फेजेस…

एक फेज होती जेव्हा भरमसाठ सुचायचं. इतकं की वाचणाऱ्याला अजीर्ण व्हावं. मला आठवतेय कुणा दिडशहाण्यानी तेव्हा माबोवर एक धागाही काढला होता किती लिहीतात. क्वांटिटी नको, क्वालिटी हवी वगैरे त्रागा करत. (अर्थात तेव्हा त्यात सी. एल. आणि कौतुकसारख्या खरोखर उत्कृष्ट लिहिणाऱ्याना सुद्धा गोवल्यामुळे एकंदरितच त्या धाग्याच्या कार्यकारण भावाबद्दल शंका निर्माण झाली होती तो मुद्दा वेगळा) असो, विषय तो नाही. विषय असा की ती सुद्धा एक फेज होती. प्रचंड काही सुचायचं , मग ते खरडून माबो किंवा मिपावर टाकलं जायचं. कदाचित लोकांना आवडायचही म्हणून लिहीलं जात असावं. 

त्यातल्या बऱ्याचश्या कविता आज वाचल्या की अगदी माझे मलाच हसू येते की आपण ही असलं काही-काही लिहीलेलं आहे तेव्हा. पण ती सुद्धा एक फेज होती. आपल्याला लिहीता येतय, लोकांना आवडतंय ही जाणिवच खुप हवीहवीशी वाटणारी होती. तेव्हाही दोन्ही प्रकारचे लोक होतेच. टिपी करण्यासाठी येणारेही आणि खरोखर कवितेबद्दल आस्था आणि ज्ञान दोन्ही असणारेही. जे खरोखर प्रामाणिक होते त्यांनी काढलेल्या चुकातुन शिकत गेलो. सुधारणा करत गेलो. जे फालतूपणा करणारे होते त्यांच्याशी (खरतर खुपदा प्रामाणिक प्रतिसादकांशीसुध्दा) बिनधास्त नडलो सुध्दा. भांडलो, कधी स्वतसाठी, कधी इतरांसाठी. पण त्यातून शिकत गेलो.

मग कधीतरी ती फेजसुद्धा आली की काहीही सुचणेच बंद झाले. पाटी कोरी झाल्याचा अतिशय त्रासदायक असा अनुभव होता तो. इतर मित्र अतिशय सुंदर लिहीत असताना आपल्याला दोन ओळी सुद्धा सुचू नयेत? या विचाराने प्रचंड फ्रस्ट्रेशन यायचं. मेंदू जणु काही फॉर्मेट केला होता कुणीतरी. वाइट फेज होती ती. पण तेव्हाही माबावरचे काही सुहॄद कायम सोबत होते. एका जवळच्या मित्राने सुचवले की “असे समज, संगणकात वायरस शिरला होता, तो पसरू नये म्हणून संगणकाच्या ड्राइव्हस फॉर्मेट मारून क्लीन केल्या आहेत. आता पाटी कोरी झालीये मनाची. आता तिच्यावर काहीतरी चांगलं, छान असं लिहुयात…..

मग पुन्हा वाचायला लागलो. ना.घ., इंदिराबाई, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, आरतीप्रभु, नाधो, शांताबाई, रॉय, कोलटकर, भट साहेब यांच्या बरोबरच क्रांतिताई, बेफि, कैलासदादा, सीएल, वैभवदा, शाम यांनाही वाचत राहीलो. त्याच दरम्यान डेक्कन ओल्ड बुक्सच्या समीर कलारकोपची ओळख झाली. त्याच्याकडे जुन्या पुस्तकात टेनीसन, शेक्सपियर, शेले, गटे मिळून गेले अलगद आणि खजिनाच उघडला समोर. फेसबुक होतेच, त्यामुळे शुभानन, नंदुभैया,  ममताताई, दराडेमास्तर, वैवकु, विनायक, सुशांतसारख्या दर्दी लोकांचे लेखन वाचले जात होते. 

त्या फेजमध्येच कधीतरी पुन्हा अंकुर फुटायला लागले. याच दरम्यान कैलासदादा आणि क्रान्तिताईनी गज़लची ओळख करून दिली. उम्या, कौत्यासारखे जिवलग लयीचं भान करुन द्यायला कायम सोबत होतेच. हा प्रवास विलक्षण सुखावह होता, आहे. आजही काही फार चांगलं लिहायला येतय अशातला भाग नाहीये, पण आज चांगलं वाइट कळायला लागलय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या लिखाणावरचे प्रेम मर्यादेत राहून कवितेवरचे प्रेम वाढत चाललेय. त्यात विशल्या व्यास, मंदारदा, अशोककाका सारखे रसिक जोडीला आहेत. ज्यांच्यामुळे प्रस्थापित कविंच्या पलीकडे जावून काही अनवट वाटेवरच्या कविंबद्दल कळत गेले, वाचनाच्या कक्षा रूंदावत जाताहेत. आता पहिल्यासारखे लेखन नाही होत. अगदी ३०% ही नाही होत. पण आता त्याची खंत वाटत नाही. उलट आता नवीन काही चांगले वाचायला मिळाले की अजुन छान वाटते. त्या फेजमधल्या नकारात्मकतेकड़ून या सकारात्मकतेकड़े होत गेलेला हा प्रवास खुप काही शिकवतोय. मजा येतेय. 

शेवटी गोल अचिव्ह करण्यापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास जास्त रोमांचकारी असतो म्हणतात. त्यामुळे आता तिथे पोहोचण्यापेक्षा, तिथे पोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा कैफ अनुभवण्यातच जास्त मजा येतेय. म्हणून स्वतःच स्वतःला म्हणून घेतोय…

शुभास्ते पंथानु ! येताय बरोबर ?

© विशाल कुलकर्णी

3 thoughts on “फेजेस…”

  1. सुमारे दोनेक वर्षांनंतर एक मराठीत कविता सुचली अचानक. फेजेस… नाहीतर कवी होतो असं म्हणायची मानसिक तयारी झाली होती.
    तुझा बहुअंगी ब्लॉग पाहून छान वाटलं.

    Like

यावर आपले मत नोंदवा