Category Archives: अधुर्‍या डायरीची अस्वस्थ पाने

सदैव “कर्तव्य” आहे …

आज प्रभादेवी भागात आमच्या एका कस्टमर कड़े एका प्रेझेंटेशनसाठी जायचे होते. नेहमीप्रमाणे मी लोकल ट्रेनने वडाळा रेलवे स्टेशनला उतरलो आणि एक ओला (शेअर) बुक केली. सवयीप्रमाणे ड्रायव्हरचा नंबर आला की लगेच फोन लावला. खुपदा क़ाय होते की बुकींगचा मेसेज येतो तेव्हा ते लोक गाड़ी चालवत असतात, मेसेज बघेपर्यंत गाड़ी मुळ ठिकाणापासुन बरीच लांब जावू शकते किंवा समजा तुम्ही एखाद्या फ्लायओव्हरखाली उभे आहात आणि बुक केलेली गाड़ी जरा लांबुन येतेय. अशा वेळी चुकुन कॅब फ्लायओव्हरवर चढ़ते आणि मग त्याला पुन्हा पुढे कुठूनतरी यू टर्न घेवून परत यावे लागते, यात नाही म्हटले तरी वेळ जातोच आणि मग पैसेंजर वैतागतो. अरे इथे ओलाचे ऐप्प तर ५ मिनिटाच्या अंतरावर गाड़ी दाखवत होते आणि दहा मिनिट होवून गेले तरी गाड़ी येत कशी नाही? So to avoid such consequences मीच लगेच फोन करतो. तसा आजही केला. ड्रायव्हरने सांगितले की तो जरा आतल्या बाजूला आहे, यू टर्न घेवून दहा मिनिटात पोचतोय. कुठेय म्हणून विचारल्यावर चालत तीन चार मिनिटाच्या अंतरावर आहे असे कळले आणि दादरच्याच दिशेने तो चालला होता. म्हटल तिथेच थांबा, मीच येतो. 

अक्षरशः दोन मिनिटात मी तिथे पोचलो. शेयर कार असल्याने अजुन एक सहप्रवासी होता. ड्रायव्हर म्हणजे  अरुण शिंदे म्हणून एक पन्नाशीच्या आत बाहेरचे गृहस्थ होते. मला आधी सॉरी आणि नंतर थैंक्यू म्हणाले. म्हणे सॉरी एवढ्यासाठी की तुम्हाला इथपर्यंत चालत यावे लागले. थैंक्यू एवध्यासाठी की तुम्ही माझा यू टर्न मारून येण्यासाठी लागणारा वेळ आणि गॅस वाचवलात. म्हणलं “दादा, अहो जवळच होतात तुम्ही म्हणून आलो चालत थोडासा त्यात क़ाय एवढे? ”
तर म्हणाले ,” साहेब, अहो फार विचित्र पैसेंजर्स भेटतात. सकाळी दादरहून एका मुलीला पिकअप केलं. मी रोडच्या या बाजूला होतो. ती त्या बाजूला. रस्ता रिकामाच होता, फारसे ट्राफिकही नव्हते पण लेक काही या बाजूला यायला तयार नाही. शेवटी मलाच अर्धा किमीवरुन यू टर्न घेवून परत यावे लागले आणि तिला घेवून पुन्हा एक यू टर्न घेवून त्याच रस्त्याने पुढे.  आणि वर उशीर झाला म्हणून मलाच धमकी दिली की मी इमेल करून कळवेन ओलाला की तुम्ही यायला उशीर केलात. आता बोला ! ”
मी नुसताच हसलो , ड्रायव्हरदादांनी गाड़ी पुढे काढली. पुढे एका सिग्नलला जावून गाड़ी थांबली. तेव्हा एक लक्षात आले की आमच्या समोर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला दोन गाड्या उभ्या आहेत. एक बी एम डब्ल्यू होती आणि दूसरी सफारी. दोन्हीच्या मध्ये एक गाड़ी आरामात राहु शकली असती. मी थोड़ी मान उंचावून आपली गाड़ी मागे का थांबलीय हे पाहण्याचा प्रयत्न केला. ते बघून अरुणदादा हसुन म्हणाले,” नाही साहेब. पुढे जागा आहे खरी पण ते झेब्रा क्रॉसिंग आहे. त्यावर गाड़ी उभी करणे हा वाहतुकीच्या नियमाचा भंग ठरेल. ” 
इतकं छान वाटलं ते ऐकुनच की बस. आता मात्र मीही मोकळेपणे अरुणदादाशी बोलायला सुरुवात केली. बोलताना लक्षात आले की जरी व्यवसाय कॅब ड्रायव्हरचा असला तरी हा माणुस कमालीचा सुविद्य आणि शिस्तीचा आहे. केवळ कुटुंबाची गरज म्हणून टॅक्सी चालवतात पण आपले काम निष्ठेने करताहेत. तिथे कुठेही सिग्नल तोड़णे नाही. उगाच दिसली जागा की घुसव गाड़ी असला प्रकार नाही. बोलता बोलता म्हणाले नवी व्यवस्था, नवे सरकार भरपूर इंफ्रास्ट्रक्चर वाढवतेय. ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. खुपदा थेट घरी चलन येते टाऊन एरियात सिग्नल तोडला की. पण सरकार मुळ मुद्दा विसरतेय तो म्हणजे सिव्हिलियन डिसीप्लीन. जोपर्यंत आपण स्वतःला शिस्त लावून घेत नाही , तोवर हे सगळे व्यर्थ आहे हो. मॉनिटरिंग सिस्टीम्स किती दिवस मेनटेन केल्या जातील देव जाणे. त्यांनंतर पुन्हा पब्लिकचे ये रे माझ्या मागल्या सुरु होणार. असो, आपण आपल्या परीने नियम पाळायचे. आणि हो साहेब, शक्य झाले तर तुमचा फिडबैक तेवढा जरा चांगला द्या. किमान 3 स्टार तरी. काय्ये, त्यावर आमचा बोनस, इन्सेंटिव्ह ठरते हो.” आणि मिस्कीलपणे हासले.
प्रभादेवी आले आणि मी उतरलो. बिल झाले होते ४९ रुपये फक्त. (मी काळी पिवळीला कित्येकदा ९०-१०० रुपये भाड़े दिलेले आहे दादर स्टेशन ते वडाळा स्टेशन या अंतरासाठी, ते ही फारसे ट्राफिक नसताना ) . मी उतरल्या उतरल्या अरुणदादाना पाच स्टार देवून टाकले. रिमार्क मध्ये लिहीले He is a responsible citizen. पण एक गोष्ट मात्र मनापासून पटली होती की Self discipline is must !
अरुण दादांचे डिटेल्स…
Arun Shinde (9819465789) 
OLA cab driver 

White Etios MH02CR2635.

तळटीप : हे ओलाचे प्रमोशन नाहीये. असलेच तर अरुण शिंदे नामक एका शिस्तप्रिय आणि जबाबदार कॅबचालकाचे आहे. 
© विशाल विजय कुलकर्णी

दोस्त है वो हमारा … 

काल दुपारी ऑफिसच्या काही कामानिमित्त ठाण्यात होतो. एका होटेलमध्ये काहीतरी खायला म्हणून शिरलो.

काही वेळाने शेजारच्या टेबलवर एक काका येवून बसले. वय साधारण साठ पासष्ठ च्या दरम्यान. ऑफ व्हाइट कलरचा बुशशर्ट आणि करड्या रंगाची (चक्क) बेलबॉटम. हे मला वेटरने दाखवले. कुजबुजत म्हणाला, “देखो साब,  है तो पाच फिट, पर अपने आपको दीवारका अमिताभ बच्चन समझता है! पँट देखो, सारा रास्ता साफ करते चलता है, अब हमारा दिमाग खाएगा इधर!  मी समजून गेलो की बहुदा रोजचे कस्टमर आहेत काका.
आता मी काकांकडे जरा नीट पाहीले. डोक्यावर भरघोस केस होते आणि डिट्टो ऐशीच्या दशकातल्या बच्चनची हेअरस्टाइल. जवळजवळ काळ्या रंगाकड़े झुकणारा रंग. चेहरेपट्टी साधारण साउथच्या सिनेमातील सहाय्यक कलाकारांसारखी. चेहऱ्यावर एकप्रकारचा उर्मट, उद्धट भाव. 
मी माझ्या पुढ्यातली मिसळ ओरपत हळूच काकांकडे लक्ष ठेवून होतो. काका बहुदा दाक्षिणात्यच असावेत…
“अय वेट्टर्र, इधर आव, ये टेबुल साप करो पैले.” 
वेटरने टेबल साफ केलं आणि वळला..

” आर्डर तो लेके जाव!” काका बच्चन
” रोज तो एक्की आयटम मंगाते ना साब आप?”
” पिर भी आर्डर लेव. एक प्लेट इटली चटनी!” आणि खिश्यातून कसलीशी चोपड़ी काढून चाळायला लागले. 
” अभी मजे देखो साब. ” वेटर माझ्याकडे बघून खुसफुसला आणि किचनकडें पळाला.
काका, चोपडीत बघून काहीतरी पुटपुटत होते. मला वाटले बहुदा काहीतरी अय्यप्पास्वामी किंवा व्यंकटेश स्तोत्र असले काहीतरी पुस्तक दिसतेय. मी थोड़े कान देवून ऐकायचा प्रयत्न केला. काका स्वत:शी पुटपुटत होते. 
” फेयर लेडी डाउन है, वैलेंटाइन पाच पे. अक्षयबाबा आठ? हा ये ठीक है, करिश्मा फॉर्ममें लगताय ! लंगड़ा भी ठीक ठाक , या फिर स्टालियन?” मला क़ाय टोटलच लागेना. 
“रेस का शौक रखते है चिच्च्या!” मागून ‘इटली’ घेवून आलेला वेटर हळूच माझ्या जवळून कुजबुजला. आणि इडलीची डिश काकासमोर ठेवली. 
“पिछले दस सालसे देख रहा हु साब. महालक्ष्मीमें रेस हो ना हो इनके दिमागमें हर वक्त वही चलता है! अभी चिल्लायेगा देखो….”
तेवढ्यात काकांचा आवाज आलाच..
” तुमको पता है ना वेटर आम सांबार नै खाता, ये लेके जाव और चटनी लाके दो कोकोनट्ट का !
 वेटरने खोबऱ्याच्या चटणीची अजुन एक वाटी आणून ठेवली तोवर काका परत आपल्या चोपडीत बुडाले होते.
“अगर पैले ही सांबार नै देता ना साब मैं, ये फिर भी चिल्लाता सांबार किदर है करके? खब्ती है बुढ्ढा. देखना, अभी थोड़ी देर में बुढ्ढा पाव मांगेगा साब” 
वेटर डोळे मिचकावत म्हणाला.
“ऐ वेट्टर, दो पाव लाना!” 
म्हातारे काका मला बुचकळ्यात पाड़त होते. आधी इडली मागवली. मग सांबार परत करुन खोबऱ्याची चटणी घेतली आणि आता पाव मागवताहेत?
काकांनी चटणीत पाव बडवून खायला सुरुवात केली. दोन्ही पाव एका वाटीत संपवल्यावर काकांनी इडलीकड़े मोर्चा वळवला. 
” एक चोटा वाटी कर्ड लाना, कट्टा नै होना!” पुन्हा डोके चोपडीत. 
वेटर एका वाटीत, राइसप्लेटमधे देतात तेवढे दही घेवून आला. माझ्या टेबलवर ठेवलेल्या एका पसरट बाटलीतली दोन चमचे साखर त्यात घातली आणि वाटी काकांसमोर ठेवली. जाताजाता हळूच कुजबुजला…
“अभी बोलेगा दही खट्टा है, देखना आप !”
” ये क्या रे ये, कर्ड कितना कट्टा होता रे ये” 
म्हातारा ओरडलाच. (एक सांगायचं राहिलंच , हे सारं संभाषण अगदी तार सप्तकात चालू होतं बर्का)
मी चाट, माझ्यासमोर वेटरने चांगली दोन चमचे साखर त्या टीचभर दह्यात घातलेली. मी काहीतरी बोलणार तोवर वेटरने नको म्हणून खुण केली आणि मी अजुनच चाट पडलो. 
” मैं बोल्ला ता कट्टा नै होना फिरभी जान बुझके तुम कट्टा कर्ड लाया! वापिस लेके जाओ ये,  मैं इसका मनी नै देगा!”
वेटरने गुपचुप वाटी उचलली आणि घेवून गेला. मी आश्चर्यात पडलो होतो. म्हातारा चक्क नालायकपणा करत होता. पण वेटर गप्प…
सुदैवाने थोड्याच वेळात काका उठले तसा मी ही उठलो आणि त्यांच्या बरोबरच काउंटरकड़े गेलो. म्हाताऱ्याने बशीतली बड़ीशोप तोंडात टाकली.
” मेरे खातेमें लिख लेना!”  काऊंटरवरच्या माणसाने मान हलवली आणि म्हातारा निघुन गेला. जाता-जाता पुन्हा एकदा ओरडला. 
” वो कर्ड कट्टा था, उसका पैसा मैं नै देगा!”
मी माझं बिल पे केलं, समोरच्याला म्हणालो , ” काय विचित्र म्हातारा आहे? एक तर उधारीचं खातं त्यात त्या दह्यात एवढी मोठ्ठी साखर घातली होती वेटरने तरी म्हणतो आंबट आहे. उधारी तरी देतो का वेळेवर?”
“पिछले आठ सालसे एक पैसा नही दिया है साब उसने!” 
मागून आलेल्या वेटरने सांगितलं. मी शॉकच झालो. 
” फिर उसे आने क्यों देतो ह्यो यहां?”
तसा काऊंटरवरचा माणुस (हा मालकच होता हॉटेलचा) म्हणायला, ” साब, मैं भी नही खिलाउंगा तो भूखा मरेगा वो अंकल. पंधरा सालसे जानता हु उसको. कोई बड़ा टेक्सटाइल मिलमे अच्छा काम था !  सभी है घरमे. बिवी है, दो बच्चे है. अच्छा जॉबपे है दोनों लड़के. आठ दस साल पैले मिल बंद हो गया, कुछ दिनों बाद लड़कोने घरसे निकाल दिया क्यूंकी इसको रेसका आदत था! नोकरी में था तब भी सारा पैसा रेस पे उड़ाता था, अब घर की चीजें बेचके उड़ाने लगा! तो एक दिन बच्चोने घरसे निकाल दिया! तभी से ऊपर के खानेमें थोड़ा गड़बड़ है उसके ! 
साब, जब उसके अच्छे दिन थे तबसे मेरे होटलपे आता है ! मैने नया-नया चालू किया था होटल. एक दो बार तो मेरेको भी पैसा दिया था सप्लायर्स का पेमेंट करने के लिए! वेटर्स को तब भी दस-बीस रुपए टीप देता था ऐसे ही! आज बेचारे के दिन फिर गए है तो क्यां हुआ ? 
हमारा पुराना दोस्त है, बदलते दिनोंके साथ बदल जाए वो दोस्ती ही क्यां? उसके घरवालोने उसका साथ छोड़ा है , इस दोस्त ने नहीं ! एक दोस्त होने के नाते ये मेरी जिम्मेदारी है !
मी फक्त हात जोडले आणि काहीही न बोलता भरल्या डोळ्यांनी हॉटेलच्या बाहेर पडलो. 
देव असतोच हो, फक्त तो आधी स्वत:मध्ये शोधावा लागतो. त्या हॉटेलवाल्याप्रमाणे ज्यांना ज्यांना तो सापडतो ते माणुस म्हणवून घ्यायला पात्र ठरतात.
© विशाल विजय कुलकर्णी