फोटोग्राफीची आवड बहुदा रक्तातच असावी माझ्या. मला अजुनही आठवते, मी लहान असताना आण्णांकडे (आमचे तिर्थरूप) अॅग्फाचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. त्याच्या एका रीलमध्ये फक्त १२ फोटो निघायचे.

आण्णांना फोटोग्राफीचे विलक्षण वेड. त्यांच्या त्या अॅग्फाने काढलेली कितीतरी कृष्ण-धवल रंगातली छायाचित्रे अजुनही सोलापूरच्या आमच्या घरी जपलेली आहेत. मग त्यात आण्णांनी आसाम, बांग्लादेशच्या बंदोबस्ताच्या वेळी काढलेले फोटो, एस्.आर्.पी.च्या राहुटीत त्यांचा स्वतःचा स्वयंपाक बनवण्यासाठी स्टोव्ह पेटवतानाचा फोटो, तर कधी त्याच कॅमेर्याने काढलेले आमच्या हिरव्यागार शेताचे कृष्ण-धवल फोटो 😉 , आण्णांच्या भावंडांचे फोटो….
मला वाटतं आण्णांना असलेली माणसांची, माणसांच्या सोबतीची आवड त्यांच्या या छंदातून झळकत असावी.
त्यांनी काढलेले बहुतेक फोटो त्यांना भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे होते. मग त्यात नातेवाईक, मित्र यांच्याबरोबरच अनेक अनोळखी व्यक्तींही असत. मला वाटतं छायाचित्रणाचे हे वेड माझ्याकडे आण्णांकडुनच आलेले आहे. फरक असेल तर फक्त एवढाच की त्यांचा ओढा माणसांकडे होता, तर माझा निसर्गाकडे जास्त आहे. पण छायाचित्रणाची आवड मात्र आमची सामाईक. घरात चाळीसेक अल्बम्स तरी नक्कीच सापडतील. कृष्णधवल तसेच रंगीत फोटोंनी भरलेले…
हो… जस-जसे टेक्नोलॉजी बदलत गेली, रंगीत कॅमेर्यांचा काळ सुरू झाला तस तसे आमच्याकडील कॅमेर्यांचे प्रकार सुद्धा बदलत गेले. मग त्यात त्या जुन्या कृष्णधवल अॅग्फापासून ते पुढे नॅशनल पॅनासोनिक, मग याशिका, मग कोडॅक, कोनिका, फिलफोटोचा उनो, मग शेवटी कॅननचा डिजीटल अशी भर पडत गेली. माझ्या सुदैवाने हे सगळे कॅमेरे हाताळायला मिळाले. त्यामुळे एक गोष्ट कळून चुकली होती की फोटो काढण्यासाठी फक्त चांगला कॅमेरा असून भागत नाही. तर त्याला छायाचित्रकाराची नजर असणे ही तेवढेच अत्यावश्यक असते. अर्थातच अद्ययावत तंत्रज्ञानाने बनलेले कॅमेरे आजकाल छायाचित्रकाराचे काम खुप सोपे करतात. पण कॅमेरा यशस्वीपणे हाताळण्यासाठी तुमच्यात छायाचित्रकाराची ‘वृत्ती’ असणे फार गरजेचे असते. ती वृत्ती असेल तर दगडातले सौंदर्यसुद्धा ठळकपणे जाणवायला लागते. माझ्या सुदैवाने आतापर्यंत केलेल्या सर्व नोकर्यासुद्धा फिरतीच्या मिळाल्या. त्यामुळे जगभर फिरता आले. या फिरण्यातून जगभरातील छायाचित्रकारांची कामे पाहता आली. आता तर आंतरजालावर घर बसल्या सर्व उपलब्ध होतेय. पण त्या फिरतीने माझ्यातला ‘डोळस’ छायाचित्रकार जागवला. अर्थात छायाचित्रण ही केवळ हौस, एक छंद म्हणूनच बाळगल्यामुळे कधी त्याचे व्यावसायिक शिक्षण वगैरे घेतले नाही. रादर पोटासाठी चाललेल्या वणवणीमुळे ते घेता आले नाही. पण त्यामुळे काही बिघडले नाही. कारण मला ही कला फक्त एक छंद म्हणूनच जोपासायची होती, जगायची होती. त्यामुळे फक्त फोटो काढण्याच्या मागे न लागता, मी फोटो बघायला शिकलो, फोटो वाचायला शिकलो.
जशी आंतरजालाची ओळख झाली तशी अनेक उत्कृष्ट छायाचित्रकारांची ओळख झाली. यात मायबोलीकर योगेश जगताप (जिप्सी), अतुल पटवर्धन (अतुलनीय), चंदन मोगरे, प्रकाश काळेल आणि अर्थातच वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर्स आय हॅव मेट टिल डेट ‘पंकज झरेकर’ उर्फ पंक्यासारख्या छायाचित्रकारांशी ओळख झाली. या मित्रांनी काढलेले फोटो बघत – बघत या कलेतली सौंदर्यस्थळे शोधायला शिकतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय….
काही दिवसांपूर्वी माझे एक आवडते आंतरजालीय लेखक श्री अनुविना यांचा नवीन फोटोब्लॉग पाहण्यात आला. त्या ब्लॉगवरून श्री. प्रवीण अस्वले यांच्या फोटोब्लॉगची पण सफर घडली आणि वाटले की आपणही का सुरूवात करू नये या प्रवासाला ? मग नाव काय द्यायचे नव्या ब्लॉगला? इथपासून सुरूवात. सद्ध्यातरी काही सुचत नाहीये, म्हणून तात्पुरते “लेन्सच्या पलीकडचे जग…” हे नाव दिले आहे. काही नवीन सुचले तर तुम्ही सुद्धा सांगा. सुचनांचे स्वागत आहे.
आजपर्यंत मी काढलेले काही बर्यापैकी फोटो इथे आपल्या अभिप्रायासाठी पोस्ट करतोय. कसे वाटले ते नक्की सांगा. हातातला कॅमेरा अजूनही तसा बेसिक लेव्हलचाच आहे. पुढेमागे चांगल्यापैकी अद्ययावत कॅमेरा येइलही. पण तोपर्यंत छायाचित्रण कलेचे मर्म शिकण्याचा प्रयत्न करत राहीन. नव-नवे फोटो (अर्थात मी काढलेले) इथे पोस्ट करत राहीन…
आपण मित्र-मंडळी कौतुक करायला, टीका करायला, चुकत असेन तर कान धरायला सोबत आहातच.
आपलाच
विशाल कुलकर्णी
क्या बात है कुलकर्णी साहेब, अभिनंदन.
LikeLike
धन्यवाद दादानु. तुमचा नवा ब्लॉग बघीतला आणि पेटलो 😉
LikeLike
नमस्कार विशाल भाऊ…
कामाचा व्यापात असून सुद्धा स्वत:ची आवड जपत रहायची…हे फारच जबरदस्त आहे…
तुमच्या नवीन प्रयत्नाला शुभेच्छा…
जियो…
___मनस्वी राजन
LikeLike
धन्यवाद राजनभौ 🙂
LikeLike
shubhasya shighram !!!! 🙂
Abhinandan aani pudhil vatchalis shubheccha.
LikeLike
Thanks Shraddha !
LikeLike