Category Archives: आवाहन

हे देशाचे भावी रक्षक…… (?)

कुठल्याही देशासाठी त्यांचे लष्कर हा अतिशय अभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा विषय असतो. रस्त्याने जाताना कुणी मिलिटरी, नौसेना अगर वायुसेनेचा जवान अथवा अधिकारी दिसला की मान आपोआपच आदराने लवते. कारण देशाचे सैन्य, देशाचे सैनिक हे काय्म देशाच्या पर्यायाने देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत असते. मिलिटरी असो, नौसेना असे वा वायुसेना यापैकी कुठल्याही दलाचा विचार मनात आला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे या विविध सैन्यदलांतर्फे पाळली जाणारी विलक्षण शिस्त, त्यांची शिस्तबद्धता. आपण येता जाता म्हणत असतो की माणसाला जर शिस्त लावायची असेल, शिकवायची असेल तर त्याला आयुष्यातले एक वर्षका होइना सैन्यात घालवायला हवे. आणि हे म्हणणे म्हणजे अगदीच अतिशयोक्ती नसते. या सर्व सैन्यदलांत पाळली जाणारी शिस्त ही कायम सर्वसामान्य नागरिकांच्या अभिमानाचा, आदराचा विषय असते. आपल्यासाठी ते शिस्तीचे आदर्श असतात. आपण आपल्या मुलांना शिस्तीबद्दल सांगताना, शिकवताना देखील नेहमी सैन्याचे, एन्.डी.ए. आणि तत्सम सैन्य प्रशिक्षण संस्थांचे उदाहरण देत असतो. पण गेल्या काही वर्षात काही वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. काही वर्षापुर्वी देहुरोड भागत मद्यधुंद लष्करी जवांनाच्या एका गटाने घातलेल्या गोंधळाची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती आठवण जरा जुनी होत नाही तोवर आता कालची पुण्यातील संभाजी पुलावरील घटना….

काल रात्री लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ऑफिसर-कॅडेट्सनी लकडी पुलावर पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण-शिविगाळ करीत मंगळवारी रात्री धुडगूस घातला. पुण्यातील डेक्कनजवळील लकडी पुलावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही, वाहतुकीचा गोंधळ होवु नये म्हणुन या मार्गावर दुचाकी वाहनांना मनाई आहे. दुचाकी वाहनांसाठी खास वेगळे मार्ग आहेत. लकडी पुलावर रात्री नऊ वाजेपर्यंत टू-व्हीलरला मनाई आहे. तरीही ‘सीएमई’तील हे अधिकारी-कॅडेट्स तेथून आले. ते पाहून संभाजी चौकीतील वाहतूक पोलिस आणि अधिकारीवर्गाने त्यांना अडविले. लकडी पुलावर दुचाकीला मनाई असल्याकारणाने त्यावेली तिथे ड्युटीवर हजर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांचा रस्ता रोखुन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीची किल्ली काढून घेण्यात आली. ते पाहून लष्कराच्या या अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिविगाळ करीत पोलिसांवर हात उचलला. त्या पोलीसाने हटकल्याचा राग येऊन या अधिकारी – कॅडेटसनी चक्क पोलीसांनाच मारहाण सुरु केली आपल्या इतर मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. काही वेळातच ४०च्या वर सैनिकी विद्यार्थी हजर झाले आणि त्यांनी पोलीसांना तसेच उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे हिसकावून घेत फोडले. महिला पत्रकारांना अर्वाच्य शब्दांत दम भरण्यात आला. तसेच लष्कराच्या दहा गाड्यांचा ताफा मागवून दमदाटी करण्यात आल्याने या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

या प्रकारला विरोध करणार्‍या उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनाही दमबाजी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार पाहून संतप्त नागरिकांनी या लष्करी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. दरम्यान, या अधिकाऱ्यांना ‘कुमक’ मागवून घेतली आणि काही वेळातच लष्करी पोलिसांच्या आठ-दहा गाड्या लकडी पुलावर दाखल झाल्या. संतप्त जमावासह पोलिसांशीही हुज्जत घालण्यास प्रारंभ करण्यात आला. अगदी हात काट देंगे वगैरे धमक्याही देण्यात आल्या. या घटनेचे मोबाईलने फोटो काढण्याचे प्रयत्न करणार्‍या सामान्य नागरिकांचे फोन हिसकावून घेण्यात आले. त्यातील मेमरी कार्ड काढून घेवुन मोबाईल फेकुन देण्यात आले.

या घटना लष्करी अधिकार्‍यांच्या माजोरीपणाचे तर द्योतक नाहीत ना? पुन्हा समस्या अशी आहे की लष्करी अधिकार्‍यांवर कसलीही कारवाई करण्याचा अधिकार पोलींसाना नाही असा लष्कराचा दावा असतो. त्याच्या जोरावर हे देशाचे तथाकथीत रक्षक हवा तसा धुडगुस घालायला लागतात. आता या अशा घटना अपवादात्मक असतात हे जरी खरे असले. तरी हे भारतीय लष्कराच्या परंपरेला आणि किर्तीला अतिशय घातक आहे.

या घटनेसंदर्भात लष्कराच्या प्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. प्रश्न असा आहे की यापद्धतीने कायदा हातात घेणार्‍या त्या मग्रुर सैनिकी अधिकार्‍यांवर – कॅडेटसवर काही कारवाई होणार की नाही? झाल्यास ती लष्करच करणार की पोलीस? अगदी ते भारतीय लष्कराचे सैनिक – विद्यार्थी असले तरी याच देशातील कायद्याच्या प्रतिनिधीवर हात उचलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? माझ्यामते तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना – अधिकार्‍यांना पोलीसांच्या ताब्यातच देण्यात यावे आणि नागरी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तुम्हाला काय वाटते?

संदर्भ :

१. दै. सकाळ – पुणे आवृत्ती

२. दै. महाराष्ट्र टाईम्स – पुणे ई आवृत्ती

विशाल कुलकर्णी

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

आंतरजालावरील सर्व अभ्यासु / व्यासंगी सारस्वतांना नमस्कार,

मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती.

स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा. सूरू होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात देखील तेव्हा होईल. स्पर्धा पुर्ण होईपर्यंत स्पर्धेच्या घोषणेचा हा अधिकृत धागा असेल.

संपुर्ण माहितीसाठी : http://www.mimarathi.net/node/7509

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन महाजालावर/इंटरनेटवर पूर्वप्रकाशित नसावे
एक लेखक जास्तीत जास्त ३ प्रवेशिका सादर करू शकतो.
लेखनाचा प्रकार हा लघुकथा लेखन असा ठेवण्यात आला आहे. लघु / दीर्घकथा द्याव्यात, शब्द बंधन नसले तरी क्रमशः लेखन स्पर्धेत घेतले जाणार नाही. इतर विषय स्विकारले जाणार नाहीत.
डाव्या बाजूला लेखन करा मध्ये लेखन स्पर्धा २०१२ हा विभाग या विभागामध्ये लेखन प्रकाशित करावयाचे आहे
विजेत्यांची निवड करताना शुद्धलेखन व कथेची मांडणी यांचा विचार केला जाईल यांची नोंद घ्यावी.
सर्व प्रवेशिकाचे परिक्षण लेखन क्षेत्रातील ३ मान्यवर व्यक्ती करतील, त्यांची नावे स्पर्धा चालू होईल त्या दिवशी येथे दिली जातील
स्पर्धा १० डिसेंबर ते १० जानेवारी २०१२ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १४ फेब्रुवारी २०१२ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असतील. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. प्रथम क्रमांक :१२ पुस्तके (किमान किंमत ३०००.०० रु.), द्वितीय क्रमांक :८ पुस्तके (किमान किंमत १८००.०० रु.), तृतीय क्रमांक :५ पुस्तके (किमान किंमत १०००.०० रु.)
स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मीमराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुणे अथवा मुंबई येथे होईल. विजेत्यांनी बक्षीस स्वहस्ते घेणे आहे. बक्षीस वितरणासंबधीची घोषणा वेगळ्या धाग्यावर केली जाईल.
स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.

१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.

२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य घेता येते.

३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. या निरोपात लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.), प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेले लेखन मीमराठीवर स्पर्धा विभागात प्रसिद्ध करून त्याचा मीमराठीवरील दुवा, संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.

४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.

५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.

६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक / परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______

पुढील सर्व बदल/घोषणा/ स्पर्धेची सुरवात या बद्दलची माहिती येथे अद्यावत केली जाईल.
सर्व मायबाप मंडलींना नम्र विनंती आहे की सर्वांनी भरभरून भाग घ्या व हा धागा/ स्पर्धेची माहिती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

धन्यवाद !