Category Archives: माझी फ़ोटोग्राफी

मी घेतलेली छायाचित्रे

पायवाटा जाग्या झाल्या …

पुलंच्या कुठल्यातरी प्रवासवर्णनात (बहुतेक ‘पूर्वरंग’च असावे) एका ठिकाणच्या निसर्गाचे वर्णन करताना पु.ल. म्हणतात…

उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात….
असल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत , उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मीती या असल्याच चालण्यातून झाली असावी.

हे अचानक आठवण्याचं कारण म्हणजे ‘पायवाटा’, मायबोलीकर हर्पेनच्या कृपेने भेटलेल्या अनेक देखण्या आणि बोलक्या पायवाटा. म्हणजे बघा २०१३ मध्ये हर्पेनने काही प्रचि टाकले होते माबोवर… तळजाई टेकडीवरच्या जंगलाचे. अर्थात हर्पेनने टाकलेले फोटो ऐन पावसाळ्यातले होते, त्यामुळे हिरवेगार होते. आल्हादक होते. तेव्हाच ठरवले होते की एकदा का होइना तळजाईच्या जंगलाला भेट द्यायची. पण पायी घरापासून अवघ्या ५-१० मिनीटाच्या अंतरावर असलेल्या तळजाईला जायला मला २०१४ उजडावे लागले. मी गेलो ते सुद्धा नेमका उन्हाळ्याच्या दिवसात. त्यामुळे हर्पेनने पाहिलेली तळजाई आपल्याला दिसेल का ? असा प्रश्न , शंका मनात होती. पण प्रत्यक्षात तळजाईच्या जंगलात फिरताना असं जाणवलं की असं काही नसतं हो. निसर्ग “तुमच्या डोळ्यात” असतो. सौंदर्य तुमच्या नजरेत असतं. आणि मग तळजाईच्या प्रेमात पडलो. ऋतुंचे भेद जाणवणं डोळ्यांना कळेनासं झालं ….

मग त्यानंतर प्रत्येक शनीवार-रवीवार सकाळी-सकाळी उठून तळजाईला जाणे आणि दोन तीन तास मनसोक्त भटकणे हे नित्याचेच होवून बसले. त्यामुळेच जेव्हा हा धागा टाकायचा असे ठरवले तेव्हाच हे ही ठरवले की हिरवीगार तळजाई, पावसाच्या दिवसातली तळजाई हर्पेनने दाखवलीय, आपण जरा पावसाळ्याच्या प्रतिक्षेतली तळजाई दाखवुयात. कस्सें..?

हळुहळू नवी पालवी फुटतेय झाडांना. नवे अंकूर फुटताहेत. पण हिरवाईचा प्रसन्न, देखणा आविष्कार अजून लांब आहे. त्यातही तळजाईचे हे जंगल म्हणजे वैविद्ध्याचा आणि वैचित्र्याचा एक देखणा अनुभव आहे असे म्हणले तर ते गैर ठरु नये. इथे एकाच वेळी तप्त ग्रीष्माने त्रस्त शुष्क जंगलही दिसते आणि त्याचवेळी हिरवाईचा साज ल्यालेली, पशुपक्ष्यांनी , त्यांच्या किलबिलाटाने भरलेली मनोरम वनराणीही जागोजागी भेटत राहते.

Please click on the pics to see full screen view.

प्रचि १

सगळीकडे शुष्क, तप्त ग्रीष्माचे साम्राज्य. अधुनमधुन नकळत डोकावणारी किंचीतशी हिरवळ. पण शुष्कतेतही एक निराळेच रौद्र सौंदर्य असते हे मला या जंगलाने शिकवले.

प्रचि २

या शुष्क, कंटकमयी रस्त्यातून पुढे जात नव्या वाटा शोधायचे वेड मला कधी लागले ते कळालेच नाही. मग मी रुळलेले रस्ते सोडून जंगलातल्या अनवट पायवाटा शोधायला सुरूवात केली. गंमत म्हणजे या काटेरी मार्गावरच पुढे हिरवाई स्वागताचे, आमंत्रणाचे ध्वज घेवून सहर्ष उभी राहिलेली आढळली.

प्रचि ३

प्रचि ४

या वर्षी बहुदा वसंताची चाहूल थोडी लवकरच लागली. आपल्यालाही आणि त्या जंगलालाही. जिथे इतके दिवस काटे-कुटे, शुष्क गवत, सुकलेले बुंधे पाहायची सवय लागली होती तिथे आता हिरवाईची तोरणे दिसायला लागली. अर्थात अजून पावसाला वेळ आहे. पण त्याच्या भेटीतली आतुरता निसर्गाच्या विविध छटांमध्ये दिसायला लागलेली आहे.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

पुलदे म्हणतात त्याप्रमाणे पाऊलवाटा खरोखर माणसाला अंतर्मुख करतात हो. मुळात तुम्ही एकदा का पायाखालचा रुळलेला रस्ता सोडून पायवाटेवर उतरलात की आपोआपच एक प्रकारची धडधड, हुरहूर सुरू होते. मग अगदी त्या पायवाटासुद्धा रोजच्या सरावातल्या असोत वा पुर्णपणे नव्याने भेटणार्‍या असोत. कारण पायवाट ही कायमस्वरूपी नसते हो. ती सीतेसारखी स्थीर एकपतीव्रता मुळीच नसते, तर एखाद्या,नुकत्याचा तारुण्याता पदार्पण केलेल्या कायम नाविन्याचे वेड, उत्सुकता असलेल्या अवखळ, मनस्वी चंचलेसारखी असते. तिला रोज भेटणार्‍या अनेक चाहत्यांसवे ते नेतील तिकडे ती जात राहते आणि ती जाईल तिकडे तिचे वेडे दिवाणे येत राहतात, जात राहतात.

प्रचि ११

प्रचि १२

मला कधी-कधी कंटाळा येतो पायवाटा शोधत फिरण्याचा. मग मी काही दिवस नुसताच रुळलेल्या रस्त्याने तळजाईच्या जंगलात फिरायला येणारे लोकांचे थवे बघत, तर कधी एकटाच त्या वाटांवर मनमुराद हिंडत राहतो.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

इथे तसे फिरायला येणारे बरेच जण असतात, तरीही तुमचा एकांत, तुमची प्रायव्हसी भंग होत नाही.
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

पण हे नेहमी जमेलच असे नाही. कारण जंगल हे निळावंतीसारखे असते. जितके आत-आत, पुढे-पुढे जात राहाल तसतसे ते तुम्हाला अधिकाधीक मोहात पाडायला लागते. स्वतःच्याही नकळत आपण त्या इंद्रजालात फसत, अडकत जातो.

प्रचि २२

प्रचि २३

त्या दिवशी माझ्या बाबतीत असेच झाले. रुळलेल्या वाटांवरून फिरता – फिरता नकळत जंगलात , आत शिरलो आणि त्यांच्या इंद्रजालात अडकलो झालं…

प्रचि २४

चांगला नेहमीचा, पायाखालचा रस्ता सोडून जंगलाच्या अंतर्भागात शिरलो. त्या दिवशी थोडा लवकरच आलो होतो. तीन-चार किलोमीटर चालल्यावर मध्येच अचानक अंतर्भागात शिरलो. भास्कररावांच्या येण्याची वेळ झालेली होती किंवा कदाचित हजेरी लावली होतीसुद्धा त्यांनी. कारण जंगलाच्या त्या दाट, दुर्गम झाडीतही त्यांच्या अस्तित्वाचे दाखले मिळतच होते.

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

थोडीशी भीतीही वाटायला लागली होती. कारण एकतर फिरायला येणार्‍यापैकी त्या भागात कोणी दिसायला तयार नाही. त्यात जंगल अगदी दाट. पुढे जावे तर रस्ता सापडेना, मागे यावे तर पुढं जे काही दिसत होतं ते स्वर्गसुख अर्ध्यातच सोडून यायलाही जीव मानेना. शेवटी जिवाचा हिय्या करून तसाच चालत राहीलो त्या शुष्क, काळवंडलेल्या काटेरी जंगलातूनी पुढे-पुढे सरकत राहीलो. अचानक एके ठिकाणी अंधार संपला आणि जणु काही प्रकाशाकडे जाणारी पायवाट समोर उभी ठाकली.

प्रचि २७

त्या वाटेवरून तसाच पुढे सरकत राहीलो. जंगलातले रुळलेले, रहदारीचे रस्ते मागे सोडलेले असल्याने नक्की कुठे आहोत हे कळत नव्हते. पण समोर उगवतीचा भास्कर दिसत असल्याने आपण पूर्वेकडे म्हणजे ‘अरण्येश्वर’ आणि सहकार नगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दिशेने जातोय हे कलून चुकले होते. त्यामुळे जरासा निर्धास्त झालो होतो. तर मध्येच एका ठिकाणी समोरचा रस्ताच बंद झालेला.

प्रचि २८

प्रचि २९

त्यातुन कसाबसा मार्ग काढून बाहेर पडलो आणि समोर जणुकाही, ” तुझ्या जिद्दीला सलाम रे मित्रा” असे म्हणत निसर्गरागाा फुलांच्या पायघड्या घालून स्वागताला सज्ज होता.

प्रचि ३०

हि तर निव्वळ सुरुवात होती. इथून पुढे स्वर्गसुखाचा अनुभव ललाटी लिहीलेला होता बहुतेक सटवाईने 🙂
अचानकच अंधार सरला आणि मित्र सामोरी आला, आपल्या तेजाची, पावित्र्याची जणू पताका नाचवीत आला.

रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

भान हरपल्यासारखी अवस्था झालेली होती. तर तो वेडा “देता किती घेशील दो कराने” म्हणत माझ्या ओंजळीत तेजाचे दान अगदी भरभरून टाकतच होता, टाकतच होता. सगळ्या दिशा उजळल्या होत्या. सगळीकडे प्रकाशच प्रकाश फाकला होता.

प्रचि ३४

प्रचि ३५

आणि ते अदभुत अनुभवत असतानाच अचानक लक्षात आलं की आपण नकळत जंगलातल्या मुख्य रस्त्याला येवून पोहोचलो आहोत आणि मी सुटकेचा श्वास टाकला. 🙂

प्रचि ३६

तळजाईच्या जंगलातल्या या प्रवासात पायवाटांच्या सोबतीने काही नेहमीचे सोबतीही सातत्याने भेटत राहतात.
उदा.

प्रचि ३७

प्रचि ३८ : म्हातार्‍या

प्रचि ३९

मग मंडळी, कधी द्यायची भेट तळजाईला ? फार नाही पण ज्यांना पहाटे उठणे शक्य आहे त्यांच्यासाठी सकाळी ५ ते १० इतका वेळ असतो आणि मला वाटते तो भरपूर आहे आपल्या छोटेखानी गटगसाठी.

मग…? या पावसाळ्यात जमायचं? एखाद्या पावसाळी सकाळी, तळजाईच्या साक्षीने ……

विशाल कुलकर्णी

निळाई…

माझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे पण आहे एवढं खरं…
मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं !

ग्रेसची एक कविता आहे… ‘निळाई’ !

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो? या ‘निळाई’च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम ‘ब्ल्यु पिरियड‘ या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी ‘कास’च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले ‘प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये? …. निळावंती ! आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची ‘निळाई’ मला कायमच वेड लावत आलेली आहे. गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात पुन्हा एकदा या निळाईच्या मोहजालाचा विलक्षण अनुभव आला.

पर्थमधला आमचा दिनक्रम साधारणपणे सकाळी ९ ते ५ ऑफीस आणि त्यानंतर साडे सहा – सातच्या दरम्यान कुठेतरी एकत्रीत रात्रीचे जेवण असा असतो. यावेळी एक दिवस गुरुपोर्णिमेचा असल्याने मी संध्याकाळी गृपबरोबर जेवण घ्यायचे टाळले. राहत्या हॉटेलवरच काहीतरी शाकाहारी जेवण घ्यायचे असे ठरवल्याने ती संध्याकाळ मला स्वतःसाठी देता आली. तिथेच जेवण करायचे असल्याने थोडा उशीर झाला तरी चालेल असे ठरवून कॅमेरा घेवून भटकंतीसाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी माझ्या रुमच्या बाल्कनीतून सहज एक नजर बाहेर टाकली. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते. इथे दिवस तसा लवकरच मावळतो. त्यामुळे आकाशात संध्येची चाहूल लागायला सुरूवात झालेली होती.

विरघले नभांगण…
बघ निघाला माघारी रवी
पसरले श्यामरंग
फुटे निळाईस पान्हा

हॉटेलच्या समोरच अगदी मधला एक रस्ता सोडला की समोरच पसरलेला अथांग सागर आहे… निळाशार ! त्यामुळे माझी ती संध्याकाळ तिथेच जाणार हे निश्चीत होते. किनार्‍यावर आलो तेव्हा समोर पसरलेला सागर आणि आकाशाच्या पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर आली.

अजुन बर्‍यापैकी उजेड होता. त्यामुळे नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु आसमंत व्यापत चाललेल्या निळाईशी स्वतःचे अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु होती.

नकोच मजला सर्व नभांगण
क्षितीजाशी एक रेघ हवी
तुझीच सत्ता, तुझी निळाई
सोबत मजला तुझी हवी

एकमेकाशी मस्ती करत दोघांचा मस्त दंगा चाललेला होता.

अचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमक पवित्रा घ्यायचे स्विकारले असावे. त्या निळाईवर विजय स्थापीत करण्यासाठी त्याने बहुदा आपले, आपल्यात सामावलेल्या रंगांचे सामर्थ्य आजमावण्याचा निर्णय घेतला. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे सप्तरंगाची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात झाली.

असली विलक्षण जुगलबंदी पाहताना मला मात्र संमोहनाचा भास होत होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या सप्तरंगी रेघेचे रुपांतर आपल्या मनमोहक शस्त्रात करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्‍या टोकाकडूनही हालचाल सुरू केली होती.

थोड्या वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की हा श्वेत रंग आपल्या रंगांच्या जोरावर त्या निळाईवर विजय मिळवतो की काय असे वाटायला लागले.

काही काळापुरता का होइना पण त्याने विजय मिळवला देखील. क्षणभर माझ्या लाडक्या निळाईला विसरून मी रंगांच्या त्या मनमोहक आविष्काराकडे भान हरपून बघत राहीलो.

सखे ही कसली चाहूल ?
मी झालो कसा मश्गुल ?
आकंठ जणु प्रत्यंचाच ती…

हा सोडून मोह स्वप्नांचा
मनाला पडली कसली भूल …… !

भान हरपून त्या वेड लावणार्‍या इंद्रधनुकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले आहे याची नकळत जाणिव झाली आणि मी सगळी अवधाने सोडून त्या नवलाईत हरवत राहीलो….

पण किती वेळ चालणार ही मस्ती? शेवटी हळु हळू त्या निळाईने आपले निर्विवाद साम्राज्य पसरायला सुरूवात केली.

निळ्या अंबराची मिठी ही निळी
खुळ्या जिवाची दिठी ही निळी
निळाई…निळाई… स़खी ही निळी
निळ्या सागराची गाजही निळी

गंमत म्हणजे ही सगळी स्थित्यंतरे अवघ्या एका तासात झाली होती. मावळतीकडे निघालेला सहस्त्ररश्मी अजुनही आपले अस्तित्व दाखवून होता. पण गंमत म्हणजे तेजोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भास्करालाही या निळाईने अगदी निष्प्रभ करून टाकले होते. त्या निळ्या रंगाच्या शितल किमयेपुढे तो सुद्धा आपला स्वभावच जणू विसरून बसला होता.

त्या श्यामल निळाईत हरवताना नकळत मला जाणवले की माझ्या ही नकळत मी देखील त्या निळाईचा एक पदर पांघरून घेतला होता.

‘ग्रेस’ म्हणतात…

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा?

विशाल कुलकर्णी