Category Archives: पुस्तक परिक्षण

दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव… माणूस माझे नाव !

 

मीमराठीच्या पुस्तक परिचय स्पर्धेसाठी जेव्हा हा लेख/परिचय लिहायला घेतला तेव्हाच मनोमन भीती वाटत होती की हे शिवधनुष्य आपल्याला पेलवेल की नाही? हे असं बर्‍याचवेळी, बर्‍याच जणांना हा अनुभव येत असावा, निदान हे पुस्तक वाचताना तरी नक्कीच. शक्यतो पुस्तक-परिचय लिहीताना लेखक, परिचयासाठी / समीक्षेसाठी घालुन दिलेल्या नियमानुसार, प्रवाहाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो, कारण अन्यथा स्वतःचे विचार मांडण्याच्या ओघात वाहवत जाण्याचा, पुस्तकाच्या मुळ विचारधारेच्या विपरीत जाण्याचा संभव असतो. त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न होता. पण काही पुस्तके हीच मुळी वादळी स्वभावाची असतात, कारण त्यांना प्रत्यक्ष अनुभवाचा, लेखकाने स्वतः भोगलेल्या वेदनांचा स्पर्श लाभलेला असतो. ही पुस्तके तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी कुठल्यातरी एखाद्या बेसावध क्षणी तुमच्यावर ताबा मिळवतात आणि प्रवाहाबरोबर चालण्याची धडपड करणारे तुम्ही त्या पुस्तकाच्या वेगाबरोबर भरकटायला लागता. आपली ढोबळ वाट सोडून स्वतःला त्या पुस्तकाच्या स्वाधीन करुन टाकता. मग ते नेइल ती आपली वाट ठरते. पण गंमत म्हणजे हे अशा प्रकारे प्रवाहपतीत होणंही आपल्याला एक मनस्वी आनंद देवून जातं. ही त्या पुस्तकाची ताकद असते, हे त्या लेखकाचं, त्या कविचं सामर्थ्य असतं. उचल्या, बलुतं, कोसला, पांगिरा, झाडाझडती तसेच जी.ए. किंवा चिं.त्र्यं.च्या सगळ्याच कथा-कादंबर्‍या या प्रकारात मोडतात. ही प्रस्तावना मांडण्याचं कारण म्हणजे ‘या पुस्तक परिचय स्पर्धेसाठी’ मी हे पुस्तक निवडलय खरं पण कुठल्या क्षणी मी माझं अस्तित्व विसरून या पुस्तकाच्या, त्यातल्या अफाट लेखनाच्या ताब्यात जाईन, प्रवाहाबरोबर चालणे सोडून भरकटायला लागेन हे मलाच माहीत नाही. तेव्हा तसे झाल्यास आधीच क्षमा मागतो.

****************************************************************************

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व द्वारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन् चालली माझी लढाई

सुर्‍या मनापासून अगदी एकाग्र होवून ऐकवत होता. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर जणु काही आसवांची, रक्ताची शाई करुन लिहील्याप्रमाणे अंगावर येत होते. १९९३ साली, कॉलेजच्या कँटीनमध्ये सात जणांमध्ये तीन चहा आणि या हातातून त्या हातात फिरणारी सिगारेट यांच्या साक्षीने सर्वात प्रथम थरारून सोडणारा हा अनुभव घेतला होता.

सुर्‍या, साल्या कुठल्या तरी क्रांतिकारकाची कविता दिसत्येय ही. बाय द वे, तुझ्यासारख्या दिलफेक आशिककडून ही कविता ऐकताना काहीतरी विचित्रच वाटतय यार. पण काही म्हण, साला दम है इस कविमें. कसले अफाट ताकदीचे शब्द आहेत यार. “माझिया रक्तासवे अन् चालली माझी लढाई” ! साला नुसती ही कल्पना ऐकुनच शहारायला होतय.

“दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही, ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले” …

काहीतरी अतिशय भयाण असं दु:ख आलेलं आहे या माणसाच्या नशीबात. नक्कीच कोणातरी देशभक्त क्रांतिकारकाची कविता आहे ही. कोण आहे बे? अजुन काही कविता आहेत का त्याच्या. दे ना, जबराट प्रकरण दिसतय यार.

“विशल्या, क्रांतिकारक तर हा माणुस आहेच यार ! पण खरंतर तो त्याहीपेक्षा खुप मोठा आहे. अगदी हिमालयदेखील त्यांच्यापुढे खुजा वाटेल यार. सुर्‍या उर्फ सुरेश खेडकरने आपल्या झोळीतुन एक पुस्तक काढले आणि माझ्या हातात दिले. ते पुस्तक हातात घेऊन त्यावरचे कविचे नाव वाचले आणि पहिला विचार मनात आला….

“बरोबर, दुसरं कोणी असुच शकत नाही. या माणसापुढे हिमालयच काय तो आकाशातला देव सुद्धा खुजाच ठरेल !”

त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं,आहे “ज्वाला आणि फुले” आणि कविवर्यांचं नाव आहे “बाबा आमटे”

JAF

कशी गंमत आहे बघा, कुठल्याही आदरणीय , पुज्यनीय व्यक्तीबद्दल बोलताना आपण त्या व्यक्तीच्या नावापुढे माननीय, आदरणीय, पुज्यनीय, श्रीमान, राजमान्य राजेश्री अशी किंवा यासारखी संबोधने वापरतो. पण बाबांबद्दल बोलताना या असल्या औपचारिक संबोधनांची गरजच राहत नाही. उलट मी तर म्हणेन या वरच्या सर्व संबोधनांना सन्मान द्यायचा झाल्यास त्यामागे ‘बाबा’ लावावे, त्याने त्या आदराच्या भावनेचाच सन्मान होइल. मुळातच ‘बाबा’ या दोन अक्षरी आकारांत शब्दात सगळ्या विश्वाचे आर्त सामावले आहे आणि बाबांनी तर या संबोधनाला जणुकाही सार्थकताच प्राप्त करुन दिली आहे. जगातलं सगळं पावित्र्य, सगळं मांगल्य, सगळं सामर्थ्य या साडेपाच फुटी माणसात सामावलेलं होतं. मला त्या क्षणापर्यंत ‘बाबा’ माहीत होते ते फक्त कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व, आपलं सगळं आयुष्य वाहणारा एक निस्वार्थ, निष्काम सेवाव्रती म्हणुन ! पण सुर्‍याने बाबांची ही नवी ओळख करुन दिली.

बाबा नेहमी म्हणायचे ” आनंदवनातील रोगापेक्षा आनंदवनातील लोकांचा आत्मविश्वास अधिक लागट आहे.” त्यांचा तो आत्मविश्वासच जणु त्यांच्या वर दिलेल्या ‘गतीचे गीत’ या कवितेतुन ओसंडून वाहताना दिसतो. सद्ध्याच्या बिकट स्थितीचे भान राखुन, तिच्याशी सामना करत उद्याच्या भविष्याचे एक आशादायक चित्र उभे करणारे ‘बाबा’ नि:संशय एक द्रष्टे कवि होते. आपल्याला काय करायचेय हे त्या महामानवाने निश्चित ठरवलेले होते. त्यासाठी काय काय करावे लागेल, कुठली बलिदाने द्यावी लागतील याचे भान त्यांना नक्कीच होते. कदाचित म्हणुनच ते ‘आनंदवना’सारख्या सुदृढ आणि सशक्त वसाहतीची निर्मीती करु शकले. हो मी आनंदवनातल्या रहिवासींना सुदृढ आणि सशक्तच म्हणेन. शारिरीक दृष्ट्या भलेही ते अपंग असतील पण ‘बाबांच्या’ सहवासाने त्यांना जे प्रचंड असे मानसिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास दिला आहे तो आपल्यासारख्या तथाकथीत निरोगी लोकांच्यासुद्धा नशीबात नसेल.

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरु स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई….. दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही !!

पण अमुक एक गोष्ट करुन तिथे थांबणे बाबांचा स्वभावच नव्हे.

“मीच इथे ओसाडीवरती,
नांगर धरूनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती”

हा सार्थ अभिमान बाळगुनही त्यापाशी थांबणे हे बाबांना जमत नाही. आनंदवनाला त्याचे सामर्थ्य प्राप्त करुन दिल्यावर बाबा माडिया गोंडांच्या जिवनात आनंद फुलवण्याच्या मागे लागतात. त्यातुन ‘हेमलकसा प्रकल्प’ उभा राहतो. सतत नवनवी आव्हाने त्यांना खुणावत राहतात. “सुखेच माझी मला बोचती” असे म्हणत हा महामानव दिन-दुबळ्यांची दु:खे आपलीशी करतो. त्यांच्या वेदना स्वतः भोगून त्यांची त्या दु:खापासून, त्या वेदनांपासुन मुक्तता करण्याच्या पवित्र कार्यासाठी पुन्हा पुन्हा आपले जिवन, आपले सर्वस्व झोकून देत राहतो.

सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…
माणूस माझे नाव !

बाबांच्या कवितांबद्दल बोलताना पु.ल. म्हणतात “या संग्रहाला ‘ज्वाला आणि फुले’ असे नाव दिले आहे. पण मी ह्या काव्याला अग्निपुष्पच म्हणेन. हल्ली जिवंत शब्द कुठले आणि शब्दांचे पेंढे भरलेले सांगाडे कुठले हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे. शब्दांचा चलन फुगवटा वाढला आहे, नकली शब्दांच्या टांकसाळी जोसात आहेत. अशा काळात ज्या शब्दांना एखाद्या समर्पित जीवनाचे तारण असते तेच शब्द बावन्नकशी सोन्यासारखे उअजळून निघतात. या असल्या बंद्या नाण्यांचे मोल आणखी कशात करायचे? “ज्वाला आणि फुले” हे एकदा वाचुन हातावेगळे करायचे पुस्तक नाही. पुन्हा-पुन्हा वाचायचे आहे. इथे ‘स्वस्थ’ करणार्‍या वांगमयापेक्षा ‘अस्वस्थ’ करणारे वांड्^मय थोर मानले आहे. बाबा आमटे यांनी आमच्या सारख्यांच्या डोक्यातही विचारांची पिल्ले सोडली आहेत, ती आता थैमान घालीत राहणार! विचारांची पिल्ले ही सुर्याच्या पिल्लांसारखी डोळ्यापुढे काजवे चमकवतात.

या काव्यसंग्रहाची अक्षरशः पारायणे केली तेव्हा जाणवलं की पु.ल. ना नक्की काय म्हणायचं होतं? काय नाही बाबांच्या कवितेत ? त्यात तरल काव्य तर आहेच पण त्या काव्याला बाबांच्या ज्वलंत विचारांची, चिंतनाची आणि निष्काम तत्त्वज्ञानाची जोड आहे. स्वतःबद्दलचा, स्वतःच्या निश्चयाबद्दलचा अमोघ असा आत्मविश्वास आहे. आनंदवनात समाजाने त्याज्य ठरवलेल्या कुष्ठरोगी बांधवांचे दु:ख दुर करत त्यांचे दु:ख, त्यांची वेदना स्वतः जगताना त्या निर्मळ, निस्वार्थ योग्याच्या मनाला झालेल्या जखमांची सोबत त्या काव्याला आहे. समाजाने त्याज्य ठरवलेल्या त्या दुर्दैवी जिवांच्या वेदनेने स्वतःच व्याकुळ झालेल्या एका कोमल , मृदु मनाच्या संवेदना आहेत. पण बाबांची कविता त्यांच्या मनाप्रमाणे केवळ मृदु वा कोमल राहत नाही. तर प्रसंगी ती त्यांच्या स्वभावाप्रमाणे कठोर, निश्चयी बनते. एखाद्या विद्युलतेसारखी, एखाद्या लवलवत्या ज्वालेसारखी उफाळून येते.

आपल्या ‘शतकांचे शुक्र’ या कवितेत बाबा म्हणतात..

त्याने उठत नाही केवळ पेल्यातले तुफान
उठते त्यातून कधी मातृभुमीच्या वंदनेचे जयगान
जे दणाणून टाकते गुलामीच्या अंधारातही अस्मान

स्वातंत्र्य गर्जत छातीत गोळी घेता ती गीते
उठवतात सुस्त कबंधे आणि जागवतात प्रेते
याच स्वरांतून उठतात आझादीची आगेकुच करणारे
आणि मृत्यूला जिंकून मरणारे नेते

अतिशय कोमल, मृदु मनाचा हा कवि स्वतःच्या कविता संग्रहाला नाव देतो ‘ज्वाला आणि फुले’ ! पण जस-जसे आपण या कविता वाचत जातो तस-तसे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागते ती म्हणजे याचं नाव असायला हवं होतं “ज्वालांची फुले”!

कारण बाबांचे शब्द फुलांसारखे भासले तरी ती साधी सुधी फुले नाहीयेत. बाबांचे शब्द तेजस्वी ठिणगीचे रुप घेवून येतात. स्वतः तर जळतातच पण त्याबरोबर शतकानुशतके तथाकथीर रुढी-परंपरांच्या जाचक नियमांमुळे भरडल्या जाणार्‍या, स्वतःच्याच नियतीने लादलेल्या दुर्दैवाचे बळी ठरलेल्या शोषीतांची दु:खे, त्यांचे कष्ट, त्यांची संकटे जाळत सुटतात. स्वत्व गमावलेल्या मानवतेला तिच्या सर्वोच्च स्थानावर नेवून बसवतात. बाबांची कविता ही केवळ कल्पनाशक्तीची उड्डाणे नाहीयेत, बाबांच्या कविता म्हणजे तुमच्या माझ्याप्रमाणे यमक जुळवून रचलेल्या ओळी नाहीयेत. बाबांची कविता म्हणजे इंद्राचा विलासी इंद्रलोक नाहीये. बाबांची कविता म्हणजे वेदनेचा हुंकार आहे. अखंड वेदना, ती सुद्धा स्वतःसाठी नव्हे, तर समाजातील शोषीत वर्गासाठी स्वतः सोसून, तिचा स्वतः अनुभव घेवून मग त्या वेदनेला शब्दरुपात मांडायचे ही बाबांची पद्धत होती. त्यामुळे बाबांची कविता कधीच शब्दांचा खेळ वाटली नाही. ती थेट एखाद्या अग्नीशलाकेसारखी अंगावर येते. कै. साने गुरुजींनी लिहिले होते, ‘सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे’. बाबांनी आपले आयुष्य अशा दीन दुबळ्यांना हात धरून उठवण्यासाठी व जगाच्या व्यापारात आपल्या पायावर उभे करण्यासाठी व्यतीत केले. कोरडी भाकरी पळवून नेणाऱ्या कुत्र्याच्या मागे हातात तुपाची वाटी घेऊन संत एकनाथ धावत राहीले, अशी गोष्ट सांगितली जाते. अशा वागण्याला कोणी वेडगळपणा मानेल, पण अशा वेडातच मानवतावादाची बीजे मूळ धरत असतात. बाबांचे महारोग निवारणाचे कार्य असो, वा ‘जोडो भारत’चा मंत्र जपत देश पिंजून काढण्याचा उपक्रम असो, पंजाबमधील त्यांची शांतियात्रा असो वा सरदार सरोवर धरणाचा लढा, बाबांच्या या सर्व चळवळींना नैतिकतेचा आधार आणि मानवतावादाचा गाभा होता. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनांबाबत ज्यांना शंका वा विरोध होता, त्यांनाही बाबांच्या प्रामाणिकपणाबद्दल व सद्हेतूबद्दल केव्हाही संदेह नव्हता.

फुकाची अवडंबरे करत बसण्यापेक्षा “सेवा हीच प्रार्थना” हा मंत्र बाबांनी मनाशी जपला आणि त्यानुसार स्वतःचे आयुष्य झोकून दिले. बाबांच्या कर्तुत्वाचे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे मुळ त्यांच्या प्रचंड अशा आत्मविश्वासात आणि प्रबळ इच्छाशक्तीत लपलेले आहे. अतिशय आशावादी असलेल्या बाबांना आपल्या शक्तीस्थळांबरोबरच आपल्या उणीवांचीही पुरेपूर जाणिव होती. पण उणीवांचा बाऊ करण्यापेक्षा आहे त्यात विकल्प शोधणे, समस्यांचे समाधान शोधणे याची सवय बाबांनी स्वतःला जडवून घेतलेली दिसते.

… निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान जेव्हा मी स्वीकारले
तेव्हाच त्याची चाहूल माझ्या पाठीशी असलेली मला जाणवली
अपयशांनी फेसाळलेला माझा चेहरा पाहून
आता मी कधीच हताश होत नाही
कारण जीवनाचा उबदार हात माझ्या पाठीवर फिरतच असतो

आपण कशाला हात घातलाय ते बाबांना माहीत होते. पिडीतांसाठी, दीनांसाठी, कुष्टरोग्यांसाठी ते एक नवे जग, एक नवी दुनीया निर्माण करायला निघाले होते. हाती घेतलेले हे काम सोपे नाही, तर सर्वस्वाचा होम करायला लावणारे आहे याची बाबांना जाणिव होती. पण त्या महामानवाने आपल्या आयुष्याच्या समीधा या यज्ञात अर्पिण्याचा दृढनिश्चयच केला होता. आता कुठलीही आपत्ती, कुठल्याही बाधा त्यांना अडवु शकणार नव्हत्या. कारण नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या विश्वामित्राच्या प्राक्तनात काय असते हे बाबांना पक्के ठाऊक होते. आपल्या ‘विश्वामित्र’ या कवितेत बाबा म्हणतात.

विश्वामित्राने इंच इंच सरकायचे असते
पाठीवर घेऊन आघातांच्या ऋणांचे ओझे
तो सातदा पडतो आणि आठदा उठतो
आणि त्याचा पल्ला सतत पुढेच आहे
प्रलोभने स्वीकारण्याचे साहस
आणि ती बाजूला सारण्याचा निर्धार
दोन्ही त्याच्या ठायी आहेत
म्हणून त्याला कधी पळवाट शोधावी लागत नाही.
शेवटचे शिखर त्याला कधी सापडत नाही
आणि प्रत्येक शिखरावर तो फक्त एक क्षण असतो
त्याच्या ह्या क्षणांनी मी माझी उंची मापीत असतो !

किती स्पष्ट आणि स्वच्छ विचारसरणी ! कुठलाही आणि कसलाही भाबडा आशावाद नाही. उगाच मनात आले म्हणून भावनांबरोबर वाहावत जाणे नाही. तर जे कार्य हाती घेतलय त्यात काय काय होवू शकेल याची अगदी स्पष्ट कल्पना बाबांना होती.

‘ज्वाला आणि फुले’ हा केवळ एक कवितासंग्रह नाही तर बाबांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या भविष्यातल्या वेगवेगळ्या संकल्पांची जणु रासच आहे. यात एकुण २३ दिर्घकविता आहेत. प्रत्येक कविता म्हणजे जणुकाही बाबांनी घेतलेल्या ज्वलंत, मुर्तीमंत अनुभवाचे शब्दरुपच आहे. या काव्यामध्ये रक्त सळसळवणारी धुंदी आहे, आयुष्याला आव्हान द्यायचे सामर्थ्य आहे. जगण्याच्या धडपडीला नवचैतन्य प्राप्त करुन देणारे सामर्थ्य आहे. या काव्यसंग्रहाला लिहीलेल्या प्रस्तावनेत वि. स. खांडेकर म्हणतात…

“पुरुषार्थाच्या सर्व प्रचलित अर्थांपेक्षा एक नवा खोल अर्थ बाबासाहेबांच्या जगावेगळ्या धडपडीत मला प्रतीत झाला. ज्या करुणेचे कृतीत रुपांतर होत नाही ती वांझ असते, हे लहानपणापासून अंधुकपणे मला जाणवत आले होते, पण करुणेच्या पोटी जन्माला आलेली कृती ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असुन चालत नाही, ती रोगाच्या विषारी मुळावर घाव घालणारी शस्त्रक्रियाच असायला हवी, ही तीव्र जाणीव ‘आनंदवना’ च्या मुळाशी असलेल्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने मला करुन दिली. आपल्या सार्‍या सामाजिक अनुभवाच्या संदर्भात हे तत्त्वज्ञान मोलाचे आहे, अशी माझी खात्री होऊन चुकली.”

आपलं हेच जिवनाचं तत्त्वज्ञान बाबांनी त्यांच्या कवितातुन मांडलेले आहे. ज्या आत्मविश्वासाने, ज्या जिद्दीने बाबांनी ‘आनंदवनात’ स्वर्ग उभा केला. तो सारा आत्मविश्वास, ती जिद्द बाबांच्या या ‘ज्वाला आणि फुले’ नावाच्या आत्मचिंतनपर लेखनात जणु काही त्यांच्या उत्कटतेची वसने लेवून कवितेच्या रुपात अवतरली आहे. पण या शलाकेचं वैशिष्ठ्य असं आहे की ज्याच्याकडे या विद्युलतेच्या शेजारी उभे राहून तिचा दाहक, पण संजीवक स्पर्श सहन करण्याचे सामार्थ्य आहे केवळ तोच या स्वच्छंद आत्म-चिंतनाचा मनसोक्त आस्वाद घेवु शकेल.

बाबांच्या या विद्युलतेबद्दल बोलायला माझे शब्द खुपच तोकडे आहेत. तो प्रयत्न करुन स्वतःचेच हात जाळुन घेण्याचे धाडस माझ्यात नाहीये, म्हणुन वि.स. खांडेकरांच्याच वाक्यांनी या लेखाचा समारोप करतो.

“एकाच वेळी शिंगे, तुतार्‍या, रणभेरी वाजाव्यात, तशा प्रकारचा शब्दांचा, कल्पनांचा आणि विचारांचा कल्लोळ आहे. हे शब्द आणि कल्पना, जीवन उत्कटपणे जगत असताना एका प्रज्ञावंताच्या हृदयाला झालेल्या जखमातल्या रक्ताने माखलेल्या आहेत. मात्र हे रक्त नुसते भळभळत वाहणारे नाही. चिळकांडी उडत असतानाच त्याचे ज्वाळेत रुपांतर होते. याचे कारण बाबासाहेबांची अनुभूती केवळ हळव्या भावनेच्या किंवा क्षणिक वेदनेच्या टप्प्यापाशी थांबत नाही. स्वतंत्र बुद्धीने ती त्या दु:खाच्या उगमाचा विचार करु लागते. इतिहास, पुराणे, नानाविध शास्त्रे, शतकानुशतके बदलत आलेले मानवी जीवन, हे विसावे शतक, त्यातले ज्ञान-विज्ञान आणि त्याच्या पुढल्या जटिल समस्या…”

या सगळ्यांचा उहापोह बाबांनी आपल्या या अग्निपुष्पांच्या साह्याने केलेला आहे. या सर्वांच्या साह्याने आजच्या उध्वस्त मानवाच्या पुनरुज्जीवनाचा ही अनुभूती शोध घेते. बाबासाहेब बोलू लागतात ते आपल्याला प्रज्ञेला घडलेल्या नव्या मार्गाचे दर्शन स्पष्ट करण्यासाठी. मानवाच्या शारिरिक, मानसिक, आर्थिक आणि आत्मिक पुनरुत्थानाचे कंकण हाती बांधलेला हा शूर समाजसेवक, शब्दांपासून विचारापर्यंत वापरून गुळगुळीत झालेली सारी नाणी दूर फेकून देतो. नवा विचार आणि नवे शब्द यांची या चिंतनात पडलेली सांगड चाकोरीतून जाणार्‍या वाचकांना अधूनमधून गोंधळात पाडील, नाही असे नाही, पण हा दोष केवळ लेखकाचा नाही. बाबासाहेबांच्या कार्याची ज्याला कल्पना नाही त्याला या चिंतनातला रस मुक्तपणे चाखता येणारच नाही.”

शेवटी माझं म्हणून एवढेच सांगेन ‘ज्वाला आणि फुले’ या केवळ कल्पित कविता नाहीत किंवा भावुक होवून शब्दात उतरवलेल्या पोकळ भावनाही नाहीत. तो एका मनस्वी, पवित्र मनाच्या महायोग्याला घडलेला जीवनाचा, त्यातल्या सुख्-दु:खाचा, वेदनेचा, तिच्या निराकरणाचा साक्षात्कार आहे. हे केवळ पोकळ शब्द नाहीत. तर आधी केले आणि मग सांगितले या इतिकर्तव्यतेच्या महन्मंगल भावनेतूल जन्माला आलेली एक ओजस्वी शिल्पकृती आहे. त्या महान आत्म्याचे, ज्याने आपल्या आयुष्यातली सर्व सुख्-दःखे कोळून प्यालेली आहेत , स्वतः नगरपालिकेचा उपाध्यक्ष असताना भंग्याची पाटी डोक्यावरून वाहून नेण्याची हिंमत दाखवली आहे अशा महात्म्याचे हे तेजस्वी बोल आहेत. हा झंझावात पेलण्याचं, हे वादळ तोलण्याचं बळ जर तुमच्या बाहूत असेल, या ज्वलंत विचारधारेची अग्निशलाका पेलण्याची ताकद जर तुमच्या मनात असेल तरच या पुस्तकाला हात घाला. एक मात्र नक्की, जर तुमच्यात हे वादळ पेलण्याची ताकद असेल तर तुम्हाला आपल्या तेजाचा छोटासा का होइना, पण अंश देण्याचे सामर्थ्य आणि खात्री या अग्निपुष्पात नक्कीच आहे.

पुस्तकाचे नाव : ज्वाला आणि फुले
चिंतन : बाबा आमटे
शब्दांकन : रमेश गुप्ता
प्रस्तावना : वि. स. खांडेकर
प्रकाशक : गायत्री प्रकाशन, पुणे
प्रमुख वितरक : रसिक साहित्य प्रा. लि. पुणे

(पुर्वप्रकाशन : मीमराठी.नेट)

रान : एक अथक चालणारा प्रवास (जी.ए.कुलकर्णी)

रान : जी.ए. कुलकर्णी
रान : जी.ए. कुलकर्णी

पुस्तक परिचय : The Trees : अनुवाद : “रान”

लेखक: Conrad Richter : अनुवादक : जी.ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन

अगदी लहानपणापासून जी.ए. कुलकर्णी या नावाबद्दल मनात एकप्रकारचे गुढ कुतुहल व्यापुन राहीलेले आहे. अगदी परवा-परवा पर्यंत जी.ए. म्हणजे..”जाऊदे यार, आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे ती किंवा डोक्यावरुन जातं यार सगळं” अशी काहीशी भावना मनात होती. अर्थात अगदी आजही त्यातले तथ्य तसेच आहे. पण काही वर्षांपूर्वी कुठल्यातरी एका बेसावध क्षणी असे ठरवले की कळो ना कळो, पण वाचून तर बघुयात. एका ऐवजी दोन वेळा वाचावे लागेल, कदाचित थोडी जास्त पारायणे करावी लागतील, पण किमान १० टक्के तरी कळेलच की ! या भावनेतून ’जी.ए.’ वाचायला सुरूवात केली. एके दिवशी तीर्थरुपांनी आमच्या हातात जीएंना बघितले आणि त्यांनाच काय वाटले कुणास ठाऊक? दुसर्‍याच दिवशी आमच्या हातात ‘जीएंची निवडक पत्रे’ आलं. बहुदा वाचनालयातुन शोधून आणुन दिलं होतं आण्णांनी. ति. आण्णांनी सांगितलं जीएंचं साहित्य वाचण्यापुर्वी जीए ही काय चीज आहे ते जरा जाणुन घे, म्हणजे मग पुढे जीएंचं साहित्य समजणं थोडं, फार नाही पण थोडं का होइना, सोपं होइल. ते चार खंड वाचायला घेतले. पहिले काही दिवस अवस्था आंधळ्यासारखीच होती. कुठल्यातरी एका क्षणी लक्षात आले की हे म्हणजे पोहायला शिकण्यासारखे आहे. लहानपणी गावी गेलो की शेतात जायची प्रचंड भीती वाटायची, कारण शेतात गेलो की आण्णा कंबरेला तो पांगरीच्या लाकडाचा बिंडा बांधायचे आणि सरळ विहीरीत ढकलुन द्यायचे. पाण्यात पडले की क्षणभर सगळे शरीर थेट पाण्यात, आत खोलवर जायचे. नाका-तोंडात पाणी गेले, पाण्याखाली आजुबाजुला पसरलेला अंधार बघितला की मरणशांतता दाटायची. मन प्रचंड भयाने व्यापून जायचे…! क्षणभरच्..कारण लगेचच मग जिवाच्या आकांताने पाण्याच्या वरच्या स्तराकडे जायची धडपड सुरू व्हायची. पुढच्याच क्षणी प्रकाश दिसायचा. असं दोन तीन वेळा झालं आणि लक्षात आलं की अरे पोहणं शिकण्यासाठी पाणी किती खोल आहे याचा उहापोह करत बसण्याची गरज नाहीये. आवश्यक आहे ते फक्त हात्-पाय हलवत राहणं. कधी ना कधी पोहायला जमेलच….! तसंच काहीसं जीएंच्या बाबतीत झालं. फरक एवढाच आहे की दोन-चार प्रयत्नात मी व्यवस्थीत पोहायला शिकलो होतो. जीएंना समजून घेण्याचे प्रयत्न मात्र अजुन चालुच आहेत. विहीरीचं ठिक असतं हो, समुद्राचा थांग कधी कुणाला पुर्णपणे लागलाय का? पण म्हणून काय डुबक्या मारायच्याच नाहीत. अधुन्-मधुन आपल्याही नकळत हाती आलेल्या शिंपल्यात एखादा टपोरा मोती गवसून जातोच. ‘पत्रे’ संपल्यावर आण्णांनी सांगितलं की अजुनही थेट जीएंना हात घालु नकोस. जमलं तर आधी त्यांची ‘अनुवादितं’ वाच. मग सोलापूरच्या आमच्या छोट्याश्या ‘सोनी सार्वजनिक वाचनालयात’ जीएंना शोधणं सुरू झालं. तिथे काही मिळेना. तेव्हा तिथल्याच काकांनी सोलापूरातल्या ‘हिराचंद नेमचंद वाचनालयाची‘  ओळख करुन दिली. स्वतःचा संदर्भ देवून तिथे सदस्यत्वही मिळवून दिले. तिथे मग खजिनाच गवसला. त्यातच एकदा सर कॉनराड रिक्टर यांच्या ‘द अवेकनिंग लँड’ या ट्रिलोजीची ओळख झाली. या तिन्ही पुस्तकांचा जीएंनी मराठीत अनुवाद केलेला आहे.

१. The Trees : रान (प्रथमावृत्ती : १९६७, द्वितीय आवृत्ती : डिसेंबर २००८)
२. The Town : गाव (प्रथमावृत्ती : १९६७)
३. The Fields : शिवार ((प्रथमावृत्ती : १९६८)

आज आपण ’रान’ बद्दल बोलणार आहोत. या ट्रिलोजीतले पहिले पुष्प. तसं बघायला गेलं तर ‘रान’ ही एका कुटुंबाच्या स्थलांतराची कथा आहे. पेनिसिल्व्हानियामधील ‘वर्थ ल्युकेट’ (Worth Luckett) नामक एका स्वच्छंद, भटक्या वृत्तीच्या व्यक्तीला दुष्काळामुळे आपल्या कुटुंबासहीत जगण्याच्या शोधात दुसरीकडे, ओहियोच्या तुलनात्मक दृष्ट्या सुपीक पण घनदाट वृक्षांच्या जंगली प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागते. पुस्तकात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, काही माणसं खार्‍या वार्‍याचा वेध घेत समुद्राच्या दिशेने सरकतात तर काही झाडा-झुडपांच्या ओढीने जंगलाकडे जातात. वर्थचं ल्युकेट कुटुंब दुसर्‍या प्रकारामध्ये मोडतं. हे संपूर्ण कथानक हे जंगलामध्ये, नव्या वसाहती उभारल्या जाण्याच्या सुमारास घडतं. जंगलामध्ये वसाहती करणार्‍यांच्या वाटेला येणारे खडतर, थोडेसे भयावह तरीही अपरिहार्य असे जीवन चित्र आपल्यासमोर उलगडले जाते. इथे निसर्ग माणसांवर संकटे आणतो आणि निसर्गच त्यांना मायेची उब देतो. वर्थच्या कुटुंबात एकुण पाच सदस्य आहेत. त्याची आजारी पत्नी ’जेरी’ (Jary), वयाने तशी लहान असुनही आईच्या आजारपणामुळे सगळ्या कुटुंबाचा भार अंगावर आल्यामुळे अकाली मोठी झालेली त्याची मोठी मुलगी ’सेर्ड’(Sayward), धाकट्या तीन मुली जेनी, अ‍ॅशा, उर्सुला उर्फ स्युली (Genny, Achsa, and Sulie), थोडासा उनाड असलेला मुलगा ‘वेइट’ (Wyitt), वर्थचा शिकारी कुत्रा ‘सार्ज’ आणि अर्थातच पेनसिल्व्हानियामध्येच दफन केलेल्या त्यांच्या तान्ह्या बाळाच्या आठवणी !

घनदाट जंगलातले आकाशाला भिडणारे वृक्ष, त्यांच्या एकमेकांशी जोड्ल्या गेलेल्या अनंत अंधाराला कारणीभूत ठरलेल्या वाटा, दुर्मिळ असलेले सुर्याचे, सुर्यप्रकाशाचे दर्शन, दिवसेंदिवस वाढत चाललेली अस्वस्थता यामुळे जेरी वर्थकडे नदीकिनार्‍याच्या भागाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करते. पण वर्थला ते मान्य नाही. कारण त्याच्या शरीरात काही प्रमाणात का होइना मोन्सी इंडीयन्स (डेलावर इंडीयन्स) च्या रक्ताचा अंश आहे, त्याचे त्यांच्याशी व्यवस्थीत जमतेदेखील. त्यामुळे तो नदीच्या त्या भागात असलेल्या परक्या इंडीयन टोळीवाल्यांच्या जवळ जाऊन अजुन संघर्षाला तयार नाही. शेवटी वर्थ त्या दाट जंगलातच आपले एक खोपटे बांधायचे ठरवतो आणि बांधायला सुरुवात देखील करतो. वर्थ एक उत्कृष्ट सुतार आहे. लाकडाच्या वस्तु, फर्निचर बनवणे हा त्याचा हातखंडा आहे पण त्याला खरा रस आहे तो मुक्तपणे जंगलात भटकण्यात. आपल्या बंदुकीने जंगलातली जनावरे मारुन त्यांची कातडी मिळवणे व तिचा व्यापार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्याला आवडते. त्याच्या पायाला बांधलेले चक्र, रानाबद्दलची त्याची ओढ त्याला शांत बसु देत नाहीये. त्यामुळे कधी एकदा घरच्यांसाठी खोपटे बांधुन आपण जंगलात भटकायला मोकळे होतोय यासाठी तो कायमच आतुर असतो.

ल्युकेट कुटुंबियांच्या आर्थिक्-सामाजिक परिस्थितीबद्दल लेखक थेट भाष्य करत नाही. ती वेगवेगळ्या प्रसंगातून आपोआप आपल्या समोर येत राहते. तो कधीच सांगत नाही की ते समाजापासून, लोकवस्तीपासून वेगळे पडलेले आहेत, त्याउलट तो जंगलाबद्दल, रानाबद्दल बोलतो.

क्षणभर सेर्डला वाटले, कुणाला आधी न सांगता वर्थने आपल्या सगळ्यांना समुद्राच्या काठी आणलेले आहे आणि मावळत्या सुर्याचा लालसर प्रकाश संथ अशा हिरवट काळ्या पाण्यावर पसरला आहे. पण तिने काळजीपुर्वक पाहताच तिच्या लक्षात आले हा समोर पसरलेला समुद्र नसुन अमर्याद पसरलेले काळे रान आहे. तसे पाहिले तर खुप खाली एखाद्या ओढ्याच्या प्रवाहामुळे वरुन एखाद्या स्वच्छ चिंधीसारखी दिसणारी पट्टी सोडली तर गर्द अश्या झाडांच्या शिखरांचा तो खरेच एक सागर होता. अगदी दृष्टी पोहोचेपर्यंत हे रान लाटालाटांनी पसरत गेलेले होते आणि क्षितीजापाशी त्या लाटा धुसर निळसरपणे आपटुन नाहीशा झाल्या होत्या. त्या दृष्याचा परिणाम सगळ्यांवर एकदमच झाला, व ते सगळे एका ओळीत थबकुन स्तब्ध झाले. सेर्डचे लक्ष मात्र आपल्या आईकडे होते. त्या भयाण, गर्द विस्तारात कुठेतरी एखादी वाडी-वस्ती, निदान राहण्याच्या आशेने कुणीतरी साफसुफ केलेली एखादी चादरीएवढी जागा दिसत्येय का हे ती मोठ्या आशेने शोधत होती.

किती सार्थ आणि साध्या शब्दात कॉनराड (आणि जी.ए.) आपल्याला ल्युकेट कुटुंबियांच्या अवस्थेची जाणिव करून देतात. अजुन एक असाच प्रसंग….

एकदा जेवता जेवता ‘जेरी’ सहज बोलुन जाते,” अगदी साधा ब्रेड जरी असता तरी आज काही तरी खाल्ल्यासारखे, जेवल्यासारखे वाटले असते.”

ते वाक्य ऐकल्यावर वर्थची मुले अ‍ॅशा, जेनी, स्युली आणि वेइट आश्चर्यचकीत होतात. कुणीतरी सेर्डला सांगतं…

“सेर्ड, अगं बघ तरी, तिच्या हातातच ब्रेड आहे तरी सुद्धा ती असं बोलतेय. ” मुलांना साहजिकच आईच्या मानसिक अवस्थेबद्दल शंका यायला लागते… जेरीच्या त्या उद्गारांचा उलगडा पुढच्या परिच्छेदात होतो. पेनसिल्व्हानियातल्या त्या दुष्काळामुळे परिस्थिती अशी आलेली असते की त्या मुलांनी खरा ब्रेड पाहिलेलाच नसतो. लहानपणापासून जेरीने त्यांना हरणाच्या मांसालाच ब्रेड म्हणतात असे सांगितलेले असते. गेली कित्येक वर्षे दुष्काळ आणि वर्थचे जंगलवेड यामुळे त्यांचे आयुष्य जंगलातच गेलेले आहे, समाजाशी, विकसीत मानवी वस्त्यांशी त्यांचा फारसा संबंधच राहीलेला नाही. त्यामुळे वर्थने जंगलातुन मारुन आणलेल्या जनावरांचे मांस हे एकच अन्य त्यांना माहीत आहे. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी जेरीला आपल्या लहानपणी , तारुण्यात खाल्लेला खराखुरा ब्रेड आठवतो आणि इतके दिवस तिनेच सांभाळलेले गुपीत तिच्या हातुन निसटून जाते. प्रत्यक्ष असे काहीही भाष्य न करता लेखक ल्युकेट्सचे समाजापासुन तुटलेपण सार्थपणे व्यक्त करुन जातो.

ही कॉनराडच्या लेखणीची ताकद आहे आणि जी.ए. ती मराठीत आणताना तेवढ्याच समर्थपणे व्यक्त करत राहतात.

खरे तर रान ही केवळ ल्युकेटसच्या आयुष्याची कथाही नाहीये. ‘रान’ हा एक अथक चालणारा प्रवास आहे. ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही. कुठल्यातरी अनामिक लक्ष्याकडे चालत राहणारा प्रवास. मग वर्थ, जेरी, सेर्ड, अ‍ॅशा, जेनी, स्युली, वेइट हे आपोआप त्या प्रवासातले प्रवासी ठरतात. गंमत म्हणजे एक सेर्ड सोडली तर सगळे बरोबर असुनही प्रत्येकाचा प्रवास पुर्णपणे एकाकी आहे. स्वतःभोवतीच घिरट्या घालत, आत्मकेंद्रीतपणे क्वचित अहेतुकपणे चालणारा प्रवास आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी त्यांच्या बरोबर येत राहतं तर कुणी साथ सोडून जात राहतं….

हा प्रवास खर्‍या अर्थाने सेर्डचा जास्त आहे. नुकतीच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारी एक तरुण मुलगी ते अचानक अंगावर पडलेल्या घराच्या जबाबदारीमुळे हळुहळु अकाली प्रौढ स्त्रीमध्ये होणारे तिचे रुपांतर पाहणे हा एक लोभसवाणा क्वचित अंगावर शहारा उभा करणारा अनुभव आहे. आईच्या मृत्युनंतर साहजिकच मोठी मुलगी म्हणुन घराची, भावंडांची जबाबदारी तिच्यावर येवून पडते. कारण वर्थला घराच्या कुठल्याही जबाबदार्‍या पेलण्यात स्वारस्य नाही. त्याला मुळात घरापेक्षाही जंगलाची, मुक्त आयुष्याची, कसलीही जबाबदारी नसलेल्या जीवनाची जास्त ओढ आहे. मुलांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली की आपण आपल्या मनाप्रमाणे खांद्यावर बंदुक ठेवून रानात भटकायला मोकळे या एक प्रकारच्या बेफिकीर, स्वकेंद्रीत पुरुषी वृत्तीचे वर्थ हे जिवंत प्रतीक आहे. इतके की पत्नीच्या मृत्युनंतर पुढची जबाबदारी अंगावर पडु नये म्हणून हा माणुस जनावरांची कातडी आणायची म्हणुन जो गायब होतो ते ७-८ दिवसांनीच उगवतो. त्या काळात मुलांकडे लक्ष देणे, त्यांना सांभाळणे ही सर्व कामे , खरे तर जबाबदार्‍या सेर्ड न सांगत पार पाडत राहते.

महत्वाचे म्हणजे सेर्डने हे सगळे अगदी सहजपणे स्विकारलेले आहे. पुरुषांना परंपरेनेच पिढ्यानुपिढ्या बहाल केलेले अधिकार, स्वातंत्र्य तीने कळत-नकळत कदाचित नाईलाजाच्या भावनेतुन का होइना मान्य करुन टाकलेले आहेत. घर सांभाळणे, भावंडाची देखभाल करणे, त्यांची पोटे भरणे हे एक स्त्री म्हणुन माझेच काम आहे हे तीने मान्य करुन टाकलेले आहे. गंमत बघा… कुठल्याही परंपरेवर, तथाकथीत संस्कृतीवर कसलीही टीका टिप्पणी न करता लेखक आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही ज्ञान करुन देतो. कुठल्यातरी एका क्षणी त्यांना आपण राहतो तिथुन जवळच एक मानवी वस्ती असल्याचे ज्ञान होते. सेर्ड हरखते, तिला सगळ्यात आधी आईची आठवण येते. ही मानवी शेजाराची माहिती जर आधी कळली असती तर मानवी सहवासाची भुकेली आई कदाचीत अजुन थोडी जगली असती हा एकमेव विचार सेर्डच्या मनात येतो. तर वर्थची प्रतिक्रिया अगदी उलटी आहे, तो रक्ताने अर्धा इंडीयन (डेलावर) आहे. जंगलाच्या अगदी जवळ झालेली मानवी वस्ती त्याला जंगलावर मानवाचे आक्रमण वाटते. त्याचा मुलगा वेइट देखील त्याच्याच मार्गाने चाललेला आहे. बापाचे जंगलाचे वेड, ती बेफिकीरी त्याचाही रक्तात जशीच्या तशी उतरलेली आहे. बापाचा पुरुषी अहंकार हे वेइटचेदेखील वैशिष्ठ्य आहे.

कॉनराडचे वैशिष्ठ्य म्हणजे हार्मोनियम वाजवताना सराईतपणे पट्ट्या बदलत राहुनही सुरांशी फारकत न घेणार्‍या पट्टीच्या वादकाप्रमाणे तो सतत पट्ट्या बदलत राहतो, तरीही कथावस्तु अजिबात भरकटत नाही. अतिशय संथपणे चालणारे कथानक असुनही वाचताना आपण कुठेही कंटाळत नाही. जंगलात राहणार्‍या लोकांचे दैनंदीन जिवन, ते व्यतीत करताना त्यांना येणार्‍या नित्य अडचणी यांचे वर्णन करताना लेखक सहजपणे त्यांच्या परस्परांतर्गत भावनिक-मानसिक संबंधावर देखील समर्पक आणि समर्थपणे भाष्य करत राहतो. जबाबदार्‍या आणि कर्तव्य यांच्या फेर्‍यात अडकल्याने काहीशी कठोर, ठाम स्वभावाची बनलेली सेर्ड, टॉम बॉईश असणारी रांगडी अ‍ॅशा, आपल्याच विश्वात जगणारी, कायम गाणी गाण्यात गुंतलेली अल्लड जेनी, अजुनही बालवयीन असल्याने काय बरे काय वाईट? काय खरे काय खोटे? या द्वंद्वात अडकलेली स्युली आणि बापानंतर घरातला एकमेव पुरुष म्हणून तो पुरुषी बेफिकीरपणा आपोआप अंगिकारलेला वेइट ही सगळी पात्रे एकमेकांशी बांधलेली आहेत. एकमेकाबद्दल प्रेम, माया, असुया, मत्सर क्वचित प्रसंगी राग, द्वेष अशा विविध भावनांनी लडबडलेली आहेत. शेजारच्या वस्तीतल्या एका कुटुंबाची गुरे सांभाळण्याचे काम करता करता एक दिवस ‘स्युली’ अचानक गायब होते. तेव्हा प्रथमच सेर्डला मानवी शेजाराचे महत्व कळते, उमजते. स्युलीच्या गायब होण्याची बातमी ऐकुन आपण होवून अनेक जण मदतीला येतात. गंमत म्हणजे यावेळी पण वर्थ गायबच आहे. स्युलीचा शोध चालु असताना एका दिवशी तो अचानक उगवतो आणि स्युलीला शोधायला म्हणुन पुन्हा निघुन जातो. यावेळी मात्र तो कायमचाच निघुन जातो…पुढे त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट कित्येक वर्षांनी आलेल्या एका पत्रातुनच होते….

जंगलात राहणार्‍या वर्थसारख्याच एका आपल्यापेक्षा खुप मोठ्या असलेल्या विक्षिप्त, कृर म्हणुन ओळखल्या गेलेल्या ‘लुई स्करांच्या’ प्रेमात पडलेली जेनी जेव्हा वडील आणि मोठी बहिण यांचा विरोध पत्करुन त्याच्याशी लग्न करायचे ठरवते तेव्हा काळजावर दगड ठेवुन सेर्ड तिला परवानगी देते. आणि काही काळानंतर जेव्हा अ‍ॅशा लुईचा हात धरुन पळून जाते तेव्हा खचलेल्या, कोलमडलेल्या जेनीला आईच्या मायेने परत उभारी देण्याची जबाबदारीही सेर्ड समर्थपणे पार पाडते. पण हे सगळे करत असताना सेर्डच्या वैयक्तीक आयुष्याचे काय होते? तिला कधी तिच्या जबाबदार्‍यांमधुन मुक्तता मिळते का? तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळतो का? की ती शेवटपर्यंत वर्थच्या अर्धवट सोडलेल्या जबाबदार्‍याच पार पाडत राहते?, एक स्त्री म्हणून जगायचा अधिकार तिला मिळतो का? की तिचे आयुष्य देखील त्या अमर्याद पसरलेल्या घनदाट काळ्या रानाप्रमाणेच एक अर्थहिन, अंतहिन प्रवास करत राहते…..

हे जाणुन घ्यायचे असेल तर ‘रान’ वाचायलाच हवे.

तसं पाहायला गेलं तर हे ‘रान’ हाच खरा या कादंबरीचा खराखुरा नायक आहे. कथेतली सगळी पात्रे, सगळ्या सजीव-निर्जीव वस्तु अलिखीतपणे या रानाशी संलग्न आहेत. जंगलात आयुष्य कंठणारी वर्थसारखी किंवा इतर इंडीयन जमातींसारखी माणसे असोत किंवा त्या जंगलातील पशु असोत त्यांच्याशिवाय ‘रान’ अधुरे आहे, त्याशिवाय ‘रान’ अधुरी आहे. वाचताना कधी-कधी आपण नकळत त्या जंगलातील एकाकी आयुष्याची नाळ आपल्या आजच्या आयुष्याशी घालण्याचा प्रयत्न करायला लागतो. जंगलात राहून समाजापासुन एकटा पडत चाललेला वर्थ काय आणि आजच्या सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात एकत्र राहुनही एकमेकांपासुन तुटत चाललेला आजचा माणुस काय…

खरेतर कॉनराड रिक्टरच्या ‘द ट्रीज’ चा हा प्रामाणिक अनुवाद असल्याने जी.एं.चा तो खास जी.ए. टच फारसा जाणवत नाही या कादंबरीत. पण मुळची कादंबरीच जी.एं. च्या स्वभाववैशिष्ठ्यांशी मेळ खाणारी असल्यामुळे जागोजागी जी.ए. प्रकर्षाने जाणवत राहतात, भेटत राहतात. ‘त्या तिथे समोरच आपल्याला जायचय’ हे सांगतानाही वाचकाला आजुबाजुच्या वातावरणात गुंतवत-गुंतवत त्याला आपल्या शब्दजालात गुरफटत नेण्याची जी.एं.ची लेखनशैली इथेही आपला परिणाम साधत राहते. मग ते घनदाट पसरलेल्या जंगलाचे वर्णन असो, वा सुर्याचा प्रकाशही जमीनीपर्यंत पोचु न देणार्‍या उंचच उंच झाडांबद्दल बोलताना ‘खुद्द परमेश्वराला जरी आपणच निर्माण केलेले आकाश बघायचे असेल तर त्यालाही आपली कुर्‍हाड वापरावी लागेल’ अशी कळत नकळत गुढतेत गुरफटत नेणारी वाक्ये असोत. जी.ए. आपले मायाजाल नेहमीप्रमाणेच समर्थपणे पसरवत राहतात आणि आपल्याला समोरच तर जायचेय हे माहीत असुनही आपण स्वतःहून त्या मायाजाळात गुरफटत जातो. ही ताकद कॉनराडच्या लेखणीची म्हणायची का जी.एं.च्या अनुभवी लेखनाची हे ज्याचे त्याने ठरवावे. आपण सगळेच कॉनराडच्या या पात्रांप्रमाणे आयुष्यभर भरकटत असतो. पण तरीही एकदा का होइना आपले भान हरपून या रानात हरवायलाच हवे. हा प्रवास एकदा करायलाच हवा.

शुभास्ते पंथानु !