Category Archives: प्रिंट मिडीयातील माझे लेखन…

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है

IMG-20190428-WA0019

IMG-20190428-WA0020

परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करताना पहिली चूक ही केली की त्याने मानव पण निर्मिला. दूसरी चूक ही केली की मानवाला विचार करण्याची, कल्पना शक्तीची देणगी दिली. तसं पाहायला गेलं तर हे मानवाला मिळालेलं एक वरदान, एक खास भेट आहे. पण त्याने झाले असे की मानव विचार करायला लागला. मानव हा तसा समुहप्रिय प्राणी, त्यामुळे त्याने समुहात राहायला सुरुवात केली. तसे समुहात राहण्याचे नियम बनवले गेले. आणि तिथेच बिनसले. नियम आले की बंधने वाढतात. पण माणूस सरसकट एकसारखा नसतो. जितक्या व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती. कुणी बंधने पाळतो तर कुणी बंडखोरी करतो. प्राण्यांचे बरे असते ना? उन्मुक्त जीवन, कसली बंधने नाहीत, नियम नाहीत. आयुष्यात कसली गुंतागुंत नाही. “

गुंतागूंत” , यस्स, किती तरी वेळ झाला हाच शब्द आठवण्याचा प्रयत्न करतोय. या विचार करण्याच्या क्षमतेने , कल्पनाशक्तीने मानवी जीवन इतके गुंतागूंतीचे करुन ठेवलेय की विचारूं नका. But then it’s completely human. कदाचित परमेश्वराने ठरवलेले असेल की पुढे आपल्याला संपूरणसिंग कालरा उर्फ गुलझार नावाचा एक हज़ारो लाखो लोकांना वेड लावणारा वेडा जन्माला घालायचा आहे. त्याची सोय म्हणून कदाचित परमेश्वराने आधीचा ही क्षमता, हे सामर्थ्य मानवाला दिलेले असावे.

गुलझारचा , त्यांनी दिग्दर्शीत केलेला कुठालेही चित्रपट पाहा, त्यात मानवी जीवनातील मानवी नात्यातील गुंतागूंतीवर थेट आतवर जावून भिडणारे भाष्य असते. असाच एक चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘इजाजत’ ! महेंद्र (नसीरमियाँ), सुधा (रेखा) आणि माया (अनुराधा पटेल) यांच्या प्रेमत्रिकोणावर आधारीत अतिशय गुंतागूंतीचे कथानक. श्री सुबोध घोष यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन सर्वस्वी गुलझारचे होते. सोबत चार चाँद लावायला पंचमदा, आशाबाई यांच्यासारखे मनस्वी कलाकार होतेच. इजाजत सर्वार्थाने गाजला. त्याची गाणी आजही ओठावर सहजी रेंगाळतात. त्यातलेच एक नितान्तसुन्दर गीत..

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है.   

गुलझारच्याच काही ओळी आठवतात..

सिर्फ अहसास है ये दूर से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो।

प्रेमाच्या अस्पर्श, अशारिर आणि तरीही अभिन्न भावनेची खरी गंमत अनुभवायची असेल तर डोळे मिटायचे आणि डोळ्यासमोर ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है’ म्हणत आर्तपणे साद घालणारी माया डोळ्यासमोर आणायची.

गुलझार हा विलक्षण भावनाप्रधान कवि आहे. त्यांच्या कवितेत, गाण्यात कधीच अर्थ, आशय शोधायचा वेडेपणा करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. गुलझार समजून घ्यायचा असेल तर नुसती त्याची गाणी ऐकुन, कविता वाचुन कळत नाही. गुलझार ही एक वृत्ती आहे. गुलझार जगावा लागतो, अनुभवावा लागतो. त्यातली अनुभूती घ्यायला सुरूवात केली की गुलझार आपोआप उलगड़त जातो. आता हेच बघा ना…

भीगे दिन, खत में लिपटी रात या गोष्टी. नेहमीच्या भौतिक आयुष्यात त्यांना काहीच अस्तित्व नाही. पण या शब्दात गुलझार ओतप्रोत सामावलेला आहे. त्यातला अनहद नाद अनुभवायचा असेल तर गुलझार व्हावे लागते.

माया, सुधा, पुन्हा माया आणि पुन्हा सुधा अश्या विलक्षण पेचात सापडलेला संवेदनशील महेंद्र, महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी पण त्याच्या वागण्याने दुखावली गेलेली सुधा आणि महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी, नंतर त्याचा संसार आपल्यामुळे उध्वस्त झालाय हे कळल्यावर पुन्हा उध्वस्त होणारी कविमनाची माया असा सगळा गुंता गुलझार अतिशय तरलपणे हाताळतात आणि जन्माला येतो इजाजत.

“पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट, कानों में एक बार पहन के लौटाई थी” या सारख्या कल्पना सूचण्यासाठी जरी कवि असणं आवश्यक असलं तरी ती चाहूल अनुभवण्यासाठी ते रसिक, तरल मनही हवं असतं. आणि “पतझड़ की वो शाख अभी तक काँप रही हैं” यातली वेदना थेट आतवर झिरपण्यासाठी तितकं संवेदनशील मन असावे लागते. या सर्व मानवी भावनांना, खरेतर गुलझारच्या कवितेतील या कल्पनांना कसलेही भौतिक अधिष्ठान वा अस्तित्व नाहीये. या सर्वस्वी अनुभवायच्या, मनाच्या खोल डोहात आतपर्यंत झिरपुन घ्यायच्या गोष्टी आहेत.  झाडाच्या फांद्यातुन झिरपणारी वाऱ्याची, पानाची सळसळ ही त्यालाच समजू शकते ज्याने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय. हे रूपक मायाच्या आयुष्यात आलेल्या स्थित्यन्तराचे आहे. ती हे सगळे जगलीय. महेन्द्रच्या विरहांने तिला या वेदनेची अनुभूती आलीय. त्या वेदनेतून झालेला हा साक्षात्कार आहे.

“वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो” ….. आणि वेळ पडलीच तर मनाची सगळी अस्वस्थता, कातरता, बेचैनी संपवून मुळावरच घाव घालु शकेल अश्या कठोरपणाचीही गरज आहे.

इज़ाजतची माया अशीच आहे.  बेदरकार तरीही संवेदनशील, मनस्वी. कुठलीही गोष्ट ठरवून प्लान करुन करणे तिच्या स्वभावातच नाहीये. तिला त्या त्या क्षणापुरते जगणे मंजूर आहे. त्यामुळेच कदाचित लग्नानंतर सुधाच्या सांगण्यावरुन महेंद्र मायाच्या सर्व वस्तु तिला परत पाठवून देतो. तेव्हा पोच देण्यासाठी माया त्याला एक चिठ्ठी लिहीते , ज्यात असते ही कविता.. मेरा कुछ सामान….

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी

हि कल्पनाच केवढी तरल, केवढी सुंदर आणि तरीही त्रासदायक आहे. एकत्र असण्याच्या काळात एकमेकाच्या सहवासात घालवलेले ते जादुई क्षण.  तन-मन जणुकाही एकजीव झालेले. वेगळेपणा असा काही उरलेलाच नाही. मग जे काही सुख-दुःख असेल ते सामाईक झालेलं. दोघांनी मिळून भोगलेलं, उपभोगलेलं. त्यातही मायाची खंत आहे की तिला अर्ध्यातुनच जावं लागलं. प्रेमाच्या त्या पावसात अर्धवट भिजलेलं , अर्धवट शुष्क राहिलेलं मन.

गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

आपल्या कवितेत ती म्हणते. शिल्लक राहिलेलं शुष्क, कोरडं मन मी माझ्याबरोबर घेवून आलेय. आपल्या प्रेमाचा तो ओलावा, ती जवळीक मात्र तिथेच मागे सोडून आलेय. ते वेडं मन तिथेच कुठेतरी रेंगाळतय अजुन. जमलं तर तेवढे फक्त परत पाठवून दे. बाकी काही नको.

एक सौ सोलह चाँद की रातें, एक तुम्हारे काँधे का तील
गीली मेहंदी की खुशबू, झूठमूठ के शिकवे कुछ

माझ्या मते बॉलीवुडमधल्या समस्त हिंदी गाण्यापैकी सर्वाधिक चर्चा झालेली ही एकमेव ओळ असेल. या “एकसौ सोलह चाँदकी राते” बद्दल आजवर इतकं लिहिले आणि वाचले गेलेय की जितके भगवदगीतेबद्दल सुद्धा नसेल. अनेकांनी अनेक अंदाज बांधले, विशेषतः एकसौ सोलह या आकड्याबद्दल अनेकांनी विश्लेषणं केली आहेत. गंमत म्हणजे गुलझार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे की त्या आकड्याला तसा काहीही अर्थ, कसलेही संदर्भ नाहीत. लिहीता लिहीता खुपदा सहज काहीतरी सुचुन जातं आणि ते इतकं आवडतं आणि गाण्यात चपखल बसतं की त्याचा आशय, संदर्भ शोधण्याची आवश्यकताच राहात नाही. आणि ते आहे तसं स्वीकारलं जातं. हे शब्दही तसेच उस्फूर्तपणे आलेले आहेत. ते म्हणाले होते की

“अंक इतना महत्वपूर्ण नहीं है जितनी यह बात कि प्रेम संबंध में जीने वाले दो में से एक व्यक्ति इस बात को सहेज कर रखता है कि उसने कितनी चांदनी रातें अपने प्रेमी के संग बिताई हैं|”

माया-महेन्द्रच्या प्रेमीजीवनातील असे कित्येक क्षण असतील जे मायाला साद घाल असतील. कधी सुखाचे, तर कधी दुःखाचे क्षण. अश्या गोष्टी ज्या दोघांनी फक्त एकमेकांपुरत्याच मर्यादित ठेवलेल्या आहेत. त्या क्षणांच्या आठवणी, त्या एकांतातील नखरे, प्रेमालापाचे, रुसव्या फुगव्याचे क्षण परत करता येतील का? मायाला कळून चुकलेय की महेंद्र आता सुधाचा झालाय, तिचा राहिलेला नाहीये. काहीअंशी तिने ते स्वीकारलेय सुद्धा. पण मन मानत नाही.

तिला महेंद्र नकोय, पण त्या साऱ्या क्षणांच्या आठवणी, ते क्षण ती परत मागतेय ज्यात तिने आपले आयुष्य खऱ्या अर्थाने जगलेले आहे. ते क्षण परत करणे शक्य आहे का?

झूठमूठ के वादे भी, सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो सामन लौटा दो

ती महेन्द्रला आठवण करून देते त्या क्षणी त्याने केलेल्या असंख्य वचनांची, तिच्या रुसव्या-फुगव्याची. तिला मान्य आहे की अशी वचने, ते रूसवेफुगवे, त्या लाड़िक, लटक्या तक्रारी ही त्या त्या क्षणांची तात्कालिक देण असते. त्यांना काही भौतिक अस्तित्व असायलाच हवे हे जरूरी नाही. आपली वचने त्याने पूर्ण करावीत हिसुद्धा तीची मागणी नाहीये. तिला फक्त ते सुखावणारे क्षण हवे आहेत. तेवढे परत आणता येतील का? आणि ते जऱ परत करणे शक्य नसेल तर बाकीच्या भेटवस्तू, प्रेमपत्रे यासारख्या भौतिक वस्तु परत करण्यात काहीच अर्थ नाही. कारण तिचा जीव त्या महेन्द्रच्या सहवासात घालवलेल्या क्षणांमध्ये गुंतलेला आहे. बाकी भौतिक गोष्टीत तिला कसलेच स्वारस्य राहिलेले नाहीये.

एक इजाजत दे दो बस
जब इस को दफ़नाऊँगी
मैं भी वही सो जाऊँगी

माया सर्वार्थाने महेन्द्रमध्ये गूंतलेली आहे. तो तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्याच्याशिवाय, त्याच्या आठवणीशिवाय जगणे तिला सहनच होणार नाहीये. ज्या भावना, जे प्रेम, लालसा तिने महेन्द्रबद्दल बाळगल्या आहेत त्या ती परत मागतेय. आणि याचबरोबर ती अजुन एक मागणी, रादर परवानगी, इजाजत मागतेय की त्या सगळ्या भावना, ते क्षण, ते प्रेम तिने विसरावे अशी जर महेन्द्रची अपेक्षा असेल, तर तिलासुद्धा त्या प्रेममयी क्षणांमध्ये विलीन होवून जाण्याची, विरघळून जाण्याची परवानगी मिळावी. कारण त्यांनंतर तिच्या अस्तित्वाचे काही प्रयोजनच उरत नाही.ती सर्वस्वी महेंद्रमय होवुन गेलेली आहे. तिच्या आयुष्यातुन महेन्द्रला वजा केले की उरते ते निव्वळ एक शून्य. त्यापेक्षा तिला त्या क्षणांबरोबरच स्वतःचे अस्तित्व संपवणे जास्त स्विकारार्ह आहे.

मी वारंवार सांगत आलेलो आहे की आशाबाईंचा आवाज हे माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही वेडे लतादिदीच्या आवाजाची एखाद्या भक्ताप्रमाणे भक्ती करतो पण आमचे प्रेम आहे ते आशाबाईंच्या सुरांवर, आवाजावर. आणि प्रेमभावना ही जगातल्या कुठल्याही भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे माझ्या मते. या गाण्यात आशाबाई आशाबाई राहात नाहीत, त्या माया होवून जातात. अतिशय आर्तपणे थेट आतवर जावून झिरपणारे त्यांचे स्वर आपल्याला मायाच्या वेदनेची, तिच्या मनातील आन्दोलनांची सार्थ जाणीव करुन देतात. आणि नकळत आपणही माया होवून जातो. गुलझारसाहेबांच्या प्रत्ययकारी शब्दाना योग्य आणि समर्पक आधार देण्याची ताकद फक्त पंचमदांच्या संगीतातच आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुलझार, पंचम आणि आशा हे दैवी त्रिकुट एकत्र येते तेव्हा अश्या अविस्मरणीय गीतांची निर्मिती होते.

मुखड्यात रेंगाळणारे सिंथेसायजरचे सूर एखाद्या स्मृतीसारखे अंगावर येणारे. मध्येच गिटार आणि बासरीच्या रेझोनन्सचा केलेला अप्रतिम वापर आणि या सगळ्याची सांगड घालत काळजाला हात घालत अंगावर येणारा आशाबाईंचा आलाप.
‘लौटा दो’ च्या वेळी नकळत सुरु होणारा मंद मधुर तबला आणि पहिल्या इंटरल्यूडमध्ये पंचमने वापरलेला पं. उल्हास बापट यांच्या संतुरच्या सुरेल सूरांचा अप्रतिम तुकडा.. अहाहा ! पंचमची कमाल म्हणजे संतुरचे हे सूर त्याने पानगळीत झाडावरून अलगद गळून पडणाऱ्या शुष्क पानांच्या नादासाठी वापरलेले आहेत. दुसऱ्या इंटरल्यूडमध्ये येणारे सरोद, क्लैरीनेट आणि बासरीचे सुर ही खरी ट्रीट आहे या गाण्यातली. आणि या सर्वाबरोबर गाणं संपल्यावर देखील कानात, रादर गात्रा-गात्रांत रेंगाळत राहणारा आशाबाईंचा आर्त स्वर आपण जगत राहतो, अनुभवत राहतो. मग पंचमची आठवण असह्य होते आणि आपण आर्तपणे परमेश्वराला साद घालतो…

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है ! आमचा पंचम आम्हाला परत दे प्रभो, बाकी काही नको.

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी
पनवेल. (०९९६७६६४९१९)

समईच्या शुभ्र कळ्या….

लहानपणी गावी गेलो की मजा असायची. विशेषतः संध्याकाळचे वातावरण फार गोड असे. शांत, निवांत, किंचित कातर झालेली संध्याकाळ. सगळीकडे संध्याप्रकाशाच्या पिवळसर सोनेरी छटा पसरलेल्या. सूर्य मावळतीकड़े झुकलेला, कदाचित अस्त पावलेला. दिवेलागणीची वेळ झालेली. जित्राबं घराकडे परतलेली. हळूहळू अंधार आपले हातपाय पसरायला लागलेला. कुठे रात्रीच्या स्वयंपाकाची लगबग, तर कुठे दावणीला बांधल्या जाणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घुंगरांचे सुरेल नाद. एखाद्या घरातील कुणी काकू जात्यावर धान दळताना कुठल्यातरी अनवट ओव्या गुणगुणत असायची. अश्यात आजी उठून देवापुढची समई लावायची आणि इड़ा-पिडा जावो, बळीचे राज्य येवो म्हणून परमेश्वराची प्रार्थना करायची. मग नकळत..
“बाई गं, माझ्या माहेरी ना…… ” म्हणत आपल्या माहेराचं कौतुक सुरु व्हायचं. घरातली चिल्ली पिल्ली गोळा करून सामूहिक शुभंकरोति व्हायची….
आयुष्य किती सुरेख होतं ना तेव्हा. आता खेड्यातुनसुध्दा हे चित्र दिसत नाही म्हणा. पण ते एक असोच.

आज हे सगळं अचानक आठवायचं कारण म्हणजे परवा  एका मैत्रिणीने फरमाईश केली की ‘विशाल’ अरे  ‘समईच्या शुभ्र कळ्या’  वर लिही ना एकदा. जोशात तिला हो म्हणून बसलो खरे पण नंतर मात्र पोटात धडकी भरली. साक्षात आरतीप्रभु यांच्या कवितेवर लिहायचं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यापेक्षा अवघड. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ग्रेस, भा.रा.तांबे किंवा आरती प्रभू ई. आणि अशा इतरही महाकविंच्या कवितांचं रसग्रहण वगैरे करायचा विचारही मनात आणु नये. तेवढी आपली पात्रता नाही, निदान माझी तर नाहीच नाही आणि महत्वाचे म्हणजे ‘ग्रेस’ किंवा ‘आरतीप्रभु: समजावून सांगायचे तर आधी ते आपल्याला कळायला हवेत. गेली दहा-बारा वर्षे वाचतोय. पण मला ते एक सहस्त्रांशानेही कळले असतील याची मलाच ग्वाही देता येत नाही. कविने कविता उलगडुन सांगु नये असा एक संकेत आहे… पण मग ती काहीं वाचकांसाठी साठी दुर्बोध ठरते तर काहींसाठी अर्थपुर्ण. जर तिच्यात अनुभुती नसेल तर ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. त्यासाठी म्हणून माझ्यासारखे काही वासरात लंगड़ी गाय असणारे हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात. आता ते मला पेलवलय की मी तोंडावर पडलोय हे तुमच्यासारख्या सुज्ञ, रसिक वाचकांनी सांगायचे.

APAB

तर समईच्या शुभ्र कळ्या….

गाण्याची सुरूवातच होते ती बासरीच्या अतिशय करुण, कातर  सुरानी. जणुकाही आसमंतात एकप्रकारची उदासीनता दाटून राहिलेली आहे. आपणही नकळत त्या सुरात गुंगत जातो, शांत होत जातो आणि अचानक कानावर येतात ते जणुकाही आपल्याच अंतर्मनातून आल्यासारखे भासावेत असे आशाबाईंचे कमालीचे आर्त, काळजाला हात घालणारे सुर.

समईच्या शुभ्र कळ्या , उमलवून लवते

आशाबाईंचा आवाज हे माझे पहिलं प्रेम आहे. विशेषतः पंचमदा आणि बाळासाहेब यांच्यासाठी गाताना आशाबाई आशाबाई राहातच नाहीत. त्या स्वतःच सुर होवून जातात, संगीत बनून जातात. या ओळी ऐकल्या की माझ्या डोळ्यासमोर ती तुळशीपुढे दिवा किंवा देवापुढे समई लावणारी आज्जी उभी राहते. पण पुढची ओळ ऐकली की लक्षात येते की, “नाही, ही कुणी आज्जी असूच शकत नाही. हि नक्की कुणीतरी नव्यानेच लग्न झालेली सासुरवाशीण असावी.

केसांतच फुललेली , जाई पायांशी पडते.

कदाचित गर्भातल्या नव्या जिवाची चाहूल लागताना नकळत माहेरच्या आठवणींनी मन कातर झालेली कुणी पहिलटकरीण सासुरवाशीण असावी. ती पहिलटकरीण वाटण्यामागे एक कारण आहे, पहिल्या दोन ओळींनीच मला विलक्षण अस्वस्थ केले, गाणे कैक वेळा ऐकले असेल, पण जेव्हा त्यावर लिहायला बसलो तेव्हा सर्व अंगाने विचार करायला लागलो. आणि कुठेतरी, काहीतरी राहून जात असल्याचे वाटायला लागले आणि मग न राहवून मी आंतरजालावरचे संदर्भ शोधायला, चाळायला सुरूवात केली. त्या उठाठेवीत मुळ कवितेची, गाण्यात नसलेली अजुन दोन-तीन कडवी मला सापडली. आणि झटक्यात ट्युब पेटली. की येस्स, आपली ही नायिका कदाचित गर्भातल्या नव्या जिवाची चाहूल लागताना नकळत माहेरच्या आठवणींनी मन कातर झालेली कुणी पहिलटकरीण सासुरवाशीण.असावी. त्यावर पुढे बोलूच.

मी वर म्हटल्याप्रमाणे कविला काय सांगायचे आहे ते त्यालाच ठावे. आपल्यापुरता आपण काढू तो अर्थ, प्रत्येकाची अनुभूती निराळी, अर्थ निराळा. संध्याकाळच्या शांतवेळी समईच्या वाती प्रज्वलीत करताना काही वेळापूर्वीच केसात माळलेल्या  आता किंचित सुकलेल्या जाईची फुले ओघळून तिच्याच पायाशी पडतात. नकळत तिला आपल्या प्रवासाची आठवण करून देतात. आयुष्य कसं भराभर पळत असतं नाही? काल माहेरच्या अंगणात वारा प्यालेल्या हरणीसारखी उधळत होते. जाईसारखी बहरून जात होते. आज बाळाच्या पहिल्या चाहूलीबरोबर ती उच्छ्रुंखलता , ते वेडं वय जाईच्या गजर्‍यातल्या चुकार, नकळत निसटून गेलेल्या फुलांसारखं गळून आपल्याच पायाशी पडतं. आणि काहीतरी अनमोल असे गमावून बसल्याची भावना अजून तीव्र होवून जाते. कसलीशी अनामिक हुरहुर दाटते…

भिवयांच्या फडफडी , दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.

हि भावना प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात कायमचे घर करून राहिलेली असते. माहेरची आठवण हा प्रत्येकीच्या मनातला एक हळवा, नाजूक कोपरा असतो. त्या सार्‍या सयी, सार्‍या आठवणी कायम जागृत असतात तिच्या मनात. मग साधी पापणी जरी फडफडली तरी मनात शंका येते की तिकडे काही झालं तर नसेल? हा कसला संकेत आहे. पापण्यांची हि फडफड नक्की कशाकडे इशारा करतेय? आई-बाबा बरे असतील ना? दारातली कपिला माझी आठवण तर काढत नसेल? परसातल्या जाई-जुई कोमेजल्या तर नसतील? देहाने काय ती फक्त सासरी, चित्त सगळे माहेरी एकवटलेले. ती माहेर मागे सोडून आली खरी, पण येताना स्वतःलाही तिथेच, माहेरीच सोडून आलेली असते. देह इथे असला तरी मनाचे पक्षी तिथेच माहेरच्या अंगणात कुठेतरी भरार्‍या मारत असतात. जुन्या सार्‍या सख्या, भावंडं, तिथल्या तरुवेली सगळ्यांवर तिची जडलेली माया तिला पुन्हा-पुन्हा तिकडे खेचत राहते. मन घट्ट करून , भरल्या डोळ्यांनी तिचे लग्न करून पाठवणी करणारे बापुडवाणे आई-बाबा डोळ्यासमोर येतात आणि डोळे भरून यायला लागतात.

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची…

पण डोळ्यात दाटलेलं ते पाणी पापणीची मर्यादा ओलांडत नाहीये. ते मुळी वाहतं व्हायला तयारच नाहीये. निरोप देताना आईने सांगितलं होतं. रडू आलं तरी गुपचूप रड. डोळ्यातले अश्रु कुणाला दाखवू नकोस. तुला कुणी कमजोर समजता कामा नये. मग ते पाणी तिच्या डोळ्यातच पेंग आल्यासारखं, सुस्तावल्यासारखं साचून राहतं. आणि मग त्या समईच्या शुभ्र कळ्यांच्या प्रकाशात शुक्राच्या चांदणीसारखं चमकत राहतं. तिच्या मनातल्या वादळांची अबोल साक्ष बनून….
इथे पुन्हा आई-वडिलांचे संस्कार, त्यांची शिकवण तिला तिच्या सासुरवाशीण असण्याची आठवण करून देतात आणि ती लगबगीने डोळ्यात दाटलेले वादळ थांबवण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच समजावत उठते की, उठ, बरीच कामे बाकी आहेत. असा विसराळूपणा बरा नव्हे. सोबतच्या कुणा पोक्त, अनुभवी सखीला मग उगाचच स्पष्टीकरण देते.

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची…..

गाण्यात नसलेल्या कडव्यांपैकी पहिले कडवे इथे येते.

गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्‍याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते

हे वाचताना जाणवते की कदाचित, कदाचित हि बयो कुणी पहिलटकरीण असावी. म्हणूनच ती माहेराबद्दलची प्रिती, बाळाच्या चाहुलीची ती आतुरता, ती वेडी हुरहुर जागी झालेली आहे. पण तिची ती पोक्त, अनुभवी सखी शहाणी आहे, समंजस आहे. ती आपल्या नायिकेची समजूत काढते. की बयो गं, अजून वेळ आहे. इतकी अधीर होवू नकोस. वेडेपणा करू नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. केतकीचे पाते उघडून आतला गाभा ठिक आहे की नाही हे बघायची घाई करत नसतात, त्यामुळे गाभा करपण्याची भीती जास्त.आपली नायिका कायम हे सासुरवाशीण- माहेरवाशीणीचे मुखवटे लिलया बदलत समतोल सांभाळत असते. मग नकळत ती सासुरवाशीणीच्या रोलमध्ये शिरते आणि जणुकाही एखाद्या पोक्त , समंजस सखीप्रमाणे स्वतःमधल्याच उदास सखीला समजावते. की,”बयो, उठ आता, अशी उदास का बसून राहिली आहेस तिन्हीसांजेला ? मग तिची सखी सुद्धा तिला समजावते…

थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

उठ बयो, डोळ्यातले पाणी पुस. अशी सुटी फुलं माळू नयेत केसात. ती त्या चुकार आठवणीसारखी असतात. जरा संधी मिळाली की सुटून मोकळी होतात, मग त्रास देतात. आवर स्वतःला आणि ते बघ संध्याकाळ होवू घातलीय. घरातलं उन्ह त्या छोट्या-छोट्या आठवणीतल्या निसटून गेलेल्या सुखासारखं हातातून निसटून चाललय. त्यांना धरून ठेव. पदराच्या शेवाला त्या उन्ह रुपी सुखाचे थोडे थोडे, छोटे-छोटे तुकडे शिवून ठेव. म्हणजे ते उन्ह हातातून निसटणार नाही. अंधार टळणार नाहीच, पण त्या अंधारात त्या उन्हाचे छोटे छोटे तुकडे काजव्यासारखे चकाकत राहतील. सगळ्या घराला लुकलुकता प्रकाश देत सुर्योदयाची, सुखाची आशा जिवंत ठेवतील.

मुळ कवितेतील ज्यादाची उर्वरीत दोन कडवी इथे येतात.

उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर !!
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?!!

इथे आरतीप्रभू या महाकविच्या हळव्या मनाची साक्ष पटते. त्यांची नायिका हळवेपणाने आपल्या सखीसमोर मन मोकळे करून जाते. की बाई गं, आता नाही राहावत. संध्याकाळचा केशरी रंग आसमंतात पसरायला लागला की मन भरून येतं. असं वाटतं तो रंगाळलेला, गंधाळलेला आसमंत श्रावणसरीसारखा अंगभर पांघरून घ्यावा, सुखाने मिरवावा. आता नाही वाट पाहवत. कुंकू लावताना आरश्यात पाहिले की डोळ्यातल्या बाहुल्या दिसतात आणि कढ अनावर होतो की कधी एकदा या बाहुल्या सजीव रूप घेवून बाहेर येतील. मजसंगे आनंदाने फेर धरून नाचायला लागतील. असलं काहीतरी वाटतं आणि मन अजुनच हळवं होवून जातं. हे नाही सोसत आता. हे सोसायचं असेल तर त्यासाठी त्या डोळ्यात साचून राहिलेल्या , दाबून ठेवलेल्या आसवांचेच बळ हवे.

हांसशील हांस मला, मला हांसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ?

तिच्या मनातील हा संघर्ष टिपेला पोहोचलाय. उगाचच आपलं एक मन दुसर्‍यावर हासतय असं तिला वाटत राहतं. क्वचित आपली सखीसुद्धा आपल्यावर हासत असल्याचा भास तिला होता आणि आपल्यातल्या सासुरवाशीणीला ती निक्षून सांगते की हसणार असशील तर हास बाई मला . पण आत्ताच्या अवस्थेत हसणं मला काही जमणार नाही. माझ्यातल्या हळव्या कोपर्‍याला ते हासणं  मुळी सोसणारच नाही. डोळ्यात दाटलेले ते अश्रु  डोळ्याच्या, मनाच्या डोहात घट्ट रुतून बसले आहेत. आता त्यांना काढून टाकणे मला शक्य नाही बयो. मला त्या सोबतच जगावे लागणार आहे. आणि माझ्या हसण्याने काय होणार आहे? तो आकाशातला चंद्र थोडाच दुप्पट तेजाने चांदणे सांडत तळपणार आहे? माझं माहेर, त्या कडू-गोड आठवणी हे माझं पुर्वसुकृत आहे म्हण किंवा संचित आहे म्हण हवं तर. ते माझ्याबरोबरच जाणार. ते त्यागणं मला तरी या जन्मी शक्य होणार नाही.. या जगातील यच्चयावत माहेरवाशिणींची हिच व्यथा आहे…..

संपुर्ण गाण्यात पार्श्वभुमीवर मंद स्वरात कुठलेसे करुण सुर आळवत ती बासरी आपले अस्तित्व सांडत असते आणि आपण कधी त्या बासरीच्या सुरात तर कधी आशाबाईंच्या आर्त स्वरांत विरघळत राहतो. रागेश्री रागातील हे आशाबाईंनी गायलेलं गाणं पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आहे. हि मंगेशकर भावंडं असोत किंवा आरतीप्रभूंसारखे वेड लावणारे कवि असोत, हि माणसं नक्कीच कुठल्याश्या क्षुल्लक चुकीची शिक्षा भोगण्यासाठी या पृथ्वीतलावर आलेली शापित यक्ष-गंधर्व मंडळी असावीत. आपल्या इथल्या वास्तव्याने स्वतःबरोबर आपलीही आयुष्ये उजळून टाकली आहेत त्यांनी. जगणं सोपं नसतंच आणि नसावंही. पण ही दैवी माणसं ते सोपं व्हायला, गंधाळून टाकायला सहाय्यभूत ठरतात हे मात्र नक्की.

धन्यवाद.
विशाल विजय कुलकर्णी
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९,
पनवेल – ४१०२०६