Category Archives: उपक्रम

आंतरजालस्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : शेती आणि शेतकरीविषयक

 अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही पण;

आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरजालाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ सादर करीत आहे……

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

विषय : शेती आणि शेतकरी

या स्पर्धेचे दोन प्रकार असतील,

गद्यलेखन स्पर्धा-२०१४ आणि पद्यलेखन स्पर्धा-२०१४

१] गद्यलेखन स्पर्धा-२०१४

विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख   ड) शेतीविषयक माहितीपर लेख

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१४

विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा, अंगाई, लावणी इत्यादी)

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. साहित्य अनुवादित असेल तर तसा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.

२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात

३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त ३ प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

पारितोषिकाचे स्वरूप :

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह,प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल :

२६ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्याwww.shetkari.in या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण :

सन २०१५ मध्ये होणार्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

१) स्पर्धा ०१ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.

२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन येथे प्रकाशित करावे लागेल.

३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.

४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह spardha@shetkari.in या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.

५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहितीspardha@shetkari.in या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख/कथा/वैचारिक लेख/शेतीविषयक माहितीपर लेख/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे.

६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.

८) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.

९) गद्यलेखनासाठी शब्दमर्यादा – १२०० शब्द एवढी असेल.

नियम व शर्ती :

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.

२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन

आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.

३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.

४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तर त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.

५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील.

६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.

८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.

९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.

१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती

अधिक माहितीसाठी गंगाधर मुटे ९७३०५८२००४ (विदर्भ), डॉ. कैलास गायकवाड ९५९४२८९८९८ (मुंबई),विशाल कुलकर्णी ९९६७६६४९१९ (प.महाराष्ट्र), राज पठाण ९७६४९८०२२४ (मराठवाडा), कमलाकर देसले ९४०३१७६९३६ (खानदेश) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

नागपूर : ०२-११-२०१४

गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष

आणि संयोजक मंडळ

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

——————————————————————————————————————————–

” लेन्सच्या पलीकडचे जग..” : नवा फोटो ब्लॉग

फोटोग्राफीची आवड बहुदा रक्तातच असावी माझ्या. मला अजुनही आठवते, मी लहान असताना आण्णांकडे (आमचे तिर्थरूप) अ‍ॅग्फाचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. त्याच्या एका रीलमध्ये फक्त १२ फोटो निघायचे.

माझा पहिला कॅमेरा : आण्णांकडून आलेला
माझा पहिला कॅमेरा : आण्णांकडून आलेला

आण्णांना फोटोग्राफीचे विलक्षण वेड. त्यांच्या त्या अ‍ॅग्फाने काढलेली कितीतरी कृष्ण-धवल रंगातली छायाचित्रे अजुनही सोलापूरच्या आमच्या घरी जपलेली आहेत. मग त्यात आण्णांनी आसाम, बांग्लादेशच्या बंदोबस्ताच्या वेळी काढलेले फोटो, एस्.आर्.पी.च्या राहुटीत त्यांचा स्वतःचा स्वयंपाक बनवण्यासाठी स्टोव्ह पेटवतानाचा फोटो, तर कधी त्याच कॅमेर्‍याने काढलेले आमच्या हिरव्यागार शेताचे कृष्ण-धवल फोटो 😉 , आण्णांच्या भावंडांचे फोटो….

मला वाटतं आण्णांना असलेली माणसांची, माणसांच्या सोबतीची आवड त्यांच्या या छंदातून झळकत असावी.

त्यांनी काढलेले बहुतेक फोटो त्यांना भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे होते. मग त्यात नातेवाईक, मित्र यांच्याबरोबरच अनेक अनोळखी व्यक्तींही असत. मला वाटतं छायाचित्रणाचे हे वेड माझ्याकडे आण्णांकडुनच आलेले आहे. फरक असेल तर फक्त एवढाच की त्यांचा ओढा माणसांकडे होता, तर माझा निसर्गाकडे जास्त आहे. पण छायाचित्रणाची आवड मात्र आमची सामाईक. घरात चाळीसेक अल्बम्स तरी नक्कीच सापडतील. कृष्णधवल तसेच रंगीत फोटोंनी भरलेले…

हो… जस-जसे टेक्नोलॉजी बदलत गेली, रंगीत कॅमेर्‍यांचा काळ सुरू झाला तस तसे आमच्याकडील कॅमेर्‍यांचे प्रकार सुद्धा बदलत गेले. मग त्यात त्या जुन्या कृष्णधवल अ‍ॅग्फापासून ते पुढे नॅशनल पॅनासोनिक, मग याशिका, मग कोडॅक, कोनिका, फिलफोटोचा उनो, मग शेवटी कॅननचा डिजीटल अशी भर पडत गेली. माझ्या सुदैवाने हे सगळे कॅमेरे हाताळायला मिळाले. त्यामुळे एक गोष्ट कळून चुकली होती की फोटो काढण्यासाठी फक्त चांगला कॅमेरा असून भागत नाही. तर त्याला छायाचित्रकाराची नजर असणे ही तेवढेच अत्यावश्यक असते. अर्थातच अद्ययावत तंत्रज्ञानाने बनलेले कॅमेरे आजकाल छायाचित्रकाराचे काम खुप सोपे करतात. पण कॅमेरा यशस्वीपणे हाताळण्यासाठी तुमच्यात छायाचित्रकाराची ‘वृत्ती’ असणे फार गरजेचे असते. ती वृत्ती असेल तर दगडातले सौंदर्यसुद्धा ठळकपणे जाणवायला लागते. माझ्या सुदैवाने आतापर्यंत केलेल्या सर्व नोकर्‍यासुद्धा फिरतीच्या मिळाल्या. त्यामुळे जगभर फिरता आले. या फिरण्यातून जगभरातील छायाचित्रकारांची कामे पाहता आली. आता तर आंतरजालावर घर बसल्या सर्व उपलब्ध होतेय. पण त्या फिरतीने माझ्यातला ‘डोळस’ छायाचित्रकार जागवला. अर्थात छायाचित्रण ही केवळ हौस, एक छंद म्हणूनच बाळगल्यामुळे कधी त्याचे व्यावसायिक शिक्षण वगैरे घेतले नाही. रादर पोटासाठी चाललेल्या वणवणीमुळे ते घेता आले नाही. पण त्यामुळे काही बिघडले नाही. कारण मला ही कला फक्त एक छंद म्हणूनच जोपासायची होती, जगायची होती. त्यामुळे फक्त फोटो काढण्याच्या मागे न लागता, मी फोटो बघायला शिकलो, फोटो वाचायला शिकलो.

जशी आंतरजालाची ओळख झाली तशी अनेक उत्कृष्ट छायाचित्रकारांची ओळख झाली. यात मायबोलीकर योगेश जगताप (जिप्सी), अतुल पटवर्धन (अतुलनीय), चंदन मोगरे, प्रकाश काळेल आणि अर्थातच वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर्स आय हॅव मेट टिल डेट ‘पंकज झरेकर’ उर्फ पंक्यासारख्या छायाचित्रकारांशी ओळख झाली. या मित्रांनी काढलेले फोटो बघत – बघत या कलेतली सौंदर्यस्थळे शोधायला शिकतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय….

काही दिवसांपूर्वी माझे एक आवडते आंतरजालीय लेखक श्री अनुविना यांचा नवीन फोटोब्लॉग पाहण्यात आला. त्या ब्लॉगवरून श्री. प्रवीण अस्वले यांच्या फोटोब्लॉगची पण सफर घडली आणि वाटले की आपणही का सुरूवात करू नये या प्रवासाला ? मग नाव काय द्यायचे नव्या ब्लॉगला? इथपासून सुरूवात. सद्ध्यातरी काही सुचत नाहीये, म्हणून तात्पुरते “लेन्सच्या पलीकडचे जग…” हे नाव दिले आहे. काही नवीन सुचले तर तुम्ही सुद्धा सांगा. सुचनांचे स्वागत आहे.

image blog

आजपर्यंत मी काढलेले काही बर्‍यापैकी फोटो इथे आपल्या अभिप्रायासाठी पोस्ट करतोय. कसे वाटले ते नक्की सांगा. हातातला कॅमेरा अजूनही तसा बेसिक लेव्हलचाच आहे. पुढेमागे चांगल्यापैकी अद्ययावत कॅमेरा येइलही. पण तोपर्यंत छायाचित्रण कलेचे मर्म शिकण्याचा प्रयत्न करत राहीन. नव-नवे फोटो (अर्थात मी काढलेले) इथे पोस्ट करत राहीन…

आपण मित्र-मंडळी कौतुक करायला, टीका करायला, चुकत असेन तर कान धरायला सोबत आहातच.

आपलाच

विशाल कुलकर्णी