ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…

 

रसिक चाहत्यांनी सभागृह गच्च भरलेलं आहे. त्यांच्या आवडत्या कविचं, शायर विजयच्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. जोपर्यंत विजय जीवंत होता तोवर त्याला दोन वेळच्या जेवणाची शाश्वती नव्हती. आता त्याच्या मृत्युनंतर (?) मात्र त्याच्या साहित्याच्या सरणावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी त्याच्या भावंडासहीत सगळे हपापले आहेत. अगदी प्रकाशक घोषबाबू सुद्धा त्यातलेच. त्यांना विजयबद्दल कधीच आपुलकी नव्हती. त्यात तो त्यांच्या पत्नीचा पूर्वाश्रमीचा प्रेमी. पण आता लोकांना त्यांची शायरी आवडतेय म्हणल्यावर घोषबाबू सुद्धा फायदा लाटायला आघाडीवर आहेत. स्टेजवर त्यांची पत्नी, विजयची पूर्वप्रेमिका मीना सुद्धा आहे, जिला मृत्युनंतर का होईना विजयच्या लेखणीला न्याय मिळतोय याचे समाधान आहे. प्रेक्षकांमध्ये ‘गुलाबो’ सुद्धा आहे जिने विजयवर मनापासून प्रेम केलय. तिच्या बदनाम पेशामुळे ती समाजात कायम तिरस्कृत राहिलेली आहे, पण तिच्याच प्रयत्नामुळे आज विजयच्या कविता प्रकाशित होताहेत. इकडे प्रकाशनाला सुरुवात होते आणि तिकडे सभागृहाच्या मागच्या भागातुन अतिशय आर्त परंतु ठाम आवाजात रफीसाहेबांचे सूर कानी येतात…

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इंसाँ के दुश्मन समाजों की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है ….?

सगळ्यांचे चेहरे सभागृहाच्या दाराकडे वळतात. तिथे दाराच्या चौकटीला धरून विजय उभा आहे. तोच विजय ज्याच्या तथाकथित मॄत्युचे निमित्त करून त्याच्या न पाहिलेल्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी चाखण्यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे. कृसावर टांगलेल्या विकल येशुसारखा थकलेला! समाजाला, त्याच्या स्वार्थीपणाला कंटाळलेला विजय दाराच्या चौकटीला दोन्ही हात टेकवून पराभूत अवस्थेत उभा आहे. घोषबाबुना आपला डाव फसल्याची जाणीव होते, त्यांचा आणि विजयच्या मतलबी भावंडांचा चेहरा बघण्यासारखा होतो. विजयला जिवीत बघून गुलाबो मात्र अतिशय प्रसन्न झालेली आहे. लोक अवाक झालेले आहेत. साहिरचे टोकदार शब्द रफीसाहेबांचा आर्त, विकल आणि तरीही टोचणारा, बोचरा स्वर लेवुन आपल्या मेंदुवर, मनावर अतिशय आक्रमकपणे चाल करून येतात…

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया..

71257249_2684129234953655_2864370305961295872_n

चित्रपटाच्या बाबतीत त्यांचा शेवट खुप महत्वाचा असतो. १९५७ साली आलेल्या प्यासामधुन गुरुदत्तने हे पुन्हा एकदा सिद्ध केले. तोवर हलक्याफुलक्या विनोदी, अपराधपट करणाऱ्या गुरुभाईने प्यासा केला आणि लोकांनी गुरुभाईला एकदम ध्रुवपदावरच नेवून बसवले. खरे सांगायचे तर या चित्रपटामुळे गुरुदत्तलाच स्वतःचा नव्याने शोध लागला म्हणायला हरकत नाही. याच बोलपटाने गुरुदत्तला एक विलक्षण संवेदनशील दिग्दर्शक म्हणून नाव मिळवून दिले. प्यासाचा क्लायमॅक्स या गाण्याने करून गुरुदत्तने प्यासाला जणु काही ध्रुवपदावरच नेवून बसवले.

“ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?”
साहिरमियांनी या ओळीतून अतिशय परखडपणे एक कटुसत्य सांगितलेले आहे.

मानवाच्या निर्मितीपासुन त्याच्यासमोर कायम असलेला मूलभूत प्रश्न कुठलाय माहीतीय? नाही, रोटी कपड़ा और मकान वगैरे नंतरच्या गोष्टी झाल्या. मानवाची मुळ समस्या ही आहे की क़ाय मिळाले म्हणजे मी संतुष्ट होईन? तृप्त होईन? तृप्ती ही फार दुर्लभ गोष्ट आहे. धन प्राप्त करता येते, आरोग्य कमावता येते, मित्र, नातेवाईक मिळवता येतात पण तृप्ती? तृप्ती कधी दृष्टीपथात येतच नाही. जेवढे मिळेल तेवढी अजुन, अजुन, अजुन …. अजुनची भूक अजुनही वाढतच जाते त्याला अंत नाहीये. “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है?”

आपला पूर्वाश्रमीचा प्रेमी जीवंत पाहुन घोषबाबुची पत्नी मीना मनोमन समाधानी आहे. पण विजयला या जगाची यथार्थता, या समाजाची वास्तविकता कळुन चुकलेली आहे.

हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी

इथे सगळेच अश्वत्थामा आहेत. प्रत्येकाच्या कपाळावर एक भळभळती जखम आहे. जो तो गोंधळलेला, हरवलेला. आयुष्याशी झुंजताना स्वत:लाच गमावून बसलेला. अतिशय विषण्ण मनाने विजय स्वत:लाच प्रश्न करतो.

ये दुनियाँ है या आलम ए बदहवासी?

त्याला जगण्यातली निरर्थकता कळुन चुकलेली आहे. आपल्या स्वानुभवातून समाजाची स्वार्थी, मतलबी मानसिकता त्याला उमजलेली आहे. इथे कोणी कुणाचा नाही, जो तो फक्त स्वतःचा हे त्याला नेमके उमजले आहे. तो या प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्या मुर्दाड, स्वार्थी लोकांना आपल्या काव्यातुन आरसा दाखवतो.

यहाँ इक खिलौना है इंसा की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों की बस्ती

साहिरच्या ओळी जरी त्या त्या चित्रपटातील परिस्थितीशी, घटनांशी सुसंगत असल्या तरी त्या ओळी, त्या त्या चित्रपटापुरत्या मर्यादित कधीच नसतात. साहिरमियाँ कायमच आपल्या शायरीतून तत्कालीन परिस्थितीवर, समाजव्यवस्थेवर नेमके आणि परखड़ भाष्य करत कोरडे ओढ़त असतात. दारिद्र्य, निरक्षरता, बेकारी, भ्रष्टाचार, वासना, क्रुरता आणि अनाचाराच्या अनागोंदीत अडकलेला आपला समाज साहिरसाठी नेहमीच एक माध्यम ठरत आलेला आहे व्यक्त होण्यासाठी. आपल्या काव्यातुन, शायरीतून साहिरमियाँ जणु काही सगळ्या मानवजातीचीच व्यथा-वेदना मांडत आलेले आहेत.

साहिरचे स्वतःचे आयुष्यसुदधा अतिशय वेदनामय आहे. साहिर लुधियानवी हे हिंदी साहित्यसृष्टीला पडलेलं एक अतिशय देखणं स्वप्न आहे. हिंदी चित्रसृष्टीच्या, उर्दू-हिंदी साहित्याच्या क्षेत्रातले एक अतिशय उज्वल आणि महत्वाचे पान आहे. मला साहिर आवडतो कारण साहिर विलक्षण छळतो. आणि तरीही साहिर जगण्याला एक विलक्षण सकारात्मक अशी दिशा दाखवत राहतो. त्याच्या लहानपणी जे त्याने भोगलय. विक्षिप्त वडील, कायम बापाच्या अत्याचाराला बळी पडलेली आई आणि अश्या परिस्थीतीत लहानाचा मोठा झालेला साहिर त्याच्या मनात एकुण आयुष्याबद्दलच कटुतेची भावना निर्माण झाली असती तरी काही वाटले नसते. पण आयुष्यभर अनेक वाईट अनुभव घेत मोठा झालेला साहिर सगळी कटुता बाजूला ठेवून जगंण्याच्या सकारात्मकतेवर भाष्य करतो. जगण्यातल्या आनंद, त्याची सार्थकता दाखवून देतो तेव्हा तो अधिकाधिक जवळचा वाटायला लागतो..

पण इथला साहिर कुणी औरच आहे. वेगळा आहे. आयुष्याला, समाजाच्या स्वार्थी दांभिकपणाला कंटाळलेला , थकलेला विजय इथे साहिरमियांचा चेहरा आहे. आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की आपला स्वभाव बाजूला ठेवून बंड पुकारावेसे वाटते. हातात मशाल घेवून सगळा अंधार लख्ख धुवून काढावासा वाटतो.

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
जला दो, जला दो, जला दो

इथे विजयच्या माध्यमातून साहिरामियाँ या भौतिकतावादी, स्वार्थी-मतलबी दुनियेला अखेरचा इशारा देतात. आपल्या शायरीतून इथल्या दांभिक समाजाला स्पष्ट आरसा दाखवतात.

यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है .

शेवटी विजय या स्वार्थी जगाचेच अस्तित्व नाकारतो. या दुनियेचा धिक्कार करत जगाला ठणकावून सांगतो की “बास झाले, आता यापुढे हे सहन केले जाणार नाही. जऱ हे विश्व, ही दुनिया अशीच राहणार असेल तर आम्हाला तीची गरज नाही. नष्ट करा हे मतलबी जग. तेव्हाच नव्या आशादायक, स्वच्छ, सुंदर जगाचा पुन्हा पाया घालता येईल.

‘जला दो इसे फूँक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा लो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया…।’

इथे पुन्हा गुरुदत्तच्या दिग्दर्शनाची कमाल अनुभवता येते. हे जग नाकारताना विजय आपणही याच जगाचा एक भाग आहोत हे विसरत नाही. जगाला नष्ट करायला निघालेला विजय स्वतःचे अस्तित्वही नाकारतो. तो हॉलमधेच जाहीर करतो की ‘मी विजय नाही” … ,’
साहिबान, मैं विजय नहीं हूँ…।’

प्रेक्षकात एक प्रचंड प्रक्षोभ माजतो. पड़द्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्याही. विजयच्या मनातली ती विद्ध आग घेवूनच आपण चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो.

प्यासा : १९५७
#साहिरमियाँ #गुरुदत्त #सचिनदेवबर्मन #रफीसाहेब

© विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s