Category Archives: क्रिकेट विश्व

३३ वर्षांनी त्यांनी आणि आपणही अनुभवलेला एक उत्कट आनंद सोहळा…

काल श्रीलंकेत टी२० च्या अंतीम सामन्यानंतर जे पाहायला मिळालं, मला वाटतं आजवर पाहिलेल्या ‘आपला आनंद व्यक्त करण्याच्या’ पद्धतींपैकी ती एक अतिशय उत्कट आणि सुंदर अशी पद्धत होती. मुळात ‘ख्रिस गेल’ हे व्यक्तिमत्वच मला कायम उत्साहाचं मुर्तीमंत प्रतिक वाटत आलेलं आहे. मैदानातील त्याचा झंझावात पाहणं म्हणजे रस्त्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टीला झोडपत सुटलेल्या एखाद्या बेदरकार वादळाचा साक्षीदार असण्यासारखं आहे. गंमत म्हणजे गेलच्या खेळात विव्ह रिचर्डसचा बेफाम झंझावात आणि सोबर्सची पद्धतशीर संयमी पण शत्रुपक्षाला पुर्णतः नामोहरम करणारी फटकेबाजी या दोहोचा संगम आहे. त्यामुळे गेलला मैदानावर, विशेषतः २०-२० च्या मैदानावर फटक्यांची बहारदार नक्षी रेखताना बघणं ही जणु काही मेजवानीच असते. पण काल त्या झंझावाताचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. भलेही शेवटच्या मॅचमध्ये गेल फलंदाजीत अयशस्वी ठरला असेल पण एकंदरीत स्पर्धेतला त्याचा खेळ खासच होता. पण मला पुर्ण स्पर्धेत गेल आवडला तो अंतीम विजयानंतर बेभान होवून आनंद व्यक्त करताना.

सर्वसाधारणपणे माणुस अतिशय आनंद झाला की मनमुराद हसतो किंवा रडतो, गातो किंवा जे गेल आणि त्याच्या सहकार्‍यांनी केलं ते करतो, म्हणजेच बेभान होवून नाचतो. आपण नाही का “धत्तड तत्तड धत्तड तत्तड” करत बेभान होवून नाचत आपला आनंद व्यक्त करतो त्याचप्रमाणे कालच्या विजयानंतर कॅरेबियन्सनी देखील आपला आनंद व्यक्त केला. आधी थोडा वेळ त्या ’CHAMPIONS’ च्या बोर्डच्या मागे उभा राहून मजा घेत असलेल्या गेलने अचानक एक भन्नाट झेप घेत स्वत:ला मैदानात झोकून दिले आणि मग सुरु झाला एक अफ़लातुन आनंद सोहळा. ‘गन्गनम डान्स’ की काय त्या डान्सच्या स्टेप्सवर ‘गेल’ थिरकायला लागला. सुरुवातीला आपल्या रामा डान्सप्रमाणे वाटलेल्या गेलच्या त्या स्टेप्स नंतर त्या नृत्यामागची कारणे, त्या नृत्यामागची धुंदी, तो उन्माद लक्षात आला तसा विलक्षण देखण्या वाटायला लागल्या. गंमत म्हणजे सुरुवातीला मुग्ध होवून गेलच्या नृत्याची मजा घेणारे विंडीजचे इतर खेळाडू सुद्धा नंतर त्या स्टेप्सवर थिरकायला लागले आणि जणुकाही एक सोहळाच सुरू झाला.

प्रसंगच तसा होता. तब्बल ३३ वर्षांनी विंडीजच्या वाटयाला हा आनंद हे समाधान आलेलं आहे. एकेकाळी क्रिकेटच्या खेळावर निर्विवाद राज्य केलेला, सम्राटपद उपभोगलेला विंडीजच्या या योद्ध्यांचा हा संघ गेल्या कित्येक वर्षात ढेपाळल्यासारख्या वाटत होता. कुठेतरी अधोगतीला सुरुवात झाली होती. ‘तोफखाना’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विंडीजच्या गोलंदाजीची धार हळु हळु बोथट व्हायला लागली होती. एकेकाळी समोरचा संघ जर विंडीजचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाचा जोर सामना जिंकण्यापेक्षा ड्रॉ करण्यावरच जास्त असायचा. पण गेल्या कित्येक वर्षात विंडीजची ती दहशत, ती जरब नाहीशी झालेली होती. वर्ल्ड कप जिंकणे तर सोडाच पण उपांत्य सामन्यापर्यंत पोचण्याची सुद्धा क्षमता त्यांच्यात राहीली नव्हती. त्यात गेल्या काही दिवसात संघ अंतर्गत कलहाने आणि राजकारणाने पोखरला गेलेला होता. अशा परिस्थितीत डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली विंडीजच्या पोखरलेल्या, गलितगात्र व्हायला लागलेल्या टीमने पुन्हा आपली अंतर्गत भांडणे, कलह बाजुला ठेवून आपली समग्र ताकद एकवटली आणि जगाला पुन्हा एकदा आपल्या संघटीत सामर्थ्याचा साक्षात्कार घडवून आणला. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, न्युझीलंड, भारत, पाकिस्तान अशा बलाढ्य संघांना नामोहरम करत या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि मग सुरू जाहला एक जल्ल्लोष….

काय नव्हतं त्या नृत्यात? आनंद, धुंदी, आपल्या सामर्थ्याबद्दलचा आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटबद्दलचं अफाट आणि उत्कट प्रेम !

भलेही नृत्याच्या त्या मुद्रा, त्या स्टेप्स एखाद्या व्यावसायिक, प्रशिक्षीत नर्तकाच्या नसतील, भलेही त्या नृत्यात ते कौशल्य नसेल. पण त्यात होती सहजता, त्यात होतं लालित्य, त्यात होतं आपल्या देशावरचं उत्कट प्रेम. इतक्या वर्षांनी आपल्या देशाला हा गौरव मिळवून दिल्याचा आनंद काल विंडीजच्या संपूर्ण संघाने मनसोक्त अनुभवला. त्यांच्याबरोबर माझ्यासारख्या विंडीजच्या चाहत्यांनी सुद्धा…….! अत्यानंदाच्या त्या उत्तुंग क्षणी ती सगळीच एरव्ही रासवट, रानगट वाटणारी विंडीजची सेना विलक्षण देखणी दिसत होती. त्या क्षणी आनंद विभोर झालेलं त्यांचं ते देखणं दर्शन कुठल्याही रुपगर्वितेलाही मान खाली घालायला भाग पाडणारं होतं.

विंडीजच्या या विजेत्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन !
विंडीजच्या संघाच्या या यशाबरोबरच आता हे यश असंच टिकून राहो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना !!

थरार आणि बरोबरी….!!

ता. २७ फेब्रुवारी २०११, स्थळ चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु ! मला वाटते भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील क्रिकेटचे चाहते हा दिवस कधीही विसरणार नाहीत. कालच्या दिवशी साहेबांनी पुन्हा एक नवीन विक्रम नोंदवला. साहेबांचे विश्व चषक स्पर्धेतले पाचवे शतक ! या शतकानेसह आपल्या लाडक्या तेंडल्याने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटपटू या नव्या विक्रमाची नोंद केली . त्याच्या नावावर जमा झालीत पाच शतकं. वनडेमधील हे साहेबांचं ४७वं शतक. १० चौकार आणि पाच षटकांरांनी सजलेल्या विक्रमादित्याच्या १२० धावांच्या खेळीनं भारताला त्रिशतकी धावांची सीमा ओलांडून दिली आणि या सामन्यासाठी लाठ्याकाठ्याही सहन करणाऱ्या बेंगळुरूच्या चाहत्यांचा पैसा टीम इंडियाच्या खेळानं वसूल झाला. कालचा सामना हा विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासातील बरोबरीत सुटलेला चौथा सामना ठरला !!

विक्रमादित्याची अजून एक विक्रमी खेळी

कालचा सामना बोर्डवर जरी बरोबरीत सुटलेला असला तरी कालचा सामना सर्वार्थाने स्ट्रॉस आणि त्याच्या लढवैय्या साथीदारांचा होता.

“कॅप्टन्स गेम” कशाला म्हणतात त्याचे ज्वलंत आणि आदर्श उदाहरण म्हणुन कालचा अ‍ॅंड्र्यु स्ट्रॉसचा खेळ ओळखला जायला हरकत नाही. काल निर्विवादपणे तो चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचा बादशहा होता. चिन्नास्वामीची कालच्या सामन्यातली खेळपट्टी ही तशीही “फलंदाजधार्जिणी” होती, पण तिचा व्यवस्थित फायदा उठवू शकले ते आपला विक्रमादित्य आणि इंग्लंडचा कर्णधार स्ट्रॉसच !! तसे गंभीर, युवराज सिंह आणि इयन बेल यांनी सुद्धा आपल्या बॅटची चमक दाखवली. पण कालचा सामना सर्वार्थाने स्ट्रॉसचाच होता.

मुळातच आधीपासुनच हा सामना प्रचंड गाजत होता. याला भारतीयांचे क्रिकेटबद्दलचे वेड म्हणायचे की तिकीटांची कमतरता ( की तिकीटांसाठी पण असलेले आरक्षण (?) ) पण अवघ्या तीन तासात तिकीटे संपलेली होती. तासनतास रांगेत उभे राहीलेल्या हजारो रसिकांना निराश मनाने आणि रिकाम्या हाताने परत फिरावे लागले होते. अहं रिकाम्या हाताने नव्हे तर हाता-पायावर पोलीसांनी गर्दी पांगवण्यासाठी केलेल्या लाठीमाराचे वळ घेवुन परत फिरावे लागले.

चाहत्यांची निराशा....

७००० तिकीटे अवघ्या तीन तासात संपली आणि बाकीची तिकीटे बीसीसीआय, आयसीसी आणि प्रायोजकांसाठी आधीच आरक्षित झालेली होती. खरेतर हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डनलाच व्हायचा होता. पण इडन गार्डन सामन्यासाठी तयार नसल्याने ( वेळेत बांधकाम पुर्ण करण्यात झालेला हलगर्जीपणा भोवला) हा सामना इडन गार्डनच्या ऐवजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या पदरात पडला. पण हे शिवधनुष्य कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला काही पेलवले नाही.

काही दिवसांपुर्वी माजी क्रिकेटपटु रवी शास्त्री याने जाहीर केले होते की इंग्लंडचा अडसर दुर करण्यात जर यश आले तर हा विश्वचषक आपलाच आहे. अतिषयोक्तीचा भाग दूर ठेवला तरी कालचा सामना आपल्या दृष्टीने खुप महत्त्वाचा होता. आपली ताकद दाखवण्यासाठी म्हणुनही, स्वतःचे सामर्थ्य आजमावण्यासाठी म्हणुनही आणि या विश्वचषकातील भारतीय भुमीवर खेळला गेलेला आपला पहीलाच सामना म्हणुनही. कालची मॅच बरोबरीत सुटली खरी पण कालच्या मॅचचे विजेते निर्वीवादपणे इंग्लंडचे जिद्दी बहाद्दरच होते.

प्रत्येक क्षण रोमांचक होता. मॅचची सुरूवात थोडी अडखळतच झाली. सेहवागच्या बॅटची कड घेवून उडालेल्या चेंडूवर तीन वेळा कॅच सोडून सेहवागला जीवदान देणारे इंग्लंडचे क्षेत्ररक्षक पाहून उगाचच अपेक्षा वाढल्या होत्या. पण सेहवागला त्या जिवदानांचा फायदा उठवता आला नाही. पण आपल्या ३५ धावांच्या छोट्याच खेळीत नजफगडच्या या नवाबाने रसिकांना एका मस्त मेजवानीचा लाभ दिला. (२६ चेंडुत ३५ धावा).

पण साहेबांनी मात्र पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. ११५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या साह्याने सचिनने आपले सत्तेचाळीसावे आणि विश्वचषकातले पाचवे शतक झळकावले. साहेब काल फ़ुल फ़ॉर्ममध्ये होते. त्यांच्या मनगटाची नजाकत काल पुर्ण बहरात होती. अगदी सहजपणे फ़ारशी ताकद न लावता सचिनने उचललेले उत्तुंग षटकार बघणे म्हणजे बिरजु महाराजांचे नृत्य बघण्याइतके कलात्मक होते.

कालच्या सामन्यातल्या सचिनच्या अदाकारीची ही एक अफ़लातुन झलक….

एकीकडे सचिनची बॅट आपल्या तेजाने तळपत असताना विरुद्ध बाजुला गंभीर अतिषय तन्मयतेने दुसरी बाजू टिकवत सचीनला साथ देत होता. दुसरी बाजु लढवताना गंभीरने भारताची ३३८ ही प्रचंड धावसंख्या उभी करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

सचिन आणि गंभीर यांच्या नंतर युवी आणि माहीने थोडावेळ तग धरला, पण नंतर मागचे फलंदाजमात्र मातीचा किल्ला ढासळावा तसे ढासळत गेले. ४९.५ षटकात भारत सर्वबाद ३३८ !!!

त्यानंतर आघाडीलाच उतरलेल्या इंग्लंडच्या कर्णधाराने झंझावाती आणि जबाबदार खेळी करत कालच्या सामन्यापुरते का होइना रसिकांच्या मनावरचे आपल्या विक्रमादित्याचे गारुड उतरवुन टाकले. झहीरच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये पीटरसनने त्याची झकास धुलाई करत आपला नैसर्गिक खेळ दाखवून दिला. पीटरसन ३१ धावावर खेळत असताना मुनाफनेच स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल पकडत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारताच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पण सामन्यातली खरी चुरस तर त्यानंतरच यायची होती. वन डाऊनला आलेल्या बेलच्या साथीने संघाच्या धावसंख्येला आकार आणि आधार देत कर्णधार अँड्र्यु स्ट्रॉसने इंग्लंडला अतिशय मजबुत स्थितीत नेवुन सोडले. इथे इयन बेलच्या संयमी खेळीचे कौतुक करायलाच हवे. एका बाजुने स्ट्रॉस समस्त भारतीय गोलंदाजांवर वादळासारखा तुटुन पडलेला असताना दुसर्‍या बाजूने बेल शांतपणे आपली बाजु टिकवून धरत किल्ला लढवत होता. स्ट्रॉसबरोबर १७० धावांची अफलातुन भागिदारी करत त्याने आपल्या संघाला मजबुत अवस्थेत नेवुन पोचवले. अर्थात याचे श्रेय बर्‍यापैकी आपल्या चुकीच्या निर्णयावर ठाम राहीलेल्या पंचाला देखील जाते. १७ धावावर तो बाद असताना थर्ड अंपायरने संशयाचा फ़ायदा घेत त्याला नाबाद ठरवले आणि तीच चुक आपल्याला प्रचंड महागात पडली.

आपले शतक साजरे करताना स्ट्रॉस

अँड्र्यु स्ट्रॉस…, इंग्लंड संघाचा हा कर्णधार !! २००५ च्या अ‍ॅशेस मालिकेत शेन वार्नसमोर दोन शतके झळकावत आव्हान उभे करणारा पराक्रमी योद्धा !! कालच्या सामन्याचा हिरो आणि शेवटी सामनावीर या पदवीचा मानकरीही तोच ठरला नसता तरच नवल. दोनच दिवसांपुर्वी  सध्या फॉर्मात असलेल्या भारताला रोखून दाखवण्याचा आपला इरादा अँड्र्यू स्ट्राऊसने जाहीर केला होता. भारतीय पाठिराख्यांच्या साक्षीने चिन्नास्वामी स्टेडियमवर हा पराक्रम करू, असे स्ट्राऊसने सांगितले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेले कित्येक दिवस कायम वेगवेगळ्या दौर्‍यावर असलेला इंग्लंडचा संघ आधीच थकलेला असुन, त्यात सराव सामने आणि हॉलंडच्या नवख्या संघाने दिलेली चित्तथरारक झुंझ या पार्श्वभुमीवर भारतीय संघच फेव्हरीट होता. पण चिवट ब्रिटीशांनी शेवटी आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय संघाला नमवुन दाखवलेच. हो, माझ्यामते तरी इंग्लंडचा संघ जिंकलाच आहे.

स्ट्रॉसच्या झंझावातातले काही सुंदर फ़टके….! लेगला मारलेले फ़टके आणि गॅप्सचा व्यवस्थित वापर करत अवघ्या १०० चेंडुत स्ट्रॉसने आपले शतक झळकावले.

आपल्या दुसर्‍या स्पेलमध्ये जहीरने आपला इरादा जाहीर केला. बेल आणि स्ट्रॉस यांना लागोपाठच्या चेंडुवर बाद करत त्याने भारताचे सामन्यातील आव्हान कायम राखण्यात आपला वाटा उचलला.

झहीरची हॅट्-ट्रिक चुकली पण त्यानंतर लगेचच अवघ्या एका धावेवर कॉलिंगवुडच्या यष्ट्या उखडत झहीरने त्यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. काही क्षण आता भारताचा विजय निश्चीत झाला असेच सगळेजण धरुन चालले होते.

पण पुढच्याच षटकात ब्रेसननने पियुष चावलाच्या गोलंदाजीवर दोन भन्नाट षटकार खेचत इंग्लंडला पुन्हा एकदा विजयाच्या दारात आणुन उभे केले.

त्यानंतरच्या बॉलवर ब्रेसननच्या यष्ट्या उखडत पियुष चावलाने आपला उद्रेक व्यक्त केला खरा. पण तोवर खुप उशीर झाला होता. सामना आपल्या हातातून निसटला होता.

शेवटचे षटक ! सामन्याचा थरार अत्युच्च पातळीला पोहोचलेला. स्कोअर होता ३२५/८. स्ट्राईकवर ग्रॅमी स्वान, मुनाफच्या पहिल्याच चेंडुवर स्वानने दोन धावा घेतल्या. त्यानंतर एक थर्ड मॅनला चेंडु तटवत एक धाव घेत स्वानने अजमल शहजादकडे स्ट्राईक सोपवली आणि सामन्यातल्या आपल्या पहिल्याच आणि मुनाफच्या तिसर्‍या चेंडुवर एक उत्तुंग षटकार खेचत अजमल शहजादने शेवटची पाचर मारली.

शहजादने मारली अखेरची पाचर..!

चौथा चेंडु शहजादला उचलता आला नाही पण स्वॅनने दिलेल्या कॉलला प्रतिसाद देत त्याने एक बाय ची धाव पुर्ण केली. पाचव्या चेंडुवर परत एक इन साईड एजचा आधार घेत स्वानने दोन धावा टिपल्या. अगदी शेवटच्या चेंडुपर्यंत सामन्याचा थरार कायम होता. शेवटच्या चेंडुवर इंग्लंडला विजयासाठी दोन तर बरोबरीसाठी अवघी एक धाव हवी होती. शेवटच्या चेंडुवर स्वानने मिड्-ऑफला चेंडु फटकावत एक धाव घेण्यात यश मिळवले आणि सामना बरोबरीत संपला.

सामना बरोबरीत संपला खरा पण इंग्लंडचा संघ आपली ताकद दाखण्यात यशस्वी ठरलाय. अजुन खुप सामने व्हायचे आहेत. अनेक तुल्यबळ किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली अशा प्रतिस्पर्धी संघांना इंग्लंडला तोंड द्यायचे आहे. पण या सामन्यातील बरोबरीने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. यावेळच्या विश्वचषकाचा एक प्रबळ दावेदार म्हणुन इंग्लंडकडे बघायला काही हरकत नाही. त्याबरोबरच भारतीय संघाला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपले कुठे चुकले यावर विचार करणे आवश्यक आहे. युवराज आणि माहीच्या नंतर येणार्‍या फलंदाजांनी कालचा सामना खुपच कॅज्युअली घेतल्यासारखे वाटले. आशा आहे की यातुन ते नक्की आपल्या चुका शोधुन खेळ सुधारण्यावर भर देतील.

या विश्वचषकाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन संघाना एकमेकाशी झुंझताना परत पाहायला मलातरी विलक्षण आवडेल. दोन्ही संघांना माझ्या खुप खुप शुभेच्छा !!

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार !!

विशाल….