Category Archives: प्रासंगिक

परीस

परीस ….

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली – इयत्ता चौथी, पाचवीत @विकु).

पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखवायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.

तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते.

“…… अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.

परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला,” अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!” माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय.

त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत.

पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली.

आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन…

थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो.

सुरूवातीला उगीचच वाटायचं …
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/_

सादर अभिवादन ! 💐

© विशाल विजय कुलकर्णी

जिगरी

आजही माझ्या डोळ्यासमोर आहे तो गोरा-गोमटा , घाऱ्या डोळ्याचा , लुकडेला मुलगा. कपडे साधेच असायचे, बहुतांशी इस्त्री नसायचीच, पण कपड्यावर कुठे थोडी सुद्धा अस्वच्छता असेल तर शपथ ! नीटनेटकेपणा हा तेव्हाही त्याचा स्थायीभाव होता, आजही आहे. एकदा त्याच्याबरोबर गिरीमला गेलो होतो, सायकलवर डबल सीट आणि नेमकी सायकल मध्येच कुठेतरी पंक्चर झाली आणि मग आम्ही दोघे आळीपाळीने सायकल ओढत कसेबसे गिरीमला पोचलो…

आयुष्य किती साधं आणि सरळ होतं. कदाचित म्हणूनच अधिक सुंदर होतं. मी, मन्या आणि संदीप, सगळ्यात समोर, एकाच बेंचवर बसायचो. कै. काकडेबाईंची तंबीच होती तशी. चुकून एखादे दिवशी समोर नाही दिसलो तर बाई ओरडायच्याच. कौतुकही करून घेतलं आणि खूपदा मारही खाल्ला बाईंचा , पण सारं एकत्रच. We were the three idiots of STV.

सोमा,रावसो, अज्जू, रवी ही त्यावेळची वर्गातली स्कॉलर गॅंग. त्यांच्याशी दोस्ती होतीच, पण आधी मन्याशी आणि मग कदाचित त्याच्यामुळेच संदिपशी दोस्ती झाली. कदाचित मन्या आणि सँडीभोवती, सोमासारखे हुशार मुलगा हे वलय नव्हते, त्यामुळे माझ्यासारख्या टवाळ मुलाला त्याच्याशी कनेक्ट होणे जास्त सोपे गेले असावे. नंतर तर एकदम जिवलग मैत्रीच झाली. सोमा, रावसो किश्या पम्या हे सुद्धा नंतर खूप घट्ट मित्र बनले. पण शाळेत ज्यांच्याशी खऱ्या अर्थाने प्रथम बंध जोडले गेले ते मन्या आणि संदीपच होते. त्यानंतर एका राखी पोर्णिमेला शोभाने राखी बांधली आणि कुटुंबात अजून एक भर पडली. शाळेच्या हॉस्टेलशी खऱ्या अर्थाने संबंध आला तो संदीपमुळे आणि मग सगळीच गॅंग मित्र झाली. आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा शाळेतले सगळे मित्र सोबत आहेत, त्याला सहाय्यभूतही संदीपच आहे.

दहावीनंतर फाटाफूट झाली आणि त्यानंतर संदीप भेटला तो थेट पुण्यात धनकवडीत. एका कटींग सलूनमध्ये. And I was like, हा संदीप? How’s that possible? कारण आता माझ्यापुढे उभा असलेला माणूस कोणी वेगळाच होता. गोलमटोल, डोक्यावरच्या केसांनी फारकत घ्यायला सुरुवात केलेली. पोटाचा घेर वाढलेला. लहानपणीच्या केस चापून बसवलेल्या, तेलकट चेहऱ्याऐवजी एक देखणा चेहरा. चेहऱ्याकडे पाहताना डोळ्याकडे नजर गेली आणि लगेच ओळख पटली. ‘साल्या, बघतोयस काय नुसता? म्हणत त्याने कडकडून मिठी मारली आणि क्षणात मधली २०-२५ वर्षे गायब झाली. आता माझ्यासमोर तोच संदीप होता, रूप वेगळे होते पण तोच होता.

संदीप साधा, सरळ तेंव्हाही नव्हता. पण चालू सुद्धा कधीच नव्हता. माझा मित्र तेव्हाही अतिशय धोरणी, जिद्दी होता. स्पष्ट होता, आहे. पण महत्वाचे म्हणजे मन तेव्हाही मोठे होते आता ही आहे. अगदी त्याच्या पोटाच्या घेरापेक्षाही खूप मोठे 😀

आपल्याला काय करायचं आहे? हे त्याला पक्कं ठाऊक होतं. घरची परिस्थिती, सतत कष्ट करणारी आई कायम डोळ्यासमोर होती. त्यामुळे आपलं उद्दिष्ठ त्याने तेव्हाच पक्कं केलेलं होतं. आणि आज त्याने ते पूर्ण केलंय. He has reached his goal. He’s achieved what he had decided. But that’s not the beauty… आपले गोल्स आपल्यापैकी बहुतेकांनी अचिव्ह केलेले आहे.

पण संदिपचे वेगळेपण म्हणजे त्याने आपल्या बरोबर आपल्या सर्व मित्रांनाही कायम सोबत घेऊन वाटचाल केलेली आहे, करतोय. आजही आम्ही भेटलो की त्याच्या बोलण्यात ग्रुपसाठी विशेषतः ग्रुपमधल्या तुलनेने आर्थिक दृष्ट्या कमजोर मित्रांसाठी काय करता येइल कसे करता येईल याचेच विचार असतात. कुणाचाही वाढदिवस असो, एनिवर्सरी असो सर्वात पहिला फोन, पहिला मेसेज माझ्या या दोस्ताचाच असतो.

मेरा यार, यारोंका यार है ! आज त्याचा वाढदिवस आहे. देव करो आणि त्याला अपेक्षित ते सर्व प्राप्त होवो. सुख, समृद्धी समाधान आणि मित्र-मंडळी कायम त्याच्या आयुष्यात राहोत हीच सदिच्छा 😍😘

Many many happy returns of the day Sandy ! Love you dost. You are one of the biggest and precious boons in my life that I have received from god. Be there always my dear ! 🎂🍷🌹💐

तुझाच

विशल्या