Category Archives: पुस्तक परिक्षण

रात्र काळी घागर काळी ….

लेखक : चिंतामण त्र्यंबक खानोलकर
प्रकाशक : मौज प्रकाशन
किंमत : रुपये १३३/- फ़क्त

‘चिंतामण त्र्यंबक खानोलकर‘ हे नाव तसे अनोळखीच होते माझ्यासाठी. त्यांची सर्वात प्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे ‘अजगर’. या कादंबरीवर अगदी आचार्य अत्र्यांनीही खरपुर टीका केली होती असे ऐकुन आहे. पण ‘अजगर’ मुळेच मी चिं.त्र्यं. च्या प्रेमात पडलो. त्यानंतर साहजिकच ‘रात्र काळी घागर काळी’ वाचनात आले. मग चिं.त्र्यं. वाचण्याचा सपाटाच लावला आणि मग वाचता वाचता, चिं.त्र्यं. ना शोधता शोधता कुठल्यातरी एका क्षणी समजले की हा माणूस आपल्याला अनोळखी नाहीये. कारण चिं.त्र्यं. ना ओळखत नसलो तरी ‘आरती प्रभूंनी’ कधीच माझ्या मनावर गारुड केलेले होते.

आरती प्रभू उर्फ़ चिं.त्र्य. खानोलकर
आरती प्रभू उर्फ़ चिं.त्र्य. खानोलकर

ये रे घना, ये रे घना
न्हावूं घाल, माझ्या मना … या गीताने कधीच वेड लावलेले होते.

नाही कशी म्हणु तुला, तो एक राजपुत्र (चानी), लव लव करी पात (निवडुंग), कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना) ही आणि अशी अप्रतिम गीते लिहीणार्‍या ‘आरती प्रभूंचेच’ नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे हे समजल्यावर आनंदाश्चर्याचा धक्काच बसला होता. लहानपणापासून कवितेत आकंठ बुडालेला हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी’ सारखी अफाट कादंबरी लिहीतो आणि आपल्याला ते माहीतही नसावे याबद्दल स्वतःचाच प्रचंड राग आला होता त्या वेळी.

आता थोडेसे “रात्र काळी घागर काळी” बद्दल…

खरेतर या कादंबरीचे परिक्षण लिहीणे मला या जन्मीतरी शक्य होणार नाही. या कादंबरीचा, कथेचा आवाका प्रचंड आहे आणि तो पेलण्याइतकी माझी कुवत नाही. पण तरीही मला जे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणलं तर ही एका दुर्दैवी स्त्रीची शोकांतिका आहे. म्हटलं तर हे अगम्य अशा स्त्रीस्वभावाचे चित्रण आहे. म्हणलं तर नियतीच्या विलक्षण खेळाची कहाणी आहे. प्राक्तनाने एकाच व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या दोन विलक्षण स्त्रीयांची ही गोष्ट आहे. सर्व सामान्याला अप्राप्य असं दैवी सौंदर्य सहजगत्या पदरात पडूनही त्याच्म तेज सहन न झाल्याने स्वतःच राख होणार्‍या एका दुर्दैवी जिवाची ही कथा आहे.

तसं पाहायला गेलं तर ‘यज्ञेश्वरबाबांची’ दैवी सौंदर्य लाभलेली कन्या ‘लक्ष्मी’ ही या कथेची नायिका आहे. या कथेत आणखी एक तितकेच महत्वाचे पात्र आहे ते म्हणजे ‘जाई’ , लक्ष्मीपासून दुर जावू पाहणारा तिचा पती ‘दिगंबर’ जिच्यात गुंतलाय ती ‘जाई’ गावातल्या एका भाविणीची मुलगी ! तसं बघायला गेलं तर कथेत या दोन रुढार्थाने नसल्या तरी नियतीने एकमेकीच्या सवती बनवलेल्या स्त्रीयांच्या परस्परांतर्गत संघर्षाची कहाणी यायला हवी. पण इथे पुन्हा लक्ष्मीच नायिकेबरोबर, प्रतिनायिकाही बनते. आपली पत्नी गेल्यावरही अतिशय सौम्यपणे’ “नशिबवान होती, सवाष्णपणाने गेली” इतकी निर्विकार आणि विरक्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे यज्ञेश्वरबाबा आपली लेक समोर आली की मात्र त्यांच्या विरक्त डोळ्यात आईची वत्सलता दाटते.

उच्च आणि रौद्र स्वरात लागलेला दिगंबराचा ‘रुद्र’ ऐकून यज्ञेश्वरबाबा कमालीचे प्रभावीत होतात आणि दिगंबराचा काका ‘दास्या’ याच्याकडे दिगंबराला आपली मुलगी देण्याची इच्छा व्यक्त करतात. ‘दास्या’ला ती अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट वाटते. प्रत्यक्ष यज्ञेश्वरबाबांसारख्या तेजपुंज व्यक्तीची देखणी कन्या आपल्या घरात सुन म्हणून येणार ही कल्पनाच त्याला विलक्षण सुखावून जाते. पण लक्ष्मीचे सुन म्हणून त्या घरात येणे त्याच्या आयुष्यात किती मोठी उलथापालथ करणार आहे याची त्याला कल्पनाच नाही. इथे ‘दास्या’ हा एक पराभुत, कायम दुसर्‍यावर अवलंबून असलेल्या एका लाचार, असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या पंगु मनोवृत्तीचं प्रतिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जिवलग मित्रावर ‘अच्युत’वर अवलंबून असणारा ‘दास्या’ हे ही एक विचित्र च्यक्तीमत्व आहे. प्रत्येक कामासाठी त्याला अच्युतचा आधार लागतो, तरीही संधी मिळताच अच्युतच्या निपुत्रिक असण्यावर टोमणे मारायला तो कमी करत नाही. पुढे जेव्हा लक्ष्मी आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी अच्युतकडे द्यायचे ठरवते तेव्हा सर्वस्वी अच्युतवर अवलंबून असणारा दास्या ‘माझा नातु वांझेच्या वाईट सावलीत वाढायला नको’ असे म्हणून अच्युतच्या दुर्दैवी पत्नीची अवहेलना करतो. यामुळे दुखावला जावूनही त्याला दुर न सारणारा ‘अच्युत’ जेव्हा ‘दास्या तरी काय, लहान मुलच आहे माझ्यावर अवलंबुन असलेलं’ असं म्हणतो तेव्हा नकळत तो आहे त्यापेक्षा खुप मोठा बनत जातो. स्वतःला मुल नसलेल्या अच्युतचं मित्रप्रेम, दिगंबरावर केलेली निर्व्याज माया, दास्याच्या त्याच्यासारख्याच अर्धवट मुलाला ‘वामन’ला अच्युतने लावलेला जिव या सगळ्याच गोष्टी अतर्क्य अशा मानवी स्वभावाचे सुरेख उदाहरण म्हणून आपल्या समोर येत जातात.

आपल्या कथेची नायिका, यज्ञेश्वरबाबांची सौंदर्यवती कन्या ‘लक्ष्मी’ हा ‘रात्र काळी…..’ चा मुळ कणा आहे. एका विरक्तीकडे वळलेल्या संन्यस्त गृहस्थाच्या घरात जन्माला आलेली ही लोकविलक्षण, अद्वितीय म्हणता येइल असे सौंदर्य लाभलेली निरागस आणि निष्पाप मुलगी. बाबांच्या इच्छेखातर, किंबहुना त्यांच्या डोळ्यातली वात्सल्याची भावना टिकवण्याखातर ती त्यांनीच ठरवलेल्या दिगंबरशी लग्न करते. पण अगदी उच्च स्वरात, खणखणीतपणे तेजस्वी रुद्र म्हणणारा दिगंबर मानसिकरित्या अगदीच दुर्बळ निघतो. तिच्या दैवी सौंदर्याचीच त्याला भिती वाटायला लागते. एवढं अफाट सौंदर्य लाभलेली स्त्री शुद्ध असुच-राहुच शकत नाही असा विचित्र गैरसमज त्याच्या या न्युनगंडातून जन्माला येतो. या न्युनगंडामुळे दिगंबर तिच्या सौंदर्याला भुलत नाही पण घाबरतो जरूर. पण त्याच्या “तू शुद्ध आहेस का?” या प्रश्नाने मनोमन प्रचंड दुखावली गेलेली लक्ष्मी जेव्हा त्याच्यातल्या पुरुषाला डिवचते तेव्हा चवताळून तो तिच्यावर लाक्षणिक अर्थाने बलात्कार करतो आणि ” चुकार बीज पेरलं जातं “. पण जेव्हा ती फणा काढून उभी राहते तेव्हा मात्र तो गलितगात्र होवून पळुन जातो. ” हे शंभर नंबरी सोनं नव्हेच ” असं त्याला वाटतं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळतो. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी होते. जे सुख पत्नी (एका ऋषितुल्य व्यक्तीची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनासायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहते. अर्थात मनाने कमजोर असलेला दिगंबर जाईकडेही टिकु शकत नाही. ऐन वेळी अच्युतने त्याला जाईबरोबर पकडल्यानंतर तो घर सोडून पळूनच जातो. लक्ष्मीचं सौंदर्य मात्र नेहमीच लोकांना तिच्याकडे आकर्षित करत राहतं. यातुन दिगंबरचा मानलेला काका ’अच्युतही’ सुटलेला नाहीये. अच्युतच काय पण तिचा सासरा ’दास्या’देखील तिच्या मोहात पडतो. पण मुळातच मनाने पंगू असलेला दास्या, त्याच्यात तीही हिंमत नाही. तो आपली वासना केवळ लक्ष्मीच्या साडीच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करतो. कादंबरीतला हा प्रसंग तर विलक्षणच आहे. चिं.त्र्य. अगदी साध्या शब्दात पण अतिशय प्रभावीपणे दास्याच्या मनाची ती उलाघाल शब्दबद्ध करतात. पण हे पाहून लक्ष्मी मात्र दुखावली जाते. तिच्यातली बंडखोर, मानी स्त्री दास्याचं घर सोडून दुसर्‍याच एका व्यक्तीचा आसरा घेते.

चिं.त्र्यं.ची सगळीच पात्रं विलक्षण आहेत या कथेतली. एका दर्शनात ‘लक्ष्मीसाठी’ वेडे झालेले ‘केमळेकर’ वकील तिला आपल्या घरात आश्रय देतात. सर्व सुख-सोयी पुरवतात. अगदी ‘दास्या’च्या घरासमोरच तिला एक टुमदार घरही बांधून देतात. पण जिच्यासाठी एवढं सगळं केलं ती लक्ष्मा सहजसाध्य असतानाही तिच्या दैवी सौंदर्याला स्पर्शही करण्याची त्यांची हिंमत होत नाही. लक्ष्मीचं सौंदर्य दैवी असलं तरी तिच्या स्वत:साठी मात्र ते अशा रितीने शापित बनत जातं. केमळेकरांच्या सांगण्यावरुन तिला वाणसामानाचा पुरवठा करणारा गावातला वाणी ’दाजी’ देखील लक्ष्मीकडे आकर्षित झालेला आहे. पुरुषसुखाला वंचीत झालेली ’लक्ष्मी’ या दाजीला देखील जवळ करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाजीतही नाहीये. तो फ़क्त दुरुनच लक्ष्मीला पाहण्यातच आपले समाधान मानतो.

लक्ष्मीचं पात्र म्हणजे एक प्रचंड गुंतागुंत आहे. मानवी मनाच्या अगम्य गुंत्याचं, अवस्थांचं एक विलक्षण प्रतीक आहे लक्ष्मी. जिच्यामुळे आपला नवरा आपल्यापासून दुर गेला त्या ’जाई’ला मात्र तिचा दिगंबरपासून राहीलेला गर्भ आपोआपच जिरून गेलाय हे कळाल्यावरही ती जाईला जवळ करतेय. आपल्या मुलाला ’सदाला’ ती जाईच्या मायेत वाढवते. इथेच कथेत अजुन एका पात्राचा प्रवेश होतो. अच्युतकाका एक दिवस त्याला नदीकाठी सापडलेली एक तान्ही पोर घेवून लक्ष्मीकडे येतो आणि तिला सांभाळण्याची विनंती करतो. लक्ष्मी त्या बेवारस मुलीला सांभाळते, तिला ’बकुळ’ हे नाव देते. इथे मात्र ती अच्युतच्या सांगण्यावरून बकुळला आपल्या एका अनामिक मैत्रीणीची मुलगी म्हणून वाढवते. पण केमळेकरांनी दिलेले ते घर तिला शापित वाटत असते, आपला मुलगा ’सदा’ इथे वाढायला नको म्हणून ती त्याला अच्युतकडे देते. “वांझेची अपवित्र सावली माझ्या नातवावर नको’ या आपल्याच मित्राच्या वाक्याने हादरलेला अच्युत मग लक्ष्मीची समजुत काढुन सदाला दास्याच्या घरीच ठेवायला तिच्या मनाची तयारी करतो. स्वत: जातीने सदाचा सांभाळ करायचे वचन तो लक्ष्मीला देतो. इथे नकळत ’दास्याला तरी काय मीच सांभाळतोय ना’ हे त्याचे वाक्य त्याच्या मनाच्या मोठेपणाला अजुन उजाळा देते.

पुढे मोठा झाल्यावर आजोबाच्या घरी वाढलेला सदा नकळत बकुळवर प्रेम करायला लागतो. बकुळही त्याच्या प्रेमात पडते. पण हे लक्षात आल्यावर मात्र ’लक्ष्मी’ मनोमन हादरते. कारण सदाबरोबरच तीने बकुळलाही आपले दुध पाजून वाढवलेले आहे. त्या दोघांना एकमेकांपासुन दुर करण्यासाठी ती ’बकुळ’ला खोटेच सांगते की बकुळ ’जाईची’ म्हणजे एका भाविणीची मुलगी आहे. या बातमीने अंतर्बाह्य कोसळलेल्या बकुळचे लग्न ती दास्याच्या अर्धवट मुलाबरोबर वामन्याबरोबर लावून देते. वर पुन्हा सदा आणि बकुळ एकमेकांसोबत येवु नयेत म्हणून ती अर्धवट वामन्याला एक मंत्र देते….

दाजी येइल अधुन मधुन बकूळकडे, त्याला अडवु नको

कधी अतिशय प्रेमळ, तर कधी विषयोत्सुक. कधी विलक्षण करारी तर कधी कमालीची हळवी अशी लक्ष्मी प्रत्येक वेळी वाचकाला कोड्यात पाडत राहते एवढे मात्र नक्की. पुढे काय होते? सदा आणि लक्ष्मीच्या नात्याचे काय होते? सदा आणि बकूळचे काय होते? गायब झालेला दिगंबर त्याचे पुढे काय झाले? मुळात लक्ष्मीच्या आयुष्यात अजुन काय उलाढाली, दिव्ये लिहीलेल्या आहेत. या सर्व गोष्टी पुस्तकात वाचण्यातच गोडी आहे.

कादंबरी लिहिताना कोकणातले जे पुरातन, सनातन गूढ वातावरण खानोलकरांनी निर्मीले आहे की वाचताना आपण मनोमन चिं. त्र्यं. ना मनमो़कळी दाद देवुन जातो. त्यांनी वर्णनात्मक शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणार्‍याला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.अगम्य, अतर्क्य अशा मनाच्या काळोख्या डोहात लपलेल्या अनेक वादळांची, उद्रेकांची कहाणी म्हणजे ’रात्र काळी घागर काळी’ !

एकदातरी वाचायलाच हवी आणि संग्रहात तर हवीच हवी.

चिं.त्र्यं.खानोलकरांचे चे इतर गद्य लेखन…

अजगर (कादंबरी, १९६५)
अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
अभोगी (नाटक)
अवध्य (नाटक, १९७२)
आपुले मरण
एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)
कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)
कोंडुरा (कादंबरी, १९६६)
गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
रखेली (नाटक)
राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
श्रीमंत पतीची राणी (नाटक)
सगेसोयरे (नाटक, १९६७)
सनई (कथा संग्रह, १९६४)

विशाल कुलकर्णी

“मिठावरच्या कराची कहाणी आणि The Great Hedge of India”

काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपुर्वी म्हणु हवं तर, सकाळी सकाळी आशिषचा फोन आला. आशिष माझा शाळेत असल्यापासुनचा मित्र, सद्ध्या साहेब लंटनला असत्यात. प्रचंड उत्साही माणुस, वाचनाचं भयंकर वेड. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास म्हणजे त्यावेळी तिथे बहुदा सकाळचे सहा वगैरे वाजलेले असणार. मी चाट पडलो, च्यायला हा माणुस एवढ्या लवकर कसा काय उठला? त्यापेक्षाही मोठा धक्का वाट बघत होता माझी….

“अबे विशल्या, झोपलोच नाही बे काल रात्री.”

“का बे आश्या, नवीन पुस्तक मिळ्ळं की काय तुला?” आश्या रात्रभर जागतोय म्हणजे दुसरे काही कारण असुच शकत नाही.

“येस राजे, भन्नाट पुस्तक हातात पडलं काल. रात्रभर बसुन वाचून काढलं. तिथे मिळालं तर बघ. नाव आहे ” The Great Hedge of India” लेखक आहे “Roy Moxham”. वाचुन काढ.

आता आली का पंचाईत. आमचं इंग्रजी वाचन फार फार चेतन भगत वाचण्याच्या लायकीचं आणि हा माणुस चक्क रॉय मॉक्…मॉक्स…मॉक्सहॅम की काय (कसलं अवघड नाव, उच्चारतानाच फेफे उडतेय) नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचायला सांगतोय. पण आश्याला नाही म्हणायचं म्हणजे स्वतःचीच लायकी काढुन घ्यायची, त्यापेक्षा “बरं, बघतो मिळालं इथे कुठे तर! म्हणुन रिकामा झालो. साहेबांनी फोन ठेवला. मी विसरून गेलो. दोन आठवड्यापुर्वी परत आश्याचा फोन…

“वाचलंस का बे?”

आता मात्र ठरवलं, गंभीरपणे शोधायला हवं आणि शोधायला लागलो तर मॉक्सहॅम साहेब आमच्या बेलापूरच्या लायब्ररीतच सापडले. म्हणलं चला विकत घेण्याचा खर्च वाचला. ते पुस्तक आणि डिक्शनरी जवळजवळ ठेवून वाचायला बसलो,. माझ्याही नकळत कसा त्यात गुंतत गेलो कळालेच नाही. एका ब्रिटीश भटक्या संशोधनाने भारतात येवुन घेतलेला , आता अस्तित्वात नसलेल्या एका अचाट गोष्टीचा शोध हा या पुस्तकाचा विषय आणि पुस्तक वाचताना मिळत गेलेली गोर्‍या साहेबाच्या या अचाट आणि अफाट करणीची माहिती थक्क करुन टाकत गेली. तेव्हाच ठरवलं यावर लिहायलाच हवं. (पुस्तक विकत घेण्याचा विचारही तेव्हाच पक्का झाला मनात.)

यावर लिहायचं म्हणल्यावर दोन वेळा पुस्तक वाचून काढलं आणि लक्षात आलं की याचं भाषांतर करणं ’अपने बस का रोग नही’. साहजिकच मग आधी गुगल आणि तिथुन विकिपिडीया कडे मोहरा वळवला. अपेक्षेप्रमाणे तिथे भरपुर आणि सोप्या शब्दातली माहिती हातात आली. आता मला तिचं मराठीकरण करणं सोपं होतं.

The Great Hedge of India

 

मुळात ‘हेज’ या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय शोधण्यापासुन आमची सुरूवात होती. आपण घराभोवती बोगनवेल किंवा तत्सम वनस्पतींचे जे दाट कुंपण उभे करतो त्याला बहुदा इंग्रजीमध्ये हेज म्हणत असावेत. कारण गुगलमध्ये हेज म्हणुन सर्च दिल्यावर अशीच चित्रे गुगलने मला दिली. नेमका एक दिवस मंदारचा फोन आला (जोशांचा नव्हे) माझा जुना मित्र, तो नागपुरचा आहे. त्याला विचारले तर म्हणाला, “भाऊ, त्याला बागड म्हणतात ना बेSSS!”

या फ़ोटोवरुन काहीच अंदाज येत नाही ना, असं काय विशेष मग या बागडीमध्ये.
ठिक्कै, पुढचे फ़ोटो बघितल्यावर येइल कल्पना ….

“बागड” भन्नाटच शब्द आहे नाही. अर्थात जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती यापेक्षाही भन्नाट आहे, अचाट आहे , अफाट आहे. जर मी तुम्हाला सांगितले की अशी जवळजवळ १४२९ मैल (म्हणजे साधारण २३०० किमी) लांबीची बागड भारतात उभी केली होती, ती सुद्धा जवळपास १२ फुट उंचीची (३.७ मिटर) आणि जवळपास तेवढ्याच रुंदीची….., तर तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण हे सत्य आहे, अशी २३०० किमी लांब आणि १२ फुट उंचीची बागड एकेकाळी भारतात अस्तित्वात होती.

बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.

आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्‍या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच.

सन १७८० मध्ये तत्कालिन इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर वॉरन हेस्टिंग्ज याने भारतातील मुख्य मिठ उत्पादकांना बंगालमध्ये कंपनीच्या नियंत्रणाखाली एकत्रित आणले. त्यामुळे तोपर्यंत मीठाच्या आयात्-निर्यातीवर असलेला ०.३ रुपये प्रति ३७ किलोचा कर थेट ३.२५ रुपये प्रती ३७ किलो (३७ किलो= एक मौंड/माउंड) इतका वाढला आणि त्यातून कंपनीला अगदी सन १७८४-८५ साली जवळपास ६२ लाख ५७ हजार चारशे सत्तर रुपयाची (त्या काळचे) निव्वळ करप्राप्ती झाली. त्यावेळच्या चलन दरानुसार हा कर म्हणजे दरडोइ साधारण २ रुपये प्रतीवर्ष (त्यावेळच्या मजुरांचा दोन महिन्याचा पगार) एवढा होता. मिठावर टॅक्स इतर प्रांतातही होते, पण बंगालमध्ये तो उच्चतम होता. साहजिकच हा टॅक्स वाचवण्यासाठी त्याची तस्करी, चोरी असे प्रकार सुरू झाले. बंगालच्या आसपासच्या राज्यातुन मिठ तस्करीच्या मार्गाने बंगालमध्ये आयात केले जावु लागले. त्यामुळे ब्रिटीशांच्या सरकारी मिठाच्या धंद्यावर, त्याच्या उत्पन्नावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला. हा परिणाम रोखण्यासाठी, या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी, त्याकाळी मग मिठाच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व मिठ तस्करांना रोखण्यासाठी हि ४००० किमी लांबीच्या आंतरदेशीय सीमा रेषेची कल्पना अस्तित्वात आली. त्याकाळी ही कस्टम्स लाईन ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या अखत्यारीत होती. नंतर १८५७ च्या बंडानंतर जेव्हा इंग्लंडच्या राणीच्या हातात सत्ता गेली तेव्हा ब्रिटीश सरकारने या कस्टम्स लाईन ची जबाबदारी आपल्या ताब्यात घेतली. या लाइनची एकुण लांबी तत्कालीन लंडन ते इस्तंबुल एवढ्या अंतराची होती.

वरील फ़ोटोत दाखवलेला हिरवा पट्टा म्हणजे ती विलक्षण बागड आहे. या फ़ोटोत तिच्या आकाराची, लांबीची प्रत्यक्ष कल्पना येते.
१८०३ मध्ये पंजाबपासुन ते थेट ओरिसापर्यंत ही कस्टम्स लाईन उभी करण्यात आली. दर २५ किमीवर कस्टम ऑफीसेस उभारण्यात आली. गस्ती सैनिक, कस्टम अधिकारी व हजारो मजुर या कामासाठी नेमण्यात आले. तत्कालीन पंजाबमधील तारबेला (मुलतान)पासुन ते ओरीसामधील सोनापूरपर्यंत पसरलेली कस्टम्स लाईन म्हणजे ब्रिटीशांच्या दुरदृष्टीचे आणि व्यवहारी, व्यापारी वृत्तीचे एक विलक्षण उदाहरण होते.

असो आपल्या लेखाचा विषय हा नाहीये, आपल्या लेखाचा विषय आहे तो या कस्टम लाईनचा हिस्सा असलेली जवळपास २३०० किमी लांबीची दाट वनस्पतींपासुन बनवलेली आणि १२ फुट उंचीची घनदाट, लांबच्या लांब बागड. नक्की साल नाही सांगता येणार आता पण साधारण १८४० च्या सुरुवातीला ही बागड उभारण्यास सुरूवात झाली असावी. १८६८ पर्यंत जवळ जवळ २९० किमी लांबीच्या बागडीची निर्मीती पुर्ण झाली होती. या बागडीत त्यावेळी सुक्या वनस्पतींचा म्हणजे काटेरी झाडे, वेली यांचा समावेश असे आणि त्यामुळे या बागडीला तेव्हा पांढर्‍या मुंग्या, (वाळवी), उंदीर, आग, वादळ, नैसर्गिक क्षय ई. कारणांमुळे विनाशाची भीती होतीच.

तत्कालिन आंतर्देशीय कस्टम्स कमिशनर अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम यांनी मांडलेल्या अंदाजानुसार साधारण एक मैल लांबीची सुक्या वनस्पतीपासुन उभारण्यात आलेली बागड तयार करण्यासाठी २५० टन सुकलेल्या वनस्पती, काटेरी झाडे, वेली असे सामान लागत असे. आणि ते किमान ५-१० किमी अंतरावरून वाहून आणावे लागत असे. आणि दरवर्षी किमान अर्ध्याहुन अधीक वनस्पती, काटे-कुटे बदलावे लागत. या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणारा खर्च अफाटच होता. त्यामुळे जिवंत बागडीच्या कल्पनेला साकार रुप आले. म्हणजे केवळ काटे-कुटे, सुकलेल्या वनस्पती यांचे कुंपण उभे करण्यापेक्षा तिथे हिरव्या वनस्पतींची लागवड करण्याचा (रोपणी) विचार केला गेला.

अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम
१८६९ च्या सुरुवातीस जिवंत बागडीच्या लागवडीसाठी सर ह्युम यांनी वेगवेगळ्या काटेरी वनस्पतींची प्रायोगिक तत्त्वावर (कस्टम्स लाईन्सवर) लागवड करण्यास सुरूवात केली. त्यात सुरूवातीला भारतीय जातीची बोर, बाभुळ, करवंद अशा अनेक काटेरी झाडांची लागवड करण्यात आली.

जिथे इतर काहीच उगवत नसे अशा ठिकाणी बांबुची रोपे लावण्यात आली. जिथे जमीन खराब होती किंवा लागवडीच्या दृष्टीने कमी दर्जाची होती, तेथली माती खणून काढून तिथे चांगली माती टाकण्यात आली. या बागडीला नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी विहीरी बांधण्यात आल्या, आजुबाजुच्या खाड्यांचे पाणीदेखील बागडीसाठी म्हणुन वळवण्यात आले आणि त्याचबरोबर बागडीच्या पुर्ण लांबीएवढी पक्की सडक बांधून काढण्यात आली. उत्तरेतील सिंधू नदीच्या तीरावरील लाय्याहपासुन ते बुर्‍हाणपुरापर्यंत हि जिवंत बागड उभी करण्यात आली होती.

सन १८७० मध्ये सर अ‍ॅलन ह्युम यांच्याकडुन सर्व सुत्रे पुढील सहा वर्षाकरता जी.एच्.एम. बॅटन यांचाकडे गेली. बॅटनने बागडीची लांबी वाढवण्याचे कार्य आपल्या हातात घेतले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात बागड आणखी १११.२५ मैल लांबवण्यात आली. बॅटनने आणखी एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे जिथे जिवंत बागडीची लागवड करणे शक्य नव्हते तिथे त्याने पक्के दगडी बांधकाम (भिंती) उभारल्या किंवा खोल असे खंदक बांधुन घेतले. ज्यामुळे १८७३ च्या दरम्यान आग्रा आणि दिल्ली यांच्या मधला भाग जवळ जवळ अभेद्य बनला होता. त्यानंतर बागडीची रचना (जागा) थोडीशी हलवुन ती नव्याने निर्माण झालेल्या आग्रा कालव्याच्या किनार्‍याने पुढे वाढवण्यात आली. सन १८७८. बॅटनच्या नंतर डब्लु. एस. हल्से यांनी बागडीच्या शेवटच्या टप्प्याचे काम जवळपास पुर्णत्वास नेले. या काळापर्यंत बागड तिच्या पुर्ण आकारास पोहोचली होती. या वेळेपर्यंत या पुर्ण वाढ झालेल्या बागडीची लांबी जवळजवळ १८०० मैल इतकी वाढली होती. हे काम असेच पुढे चालु राहीले. कस्टम लाईन आणि बागडीच्या रक्षणासाठी (देखभालीसाठी म्हणु हवे तर) खुप मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता होती. या कामावरील वरीष्ठ अधिकारी सोडले तर इतर बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते. १८६९ मध्ये सरकारने जवळपास १४,००० लोकांची नियुक्ती या कामासाठी केली होती. इथेही ब्रिटीश अधिकार्‍यांनी आपले डोके चालवले होते. बागडीच्या भारतीय कर्मचार्‍यापैकी ४२% एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी हे मुस्लीम होते. त्यांना जाणीवपुर्वक त्यांच्या राहत्या जागेपासुन दुर अंतरावरील ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते जेणेकरून आजुबाजुच्या लोकांत त्याची फारशी लोकप्रियता वाढून त्याचा गैरवापर होवु नये. आजुबाजुच्या खेड्यातील लोकांशी सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी खेडुतांना या सीमेवरुन दोन पौंड मिठ मोफत (कुठलाही कर न आकारता) घेवुन जाण्याची मुभा देण्यात आली होती.

हे काम करण्यासाठी लोक उत्सुक असत कारण या कामासाठी त्यावेळच्या निर्धारीत पगारापेक्षा खुप जास्त असा पगार दिला जात असे. रक्षकांना रुपये पाच (५.००) प्रति माह आणि माळी लोकांना रुपये तीन (३.००) प्रति माह. पण सुरूवातीला या कर्मचार्‍यांना आपली कुटूंबे बरोबर बाळगण्याची परवानगी नव्हती. त्यांना घरे ही पुरवली जात नसत, ती त्यांनी आपापल्या खर्चाने माती, लाकुड यांच्या साह्याने बांधुन घ्यावी लागत. १८६८ मध्ये कस्टम्स खात्याने त्यांना आपली कुटुंबे बरोबर आणण्याची परवानगी दिली. हे कर्मचारी १२-१२ तासांच्या दोन समान पाळ्यांमध्ये काम करत. बागडीची पर्यायाने कस्टम्स लाईनची देखभाल आणि गस्त ही मुख्य कामे होती.

अधिकारी वर्ग मात्र मुख्यत्वे करुन ब्रिटीशच असे. खरेतर ब्रिटीशांनी भारतीयांना या पोस्टसाठी आकर्षित करण्याचे खुप प्रयत्न केले. पण या उच्च नेमणुकीसाठी उच्च दर्जाचे इंग्रजी बोलता येणे ही महत्त्वाची अट असल्याकारणाने त्यात ते अयशस्वी ठरले. कारण चांगले इंग्रजी येणार्‍यांना त्या काळात इतर नोकर्‍यात इथल्यापेक्षाही जास्त पैसा मिळत होता. प्रत्येक अधिकार्‍याच्या हाताखाली किमान १०० माणसे आणि ११० ते ३० मैलाच्या कस्टम्स लाईनची जबाबदारी असे, त्यामुळे काम अतिषय कष्टाचे आणि कठीण होते. विशेष म्हणजे अशा ठिकाणी तो अधिकारी हा एकटाच ब्रिटीश असे, दुसर्‍या एखाद्या ब्रिटीश व्यक्तीला भेटण्यासाठी त्याला त्याच्या अखत्यारीतील भाग ओलांडून जावा लागत असे. अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश अधिकारी त्यावेळी काम करत, खरे खोटे तेच जाणोत पण ते जर खरे असेल तर मग मनापासुन दाद द्याविशी वाटते आणि म्हणावसं वाटतं “उगीच नाही ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं!”

खरेतर बरेचसे ब्रिटीश अधिकारी ही कस्टम लाईन आणि अर्थातच बागडही नष्ट करायच्या विचाराचे होते. कारण तिच्यामुळे भारतीय उपखंडातील मुक्त व्यापारव्यवस्थेला तसेच पर्यंटनाला मोठ्या प्रमाणावर बाधा येत होती. ही सीमा रेषा खासकरून मिठ आणि साखर यांच्या आयात निर्यातीवर कर आकारण्यासाठी उभी करण्यात आलेली होती. साखरेवर तर उत्पन्नाच्या १०% इतका प्रचंड कर लावण्यात येत असे. पण त्या दरम्यानही भ्रष्टाचार आणि मनमानीपणाचा रोग या बागडीलाही होताच. बागड आणि सीमा रेषेवर तैनात अधिकारी मनमानी कारभार करत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता. १८५७ च्या बंडाच्या दरम्यान काही ठिकाणी बागड तसेच सीमा अधिकार्‍यांच्या छावण्या जाळण्यातही आल्या होत्या. पण या सीमारेषेवर (बागडीवर) मिळणारे कराचे प्रचंड उत्पन्न इतर कुठल्याही समस्येकडे डोळेझाक करायला लावण्यास समर्थ होते. हि बागड तसेच सीमारेषा पुर्णपणे नष्ट करण्यापुर्वी भारतातील मिठाच्या सर्व उत्पादनावर ताबा मिळवण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न होता.जेणेकरुन मिठाच्या उत्पादनावरच कर लावता आला असता.

लॉर्ड मायो आणि लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कारकिर्दीत ही सीमा रेषा आणि बागडीचे अस्तित्व संपवण्याच्या कामाला वेग आला. नंतर लॉर्ड लिटन यांनी लागु केलेल्या कायद्यानुसार मिठावरील टॅक्स बर्‍यापैकी कमी करण्यात आला. बंगालमध्ये २.९० रुपये आणि शेष भारतात २.५० रुपये इतका. तत्कालीन सरकारचे भारतातील अर्थमंत्री सर जॉन स्ट्रॅशे यांच्या प्रयत्नांना यश येवून सन १९८० मध्ये मिठाच्या आयातीवरचा कर रद्द करण्यात आला आणि मुक्त व्यापाराला चालना मिळाली, ज्याचा फायदा मिठाची तस्करी नष्ट होण्यात झाला. सन १८८२ मध्ये लॉर्ड रिपन यांनी संपुर्ण भारतासाठी एकच दर लागु केला तो म्हणजे रुपये दोन (२.००) प्रति मौंड (३७ किलो). ज्यामुळे सरकारला जवळजवळ १.२ दशलक्ष रुपये दरसाल एवढे नुकसान सहन करावे लागले.

यामुळे मिठाच्या तस्करीला मात्र पुर्णपणे आळा बसला. म्हणजे गंमत बघा ज्या कारणासाठी बागड आणि एवढी विस्तृत सीमा रेषा उभी करण्यात आली होती, त्याच कारणाने ती नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. जे तस्कर सीमा विभागातर्फे पकडले गेले त्यांना आठ रुपये (८.००) एवढा प्रचंड दंड आकारण्यात आला आणि जे तेवढा दंड भरु शकत नव्हते त्यांना सहा आठवड्याची कैद भोगावी लागली. म्हणजे व्यापारी ब्रिटीशांनी त्यातूनही पैसा कमावला. ब्राव्हो….! १८६८ पासुन १८७८ पर्यंत दहा हजाराच्या आसपास लोक तस्करीच्या आरोपाखाली पकडले गेले. लाच देवुन किई जण निसटले असतील त्यांची संख्या अनुत्तरीतच आहे. तस्करीचे अनेक प्रकार त्या काळात हाताळले गेले. सुरुवातीच्या काळात उंटावर किंवा घोड्यांवर मीठ लादुन शस्त्रांच्या जोरावर सीमा रेषा जबरदस्तीने ओलांडली जात असे. नंतर सीमा अधिकार्‍यांच्या भ्रष्ट वृत्तीचा फायदा घेवून लाच वगैरे देवुन करमुक्त भागातून मिठाची तस्करी करण्यात येत असे.

१८८८ साली चांदीच्या घसरलेल्या भावामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मिठावरचा टॅक्स परत २.५० रुपये प्रति मौंड इतका वाढवण्यात आला. मिठावरचा कर हे आता ब्रिटीश सरकारसाठी निव्वळ कमाईचे साधन बनले ज्याने १९३० सालच्या मिठ सत्याग्रह आंदोलनाला प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी या मिठाच्या करामुळे आपली असहकाराची चळवळ चालु केली. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी जवळ जवळ ८०,००० जनतेच्या साथीने अहमदाबादपासुन ३२० किमी अंतरावर असलेल्या दांडी या मिठाचे उत्पादन होणार्‍या समुद्रकिनार्‍यावरील खेड्यात ब्रिटीशांचा मिठाचा कायदा मोडत मिठ सत्याग्रहाची सुरूवात केली.

बापुंची हि यात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत दांडीयात्रा म्हणुन लोकप्रिय झाली. या मिठ सत्याग्रहाने जरी मिठावरील टॅक्स कमी अथवा रद्द करण्यात अपयश आले असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिला. असहकाराचा नवा मंत्र दिला. शेवटी १९४६ च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या नेतृत्वाखालील तत्कालिन हंगामी सरकारने मिठावरील कर पुर्णपणे रद्द केली. खर्‍या अर्थाने आंतरदेशीय सीमा रेषा त्याचवेळी नष्ट झाली असे मानता येइल.

रॉय मॉक्सहॅम :

इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारली गेलेली असुनही या सीमारेषेचे किंवा बागडीचे वर्णन तत्कालीन इतिहासात किंवा ब्रिटीश अहवालातही आढळत नाही. १९ व्या शतकात, एक ब्रिटीश लायब्ररीयन कम Conservator रॉय मॉक्सहॅम याच्या वाचनात एकदा भारतातील या अवाढव्य बागडीची माहिती आली आणि रॉयने स्वतःला भारतातील या बागडीच्या संशोधनात वाहुन घेतले. या साठी रॉयने भारताच्या एकुण तीन फेर्‍या केल्या. प्रत्येक वेळी तो जवळपास ३-४ महिने भारतात राहीला. भारताच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या अवस्थेत, पडेल त्या परिस्थितीते भटकला. पहिल्या दोन दौर्‍यात त्याला या बागडीच्या सद्ध्याच्या अवस्थेबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. मुळात अशी काही गोष्ट अस्तित्वात होती हेच इथे कुणाला माहीत नव्हते. त्याच्या तिसर्‍या आणि शेवटच्या फेरीत मात्र रॉयला एक वृद्ध व्यक्ती भेटली जिने तिच्या तरुणपणात एका व्यक्तीला कस्टम्स लाईनबद्दल बोलताना ऐकले होते. तेवढ्याशा सुतावरुन रॉयने अक्षरशः स्वर्ग गाठला आणि त्या व्यक्तीला शोधुन काढले आणि शेवटी आता अस्तित्वात नसलेल्या कस्टम लाईन उर्फ सीमारेषेची जागा शोधुन काढली. त्यावेळी तिथे फक्त एक लांबपर्यंत पसरलेला उंचवटाच उरला होता. अखेरीस रॉयने आपल्या या संशोधनाची जगावेगळी कहाणी लिहून काढली आणि त्यामुळे जगाला कळाले की अशी काही अद्वितीय गोष्ट ब्रिटीशांनी भारतात उभी केली होती. अर्थातच त्यामागची काळी बाजुही उजेडात आली.

रॉय, तुझे प्रयत्न आणि जिद्द यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या एवढ्या मोठ्या अन्याय, अत्याचाराची ही कहाणी उघडकीस आली. तुझे शतशः आभार. पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या कल्पकतेलाही मनापासुन सलाम.

संदर्भ : द ग्रेट इंडीयन हेज : विकीपिडिया

तळटिप : पुस्तकातील उतार्‍यांचे भाषांतर करणे मलातरी शक्य नसल्याने मी विकीपिडियाचा आधार घेतला. त्यातही बर्‍याच चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. सुचनांचे आणि वाचकांना या संदर्भात असलेल्या अन्य माहितीचे मनापासुन स्वागत. बाकी विस्तृत माहिती वरील दुव्यावर उपलब्ध आहेच.

विशाल कुलकर्णी.