निसर्गाचे संगीत…
कालच्या विकांताला (बऱ्याच काळानंतर) उंडगायला बाहेर पडलो होतो, सहकुटुंब! ‘पाऊस’ असा छान बरसत होता की जणु काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरूवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा..
पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते.
वेस लांघूनी क्षितीजाची
घन सावळे बरस बरसले
प्रिया बावरी धरा नटावी
नभांत ओले रंग पसरले
एखाद्या नव्वदी ओलांडलेल्या आजीच्या चेहऱ्यावर पसरलेल्या सुरकुत्यांच्या जाळ्यात एखादी तिच्याच वयाची जुनी बालमैत्रीण भेटल्यावर अचानक एक गुलाबी रंगत यावी. दाताच्या बोळक्यातून निरागस, निष्पाप हांसू फुलावं तशी गेल्या ग्रीष्मात होरपळुन निघालेली धरा वर्षेच्या भेटीने नखशिखान्त बहरुन आली होती. हिरवाईचं हंसू लेवुन गवतफुलांच्या कुंदकळ्या चमकवीत वसुंधरा हर्षभरीत होवून गंधाळली होती.
गंधरांगोळ्या रंग रंगल्या…
काळी माती, धवल जलफुले
अलवार बहरली निळावंती
करीत कलरव खग निघाले
तो सोहळा पाहुन आभाळालाही भरून आले नसते तरच नवल. त्यात पावसाच्या आगमनाने धुन्द झालेल्या पक्षीराज मयुराचा केका आसमंतात घुमायला लागला आणि भारावलेली सृष्टी आनंदोत्सव साजरा करु लागली. वातावरणात झालेला बदल पक्ष्यानाही सुखावून गेला होता. त्याची लगबग सुरु झाली. घरट्याची दरूस्ती करायची होती. मोसमासाठी पुरेसे अन्न जमा करून ठेवायचे होते. जो तो कामाला लागला होता. इतके दिवस मरगळुन गेलेल्या निसर्गाने नवी उभारी घेतली आणि आपले साम्राज्य हिरवाईच्या पार्श्वभूमीवर विविधारंगानी रंगवण्यासाठी आपला जादुई कुंचला हातात घेवून तो सिद्ध झाला.
धुंद नाचती मोर काननी
निळे-सावळे मेघही भिजले
सुखे आनंदी विहग बोलती
जलदांचे कुजन नभी रंगले
झाड़े, पाने, वेली, झरे-कालवे सगळेच आपापल्या परीने पावसाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. वनदेवीने आनंदविणेवर मल्हार छेडला. आता त्यालाही राहवेना. तो सगळा संकोच बाजूला ठेवून अनंत धारांच्या रूपाने सखीकडे झेपावु लागला. आला, आला हो…. पाऊस आला.
त्या जलधारा, मुग्ध तरुवर
अंग-अंग तव मृदगंधे सजले
स्तब्ध वारा सांगतो निर्झरा
आनंदी जगणे बघ गाणे झाले
निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते ! आमच्या शांताबाई (शेळके) म्हणतात…
पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
खरेतर समस्त निसर्गातच इतके संगीत ओतप्रोत भरलेले आहे की इतर कुठल्या मानवनिर्मित संगीतसाधनांची, वाद्यांची गरजच पडू नये. सतत कानावर येणारा भुंग्याचा गुंजारव, या फुलावरुन त्या फुलाकडे जाताना त्यांच्या पंखांची हळुवार आवाजातली गुणगुण किती श्रवणीय असते. कधी शांत, कोमलपणे तर कधी बेभान होत वाहणाऱ्या समीराची कानात साठवून ठेवावीशी वाटणारी सळसळ नेहमीच मनाला मोहवून टाकते.
कोयल की कुहू कुहू
पपिहे की पिहू पिहू
जंगल में झिंगुर की झाये झाये
कोकिळेची ‘कुहू कुहू साद, राव्याचा ‘पीहू पीहू ’ नाद आणि पाऊसकिडय़ांचा अनवरतपणे कानावर येणारा ध्वनी, यांनी सगळ्या निसर्गाचेच संगीत बनवले आहे. लचकत, मुरडत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांचे गाणे ऐकलेय कधी?
त्या गायला लागल्या की तो किनाराही त्यांना आवेगाने साथ देतो . त्या प्रवाही लाटा व स्तब्ध किनारा यांच्या सोबतीने मग कविमनही मुक्त कंठाने गाऊ लागते. ती सरगम हळूहळू सगळ्या आसमंतात झिरपायला लागते.
आणि हे सगळे कमी असते की काय म्हणून रात्रीच्या नीरव शांततेच्या संगीतात कित्येक मानवनिर्मित गोष्टीदेखील भर घालत असतात बरं. रात्रीच्या नीरव शांततेत घड्याळाची अविरत टिकटिक, कुठेतरी दूर एखाद्या पुलावरुन जाणाऱ्या आगगाडीची धडधड. रातकिड्यांची किरकिर, कुठेतरी दूरवर निनादणारी एखाद्या मंदिराची घंटी.., या सगळ्यात एक प्रकारचे दैवी संगीत भरलेले आहे. हे मानवी मनाचे संगीत आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची, त्याचे गाणे करण्याची ही ओढ, ही हूरहूर मानवी मनात जागली की मग ते निव्वळ निसर्गाचे न राहता आयुष्याचे संगीत होवून जाते.
© विशाल कुलकर्णी