दोस्तकंपनी…

काल परवा कौतुकच्या एका पोस्टवर उदयने गुलबकावली म्हणजे काय रे बाबा? असा प्रश्न विचारला. त्या पोस्टवर कल्ला करताना आपोआप जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहीले. आमच्या लहानपणी नशिबाने आणि परिस्थितीने काही बाबतीत फार मोठे उपकार करून ठेवलेले आहेत. मी अगदी नववी दहावीत येईपर्यंत घरी टिव्ही नव्हता. संगणकाबद्दल ऐकलेही नव्हते. मोबाईल तर अजून यायचे होते. त्यामुळे शाळेव्यतिरीक्त भरपूर मोकळा वेळ हाती असायचा. (शाळेव्यतिरिक्त म्हटलेय, अभ्यासाचा उल्लेख केलेला नाही. कारण जसे ऑफिसचे काम घरी आणायचे नाही असा दंडक आज पाळतो, तसेच तेव्हाही शाळेतले काम घरी आणायचे नाही हे सुद्धा पाळायचो 😛 ) 

मग भरपूर खेळणे. यात अगदी जिभल्यापाणी (कुणाला माहिती तरी आहे की नाही हा खेळ आज देव जाणे) पासून ते सुरपाट्या, सुरपारंब्या आणि खोखो पासून ते मिळेल ते फळकुट उचलून सायकलच्या मागच्या चाकाचा स्टंपसारखा वापर करून खेळलेल्या क्रिकेट पर्यंत. 

(फोटो आंतरजालावरून साभार)

सुदैवाने आमच्या घरात एक व्यसन अगदी परंपरागत पद्धतीने, वारसा हक्काने आणि अगदी कर्तव्यभावनेने सुद्धा चालत आलेले आहे, ते म्हणजे वाचन. अण्णांची नोकरी पोलीस खात्यातली. त्यामुळे सतत बदल्या व्हायच्या. प्रत्येक वेळी नवीन गावी गेलो की आम्ही रेशन दुकानाच्या आधी गावातली वाचनालये शोधायचो. कुर्डुवाडीचे नगर वाचनालय, दौंडमधले ललित वाचनालय, सोलापुरातली सोनी वाचनालय, संतसेवा वाचनालय, टिळक स्मारक मधले एच.एन. वाचनालय, कळव्यातले जवाहर वाचनालय, सीबीडी बेलापुरचे नगर वाचनालय, खारघरचे शिवमंदिराजवळचे मनीषानगर वाचनालय ही आमची पवित्र तीर्थक्षेत्रे बनली होती. 
प्रत्येक ठिकाणी काही नवीन व्यसनें लागत गेलेली. उदा. कुर्डूवाडीच्या नगर वाचनालयाने हान्स अँडरसन नावाच्या जादूगाराची ओळख करून दिली. गलिव्हर, पिनाकियो, एलिस, डॉन क्विक्झॉट, फँटम, टारझन या परदेशी मित्रांबरोबरच गोट्या, फाफे, सुमी, फेलुदा हे देशी मित्र इथेच भेटले. कथासरित्सागर, पंचतंत्र, इसाप, अरेबियन नाईट्सच्या सुरसकथा, सिंदबादचे अफलातून सागरी जग इथेच भेटले.
दौंडच्या ललित वाचनालयाने सुशि नावाच्या अवलीयाची भेट घालून दिली आणि आम्ही सुशिंच्या प्रेमातच पडलो. तेव्हा सुशिंच्या बरोबर शरदचंद्र वाळींबे, हेमं कर्णिक, सुभाष शहा यांसारखी इतरही मंडळी होतीच पण आम्ही मात्र सुशिंशी एकनिष्ठ होतो. नंतर तिथे हिंदी पॉकेटबुक्स ही मिळताहेत म्हटल्यावर वेदप्रकाश शर्मा, मेजर बलवंत, रानु, गुलशन नंदा, सुरेंद्र मोहन भारती, केशव पंडित अशी नावे यादीत जोडली जात राहिली. सोलापूरला आलो आणि मग तर खजिनाच सापडला…
एच.एन. वाचनालयाने, सोनी , संतसेवा वाचनालयाने जी. ए., प्रना, पुलदे, वपु, कानेटकर, देसाई, पठारे, पुरंदरे अशा अनेक दिग्गजांची ओळख करून दिली. जसजसे वय वाढत गेले तसे आवडी बदलायला लागल्या होत्या. फँटसी, फिक्शन, गुप्तहेरकथा यातून बाहेर पडून मन समीक्षा, ललित, सामाजिक , कविता अशा वेगवेगळ्या साहित्यात रंगायला लागले. कुठल्यातरी बेसावध क्षणी आपल्यालाही लिहायला जमतंय हे लक्षात आलं आणि लिहायला सुरुवात झाली. मग आपण लिहायचं म्हटल्यावर लिहिताना संदर्भ किती महत्वाचे असतात याची जाणीव झाली आणि मग वाचनाचा परीघ आणि आवाका अजूनच रुंदावला.
गेल्या सात आठ वर्षात सुदैवाने अशोकाकाका, मंदार काळे, प्रसन्नदा, निपो, विशल्या, प्रसाददाद्या, कैलासदादा, क्रान्तिताई , आरती, हर्षद, इन्ना यांच्यासारखी पुस्तकवेडी मित्रमंडळी आयुष्यात आली आणि वाचनातली रंगत अजून वाढत गेली. आज घरी (इथे आणि सोलापूरी मिळून) किमान दिडेक हजार पुस्तके आरामात निघतील. पण लहानपणी वेगवेगळ्या ठिकाणच्या या वेगवेगळ्या वाचनालयांनी केलेले (आजही होत असलेले) अमाप उपकार कसे विसरता येतील? 
आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत, विवंचना आहेत. पण नो प्रॉब्लेम. आपले दोस्तलोक, कुटुंबीय आणि हो…

” पुस्तके आहेत ना बरोबर !”
“वाचेल तो वाचेलच !” 
© विशाल विजय कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s