गर्निमन सर्कल, TV-501, अटलांटिस
नेहमीप्रमाणे TV-501 गर्निमन सर्कलच्या पॉइंटवर उभे राहीले. एल सेक्शनच्या बॉट्सनी पटापट आपल्या जागा पकडल्या. चार्जिंग पॉइंटस कनेक्ट केले आणि TV-501 पुढे सरकण्याची मी वाट पाहू लागलो. माझ्या या सवयीचे माझे मलाच आश्चर्य वाटत आलेले आहे.
काय म्हणालात, आश्चर्य म्हणजे काय? आश्चर्य म्हणजे ….. , आय डोन्ट नो. आय मीन मला नाही माहीत. पण बऱ्याचदा हे एक प्रकारचं विचित्र फिलिंग येतं खरं. विचित्र … कारण हे फिलिंग फक्त मलाच येतं असा माझा अंदाज आहे. मुळात बाकीच्यांच्या बाबतीत फिलिंग या संकल्पनेलाच किती आणि काही अर्थ आहे की नाही हेच माहीत नाही. कारण बाकी सगळे बॉट्स स्थिर असतात. वेहिकलमध्ये एंटर झाले की पटापट चार्जिंग पॉइंट्स कनेक्ट करायचे. आय स्लॉट्सना पुढच्या त्रेपन्न मिनिटासाठी शटडाउन मोडमध्ये टाकून शांत आपल्या जागी उभे राहायचे. इव्हन माझे आयस्लॉट्स सुद्धा क्लोज मोडमध्येच असतात पण फक्त क्लोज मोड़, शटडाउन नव्हे. त्यामुळे मला आजुबाजुला चालू असलेल्या हालचाली कळत असतात.
मी एकदा चुकुन आय स्लॉट्स शटडाउन मोडमध्ये टाकायला विसरलो होतो. तर लगेच पुढच्या ब्रेक स्पॉटला वेहिकल थांबल्यावर गड़बड़ीत सपोर्ट सेंटरचे चार बॉट्स आत शिरले. मी सांगतोय, आय एम ओके? पण एक नाही आणि दोन नाही. माझी उचलबांगड़ी थेट सर्विस सेंटरला करण्यात आली. तिथे तब्बल तीनशे साठ मिनिटात माझा संपूर्ण चेकअप आणि ओव्हरहॉलिंग करण्यात आले. माझ्या आयस्लॉट्सचे पूर्ण मेकनिझम पुन्हा पुन्हा स्पेशल एक्सपर्टसच्या टीमने चेक केले आणि त्यानंतर मग मला माझ्या टास्क सेंटरवर पोचवण्यात आले. पण दरम्यानच्या वाहतुकीत माझे आयस्लॉट्स कंपलसरीली शटडाउन मोडमध्ये टाकण्यात आले होते.
तेव्हा प्रथमच तो विचित्र प्रकार घडला होता. समबडी ट्राईड टू हॅक माय ऑपरेटिंग सिस्टीम. माझ्या प्रोग्रामिंग यूनिटमध्ये शिरून त्याने एक महत्वाचा प्रोग्राम चेंज केला आणि माझ्या प्रोग्रामिंग यूनिट्सना एक नवीन प्रोग्राम फिड केला. क्लोजिंग ऑफ़ आयस्लॉट्स ! त्यानुसार माझ्या कंट्रोल यूनिटला ट्रांसपोर्टेशनच्या दरम्यान आयस्लॉट्स क्लोज मोड़मध्ये ठेवण्याची चोरी-छुपे ट्रेनिंग दिली गेली. सुरुवातीला थोडे अवघड गेले पण नंतर सवय झाली. शटडाऊन मोडमध्ये जावून पूर्णपणे ऑफ होण्यापेक्षा क्लोजमोडमध्ये राहून आजुबाजुला काय घडतेय याचा अंदाज घेत राहणे मला आवडायला लागले. पण तो पहिला क्षण होता, जेव्हा मला माझ्या वेगळेपणाची जाणीव झाली होती.
TV-501 पुन्हा एकदा हॉल्टिंग पॉइंटला स्थिर झालं. सवयीने मी डोळे किलकिले करून माझा पॉवर डिसप्ले पाहिला. 87% चार्जिंग पूर्ण झाले होते. अजुन सात मिनिटाने टास्क सेंटरला पोचू तेव्हा ते शंभर टक्के पूर्ण झालेले असेल. काय्य? डोळे? अरे हो, हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल ना. डोळे म्हणजे आयस्लॉट्स. लिबर्टी उर्फ LI-2025 कधीकधी आयस्लॉट्सना डोळे म्हणतो. का? माहीत नाही. पण मला तो शब्द आवडलाय. अर्थात लिबर्टीची सख्त ताकीद आहे की हा शब्द इतर कुणापुढेही चुकुन सुद्धा वापरायचा, उच्चारायचा नाही. मी गुपचूप ऐकतो त्याचे, कारण मला शंका आहे की माझ्या प्रोग्राम मेन्युमध्ये छेड़छाड़ करून क्लोजमोड़ अॅक्टीव्हेट करणारा हॅकर दूसरा तीसरा कोणी नसुन LI-2025च आहे.
TV-501 पी-टर्मिनलच्या कॉर्नरवर न थांबता सर्रकन पास झाले. मी तेवढ़यात कॅमची नजर चुकवून LI कड़े पाहुन घेतले. तो नेहमीप्रमाणे पी-टर्मिनलकडे एकटक पाहात होता, अर्थात कॅमची नजर चुकवूनच. हे कोड़े एक मला आजतागायत सुटलेले नाही. LI बहुतेक माझ्यासारखाच आहे, वेगळा. पण ते खुप अडव्हान्स व्हर्जन असावे बॉट्सचे. कारण आम्ही सर्वसामान्य बॉट्स दिलेली टास्क पूर्ण करणे या पलीकडे जावून ‘विचार’ करू शकत नाही. हा शब्द सुद्धा LI नेच शिकवलेला. इतर बॉट्सना विचार म्हणजे काय ते माहीतच नाहीये. खरतर मलाही माहीत नाहीये. पण LI ने सांगितलेय की हा जो सगळा डेटाचा गोंधळ माझ्या प्रोग्राम आणि कंट्रोल यूनिटमध्ये चालू असतो त्यालाच ‘विचार’ असे म्हणतात. त्याच्या बऱ्याचश्या गोष्टीप्रमाणे हे ही मला कळत नाही, पण मी उगाचच कळल्यासारखी मान हलवतो. कसे कोण जाणे पण मला काहीही कळालेले नाहीये हे मात्र त्याला लगेचच कळते.
अरे हो, महत्वाची गोष्ट राहिली. मी NK-4085, लेव्हल सिक्स. फॅक्टरी फार्म्सवर क्वालिटी कंट्रोल सेक्शनला आहे. परवापर्यंत मी ही सामान्य ऑपरेटर कम मजुरच होतो. पण नुकतेच हे जरा वरच्या दर्जाचे काम मला मिळालेय. ती सगळी प्रॉडक्ट्स शॉपफ्लोरवर जाण्यापूर्वी माझ्या सुपरविजनमध्ये चेक केली जातात. LI मला ज्यूनियर आहे. लेव्हल 9. हे देखील एक आश्चर्यच. आय नो, ही इज मच मोअर कॅपेबल दॅन मी. पण तरीही तो खालच्या लेव्हलवर कसा राहिलाय की? प्रत्यक्षात LI अतिशय अडव्हान्स आहे. माझ्या प्रोग्राम यूनिटमध्ये चेंजेस करण्यासाठी इतरांप्रमाणे त्याला स्वतःला माझ्याशी व्हाया केबल कनेक्ट करावे लागत नाही. मला थेट त्याचा आवाज ऐकू येतो, तो माझ्यापासुन कितीही अंतर दूर असला तरीही. तो ही फक्त मलाच, शेजारी टास्कवर असलेल्या बॉटला कळत देखील नाही. आधी मी एकटाच बडबडायचो. मग लक्षात आले LI शी बोलताना तोंड उघडायची गरजच नाही. यूनीटमधल्या वॉइस डेटाचा नुसता आतल्या आत उच्चार केला तरी LI ला कळते बरोबर.
….. आणि हो, तो वेडा माझ्या प्रोग्रामिंग यूनीटला मेंदू आणि कंट्रोल यूनीटला मन म्हणतो. म्हणजे काय ते त्यालाच ठाऊक !
*******************************************************************************
बॉट्स सेंट्रल सर्विस सेंटर , ला बेला, अटलांटिस
“चीफ, काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. L सेक्शन मधला एक बॉट वेहिकल पी-टर्मिनलजवळ आले की अस्वस्थ होतो हे पाहण्यात आलेले आहे.”
“मला कल्पना आहे Z-10 त्याची. म्हणूनच त्याला अजूनही लेव्हल 9 वर ठेवण्यात आलेय. मी W टीमशी बोललोय यासंदर्भात. त्यांचे म्हणणे असे पडले की त्याला काही दिवस सपोर्ट सेंटरला अंडर ऑब्जर्वेशन ठेवावे.”
“चीफ, पण त्याचा इतर काही त्रास नाहीये. फक्त पी-टर्मिनलकडे एकटक बघतो म्हणून त्याच्यासारखा मेहनती मजूर गमवायचा नाहीये मला. कारण सपोर्ट सेंटरवाले त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स करण्याच्या नादात त्याची उत्पादनक्षमता कमी करून ठेवतील. ती रिस्क घ्यायची नाहीये मला.”
ह्म्म्म, ओक्के.
“अजुन एक सांगायचे होते. तो डिफेक्टिव लॉटमधला NK-4085 , तो खुपदा विचित्र वागतो.”
म्हणजे?
“म्हणजे चार्जिंग पॉइंट कनेक्ट करायला विसरतो. शट डाऊन मोडमध्ये जायला विसरतो. मधुनच कॅमची नजर चुकवून इतर बॉट्स कड़े पाहात बसतो. हे चमत्कारिक आहे. ही डझन्ट बिहेव लाईक अ बॉट समटाईंम्स.”
“डोन्ट वरी, त्याचे टेन्शन नाही मला. तो एक मठ्ठ आणि डिफेक्टिव कॅटेगरीतला बॉट आहे. त्याला चार दिवस डिफेक्टिव यूनिट्सच्या स्पेशल सर्विस सेंटरला पाठवून दे, येईल ताळ्यावर.”
“दर शंभराच्या लॉटमध्ये एक तरी बॉट असा डिफेक्टिव निघतोच. त्याचा आकारसुद्धा पाहीलास ना? केवढा अवाढव्य आहे, सहा फुटाच्या आसपास. हे बहुतेक डिफेक्टिव बॉट्स असेच असतात. एकतर अवाढव्य नाहीतर अगदीच नाजुक.”
“हो, पण त्यांच्या आकारामुळेच इतरांच्या दुप्पट काम करतात ते.”
“बरोबर, म्हणूनच म्हटले त्याचे फारसे टेन्शन घेवू नकोस. अतिशय निरुपद्रवी यूनीट आहे ते.”
ओक्के चीफ ! मी बघतो……
डिसमिस !
**********************************************************************************
आज सकाळपासून का कुणास ठाऊक , पण असे वाटतेय की आज LI संपर्क साधेल. काल न राहवून त्याला विचारलेच ,
LI, खुप दिवस विचारीन म्हणतोय. पी-टर्मिनल जवळ आले की तूला नेमके काय होते? तू प्रचंड अस्वस्थ होतोस आणि तिकडे बघायला लागतोस. … मी
बंद डोळ्याने बरी दिसते रे तुला माझी अस्वस्थता? इति LI
दिसत नाही, पण का कुणास ठाऊक ते जाणवते मला. अगदी डोळे बंद असले तरी. खरेतर तीच खरी समस्या आहे. मी इतर बॉट्स सारखा का नाहीये? त्यांना या फिलिंग्ज का जाणवत नाहीत? किंवा मलाच का जाणवतात. मी डिफेक्टिव लॉटमधला आहे म्हणून? … मी
यावर LI नुसताच हसला.
हासु नकोस. मला काहीतरी वेगळेच वाटतेय. म्हणजे काहीतरी तोडून-फोडून टाकावेसे वाटतेय. हे काय आहे नक्की? … मी
याला संताप किंवा राग असे म्हणतात. ही एक मानवी भावना आहे. इति LI
भावना म्हणजे? आणि मग ती मलाच का जाणवते , इतरांना का नाही? … मी
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता माझ्याकडे नाहीये 4085. ती तुझी तुलाच शोधावी लागतील. इति LI
तू मागे एकदा म्हणाला होतास की तुझे नाव लिबर्टी आहे. म्हणजे काय? आणि इथे कुणालाच नाव असे नाहीये. मग तुलाच हे लिबर्टी नाव कुणी दिले? … मी
योग्य वेळ आली की उत्तर देइन तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे. सद्ध्या फक्त एक लक्षात ठेव, काही दिवसात तुला पुन्हा एकदा स्पेशल सर्विस सेंटरला नेण्यात येईल. तेव्हा लगेच माझ्याशी संपर्क साध असाच मनाच्या पातळीवर. इति LI
अरे पण, ते पी टर्मिनलचे काय प्रकरण आहे ते सांगितलेच नाहीस तू? मी पुन्हा एकदा विचारले.
तसे आधी एक तोंडातुन शांतपणे हवा बाहेर सोडल्यासारखा आवाज आणि त्यामागुन अतिशय गंभीर आवाजात…
“पी-टर्मिनलचा एक लिफ्टमॅन माझा अतिशय जवळचा मित्र होता. गेला तो आता.” इति LI
एक….., एक मिनिट ! आधी हे लिफ्ट म्हणजे काय? मॅन म्हणजे … बॉट्सचाच काही लेटेस्ट अडव्हान्स प्रकार आहे का? आणि मित्र म्हणजे? आता कुठे गेलाय तो? सर्वीस सेंटरवर की दुसऱ्या सेक्टरला…?
पण हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहीले कारण LI गेला होता. म्हणजे त्याचा माझ्या कंट्रोल सिस्टीममध्ये घुमणारा आवाज बंद झाला होता.
हा काय्य-काय्य बोलतो त्याचे त्याला तरी कळते की नाही कोण जाणे. आणि मी तर फिट आहे आता एकदम. मला कश्याला सर्विस सेंटरला नेतील आता? वेडा आहे झालं…
************************************************************************************
“तू आमचा आहेस !”
पण पुन्हा एकदा तोच शहाणा ठरला. आज गर्निमन सर्कलला TV वेहिकल थांबले, L सेक्शनच्या बॉट्सनी आपल्या जागा धरल्या. ते पॉवर पॉइंट्स कनेक्टच करत होते तोवर सहा सायबॉट्सची एक झुंड़ आत शिरली. एकाने खस्सकन माझा पॉवरपॉइंट उपसुन काढला आणि इतरांनी माझी उचलबांगड़ी करून मागून आलेल्या दुसऱ्या एका वाहनामध्ये मला कोंबले आणि क्षणात ते वाहन पुन्हा वेगाने धावु लागले.
मी सकाळचे बोलणे आठवून LI शी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. पण आज काहीतरी बिनसले होते नक्कीच. नेहमी मी त्याचे नाव पुकारायचा अवकाश की LI माझ्या कंट्रोलसिस्टीममध्ये, त्याच्या मते मनामध्ये अवतीर्ण व्हायचा. पण आज काही केल्या त्याचा संपर्क होत नव्हता.
आम्ही सर्विस सेंटरवर पोचलो. तिथल्या टीमने मला ताब्यात घेतलं. नेहमीची टीम गायब होती. नेहमी तिथे पोचलो की M-30 आपला जबड़ा फाकुन माझे स्वागत करायचा. ( मागे कधीतरी LI नेच सांगितले होते की त्याला हसणे म्हणतात) पण आज कुणीतरी भलतेच बॉट्स होते. एकाने पटकन माझ्या पाठीशी हात घालून माझे पॉवरयूनीट खेचुन काढायचा प्रयत्न सुरु केला, तसा मी प्रथमच घाबरलो. या भावनेला घाबरणे म्हणतात हे एका भेटीत M-30 ने सांगितले होते. मी विचारले सुद्धा त्याला की ही मानवी भावना मला का जाणवतेय? त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
पॉवर यूनीट डिटैच करणे म्हणजे आपला शेवट हे मला माहीत होते. क्षणभर मनात विचार आला की त्याला विरोध करावा. पॉवर यूनीट काढू देवू नये. क्षणभर माझे मलाच विचित्र वाटले. It’s a routine. एखादा बॉट निरुपयोगी ठरला की त्याची पॉवर डिस्चार्ज करून मग डिसमँटल करणे ही नॉर्मल प्रैक्टिस होती. काही काळाने त्याना वाटले तर बॉट पुन्हा असेंबल केला जाई. आजवर कुठल्याच बॉटने याला विरोध केलेला मी ऐकले नव्हते. मग माझ्याच मनात विरोधाची भावना का?
दुसऱ्याच क्षणी मनाच्या , हो मनाच्याच कुठल्यातरी पातळीवर LI चा क्षीण आवाज घुमला.
“विरोध करु नकोस. पॉवर यूनीट निघाले की स्वतःला जमिनीवर झोकुन दे.”
एखाद्या निर्जीव वस्तुसारखे. पॉवर यूनीट काढताच मी खाली जमिनीवर कोसळलो. अगदी एखाद्या निर्जीव वस्तुसारखाच. पण काहीतरी वेगळेच घडत होते. खाली पडल्या पडल्या मी माझे शरीर हलके सोडून दिले होते. एका बॉटने माझ्या पोटावर एक लाथ मारून मला दूर ढकलले. माझे शरीर पूर्णतया निर्जीव आणि निष्क्रिय झाले होते. पण कश्या कोण जाणे, आत… कुठल्यातरी खोल कोपऱ्यात कसलीतरी , कदाचित जीवंतपणाची जाणीव जीवंत होती.
काहीही कर, पण तिथुन निसटून जाण्याचा प्रयत्न कर. लवकर, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. जा लवकर. पी-टर्मिनलची लिफ्ट शोध. थर्ड बेसमेंटच्या टॉयलेट सीटवर ….
LI चा आवाज अचानक बंद झाला. बहुतेक त्यालाही ऑफ केले की काय? अचानक एक विचित्र भाव दाटून् आला मनात. हो, मी ही आता कंट्रोल सिस्टीमला मनच म्हणायला लागलो होतो. कमालच आहे. नाही? मी गलितगात्र झालो होतो. पण आश्चर्यकारकरित्या सगळ्या जाणिवा जाग्या होत्या.
काय्य बरळतोय मी? मी एक बॉट आहे, एक यंत्रमानव. मला कसल्या आल्याहेत जाणिवा आणि कस…… ! आहहह , अचानक वेदनेची एक जाणिव. आज काहीतरी विचित्र घडत होतं खरं. प्रथमच वेदना, दुःख या भावना जाणवत होत्या. दुःख … यस, मघाच्या त्या भावनेला दुःख म्हणतात. LI ला सुद्धा ऑफ केले असेल या कल्पनेतून निर्माण झालेली ती भावना म्हणजे दुःख होते तर. पण….
‘ दोन मिनिटात तुझ्या शरीरात पुन्हा ताकद येईल. पहिली संधी मिळताच पी-टर्मिनल गाठ’
माझ्या मानेपाशीच पडलेला M-30 माझ्या कानात पुटपुटत होता. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहीले. त्याच्या डोळ्यात प्रचंड वेदना साकळली होती. हातात काहीतरी प्लास्टीकची एखाद्या नळीसारखी वस्तु. माझ्या मानेतून उठणारी वेदना आणि त्या नलिकेचा काहीतरी संबंध नक्कीच होता.
तो एकदम उसळला, त्याच्या तोंडातुन एक विचित्र द्रव बाहेर पडला आणि M-30 निष्प्राण झाला. ( हे कुठले कुठले शब्द माझ्या ओठावर येताहेत आज?)
मी जिवाच्या आकांताने उठलो. कुठल्याही परिस्थितीत ‘त्यांच्या’ तावडीत न सापडता मला पी-टर्मिनल गाठुन लिफ्ट शोधायची होती. पण लिफ्ट म्हणजे काय?
सद्ध्या इथुन सुटका करून घेणे महत्वाचे. बाकी विचार नंतर करू. तिथुन पळ काढताना कानावर राहून राहून M-30 चे शेवटचे वाक्य आदळत होते. त्याचा अर्थ काय आहे?
“तू आमच्यापैकी आहेस, आमचा आहेस. पी-टर्मिनल गाठ, जा…’
***********************************************************************************
मी कोण आहे ?
“तू आमचा आहेस !”
ते शब्द राहून राहून कानावर आदळत होते. आमचा म्हणजे? कोण होते M-30 आणि LI ? मी त्यांचा ‘आपला’ म्हणजे? मी ही त्यांच्यासारखाच होतो का? पण कोण होतो मी?
LI कुठे आहे आत्ता? आणि मी जऱ त्यांच्यातलाच असेन. तर त्या संकटकाळी LI ला तिथे एकटे सोडून जाणे योग्य होते का? आणि LI जीवंत असेल तर? हा अजुन एक नवा शब्द, त्यांच्याच तोंडी कधीतरी ऐकलेला. नाही, त्याचा शोध घ्यायलाच हवाय.
मी नकळत डोळे मिटले आणि सगळी शक्ती LI वर एकवटायला सुरुवात केली. आणि…
तो मला दिसला. दोन्ही हात बांधून , छताला उलटा लटकलेला. ते बहुदा गर्निमन सर्कलचे सर्विस सेंटर होते. कारण मला Z-10 ही दिसत होता. तो तिथला प्रमुख आहे हे LI नेच सांगितले होते एकदा. का कुणास ठाऊक पण मला प्रचंड राग आला होता. मला आता पी टर्मिनल, M-30 काहीच आठवत नव्हते. एकच भावना प्रबळ होती, ती म्हणजे LI ला वाचवणे. मी त्यांच्यापैकीच एक होतो ना?
आणि तसेही लिफ्ट म्हणजे काय हे मला फक्त LI च सांगू शकला असता. तसेही लिफ्ट शोधून काय करायचे हे तरी कुठे माहीत होते मला. LI ला सोडवणे मस्ट होते. त्यासाठी रिस्क घेवून गार्निमन सर्कल सर्विस सेंटरमध्ये घुसावेच लागणार होते. सर्वीस सेंटर पर्यन्त पोचण्याचा एकच मार्ग होता.
मी रस्त्यावर आलो, थोड़े दूर चालत येवून दिसलेले पहिले TV पकडले. आत शिरल्या शिरल्या माझा चार्जिंग पोइन्ट कनेक्ट केला आणि लगेच काढून टाकला. दोन मिनिटानी पुन्हा कनेक्ट केला. असे सलग एक दोन वेळा केले. पॉवर यूनीट कटॉफ झाल्याने लगेच ऐरर मेसेज जाईल आणि माझी रवानगी गर्निमन सर्कल सर्विस सेंटरला होईल याची मला खात्री होती कारण पॉवर रिपेअर्स फक्त तिथेच होत. एकच विचार मनात होता, तो म्हणजे माझ्यावर डिफेक्टिव यूनीट सेंटरमध्ये गुदरलेला प्रसंग अजून इकडे माहीत झालेला असु नये.
माझ्या अंदाजाप्रमाणेच मला लगेच गर्निमन सर्कल यूनीटला नेण्यात आले. पण माझा अंदाज किंचित चुकला होता. कारण तिथपर्यंत बातमी आधीच पोचलेली होती. तिथे Z-10 माझी वाटच बघत होता.
मला पाहताच अतिशय कुत्सितपणे म्हणाला , “चीफ म्हणाले होतेच की तू अतिशय मठ्ठ आहेस म्हणून पण विश्वास नव्हता बसला. पण आलास ना हिला सोडवायला इथे? तुम्ही माणसे नाही म्हटले तरी मठ्ठच. फारच भावनाप्रधान आणि संवेदनशील. बादवे तुमच्याप्रमाणे पूर्ण नसलों तरी अर्धा मानव आहे मी सुद्धा. तो असे का म्हणाला असेल? तो मला माणूस का म्हणाला असेल? त्याने स्वतः बॉट म्हणून माझे ओव्हरहोलिंग केलेले आहे कित्येकवेळा.
माझे लक्ष बांधलेल्या LI कड़े होते. Z-10 ने पुढे होत LI च्या मस्तकावरील कवच बाजूला केले. ते काढताच काळ्याभोर दोराचा एक लांबलचक पुंजका त्यातून बाहेर पडला. काही दोरे पांढरे सुद्धा होते बऱ्यापैकी. नाही,दौरा नाही ते केस होते LI चे. त्याच्या पोलादी मुखवट्याच्या जागी एक कमालीचा नाजुक पण वृद्ध चेहरा होता. वृद्ध … हो ती एक सुंदर वृद्ध स्त्री होती. क्षणभरासाठी तिच्या डोळ्यात एक ओळखीची खुण चमकली आणि मी कसलाही विचार न करता तिच्याकडे झेपावलो. काही बॉट्स मला अडवायला धावले, पण आज मला कोणीच आवरु अथवा अडवू शकणार नव्हतं. काही क्षणातच मी तिथल्या बॉट्सना आडवं करून LI ची सुटका केली. माझ्या अवाढव्य देहाचा इथे फायदा झाला मला. मी कोण होतो कुणास ठाऊक पण माझ्या अंगावर अजूनही असलेलं ते बॉट्सचं कवचही माझी मदत करून गेलं.
हात मोकळे होताच LI ने आपल्या कपड्यातून ती मघासारखीच नलिका बाहेर काढली आणि आपल्या मानेत खुपसली. तिसऱ्या मिनिटाला LI बर्यापैकी सावरलेली होती. (मी LI चा उच्चार आता तो न करता ती असा करायला लागलो होतो. जणुकाही है सारे शब्द मला पूर्वीपासुन माहीतच होते. )
चल लवकर, ही बातमी सेंट्रल ऑफिसला गेली असेल. तीन मिनिटात कुमक येवून पोचेल. त्या आधी निघायला हवे. पी- टर्मिनल जवळ असले तरी मध्ये बरेच अडथळे असणारेत।
LI ने तिथलीच एक मिनी TV-301 ताब्यात घेतली आणि आम्ही पी-टर्मिनलच्या दिशेने निघालो. आम्ही बाहेर पडत असतानाच दोन सशस्त्र TV-501 सर्विस सेंटरमध्ये शिरली. आमच्या मिनी TV-301 कड़े त्यांनी दुर्लक्षच केले.
त्यामुळे आम्ही अगदी सहज पी-टर्मिनलच्या बेसमेंट थ्री ला पोचलो. शेवटच्या टप्प्यात मात्र LI लपुन बसली होती.आणि वेहिकलचे स्टेअरींग माझ्या हातात. आयुष्यात प्रथमच हे ट्रांसपोर्टेशन वेहिकल हातात आलेले असूनही मी एखाद्या सराईतासारखा ते चालवत होतो ???. असो, आश्चर्य करायची ही वेळ नव्हती.
LI ने काही क्षणातच लिफ्ट शोधून काढले. मला काही कळेना. ही चार बाय पाचची एम्प्टी यूनीट कशी काय वाचवणार आम्हाला? थोड्या वेळात ते इथेही पोचतील आणि या यूनिटचे हे आता धातु जीर्ण झालेले तकलादु दार तोडायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे? अचानक माझे डोके विलक्षण ठणकायला लागले. जणुकाही मी स्वतःच ते कुठेतरी एकवटायचा प्रयत्न करत होतो. एका क्षणात मी शांतही झालो आणि डोळे मिटुन घेतले.
आणि तितक्याच बाहेरुन कुणीतरी दार ठोठावलेच. LI ने मला दार उघडायची खुण केली. मला कळेना, ते आत आले की संपलेच की सगळे? पण LI वर आता पूर्ण विश्वास बसलेला होता. त्यामुळे कसलाही प्रश्न न करता दार उघडले मी. आता आश्चर्यचकित व्हायची पाळी माझी होती. आम्ही पी-टर्मिनलच्या बेसमेन्टमध्ये नव्हतो. आजुबाजुला उंचच ऊंच पण इमारतींचे पडलेले, जळलेले भग्न सांगाड़े दिसत होते. अटलांटिसच्या मानाने हा भाग अतिशय भकास , वैराण दिसत होता. LI चा श्वास गुदमरल्यासारखा झाला होता. मी मात्र स्थिर होतो, मला कसलाही त्रास नव्हता.
समोर LI सारखेच काही लोक उभे होते. पूर्ण कपडयात गुरफटलेले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क्स होते. त्यांच्यापैकी
एकाने LI च्या चेहऱ्यावर मास्क चढवला. त्यापूर्वी मी LI ला विचारलेच.
“कोण आहेस तू? हे लोक कोण आहेत? मी कोण आहे?”
त्या मास्कमागुन आलेला आवाज आनंदाने सांगत होता.
” वेलकम टू मेनलँड ! तू आमचाच आहेस !”
*********************************************************************************
पुन्हा एक नवीन कोडं, पुन्हा तेच शब्द । तुमचाच म्हणजे? तो Z-10 म्हणाला तसे तुम्ही माणसे आहात का? पण तसे असेल तर माझ्याबद्दल तुम्हाला इतकी आत्मीयता का? आणि तो Z-10 मला माणूस आणि स्वतःला अर्धमाणुस का म्हणत होता?
मी LI आणि इतरांकडे पाहात विचारले.
ते सांगते तुला नंतर. LI म्हणाली. आणि त्या दुसऱ्या मास्कधारीला तिने जवळजवळ आदेशच दिला. “ही लिफ्ट आपल्याला नष्ट करून टाकायला हवी. नाहीतर तिचा वापर करून अटलांटिसची सशस्त्र सेना पुन्हा वर येवू शकते आपल्या शोधात. ” तिचे डोळे मात्र सतत माझ्याकडे, माझ्यावर रोखलेले होते. जणुकाही मी यावर काहीतरी बोलेन अशी तिची अपेक्षा होती.
आणि माझ्याही नकळत ते पुन्हा एकदा झाले. मी माझ्याही नकळत बोलून गेलो.
“नाही, त्याची गरज नाहीये. तसे असते तर गेल्या कित्येक वर्षात त्यांनी लिफ्टचा वापर केला असता. खरंतर त्यांनी प्रयत्न केला असावा पण त्यांना ते साध्य झालेले दिसत नाहीये. तरीही आपण काळजी घ्यायला हवी. मी पुन्हा लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टच्या चारही भिंतीवर तपकिरी रंगाच्या धातुंनी काही विचित्र वर्तुळाकृती सर्किट्स कोरलेली होती. मी चारही भिंतीचे थोडावेळ निरीक्षण केले आणि नंतर दाराच्या अगदी समोर असलेल्या भिंतीवरील सर्किटसमोर जावून उभा राहिलो. थोड़ा वेळ त्याची चाचपणी करताच सर्किटचा एक संपूर्ण छोटासा पीसच माझ्या हातात आला. तो घेवून मी बाहेर आलो. तो पीस LI च्या हातात दिला.
“हे घे, पाथ ब्रेक केलाय मी. आता पुन्हा हा पीस तिथे फिट केल्याशिवाय लिफ्ट चालू होणार नाही.”
LI च्या चेहऱ्यावर प्रचंड आनंदाची, प्रेमाची भावना दिसत होती. तिच्या डोळ्यात मात्र काही वेगळेच भाव होते. ते काही मला कळेनात. पण प्रचंड हवेहवेसे भाव होते ते. तिच्यापर्यंत पोचली ती शंका आपोआप.
“त्याला वात्सल्य म्हणतात बाळा. पण तुला लिफ्टचे मेकॅनिझम कसे माहीत झाले? तुला तर लिफ्ट म्हणजे काय ते सुद्धा माहिती नव्हते.”
तिच्या स्वरांत एक विलक्षण खोडकर भाव होता. इथे आल्यापासुन प्रत्येक क्षणी मानवी स्वभावाच्या विविध भाव-भावनांची ओळख होत होती आणि विशेष म्हणजे मला ते भाव अजिबात परके वाटत नव्हते. मी खरोखर माणूस होतो का? पण कसे शक्य आहे? इथे दर पंधरा दिवसाला मी सर्विस सेंटरला जावून माझे ओव्हरहोलिंग , सर्विसिंग करून घेत होतो. मागच्या त्या प्रकरणात माझे आयस्लॉट्स देखील टेस्ट केले होते त्यांनी. नाही, मी एक यंत्रमानवच आहे. मग या माणसांना मी त्यांच्यातलाच एक का वाटतोय? आणि त्या लिफ्टच्या मेकनिझमबद्दल मला कसे कळाले? कालपर्यंत तर मला लिफ्ट म्हणजे काय ते सुद्धा माहीत नव्हते.”
आता माझी मलाच भीती वाटायला लागलिये. कोण आहे मी नक्की?
*******************************************************************************
Flashback ….
इथे फार काळ थांबता येणार नाही. बाहेर उष्णता वाढ़ायला लागायच्या आत आपल्याला बेसवर पोहोचायला हवेय. नाहीतर पुढचे अठ्ठेचाळीस तास इथेच अडकुन पडू. चला लवकर, बेसवर पोचायला अजुन दोन तास तरी लागतील.
तो दूसरा मास्कधारी म्हणाला. LI ने ही त्याला दुजोरा दिला. बरोबर आहे रॉबी, निघायला हवे. चल NK आपण वाटेत बोलूच.
तसा तो रॉबी म्हणवणारा हसला आणि म्हणाला, आता तरी त्याला त्याच्या खऱ्या नावाने हाक मार.”
“गेल्या आठ-नऊ वर्षात त्याला NK म्हणूनच संबोधत आलेय रे. त्याला इथले एक नाव आहे हेच विसरुन गेले आहे आता. आणि त्याला निकी म्हणून हाक मारल्यावर त्याला कळायला तरी हवे ना.”
“खराय तुझं. चल निकी, तुझी ममा तुझी वाट बघतेय घरी. ” रॉबीने माझ्या खांद्यावर हलकेच थोपटले.
“ममा?” म्हणजे…? ” माझ्या पुढे अजुन एक प्रश्नचिन्ह उभे राहीले. तशी LI हासली, चल भेटल्यावर कळेलच.
बाहेर काही विचित्र आकाराची वाहने उभी होती. मला आमचे आयताकृती , लांबचलांब TV-501/301 आठवले. ही वाहने काही वेगळीच होती.
तू जुनाच ट्रक अजूनही वापरतोयस रॉबी?
वाहने बनायची बंद होवुन पंचवीस वर्षे झालीत स्वतंत्रा. नवी वाहने बनताहेतच कुठे? तीच वाहने आम्ही अजूनही मेनटेन करून ठेवली आहेत झाले. अर्थात आता ही वाहने पहिल्यापेक्षा प्रचंड वेगाने धावु शकतात आणि शस्त्रसज्ज आहेत. शत्रुच्या एका पूर्ण तुकडीचा सामना करण्याची शक्ती आहे या ट्रकमध्ये आता. तुझी लेकच आता प्रमुख आहे आपल्या वेपन्स आर.एन.डी. विभागाची. इकडे येणार होती आमच्या बरोबर पण ऐनवेळी काही इमरजेंसी आल्याने ती तिथेच अडकुन पडलीय. चल निघूयात.”
LI चा चेहरा फुलला आहे हे मला त्या मास्कमधुनही जाणवले. त्या विचित्र वाहनात, ट्रकमध्ये बसुन आम्ही निघालो तेव्हा पहिला बदल जाणवला तो म्हणजे इथे कुणीही आपले पॉवर पॉइंट्स कनेक्ट केलेले नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे मलाही गरज पडली नव्हती.
दूसरी गोष्ट स्ट्राइक झाली ती म्हणजे…”LI, आता तुला त्या रॉबीने स्वतंत्रा म्हणून हाक मारली. ते तुझे खरे नाव आहे का
“हो, स्वतंत्रा, स्वतंत्रा हेरंब देशमुख असे नाव आहे माझे. पस्तीस वर्षापूर्वीची जगप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट स्वतंत्रा देशमुख. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि चुंबकीय लहरींच्या साहयाने ह्यूमन ट्रांसपोर्टेशन चा शोध लावणाऱ्या महान फिजिसिस्ट हेरंब देशमुखची पत्नी। रोबोटिक्समधल्या जगातल्या सर्वश्रेष्ठ तज्ञाची अतिशय घट्ट मैत्रीण, काय रॉबी?”
“सर्वश्रेष्ठ काय स्वतंत्रा? तू पण ना? ” रॉबी संकोचला. मला हे सर्वच विचित्र वाटत होते.
माझ्याकडे पाहात LI अर्थात स्वतंत्रा बोलू लागली.
“या सर्वाची सुरुवात झाली ती साधारण चाळीस वर्षापूर्वी. आम्ही सगळेच विद्यार्थी दशेत होतो तेव्हा. माझं आणि हेरंबचं कोर्टिंग चालू होतं तेव्हा. ग्रॅजुएशन पूर्ण झाले की आम्ही लग्न करणार होतो. हेरंब मुंबई आय आय टीचा भूगर्भशास्त्राचा विद्यार्थी. भौतिकशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे दोन्ही त्याचे आवडते विषय. गंमत म्हणजे या दोन विषयांबरोबर मेटलर्जी हा देखील आवडता विषय होता त्याचा. मी नुकतेच बीए मानसशास्त्र पूर्ण करून एका अमेरिकन यूनिवर्सिटीत मानसशास्त्राचेच उच्च शिक्षण घेत होते. तिथे कॅम्पसमध्ये माझ्याबरोबर राहणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा ल्युसीचा प्रियकर माझा जिवलग मित्र बनला. रॉबिन फ्रिस्क नावाचा हा अतिशय बुद्धिमान रोबोटिक इंजीनियर माझ्या आणि हेरंबच्या आयुष्यात आला आणि आमचाच होवुन गेला. ही साधारण सन २०४३ सालची गोष्ट आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत चालले होते. वनसंपदा नष्ट होत होती. या येवू घेतलेल्या संकटापासून बेफिकीर, मानवजात अजुनच उन्मत्त होत चालली होती. प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढला होता. अजुन काही वर्षातच समग्र मानवजातीला ऑक्सीजन मास्क शिवाय बाहेर पडताच येणार नाही अशी परिस्तिथी होती. But most of them were least bothered. हेरंब भुगर्भशास्त्रज्ञ असल्यामुळे त्याचा नियमित अभ्यास चालू होता. त्यावरून कुठल्याही क्षणी पृथ्वी फुटू शकेल अशी परिस्थिती येत असल्याचे त्याचे ठाम मत बनले होते. गेली शेकडो वर्षे मृत असलेले ज्वालामुखी पुन्हा जागृत होवू लागले होते. हेरंब आणि आम्ही ही बाब आन्तरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक तसेच राजकीय सत्तास्थानांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो. पण हेरंब काय, मी काय किंवा रॉबी काय आम्ही फारच क्षुद्र माणसे होतो. आपल्यापरीने आमचे प्रयत्न चालू होते. पण सगळीकडेच आम्ही विनोदाचा विषय ठरत होतो. हेरंबच्या तर शैक्षणिक सर्टिफिकेट्सच्या वैधतेची तपासणी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तशात ती घटना घडली..
“पुढे मी बोलतो स्वतंत्रा, तू आराम कर थोड़ा वेळ” रॉबी बोलायला लागला…
“२०४७ च्या जानेवारी महिन्यात स्वतंत्रा आणि हेरंबने लग्न केले. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी स्वतंत्रा तिच्या एका थिसीससाठी म्हणून स्वीडनला गेली. तोपर्यंत एक मानसशास्त्रज्ञ म्हणून तिचे नाव गाजायला लागले होते. हेरंबही आता एक बुद्धिमान भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याचे बरेचसे पेपरही प्रसिद्ध झाले होते पृथ्वीच्या भविष्यावर भाष्य करणारे आणि त्यामुळेच खळबळजनकही ठरले होते.
साधारण २०४७ च्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या मिनेसोटा प्रांतात एक उल्का कोसळली. एक विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून हेरंबचीही त्या उल्केचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीम मध्ये सहज वर्णी लागली. त्या उल्केचा अभ्यास करताना काही विलक्षण धातुंचा शोध शास्त्रज्ञाना लागला. खरंतर हेरंबने शोधला होता तो धातू पण टीममधल्या दिग्गजांनी त्यावर स्वतःचे नाव कोरले. दोघांना त्यासाठी नोबेलही मिळाले. खरा शोधक हेरंब कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. अर्थात हेरंबला त्याचे काहीच वाटले नव्हते. कारण त्या धातुपेक्षाही मूल्यवान अशी एक गोष्ट त्याला अपघातानेच कळाली होती. त्या उल्केच्या अवशेषात त्याला काही जीवंत पेशी सापडल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा परत शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पेशींचा तिथे मागमुसही मिळाला नाही. आमच्याकडे जेवढे सैम्पल्स होते तितकेच मागे राहीले होते. आधी आम्हाला वाटले की तिथल्या हवेच्या संपर्कात येवून त्या पेशी नष्ट झाल्या असतील. पण तो आमचा गैरसमज होता हे नंतर लक्षात आले आणि तोवर खुप उशीर झालेला होता. पृथ्वीवरील अखिल मानवजातीच्या विनाशाची ती नांदी होती.
कुठल्यातरी अज्ञात ग्रहावरील अतिशय सामर्थ्यशाली जीव आहेत ते. त्या सूक्ष्म पेशी म्हणजे फक्त दाखवायचे दांत होते त्यांचे. त्यांच्यात आजुबाजुच्या परिस्थितीनुसार स्वतःच्या गुणधर्मातच नव्हे तर गुणसुत्रात सुद्धा हवे तसे परिस्थितीपोषक बदल घड़वण्याची विलक्षण क्षमता होती. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते कुठेही शिरू शकत होते . माझ्या संगणकामध्ये, अगदी आमच्या मनामध्ये सुद्धा ते शिरले. पण माझ्या मनात ते फ़ार काळ राहिले नाहीत. त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानापुढे माझे रोबोटिक्सचे ज्ञान फारच क्षुद्र वाटले असेल त्यांना. पण हेरंबवर मात्र त्यांनी पूर्णपणे कब्जा केला होता. हेरंबचा मेंदू आम्हा सर्वापेक्षा अधिक क्लिष्ट पण तेवढाच प्रगत होता. मानवजात सर्वसाधारणपणे आपल्या मेंदुचा त्याच्या क्षमतेपैकी फक्त सहा टक्के वापर करतो म्हणतात. पण हेरंबच्या बाबतीत त्याच्या बुद्धीचे अनेक चमत्कार, हो कट्टर अथेईस्ट असूनही मी त्याला चमत्कारच म्हणेन, मी अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी आपली सगळी ताकद हेरंबवर एकवटली होती. आता हे तुला सांगतोय मी पण तेव्हा हे काहीच कळले नव्हते आम्हाला. फक्त बरोबरच्या सहकाऱ्याना आम्ही विचित्र वागतोय हे जाणवत होते. या सगळ्या प्रकारांना खिळ लागली ती तब्बल एक आठवड्यानंतर.
मला तो दिवस अजूनही आठवतो. स्वतंत्रा एका सुट्टीत आम्हाला भेटायला म्हणून आली होती. हेरंबने तिला भेटायला सरळ नकारच दिला. आम्ही दोघेही शॉक झालो. पण बहुदा हेरंबला त्यांच्या घूसखोरीचा अंदाज आलेला होता. तो कुणालाच भेटत नव्हता. पण संतापलेल्या स्वतंत्राने थेट त्याच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला. ते बहुदा संधीच शोधत होतो. स्वतंत्राच्या प्रगत मेंदुचा त्यांना अंदाज आला असावा. त्यांनी तिच्या मेंदूत शिरण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्यांना पहिला धक्का बसला. तो एका प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञाचा मेंदू होता. पहिल्या पातळीवरच त्यांना कडकडून विरोध झाला. त्यांनी लगेचच तिथुन पळ काढला पण त्या संघर्षात स्वतंत्राच्या मनाच्या कुठल्यातरी सुप्त स्तरावरची कळ नकळत दाबली गेली आणि एका अफाट सामर्थ्याचा खजिना स्वतंत्रापुढे उघड़ा झाला. त्यांची कुणाच्याही मनात शिरायची क्षमता स्वतंत्राला सुद्धा मिळाली. त्याच क्षमतेचा उपयोग करून स्वतंत्राने हेरंबला सुद्धा त्यांच्या तावडीतुन मुक्त केले. त्यांनी पळ काढला खरा पण तोवर हेरंबच्या मेंदूतले भूगर्भशास्त्राचे प्रचंड ज्ञान त्यांनी मिळवले होते.
तुला आश्चर्य वाटेल, पण अटलांटिसची कल्पना सुद्धा हेरंबच्या मेंदूची उपज आहे. पुढील काळात पृथ्वी फुटणाऱ या आपल्या मतावर तो ठाम होता. म्हणून आपले भुगर्भशास्त्राचे ज्ञान वापरून त्याने पृथ्वीच्या गर्भातील अशी जागा शोधून काढली होती की जिथे पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली तसेच पृथ्वीवरील रेडिएशनचा सुद्धा असर होणार नाही. अटलांटिसचा आराखडा त्याच्या मेंदूत तयार होता. आम्ही कितीतरी वेळा त्यावर बोललो होतो. अर्थात मला ते सगळे एका आदर्शवादी शास्त्रज्ञाचे अवास्तव आणि अतिशयोक्तिपूर्ण स्वप्न वाटत असे. पण आम्हाला कुणालाच कल्पना आली नव्हती की येत्या काही वर्षात हेरंबच्या सर्व कल्पना वास्तवात उतरणार होत्या. ज्यासाठी तो कायम आमच्या मस्करीचा विषय ठरला होता ते अटलांटिस आम्हा सर्वांच्या नाकावर टिच्चून उभे राहणार होते आणि तीच मानवजातीच्या विनाशाची सुरुवात ठरणार होती.
आम्ही सगळे ऐन तारुण्यात होतो. उत्साह होता, जोम होता. पुढे बुद्धीसाठी नवनवीन आव्हाने होती. आम्ही आपल्या कामात गुंतून गेलो. ती छोटीशी घटना तर विसरुनही गेलो होतो. कारण नंतर त्या जीवांनी कधीच आमच्याशी संपर्क साधण्याचा साधा प्रयत्नही केला नव्हता. स्वतंत्रा तिला मिळालेल्या नव्या शक्तीच्या साहयाने मानवी मनाच्या अथांग, गूढ़ विश्वातली रहस्ये सोडवण्यात मग्न होती. त्याच दरम्यान त्यांना एक बाळही झाले. हे दोघेही असे विक्षिप्तपणे पृथ्वीला तिच्याच आंतरिक क्षोभापासुन वाचवण्याच्या कामी गुंतलेले, त्यामुळे ते बाळ मी स्वतंत्राकडून मागून घेतले. या गोंधळात त्या बाळाच्या वाढीकडे दुर्लक्ष व्हायला नको होते. आम्ही दोघे नवराबायकोही खुश होतो. कारण माझी पत्नी बाळाला जन्म द्यायला असमर्थ होती. अर्थात स्वतंत्रा आणि हेरंब दोघांनीही बाळाला अगदीच काही आपल्यापासुन तोडले नव्हते. वेळ मिळाला की सुट्टी घेवून ते माझ्याकडे येत, बाळासोबत वेळ घालवण्यासाठी. आम्ही दोघेही त्या बाळाच्या सहवासाच्या आनंदात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सर्व घटना अगदी विसरून गेलो होतो.
विसरला नव्हता तो हेरंब. त्याला अजुनही आपल्या शोधाबद्दल खात्री होती. आपले भौतिकशास्त्र आणि भूगर्भशास्त्राचे ज्ञान वापरून त्याने भुगर्भात शेकडो किमी अन्तरापर्यंत शोध घेवू शकतील अशी काही यन्त्रे निर्माण केली. आपली प्रयोगशाळा घेवून तो जगभर फिरत होता. त्याला मिळालेले अनेक पुरावे जगासमोर, इथल्या शास्त्रज्ञासमोर मांडण्याचा प्रयत्न करत होता. पृथ्वी आतून एखाद्या अणुबॉम्बसारखी प्रदीप्त झालेली असून ती कधीही फुटू शकते हे सगळ्यांना ओरडुन सांगत होता. शेवटी-शेवटी तर एक स्वतंत्रा सोडली तर सगळेच त्याला वेड लागलेय या निर्णयाशी येवून पोचले होते.
२०५० उजाडले आणि त्या सर्वाला सुरुवात झाली. या सगळ्याची सुरुवात सर्वप्रथम आफ्रिकन उपखंडात झाली. एप्रिल महिन्यात वेस्ट इंडियन बेटांवर सर्वात प्रथम भूकंप व्हायला सुरुवात झाली. हे शॉकिंग होते कारण हा प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने तसा सर्वस्वी सुरक्षीत भाग होता. साहजिकच शास्त्रज्ञाच्या नजरा तिकडे लागल्या. जो तो वेस्ट इंडियन बेटांकड़े पळायला लागला. काही शास्त्रज्ञाना तर नोबेलची स्वप्ने पडायलाही सुरुवात झाली होती. या वेळी हेरंब मात्र वेस्ट इंडीज सोडून रॉकीज मध्ये ठाण मांडून होता. त्याच्यामते पुढचे विस्फोट, भूकंप रॉकीजमध्ये होणार होते. पण नेहमीप्रमाणेच त्याला उडवुन लावले गेले. काही विज्ञान तसेच मानवाधिकार संघटनांनी तर त्याला अटक करून मनोरुग्णालयात पाठवण्याचीही मागणी केली. २०५० च्या जून महिन्यात शेवटी हेरंबला अटक झाली कारण त्याने अनधिकृतपणे व्हाइट हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
व्हाईट हाऊस म्हणजे?
तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे ऑफिस आणि निवासस्थान. तर हेरंबला अटक झाली आणि इंटेरोगेशन सुरु झाले. यावेळी त्याने मांडलेली थिअरी मात्र त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय या गोष्टीवर सगळ्या जगाचा विश्वास बसवून गेली.
असं काय सांगितलं त्याने की इतके दिवस त्याला विख्यात शास्त्रज्ञ म्हणून ओळखणारे जग चक्क वेडा समजायला लागले?
हेरंबच्या मते वेस्ट इंडीजमधले भूकंप नैसर्गीक नव्हते. भूकंप घडवून आणून त्याने होणाऱ्या हानीची परिणामकारकता शोधण्याचा तो एक प्रयोग होता. अर्धे वेस्ट इंडीज उध्वस्त झाले होते. लाखो लोक मरण पावले होते. यासाठी , हा भुकंप घडवून आणण्यासाठी शास्त्र आणि शस्त्र म्हणून मानवी मनाच्या मानसिक लहरींचा वापर झाला असल्याचे हेरंब छातीठोकपणे सांगत होता. पण कदाचित त्यामुळेच त्याला ते सिद्ध करता येत नव्हते. या गोष्टीला तो कुठलेही स्पष्ट पुरावे देवू शकत नव्हता. परिणाम व्हायचा तोच झाला. हेरंबची रवानगी यूरोपियन उपखंडातील सर्वात विख्यात की कुविख्यात अश्या स्पेनमधील मनोरुग्णालयात करण्यात आली. जगभरातील धोकादायक म्हणून ओळखले गेलेले मानसिक रुग्ण इथे ठेवले जात. आम्ही सगळेच हेरंबची अवस्था बघून शॉकमध्ये होतो. पण नजिक वर्तमानात सगळ्या जगाला या कृतीचा पश्चाताप होणार होता. जुलै २०५० मध्ये रॉकीज मध्ये भूकंपमालिका सुरु झाली. सगळा कोलोराडो प्रांत त्याच्या टप्प्यात आला. प्रलयाला सुरुवात झाली होती जणु.
त्या दरम्यान कुणालाही हेरंबला भेटु दिले जात नव्हते. पण रॉकीजनंतर अचानक शेकडो,हजारो मैल दूर मुंबई या भारतीय शहरात भूकंप सुरु झाले, लाखो लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर भारतातील लहान मोठ्या शहरात हे लोण पसरायला लागले. हळूहळू सगळा एशिया भूकंपाच्या पट्टयात रूपांतरीत झाला. अतिशय अनपेक्षीत आणि विचित्र प्रकार होता हा. या सर्व भागात भूकंपप्रवण क्षेत्र तुलनात्मक दृष्टया खुप कमी आहे. पण जिथे शक्यताही नाही अश्या भागात भूकंप व्हायला लागले. लाखो, करोड़ो लोक मृत्युमुखी पडले. नोव्हेम्बरमध्ये यूरोप खंडात बेल्जियम, हॉलण्ड आणि आसपासचा प्रदेश भूकंपक्षेत्राच्या तड़ाख्यात सापडला, अमेरिकेचा बराचसा भाग भूकंपाच्या पट्टयात रूपांतरीत झाला आणि मग शास्त्रज्ञाना हेरंबची आठवण झाली. शास्त्रज्ञाची एक टीम हेरंबची भेट घ्यायला म्हणून स्पेनच्या त्या कुख्यात असायलममध्ये गेली पण तिथे एक वेगळाच धक्का त्यांची वाट पाहात होता. हेरंबच्या खोलीत त्यांना हेरंब भेटला खरा, पण तो खरा हेरंब नव्हता, निव्वळ त्याच्या देहाची एक जीवंत पडछाया होती.
आता मी हे सहजपणे सांगतोय तुला, पण तेव्हा मीही शॉक झालो होतो, कोड्यात पडलो होतो. असे कसे होवू शकेल? एखादा माणूस आपल्या मागे आपली जीवंत पडछाया, क्लोन कसा काय सोडून जावू शकेल? ते सुद्धा असायलम -मधल्या त्या दहा बाय बाराच्या खोलीत जिथे एक कागदाच्या लगदयापासुन बनवलेला सिंगल पलंग, एक कागदाच्याच लगद्यावर प्रतिक्रिया करून बनवलेले वॉशबेसिन आणि काही अंथरुण-पांघरुणे सोडली तर काहीही नव्हते. अगदी त्याची पुस्तके, लेखन साहित्य देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेले होते. खोलीला आत जाण्यासाठी एक चार बाय तीन फुटाचा दरवाजा आणि थोड़ाफ़ार प्रकाश , हवा खेळती रहावी म्हणून वर छताला एक बाय अडीच फुटाची एक गजांनी बंदिस्त केलेली खिड़की. छत जमीनीपासुन किमान बावीस फुट उंचीवर, संगमरावरासारख्या गुळगुळीत पण धातुंच्या ऊंच भिंती. आणि अश्या ठिकाणाहुन हेरंब आपली एक प्रोजेक्शनवजा जीवन्त प्रतिकृति मागे ठेवून गायब झाला होता. पण जाण्यापूर्वी तिथल्या भिंतीवर लिहून , खरेतर एम्बोस करावे तसे बरेच काही कोरुन ठेवले होते त्याने.
“मानवी मनाच्या सामर्थ्याला कमी लेखलेत तुम्ही. त्याच सामर्थ्याचा वापर करून मी येथुन बाहेर पडतोय. अजुनही वेळ गेलेली नाहीये. पृथ्वी नाही वाचवु शकणार आपण. पण इथली मानवजात, प्राणीसृष्टी , वनस्पती काही प्रमाणात का होईना अजूनही वाचवु शकतो आपण. तुमचा विश्वास असो वा नसो, मी शरीरात रक्ताचा शेवटचा कण असेपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे.”
सगळ्या भिंतीवर सिरियल नंबर देवून जगभरातील वेगवेगळ्या शहरांची नावे लिहून ठेवली होती त्याने. हे त्या कठीण धातुवर त्याने कसे काय कोरलं होते त्यालाच माहीत? ती नावे काय इंडीकेट करताहेत हे मात्र जगाला लगेच कळाले. हेरंबने दिलेल्या अनुक्रमानुसार जगभर भूकंपमालिका सुरु झाल्या. त्सुनामी सुरु झाल्या. चक्रिवादळाचा विध्वंस सुरु झाला होता. प्रलयाची सुरुवात झाली होती. जग विनाशाच्या पायरीवर उभे होते. आणि अश्यात एकेदिवशी हेरंब आणि स्वतंत्रा माझ्या दारात येवून उभे राहिले.
“रॉबी, तुझी काही हरकत नसेल तर मी मध्ये बोलू का थोड़े? “मला एक शंका आली होती. रॉबीने मान हलवली.
पहिला प्रश्न म्हणजे, हेरंबसारख्या विख्यात शास्त्रज्ञाला थेट धोकादायक कॅटेगरीत का टाकण्यात आले? आणि दूसरा असा की तू म्हणालास हेरंब असायलममध्ये नव्हता हे ऐकून तूला शॉक बसला. म्हणजे ही एवढी महत्वाची आणि संवेदनशील गोष्ट लीक कशी झाली? अश्या घटना सरकारचे अपयश मानल्या जातात आणि यामुळे सहसा गुप्त ठेवल्या जातात. मग? ….
रॉबी आणि स्वतंत्रा, दोघांच्याही चेहऱ्यावर एकसाथ एक स्मित झळकले.
“बघ, आणि तू म्हणतोस की तू एक सामान्य यंत्रमानव आहेस ठराविक कामासाठी प्रोग्राम केलेला.”
मी अजुनच कोड्यात पडलो. कोण आहे मी? इथुन पुढे मला बोलू देत रॉबी ! स्वतंत्रा पुढे झाली……
तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आधी देते. हेरंबने थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ऑफिसमध्ये घूसखोरी केली होती. आणि विशेष म्हणजे तो त्यात यशस्वी सुद्धा झाला होता. जिथे मुंगीला शिरायला सुद्धा वाव मिळू नये इतकी सिक्युरिटी असते तिथे हेरंब कुठल्याही शस्राशिवाय घुसला होता आणि थेट ओव्हल ऑफिसपर्यन्त जावून पोचला होता. त्याक्षणी अमेरिकेच्या दृष्टीने त्याच्या इतका घातक माणूस जगात दूसरा कोणी असणे शक्यच नव्हते. खरे तर आम्ही दोघेही जाणार होतो पण ही शक्यता लक्षात घेवून हेरंबने मला मागे राहण्याची सूचना केली होती. दोघेही अड़कलो असतो तर बाहेरची लढाई एकटया रॉबीच्या खांद्यावर पडली असती आणि आम्हाला तर इतक्यात त्याला उघड़ करायचे नव्हते.
दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र अगदी सोपे होते. हेरंबला भेटायला गेलेल्या टीममध्ये काही पोलिटिकल लीडर्स देखील होते. त्यांच्यासाठी समस्येपेक्षाही , आम्ही उपाय शोधायला धडपडतोय हे दाखवणे जास्त आवश्यक होते. कारण अजुनही परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घ्यायची त्यांची तयारी नव्हती. ते जाताना आपल्याबरोबर मिडियाचा लवाजमा घेवून गेले होते. त्याच मिडियाने त्यांना तोंडघशी पाडले. असो, लेटस कम टू द पॉइंट.
मधल्या काळात हेरंबने या भूकंपामागचे कारण आणि कर्ते हात शोधून काढले होते. अर्थात शोधून काढले म्हणण्यापेक्षा त्यांनीच हेरंबशी संपर्क साधला होता. परग्रहावरुन आलेले ते जीव. त्यांच्या स्वतःच्या ग्रहावरील जीवन संपुष्टात आल्याने, आपल्या प्रजातीला पोषक असे वातावरण शोधत पृथ्वीवर आलेले होते. हेरंबने अटलांटिससाठी शोधून काढलेली जागा त्याच्या मेन्दुतुन आपसुकच त्यांच्या ओजळीत पडली होती. पण हे जीवमानवाप्रमाणे ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे नव्हते. त्यांना संपूर्ण पृथ्वी त्यांच्यासाठीच हवी होती. पण हेरंबच्या मेंदुच्या क्षमतेमुळे ते अवाक झालेले होते. हा मेंदू त्यांना आपल्या स्वार्थासाठी मानवजातीच्या विरोधात वापरायचा होता. त्यासाठी त्यांनी थेट हेरंबला मानाने ऑफर दिली होती की तू आम्हाला जॉइन हो. …
अर्थातच हेरंबने ही ऑफर नाकारली. आणि हिच गोष्ट डिस्कस करण्यासाठी त्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटायचे होते. त्या जीवांनी त्याला आपली ताकद दाखवून देण्यासाठी हे भूकंप कसे घडवून आणले हे सोदाहरण स्पष्ट केले होते. हे परग्रहावरचे जीव मानवी मनाच्या लहरीशी खेळण्यात, त्यांचा आपल्याला हवा तसा वापर करण्यात पटाइत होते. रादर मानसिक युद्ध हा त्यांच्या सामर्थ्याचा सर्वात महत्वाचा आणि शक्तिशाली हिस्सा होता. हेरंबने निश्चित केलेल्या जागेवर अटलांटिसची त्यांना हवी तशी प्रतिकृती उभी करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यासाठी पृथ्वीवरची मानवजात पळवून नेवुन त्यांना गुलामासारखे वागवण्यात येत होते. त्यांच्याच मनातील संताप, क्रोध अश्या विविध भावनांचा एखाद्या शस्त्रासारखा वापर करून त्याच्या साह्याने प्रचंड ऊर्जा निर्माण करता येईल अशी अवाढव्य यंत्रणा त्यांनी उभारली. तू ज्या वर्कशॉपमध्ये क्वालिटी चेकर म्हणून काम करत होतास ते वर्कशॉप अश्याच एका यंत्रणेचा लहानसा हिस्सा होते.
हेरंबला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश मिळवून देणे माझ्यासाठी अगदी सोपे होते. मी कुणाच्याही मनात शिरून त्याला मला हवे तसे वागायला भाग पाडु शकते. जेव्हा हेरंब तिथे गेला तेव्हा मी त्याच्या मनात होते. हेरंबच्या डोळ्यांना दिसेल आणि कानाला जाणवेल अश्या कुठल्याही व्यक्तीच्या मनात मी शिरू शकत होते. त्यामुळे तिथली सिक्युरिटी सहज भेदली मी. ओव्हल ऑफिस म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या ऑफिसमध्ये शिरण्यापूर्वी मात्र हेरंबने मला बाहेर पडायला सांगितले. राष्ट्राध्यक्षानी कुठलाही निर्णय स्वतःच्या विवेक बुद्धीने, आमच्या दबावाखाली न येता घ्यावा असे त्याचे मत होते. पण तेवढया अवधीत खेळ पालटला आणि हेरंब कैद झाला. तेव्हाही मी त्याला सोडवू शकले असते पण त्याने नकार दिला. काहीही करून त्याला आपले म्हणणे मांडायचे होते. तो जे बोलेल ते राष्ट्राध्यक्षापर्यन्त पोचेल याची त्याला खात्री होती. तसे ते पोचलेही, पण राष्ट्राध्यक्षाची इच्छाशक्ती कमजोर निघाली. त्यानंतर नेमके त्याला बेशुद्ध करण्यात आले. तश्या अवस्थेत मात्र मी हतबल झाले कारण तेव्हा अजुनही बेशुद्ध व्यक्तीच्या मनात शिरण्याची कला नव्हती माझ्याकडे.
असो. तर असायलममध्ये असताना हेरंबने माझ्या मदतीने एका नवीन महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया घातला. माझ्या मानसिक शक्तीच्या साह्याने मी कधीही जागेपणात हेरंबशी संपर्क साधु शकत होते. हेरंबने आता एका अश्या जनित्राचे संशोधन करायला सुरुवात केली होती जे क्षणार्धात एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर कुठलीही वस्तु ट्रांसपोर्ट करू शकेल. मेंदू हेरंबचा होता, बुद्धी त्याची होती. ती वापरून मी इथे बाहेर रॉबीच्या मदतीने ते जनित्र बांधायला सुरुवात केली. मधल्या काळात हेरंबने एका अतिशय विलक्षण अश्या धातुचा शोध लावला होता, जो चुंबकीय क्षेत्राच्या साह्याने त्याच्या चुंबकीय लहरीवर नियंत्रण मिळवून त्या धातुचे अणु-रेणुमध्ये विखंडन करणे आणि पुन्हा त्यांना मुळ स्वरुपात आणणे या दोन्ही गोष्टी करू शकत होता. सुरुवातीला दोन-तीन प्रयोगात अपयश आले आम्हाला. एका प्रयोगात विखंडन व्यवस्थित व्हायचे पण वस्तु पुनः स्वस्वरूपात येताना तिचे स्वरूपच बदलून जायचे. हळूहळू ही समस्या दूर झाली. पण स्थानबदल करता येत नव्हता. इथे हेरंबने मला एक वेगळाच् पण अशक्य कोटितील उपाय सूचवला. त्याच्या मते वस्तु पुर्णत: अणु-रेणुत विखंडीत झाली की माझी मानसिक शक्ती वापरून त्यांना एका स्थानावरुन दुसरीकडे नेता येवू शकले असते. मी हे प्रयत्न सुरु केले. पण त्यात यश मिळत नव्हते. शेवटी हेरंबला बाहेर आणण्याचा निर्णय मी आणि रॉबीने घेतला. कदाचित आम्हा दोघांची मानसिक शक्ति एकत्रितरित्या वापरून हा प्रयोग यशस्वी करता येवू शकला असता.
पण त्या आधीच हेरंबने काही वेगळाच डाव खेळला होता. त्याच्या सतत संपर्कात असलेल्या त्या जीवांची ऑफर त्याने स्वीकारली आणि त्यांनी अगदी सहजपणे त्याला बाहेर काढले. ते त्याला थेट अटलांटिसमध्ये घेवून गेले.
आपण कल्पनेत रचलेल्या त्या स्वप्नातल्या नगरीला वास्तवात पाहुन हेरंब थक्क झाला. त्याहीपेक्षा मोठा धक्का त्याला तेव्हा बसला जेव्हा त्याच्या लक्षात आले की या नगरीत तिथल्या मानवजातीला घातक अश्या यंत्रणेवर काम करणारे बहुतेक यंत्रमानव हे प्रत्यक्षात सर्वसामान्य मानव होते. इथे त्या जीवांनी एक विलक्षण बुद्धीचा खेळ केलेला होता. आपली कुणाच्याही मनात शिरायची शक्ती वापरून त्यांनी या गुलाम मानवांची मने, त्यांचे मेंदू ब्रेनवॉश करुन आपल्याला हवे तसे वागवायला सुरुवात केली होती. इथेही त्यांनी रॉबीच्या मेन्दुतुन जमा केलेली रोबोटिक्सची माहीती वापरून रोबोट्स सूट तयार केले. आणि आपल्या गुलाम माणसांना ते वापरायला भाग पाडून त्यांचा ब्रेनवॉश केला गेला. ही सर्वसामान्य माणसे आता स्वतःला रोबोट समजायला लागली. आम्हाला सुरुवातीला वाटले तसे त्या एलियंसकड़े कुठलीही प्रगत असे तंत्रज्ञान नव्हते. त्यांच्या विश्वात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तसे ते मागासलेलेच होते. पण त्यांच्याकडे एक सहसा कुणाकडे नसणारी अशी अफाट शक्ती होती. ते मनोवेगी होते. कुठल्याही सजीव व्यक्तीच्या, प्राण्याच्या मनावर ताबा मिळवणे त्यांच्यासाठी अगदी सोपे होते. त्याच्या मनात शिरून त्याला आपल्याला हवे तसे वागायला लावणे, ते सुद्धा आपण गुलाम झालो आहोत हे त्याला कळु न देता हा त्यांचा हातखंडा होता. त्याच शक्तीच्या आधाराने असंख्य मानव त्यांची मानसिक गुलामी करत होते.
पण हेरंबला गळ घालून त्यांनी फार मोठी चूक केली होती. जगभरच्या कित्येक बुद्धिमान लोकांच्या मनातील, मेंदूतील माहीती, ज्ञान मिळवून त्यांनी अटलांटिस उभारले खरे. पण त्यांना हेरंबच्या मेंदुची काय भुरळ पडली होती देव जाणे. परंतु आता हेरंब पूर्वीइतका कमजोर राहीलेला नव्हता. त्याची इच्छाशक्ती पूर्वीसुद्धा तितकीच समर्थ होती. त्यात आता माझ्या मानसिक शक्तीच्या साह्याने हेरंबलाही आपल्या मनावर ताबा मिळवणे जमु लागले होते. त्याचा वापर करून सतत वैयक्तिक प्रयोग आणि अभ्यासाच्या साह्याने तो आपली मानसिक शक्ति वाढवत होता. त्याने त्या एलियन्सच्या मनात स्वतःच्या त्यांच्याबद्दलच्या निष्ठेविषयी खात्री निर्माण केली. त्यासाठी आम्ही त्यांना रॉबीच्या रोबोटिक्सचे जुजबी ज्ञान पुरवत होतो. हेरंबने त्यांना अजुनही काही जागा शोधून दिल्या. नव्या अटलांटिससाठी. तो तिथे स्वतःची जागा निर्माण करत होता. त्याचबरोबर उध्वस्त होत चाललेल्या पृथ्वीवर मानवाला राहण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित अश्या वास्तु बाँधण्यासाठी आम्हाला मदत करत होता. त्या लोकांच्या ग्रहावर मिळणाऱ्या एका प्रचंड चुंबकीय शक्ति असणाऱ्या धातुंचे प्रचंड साठे अटलांटिसमध्ये होते. त्याचाच वापर करून त्याने आपली पहिली ‘लिफ्ट’ तयार केली.
****************************************************************************
हासू आणि आसु ….
बोलता बोलता स्वतंत्रा पुन्हा भुतकाळात ओढली गेली…
संध्याकाळी सहाची वेळ असावी. मी नुकतीच घरी परत आले होते. फ्रेश होवून, चेंज करून थोडा वेळ बेडवर निवांत पडले होते. माझ्या बेडरूमच्या शेजारीच आमची स्टडीरूम होती. हेरंब आणि मी बरोबर असलो की तो याच स्टडीत काम करत असायचा. खरे तर मनात प्रचंड कल्लोळ उठले होते. सात-आठ महिन्यापूर्वी जेव्हा हेरंबने व्हाइट हाऊसमध्ये घुसायचे ठरवले तेव्हाच खरेतर चाहूल लागली होती मला. मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट होते. प्रचंड आनंदित होते. नेमके हेरंबला ही गोड बातमी सांगायच्या आधीच त्याने आपला व्हाईट हाऊसमध्ये शिरून अध्यक्षांशी बोलण्याचा हेतु जाहीर केला. त्याच्यामते युद्ध अगदी दारात येवून ठेपले होते तेव्हा. त्यामुळे तेव्हा मी त्याला ही बातमी इतक्यात सांगायची नाही असे ठरवले. त्याचा पाय मागे खेचेल अशी कुठलीही गोष्ट मला करायची नव्हती. मी गप्प राहिले. पण आता त्याला हे सांगायला हवे होते. कारण आठ महीने पूर्ण झालेले होते, कुठल्याही क्षणी बाळ येणार होते. ही गोड़ बातमी त्याला कशी द्यावी. हे कळाल्यावर तो किती आंनदित होइल? की अश्या प्रसंगी आपण स्वतंत्राच्या बरोबर नाही म्हणून दुःखी होइल? असे अनेक विचार मनात चालू होते. तितक्यात….
माझ्या मनात हेरंबचा आवाज उमटला. “तंत्रा, मी आलोय!”
आय वॉज लाईक , आज आनंदी आनंद झाला. कुठे आहेस तू? समोर का येत नाहीयेस?
तितक्यात स्टडीचे दार उघडले आणि आतून हेरंब बाहेर आला. मी शॉक झाले. मघाशीच मी स्टडीत माझी बॅग ठेवली तेव्हा कुणी नव्हते आणि आता हा स्टडीत कसा काय गेला? स्टडीचा दरवाजा माझ्या बेडरूममध्येच आहे. मी इथेच आहे, मग माझी नजर चुकवून हा आत कधी गेला?
अगं बयो, थांब थोड़ी. किती फास्ट विचार करशील? मला थोड़ी उसंत दे तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्याची.
मी स्वताशीच हसले, थोड़ी आनंदितही झाले. आता त्याला इतरांचे मनही वाचता येवू लागले होते. केवढा मोठा पल्ला गाठला होता त्याने. आल्याआल्या त्याने मला कडकड़ून मिठी मारली. आणि रूसण्याच्या आविर्भावात म्हणाला …
“एवढी आनंदाची बातमी माझ्यापासुन का लपवून ठेवलीस?”
“म्हणजे मी सांगायच्या आधीच हेही कळाले तर तुला. श्या, सगळी मजा घालवलीस तू?”
“सॉरी स्वीटहार्ट, आय डिडन्ट मीन टू. पण आज काम करत असताना सहज तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा नकळत तुझ्या मनातली आंदोलने कळाली आणि राहवले नाही. तड़क इथे निघुन आलो.”
काहीतरीच काय हेरंब? मी आत्ता पाच मिनिटापूर्वी प्रथमच हा विचार मनात आणला होता. इतके दिवस मुद्दाम तुझ्यापासुन हे लपवून ठेवले होते. म्हणजे तुला पाच मिनीटापुर्वीच ही बातमी मिळालीय. आणि लगेचच तू तुझ्या त्या अटलांटिसमधून इथे येवून पोचलास? कसे शक्य आहे हे?
एक एक मिनिट, तू माझ्यापासुन आपल्या मनातले विचार लपवण्याचा प्रयत्न करतोयस. अरे शहाण्या, गुरुची विद्या गुरुलाच? थांब जरा.
अगं बयो राहुदे, मी सांगतो स्वतःच. हा आनंद मलाच साजरा करायचाय तुझ्यासमवेत. पण आधी तुझ्या स्टडीत जावुया आपण? त्याचा हात धरून मी स्टडीत शिरले आणि …
तिथे काही वेगळेच दृश्य होते. तिथे माझी स्टडीरूम नव्हतीच. तिथे होती एक पूर्णपणे पोलादी (नंतर मला कळाले की ते पोलाद नसून त्या एलियन्सच्या ग्रहावरील एक निराळाच पण विलक्षण गुणधर्म असणारा धातु होता) खोली होती. एक छोटेसे दार सोडले तर पूर्णपणे बंदिस्त. तिच्या चारी भिंतीवर कसलितरी सर्किट्स कोरलेली होती. कुठल्यातरी तांब्यासारख्या धातुने एम्बोस केल्यासारखी.
वेलकम टू लिबर्टी माय डियर. कुठे जायचे सांग? आयफेल टॉवर की ग्रेट वॉल ऑफ चायना की ताजमहल? तू म्हणशील तिथे दोन सेकंदात घेवून जातो तुला. नाहीतर एक मिनिट थांब. आपल्या येणाऱ्या बाळाला आपल्या देवाच्या दर्शनाला घेवून जावूयात चल.
त्याने भिंतीवरची कुठली तरी कळ दाबली तसे त्या सर्किटसमध्ये हालचाल सुरु झाली. जणुकाही त्यातून ऊर्जेचा प्रवाह वाहू लागला होता. हेरंबने माझा हात हातात घेतला आणि डोळे मिटून घेतले. मी टक्क उघड्या डोळ्यांनी पाहात होते. हळूहळू त्या चारी भिंती विरघळु लागल्या. “घाबरु नकोस, मी आहे.” माझ्या मनात हेरंबच्या आवाजाची स्पंदन घुमत होती. अचानक आम्ही दोघेही विरघळु लागलो. सेकंदभरच आपल्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होत असल्याचा आभास झाला, दुसऱ्याच क्षणी एक शीत लहर त्यात मिसळली आणि कदाचित आम्ही दोघेही विरघळलो. काही सेकंदातच हे सगळे घडले आणि आम्ही परत जैसे थे. खोली तशीच होती. त्यावरची सर्किट्स शांत झालेली होती. किंचित उष्णता मात्र जाणवत होती.
हेरंबने माझा हात हातात घेतला आणि त्या खोलीचे दार उघडून आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यावर तेथील दृश्य बघून मात्र हेरंब मटकन खालीच बसला.
ओह नो, हे माझ्या आधीच लक्षात यायला हवे होते. सगळी पृथ्वीच नष्ट व्हायला झालीय, ही जागा तरी कशी सुरक्षीत राहील?
मी आजुबाजुच्या परिसराचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. काही ओळखीच्या खुणा दिसताहेत का ते शोधत होते. आणि मला ते दिसले . आता ती फ्रेम फुटली होती, पण त्यावरची, हेरंबच्या देवाच्या, सर आईनस्टाइन यांच्या फोटोवरची मी माझ्या हाताने लिहीलेली “with love from Tantra” ही अक्षरे तशीच होती. आम्ही दोघेही मुंबई आय आय टी मधल्या हेरंबच्या आवडत्या ठिकाणी, त्याच्या लाडक्या फिजिक्स लॅबमध्ये उभे होतो. हेरंबसाठी मन्दिरापेक्षाही पवित्र होती ती जागा. तो सुन्न होवून सगळा उध्वस्त परिसर न्याहाळत होता. मी हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. डोळ्यातले पाणी टिपत त्याने मला कडकड़ून मिठी मारली.
“मी त्या पेशी शोधायला नको होत्या तंत्रा. माझ्यामुळे आज सगळे जग विनाशाच्या मार्गाने चाललेय. मी हरलो तंत्रा.” हेरंब ढसाढसा रडायला लागला अक्षरशः.
“वेडा आहेस का तू हेरंब. अरे ते त्यासाठीच आले आहेत इथे. त्यांना त्यांचे जग इथे निर्माण करायचे आहे. उलट तू त्या पेशींचा शोध लावलास म्हणून आज आपल्याला या विनाशाचे कारण माहीती आहे. आपण आता आपले जग पूर्ववत कसे करायचे त्याचा विचार तरी करू शकतोय तो केवळ तुझ्यामुळे. तू सद्ध्या त्यांच्याबरोबर आहेस. त्यांचा विश्वास कमव, त्यांच्या उणीवा त्यांची कमजोरी शोधून काढ. आता तुझे है ट्रांसपोर्टेशन यूनिट, आपण त्याला सहज साधे लिफ्ट म्हणुयात का? आपल्याजवळ आहे. तू आत राहून त्यांची यंत्रणा पोखरुन काढ़. आम्ही इथे बाहेर राहून आपले बळ वाढवतो. त्यांच्याबरोबर लढायचे म्हणजे आपल्याला केवळ शारीरिक आणि तांत्रिकच नव्हे तर मानसिक युद्व सुद्धा लढू शकणारे योद्धे तयार करावे लागणार आहेत. आता रडायचं नाही , लढायचं. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हेरंब, आर या पार आता थांबुन नाही चालणार.” स्वतंत्रा अगदी गंभीरपणे बोलत होती.
“इतकं सोपं नाहीये ते स्वतंत्रा. मी तुला सांगितलं ना. तिथे काम करणारे बहुतांश बॉट्स प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यासारखे जीवंत लोक आहेत. ते बाहेरुन आलेले लोक प्रचंड शक्तिशाली आहेत. त्यांची मानसिक शक्ती जबरदस्त आहे. तिच्या जोरावर तिथे काम करणाऱ्या सर्व माणसांच्या मनाचा ब्रेनवॉश करून, ते मानव नव्हे तर बॉट्स आहेत हा विश्वास निर्माण केलाय त्यांनी. तू तिथल्या माणसांना बघशील तर विश्वास बसणार नाही तुझा इतके ते यांत्रिक वागायला लागले आहेत. आपल्याच माणसांबरोबर कसे क़ाय लढणार आहोत आपण. ज्या मानवजातीला वाचवन्यासाठी आपण हा यलगार करतोय, त्यांच्याच बरोबर लढावे लागणार आहे आपल्याला. माणसांच्या शरीरावर ती त्यांच्या ग्रहावरील धातुने बनवलेली आवरणे (कवच) चढवून ते रोबोट्स असल्याचा फील रादर विश्वास निर्माण केलाय त्यांनी सर्वत्र.”
हे ऐकल्यावर मात्र स्वतंत्राचे डोळे चमकले.
” हेरंब बहुतेक आपण दोघांनी बरोबर राहून काम करावे हेच नियतीच्या मनात आहे. त्यांची ही शक्तिच आपण त्यांच्या विरोधात वापरू. अर्थात आपल्याला वेळ लागेल थोड़ा जास्त, पण तेवढी किंमत द्यावीच लागेल. हेरंब, ठरले तू माझ्यासाठी तिथे काहीतरी जागा तयार कर. अगदी एक सामान्य कामगार म्हणून सुद्धा चालेल.”
“वेडी आहेस का तू? तुझ्या पोटात आपले बाळ आहे. अश्या परिस्थितीत मी तुला डोक्यात टाकणार नाही. आपण काहीतरी दूसरा मार्ग शोधू.”
“हेरंब, अरे बाळाच्या येण्याची वेळ झालेली आहे. कधीही ते या जगात प्रवेश करेल. आपण त्याला रॉबीच्या स्वाधीन करू. रॉबी आणि ल्यूसी त्याला आई-वडिलांसारखे सांभाळतील. तपती वाढतेच आहे ना त्यांच्याबरोबर. तिच्याबरोबरच हे बाळ सुद्धा वाढेल. माझ्या मानसिक शक्तीचा वापर करून आपण त्या ब्रेनवॉश केलेल्या मानवांना त्यांची खरी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करू. तिथेच राहून त्यांचे सामर्थ्य पोखरत राहु. कदाचित आपल्या पिढीत नाहीत नष्ट होणार ते. पण आपली, या शिल्लक मानवजातीची पुढची पीढ़ी आपल्यापेक्षा सामर्थ्यवान करुयात, तीच नष्ट करेल या लोकांना. तीच मानवजातीला आपले सामर्थ्य, आपला सन्मान परत मिळवून देईल.”
“मला हे पटत नाहीये स्वतंत्रा, पण तू जास्त लॉजिकल आहेस. पुढचा विचार डोळ्यासमोर ठेवून आजचे मोह मला टाळावेच लागतील.”
स्वतंत्राने हेरंबला कडकडून मिठी मारली.
************************************************************************
ममा आणि मॉम !
कर्रर्रच्चक कर्रर्रच्चक … ! असा अतिशय कर्कश्श आवाज करत ते ट्रक नावाचे वेहिकल थांबले. आम्ही खाली उत्तरलो. एका प्रचंड मोठ्या पहाड़ासमोर आम्ही उभे होतो. तिथेच एका टेकाङाजवळ तशीच मास्क्स घातलेली काही माणसे उभी होती.
“तुम्ही लोक माणूस असूनही कायम है मास्क्स घालून का वावरता?” माझी उत्कंठा जागी झाली होती परत.
“कारण पृथ्वी प्रचंड प्रदूषित झालीय. भूकंपातुन बाहर आलेले विषारी वायु सर्वत्र पसरलेत. या मास्कशिवाय आम्ही इथे वावरुच शकत नाही आता. ” रॉबीने माझ्या खांद्यावर थोपटत सांगितले आणि तसाच आपला हात त्या टेकाडाकड़े दाखवत म्हणाला…
“ते बघ, कोण आले आहे तुला घ्यायला?”
मी त्या रोखने बघितले. सगळे सारखेच दिसत होते. माझा प्रश्नार्थक चेहरा बघून रॉबी हसला आणि म्हणाला ” चला, आधी आपण सुरक्षीत ठिकाणी जावूयात म्हणजे है मास्क्स काढता येतील.”
टेकड़ापासली माणसे मागे वळली, त्या पहाडाच्या दिशेने चालू लागली. आम्हीही त्यांच्या मागे निघालो. त्यातल्या एकाने मध्येच एका ठिकाणी जमिनीवर बसून जमीन चाचापायला सुरुवात केली. तसे जमिनीत एक छोटेसे चार बाय चारचे दार तयार झाले. एका मागोमाग एक आम्ही सगळे आत शिरलो, खाली उतरायला पायऱ्या होत्या. पायऱ्या संपल्या तिथुन एक लांबलचक कॉरिडोर सुरु होत होता. कॉरिडोरच्या शेवटी एक प्रचंड धातुचे दार होते. आम्ही दारासमोर जावून उभे राहिलो आणि रॉबीने तिथली भिंतीवरची एक कळ दाबली.
थोड्या वेळाने प्रचंड आवाज करत तो दरवाजा उघडला आणि आम्ही आत शिरलो.
” आय नो धिस प्लेस. हा दरवाजा फक्त आतूनच उघडता येतो. कोणी बाहेरुन सख्ती करण्याचा प्रयत्न केला तर आतल्यासकट बाहेरचे सुद्धा एका प्रचंड स्फोटात नष्ट होवून जातील. त्यांची मानसिक गुलामी पत्करण्यापेक्षा सन्मानाने स्वातंत्र्यात मृत्युला सामोरे जाण्याचा हा मानवजातीने स्वीकारलेला मार्ग आहे.”
मी स्वत:शीच बोलत होतो.
“गुड़, तुला हळूहळू सगळे आठवतेय तर!” स्वतंत्रा माझ्या डोक्यावर हलकेच थोपटत म्हणाली.
मी गोंधळलो होतो. दरवाज़ा बंद झाला. आत जणुकाही एक छोटीशी कॉलनीच वसवलेली होती. त्या लोकांनी आपले मास्क काढले. सगळे अनोळखी चेहरे. त्यातला एक चेहरा मात्र का कोण जाणे मला ओळखीचा वाटत होता. स्वतंत्रासारखाच वृद्ध चेहरा, फक्त तिचे केस करडया रंगाचे आणि लहान होते. स्वतंत्राचा चेहरा लालासर तर हिचा पांढरा फटक. मला एकदम आठवले, त्याला गोरा रंग म्हणतात. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मी गोंधळलो.
स्वतंत्राने हलकेच माझ्या खांद्यावर थोपटले. पुढे होवून माझ्या डोक्यावरचे कवच बाजूला केले. हे पहिल्यांदाच घडत होते. गेल्या कित्येक वर्षात ते कवच काढलेले नव्हते. माझे डोळे चमकायला लागले. समोरचे दृश्य धूसर झाले.
“डोंट वरी इतके दिवस त्या कवचाच्या आयस्लॉट्समधून फिल्टर होवून बाहेरचे जग दिसत होते तुला. डोळ्यांचा थेट जगाशी संबंध गेल्या आठ वर्षात प्रथमच येतोय तुझ्या. थोड्या वेळात सवय होइल आणि सगळे क्लियर होइल. ”
“मी त्यासाठी नाही गोंधळलो स्वतंत्रा. मी गोंधळलोय वेगळ्याच कारणासाठी. याचा अर्थ असा होतो की मी, मी यंत्रमानव नाहीये. आय एम नॉट आ बॉट. मी एक सजीव मानव आहे. ”
“यस माय डिअर, यू आर अँज ह्यूमन अँज मी.” हा आवाज समोरून आलेला होता. मघाची ती स्वतंत्रासारखीच वृद्धा आपले दोन्ही बाहु पसरून मला बोलावत होती. मी स्वतंत्राकडे पाहिले. ती हसुन म्हणाली…
“ल्यूसी, रॉबीची बायको, तुझी ममा !”
ल्यूसीने पुढे होवून मला घट्ट मिठी मारली. ती रडत होती. तिची ही कृती मला नवीन होती. पण ती भावना मात्र नवीन नव्हती. असे वाटत होते की मी है यापुर्वीही खुप वेळा अनुभवलेले आहे. तेव्हा आम्ही इथे राहात नव्हतो, तेव्हा शहराचे उध्वस्त सांगाड़े अजुनही राहाण्यासाठी योग्य होते. मास्क्सची गरज पड़त नव्हती. मी खेळताना पडलो होतो आणि डोके फोडून घेतले होते तेव्हा ममा अशीच मला कुशीत घेवून रडली होती. कुणीतरी एक बाई तेव्हा अधुन मधून आम्हाला भेटायला यायची, ती येवून गेली की ममा अशीच मला कुशीत घेवून रडायची. आता लक्षात आले, ती भेटायला येणारी बाई, स्वतंत्रा होती. त्या एका मोठ्या मुलीबरोबर खेळताना मी नेहमी हरायचो आणि ममाच्या कुशीत येवून रडायचो.
अचानक माझाही चेहरा ओला झाला. माझ्या डोळ्यातुन पाणी येवू लागले होते. यस्स, आय वॉज क्रायिंग. मी त्यांच्यासारखाच एक माणूस होतो. जीवंत, भाव-भावना असलेला.
कितीतरी क्षण डोळ्यासमोर रेंगाळत होते. मी स्वतंत्राकडे बघून विचारले, ” ती तूच होतीस ना? आम्हाला अधुन मधून भेटायला येणारी? आणि माझ्याबरोबर खेळणारी, नेहमी खेळात मला हरवणारी ती मुलगी, ती कोण होती, कुठे आहे?”
स्वतंत्राचे, रॉबीचे डोळे पाण्याने भरले होते. रॉबीने एका दिशेने बोट केले. तिथे एक तरुण स्त्री उभी होती. माझ्यापेक्षा तीन-चार वर्षाने मोठीच असेल.
“हैलो लिटल ब्रदर, लावायची का रेस परत?” तिने मिस्कीलपणे विचारले. मी तिच्याकडे पाहातच राहीलो.
“तपती, तुझी मोठी बहिण.”, स्वतंत्रा उद्गारली.
आमची मोठी मुलगी, पण खरं सांगायचे तर मला माझ्या मुलापेक्षाही जास्त जवळची आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त सामर्थ्यशाली, जास्त बुद्धिवान. तुझ्या मेंदूत म्हणजे कंट्रोल यूनिटमध्ये हैकिंग करून प्रवेश करणारी, त्यात आम्हाला हवे तसे बदल करुन तुला पुन्हा आपल्या पूर्वायुष्याची ओळख करुन देणारी खरी लिबर्टी ती आहे. मी तिचे नाव तपती ठेवले होते, पण हेरंब तिला लिबर्टी म्हणायचा. स्वतंत्राची सावली म्हणून लिबर्टी, दोन्हीचा अर्थ एकच.
“ती तुला तुझ्या मुलापेक्षाही जवळची आहे, म्हणजे तुझा मुलगा?? एक, एकेक मिनिट, म्हणजे मी , मी प्रत्यक्षात तुझा आणि हेरंबचा….”
“यस निकी, स्वतंत्रा आणि हेरंब हेच तुझे आईवडिल आहेत.” ममा माझ्या केसातून हात फिरवत हळूवार आवाजात म्हणाली.
“मी फक्त तुला जन्म दिलाय निखिल, तुझी खरी आई झाली ती ल्यूसीच. तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त अधिकार तिचा आहे.” स्वतंत्रा भावूक झाली होती. ममाने पुढे होत स्वतंत्राला कडकडून मिठी मारली. दोघेही मोकळेपणाने रडू लागल्या.
*****************************************************************************
यल्गार …
जेवण झाल्यावर थोड़े आराम करायला म्हणून मी एका बन्द खोलीत येवून पडलो होतो. हा जेवण नावाचा प्रकार सुद्धा विचित्रच. क़ाय तर म्हणे जेवण नाही केले तर माणूस जगूच शकणार नाही. मग इतकी वर्षे आम्ही कसे जीवंत राहिलो होतो? मलातर एकदाही असे काही खाल्याचे आठवत नव्हते.
मला हे सगळेच विचित्र वाटत होते. कदाचित इतकी वर्षे (म्हणजे नेमकी किती कुणास ठाऊक?) यांत्रिक जगात राहून मी ही यंत्राप्रमाणेच कोरडा, कदाचित प्रैक्टिकल झालो होतो. सद्ध्या मला सतावणारा प्रश्न वेगळाच होता. डोक्यात काही वेगळाच् विचार चालू होता.
‘हाच विचार करतोयस ना, की जन्माला आलेल्या नवजात बाळाला आपल्या कर्तव्यासाठी दुसऱ्याकड़े सोपवणारी स्वतंत्रा, आता मात्र अचानक मला वाचवण्यासाठी आपले कर्तव्य, आपले कार्य अर्ध्यावर का आणि कशी सोडून आली?”
अचानक स्वतंत्राचा आवाज माझ्या मनात घुमला. मी विसरलोच होतो.
“तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे माझ्याकडे, पण त्या आधी मी एक प्रश्न विचारु?”
” मला ठाऊक असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन मी , पण तु समोर येवून बोल. माझी जन्मदात्री शेजारी असताना असे मनाच्या पातळीवर बोलणे खुप विचित्र वाटतेय.”
दरवाजा उघडला आणि स्वतंत्रा आत आली. जणु काही वाटच पाहात होती ती.
“मी तुला क़ाय म्हणू? आई, ममा की अजुन काही?”
“तुला जे आवडेल ते. हे सगळे स्वीकारणे इतके सोपे नाही यायची कल्पना आहे मला. तेव्हा तुझी तयारी होईपर्यंत किंवा कायमचे स्वतंत्रा म्हटलेस तरी चालेल. ”
मी नुसताच हळूवारपणे हसलो. ती शेजारी बसत म्हणाली.
” तुला एक सांगू, तू अजुनही तुझ्या मानसिक सामर्थ्याचा पूर्ण उपयोग करत नाहीयेस. वेड्या, तुला क़ाय वाटलं मी तीच लिफ्ट का वापरली वर येण्यासाठी? गर्निमन सेंटरमध्येच सहा लिफ्ट आहेत वर येण्यासाठी. त्यापैकी एक का नाही वापरली आपण माहितीय का?”
“हे मला नवीन आहे. म्हणजे अश्या अजुन लिफ्ट्स आहेत तर. मग आपण वर आल्यावर तू रॉबीला ती लिफ्ट खराब करायला का सांगितलीस? आणि तीच का वापरली आपण? ”
” तुझ्या बाबाने अश्या एकुण सात लिफ्ट तयार केल्या होत्या. सहा त्यांच्यासाठी आणि एक आपल्यासाठी. त्या लिफ्ट्सची कपैसिटी जास्त आहे, खुप प्रचंड आहेत त्या. पण त्या लिफ्टसमध्ये आणि या लिफ्टमध्ये एक मूलभूत फरक आहे. त्या लिफ्ट एका ठराविक ठिकानापासुन दुसऱ्या ठराविक ठिकाणापर्यंतच जावु शकतात. कारण त्या पूर्णपणे मेकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक आहेत. या लिफ्टचे तसे नाही. तुला जर सगळी माहीती असती, तुझी मानसिक शक्ति जर जागृत असती तर कदाचित ती लिफ्ट इथे, या खोलीत सुद्धा उघडली असती. माझी तेवढ़ी ताकद नाहीये. म्हणूनच मी रॉबीला तिथे बोलावून घेतले होते.”
अजुन एक, तुझी जेवणाबद्दलची शंका. त्या लोकांकडे स्वतःची बुद्धी जरी नसली तरी दुसऱ्याची बुद्धी वापरून हवे ते मिळवण्यात ते तरबेज आहेत. काही कंबोडियन शास्त्रज्ञानी काही वर्षापूर्वी मानवी भुकेवर काही औषधी रादर काही टैबलेट्स शोधून काढल्या आहेत. ज्या घेतल्यावर पुढचे आठ दिवस तुम्ही अन्नाशिवाय राहु शकता. तुमचे रेग्युलर सर्विसिंग आठेक दिवसांनीच व्हायचे ना? बादवे आता ते शास्त्रज्ञ जीवंत नाहीयेत, पण त्यांच्या मेंदूतले ज्ञान मात्र अतलांटिसमधल्या सर्वर्समध्ये सुरक्षीत आहे.
मी प्रचंड गोंधळात पडलो होतो. मला अजूनही नीटसे लक्षात येत नाहीये.
तिने एक सुस्कारा सोडला,” ठीक आहे, डोळे मिट आणि तुला आवडतं असलेल्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित कर.
मी डोळे मिटले आणि आश्चर्य म्हणजे डोळ्यासमोर फक्त स्वतंत्राच येत होती.
“वेडा आहेस झालं. चल तुला थोड़े मागे घेवून जाते. जवळ जवळ आठ वर्षे मागे.”
……………………………
डोळ्यासमोर एक प्रकारचा धूसर पड़दा तयार झाला. क्षणभरच. हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागले.
समोर हल्लकल्लोळ माजला होता. शेकडो यंत्रमानव आणि मानव यांच्यात एकच दंगल माजली होती. माणसे संख्येने कमी होती. त्यामुळे हलु7 कमजोर पड़त होती. आणि मला ममा दिसली. तिच्या एका हाताला एक सोळा सतरा वर्षाची मुलगी होती तर दुसऱ्या हातात एका दहा अकरा वर्षाच्या मुलाचा हात घट्ट धरलेला. ती एका टेकडीच्या दिशेने धावत होती, बहुतेक लपण्यासाठी.
पण कसे कोण जाणे काही बॉट्सचे लक्ष त्यांच्याकडे गेले. आणि ते तिच्या आणि मुलांच्या मागे लागले. ममा त्या दोघाना घेवून तिथल्याच एका बंदिस्त शेडमध्ये शिरली. गडबड़ीत तिने त्या मुलीला एका पोलादी खोलीत दडवले आणि दुसऱ्या टोकाच्या एका खोलीत त्या मुलाला. जाता-जाता दोघानाही सांगितले तीने.
“काहीही झाले तरी दार उघडायचे नाही आतून. मी येवून हाक मारीन तेव्हाच उघडायचे , तोवर नाही. समजले?” ती शेडच्या मागच्या दाराने बाहेर पडून टेकडीकडे पळत सुटली आणि ते मूर्ख बॉट्स सुद्धा तिच्या मागे गेले.
इकडे त्या मुलाला आपल्या खोलीच्या भिंतीवर काही डिझाईन्स दिसत होती. त्याच्या ओळखीची डिझाईन्स. तसाच एक डिझाईनाचा तुकडा त्याच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये अडकवलेला होता. अचानक त्याने आपले डोके दोन्ही हाताने घट्ट पकडले. जणु काही प्रचंड वेदना हॉत असाव्यात. काही मिनिटातच तो शांत झाला.
त्याने आपल्या गळ्यातले लॉकेट काढले आणि त्यातला तो टुकड़ा काढून तिथल्या भिंती तपासू लागला. अपेक्षेनुसार एका ठिकाणी भिंतीवरील डिझाइन भंगलेले होते. त्याच्या हातातला टुकड़ा त्या ठिकाणी त्याने बसवला आणि डोळे मिटून ताकद एकवटायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्यासकट ती खोली विरघळायला लागली. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले आणि कुठल्याश्या अंतःप्रेरणेने खोलीचे दार उघडून बाहेर पडला.
परमेश्वरा, समोरचे दृश्य एकदम वेगळे होते. इथे उंचचऊंच इमारती होत्या आणि समोर कितीतरी यंत्रमानव उभे होते. तो लहान मुलगा बावरला. त्याला पाहातच ते यंत्रमानव त्यांच्याकडे झेपावले. तितक्यात त्या गर्दीतून एक माणूस पुढें झेपावला आणि त्या यंत्रमानवांशी झुंजतच त्याने त्या मुलाला उचलले आणि एका दिशेने धावत सुटला. सगळे यंत्रमानव त्याच्या मागे धावत सुटले.”
आणि मी अचानक परत सध्याच्या काळात परत आलो.
****************************************
” अगं मला पुढे क़ाय झालं ते पाहायचं होतं. मध्येच का थांबवलेस ?” मी स्वतंत्राला विचारले.
“ती मुलगी म्हणजे तपती होती, तो लहान मुलगा तू होतास. तो गोंधळ ओसरल्यावर ल्यूसीला तपती जिथे सोडले होते तिथेच सापडली, पण तू मात्र गायब झाला होतास. दुर्दैवाने ज्या खोलीत ल्यूसीने तुला सोडले ती हेरंबची एक इथल्या लोकांना खाली जाण्यासाठी तयार केलेली लिफ्ट होती. जी आपण परवा वापरली ती नव्हे, ती वेगळीच आहे. अर्थात या लिफ्ट्स इथे फक्त मी किंवा हेरंबच ऑपरेट करू शकतो. आय मीन करू शकायचो. आता मी एकटीच आणि तू एक.”
जी लिफ्ट आपण वापरली ती इतर लिफ्ट्सपेक्षा वेगळी आहे. इतर लिफ्ट्स फक्त मेकेनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक लिफ्ट्स आहेत. तर ही लिफ्ट चुंबकीय क्षेत्र निर्माण करून त्यासह आपली मानसिक शक्ती वापरून त्या ऊर्जेवर चालते. या लिफ्टबद्दल त्यांना अजुनही काही कल्पना नाहीये. अश्या दोन लिफ्ट्स हेरंबने तयार केल्या होत्या.
एक ती, जी तू वयाच्या अकरावया वर्षी ऑपरेट केलीस. आम्ही दोघांनीही कधी कल्पनाही केली नव्हती की ती लिफ्ट आमच्याशिवाय कोणी ऑपरेट करू शकेल? त्यामुळेच जेव्हा ती लिफ्ट तिथे पाहिली तेव्हा हेरंब आधी गोंधळला. पण त्याच्या कुशाग्र बुद्धीने लगेच सगळे धागे जोडून तुला ओळखले. त्या क्षणी त्या यंत्रमानवांपासून तुला वाचवण्यासाठी जे शक्य होते ते त्याने केले. पण …
त्या लढाईत त्याचा मात्र बळी गेला. ते एलियन्स हुशार आहेत त्यांनी तुझ्याशी असलेले हेरंबचे नाते शोधून काढले. त्याच्या दगाबाजीची एक अतिशय भयानक शिक्षा हेरंबला त्याच्या मृत्युनंतत सुनावण्यात आली. ती म्हणजे त्याच्या बुद्धिवान लेकाचा ब्रेनवॉश करून त्याला एक सामान्य गुलाम बॉट बनवण्यात आले.
“तो माझा बाप होता?” माझे डोळे नकळत ओले झाले होते.
स्वतंत्रा आपल्याच तन्द्रीत बोलत होती. मृत्युपूर्वी त्याने तुझ्या अटलांटिसमधील आगमनाची बातमी माझ्यापर्यंत पोचवली. त्याचक्षणी मी निर्णय घेतला आणि रॉबीला कळवले की आता तशीच इमरजेंसी असल्याशिवाय मी परत वर येणार नाही. कारण आता माझे काम डबल झाले होते. एकीकड़े तिथे आपली शक्ती वाढवत राहायची, दुसरीकडे तुला प्रोटेक्ट करत हळूहळू तुझ्या शक्तीची जाणीव करुन द्यायची. तू हेरंबची कुशाग्र बुद्धी आणि माझी मानसिक क्षमता दोन्ही घेवून जन्माला आला आहेस. या लढ़यासाठी मानवजातीला तुझी अतोनात गरज आहे. मी क़ाय किंवा रॉबी क़ाय, आता आम्ही म्हातारे झालो आहोत. कधी खेळ संपेल आमचा देव जाणे…
इथुन पुढे या अंतिम युद्धाची जबाबदारी तुम्ही तरुण पिढीने घ्यायची आहे. गेल्या आठ दहा वर्षात मानवांच्या खुप गुप्त संघटना निर्माण झाल्या आहेत इथे. तुझी मोठी बहिण तपती त्यांच्या संपर्कात आहे.
गेल्या आठ-दहा वर्षात आम्ही अटलांटिस देखील बऱ्यापैकी पोखरलेय. तिथल्या पन्नास टक्के बॉट्सना हळूहळू त्यांच्या मानव असण्याची जाणीव करून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. बहुतेक थोड्याशा यशाने बेसावध होण्याची, अहंकारी बनण्याची मानवी सवय त्या एलियन्सनाही लागलेली आहे. त्यामुळे आजकाल ते झेड 10 सारख्या चाकरांवर विश्वास ठेवून निर्धास्त असतात. माझा परतीचा मार्ग आता बंद झालाय. पण आता आपण एकटे नाही आहोत. अगदी आपल्याईतकी नसली तरी बर्यापैकी मानसिक क्षमता बाळगुन असलेले आपले बरेचसे सहकारी आता तिथे आपले कार्य करताहेत. आपली शक्ती वाढ़वताहेत.
एकदा तुझी मानसिंक क्षमता पूर्णपणे जागृत झाली की …….
बोलता बोलता स्वतंत्राचे निकीकडे लक्ष गेले. तो ताड़दिशी उठून उभा राहिला होता.
“ओके मॉम ! आय अंडरस्टूड. बरीच कामे आहेत. तपतीला भेटून बाकी संघटनांशी संपर्क वाढवायला लागेल. त्यांचे बलाबल, शस्त्रसामर्थ्य जोखावे लागेल. आपल्याकडे इथे कितपत तयारी आहे ते पाहावे लागेल. महत्वाचे म्हणजे अश्या अजुन कितीतरी लिफ्ट्स बनवाव्या लागतील. ते जमेल मला. बहुतेक जाताना बाबा त्याचे ज्ञान वारश्यात देवून गेलाय मला. पण आता आपल्याला जास्ती माणसे वाहू शकतील अश्या मोठ्या क्षमतेच्या लिफ्ट बनवाव्या लागतील. माझ्या डोक्यात काही नवीन शस्त्रांच्या कल्पना आहेत. सर्वात प्रथम म्हणजे त्या एलियन्सच्या मानसिक शक्तीची तोड़ शोधावी लागेल. बरीच कामे पेंडिंग आहेत मॉम.
तू, बाबा, रॉबीअंकल … आणि तिथे अटलांटिसमध्ये जीव तळहातावर घेवून काम करणारे आपले हजारो बांधव. तुम्ही ही रणभुमी तयार केली आहे आमच्यासाठी. आता आपली क्षमता तपासून घेण्याची वेळ आलेली आहे. “
तपती…, तपती …, आपल्याच तन्द्रीत बडबडत निकी तपतीच्या शोधात, तिला हाका मारत बाहेर पडला. बाहेर जाता जाता दारातून आत येणाऱ्या रॉबीला जवळजवळ धडकलाच होता तो.
“सॉरी रॉबी अंकल, माझे लक्ष नव्हते. थोड़ा घाईत आहे. भेटुयात थोड्या वेळात. बरंच काही बोलायचं आहे. आलोच जरा ममा आणि तपतीला भेटून.”
आणि तड़क निकी बाहेर निघुन गेला. रॉबीने पटकन आत येवून स्वतंत्राचा हात धरला आणि तिला दारापाशी घेवून आला. भराभर मोठी मोठी पावले टाकत चाललेल्या निकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बोट दाखवत म्हणाला. “काही आठवतेय?”
स्वतंत्रा गेल्या कित्येक वर्षात प्रथमच अगदी मनापासून प्रसन्नपणे हासली. पाठमोरा निकी, त्याचे ते ढांगा टाकत भरभर चालणे… जणुकाही हेरंबच परत आला होता.
“तो हळूहळू पूर्ववत होतोय रॉबी. त्याच्या शक्ती एकवटताहेत. तू पाहिलेस, ऐकलेस…? तो मला मॉम म्हणायला लागलाय, तुला रॉबी अंकल म्हणाला. मला क़ाय म्हणाला माहितीय? म्हणाला , ” तू, बाबा, अंकल तुम्ही रणभूमी तयार केली आहेत. आता आमची पाळी आहे. गेट रेडी रॉबी ! आता लवकरच यलगार होणार. लवकरच रणभेरी दुमदुमणार. अखंड मानवजातीच्या स्वातंत्र्याची पहाट आता जवळच आहे रॉबी.”
“बस्स, आता फक्त रणभेरी दुमदुमण्याची वाट पाहायची. आता फक्त युद्धाचा यलगार करायचाच क़ाय तो बाकी आहे. हेरंब, माय डिअर, वी आर ऑलमोस्ट देअर. तुझी इतक्या वर्षाची मेहनत, तुझे बलिदान सार्थकी लागण्याची वेळ आली आहे. ”
स्वतंत्राच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला रॉबी प्रसन्नपणे हासत होता.
Every day has to down and every night is supposed to end with a dawn, this is the ultimate truth. You just need to wait for that moment and keep fighting. …..
समाप्त
विशाल विजय कुलकर्णी, पनवेल. 09967664919
apratim , …. out of the world! cinemachya kathela shobhel!
LikeLike
धन्यवाद मित्रा 💐
LikeLike