गुड जॉब

“मी क़ाय म्हणते, यावेळी आपण नाशिकच्या ऐवजी प्रयागला जावूयात का? दरवेळी नाशिक, त्र्यंबक करून कंटाळा आलाय आता.” चेहऱ्यावर पफचा हलकासा हात फिरवत तिने लाडिक स्वरात विचारले, तसे त्याने तोंड वाकडे केले.
“अगं पण मी ऑलरेडी बुकींग केलेय. आणि आता अवघ्या काही रात्री शिल्लक आहेत. आता इतक्या कमी वेळात प्रयागला बुकींग तरी मिळायला पाहीजे ना?” त्रासिक स्वरात त्याने उत्तर दिले.
“मिळेल रे, मी बोलते मास्टरशी. तो करेल काहीतरी मॅनेज. चल मी निघते, मध्यरात्री संपर्क साधेन तुझ्याशी. मिळाले बुकींग तर कळवेन, नाहीतर त्र्यंबक आहेच.” पर्स खांद्यावर टाकून ती बाहेर पडली.
तो ही पटापट आवरु लागला. उशीर करून चालणार नव्हते. आजकाल कॉम्पिटिशन प्रचंड वाढली होती. रोज नवनवे, ताजे-तगड़े उमेदवार यायला लागल्यापासून स्पर्धा वाढलेली. मास्टर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असाइनमेंट्स द्यायचा. त्यात याचे वय होत आलेले. परत जायची वेळ होत आलेली. त्यांमुळे आजकाल त्याला असाइनमेंट्स सोपवताना मास्टर जरा कॉन्शसच असायचा. तिचे मास्टरशी चांगले जमत असल्याने मास्टर त्यालासुद्धा थोड़ीफार सुट देत असे.
तशी ती हुशार होती. प्रचंड कार्यक्षम होती. त्याच्यासारख्या परतीची वेळ जवळ आलेल्यावर तिचा क़ाय जीव होता हे त्यालासुद्धा कळत नसे. बरोबर रात्री अडीचच्या दरम्यान तिचा फोन आला. खुशीत होती.
“अरे आनंदाची बातमी. मास्टर प्रयागचे बुकींग मिळवून देतो म्हणालाय. या सर्वपित्रीला आपण प्रयागला.यस्स यस्स यस्स !”
पहाटेच्या वेळी ती अक्षरशः तरंगतच परत आली.
“अरे वा, स्वारी एकदम खुश. आजचा काउंट चांगला दिसतोय.”
“हो रे ,टोटल सात. चार बायका, तीन पुरुष, त्यापैकी एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा होता. तीन बायका आणि एक पुरुष ऑन द स्पॉटच. एक बाई धीट निघाली बऱ्यापैकी. पुरुषापैकी एक जण पळून गेला,  मुलगा हॉस्पिटलाइज आहे. उद्या येईल तो.” ती आपल्याच तन्द्रीत होती. त्याच्या चेहऱ्याकड़े लक्षच नव्हते तिचे. त्याचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. “तेरा चौदा वर्षाचा मुलगा?”
“तुझा क़ाय काउंट आजचा? मास्टर ओरडत होता हा तुझ्या नावाने. तू आजकाल फारच मानवी होत चाललायस म्हणत होता. “
कसल्याशा आठवणीने त्याचा चेहरा क्षणभर उजळला पण लगेच उतरलाही.
“फार नाही गं. तीन फ़क्त. एक म्हातारा, ज्याचे तिकीट ऑलरेडी कटले होते. एक तरुण मुलगी जी आयूष्याला कंटाळली होती. आणि एक छोटीशी परीसारखी गोडु. मला एकदम माझ्या सुमीचीच आठवण आली.”
“वॉव, आली ती इकडे? कधी भेटवतोयस?” ती एकदम चित्कारली. तसा त्याचा चेहरा परत उतरला.
“नाही आणलं मी तिला. बागेत हरवली होती. घाबरून गेलं होतं लेकरु. आईला हाका मारत होतं. माझी सुमीपण अशीच हाका मारत होती नेहाला शेवटी.”
“मग?” ती पुढे सरकली, तिच्या डोळ्यात कमालीची उत्सुकता होती.
“मग क़ाय? मी एक म्हातारा आजोबा झालो आणि सुमीला… आपलं .., त्या लेकराला तिच्या घरापर्यंत पोचवलं. आईला बघुन लेकरु प्रचंड खुश झालं होतं. माझ्या सुमीला नाहीच भेटली नेहा. कशी भेटेल? ती तर मास्टरकड़े रुजू झाली होती ना!” तो विषण्णपणे उद्गारला.
“असं कड़ू नकोस रे राजा. आधीच तर मास्टर वैतागलाय तुझ्यावर. इतका हळवेपणा बरा नव्हे. तु असेच वागत राहिलास तर प्रयाग तर दुरच आपल्याला हा पिंपळसुद्धा सोडून जावे लागेल. बी प्रैक्टिकल माय डियर, असे करून कसे चालेल?” आणि ती त्यांच्याकडे पाठ वळवून मागच्या दिशेने निघाली.
“पण एक सांगू, तू असा आहेस म्हणूनच आवडतोस मला. कुठल्यातरी कोपऱ्यात तुझ्यातला माणूस जागा आहे अजुन. पण म्हणूनच आपल्या विरहाच्या शक्यता अजुन वाढतात रे. मास्टरच्या लक्षात आले तर तो पुन्हा कुणाच्या तरी पोटी पाठवून द्यायचा तुला. पण तरीही सांगते, हेही आवड़लं मला. व्हेरी वेल डन. गुड़ जॉब माय डियर, गुड़ जॉब.
आणि पुढच्याच क्षणी ती सर्रकन पिंपळाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर जावुन लटकली. तो विषण्णपणे आपल्या फांदीकड़े वळला.
समाप्त.
विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s