Category Archives: प्रासंगिक

शिक्षक दिन

शिक्षक दिन म्हटले की मला रॉबिन विल्यम्सच्या प्रोफेसर किटींगचीच आठवण येते. असे शिक्षक मला भेटले असते तर मी एकतर चित्रकार झालो असतो किंवा छायाचित्रकार ! But I am happy that I have started searching myself again.

कारण किटींग सांगतो ..
You must strive to find your own voice because the longer you wait to begin, the less likely you are going to find it at all.

“बाबुमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नही.” म्हणून अगदी सहज , साध्या शब्दात आनंद आपल्याला जगण्याचे मर्म सांगून जातो. प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी शिक्षक म्हणून समोर येत असतो, काहीतरी नवे ज्ञान देत असतो. फक्त ते मिळवायचे असेल तर आजन्म विद्यार्थी बनून राहायची आपली तयारी मात्र हवी.

शॉ म्हणतो , ” I’m not a teacher: only a fellow traveler of whom you asked the way. I pointed ahead – ahead of myself as well as you. “

शिक्षण, विशेषत: शाळा-कॉलेजात जावून घेतलेले शिक्षण का आवश्यक आहे हे सांगताना तो म्हणतो..
A fool’s brain digests philosophy into folly, science into superstition, and art into pedantry. Hence University education.

पण इथे विद्यापीठ, शाळा म्हणजे फक्त दगडमातीची एक इमारत एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये शॉला. तर जिथे मार्ग दाखवायला गुरु असतात, शिक्षक असतात ती विद्यादान देणारी जागा त्याला अपेक्षीत आहे.

रस्त्याने चालताना ठेच लागते तेव्हा तो दगडसुद्धा नीट बघून चाल असा धड़ाच देत असतो. पण बर्नार्ड शॉ वर विलक्षण प्रेम असून सुद्धा मला नेहमी वाटतं की सर्वक्षेष्ठ शिक्षक म्हणजे स्वानुभवच. स्वतःच्या अनुभवातून जे शिकायला मिळते ते कुठल्याही विद्यापीठात शिकता येत नाही.

आधी आई-वडील, मग गुरु, मग मित्र मंडळी, नोकरीतले, व्यवसायातले मेंटॉर्स, प्रतिस्पर्धी आणि अगदी पत्नी किंवा पतीसुद्धा एक उत्तम शिक्षक म्हणून समोर येतात. आपल्याला फक्त त्यांच्यापासुन काय घ्यायचं ते कळलं म्हणजे झालं. जगात वावरताना लोक नेहमी इतरांना , परिस्थितीला, राजकारण्याना नाहीतर नशिबाला दोष देताना दिसतात. अश्या लोकांना एकच सांगणे आहे की

मित्रहो, स्वतःच स्वतःचे शिक्षक होवून बघा. स्वतःचे गुण-दोष शोधायला आणि पारखायला शिका. मग ही सतत तक्रारी करायची सवय आपणहुन नष्ट होवून जाईल. जगणे गाणे होईल.

शॉच्याच एका नाटकातले (Mrs Warren’s Profession) एक पात्र, विव्ही याबद्दल अगदी सहजपणे सांगून जाते..

“People are always blaming their circumstances for what they are. I don’t believe in circumstances. The people who get on in this world are the people who get up and look for the circumstances they want, and, if they cant find them, make them.”

सो मंडळी, स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हा आणि स्वतःच विद्यार्थी ! मग बघा मजा…

शिक्षकदिनानिमित्त सर्वाना याच शुभेच्छा आणि सदिच्छा 💐👍

© विशाल कुलकर्णी

एक पहाट रेंगाळलेली…

 

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लडबडले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

(कविवर्य ना. धों. महानोर)

दातावर दात वाजणे, हाताला बोटे आहेत याची जाणीव नसणे, वाऱ्याची बारीक झुळूक जरी आली तरी सुया टोचल्याचा आभास होणे हे सगळे अनुभव म्हणजे थंडी !

नेरे गाव मागे सोडून धोदाणीच्या दिशेने जाताना मध्येच शांतीवनला जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला एक छोटा रस्ता डोंगराच्या दिशेने जात राहतो. बहुदा सांगटोली गावाकडे जातो तो रस्ता. पहाटेच्या अंधुक उजेडात त्या रस्त्याला लागायचे. समोर लांबचलांब पसरलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून विहरत येणारा गार-गार वारा अंगाशी झोंबायला लागतो. आसमन्तातुन विविध पक्षांची प्रसन्न किलबिल कानावर यायला सुरुवात होते. मग मीही कानातला हेडफोन काढतो. खिश्यातला मोबाइल काढून त्यावर सुरेलपणे झरणारा पंडितजींचा भटियार बंद करतो आणि शांत चित्ताने निसर्गाची नादमधुर साद कानात साठवत पुढे पुढे जात राहतो.

सकाळची शांत वेळ, मंद, मधुर रानफुलांचा वातावरणात पसरलेला आणि समीराने सर्वत्र उधळलेला मंद सुगंध, पूर्वेला उजळु लागलेले भास्कररावांचे रंग, तळ्याचा शांत काठ, त्या काठावरील शिवशंभोच्या देवळातील घंटांचा लांबवर ऐकू येणारा सुमधुर नाद आणि त्यात तो भारदस्त भैरवातील कोमल ‘रे्’; भक्तिरसात चिंब झालेला, एक धीर-गंभीर वातावरण निर्माण करणारा. ‘ग म रे सा’ हा स्वर-समूह एखाद्या भक्कम आधार-स्तंभासारखा उभा. सगळया स्वरांचा आनंद घेत घेत, ‘सा रे् ग, रे् ग म प, ग म ध् ध् प, ध् ध् प म प’ त्यानंतर ‘ग म रे् सा’ जणू वाट बघत, भेटीच्या उत्कंठेने आतुर झालेला!

यासाठी फक्त शास्त्रीय संगीतच ऐकायला हवे असे नाही. बाकी सगळी इंद्रिये काही काळापुरती अडगळीला टाकायची आणि सगळी शक्ती कानात एकवटुन निसर्गाला कान द्यायचा. कुठल्यातरी एका अलवार क्षणी निसर्गराजा समेवर येतो, आपलीही तार जुळते आणि सुरु होते एक अवर्णनीय अशी नितांतसुंदर मैफील. पहाटेचे चित्र विचित्र पण मंजुळ आवाज ऐकण्याचा आनंद,त्ये सुख… त्याची सर कुठल्याच संगीताला नसते हो. वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट , अगदी चिमणीचा चिवचिवाटही मन प्रसन्न करून जातो. मधूनच राघू आपले अस्तित्व जाणवून देतो. मैना आपल्या मंजुळ व कर्णमधुर आवाजाने मन उल्हसित करते. वसंतात कोकिळ पक्षी आपल्या कुहू-कुहूने रवीराजाच्या आगमनाची दवंडी पिटत असतो. पानाच्या सळसळीमधून वाहत्या वाऱ्याचा कानाला एक निसटता स्पर्श करत होणारा आवाज एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. हिरव्या गवतावरून वहाणारा वारा एक अगदी हळुवार ध्वनी उत्पन्न करून जातो. त्याचप्रमाणे सळसळणाऱ्या पानांचा ध्वनीही सुखावत असतो.

पानगळीच्या दिवसात, पहाटेच्या नीरव शांततेत झाडाची सुकलेली पाने ओघळताना होणारा आवाज ऐकलायत कधी? पायाखालचा वहिवाटीचा रस्ता सोडून नकळत जंगलातल्या वळणदार अनवट पाऊलवाटेवर उतरताना पायाखाली सुकलेल्या गवताची होणारी चरचर ऐकलीय कधी? त्या तृणपर्णावर इतका वेळ तोल सावरून बसलेले दंवाचे थेंब, आपल्या पावलाने त्यांच्या शांत समाधीत आणलेल्या व्यत्ययामुळे विचलीत होवून आपली जागा सोडत नकळत तुमच्या पावलावर ओघळतात तेव्हा त्यांचा तो कोमल, मुलायम स्पर्श अनुभवलाय कधी?

मग हळूहळू भास्करराव डोके वर कढ़ायला लागतात. आसमंताला जाग येवू लागते आणि निसर्गाचा अंमल संपून माणूस नावाच्या प्राण्याचा दिवस चालू होतो.

© विशाल विजय कुलकर्णी

दिनांक : २८/०१/२०१८