Category Archives: चित्रपट परीक्षण

एक वेगळी , सुखद “पाऊलवाट”….

गुरुवारी अचानक चिनुक्सचा फोन काय येतो. तुला ‘पाऊलवाट’च्या प्रिमीयरला यायला आवडेल काय म्हणून स्वप्नवत विचारणा काय होते? आणि आम्ही ‘मायबोली’ च्या नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याच्या स्वप्नातल्या या ‘पाऊलवाटेचा’ एक हिस्सा काय बनतो………! सगळं स्वप्नात घडतय असं वाटत होतं.

’मायबोली.कॊम’ माध्यम प्रायोजक असलेल्या ’पाऊलवाट’ या आदित्य इंगळे या नव्या दिग्दर्शकाने रंगवलेल्या एका देखण्या चित्राच्या प्रिमियरसाठी म्हणून कोथरुडच्या सिटीप्राईडला पोचलो तेव्हा तिथे अतिशय उत्साहाचे वातावरण होते. काही लोक रांगोळी काढत होते. अतिशय सुंदर रांगोळी काढली त्यांनी. सनईवादन सुरु होते.

रसिकांचे सुश्राव्य स्वागत

मी साजीराला फोन लावला तर साहेब समोरच उभे होते. त्याने लगेचच माझ्याआधी तिथे पोचलेल्या उत्साही मायबोलीकरांपर्यंत मला नेऊन सोडले. हबा आणि बाळ मल्लिनाथ नटुन-थटून हजर झाले होते. मी हबाशी बोलतोय तोपर्यंत एक अर्धी चड्डी (बर्म्युडा) घातलेले, गळ्यात कॅमेर्‍याची बॅग अडकवलेले सदगृहस्थ ‘हॅलो’ करत समोर आले. म्हणलं च्यायला आपण पण सेलिब्रिटी झालो की काय? येत नाही तोवर फोटोग्राफर फोटो काढायला हजर. कॉलर टाईट करणार तोवर त्या व्यक्तीने स्वतःची ओळख करुन दिली. “हाय विशाल, मी ‘फारेंड’!” (माझा पडलेला चेहरा बहुदा फारेंडाला दिसला नसावा) कारण तोपर्यंत क्रिकेटवर लिहीणारा एक दर्दी लेखक भेटल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर झळकला होता. मी अगदी आनंदाने त्याचाशी हस्तांदोलन केले. हे सगळे होइपर्यंत एक बर्‍यापैकी दिसणारी भद्र महिला बाजुला उभी होती. कुठेतरी पाहीलय हे जाणवत होतं पण कुठे?… तिच्या चेहर्‍यावर एक मिस्कील हास्य…. आणि माझी ट्युब पेटली ! मंजात्या……, मग मंजात्याशी मनसोक्त गप्पा सुरु झाल्या. गर्दी वाढायला लागली होती. चित्रपटातले कलाकार यायला सुरुवात झाली होती

सुबोध भावे (अनंत देव)

.

मधुरा वेलणकर

मग आम्हीही फारेंडाला बळीचा बकरा बनवून सगळ्या कलाकारांसोबत फोटो काढून घेतले. सौजन्य : आगाऊ हबा !!

अस्मादिक, सुबोध, हबा आणि मल्लिनाथ

हबा, मधुरा, अस्मादिक आणि मंजिरी सोमण

मधुरासोबत रंगलेल्या गप्पा

मल्ली, अस्मादिक, साजीरा आणि हबा : आम्ही मायबोलीकर

तेवढ्यात साजीरा सांगत आला की चित्रपटाला सुरुवात होइल आत जावून बसा.

बॅनरवरील मायबोलीचा लोगो एक वेगळेच समाधान देत होता.

आम्ही आपापल्या जागा पटकावल्या. तेवढ्यात बाळ मल्लीने हबाकडे हट्ट करून आपली सीट (खुर्ची: गैरसमज नसावा) बदलून घेतली. सहाला सुरू होणारा चित्रपट सगळे स्वागत समारंभ वगैरे आटपून सातच्या दरम्यान सुरू झाला. त्यापुर्वीच चित्रपटातल्या बाळ-गोपाळांचे मधुराच्या हस्ते कॅडबरी चॉकलेट्स देवुन स्वागत करण्यात आले. मल्ल्या बिचारा उगीचच हिरमुसल्यासारखा वाटला. 😉

चित्रपटाला सुरुवात होते ती एका काळोख्या रात्री….

रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराच्या पार्श्वभुमीवर भडकलेल्या चितेच्या दर्शनाने चित्रपटाला सुरुवात होते. खांद्यावर पाण्याचे मडके घेतलेला नायक चितेला एक प्रदक्षिणा घालून मडके पाठीमागे सोडून देतो. ‘फट्ट’ करून मडके फुटल्याचा आवाज…….. आणि कट टू नेक्स्ट सीन !

मुंबईत गायक बनायला म्हणून आलेला ‘अनंता’ आणि त्याचा मुंबईतील मित्र ‘बाब्या’ यांची गोदुआक्कांशी पहिली भेट. अनंत गायक व्हायला आलाय हे कळल्यावर….
“गायक? पोटासाटी काही कमावतात की नाही पाहुणे?” असा तिरकस प्रश्न…. आणि ‘वर तसे काळजी करण्याचे कारण नाही, नाहीच देवू शकले भाडे तर त्यांचे सामान फुंकून टाकेन आणि करुन घेइन भाड्याची भरपाई!” असे गोदुआक्कांनी स्वतःच दिलेले स्पष्टीकरण यावरुन अनंताला कशाला सामोरे जायचे आहे याची कल्पना येते. दोन वेळ चहा, नाष्टा, जेवण मिळेल. दररोज आंघोळ करावीच लागेल. पण तीही फक्त दोन बादल्यात. समोर समुद्र आहे म्हणून हवे तितके पाणी वापरा असे चालणार नाही.” हे ऐकताना आक्कांचा स्वभाव डोळ्यासमोर उभा राहायला लागतो. आणि ते ऐकताना गोंधळलेला अनंता हलकेच आपल्या चेहर्‍यावर हास्याची लकेर फुलवतो.

खरेतर क्लायमॅक्सपासून चित्रपटाची सुरुवात करायची आणि शेवटपर्यंत तो टेंपो कायम ठेवत कुठेही न रेंगाळता आपले म्हणणे व्यवस्थीतपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे हे खुप कठीण काम असते.पण दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी हे आव्हान अतिशय यशस्वीपणे आणि समर्थपणे पेललेय. बहुतांशी चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणार्‍या (विशेषतः मराठी चित्रपट) भाबड्या आदर्शवादाचे खोटे उदात्तीकरण न करता वास्तववादाशी नाते सांगत चित्रपट पुढे सरकत राहतो. एकेक पात्र हळुहळू आपल्यासमोर येत जाते. इथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या अपेक्षेत जगतोय. २० रुपयांची लॉटरी लागल्यावर आपल्या नशिबात धनलाभाचा योग आहे अशी स्वतःची खात्री पटवतानाच “हातात भरपुर पैसा असेल तर समाजात अवहेलना स्विकारावी लागत नाही. विशेषतः चांगला जावई मिळवता येतो” हे कटूसत्य सांगून जाणारे कंजुस नेने (आनंद इंगळे),

येता जाता म्हातार्‍या गोदुआक्काच्या मरणाची वाट बघत तिच्या इस्टेटीची स्वप्ने बघणारा बाब्या (हृषिकेश जोशी) जेव्हा फसव्या उत्साहाने सांगतो ‘ अरे आपण सामान्यांनी फक्त स्वप्नेच बघायची. मग बघ ना, काय फरक पडतो?वयाच्या ऐशीव्या वर्षी का होइना पण या मुंबईत स्वतःची दोन खोल्यांची जागा घेणारच” तेव्हा त्याची अगतिकता थेट आतवर जावून भिडते.

आपल्या हलाखीला विनोदाची जोड देत जगणारा बाब्या असो की ‘आपण लग्न केल्यावर इथेच आक्कांकडे राहूया? त्यांनाही सोबत होइल” असे अनंताने विचारल्यावर “अरे कसली स्वप्ने बघतोयस? अजुन तुझे कशातच काय नाही. प्रेम वगैरे माझ्यासाठी ठिक आहे, घरच्यांना काय सांगु?” असा अतिशय प्रॅक्टीकल विचार करणारी रेवती (मधुरा वेलणकर) . ‘मै जनम जनमतक तुम्हारा इंतजार करुंगी सारख्या भाबड्या स्वप्नविश्वात न रमता अतिशय प्रॅक्टीकल वागणारी, वास्तवात जगणारी नायिका वेगळी असुनही स्वार्थी वाटत नाही हे दिग्दर्शकाचे यश !

समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला समाजसेवक , आक्कांच्या शब्दांत ‘आश्रम मिनीस्टर’ देखील अनंताला जेव्हा सांगतो की ‘आपण समाजासाठी काहीतरी काम करतोय या भाबड्या कल्पनेतुन मी कधीच बाहेर पडलोय. तु काय किंवा मी काय काहीतरी वेगळे करायचे, चौकटीबाहेर पडुन काहीतरी करायचे म्हणुन या फंदात पडलोय हे जेव्हा स्पष्टपणे अनंताला सांगतो, तेव्हा त्याचा प्रामाणिकपणाही तेवढाच भिडतो.

आपल्या संघर्षादरम्यान अनंताला वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारी पात्रेही तेवढीच वास्तववादी आहेत. मग त्यात ‘कलेचा असला म्हणून काय झाले आहे तोही एक धंदाच. जे ग्राहकाला आवडेल तेच द्यावे लागते, इथे चांगले वाईट असे काहीच नसते. जे यशस्वी होते ते चांगले. संधी मिळत नसते ती तयार करावी लागते” म्हणुन परखडपणे सांगणारे संगीतकार चंदनभाई. “सिर्फ गलाही लेके आये हो, या किस्मतभी लाये हो. यहा सिर्फ गला होनेसे काम नही चलता, किस्मतका होनाभी उतनाही जरुरी है” असे हताशपणे सांगणारी एकेकाळची यशस्वी कलाकार पण आता दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेली मुमताजबेगम ( सीमा देव) असो किंवा स्ट्रगल म्हणजे नक्की काय असते हे स्वतःच्या उदाहरणाने अनंताला समजावून सांगणारे, आता या इंडस्ट्रीला आपली गरज उरली नाही हे लक्षात येताच उगीचच कला आणि कलेचे पावित्र यावर गप्पा न मारता शांतपणे आपला बाड बिस्तारा गुंडाळून गावाकडे परत जाणारे एकेकाळचे यशस्वी सारंगीवादक ‘उस्मानभाई’ (किशोर कदम) ही सगळी पात्रे आपल्याला आयुष्याकडे डोळसपणे बघायला शिकवतात.

“गाणं गायचं नसतं, तर गाणं व्हायचं असतं. काहीतरी चांगलंच गायचं, असं गायचं के जे पुन्हा ऐकताना स्वतःची लाज नाही वाटली पाहीजे” असे स्वप्न मनाशी बाळगुन सांगलीहून मुंबईला आलेला अनंत देव !
चित्रपटातीला जुन्या यशस्वी गाण्यांच्या चालींवर आरत्या गायला नकार देणारा अनंत देव….
हातात आलेला अल्बम केवळ स्वतःच्या नवेपणामुळे कुठल्यातरी प्रस्थापित गायकाच्या हातात गेलेला पाहून निराषेने कोलमडून जात मदीरेचा सहारा घेणारा अनंत देव….
आश्रम मिनिस्टरने एका छोट्याश्या गाण्याचे मानधन म्हणून दिलेल्या ५०० रुपयांनी फुलून येणारा अनंत देव…
कळत-नकळत ‘उस्मानभाईंच्या’ आयुष्यात समरस होवून जाणारा अनंत देव…
रेवतीच्या नकाराने कोसळलेला, आक्कांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडणारा अनंत देव…
शेवटी आक्का गेल्या हे समजल्यावर त्यांच्या बाळकृष्णाच्या नाकावर टिच्चुन यशस्वी होइन हा आशावाद बाळगणारा अनंता….
हि सगळी स्थित्यंतरे अतिशय सहज आणि मनस्वीपणे साकारणारा एक समर्थ कलाकार ‘सुबोध भावे’!

चित्रपटातले सर्वात महत्वाचे पात्र म्हणजे गोदुआक्का !
पतीच्या अपघाती निधनानंतर, समाजाचे टक्के-टोणपे खात आयुष्य काढलेल्या आक्कांच्या स्वभावाला साहजिकच एक तिरकसपणाची, प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या दृष्टीने पाहण्याची झालर लाभलेली आहे…
या वास्तुला दु:खाचा शाप आहे, सुख सहन होत नाही म्हणत तिथे गाणे म्हणायला, आनंद व्यक्त करायला नकार देणार्‍या आक्का जेव्हा चला सुटी आहे तर देवदर्शन करुन येवु. तिथे समुद्रावर तुम्म्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला असे सांगतात तेव्हा त्यांच्यात दडलेली ‘आई’ हळुहळु बाहेर येतेय याची जाणीव व्हायला लागते.
आधी गाण्यातले अपयश, नंतर हातातून निसटलेला अल्बम आणि शेवटी कळस म्हणून रेवतीचा नकार इतके धक्के पचवु न शकणारा अनंता त्यांच्या कुशीत शिरून धाय मोकलुन रडतो तेव्हा त्यांना त्यांच्या मातृत्वाचा साक्षात्कार होतो. इतकी वर्षे जपुन ठेवलेले आपले दागिने विकून त्या अनंताच्या अल्बमसाठी पैसे उभे करतात. पण तोवर अनंता घर सोडून निघून गेलेला असतो………………………….!
यानंतर अनंताच्या वियोगाने अंतर्बाह्य कोसळलेल्या आक्का……………..!
यापुढे काय होते ते पडद्यावरच बघण्यात खरी मजा आहे !

श्री. नरेंद्र भिडे यांचे सुश्राव्य संगीत, अवधुत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, विभा जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने गायलेली मायबोलीकर श्री. वैभव जोशीं यांची गाणी. सर्वात महत्वाचे म्हणजे आशाबाईंच्या आवाजातील ‘एक अनोळखी फुल…” हे बाईंच्या दैवी गळ्यांची जाणीव करुन देणारे अप्रतिम गाणे. पुष्पांक गावडेंची भन्नाट सिनेमॅटोग्राफी . त्यांनी काळ्या-पांढर्‍या फ्रेम्सचा संपुर्ण चित्रपटाच केलेला अप्रतिम वापर ……आणि या सगळ्यावर कळस ठरणारा सगळे मोह टाळत दिग्दर्शकाने केलेला चित्रपटाचा अप्रतिम शेवट…!

एक अतिशय सुखद असा अनुभव देवून जातो हा चित्रपट ! जाता जाता मायबोलीकरांसाठी आनंदाचा धक्का म्हणजे वैभव जोशी यांची चित्रपटातील छोटीशी भुमिका ! ‘ गीतकाराने ‘गालिब’चा एक शेर ऐकवल्यावर “अच्छा लिखता है ये बंदा, घेवून या त्याला, देवुया त्याला पण काम!” असे म्हणणारा वैभवचा दिग्दर्शक चित्रपट क्षेत्रात कसल्या प्रकारची माणसे काम करताहेत याचीही एक झलक देवुन जातो.

अभिराम भडकमकरांचे प्रभावी आणि टु द पॉईंट कथा लेखन ! येता जाता सद्ध्याच्या रिअ‍ॅलिटी शोज आणि इतर फसव्या स्पर्धांवर केलेले तिरकस पण कटुसत्य असणारे भाष्य. ‘गाणे गायचे नसते तर गाणे व्हायचे असते” यासारखे प्रभावी संवाद….

चित्रपट संपल्यावर पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांना भेटणे झाले. चित्रपटासाठी आलेले अजुनही काही दिग्गज भेटले. महत्वाचे म्हणजे श्री. श्रीकांतजी मोघे यांची भेट. मी हळुच त्यांना ’तुम्ही “वार्‍यावरची वरात” पुन्हा सुरु करताय ना असे विचारले आणि श्रीकांतजी गडा घडा बोलायला लागले. त्यांच्या चेहयावर फ़ुलुन आलेला आनंद या माणसाचे चित्रपट रादर अभिनय क्षेत्रावरचे प्रेम किती विलक्षण आहे याची जाणीव करुन देत होते.

मर्मबंधातली ठेव ही....

दोन पिढ्यातील दोन समर्थ आणि देखणे कलावंत : श्रीकांतजी मोघे आणि सुबोध भावे

इथे आम्ही आलेल्या इतरही काही कलावंताचे आणि कलावंतांसह फ़ोटो काढण्याची हौस भागवून घेतली.

गीतकार मायबोलीकर वैभव जोशी आणि मायबोलीकर साजीरा

हृषिकेश जोशी

अस्मादिक आणि हबा श्री. संदीप खरे यांच्यासोबत

अस्मादिक आणि हबा विभावरी देशपांडेंसह (हरिश्चंद्राची फ़ॆक्टरीफ़ेम)

पाऊलवाटची संपुर्ण टीम

एकंदरीत काय तर एक आगळी वेगळी मेजवानीच आहे हा चित्रपट ! सुश्राव्य गीते , अप्रतिम कथानक, सुरेख सादरीकरण आणि सर्वांचे समर्थ अभिनय यासाठी एकदा का होइना पाहायलाच हवा हा चित्रपट !

जरुर बघा, मी ही पुन्हा एकदा बघणार आहे. तिकीट काढून बघणार आहे. 🙂

छायाचित्रे : मायबोलीकर मित्र फ़ारेंड आणि रंगासेठ यांच्या सौजन्याने.

विशाल कुलकर्णी