दाद्या..

​दाद्या …
विशल्या, कोण आहे बे ती?

कोण बे? आणि ‘ती’? 

अबे ती, स्वीटी बरोबर असते ती ! आजकाल जरा जादाच घुटमळतेय….

त्या ‘ती’ मुळे मी थोडा चमकलोच होतो. कारण दाद्याला माझ्या ओळखीतल्या बहुतेक सगळ्या ‘ती’ माहीत होत्या. तश्या त्या सगळ्यांनाच माहीत असाव्यात. कारण त्यावेळी इंजिनिअरिंग डिप्लोमाला असूनही अभ्यास सोडून इतर सर्व उद्योग आम्ही (म्हणजे अस्मादिक) करायचो. अभाविप, TSVP, विवेकानंद केंद्र, ज्ञान प्रबोधिनी अशा विविध उद्योगात आमची स्वयंसेवकगीरी चालू असायची. त्या जोडीला नुकतीच शिकलेली दाभोलकरांच्या शैलीतली वाटरप्रूफ इंकमधली ग्रीटिंग्स, कविता हा आमचा यूएसपी होता. त्यामुळे बऱ्याच ‘ती’ अवतीभवती असायच्या. पण त्यावेळी आमचा खिसा कायम रिकामा, त्यामुळे आम्ही कायम अशा ‘ती’ मंडळीपासून एक सुरक्षित अंतर राखून असायचो. तसेही इतर इतकी (वर सांगितलेली केंद्र , अभाविप वगैरे) लफडी गळ्यात होती की ‘ती’ नावाचं नवीन प्रकरण गळ्यात घ्यायला वेळच नव्हता. पण आपली अनास्था उघड करण्याइतपत बावळटही नव्हतो त्यामुळे अशा काही ‘ती’ असायच्याच अवतीभोवती. पण माझ्या सगळ्या आवडी निवडी दाद्याला माहीत होत्या. त्यामुळे जेव्हा त्याने हा प्रश्न विचारला तेव्हा चमकलोच. असोच. मुद्दा तो नाही, मुद्दा दाद्याचा आहे. मुद्दा तो कायम माझ्यावर, माझ्या उपद्व्यापावर लक्ष ठेवून असायचा हा आहे. 

दाद्या म्हणजे माझा जीवश्च कंठश्च मित्र श्रीपाद कोर्टीकर ! आमची ओळखही अशीच अफलातून पद्धतीने झालेली. फर्स्ट इयरला सगळ्या स्ट्रीम्सना वर्कशॉप कॉमन असतं. असेच एकदा स्मिथीच्या वर्कशॉपला कानशीने जॉब घासत असताना कोणीतरी विचारलं, SESP चा लॉंगफॉर्म काय बे?(हे आमचं कॉलेज) मी काही बोलायच्या आतच मागून कुणीतरी खुसफुसलं, ” SXX Education Society’s Polytechnic” ( Actually it’s Solapur Education Society’s Polytechnic) 
मी गरकन मागे वळून बघीतलं. एक गोरं गोमटं, कुरळ्या केसांचं, गोबऱ्या गालाचं, गुटगुटीत बालक स्पर्धेतील वाटावं असं बालक मिस्कीलपणे आमच्याकडे पाहात होतं. (नंतर कळलं की कुठल्याही मध्यमवर्गीय घरातील निरागस वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात लैच आगाऊ, डेंजरस असणाऱ्या बालकाप्रमाणे हे बालक सुद्धा लै डेंजरस होतं).

मी विचारलं, कुठला रे ?

उत्तर आलं… पंढरपूर ! अस्सल पंढरपुरी लोकांप्रमाणेच त्यातल्या ‘ढ’ वर दिलेला स्पेशल जोर तेव्हासुद्धा जाणवला होता. मी ही नकळत बोलून गेलो, “गोत्र जुळतंय बे आपलं.” गोत्र तर जुळत होतंच पण त्या क्षणापासून या माणसाशी जे अतूट मैत्र जुळून गेलं ते आजतागायत कायम आहे. माझ्यापेक्षा थोडासाच मोठा आहे तो, पण त्यामुळे कधीतरी मी त्याला दाद्या म्हणायला लागलो, पुढे सगळेच त्याला दाद्या म्हणायला लागले. ( पुढे कधीतरी जिच्यावर त्याचा क्रश होता त्या मुलीने सुद्धा त्याला दाद्या म्हणायला सुरुवात केल्यावर त्याच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या खास पंढरपुरी शिव्या मी मनापासून ऐकल्या होत्या)

तसा दाद्या एकदम सरळमार्गी माणूस (म्हणजे माझ्यासारखा, जिलेबीइतका सरळ). या माणसाची दोन रूपे आहेत, दोन्हीही तितकीच सच्ची, तितकीच खरी. कारण कुठला अभिनिवेश घेऊन खोटं खोटं वागणं त्याला जमत नाही. तसा तो अगदी स्वीट ममाज बॉय आहे. आपल्या आईवर, वडिलांवर, बहिणीवर (हे एक अजून लै भारी आख्यान आहे. बबडी, म्हणजे दाद्याची छोटी बहीण आणि अर्थातच त्यामुळे माझीही. पण दाद्यापेक्षा माझं नातं या ध्यानाशी जास्त जुळलं. पण आमच्या या दिव्य बहिणाबाईबद्दल नंतर कधीतरी. तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे) . पुढे नकळत मी कॉर्टिकरांच्या घराचा एक हिस्साच बनून गेलो होतो. अर्थात त्याला दाद्या किंवा बबडीपेक्षा दाद्याच्या आईने, आमच्या कोर्टिकरकाकूंनी लावलेला जीव, माया जास्त कारणीभूत होती.

तर आपण दाद्याबद्दल बोलत होतो. अतिशय स्वच्छ मनाचा पण कमालीच्या फाटक्या तोंडाचा असा माझा हा मित्र. आडनावातल्या K मुळे परीक्षेला कायम जवळपासच नंबर असायचा त्याचा , त्यामुळे एकमेकांच्या पुरवण्या इकडे तिकडे सरकावणे हा आवडीचा धंदा असे आमचा. सगळ्या क्लासमध्ये दाद्या सज्जन म्हणून फेमस. (वास्तव कटू असतं याची जाणीव तेवढी आम्हा काही जवळच्या मित्रांनाच होती हो.) 😛

 दोस्ती म्हटले की एकमेकांच्या नावाची वाट लावणे आलेच. माझ्या नावाचे तर विशा, विशल्या, कुलकरण्या असे अनेक अपभ्रंश प्रचलित होते. पण माझ्या नावाचा अपभ्रंश करताना सुद्धा विशा, विशल्या असे काही न करता ‘विशलु’ असा गोड  करणारा दाद्या एकटाच. तसं मित्रमंडळ खूप मोठं होतं आमचं. पण त्यातल्या त्यात दाद्या, मंदार, राजा, संजू, अशोक, योजना, वैशाली , पाटल्या, निखु, इरफान, श्रीनिवास ( श्री हे माझ्या आयुष्यातील अजून एक देखणं आणि जवळचं नातं, त्याबद्दलही कधीतरी सवडीने लिहिनच) हे जरा जास्त जवळचे. त्यातही दाद्या जास्त काळ बरोबर होता.  कॉलेज संपल्यावर बेरोजगारीच्या काळात शिवसेनेने चालू केलेल्या बेकारभत्ता योजने अंतर्गत 300 रुपये महिना या पगारावर तहसीलदार ऑफिससाठी काम करण्यापासून ते दैनिक सकाळचा वाचक संपर्क प्रतिनिधी म्हणून काम करण्यापर्यंत आम्ही एकत्र होतो. 😉  गंमत म्हणजे आमच्या दोघाकडे सायकलही एकाच रंगाची, एकाच मॉडेलची. लाल रंगाच्या आमच्या वीस इंची  हरक्युलीस कॅप्टन्स फिरवत आम्ही सगळ्या सोलापुरात भटकलोय. त्यांच्या पाटबंधारे वसाहतीत कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला की निवेदनाची जबाबदारी माझी असे,  मी तिथे राहत नव्हतो. पण दाद्याचा मित्र या नात्याने सगळ्या कॉलनीशीच गोत्र आणि मैत्र जुळलेले.

कुठेही जायचे झाले की आम्ही एकत्र असणार. श्री, मी, दाद्या, मंदार, इरफान , नित्या…. मस्त दिवस होते ते. मंदारच्या किंवा श्रीच्या रूमवर अभ्यासाच्या नावाखाली घातलेला गोंधळ आजही स्मरणात आहे. पुढे डिप्लोमा पूर्ण झाल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. दाद्या आमच्याच कॉलेजात आधी लॅब असिस्टंट म्हणून जॉईन झाला आणि नंतर आता एडमिनिस्ट्रेशनला फिक्स झालाय. खरेतर आता पूर्वीसारखा संपर्क नाही राहिला. पण त्यामुळे नाती थोडीच तुटतात हो? अनेक प्रसंग आहेत ज्यामुळे दाद्या आठवत राहतो अधून मधून. मला खात्री आहे ते त्यालाही आठवत असणारेत. 
सायकल चालवता चालवता अचानक ‘विशलु , एक सांगू ? तुला लांबसडक केस असलेल्या मुली जास्त आवडतात ना? ‘ म्हणून माझी फिरकी घेणारा दाद्या. पैश्याअभावी मी ट्रीपला येणार नाही हे कळल्यावर ,’मी देतो की बे?’ म्हणणारा दाद्या, कँटीनकट्टयांसाठी कायम आमची बँक असणारा दाद्या… आणि सगळयात महत्वाचे म्हणजे आमचे उपद्व्याप (लष्कराच्या भाकरी) वाढल्यावर ‘ हं, बास झालं आता, आता अभ्यासाला लागा’ म्हणून कानउघाडणी करणारा दाद्या. एखाद्या पोरीमागे फिरताना आपला संबंध नसतानाही कित्येक किलोमीटर सायकल मारत आमच्याबरोबर फिरणारा दाद्या….

नाही, आज काही वाढदिवस वगैरे नाहीये त्याचा. पण आज उगीचच वाटलं की लिहावं दाद्यावर, मग लिहिलं. काही नाती इथे बनतात, काही सटवाईने कपाळावर नोंदलेली असतात. आयुष्याच्या प्रवासात काही नाती आवडीचे थांबे बनून येतात तर काही आयुष्यभर सावलीसारखी सोबत राहतात. आमचं नातं हे असंच कायम सोबत राहो हिच प्रभूंचरणी प्रार्थना !

© विशाल विजय कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s