली…

सुन सुन सुन जालिमा, (रफीसाहेब आणि गीतादत्त http://youtu.be/Ws4_dxK3Q3A )
बाबूजी धीरे चलना, (http://youtu.be/A35PbjcKoBA )
ये लो मै हारी पिया ( http://youtu.be/piSnt5pj5XI )
मोहब्बत कर लो जी भर लो, (http://youtu.be/e1BsXULRl-U सहगायक रफीसाहेब),
ठंडी हवा काली घटा, (http://youtu.be/unxd92NgGm()
जाने कहां मेरा जिगर गया जी, (http://youtu.be/9mXnOybU3T0 सहगायक रफीसाहेब)
आंखो हीं आंखो मे इशारा हो गया, (http://youtu.be/6ialHMUFvlE )
जाता कहां है दीवाने (सीआईडी-1956),
मेरा नाम चिन चिन चु (हावड़ा ब्रिज-1958),
तुम जो हुये मेरे हमसफर (12ओ क्लाक-1958),

पण जरी ओपीने गीताला एक नवे रुप, एक नवे स्वरुप दिले असले तरी गीताचा आवडता संगीतकार सचीनदाच होते. सचीनदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीताने अनेक लोकप्रिय गाणी दिली. ही यादी खुपच मोठी आहे. तरी त्यातली माझी आवडती गाणी म्हणजे..

मेरा सुंदर सपना बीत गया (दो भाई- 1947 http://youtu.be/zaka9-uC0S4 )
तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना दे (बाजी-1951)
चांद है वही सितारे है वही गगन (परिणीता-1953 http://youtu.be/tffJfUEaT7M )
हम आपकी आंखों मे इस दिल को बसा लें तो ( http://youtu.be/8UkEcMxjGO8 प्यासा-1957)
वक्त ने किया क्या हसीं सितम ( http://youtu.be/MZ3S4-bm70s कागज के फूल-1959)

And last but not the least…

जाने क्या तुने कहीं जाने क्या मैने सुनी (http://youtu.be/mLGCAGHNTJU प्यासा ) हे गाणं पाहताना काय बघु आणि काय ऐकु असं होतं. गुरुदत्तचं अप्रतिम दिग्दर्शन, वहिदाच्या चेहर्‍यावरचे अवखळ तरीही लाजरे भाव, सचीनदांचं दुसर्‍याच विश्वात घेवुन जाणारं संगीत आणि गीताचा लाडीकपणे थेट हृदयाला हात घालणारा दैवी आवाज. हाय कंबख्त… इस एक गानेपें सारी जिंदगी निसार कर देनेको दिल करता है!

1957 नंतर मात्र गीताच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. गुरुदत्तने तिच्या वैयक्तीक आयुष्यात, तिच्या कामात फारच रस घ्यायला सुरुवात केली. स्पष्ट शब्दातच बोलायचे तर ढवळाढवळ करायला सुरुवात केली. गीताने फक्त आपल्याच चित्रपटात गायला हवे हा अतिशय अव्यवहारी आणि निर्दय हट्ट गाजवायला त्याने सुरुवात केली.गाण्यावर जिवापाड प्रेम असलेल्या गीताने आधी याला विरोध केला खरा, पण नंतर ती नशिबाला शरण गेली. मग हळु-हळु इतर दिग्दर्शक, संगीतकार तिला आपल्यापासून दूर करायला लागले. पण गुरुदत्तची ढवळाढवळ खुपच वाढली होती. संगीत आणि गायन हेच पहीलं प्रेम असलेल्या गीताच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा होत्या. त्याच दरम्यान गुरुदत्तचं नाव वहिदा रेहमानबरोबर जोडलं जाऊ लागलं होतं. ते मात्र गीता दत्त सहन करु शकली नाही आणि शेवटी नाईलाजाने तीने गुरुदत्तला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण मला वाटतं गीताने पण गुरुदत्तला ओळखण्यात चुकच केली होती. गुरुदत्त अतिशय मनस्वी कलावंत होता. वहिदाच्या प्रेमात पडण्याचं कारण तिचं सौंदर्य नसून तिच्यात त्याला गवसलेला त्याच्याच सारखा मनस्वी कलावंत होता. काही दिवसांनी वहिदाही त्याला सोडून गेली आणि गुरुदत्त आतुन तुटत गेला. मद्याच्या आहारी गेला. शेवटी १० ऑक्टोबर १९६४ रोजी झोपेच्या गोळ्या घेवुन त्याने स्वतःचे जीवन संपवले. गुरुदत्त गेला मात्र त्याबरोबर गीताही संपली. तीने अगदी मनापासुन प्रेम केले होते गुरुदत्तवर. त्या धक्क्याने ती ही तुटत गेली, आपलं एकटेपं, ते तुटलेपण लपवण्यासाठी तीनेही शेवटी दारुचाच आधार घेतला. गुरुदत्तच्या मृत्युनंतर मात्र तिची अवस्था खरोखर खुपच वाईट बनली. बाकी निर्माता-दिग्दर्शकांनी तर तिच्याशी संबंध तोडले होतेच. आता गुरुच्या मृत्युनंतर त्याची कंपनी त्याच्या भावांच्या हातात गेली. त्यानंतर गीताला तिथेही काम मिळणे बंद झाले. तेव्हा गीताला आपले कुटुंब, आपली मुले यांच्या अस्तित्वाची जाणिव झाली. गीता आणि गुरुदत्तला एकुण दोन मुले आणि एक मुलगी होती. तरुण, अरुण आणि नीना. गुरुदत्त गेला तेव्हा धाकटी नीना अवघी दोन वर्षाची होती.

5

आपल्या मुलांसाठी म्हणुन गीताने पुन्हा फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान तीला बंगाली चित्रपटांतुन संधी मिळाली. काही प्रमाणात पुनश्च आपले बस्तान बसवण्यात ती यशस्वीही झाली. तीने गायलेली काही लोकप्रिय बंगाली गीते..

तुमी जो आमार (हरनो सुर-1957)
निशि रात बाका चांद (पृथ्वी आमार छाया-1957)
दूरे तुमी आज (इंद्राणी-1958)
एई सुंदर स्वर्णलिपि संध्या (हॉस्पिटल-1960)
आमी सुनचि तुमारी गान (स्वरलिपि-1961)

गीता दत्त : विकीवर (http://en.wikipedia.org/wiki/Geeta_Dut )

मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे गीता हे कधीही न उलगडलेलं एक कोडं होतं. कुठली गीता दत्त खरी मानायची? “मैं तो गिरिधर के घर जाऊं” म्हणणारी प्रेमविव्हळ प्रेमदिवाणी की “ओह बाबू ओह लाला” म्हणत एका लहान मुलाच्या, लाडिक आवाजात गाणारी एक गायिका. अगदी “आओगे ना साजन, आओगे ना” सारखं शास्त्रीय संगीतावर आधारीत गीत गातानाही गीताची मधुर लय हरवत नाही किंवा तीने मास्टर धनीरामसाठी गायलेली “बाट चलत नयी चुनरी रंग डारी” ही ठुमरीही तेवढीच वेड लावते. आणि हीच गीता दत्त “ना यह चाँद होगा ना तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे” देखील गाते. व्हर्सटालीटी अजुन काय असते? जोगन मधलं “चन्दा खेले आँख मिचौली बदली से नदी किनारे, दुल्हन खेले फागन होली” तसंच साधना मधलं “तोरा मनवा क्यों घबराएँ रे” ही गाणी आठवताहेत? या गाण्यांमधुन गीताने आपला अनुभव आणि अधिकार जणु निर्विवादपणे सिद्ध केला होता.

1

अजुन बरीच गाणी आहेत. तिच्या मनापासून आवडलेल्या गाण्यांची यादी कधीही न संपणारी आहे. शेवटपर्यंत, अगदी गुरुदत्त गेल्यानंतर देखील ती नऊ वर्षे अजुन एक डाव आजमावत राहीली. पण आता तब्येतही साथ देइनाशी झाली होती. हळु हळु गीताने गाणं बंद करत आणलं. जवळ जवळ ३० वर्षे आपल्या रसिकांना वेड लावणारा हा जादुई आवाज २० जुलै १९७२ रोजी आसमंतात विलीन होवून गेला.

***************************************

तळटीप : छायाचित्रे आणि माहिती आंतरजालावरून साभार.

रंग सोन्नलगीचे – अर्थात आमचं सोलापूर !

यंदाच्या मायबोली गणेशोत्सवांतर्गत घेतलेल्या ’गर्जा महाराष्ट्र माझा’ या गटलेखन स्पर्धेत आमच्या ’लैभारी’ या गटाने लिहीलेल्या ’रंग सोन्नलगीचे’ या सोलापूर शहरावरील माहितीपर लेखास प्रथम पारितोषिक मिळाले. विजेतपदासाठी मायबोलीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मतदानावरच विजेता ठरणार होता. त्यानुसार मायबोलीकरांनी आमच्या ’रंग सोन्नलगीचे’ या लेखाला ४४% (८७ मते) आणि ७४ लाईक्स असे बहुमताने निवडून दिले. ही संधी दि्ल्याबद्दल मायबोली व्यवस्थापक, संयोजक आणि समस्त मायबोलीकरांचे मन:पूर्वक अभिनंदन !

मायबोली गणेशोत्सव २०१२ : स्पर्धा निकाल

"लैभारी"
“लैभारी”

———————————————————————————————————
———————————————————————————————————
कंपुचे नाव :-लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.

सहभागी मायबोलीकर

विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी (भंडारे)

———————————————————————————————————
———————————————————————————————————

२००६ मधली घटना. नुकताच फुग्रो ओमनीस्टारला जॉइन झालो होतो. काही मुलभूत प्रशिक्षणासाठी म्हणून हॉलंडला कंपनीच्या मुख्यालयात हजर झालो होतो. दोन महिन्यासाठी तिथे राहावे लागणार होते. पाच दिवसाचा कामाचा आठवडा असे. शनिवार-रवीवार बुड उचलून भटकायला निघायचो. दुसर्‍या महिन्याच्या अश्याच एका रविवारी अ‍ॅमस्टरडॅमच्या ‘वॅन गॉ’ संग्रहालयात तळ ठोकलेला होता. इतक्यात फोन वाजला, खरेतर ग्लोबल रोमींग असल्याने उचलायला मन धजावेना, पण फोनच्या स्क्रीनवर झळकलेले नाव वाचुन राहवेना. फोन ‘राजा साळुंकेचा होता. माझा जिवश्चकंठश्च मित्र. मनावर आणि खिश्यावर दगड ठेवुन फोन उचलला.

” काय करायला बे भाxxx? फोन उचलाला येवडा वेळा लागालाका तुला? (इथे टायपो नाहीये, आमच्याकडे उचलायला, बोलायला, लागायला म्हणताना मधला ‘य’ कृष्णार्पण करण्याची पद्धत आहे. 😉 ) दात आले का बे गांX ? ”

मी अक्षरशः मोहरलो. तसे घरच्यांशी बोलणे व्हायचे अधुन्-मधुन. पण खास सोलापूरी भाषेतल्या त्या मायेच्या 😉 शिव्या ऐकताना अगदी मस्त वाटले. मी राजाला ती सगळी वाक्ये रिपीट करायला लावली. आणि नंतर….

“हॉलंडात आलो बे फोकलीच्या. रोमींगमध्ये आहे. बंद कर, नायतर परत आलो की ‘देत्तो बग कडेलकनी एकच कनपट्टीखाली’ ! ”

आणि नंतर ३-४ वाक्ये त्याची, ३-४ वाक्ये माझी झाली असतील. प्रत्येक वाक्यात शिव्यांचा आणि स्पेशली ‘बे’ चा रतीब होता. रोमींगमध्ये असल्याने फारसे ताणले नाही राजाने, फोन बंद झाला. मी मागे वळलो, मागे एक चाळीशीचा तरुण उभा होता. चेहरा-मोहरा भारतीय.

“सोलापूरी का बे ?”

माझा चेहरा उजळला.

“तू पण?”

“ते फोनवरचं प्रेमळ संभाषण ऐकलं तेव्हाच ओळखलं हा भाड्या सोलापूरचा दिसतोय.”

काय गंमत बघा, दिड महिना सोलापूरी शिव्यांना अंतरलेला मी, तिथे अ‍ॅमस्टरडॅममध्ये एक सोलापूरी भेटावा आणि त्याने कसल्याही औपचारिकता न बाळगता झक्कास आमच्या सोलापूरी भाषेत शिव्यांचा रतीब सुरु करावा. यासारखं भाग्य नाही. अर्थात त्यातली मजा अनुभवण्यासाठी तुम्ही सोलापूरी असणं गरजेचं आहे. ‘बे’, भाड्या, भाडखाव, गांX या शिव्या आमच्याकडे प्रिय, जिगरी, जवळचा या अर्थाने घ्यायची पद्धत आहे. त्यामुळे सोलापूरी माणसाला वाक्यात या पैकी एखादी तरी शिवी लागतेच लागते, नाहीतर उगीचच चांदीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगाची फुळकवणी आमटी प्यायला दिल्याचा फील येतो.

आमच्या सोलापुरात बे सारखंच ’मारणे’ हे क्रियापद एक लै मारलं जातय बगा, म्हंजे वापरलं जातं. कसं ? म्हणजे पहा, आम्ही गाडी चालवत नाही, गाडी मारतो. फोन, मिस कॉल सुद्धा मारतो. रंग लावत नाही, रंग मारला जातो.  ’ए चल बे गाडी तु मार आज.’, ’काम संपल्यावर कॉल मार बे’, ’काय बे, नविन रंग मारलायस काय बे घराला?’ ’अरे कालच मी एक फोटो प्रिंट मारलो बे.’ ’अबे बोर नको मारुस’!  हे क्रियापद चालवुन पहा तुम्हीही एकदा 😉

तर असा आमचा स्वभाव गुण आहे. उगीचच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोखठोक पाहीजे. मग भले कुणी अम्हाला फाटक्या तोंडाचा का म्हणेना !

पण केवळ फटकळपणा हा सोलापूरचा गुणधर्म नव्हे. आजकाल सगळीकडे सोलापूर म्हणले की तिथे वाक्या-वाक्यात पेरल्या जाणार्‍या शिव्या, शेंगाची चटणी आणि टेक्सटाईल्सचा व्यवसाय या तीन मुद्द्यावरच चर्चा येवून थांबते. माझ्यासारख्या अस्सल सोलापूरी माणसाला ही गोष्ट अपमानास्पद वाटते. कारण माझं सोलापूर एवढ्यापुरतंच मर्यादीत नाहीये. सोलापूर म्हणलं की अनेक गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. त्यात सोलापूरच्या भौगोलिक परिस्थीतीबरोबरच तिथली खाद्यसंस्कृती, कन्नड, मराठी, तेलगु आणि हैदराबादी घाटणीची अफलातून उर्दुमिश्रीत हिंदी भाषिक माणसे या सर्वांना बरोबर घेवुन, त्यांचा समतोल साधत प्रगतीपथावर मार्गक्रमण करणारी सोलापूरची खर्‍या अर्थाने सहिष्णु मानवी संस्कृती, आजुबाजुची देवस्थाने, सोलापूरातील शैक्षणिक संस्था, स्वातंत्र्याच्या चळवळीत सोलापूरचा सहभाग, चार हुतात्म्यांची अमरगाथा या बरोबरच सोलापूरचा मानबिंदु आणि ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाचाही विचार होणे अत्यावश्यक आहे. चला केवळ गप्पा मारण्यापेक्षा, गप्पा मारत मारत एक आढावाच घेवुयात सोलापूरच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा !

सुरुवात करुयात सोलापूरची अमरगाथा सांगणार्‍या पोवाड्यापासून…

वंदन करुनी भूमातेला, भाळी टिळा लावितो,
स्वातंत्र्याच्या होमी पडले त्यांची कथा सांगतो, सांगतो, त्यांची कथा सांगतो.
बीज पेरिले स्वातंत्र्याचे, वृक्ष आजि दिसतसे,
त्या वृक्षाला निजरक्ताचे पाणी घातले कसे? सांगतो, पाणी घातले कसे.
ऐक रसिका ऐक कथा हि प्राण आणुनी कानी,
देह अर्पिला निष्कामाने स्वातंत्र्याच्या रणी सांगतो त्यांचीच मी कहाणी

हेरंबा गणनायका ओ ssssssssssssssssssss
हेरंबा गणनायका, गौरीबालका, जगतचालका, नमितो तुजला मी त्रिवार,
भक्ती मनी दाटे अपरंपार, शाहीर करती जयजयकार हो जी जी……
शाहीर करती जयजयकार हो जी जी…..

ही नगरी सोलापूर …….. हो sssssssssssssssssssssssss हो
ही नगरी सोलापूर, माती कणखर, देव सिद्धेश्‍वर,
तयाची किरपा गावावर
शिवशंभुचा अवतार, म्हणुनी त्याचा जयजयकार…………हो जी जी
रूपाई भवानी आहे सदा पाठीशी हो जी जी ….
संकटी रक्षितो माझा देव खंडोबा हो जी जी ….
सावळी विठाई चंद्रभागेच्या तीरी हो जी जी …
तिचे पुत्र खरे गुणवंत, तसे शिलवंत, आणि यशवंत
जगी ठरले ….
मृत्यूला जिंकून ते उरले
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी……
हुतात्मे धन्य धन्य झाले हो जी जी……

हा पुर्ण पोवाडा तुम्हाला “सोलापूरनगरीचा पोवाडा” इथे वाचता येइल आणि “सोलापूरनगरीचा पोवाडा“>इथे डाउनलोड करुन ऐकता येइल.

सोलापूर…माझं सोलापूर…
सिद्धेश्वराची पुण्यनगरी सोलापूर..
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९ ते ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगलेल्या बहाद्दर जनतेचे सोलापूर.
देशात पहिल्यांदा तिरंगा महानगर पालिकेवर फडकला तो सोलापुरच्या महानगर पालिकेवर.
मार्शल लॉच्या दरम्यान आपल्या प्राणांचं बलिदान केलेल्या चार हुतात्म्यांचं सोलापूर…
सोलापूरी चादरीसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर…
एका बाजुला तुळजापूरची आई भवानी आणि एकीकडे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ माऊलींच्या कृपाछत्राखाली वसलेले सोलापूर
‘भेटेन नऊ महिन्यांनी’ या अजरामर ओळी लिहिणार्‍या कवि कुंजविहारींचे सोलापूर..
चीनच्या सारख्या परक्या देशात भारताचे नाव उंच करणारे भारताचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणिसांचे सोलापूर !
‘हटा तटाने पटा रंगवूनी जटा धरीशी का शिरी, मठाची उठाठेव का करी?” असे म्हणत शुभरायबुवाची कान उघाडणी करणार्‍या शाहीर रामजोशींचे सोलापूर…..
समोरच्या पडद्यावर अमिताभ असो वा मिथुन की अजय देवगण असो, चिरंजिवी असो वा महेशबाबु की रवी तेजा असो, अर्नॉल्ड असो वा जॅकी चॅन वा टॉम हँक्स असो… आमचं नातं चित्रपटांशी म्हणत, यच्चयावर सर्वच भल्या-बुर्‍या चित्रपटांना डोक्यावर घेणार्‍या चित्रपटवेड्यांचं सोलापूर…
एखाद्याला जिव लावला की त्याच्यासाठी जिव द्यायला आणि वेळ पडल्यास घ्यायलाही तयार असणार्‍या दिलदार लोकांचं सोलापुर
मराठी, कन्नड, उर्दु मिश्रीत हैदराबादी हिंदी, तेलगु अशा अनेक भाषांनी सजलेलं सोलापुर
आमच्या सोलापूराबद्दल काय आणि किती बोलावं ….

थोडासा इतिहास…
असे मानले जाते की सोलापुर हे नाव सोळा गावांमुळे पडले. आदीलपुर, अहमद्पुर, चपळदेव, फतेपुर, जामदारडी, कळजापुर, खडरपुर, खंडेरवकिवाडी, मुहम्मदपुर, रानापुर, संदाळपुर, शैखपुर, सोलापुर, सॉन्नलगी, सोनपुर आणि वैदाकवाडी. पण कल्याणि काळातले श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या लेखातुन, त्यांचा साहित्यातुन असे कळते की आधी याला ‘सोन्नलगे’ म्हणायचे, ज्याचे नंतर ‘सोन्नलगी’ आणि त्या नंतर सोलापुर झाले. आर्यभट्ट, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि ब्रहण्मणी असे कित्त्येकांनी राज्य केले. यादवांचे राज्य असे पर्यंत याला ‘सोन्नलगी’ म्हंटले जायचे. नंतरच्या काळात त्याचे ‘सोलापुर’ मध्ये रुपांतर झाले.

सोलापूर शहरापासुन ३० किमी अंतरावरील मोहोळच्या जवळ असलेल्या कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत लेखात असा उल्लेख आहे की, यादतवांच्या उतरत्या काळात याला ‘सोनलिपुर’ म्हंटले जायचे. सोलापुर किल्ल्यात सापडलेल्या दोन शिलालेखात दोन वेगे वेगळ्या नावांचा उल्लेख आहे. एका लेखात ‘सोनालपुर’, तर दुसर्‍या लेखात ‘संदालपुर’ म्हंटले जायचे. नंतर ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी याचे ‘शोलापुर’ केले, आणि नंतर त्याचे आजच्या नावात म्हणजे ‘सोलापुर’त रुपांतर झाले.

सध्याचा सोलापुर जिल्हा हा अहमदनगर, पुणे आणि सातार्‍याचा भाग होता. १८३८, १८६४, १८७१, १८७५ आणि १९५६ अश्या विभागण्या होत होत १९६० मध्ये सध्याचा सोलापुर तयार झाला. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत.

सोलापूर म्हणलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि ग्रामदेवता आई रुपाभवानी ! खरेतर सच्चा सोलापूरकर सोलापुरला सिद्धेश्वर नगरी म्हणुनच ओळखतो, मग त्याचं मुळचं जुनं नाव सोन्नलगी असलं तरी. खुप पुर्वी साधारण १२ व्या शतकात सिद्धेश्वर नामक भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होवून श्री शिवशंकराने त्यांना दर्शन दिले. त्या नंतर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात अनेक ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केली. त्यापैकी पहिलं स्थान म्हणजे भुइकोट किल्ल्याच्या मागे तळ्यात वसलेलं श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदीर. सिद्धेश्वर यांनी स्थापना केली, म्हणुन इथे शिवालाही सिद्धेश्वर याच भक्ताच्या नावाने ओळखले गेले. श्री सिद्धेश्वर महाराजांनी पुढे जिवंत समाधी घेतली. सिद्धेश्वर मंदीरातच त्यांची संजिवन समाधी आहे. सोलापूरात मध्यवर्ती असलेलं श्री सिद्धेश्वराचं देखणं, मनोहारी आणि भर गर्दीत देखील नेहमी शांत असणारं मंदीर हा सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा विषय असतो. एका भव्य जलाशयाच्या (तळ्याच्या) मधोमध असलेलं सिद्धेश्वराचं रम्य आणि निसर्गसुंदर देवस्थान हे सोलापूराचं शक्तीस्थळ आहे असं म्हटलं तरी त्यात गैर काही नसावे. सिद्धेश्वर मंदीराला लागुनच असलेला सोलापूरचा भुइकोट किल्ला आता फक्त “इमारत कभी काफी बुलंद हुआ करती थी” एवढं सांगण्याच्याच पात्रतेचा उरलेला आहे. आता किल्ल्यात महानगरपालिकेने बाग केलेली आहे. अर्थात आज तीदेखील कधी काळी खुप सुंदर होती असे म्हणायची वेळ आलेली आहे.

मार्शल लॉ

उगवत्या मराठी साम्राज्याची जेव्हा इंग्रज चर्चा करीत होते  तेव्हा त्या निवडक जिल्ह्यांमध्ये त्यांनी सोलापूरचाही समावेश केला होता. त्यात शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरने इंग्रजांना लढा दिला. १९व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे मध्यमवर्गीय लोकांमध्ये राजकीय आणि सामजिक जाणीवा वाढीस लागल्या होत्या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर न्या. रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी भारावून गेले होते. १९२० मध्ये जोमाने पसरलेल्या राष्ट्रीय चळवळीचा परिणाम सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्येही दिसून आला.लोकमान्य टिळकांनी १९२० मध्ये सोलापूरात दिलेल्या भाषणाचा हा परिणाम म्हणुन पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता..

गिरणी कामगारांची सरकार आणि भांडवलदारांविरुद्धची चळवळ जोर धरू लागली .यात ७ कामगार मृत्युमुखी पडले तर शेकडो जखमी झाले. गिरणी कामगारांनी केलेला हा हरताळ ही देशातल्या महत्त्वपूर्ण क्रांतीची नांदीच होती. १९३० मधील गांधीजींच्या दांडीयात्रेनंतर <strong>६ एप्रिल १९३० रोजी सोलापूरातील म्युनसिपल कॉर्पोरेशन एक बिल संमत केले आणि राष्ट्रीय ध्वजाचे रोहण करण्यात आले</strong>. या घटनेनंतर सोलापूरात जे काही घडले  ते इतिहासात सुवर्णाक्षरात लिहून ठेवले गेले आहे. ५ मे १९३० रोजी मध्यरात्री गांधीजींना अटक करण्यात आल्याची बातमी सोलापूरात पसरली. या विरोधात जनतेने मोर्चे काढले, देशभक्तीपर गीते गायिली. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा गिरणी कामगार कामावर गेले तेव्हा त्यांनी ही बातमी ऐकताच याविरुद्ध निदर्शने केली. गिरण्या बंद झाल्या, जनतेने रेल्वे अडविल्या, डब्बे जाळल, शिंदीची झाडे पाडली. यात मॅजिस्ट्रेट जखमी झाले, पोलिस स्टेशन जाळले. परंतु सायंकाळी सगळ्या नेत्यांनी शांततेचा मार्ग अवलंबायचे असे ठरविले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

८ मे १९३० रोजी सरकारने बजाज आनि नरीमन यांना अटक केली. नरीमन युवकांचा लाडका नेता होता.जनतेने या घटनेचा तीव्र निषेध केला. जगन्नाथ सिंदे आनि कुर्बान हुसेन यांनी या प्रिय नेत्यांच्या छायाचित्रांची मिरवणूक काढण्याचे ठरविले. आणि त्यांनी तसे केलेही. काही युवक शहरातील रुपाभवानी भागात शिंदीची झाडे पाडण्यास गेले. हे पोलिसांना कळताच त्यांनी गोळीबार सुरु केला. जेव्हा पोलिसांच्या गोळ्या संपल्या तेव्हा लोकांनी त्यांना पकडून त्यांच्या दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लोकनेते मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले आणि त्यांनी जनतेला शांत केले व कलेक्टर नाईटना लोकांच्या तावडीतून सोडविले. पण या गोष्टीची जराही जाणीव न ठेवता पोलिसांनी जनतेवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यात कितीतरी बायका मुले म्रुत्युमुखी पडले. तेथे शंकर शिवधर नावाचा नेता मृत्युमुखी पडला आणि तोच पहिला हुतात्मा ठरला. हे सगळे पाहून जनतेने सरकारी कार्यालये पेटविली, सरकारी कर्मचार्‍यांवर द्गडफेक केली. या सगळ्याकडे नाईट यांनी दुर्लक्ष केले. जेव्हा सगळे शांत झाले पोलिसांनी त्यांच्या गाड्यांमधून गोळीबार सुरु केला. दुपारी १२ ते संध्याकाळी ७ पर्यंत पोलिसांनी शहराच्या प्रत्येक गल्ली बोळांमधून गोळीबार केला. यात ५० निष्पाप जीवांचा बळी गेला.ह्या घटनेची सविस्तर माहिती रामभाऊ राजवाडेंच्या “कर्मयोगी” या साप्ताहिकात मिळेल(१० मे १९३०). या घटनेने संपूर्ण इंग्रज साम्राज्य हादरून गेले होते. मिनी जालियानवाला घटनेची छोटी आवृत्ती म्हणून ओळखल्या जाणारी सोलापूर मार्शल लॉ चळवळ हे संपूर्ण स्वातंत्र्य लढय़ातील एकमेव उदाहरण आहे. परंतु तरीदेखील त्याची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नाही.

या सगळ्या प्रकारामुळे  भयभीत झालेली जनता सोलापूर हे सुरक्षित ठिकाण नाही असे मानून सोलापूर सोडून स्थलांतरीत झाली. जवळ जवळ २५००० लोक सोलापूर सोडून निघून गेले.या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय नेत्यांनी सोलापूरला स्वतंत्र घोषित केले. ३ दिवस सोलापूर स्वतंत्ररित्या कार्यरत होते. स्वतःच्या यंत्रणेखाली जखमींची देखभाल केली गेली.सगळे अगदी स्वतंत्र निर्भीड!!  अगदी अश्याच प्रकारची घटना १९७१ मध्ये पॅरीस मध्ये घडली. निवृत्त पोलिस अधिकारी इमाम शेख यांच्या मदतीने नाईटने सोलापूरची क्रांती चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक द्वेषापोटी खानने सोलापूरात मार्शल लॉ लागू केला. अश्या तर्‍हेने महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूरात मार्शल लॉ लागू झाला..

संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात १९३० साली एकमेव सोलापुरात मार्शल लॉ लागु झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच यात सोलापूरच्या बहाद्दर जनतेने इंग्रज सरकारला हाकलून देऊन ९, १० आणि ११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. त्या वेळी सोलापूर नगरपालिकेवर युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला होता.

मार्शल लो असताना सोलापुरात राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यात आली होती. राष्टनेते श्री. व्ही.व्ही. साठे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रध्वजासमेत सोलापुरात आले. त्यांना स्टेशनवरच अटक झाली. त्यानंतर या झेंडा सत्याग्रहासाठी सम्पूर्ण देशभरातून लोक सोलापुरात येवून दाखल होवून लागले. सरतेशेवटी स्वतः गव्हर्नर मुंबईहून येथे आले. व त्यांनी पाहाणी केली. नंतर ३० जून १९३० या दिवशी तब्बल ४८ दिवसांनी सोलापुरातील मार्शल लो मागे घेण्यात आला. कोर्टाला आग लावल्या प्रकरणी १८ ऑक्टोबर१९३० रोजी निकाल देण्यात आला. जगन्नाथ परदेशी, छन्नूसिंग चंदेले, डॉ. अंत्रोळीकर या तिघांना दोषी ठरविण्यात आले.

या घटनेचा सूड उगवण्यासाठी पुण्यात वासुदेव गोगटे याने हॉटसनवर हल्ला केला. पण चिलखतामुळे हॉटसन वाचला. त्याला या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले असता त्याने ,” ब्रिटीश सरकारच्या सोलापुरातील अमानुष कृत्याचा निषेध म्हणून मी हे केले” असे सांगितले. अशा प्रकारे सोलापुरातील मार्शल लो भारताच्या स्वातंत्र लढ्यातील एक महत्वाची घटना होती.

सोलापूरातील हा पहिलाच मार्शल लॉ असल्याने जनतेला बरेच सहन करावे लागले.गांधी टोपीवर बंदी घालण्यात आली, लोकांना निर्दयपणे मारण्यात आले, म्युनिसिपल प्रमुख माणिकचंद शहा यांनी राष्ट्रध्वज काढण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.पोलिसांनी धनशेट्टी,सारडा, हुसेन, शिंदे यांची धिंड काढली.या चौघांना पुण्याच्या सेशन कोर्टाने ८ मे १९३० रोजी झालेल्या पोलिसाच्या मृत्युसंदर्भात  दोषी ठरवून  मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश काढला.खरेतर यात या चौघांची काहीच चूक नव्हती. फासावर चढताना ते जयहिंद, वंदे मातरम ई.नारे देत फासावर चढले. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या ब्रिटीशांनी ४ निष्पाप लोकांचा बळी दिला. पुण्यात या विरोधात बरीच निदर्शने झाली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सर्व भागातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनी देखील लंडन टाईम्स मध्ये या घटनेचा निषेध केला.

त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

१. मल्लप्पा धनशेट्टी: “पेंढारकर” पेढी मध्ये कारकून म्हणून कार्यरत.यांनी नाईटचा जीव वाचविला.
२. जगन्नाथ शिंदे: युवानेता, अप्रतिम वक्तृत्वशैली. मिलिटरी लॉ अंतर्गत शिक्षा झाले.
३. किसानलाल सारडा: श्रीमंत मारवाडी. खरेतर राजकारण, समाजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हिंदू समाजाचे सुदृढीकरण केले.
४. कुर्बान हुसेन:  गिरणी कामगारांचा लाडका युवा नेता. हिंदु मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील.

या घटनेनंतर या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे वेगवेगळ्या जाती-धर्माचे चार देशभक्त फासावर गेले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांचे पुतळे पूर्वीच्या कामगार बागेजवळ व सध्याच्या पार्क स्टेडियमजवळ उभारण्यात आले आहेत. चार हुतात्मा चौक म्हणून हा परिसर ओळखला जातो. हे चार हुतात्मे तरूणांसाठी स्फूर्तिस्थाने आहेत. येथे आल्यानंतर तरूणांमध्ये वीररस निर्माण व्हावा म्हणून या चार हुतात्मा पुतळ्यांचे दिमाखदार स्मारक निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रपुरूषांचे स्मृती सर्वासाठी स्फूर्तीदायी असतात. मार्शल लॉमधील चार हुतात्म्यांचे हे पुतळे आम्हा सोलापूरकरांसाठी मानबिंदू आहेत.

सोलापूरची खादगी..

मुळचा सोलापूरी माणुस अस्सल खवैय्या आहे. आम्ही आमच्या पुरती मराठीतली एक म्हण मॉडीफाय करुन घेतलेली आहे. आम्ही म्हणतो “चवण्याचे खाणार त्याला सोलापुरकर देणार

आमच्या सोलापूरच्या शेंगांची बातच काही वेगळी. त्यामुळे ईथल्या शेंगाची चटणी, शेंगा पोळ्या आणि ठेचा खूपच प्रसिद्ध् आहे. तेल न घालता सुद्धा तेलकट, लालबुंद असुन सुद्धा कमी तिखट, जाड्या भरड्या अश्या शेंगाच्या चटणीची बातच काही और. इतक्या सुंदर चवीचे घटक पण फक्त मोजकेच, भाजक्या शेंगा ,तिखट,मीठ,जीरे आणि लसूण. सगळे जिन्नस एकत्र करुन ऊखळात कुटले की झाली शेंगा चटणी तयार. ह्याशिवाय संक्रांतीच्या दिवसात शेंगाचाच अजून एक केला जाणारा लै भारी प्रकार म्हणजे शेंगा पोळी. सोलपुरच्या पदार्थांची खासियत हीच की कमीत कमी घटक वापरुन चवदार पदार्थ करायचा. त्याप्रमाणे शेंगा +गूळ एकत्र करुन कुटायचा आणि कणकेच्या पारीत हे सारण घालून पातळ अशी पोळी लाटून तगड या एका वेगळ्या प्रकारच्या पत्र्यावर लाटायच्या आणि तव्यावर खरपूस भाजायची आणि नंतर तूप लावून खायची……स्वर्गसुख म्हणजे आणखी काय !!!!(ताटातील पदार्थ (डावीकडून सुरुवात): दही शेंगाचटणी, शेंगापोळी, बाजरीची कडक भाकरी. तिखट आमटी. भरली वांगी, गरगट्टा)(ताटातील पदार्थ (डावीकडून सुरुवात): दही शेंगाचटणी, शेंगापोळी, बाजरीची कडक भाकरी. तिखट आमटी. भरली वांगी, गरगट्टा)

पोळी तर झालीच पण भाकरी आणि तत्सम प्रकरांमध्ये सुद्धा आम्ही फेमस आहोत. पुरीसारखी टम्म फुगलेली ज्वारीची कडक पण तरीही कागदासारखी आणि कागदाएवढी पातळ भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि दही ! बास्स…. कुठलाही सोलापुरकर काय किंवा एकदाच चव चाखलेला बाहेरगावचा माणुस काय, कुणीही ही चव विसरणार नाही. बरं भाकरीची पद्धत ही नेहमीच्या भाकरीं सारखीच फक्त भाजून झाल्यावर चुलीच्या मागे ठेवायची. पद्धत जरी तीच असली तरी चव मात्र फक्त आमच्या सोलापुरातच. अशीच संक्रांतीच्या दिवसात केली जाणारी तिळ लावुन केलेली बाजरीची भाकरी . हे सगळे लिहताना आता कधी एकदा संक्रांत येतेय असे झाले आहे. भाकरीचाच अजून एक प्रकार म्हणजे धपाटे. ज्वारीच्या पिठात तिखट,मीठ, ठेचलेला लसूण,हळद, हिंग घालून एखाद्या कापडावर पातळ थापून भाजलेला प्रकार तो हाच.

भाकरीचे प्रकार झाले आता तोंडी लावायला काहीतरी हवेच. काहीतरी म्हणजे काय तर एक साधा, सोप्पा पदार्थ तो म्हण्जे मिरचीचा खर्डा/ठेचा. ईतर प्रकारांप्रमाणेच अगदी मोजकेच घटक वापरले जातात. प्रथम एका तव्यावर सर्व साधारणपणे भाकरी करून झाल्यावर त्याच तव्यावर मिरच्या व लसूण तेल टाकून ठेवायच्या. नंतर त्याच्यात अक्खे शेंगदाणे व मीठ घालून वाटीने तव्यावरच ठेचायचा (कच्चे टमाटेही मऊ परतुन घालु शकता). झाला ठेचा तयार.

ह्या पारंपारिक पदार्थाबरोबरच चाट प्रकारातही आम्ही मागे नाहि आहोत्.पुण्या-मुंबईतल्या सारखी गरम व २-३ प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्यांची पाणीपुरी नाही तर एका पाण्यातच आंबट, तिखट, गोड चवीची एकदम थंडगार अशी पाणीपुरी खायची तर एकदा सोलापुरात ‘पार्क’ ला भेट द्याच. हे पार्क म्हण्जे बाग नाही बरंका.. तर ही आहे सोलापुरची चौपाटी. इथलाच अजून एक पदार्थ “भैय्या ची भेळ”, “अनेकात एक आमचाच भैय्या” हे त्याच्या भेळेच्या गाडीवर लिहीलेले वाक्य तो खरे करून दाखवतो आणि एक प्लेट खाऊन पोट भरते पण मन काही भरत नाही.

शाकाहारी खादाडी :

चार पुतळ्यासमोरचे हॉटेल सिटी पार्क, हॉटेल ऐश्वर्या, टिळक चौकातले श्री दत्त इडली गृह, सोलापूर बस स्टँड समोरचे सोलापुर इडली गृह, सुप्रजाची पावभाजी आणि लांबोटीचा खुसखुशीत आणि झणझणीत मक्याचा चिवडा, भाग्यश्रीचा खमंग चिवडा आणि मुंबईच्या जंबो वडापावच्या तोंडात मारेल असा झकास भाग्यश्री वडा, नव्या पेठेतली आण्णाची मिरची भजी, पांचाली, रसिक सारखी गुजराथी हॉटेल्स, सात रस्त्यावरची सिद्धेश्वरची भेळ आणि महादेवची डिस्कोभजी ही सोलापूरच्या शाकाहारी मंडळींची आवडीची ठिकाणं ! याचबरोबर सोलापूर – पुणे रोडवरीला सिद्धेश्वर, हॉटेल अविराज, नसले बंधुंचे हॉटेल ही देखील काही चांगली हॉटेल्स…

मांसाहारी मंडळींसाठीदेखील बरीच ठिकाणे आहेत बरंका….
पण फेमस म्हणाल तर ‘सावजी’ची सगळी मांसाहारी हॉटेल्स, एंप्लॉयमेंट चौकातलं ‘सावजी बिर्याणी’ आणि हैदराबाद रोडवरचा ‘चाचा’चा धाबा ! इथलं मटणाचं लोणचं खायला लोक कुठुन कुठुन येत असतात. विजापूर वेशीतली कित्येक हॉटेल्स खास मोगलाई आणि हैदराबादी पद्धतीच्या सामिष जेवणासाठी लोकप्रिय आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिटी पार्क सारखी जरा मोठी हॉटेल्स सोडली तर खादाडीची बहुतेक सगळीच ठिकाणं सर्वसामान्याच्या खिश्यालाही परवडणारी.

आमच्या सोलापुरात आणी आजुबाजुला पहाण्या सारखंही खुप आहे. दोन ते तीन दिवसात सारं फिरुन होईल. आता सोलापुरातच पहा ना इथे पार्क, भुईकोट किल्ला, श्री सिद्धेश्वर देउळ, पार्क, कंबर तलाव वगैरे तर आहेतच, पण शेजार पाजारची ठिकाणं म्हणाल तर तुळजापुर, अक्कलकोट, नळदुर्ग, पंढरपुर सुद्धा आहेत. सारं कसं हातभर अंतरावरचं आहे बघा.

(सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज, डावीकडून: आई तुळजाभवानी, आजोबा गणपती, सिद्धेश्वर महाराजांची योग समाधी, उजवीकडे: श्री मल्लिकार्जुन)

(कंबर तलाव, नळदुर्ग किल्ला (नर मादी धबधबा), सिद्धेश्वर तलाव, उजवीकडे : १५ ऑगस्टला भुईकोट किल्ल्यावर फडकवलेला झेंडा, इंद्रभुवन (सोलापूर महानगरपालिका), चार हुतात्म्यांचे अर्धपुतळे)

सोलापूरची कधी आशिया खंडाचे मँचेस्टर ही ओळख होती. पण आता ही ओळख बदलतेय. दुर्दैवाने पुसली जातेय. लक्ष्मी विष्णु, नरसिंग गिरजी, जुनी मिल या सोलापूरची शान असलेल्या टेक्स्टाईल मिल्स आता बंद पडल्या आहेत. तिथे त्या जागांवर बिल्डर माफियाचा कब्जा होतोय. पुर्व भागात अजुनही तशा बर्‍याच समृद्ध मिल्स आहेत. पुलगम, चिल्का, क्षीरसागर, चाटला आणि पुर्व भागातील साळी (पद्मशाली) बांधवाच्या घरा-घरातून चालणारे पॉवरलुम्स, हँडलुम्स आजही चालतात. सोलापूरातून आजही चादरी, बेडशीट्स, टॉवेल्स जगभर निर्यात होतात. परमेश्वर करो आणि माझ्या या सिद्धेश्वरनगरीला तिची जुनी ओळख पुन्हा प्राप्त होवो.

आमच्या काही खास सोलापुरकरांची नावे :

स्वातंत्र्य सैनिक :
जगन्नाथ शिंदे, मल्लपा धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणी किसन सारडा.
तुलसीदास जाधव, चंद्रशेखर म्हमाणे, शंकरराव मोहिते-पाटील, माने गुरुजी.

शंकर राव मोहिते पाटील हे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर सहकार चळवळीचे मुख्य नेते होते. त्यांनी सोलापुर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी सहकार चळवळ सुरु केली.

चित्रपट सृष्टी :
डॉ. जब्बार पटेल( चित्रपटः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा,  नाटकः शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल्,अशी पाखरे येती)
शशीकला(मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू)
सरला येवलेकर
अतुल कुलकर्णी
वेदिका कुमार(तामीळ, तेलुगु , कानडी चित्रपटांतील नायिका)
फय्याज (गायीका, अभिनेत्री)
दिपक देशपांडे (पहिला हास्य सम्राट)

राजकीय व्यक्तिमत्त्व
सुशीलकुमार शिंदे (युनोमध्ये भारताचे पहिले नेतृत्व)

कलाक्षेत्र 
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वादग्रस्त चित्रकार कै. एम.एफ हुसेन
शिल्पकार भगवान रामपुरे (मुंबईतील स्टॉक एक्स्चेंजसमोर उभ्या असलेल्या ‘बुल’ चे निर्माते)

नामांकित व्यावसायिक
वालचंद हिराचंद दोशी: २३ नोव्हेंबर १८८२ ते ८ एप्रिल १९५३ भारतात सर्वप्रथम आधुनिक बंदर, विमान निर्माण आणि कार तयार करण्याचा कारखाना यांनी सुरु केला

क्रीडा क्षेत्र
सलील अंकोला : १९९६च्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या भारतीय संघात समावेश,
पॉली उम्रीगर – क्रिकेटपटू
अनघा देशपांडे- महिला क्रिकेट पटू

साहित्यिकः
राम जोशी
कवी कुंजविहारी
रा.ना. पवार
श्रीराम पुजारी
डॉ. निर्मलकुमार फडकुले
कवी संजीव
दत्ताहलसगीकर                                                                                                                                                                                                                                        मारुती चितमपल्ली

संगणक क्षेत्रातील महत्वाचे नाव : अच्युत गोडबोले.

अजुन काय काय आहे आमच्या सोलापुरात ?

सोलापूरातील महत्वाच्या शिक्षणसंस्था

वालचंद इंन्स्टिट्युट ऑफ़ टेक्नॉलॉजी
शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर
एस.ई.एस. तंत्रनिकेतन, सोलापुर
कॉलेज ऒफ़ आर्किटेक्चर, सोलापुर
कॊलेज ऑफ़ फ़ार्मसी, सोलापुर
डी.बी.एफ़. दयानंद कॉलेज ऑफ़ आर्ट्स & सायन्स, सोलापूर
डीजीबी दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर
दयानंद कॉलेज ऒफ़ एज्युकेशन, सोलापूर
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ़ कॉमर्स, सोलापूर
प्रि. के.पी. मंगळवेढेकर कॉलेज ऑफ़ मॅनेजमेंट रिसर्च & डेव्हलपमेंट, सोलापुर
संगमेश्वर कॉलेज, सोलापुर

ही झाली महत्वाच्या काही महाविद्यालयांची यादी. संपुर्ण यादी इथुन उतरवून घेता येइल.

आमचे प्रसिद्ध पदार्थ
पाणीपुरी
शेंगाचटणी
हुरडा
ज्वारीची, बाजरीची भाकरी
ठेचा/खरडा
सावरकर मैदानाजवळचं झणझणीत रगडा पॅटीस एकदा चाखायलाच हवं…

आमचे खाऊचे अड्डे
पार्क(पाणी पुरी, भेळ, कचोरी)
सुप्रजा(पावभाजी हुतात्मा बागेजवळ)
इडली गृह(इडली द. कसबा)
कृष्णा(आईसक्रीम- सात रस्ता)
कामत हॉटेल(चहा जुना एंप्लोयमेंट चौक)
हॉटेल सिटी पार्क(पार्क)
नसले ढाबा(पुणे हायवे)
चंद्रबळ(पुणे हायवे)

आमच्या बागा
राणीची बाग (विजापूर रोड)
किल्ल्याची बाग(लकी चौक)
संभाजी तलाव(कंबर तलाव विजापूर रोड)
रेवणसिद्धेश्वर प्राणीसंग्रहालय (विजापूर रोड)
हुतात्मा बाग(सावरकर मैदान)
चार पुतळे(पार्क)

आमची देऊळे
श्री सिद्धेश्वर मंदिर
श्री मल्लिकार्जुन मंदिर
श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर
श्री राघवेंद्र मंदिर
रुपाभवानी मंदिर
आजोबा गणपती
गजानन महाराज मंदिर
साईबाबा मंदिर

आमची ग्रंथालये
हिराचंद .नेमचंद वाचनालय

भारत वाचनालय, नवी पेठ (सर्व प्रकारच्या शैक्षणीक (पदवीच्या सर्व शाखा तसेच अभियांत्रिकीच्या पुस्तकांसाठी)

आमची प्रेक्षणीय स्थळे
चार हुतात्मा स्मारक
भुइकोट किल्ला
हिप्परगा तलाव
महानगर पालिका भवन

आमची चित्रपटगृहे
आशा
उषा
मीना
चित्रा
प्रभात
गेंट्याल
लक्ष्मी(७० मीमी)
कल्पना
कलामंदिर

भागवत चित्रमंदीर (जेव्हा उर्वरीत महाराष्ट्राला कदाचित भारताला सुद्धा मल्टीप्लेक्स ही संकल्पनाही माहीत नव्हते तेव्हापासुन आमच्या सोलापुरात सहा स्क्रीन्स (सिनेमागृहे) असलेलं भागवत चित्रपटगृह संकुल अस्तित्वात आहे 🙂

भेट देण्याजोगी जवळपासची ठिकाणे

पंढरपूर
तुळजापूर
अक्कलकोट
विजापूर(गोलघुमट)
गाणगापूर
हत्तरसंग  कुडाल
नळदुर्ग

निंबाळ येथील गुरुदेव रानडेंचा मठ

तर मंडळी  असं आहे आमचं सोलापुर….

यावं मंडळी, यावं आपण सोलापुराला
इथे येवूनी नतमस्तक व्हा सिद्धेश्वराला
कुडल खजिना किल्ला साक्ष आमच्या इतिहासाला
हुतात्म्याच्या गावी या जरा विसाव्याला,

यावं एकदा संक्रांतीच्या गड्ड्याला,
फिरणाया झोपाळ्याला, शोधनाया पन्नालाला,
भेळ, पाणीपुरी, पाव-भाजी, रगडा, पार्क चौपाटीला.
अन आत्मा तृप्त करणाया ’कृष्णा’ला.

शाल मायेची चादर घ्या या चाटला पुलगमला,
संध्याकाळी फेरफटका मीना, भागवतला,
रात्रीला बेत नक्की सावजी हाटेला.

गोड मानुनी घ्यावे आमच्या पाहुणचाराला
हातभार लागे मग आमच्या विकासाला.
एवढ्या माहीती वरुन एकदा तरी सोलापुरला चक्कर मारावं वाटेलच तुम्हाला यात शंका नाही. आणी हो, या व्यतिरीक्त अजुन काही माहीती हवी असेल तर आम्हास संपर्क साधायला विसरु नका.

तर मग कधी करताय बेत सोलापुरचा…..  ?

———————————————————————————————————
———————————————————————————————————
पुर्ण पोवाडा तुम्हाला <a href=”https://docs.google.com/file/d/0BwCHY6Ve_4hITDlOM1QtODBuV0k/preview&#8221; title=”सोलापूरनगरीचा पोवाडा”>इथे</a> वाचता येइल आणि <a href=”https://docs.google.com/open?id=0BwCHY6Ve_4hIOGdqdGhLQjNMQWc&#8221; title=”सोलापूरनगरीचा पोवाडा”>इथे</a> डाउनलोड करुन ऐकता येइल.
———————————————————————————————————
———————————————————————————————————
श्रेयनामावली
१. सौ. राजेश्वरी आपटे
२. श्री. रोहित आपटे
३. गायन- कु. श्रुती विश्वकर्मा , तबला- श्री. मुकुंद दातार, संकलन- सौ. दिपाली दातार
४. प्रा. मोहिनी पिटके
५. श्री. सु. ना. मित्रगोत्री
६. सौ. तेजस्विनी करकंटी

आम्ही सोलापूरकर !!