समईच्या शुभ्र कळ्या….

लहानपणी गावी गेलो की मजा असायची. विशेषतः संध्याकाळचे वातावरण फार गोड असे. शांत, निवांत, किंचित कातर झालेली संध्याकाळ. सगळीकडे संध्याप्रकाशाच्या पिवळसर सोनेरी छटा पसरलेल्या. सूर्य मावळतीकड़े झुकलेला, कदाचित अस्त पावलेला. दिवेलागणीची वेळ झालेली. जित्राबं घराकडे परतलेली. हळूहळू अंधार आपले हातपाय पसरायला लागलेला. कुठे रात्रीच्या स्वयंपाकाची लगबग, तर कुठे दावणीला बांधल्या जाणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घुंगरांचे सुरेल नाद. एखाद्या घरातील कुणी काकू जात्यावर धान दळताना कुठल्यातरी अनवट ओव्या गुणगुणत असायची. अश्यात आजी उठून देवापुढची समई लावायची आणि इड़ा-पिडा जावो, बळीचे राज्य येवो म्हणून परमेश्वराची प्रार्थना करायची. मग नकळत..
“बाई गं, माझ्या माहेरी ना…… ” म्हणत आपल्या माहेराचं कौतुक सुरु व्हायचं. घरातली चिल्ली पिल्ली गोळा करून सामूहिक शुभंकरोति व्हायची….
आयुष्य किती सुरेख होतं ना तेव्हा. आता खेड्यातुनसुध्दा हे चित्र दिसत नाही म्हणा. पण ते एक असोच.

आज हे सगळं अचानक आठवायचं कारण म्हणजे परवा  एका मैत्रिणीने फरमाईश केली की ‘विशाल’ अरे  ‘समईच्या शुभ्र कळ्या’  वर लिही ना एकदा. जोशात तिला हो म्हणून बसलो खरे पण नंतर मात्र पोटात धडकी भरली. साक्षात आरतीप्रभु यांच्या कवितेवर लिहायचं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यापेक्षा अवघड. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ग्रेस, भा.रा.तांबे किंवा आरती प्रभू ई. आणि अशा इतरही महाकविंच्या कवितांचं रसग्रहण वगैरे करायचा विचारही मनात आणु नये. तेवढी आपली पात्रता नाही, निदान माझी तर नाहीच नाही आणि महत्वाचे म्हणजे ‘ग्रेस’ किंवा ‘आरतीप्रभु: समजावून सांगायचे तर आधी ते आपल्याला कळायला हवेत. गेली दहा-बारा वर्षे वाचतोय. पण मला ते एक सहस्त्रांशानेही कळले असतील याची मलाच ग्वाही देता येत नाही. कविने कविता उलगडुन सांगु नये असा एक संकेत आहे… पण मग ती काहीं वाचकांसाठी साठी दुर्बोध ठरते तर काहींसाठी अर्थपुर्ण. जर तिच्यात अनुभुती नसेल तर ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. त्यासाठी म्हणून माझ्यासारखे काही वासरात लंगड़ी गाय असणारे हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात. आता ते मला पेलवलय की मी तोंडावर पडलोय हे तुमच्यासारख्या सुज्ञ, रसिक वाचकांनी सांगायचे.

APAB

तर समईच्या शुभ्र कळ्या….

गाण्याची सुरूवातच होते ती बासरीच्या अतिशय करुण, कातर  सुरानी. जणुकाही आसमंतात एकप्रकारची उदासीनता दाटून राहिलेली आहे. आपणही नकळत त्या सुरात गुंगत जातो, शांत होत जातो आणि अचानक कानावर येतात ते जणुकाही आपल्याच अंतर्मनातून आल्यासारखे भासावेत असे आशाबाईंचे कमालीचे आर्त, काळजाला हात घालणारे सुर.

समईच्या शुभ्र कळ्या , उमलवून लवते

आशाबाईंचा आवाज हे माझे पहिलं प्रेम आहे. विशेषतः पंचमदा आणि बाळासाहेब यांच्यासाठी गाताना आशाबाई आशाबाई राहातच नाहीत. त्या स्वतःच सुर होवून जातात, संगीत बनून जातात. या ओळी ऐकल्या की माझ्या डोळ्यासमोर ती तुळशीपुढे दिवा किंवा देवापुढे समई लावणारी आज्जी उभी राहते. पण पुढची ओळ ऐकली की लक्षात येते की, “नाही, ही कुणी आज्जी असूच शकत नाही. हि नक्की कुणीतरी नव्यानेच लग्न झालेली सासुरवाशीण असावी.

केसांतच फुललेली , जाई पायांशी पडते.

कदाचित गर्भातल्या नव्या जिवाची चाहूल लागताना नकळत माहेरच्या आठवणींनी मन कातर झालेली कुणी पहिलटकरीण सासुरवाशीण असावी. ती पहिलटकरीण वाटण्यामागे एक कारण आहे, पहिल्या दोन ओळींनीच मला विलक्षण अस्वस्थ केले, गाणे कैक वेळा ऐकले असेल, पण जेव्हा त्यावर लिहायला बसलो तेव्हा सर्व अंगाने विचार करायला लागलो. आणि कुठेतरी, काहीतरी राहून जात असल्याचे वाटायला लागले आणि मग न राहवून मी आंतरजालावरचे संदर्भ शोधायला, चाळायला सुरूवात केली. त्या उठाठेवीत मुळ कवितेची, गाण्यात नसलेली अजुन दोन-तीन कडवी मला सापडली. आणि झटक्यात ट्युब पेटली. की येस्स, आपली ही नायिका कदाचित गर्भातल्या नव्या जिवाची चाहूल लागताना नकळत माहेरच्या आठवणींनी मन कातर झालेली कुणी पहिलटकरीण सासुरवाशीण.असावी. त्यावर पुढे बोलूच.

मी वर म्हटल्याप्रमाणे कविला काय सांगायचे आहे ते त्यालाच ठावे. आपल्यापुरता आपण काढू तो अर्थ, प्रत्येकाची अनुभूती निराळी, अर्थ निराळा. संध्याकाळच्या शांतवेळी समईच्या वाती प्रज्वलीत करताना काही वेळापूर्वीच केसात माळलेल्या  आता किंचित सुकलेल्या जाईची फुले ओघळून तिच्याच पायाशी पडतात. नकळत तिला आपल्या प्रवासाची आठवण करून देतात. आयुष्य कसं भराभर पळत असतं नाही? काल माहेरच्या अंगणात वारा प्यालेल्या हरणीसारखी उधळत होते. जाईसारखी बहरून जात होते. आज बाळाच्या पहिल्या चाहूलीबरोबर ती उच्छ्रुंखलता , ते वेडं वय जाईच्या गजर्‍यातल्या चुकार, नकळत निसटून गेलेल्या फुलांसारखं गळून आपल्याच पायाशी पडतं. आणि काहीतरी अनमोल असे गमावून बसल्याची भावना अजून तीव्र होवून जाते. कसलीशी अनामिक हुरहुर दाटते…

भिवयांच्या फडफडी , दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.

हि भावना प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात कायमचे घर करून राहिलेली असते. माहेरची आठवण हा प्रत्येकीच्या मनातला एक हळवा, नाजूक कोपरा असतो. त्या सार्‍या सयी, सार्‍या आठवणी कायम जागृत असतात तिच्या मनात. मग साधी पापणी जरी फडफडली तरी मनात शंका येते की तिकडे काही झालं तर नसेल? हा कसला संकेत आहे. पापण्यांची हि फडफड नक्की कशाकडे इशारा करतेय? आई-बाबा बरे असतील ना? दारातली कपिला माझी आठवण तर काढत नसेल? परसातल्या जाई-जुई कोमेजल्या तर नसतील? देहाने काय ती फक्त सासरी, चित्त सगळे माहेरी एकवटलेले. ती माहेर मागे सोडून आली खरी, पण येताना स्वतःलाही तिथेच, माहेरीच सोडून आलेली असते. देह इथे असला तरी मनाचे पक्षी तिथेच माहेरच्या अंगणात कुठेतरी भरार्‍या मारत असतात. जुन्या सार्‍या सख्या, भावंडं, तिथल्या तरुवेली सगळ्यांवर तिची जडलेली माया तिला पुन्हा-पुन्हा तिकडे खेचत राहते. मन घट्ट करून , भरल्या डोळ्यांनी तिचे लग्न करून पाठवणी करणारे बापुडवाणे आई-बाबा डोळ्यासमोर येतात आणि डोळे भरून यायला लागतात.

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची…

पण डोळ्यात दाटलेलं ते पाणी पापणीची मर्यादा ओलांडत नाहीये. ते मुळी वाहतं व्हायला तयारच नाहीये. निरोप देताना आईने सांगितलं होतं. रडू आलं तरी गुपचूप रड. डोळ्यातले अश्रु कुणाला दाखवू नकोस. तुला कुणी कमजोर समजता कामा नये. मग ते पाणी तिच्या डोळ्यातच पेंग आल्यासारखं, सुस्तावल्यासारखं साचून राहतं. आणि मग त्या समईच्या शुभ्र कळ्यांच्या प्रकाशात शुक्राच्या चांदणीसारखं चमकत राहतं. तिच्या मनातल्या वादळांची अबोल साक्ष बनून….
इथे पुन्हा आई-वडिलांचे संस्कार, त्यांची शिकवण तिला तिच्या सासुरवाशीण असण्याची आठवण करून देतात आणि ती लगबगीने डोळ्यात दाटलेले वादळ थांबवण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच समजावत उठते की, उठ, बरीच कामे बाकी आहेत. असा विसराळूपणा बरा नव्हे. सोबतच्या कुणा पोक्त, अनुभवी सखीला मग उगाचच स्पष्टीकरण देते.

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची…..

गाण्यात नसलेल्या कडव्यांपैकी पहिले कडवे इथे येते.

गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्‍याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते

हे वाचताना जाणवते की कदाचित, कदाचित हि बयो कुणी पहिलटकरीण असावी. म्हणूनच ती माहेराबद्दलची प्रिती, बाळाच्या चाहुलीची ती आतुरता, ती वेडी हुरहुर जागी झालेली आहे. पण तिची ती पोक्त, अनुभवी सखी शहाणी आहे, समंजस आहे. ती आपल्या नायिकेची समजूत काढते. की बयो गं, अजून वेळ आहे. इतकी अधीर होवू नकोस. वेडेपणा करू नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. केतकीचे पाते उघडून आतला गाभा ठिक आहे की नाही हे बघायची घाई करत नसतात, त्यामुळे गाभा करपण्याची भीती जास्त.आपली नायिका कायम हे सासुरवाशीण- माहेरवाशीणीचे मुखवटे लिलया बदलत समतोल सांभाळत असते. मग नकळत ती सासुरवाशीणीच्या रोलमध्ये शिरते आणि जणुकाही एखाद्या पोक्त , समंजस सखीप्रमाणे स्वतःमधल्याच उदास सखीला समजावते. की,”बयो, उठ आता, अशी उदास का बसून राहिली आहेस तिन्हीसांजेला ? मग तिची सखी सुद्धा तिला समजावते…

थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

उठ बयो, डोळ्यातले पाणी पुस. अशी सुटी फुलं माळू नयेत केसात. ती त्या चुकार आठवणीसारखी असतात. जरा संधी मिळाली की सुटून मोकळी होतात, मग त्रास देतात. आवर स्वतःला आणि ते बघ संध्याकाळ होवू घातलीय. घरातलं उन्ह त्या छोट्या-छोट्या आठवणीतल्या निसटून गेलेल्या सुखासारखं हातातून निसटून चाललय. त्यांना धरून ठेव. पदराच्या शेवाला त्या उन्ह रुपी सुखाचे थोडे थोडे, छोटे-छोटे तुकडे शिवून ठेव. म्हणजे ते उन्ह हातातून निसटणार नाही. अंधार टळणार नाहीच, पण त्या अंधारात त्या उन्हाचे छोटे छोटे तुकडे काजव्यासारखे चकाकत राहतील. सगळ्या घराला लुकलुकता प्रकाश देत सुर्योदयाची, सुखाची आशा जिवंत ठेवतील.

मुळ कवितेतील ज्यादाची उर्वरीत दोन कडवी इथे येतात.

उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर !!
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?!!

इथे आरतीप्रभू या महाकविच्या हळव्या मनाची साक्ष पटते. त्यांची नायिका हळवेपणाने आपल्या सखीसमोर मन मोकळे करून जाते. की बाई गं, आता नाही राहावत. संध्याकाळचा केशरी रंग आसमंतात पसरायला लागला की मन भरून येतं. असं वाटतं तो रंगाळलेला, गंधाळलेला आसमंत श्रावणसरीसारखा अंगभर पांघरून घ्यावा, सुखाने मिरवावा. आता नाही वाट पाहवत. कुंकू लावताना आरश्यात पाहिले की डोळ्यातल्या बाहुल्या दिसतात आणि कढ अनावर होतो की कधी एकदा या बाहुल्या सजीव रूप घेवून बाहेर येतील. मजसंगे आनंदाने फेर धरून नाचायला लागतील. असलं काहीतरी वाटतं आणि मन अजुनच हळवं होवून जातं. हे नाही सोसत आता. हे सोसायचं असेल तर त्यासाठी त्या डोळ्यात साचून राहिलेल्या , दाबून ठेवलेल्या आसवांचेच बळ हवे.

हांसशील हांस मला, मला हांसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ?

तिच्या मनातील हा संघर्ष टिपेला पोहोचलाय. उगाचच आपलं एक मन दुसर्‍यावर हासतय असं तिला वाटत राहतं. क्वचित आपली सखीसुद्धा आपल्यावर हासत असल्याचा भास तिला होता आणि आपल्यातल्या सासुरवाशीणीला ती निक्षून सांगते की हसणार असशील तर हास बाई मला . पण आत्ताच्या अवस्थेत हसणं मला काही जमणार नाही. माझ्यातल्या हळव्या कोपर्‍याला ते हासणं  मुळी सोसणारच नाही. डोळ्यात दाटलेले ते अश्रु  डोळ्याच्या, मनाच्या डोहात घट्ट रुतून बसले आहेत. आता त्यांना काढून टाकणे मला शक्य नाही बयो. मला त्या सोबतच जगावे लागणार आहे. आणि माझ्या हसण्याने काय होणार आहे? तो आकाशातला चंद्र थोडाच दुप्पट तेजाने चांदणे सांडत तळपणार आहे? माझं माहेर, त्या कडू-गोड आठवणी हे माझं पुर्वसुकृत आहे म्हण किंवा संचित आहे म्हण हवं तर. ते माझ्याबरोबरच जाणार. ते त्यागणं मला तरी या जन्मी शक्य होणार नाही.. या जगातील यच्चयावत माहेरवाशिणींची हिच व्यथा आहे…..

संपुर्ण गाण्यात पार्श्वभुमीवर मंद स्वरात कुठलेसे करुण सुर आळवत ती बासरी आपले अस्तित्व सांडत असते आणि आपण कधी त्या बासरीच्या सुरात तर कधी आशाबाईंच्या आर्त स्वरांत विरघळत राहतो. रागेश्री रागातील हे आशाबाईंनी गायलेलं गाणं पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आहे. हि मंगेशकर भावंडं असोत किंवा आरतीप्रभूंसारखे वेड लावणारे कवि असोत, हि माणसं नक्कीच कुठल्याश्या क्षुल्लक चुकीची शिक्षा भोगण्यासाठी या पृथ्वीतलावर आलेली शापित यक्ष-गंधर्व मंडळी असावीत. आपल्या इथल्या वास्तव्याने स्वतःबरोबर आपलीही आयुष्ये उजळून टाकली आहेत त्यांनी. जगणं सोपं नसतंच आणि नसावंही. पण ही दैवी माणसं ते सोपं व्हायला, गंधाळून टाकायला सहाय्यभूत ठरतात हे मात्र नक्की.

धन्यवाद.
विशाल विजय कुलकर्णी
भ्रमणध्वनि : ०९९६७६६४९१९,
पनवेल – ४१०२०६

4 thoughts on “समईच्या शुभ्र कळ्या….”

  1. आज आपण लिहिलेला शब्दन् शब्द मनाला भिडला आणि ही गीत पुन्हा ऐकावंसं वाटलं. याचं सर्व श्रेय तुमच्या या लेखाला द्यायलाच हवं. कारण अन्यथा चिं. त्र्यं. यांचं काव्य कळणं कठीण असतं.
    मंगेश नाबर

    Liked by 1 person

  2. समईच्या शुभ्र कळ्या गाण्याचे रसग्रहण परिपूर्ण झाले आहे. मी शोधतच होते. वाचून पूर्ण समाधान झाले🙏

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s