सुन्न करून टाकणारा अनुभव !

रशिया, चीन मधे झालेल्या कामगार क्रान्तिबद्दल आपण ऐकलेले वाचलेले असते. त्या कामगारांच्या हाल अपेष्टेमुळे आपण कित्येकदा मनापासून हळहळलेलेही असतो. पण तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा भयानक अशा हाल-अपेष्टा , अन्याय, अत्याचार इथे भारताची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईतील मिल कामगारांनीही भोगलेलं आहेत हे आपल्या गावीही नसते…
ब्रिटिशकाळात साधे फोरमन म्हणून सुद्धा मिरवलेली प्रतिष्ठा, समाधान, स्वातंत्र्यपूर्व काळात मात्र राजकीय अनास्था आणि धनदांडग्याची स्वार्थी मग्रुरी याला बळी पडलेल्या सर्वसामान्य मिल कामगारांची दुर्दैवी जिनगानी !
नाझी काळातील ज्यू किंवा पोलिश घेट्टोमधील आयुष्याबद्दल वाचताना आपल्या डोळ्यात पाणी दाटून येते. पण लालबाग परळच्या चाळीमध्ये, वटनांमध्ये ( वटन – एकमेकांकडे तोंड करून उभ्या असलेल्या दोन चाळींमधली चार ते पाच फुटांची वाहिवाटीची जागा, रस्ता) दाटीवाटीने राहून आयुष्य कंठलेल्या दुर्दैवी कामगार कुटुंबांची कथा मात्र आपल्याला माहीतही नसते.
कॉम्रेड डांगे, डॉ. दत्ता सामंत, कॉम्रेड गजानन गोडबोले हि नावे आपल्याला फक्त कामगार पुढारी म्हणून माहीत असतात. पण हे पुढारीपण निभावताना या नेत्यांनी भोगलेली राजकीय वंचना, मनस्ताप, कामगारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि राजकीय नेतृत्वाकडून सतत होणारा विश्वासघात यांच्या अदृश्य चक्कीत त्यांचा झालेला कोंडमारा आपल्या गावीही नसतो.
गोदरेज, मफतलाल, खटाव सारख्या मिल-गिरण्यांच्या धनदांडग्या मालकांची मुजोरी, संपामुळे आधीच अन्नान्नदशा झालेल्या , कुणीही वाली न उरलेल्या दुर्दैवी कामगाराची झालेली होरपळ, त्यातून झालेला भूमाफियांचा उदय. नाईलाजाने गुन्हेगारीकडे वळलेली कामगारांची पुढची पिढी आणि या सर्वांचा बरोब्बर गैरफायदा घेत कामगार, मिलमालक आणि राजकारणी अश्या सगळ्यांकडूनच मलिदा लाटणारी दलाल नावाची मानवी पिशाच्चे !
या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपली मूल्ये जपत कायदेशीर मार्गाने शासनाशी, परिस्थितीशी लढा देण्याचा अट्टाहास बाळगणारी काही तत्वनिष्ठ व्यक्तिमत्वे !
समृद्धीच्या वाटचालीची हि काळी किनारही आपल्या ठाऊक असायलाच हवी.
पुस्तक : लस्ट फॉर लालबाग
लेखक : विश्वास पाटील