पुणे भेट झाली की बायकोची बहिणीबरोबर तुळशीबागेत चक्कर ठरलेली असते. प्रत्येक वेळी तिथे जावून या बायका काय नक्की करतात हे मला पडलेले कोडेच आहे. कारण म्हणावी तशी खरेदीसुद्धा करत नाहीत. पण तासन्तास घालवतात त्या तुळशीबागेत.
यावेळी सुद्धा बायको आणि बहिणाबाई निघाल्याच. ड्रायव्हर म्हणून अस्मादिक होतेच बरोबर. माझं तोंड बघून पुर्वाक्का (बहिणीची मोठी लेक) आणि बोक्या (सई) लागले हसायला. मी विचारले दोघीना यायचे का म्हणून. पुर्वाक्का विचारात पडली ,जावे की नको?
ते बघून सईने (एवढ्याश्या) कपाळावर हात मारून घेतलाच. “तुला जायचेय दीदी तुळशीबागेत?” चेहऱ्यावर शक्य तेवढं आश्चर्य आणि कंटाळा आणून बोक्याने विचारलं. ते बघून पुर्वाक्काने नको म्हणून सांगितले.
“कसल्या आहात गं दोघी? गरीब बिचाऱ्या काकाची ज़रा सुद्धा दया येत नाही ना तुम्हाला?” मीच करवादलो. तशी सई उठून तरातरा बेडरुममध्ये गेली. म्हटलं रुसली की क़ाय? तर येताना मॅडम आपल्या बाबांची पॉवरबैंक घेवून आल्या. माझ्या हातात दिली आणि म्हणाल्या, “भरपूर वेळ काढायचाय काकड्या तुला. मोबाइलचे चार्ज़िंग संपले तर उपयोगी येईल. ”
मी बघतच राहीलो…
“बाबा नेहमी असेच करतो. दुसऱ्या दिवशी तुलशीबागेत जायचे असले की पावरबैंक फूल चार्ज करुन ठेवतो. तुला गरज पडणार म्हणून मी रात्रभर चार्ज करून ठेवलीय.”
पुर्वाक्काने टिप्पणी जोडली. मी पोरींच्या हुशारीला दाद द्यावी की आगाऊपणाला , यां संभ्रमात पडलो होतो. दोघी कॅरम खेळण्यात रंगून गेल्या होत्या.
© विशाल कुलकर्णी