काल एका मित्राशी बोलताना सहज म्हणालो की यार ६८ वर्षे पूर्ण होताहेत भारतीय प्रजासत्ताकाला. तर तो हसायला लागला, म्हणाला
“तुम्ही लेको भ्रमातच जगा आयुष्यभर.”
कसलं आलय बोडक्याचं स्वातंत्र्य आणि डोंबलाचं प्रजासत्ताक? सगळ्या समस्या निरक्षरता, गरीबी, अनारोग्य, प्रदूषण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, हिंसाचार, सगळं तर तसेच आहे मग कसलं रे तुमचं प्रजासत्ताक?
वाईट वाटलं, कारण त्याचं म्हणणं अगदीच खोटंही नव्हतं. पण याचा अर्थ हजारो, लाखो लोकांची बलिदाने खोटी आहेत का? साबरमतीच्या वृद्ध बापूचं मीठाचा सत्याग्रह करणं कालबाह्य झालंय का? स्वातंत्र्यवीरांनी भोगलेलं काळेपाणी खोटं होतं कां? लाल, बाल, पालादी नेत्यांनी घेतलेले कष्ट फुकटच होते का?
हैदराबाद, गोवा मुक्ती संग्राम विसरलो आपण ?, बहुजनांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे आयुष्य व्यर्थच आहे का? समाजातील चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध आयुष्यभर झगडलेल्या डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थच आहे का? आदरणीय आमटे कुटुंबीयांनी चालवलेला सेवेचा यज्ञ काय सांगतो? ६१, ७१, कारगिल विसरलो का आपण? मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभर एकवटलेले जनमत, २००६ च्या हाय टाईडच्या वेळी गरीब श्रीमंत, जात पात सगळे विसरून एकमेकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा भिडवून नेटाने उभे राहिलेला, लातूर, भूजचे भूकंप असोत, त्सुनामीची आपत्ती असो, बिहार, आसाम मध्ये येणारे पूर असोत प्रत्येक वेळी आपल्या बांधवांच्या मदतीसाठी एक दिलाने एकवटणारा समाज म्हणजे दुसरं काय असतं?
प्रगती, विकास, न्यायसाधने, कायद्याची यंत्रणा या प्रजासत्ताक यशस्वी होण्याच्या महत्वाच्या पायऱ्या असतातच. पण प्रजासत्ताकाचा मूलभूत घटक आहे प्रजा. प्रजा म्हटले की त्यात अठरापगड माणसे असणार, वाद कलह भांडणे असणार. महत्वाचे आहे ते प्रसंगानुरूप त्याचे एकत्र येणे, कालानुरूप प्रगल्भ होत जाणे. वर उल्लेखलेल्या समस्यांशी आपली सरकारे गेली सत्तर वर्षे झगडताहेत. पण जोपर्यंत आपण स्वतः या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होत नाही , जो पर्यंत लहान सहान कामे करून घेण्यासाठी आडमार्ग वापरायचे बंद करत नाही, टॅक्स चुकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधायचे थांबवत नाही, कामं लवकर करून घेण्यासाठी संबंधितांना चहापाणी करणे थांबवत नाही, रस्त्यावर एखाद्या भगिनीला छेडणाऱ्या रोड रोमिओला पुढे होऊन थोबाडण्याचे धैर्य दाखवत नाही. तो पर्यंत निव्वळ सरकारला किंवा कुणालाही दोष देण्यात काय अर्थ आहे?
निव्वळ येता जाता सरकारला शिव्या घालण्यापेक्षा हे आपले भारतीय प्रजासत्ताक समृद्ध, विकसित होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ? आपण काय करू शकू? यांच्यावर विचार करूयात आणि अंमल करूयात ?
असो, आजच्या पवित्र दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ही सदिच्छा 💐
तळटीप : कृपया इथे सरकार ही संज्ञा सरकार या अर्थानेच घ्या, भाजप किंवा काँग्रेस नाही. ही पोस्ट राजकारणावर नाहीये, तेव्हा इतर कसलाही फालतूपणा सहन केला जाणार नाही
© विशाल कुलकर्णी