“तोच चंद्रमा नभात …”
श्रोतेहो…!
आकाशवाणीच हे सांगली केंद्र आहे.. २३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज वरून आम्ही बोलत आहोत सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत…आता ऐकुयात सुगम संगीत. इथे कधी सांगली, कधी पुणे, कधी नाशिक तर कधी मुंबई केंद्र एवढाच फरक असे. बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर …
” बालपणातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे रेडिओ…!”
लहानपणी जाग यायची ती रेडिओच्या आवाजाने,माझ्या घरी त्यावेळी मर्फी कंपनीचा रेडिओ होता. घरात आई सुद्धा गायची अधुन मधून. तिच्याकडे गाण्याचा समृद्ध वारसा आलेला आहे. माझे चारी मामा उत्तम गायचे. चौघापैकी आता फक्त नंदूमामा आहे, कालानुरूप त्याचा आवाजही वृद्ध झालाय. पण तोही उत्तम गायचा. नंदुमामा वयानुसार सगळ्यात धाकटा , आईपेक्षाही लहान. त्यामुळे त्यालाच क़ाय ते आम्ही अरेजारे करतो. तर तीन नंबरचे मामा म्हणजे सखाहरी मामा हे बाबूजीचे भक्त. सुधीर फड़के उर्फ बाबूजी हे मामांचे दैवत. बाबूजीची गाणी त्यांना मुखोदगत असत. त्यांच्याच तोंडी प्रथम ऐकले होते बाबूजीचे ….
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तुही कामिनी
तेव्हा शब्दाचे अर्थ कळण्याचे, आशय समजून घेण्याचे किंवा मराठीची श्रीमंती कळण्याचे वय नव्हते. पण मामा छान गायचे आणि वर अभिमानाने सांगायचे आमच्या बाबूजींचे गाणे आहे. तेव्हा बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे तरी कुठे माहीत होते. पण घरातच गाणे असल्याने गाण्याचा कान होता. त्यामुळे बाबूजींचे गाणे ऐकताना एक जाणीव पक्की असायची की हा माणूस नक्कीच कुणीतरी दैवी देणगी असलेला माणूस आहे. बाबूजींची जवळपास सगळीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकलेली आहेत, गीत रामायणाची तर अजुनही पारायणे होतच असतात. पण हे गाणे जास्त आवडायचे कारण हे गाणे मामा गायचे. नंतर वयाबरोबर समज वाढत गेली. शब्द, त्याचा आशय, भाषेचे सौंदर्य आणि अर्थातच कविता समजायला लागली तेव्हा हे गाणे अजुनच आवडायला लागले.

माझ्या अतिशय आवडत्या कवयित्री शांता शेळके यांची ही गझलेच्या अंगाने जाणारी तरीही गझल नसलेली कविता. (नंतर एकदा सोलापुरातच कुठल्यातरी कार्यक्रमाला आलेल्या शांताबाईंची भेट झाल्यावर मी त्यांना या गाण्याशी असलेल्या माझ्या भावबंधाबद्दल बोललो होतो. हे गाणे किती आवडते हे त्यांना आवर्जून सांगितले होते. तेव्हा त्या त्यांच्या चिरपरिचित स्टाईलमध्ये गालातल्या गालात गोड हसून हळूच थैंक्यू म्हणाल्या होत्या. कसलं भारी वाटलं होतं म्हणून सांगू?) असो. तर हे आमच्या लाडक्या शांताबाईंचे गाणे, लाडक्या बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले गाणे. शांताबाईंनी खुप गाणी लिहीली आहेत पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की त्यांच्यातली कवयित्री त्यांच्यातल्या गीतकारावर कायम सरस, वरचढ़ ठरत आलेली आहे. अर्थात तेव्हा संगीतकारही कविच्या शब्दाना न्याय द्यायचा पुरेपुर प्रयत्न करत. काही सन्माननीय अपवाद सोडले तर गाण्यासाठी म्हणून काव्यात, त्याच्या शब्दात कुठलीही चिरफाड केली जात नसे. अर्थात शांताबाईंची कविता इतकी चिरेबंदी असते की त्यात काही बदल करण्याची गरजच पड़त नाही. किंबहुना कुठलाही शब्द इकडचा तिकडे करण्याची मुभा शांताबाई अजिबात देत नाहीत, तशी गरजच पड़त नाही. त्यांची कविता अशी असते की एकही शब्द बदलण्याचा अथवा इकड़चा तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर सगळी रचनाच बदलून जावी, कवितेचा सगळा डोल विसकटुन जाईल.
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तुही कामिनी.
शांताबाईंनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की या गाण्याने त्यांना गीतकार म्हणून मान्यता मिळवून दिली. शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले. शान्ताबाईंनीदेखील हा उल्लेख केला आहे. मूळ श्लोकातील स्त्रीभावना त्यांनी प्रियकराच्या भावनेत रूपांतरित केली आहे.
ज्या मूळ संस्कृत श्लोकावरून हे गीत लिहिले तो श्लोक असा आहे :
य: कौमारहर: स एव हि वर:
ता एत चैत्रक्षप:।
ने चोन्मीलितमालतीसुरभय:
प्रौढा: कदम्बानिला:।।
सा चैवास्मि तथापि तस्य
सुरतव्यापारलीलाविधौ।
रेवारोधसि वेतसि तरूतले
चेत: समुत्कंठते।।’
ज्याने माझे कौमारहर: केले तो माझा प्रियकर आहे. तोच माझा पती आहे. चैत्रातील आल्हाददायक रात्र आहे. कदंबावरून वाहणारे वारे आणि फुललेल्या जाईचा गंध वातावरणात भर टाकतो आहे. मन आणि भावना गुंतलेल्या आहेत. मात्र त्यावेळच्या प्रेमाची आठवण जास्त दु:खी करते आहे. मी तीच आहे, मी तेव्हाचीच आहे, पण ही हुरहूर प्रेम हरवल्याचं सांगते. एकमेकांचे नाते आता ‘ते’ राहिले नाही, हा मनीचा विषाद आहे. या मन:स्थितीला इतर कोणीही जबाबदार नाही. एका विशिष्ट पातळीवर ही भावना अलगद नेऊन सोडली आहे. हा नेमका भाव प्रियकराच्या भावनेसाठी व तीन अंतऱ्याच्या गीतासाठी पुरेसा ठरला आहे.
थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येतं की गाण्यातील काही संस्कृत शब्द हे अतिशय खुबीने वापरलेले आहेत. उदा. चैत्रयामिनी हा शब्द घ्या. मुळचा हा संस्कृत शब्द शांताबाईंनी इतक्या अप्रतिमरित्या मराठी गीतात गुंफलाय की क्यां कहने! चैत्रयामिनीला लागून येणारा ‘कामिनी’ सुद्धा तितकाच समर्पक आहे. शब्दांचे हे परस्परांवर अवलंबून असणे, परस्परांना पूरक असणे हेच शांताबाईंच्या कवितेचे सहज सौंदर्य आहे.
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी
मी ज्याला भाषेचे सौंदर्य म्हणतो ते इथे या कडव्यात खुप ताक़दीने अनुभवायला मिळते. नीरवतेचा संबंध चांदण्याशी जोडणे ही कविच्या कल्पकतेची खरी नजाकत आहे. नीरवता म्हणजे गाढ शांतता, अगदी झाडाचे पान जरी ओघळले तरी आवाज व्हावा अशी शांतता. अश्या शांततेत लागणारी समाधी आणि चांदण्याची शीतलता (इथे चांदणी नव्हे तर चांदण्यांचा प्रकाश म्हणजे चांदणे अभिप्रेत आहे) या दोन्हीतुन मिळणाऱ्या सुखाची तुलनाच नाही. तश्यात जाईच्या प्रसन्न करून टाकणाऱ्या सुगंधाची मोहिनी … गंधमोहिनी ! किती समर्पक आणि नेमके शब्द आहेत !
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे?
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी
पण एवढे सगळे असूनही काहीतरी कमी आहे. सर्व काही जैसे थे आहे, तू तूच आहेस, मी मीच आहे. पण नात्यातली ती कोवळीक, ती आर्तता मात्र हरवलेली आहे. या गाण्यातील ‘चैत्र’ हा उच्चार तर सर्व गायकांनी अभ्यास करावा असाच आहे. पूर्ण गायनात ‘जसा शब्दाचा अर्थ, तसा त्या शब्दाचा उच्चार’ हे सूत्र कायम दिसते. तोच आहे, तीच आहे, तशीच आहे, असे खंत व खेद या भावनेतील शब्द या गाण्यात बरेच आहेत. पण हा ‘तोच’ असलेला भोवताल शान्ताबाईंच्या उत्कृष्ट शब्दांनी भरला आहे.
हे गाणे सर्वश्री सुधीर फडके उर्फ बाबूजींनी गायलेले आहे. बाबूजी म्हणजे ललित संगीताचा मानदंड. गाण्याचे संगीत आणि अर्थातच चाल दोन्हीही बाबूजींचे आहे. गाणे ऐकताना हा माणूस प्रत्येक लहान-सहान बाबीचा किती खोलवर जावून विचार करत असे याची खात्री पटते. आजचे गायक एका दिवसात चार-चार गाण्याचे रेकॉर्डिंग उरकून टाकतात. बाबूजींच्या स्वरांची ताकद, त्यांच्या गळ्याचे सामर्थ्य पाहता त्यांना तर हे अगदी सहज शक्य झाले असते आणि तरीही त्यांची गाणी सर्वोत्तमच ठरली असती. पण मुळात ‘उरकुन टाकणे’ हे बाबूजींच्या स्वभावातच नव्हते. गाताना त्या गाण्याशी एकरूप होणे, बाकी सर्व विसरून गाण्याशी तादात्म्य पावणे हा बाबूजींनी स्वतःला घालून दिलेला नियमच होता जणु. त्यांचे कुठलेही गाणे ऐकावे. त्यात कधीच चाचपडलेपणा आढळत नाही. रेकॉर्डिंग झाले की माझे कर्तव्य संपले ही भावना चुकुनही येत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर प्रत्येक जागा कशी जिथल्या तिथेच यायला हवी हे बाबुजींचे खरे सामर्थ्य. गाण्यातून क़ाय सांगायचे आहे, क़ाय आशय अभिप्रेत आहे. तो रसिकांपर्यन्त कसा पोचवायचा याचा सगळा विचार बाबूजींनी केलेला असे. त्यांचे कुठलेही गाणे ऐका, उगाच कुठे भरतीच्या जागा घेतल्याहेत, श्रोत्यांना मोहवण्यासाठी कुठे अनावश्यक तान घेतलीय किंवा एखादी नको असलेली पण गाण्यात फिट बसेल अशी जागा घेतलीय… हे त्यांच्या गाण्यात कधीच दिसणार नाही. सगळे कसे जिथल्या तिथे आणि नेमके. इम्प्रोवायजेशन स्वतःच्या आवाजात असायचे , गाण्याच्या , संगीताच्या रचनेत , भूमिकेत त्यांनी कधीच ढवळाढवळ केली नाहीये. त्यांच्या गाण्याची ही सगळी लक्षणे ‘तोच चंद्रमा…’ च्या गायकीत स्पष्टपणे जाणवत राहतात.
त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी
गाण्याचा विलय जरी शोकान्त असला तरी बाबुजींचे सूर सगळे कसे सुखद करून टाकतात. श्रोत्यांना आजुबाजुच्या कसल्याही परिस्थितीचे भान हरवायला लावण्याची ताकद बाबुजींच्या आवाजात होती.
तसे पाहायला गेले तर त्यांच्या सुरूवातीच्या गाण्यावर बालगंधर्वांच्या गायकीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. पण त्यातून बाबूजींनी फार लवकर सुटका करून घेतली. त्यांचा आवाज तसा हळूवार आहे. गीतरामायणातील काही गीतांमध्ये वरची पट्टी देखील समर्थपणे लावतात ते. पण त्यांची खरी जादू अनुभवायला मिळते ती हलक्या, मध्यममार्गी सुरातच. आजकाल कवि, गीतकार यांचे इंडस्ट्रीतील नेमके स्थान क़ाय? हा एका स्वतंत्र लेखाचा किंबहुना वादाचा मुद्दा होवू शकेल. पण तत्कालिन संगीतकार, विशेषत: बाबूजी हे कवि , गीतकाराला गायक-संगीतकाराईतकेच तोलामोलाचे मानत, त्यामुळे बाबूजींच्या गाण्यात कविच्या शब्दाला, त्यांच्या उच्चारणाला तितकेच महत्व दिलेले आढळून येते.
लेख थोड़ा लांबलाच, पण शेवटी थोड़े तांत्रिक बाबीबद्दल बोलून मग थांबतो. शास्त्रीय संगीताच्या तांत्रिक बाबीबद्दलचे माझे ज्ञान तसे खूपच तोकडे आहे. पण आंतरजालावर अनेक दिग्गज लोक यावर अविरत लेखन करीत असतात. असेच आंतरजालावरील संदर्भ ढूंढाळताना सर्वश्री अनिल गोविलकर यांच्या ब्लॉगवर मला या गाण्याबद्दल काही लेखन आढळले. अनिलजी लिहीतात…
” यमन रागात गाण्याची स्वररचना बांधली गेली आहे. काही राग हे काही संगीतकारांच्या खास आवडीचे असतात आणि त्याबाबत विचार करता, सुधीर फडक्यांचा राग यमन, हा खास आवडीचा राग होता, हे प्रकर्षाने लक्षात येते. फडक्यांच्या रचना “गीतधर्मी” आहेत, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालण्याच्या ब्रीदास ते जगतात.”
असो, बाकी माझे शैलेन्द्रदादा म्हणतात तसे , अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर…
“खरं सांगायचं तर मी बाबुजींनी पकडलेलं “झाड” आहे. आणि या चेटूकावर जगात उपाय नाही, ते माझ्यासोबतच संपणार. त्यामुळे प्रत्येक ओळ ही अगदी माझीच वाटते आहे. बाकी यमनच्या वगैरे फंदात न पडलेलं बरं कारण हे ख्यालगायन नसून अस्खलित भावदर्शन आहे. फक्त काही सौंदर्यस्थळं माझ्या बुद्धीला आणखी दिसलीत – ती म्हणजे ह्रस्व-दीर्घाच्या अचूक सांभाळलेल्या जागा. उदा. मी ही तोच, तीच तू ही किंवा त्या पहिल्या प्रीतीच्या इ.”
मी सुद्धा बाबूजीनी पकडलेलं झाडच आहे शैलेंद्रदादा आणि मृत्युनंतर जऱ हे चेटुक सुटणाऱ असेल तर आपल्याला अजिबात मरायचं नाहीये. पण लव यू . दिलकी बात कह दी आपने !
बाबूजी कायम गीतातील शब्दा-शब्दांचा, काव्याचा पूर्ण अभ्यास करून मगच त्यानुसार त्याला सूट होणारी वादनसामुग्री संगीतासाठी निवडत. त्यामुळे त्यांचे संगीत हे कायम काव्याच्या आशयाशी सुसंगत असे. त्यामुळे काव्याच्या अर्थाबरोबर त्याचा आशयही गाण्यातून पुरेपुर उतरत असे. बाबूजीचे अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांचे स्वत:बद्दल, आपल्या आवाज़ाबद्दल कसलेही गैरसमज नव्हते. आपल्या सामर्थ्याबरोबर आपल्या आवाजाच्या मर्यादासुद्धा ते पूर्णपणे ओळखून होते आणि त्यांनी कधीही आपल्या मर्यादा ओलांडण्याचा अकारण प्रयत्न केला नाही. त्यामुळे बाबूजी कायम भारतीय रसिकांच्या मनात ठामपणे अढळपद मिळवून विराजमान झालेले आहेत. आणि यावत् चन्द्र-दिवाकरौ ते इथल्या रसिकांच्या मनावर राज्य करत राहतील.
बाबूजी तुम्हाला, तुमच्या सुरांना साष्टांग नमस्कार. तुमच्या सूरांची मोहिनी अशीच आमच्या पुढच्या कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील यात काडीमात्रही शंका नाही. प्रणाम !
संदर्भ सौजन्य : १. श्री. अनिल गोविलकर यांच्या ब्लॉगवरील लेख
२. दै. लोकसत्ता (दिनांक २३ जुलै २०१७) मधील श्री विनायक जोशी यांचा लेख
३. माझे वडील बंधू श्री. शैलेन्द्र साठे
विशाल विजय कुलकर्णी, पनवेल
भ्रमनधवनी – ०९३२६३३७१४३