
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी , लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे कवि-लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न केले जाते ते उगाच नाही.
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाहीत. त्यांच्या मते ‘अहंकार, अनुभव आणि आविर्भाव’ ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
मी कुसुमाग्रजांच्या प्रेमात पडलो ते त्यांच्या साध्या, सहजसोप्या आणि गर्भरेशमी पोत लाभलेल्या रसाळ भाषाशैलीमुळे. त्या काळात मर्ढेकरप्रभुती दिग्गजांमुळे साहित्यात दुर्बोध आणि काहीश्या अश्लिलतेकड़े झुकणाऱ्या लेखनाची लाट होती.
मर्ढेकरप्रभुती आत्मनिष्ठेला महत्व देणाऱ्या लेखक-कविंच्या तुलनेत कुसुमाग्रजांनी कायम अनुभवाला, आविर्भावाला जास्त महत्व दिलेले आहे. दुर्बोधतेला, समाजापासून दूर जात पढ़त पांडित्याकड़े झुकणाऱ्या वृत्तीला कायम नकार देत समाजाभिमुख लेखन करण्याकड़े त्यांचा कल होता. ते म्हणतात…
“आपल्या अंगावरील लक्तरे स्वतःपासून लपवत धुळीने माखलेल्या स्वतःच्या पायांचा शरमिंद्या नजरेने धिक्क्कार करत ही उच्चभ्रू कलावंतांची सारी यात्रा असामान्यतेच्या शोधासाठी वाटचाल करीत आहे. साहित्य हे मुळातच असामान्य असते आणि साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असताना असामान्याच्या कक्षेबाहेर जात असतो. परंतु प्रतिभेची असामान्यता वेगळी आणि प्रवृत्तीची वेगळी.” (रूपरेषा, पृ.५०)
अश्या या सामान्यातल्या असामान्यत्वावर प्रेम करणाऱ्या महाकविचा आज जन्मदिवस. त्यांच्या प्रेमापोटी, आदरापोटीच आजचा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. आजच्या दिवशी किमान मराठी भाषिकांशी बोलताना तरी स्वच्छ मराठीतुन बोलण्याचा किमान प्रयत्न तरी करण्याचा निर्धार करुयात.
शुभेच्छा 💐