रिकामटेकड्याची डायरी – दिवस १ आणि २ (Corona Lockdown)

कोरोना लॉकड़ाऊन – दिवस पहिला

पहिला दिवस सगळा विचार करण्यातच गेला. क़ाय क़ाय करायचे? कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या अडगळीत टाकायच्या? काहीं नविन लेखन, काही जुन्या कथा… 😜

माझ्या लेकीचा हा दुसरा गुढीपाड़वा. खरेतर काही प्लान्स होते, काही कल्पना होत्या डोक्यात. अमुक करायचं, तमुक करायचं. माऊला हा ड्रेस घालायचा वगैरे अनेक कल्पना शिजत होत्या. पण मध्येच कोरोना काकुंनी घोळ घातला आणि सगळाच बट्टयाबोळ !

तश्यात काल शेजारच्या सोसायटीचा वॉचमन सांगतं आला की काल रात्री एकच्या दरम्यान कुणीतरी गेस्ट आलाय आणि त्याच्या हातावर स्टैम्प आहे. आणि मग तंतरली. कोण आहे माहीत नाही, कुठे आहे माहीत नाही. बरे असेही नाही की इन्फेक्टेडच असेल. एअरपोर्टवरुन बाहेर पड़णाऱ्या प्रत्येकाच्या हातावर स्टाम्प मारला जातोच. नॉट नेसेसरी की हातावर स्टाम्प असलेला प्रत्येक जण इन्फेक्टेड असेलच असे नाही. रादर त्या व्यक्तीला बाहेर सोडलेय त्या अर्थी लक्षणे नसणार. पण या आजाराची लक्षणे असेही पहिल्या सात-आठ दिवसानंतरच दिसायला लागतात. त्यांमुळे सगळेच अंधारात. मग उगाच भलते विचार मनात आणून दिवस कश्याला खराब करा?

शेवटी ठरवलं. सण नेहमीप्रमाणेच मनसोक्त साजरा करायचा. कोण जाणे ही सुद्धा एक परीक्षा असेल आमच्यासाठी आणि माऊसाठी सुद्धा. तेव्हा उगाच कोरोना कोरोना करत बसण्यापेक्षा या एकविस दिवसात कुछ तो करोना, असं स्वत:लाच समजावलं. अनेक प्लान्स आहेत. कदाचित वर्तुळही.. 😜

त्यात कौत्याचा फोन आला होता. त्याने दोन प्लॉट्स ओतलेत डोक्यात. त्यापैकी एक तर सॉलिड इंटरेस्टिंग वाटतोय. मर्डर मिस्टरी आहे. मजा येईल लिहायला. काही अपूर्ण राहिलेल्या कविता- गझलासुद्धा पूर्ण करायच्यात. स्केचेज़ पेंडिंग आहेत. काही नवीन घेतलेली पुस्तके अजुन उघडलेली नाहीयेत. काही लॉन्ग प्लान्ड वेब सीरीज बघायच्या बाकी आहेत. लॉट मोअर थिंग्स टू डू !

चलो, कामाला लागुयात ! आज क़ाय केलं ते उद्या सांगेन !

#रिकामटेकड्याची डायरी

© विशाल कुलकर्णी

****((((*******(((((**********((((

कोरोना लॉकड़ाऊन – दिवस दुसरा
रिकामटेकड्याची डायरी

आजचा दिवस फार संथ, कंटाळवाणा गेलाय राव. ज्या दिवसाची सुरूवातच सोसायटीच्या कचरा कॉन्ट्रेक्टरच्या चेकवर सही करून होते त्या दिवसात क़ाय घडणार अजुन?

८.३० ला बोका उठला. किमान तास-दोन तास तरी गुरगुरत, मस्ती करत होता. मग काहीतरी खावून लाडोबा झोपला पुन्हा. तेव्हाच वाचायला बसलो बहुदा.

एक -दिडच्या दरम्यान कधीतरी फ्री झालो आणि सेटी (settee) उघडली. असं विचित्र तोड़ नका करू. माझी पुस्तके सद्ध्या सेटीतच असतात.

तर धों. वि. देशपांडे यांचं जीएंच्या कथा – एक अन्वयार्थ वाचत होतो. जीए हे न सुटणारं व्यसन आहे राव. ऑस्कर वाईल्ड ‘तथाकथित विचारवंत लोकांच्या वैचारिक कल्हईगिरीबद्दल’ बोलताना म्हणतो, “They are not thoughts but mere opinions.” जीए या सर्वांपेक्षा वेगळे आहेत कारण ते मते सांगत नाहीत, तर ते एक विचार मांडतात. जीए आपल्या अनुभवातुन लाभलेली दृष्टी वापरून जीवनाची कोड़ी सोड़वण्याचा प्रयत्न करतात. जीवनाचे सगळे पैलू पाहण्याचा, डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातून मिळालेली उत्तरे आपल्या कथातुन मांडतात.

जीएंच्या प्रत्येक साहित्यिक कलाकृतीला स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते, एक तर्कशास्त्र असते. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही कथेच्या अंगभूत तर्कावर तीचे चांगले असणें किंवा नसणे ठरत असते. (अर्थात एखादे पुस्तक किंवा कथा लोकांना आवडणे- न आवड़णे हे त्याच्या तर्कशास्त्रावर किंवा चांगले-वाईट असण्यावर अवलंबुन नसतें.) पण जीएंच्या सर्व कथांना, सर्व पात्राना तर्कशास्राची एक ठाम बैठक आहे. त्यांची पात्रे मानसशास्त्राचे सर्व नियम पाळतात, त्यांमुळेच जीवंत वाटतात. गूढ़ भासली तरी आपली वाटतात. मग तो विदूषक असो नाहीतर प्रदक्षिणामधले शांतक्का असो किंवा कवठे मधला दामू असो. जीए या पात्राना अगदी जीवंत करून आपल्यासमोर ठेवतात. त्यांच्या वेदनेची धग आपल्याला जाणवते.

पण तरीही जीए दुर्बोध, अगम्य, गहन का वाटत असावेत? मुळात जीए वाचायची सुद्धा एक पद्धती आहे. त्यासाठी आधी जीएंच्या विचारसरणीचा अभ्यास करावा लागेल. पण मुळातच मानवाला गूढतेचं एवढं आकर्षण का असतं? साध्या-सरळ गोष्टी सोडून कायम क्लिष्टतेकडे ओढ़ा का असतो त्याचा? मला अजुनही आठवते, लहानपणी शाळेत परीक्षेत सुद्धा हुकमी, सोपे, उत्तरे येत असलेले प्रश्न समोर असताना आधी अवघड प्रश्न सोड़वण्याकडे माझा कल असायचा, ज्यात माझा बराच वेळ जायचा आणि शेवटी मग सोपे, उत्तर माहीत असलेले प्रश्न सुद्धा राहून जायचे खुपदा.

आता इथलंच बघा ना सद्ध्या. या कोरोनापासून संरक्षणाचा सगळ्यात सोपा उपाय आहे विलगीकरण,स्वयं-विलगीकरण ! पण बऱ्याच लोकांना अजुनही ते पटत नाहीये. कुठले कुठले अवघड उपाय केले जाताहेत. (काही जण तर चक्क संस्कृतमधले मंत्र, श्लोक पाठ करताहेत, जपासाठी.) पुन्हा भरकटलो बघा. जाऊ दे, उद्या बोलूच पुन्हा…

शुभरात्री 🙏

© विशाल विजय कुलकर्णी
#रिकामटेकड्याचीडायरी

One thought on “रिकामटेकड्याची डायरी – दिवस १ आणि २ (Corona Lockdown)”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s