Category Archives: आजची मेजवानी

खानदेशी मांडे – पुरणपोळी

मागच्या आठवड्यात कोथरुड मधील गांधीभवनजवळ भरलेल्या एका महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. विविध स्टॉल्स होते. पण त्यातल्या एका स्टॉलवरच्या काकुंनी माझे लक्ष वेधून घेतले.

पिंपरीहून आलेल्या सौ. ललिता दि. तरवटे यांनी हा स्टॉल लावला होता. काकु दिवसभर येणार्‍या-जाणार्‍यांना गरमागरम खानदेशी पद्धतीचे मांडे (पुरणपोळी) करुन खायला घालत होत्या. एका नगाची किंमत ६०.०० रुपये फक्त. ते वाचल्यावर मी थोडा चमकलो. म्हटलं चितळ्यांची पुरणपोळी सुद्धा १५-२० रुपयाला मिळते, मग यात असं काय विशेष होतं की ज्यासाठी ६० रुपये मोजावेत. पण जेव्हा थोडा वेळ थांबून ते तयार करण्याची एकंदर प्रक्रिया आणि त्यामागची मेहनत बघीतली, त्या मांड्यांचा आकार बघीतला आणि अर्थातच त्याची मनसोक्त चव घेवून बघीतली तेव्हा मनोमन वाटुन गेलं..

साठच काय शंभर रुपये जरी किंमत लावली असती तरी योग्यच होती.

पुरणपोळीला लागणारे साहित्य आणि कृती सर्वांना माहीतच असते त्यामुळे ती लिहीत बसण्यात वेळ घालवीत नाही. फोटो सगळी कहाणी स्वतःच सांगतील. फक्त एवढेच सांगतो की मांड्यांचे पीठ तयार करताना गव्हाची कणिक आणि मैदा समप्रमाणात मिश्रण करुन वापरलेला असल्याने पिठाला मस्त कन्सिस्टन्सी (पर्यायी मराठी शब्द काय?) आली होती.

काकुंनी केलेली पुर्वतयारी…

१. मांड्यांसाठी गव्हाचे पिठ आणि मैद्याचे योग्य प्रमाणात मिश्रण करुन तयार केलेली कणिक
२. पुरण (कमी गोड – गुळ वापरून केलेले)
३. पोळपाटाऐवजी पालथी ठेवलेली एक मोठी परात
४. शेगडी चालू करून त्यावर पालथी ठेवलेली एक मोठी कढई

यावरून अंदाज आला असेलच…
ये चीज कुछ हटके है….  🙂


वर सांगितल्याप्रमाणे कणिक तयार करुन आधी काकुंनी परातीवर त्याच्या दोन लाट्या तयार करुन घेतल्या.

त्यानंतर त्यापैकी एका लाटीवर पुरणाची लाटी (गोळा) ठेवून दुसरी लाटी त्यावर लावून एकजिव करुन घेतले आणि लाटायला सुरुवात केली.

लाटी बर्‍यापैकी म्हणजे परातीच्या आकाराची लाटून झाल्यावर पुढची जी कमाल काकुंनी केली ती केवळ फोटोतून कळण्यासारखी नाही. मी जे म्हटलं की याला साठ काय शंभर रुपये सुद्धा कमीच आहेत ते एवढ्याचसाठी…

कृपया खालील चित्रफीत पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लाटी पुरणाने भरलेली आहे 🙂

लाटी पुरेशी पसरवल्यावर काकुंनी ती शेगडीवर पालथ्या घातलेल्या परातीवर टाकली. विशेष म्हणजे हे सगळे करत असताना कुठेही पोळीचा (मांड्याचा) आकार बिघडला नव्हता आणि कुठुनही पुरण चुकुनही बाहेर आले नाही.

Hats off to you Kaku  :wave

थोड्यावेळाने मस्त भाजले गेलेले मांडे..

भाजल्यानंतर छान घडी करुन ठेवलेले मांडे..


अर्थात अस्मादिकांनी मनसोक्त ताव मारला हे सांगणे नलगे. आता बहुदा येत्या ११ तारखेपासून बालगंधर्वच्या आवारात असेच एक प्रदर्शन भरणार आहे. तरवटे काका-काकु तिथेही असतीलच. ज्यांना मांडे खायचे (प्रत्यक्षात, मनातल्या मनात नव्हे) इच्छा आहे त्यांनी या प्रदर्शनाला जरुर भेट द्यावी.

सौ. तरवटे काकु वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खानदेशी मांडे करुन देण्याच्या ऑर्डर्सदेखील घेतात.
इच्छुकांसाठी संपर्क : सौ. ललिता दि. तरवटे : ९४२२३२५२२८/ ९६२३१३९१६०

विशाल….

मी मराठी लेखन स्पर्धा २०१२ चा निकाल

सर्व वाचकश्रेष्ठींना नमस्कार,

मी मराठी नेटवर यावर्षी घेतल्या गेलेल्या लेखन स्पर्धेचा निकाल आज जाहीर झालेला आहे. त्यासंदर्भातील मी मराठीचे चालक – मालक श्री. राज जैन यांनी दिलेली बातेमी खालीलप्रमाणे……

*******************************************************************************************************

नमस्कार

मी मराठी लेखन स्पर्धा २०१२ चा निकाल आज जाहीर करत आहोत यांचा आम्हाला खूप आनंद होत आहे. काही व्यक्तीगत कारणामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

१-१२-२०१० ते ३१-१२-२०१० याकाळात मी मराठी.नेटने लेखन स्पर्धा २०१० आयोजित केली होती, तसेच मी मराठीवर काव्य स्पर्धा २०११ यशस्वीपणे राबवण्यात आली होती. तो सर्व पूर्वानुभव सोबत घेऊन मी मराठी.नेट तर्फे लेखन स्पर्धा २०१२ घेतली होती. स्पर्धेच्या प्रतिसादाबाबत आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्याच. उत्तम लेखकांनी मनापासून स्पर्धेत सहभाग घेतला व आपल्या प्रवेशिका वेळेवर मी मराठीवर प्रकाशित केल्या. सर्व स्पर्धकांनी पाठवलेल्या लेखनाचे योग्य प्रकारे मुल्यमापन करणे आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन निकाल देणे ही परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार यांच्यासाठी कसोटीच होती. परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यालयीन व्यापांमधुन, साहित्यसेवेतुन तसेच घरगुती जीवनातून त्यांचा बहुमुल्य वेळ काढून सर्व प्रवेशिका वाचल्या याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. निकाल जाहीर करण्याआधी त्यांना हवा तेवढा वेळ लेखन वाचण्यासाठी देण्याचा निर्णय आधीच झालेला होता. त्यानुसार त्यांनी आज निकाल मीमराठी.नेट पर्यंत पोहचवला आहे, तो आम्ही तुमच्या समोर जाहीर करत आहोत. सर्व स्पर्धकांचे, सदस्यांचे, वाचकांचे सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार व मी मराठी बरोबर असलेला तुमचा स्नेह असाच कायमस्वरूपी राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना. तुमचा पाठिंबा आणि सहकार्य लाभल्यामुळेच मी मराठी.नेटची सातत्याने प्रगती होत आहे. तुमच्या सहयोगाच्या जीवावर मी मराठी परिवार अनेक नवनवीन योजना सातत्याने राबवत राहील. आज लेखन स्पर्धा २०१२ चे निकाल जाहीर करत असताना विजेत्यांचे तर अभिनंदन आहेच पण सर्व स्पर्धक आणि मी मराठी परिवारातील सर्वांचे अभिनंदन! मी मराठी परिवारावरील आपणा सर्वांचा विश्वास व स्नेह असाच वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

लेखन स्पर्धा २०१२ निकाल

प्रथम तीन विजेते
प्रथम क्रमांक – आशिष निंबाळकर ( चक्रावळ )
द्वितीय क्रमांक – विशाल कुलकर्णी (चिकणी चमेली )
तृतीय क्रमांक – नीलपक्षी ( कोंबडीला मालक पाहिजेच…)

बक्षिस समारंभ व बक्षिस वितरणाची सुचना सर्वांना लवकरच दिली जाईल व त्यांचा वेगळा धागा असेल. पुन्हा एकदा सर्वांचे अनेकानेक आभार. पुढील लेखनाकरता अनेकानेक मी मराठी.नेटतर्फे सर्वांना शुभेच्छा.
सर्वांचा असाच लोभ रहावा ही विनंती.

आपलेच,

मी मराठी.नेट

***************************************************************************************************************

चिकणी चमेली ’मी मराठी नेट’ वर

सर्व विजेत्यांचे (माझ्यासहीत) आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !

श्री. राज जैन, संचालक, मी मराठी नेट आणि स्पर्धेचे परीक्षक श्री. श्रीकांत बोजेवार (उर्फ़ श्री. तंबी दुराई) यांचे मन:पूर्वक आभार 🙂

सस्नेह,

विशाल कुलकर्णी