एक मस्त हिरवागार विकांत….

पुण्याला आल्यापासून सहा महिन्यातून एकदातरी आई-आण्णांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरची चक्कर होतेच. आधी मुंबईला असताना लांब पडत असल्याने हेच प्रमाण वर्षातून एकदा असं होतं. आता इथे कसं ऑफीस संपल्यावर निघालं तरी रात्री दहा-साडे दहा पर्यंत घरी पोहचता येतं. त्यामुळे घरचे दौरे वाढलेय. आईसाहेब खुश आहेत. प्रत्येक वेळी सोलापुरी गेलं की जुन्या मित्रांपैकी कुणाला तरी फोन करायचा, शक्य असेल तर सगळेच ठरवून एका ठिकाणी भेटायचं, किमान एकाला तरी भेटायचच असा नियम ठरवून घेतलाय मी आता. पण यामुळे झालं असं की नातेवाईक शिव्या घालायला लागले. त्यामुळे यावेळेस सोलापूरी गेल्यावर सगळ्यात आधी आमच्या आत्याबाईंसाठी वेळ काढायचं ठरवलं. खरंतर ही आत्या (सुमनआत्या) माझी लाडकी आत्या आहे. माझं लहानपण माझ्या आईपेक्षा आत्याच्या कडेवर जास्त गेलय त्यामुळे तिच्याकडे प्रथमपासुनच जास्त ओढा आहे माझा. यावेळी आत्याबाईंना भेटल्यावर तिने तिच्या शेतावर जायची टुम काढली.

सोलापूरपासुन ६० किमी वर असलेलं ’उडगी’नामक कन्नड गाव हे माझ्या आत्याचं सासर. तसे मामा प्रथमपासून सोलापूरातच असतात, पण गाव जवळच असल्याने ते स्वत:च शेतीकडे लक्ष ठेवुन असतात. तर यावेळी उडगीला जायचा बेत ठरला. घरातून सकाळी लवकर निघायचं. रस्त्यात आधी लागणार्‍या ‘प्रज्ञापूरीत’ (अक्कलकोट) थांबून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं असा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे माऊलींचे दर्शन घेवुन उडगी गाठले.

शेताच्या सुरुवातीलाच मामांचा जुना कोठा (वाडा) आहे. तिथे थोडा वेळ विसावलो. वाटेकर्‍याच्या कारभारणीने दिलेले चहा-पाणी घेवून भटकंतीसाठी निघालो.

1

समोरच हिरव्यागार उसाचं वावर पसरलेलं होतं. त्यातून वाट काढत पुढे निघालो.

2

3

4

5

उस संपला आणि जोंधळ्याची पट्टी सुरू झाली.

6

7

8

9

मामांनी यंदा शेतात उस, र गहु,  ज्वारी केलेली आहे. उपलब्ध पाणी उसालाच पुरे पडत नसल्याने जवळजवळ बरीच जमीन पडून आहे. नाही म्हणायला इतर काही कोरडवाहू पिके घेतलेली आहेत. पण ती तुरळक प्रमाणात.

गव्हाची नुकतीच जोम धरू लागलेली रोपं…

10

सद्ध्या रानात एकुण दोन विहीरी आहेत. तिसरीचं काम सुरू आहे…

11

नव्याने होवू घातलेल्या विहीरीच्या शेजारीच एक छोटीशी पत्र्याची शेड आहे. तिथेच बाहेर एका झाडाखाली चालून दमलेल्या स्त्री-वर्गाने बस्तान ठोकलं. आता पुढे येणार नाही, तुमचे तुम्ही या फिरून असं जाहीर करून दोन्ही धाकट्या (आत्या पण कुलकर्णीच आहे , म्हणून ती मोठी) कुलकर्णींजनी (सौ. सायली विशाल व सौ. कृपा विनीत (माझ्या धाकट्या भावाची पत्नी)) तिथेच सतरंजीवर बैठक घातली. पण आत्याने पुढे बोराची झाडे आहेत असे सांगितल्यावर त्यांचा बेत पुन्हा बदलला. तरी आलेला थकवा दूर करण्यासाठी म्हणून थोडा अस्सल रानमेव्याचा अल्पोपहार घेवून पुढे जायचे असे आत्याबाईंनी सांगितल्यामुळे दोघीही खुश झाल्या. अजुन हुरडा झालेला नसल्यामुळे मग कोवळी तूर, हरभरा (ढाळा), पेरू, बोरं अशा रानमेव्यांवर सगळेच तुटून पडलो.
ते संपल्यावर गड्याने उसाची मोळी समोर आणून टाकली…. (पुढे काय झाले ते कृपया विचारू नये, मला कुणीही अधाशी, हावरट म्हटलेले अजिबात आवडत नाही wink )

12

छानपैकी पोटोबा झाल्यावर पुढच्या भटकंतीसाठी रवाना झालो. मामा शिक्षणाने सिव्हील इंजीनीअर. सद्ध्या सोलापुर टाऊन प्लानींगकडे डिपार्टमेंटमध्ये सिनीयर टाऊन प्लॅनर म्हणून कार्यरत आहेत.पण शेती ही पहिली आवड असल्याने तोपर्यंत ते अंगावरचे शहरी कपडे उतरवून कर्नाटकी पद्धतीची लुंगी चढवून, ती गुडघ्याच्या वर गुंडाळून घेवून जोंधळ्याच्या शेतात शिरले होते. तिथे लावलेल्या स्प्रिंकलरला काहीतरी समस्या आलेली होती. त्यांनी तिकडूनच हाक मारली. तिकडे जाताना मामांची खरी दौलत नजरेत आली…

हिच खरी दौलत !

13

14

16
पुढची पिढी…

15

आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मामांनी आणि गड्यांनी खटपट करून स्प्रिंकलर चालू केलेला होता.

17

18

त्याच्या जवळुन जाताना नकळत अंगावर पाण्याचे ते तुषार उडाले आणि बायकांची धावपळ झाली. नाय, नाय.. पाण्यापासून दुर पळायची नाय, तर त्या स्प्रिंकलर्सच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन भिजण्याची. तिथे थोडावेळ पाण्यात (आणि पायाखालच्या चिखलात) मस्ती झाल्यावर पुढे निघालो. थोड्यात वेळात तिथे जाऊन पोचलो ज्यासाठी त्यांनी आपला बेत बदलला होता.

19

20

21

भरपूर बोरं खाऊन आणि गोळा करुन झाल्यावर मग पुन्हा मागे फिरायचे ठरले. कारण यापुढे बहुतेक जमीन रिकामीच होती पाण्याच्या अभावामुळे. तरीही येताना परत रस्त्यात आता काढायला आलेली तूर भेटलीच..

22

23

दुपारचे तीन वाजायला आले होते. भरपूर फिरल्यामुळे परत पोटात कावळे कोकलायला लागले होते. आत्याबाईंनी खादाडीचाही जंगी बंदोबस्त केलेला होता. बाजरीच्या पातळ कडक भाकरी, खरडा, शेंगदाण्याची चटणी, तेलमीठावर परतून घेतलेली कोवळी गवार, मेथीची सुकी भाजी, ढोबळी मिरच्यांची सुकी भाजी, मेथी-पालकची पातळ भाजी आणि शेवटी त्यांचं (कर्नाटकी लोकांचं) खास “चित्रान्न” असा जंगी बेत होता. तोंडी लावायला ढाला, बोरं, पेरु अस्सल ‘ग्रीन सलाद’ही होतंच.

24

25

खादाडी आटोपल्यानंतर तिथेच एका झाडाखाली मस्त सावलीत, गवतावरच जे ताणुन दिली ते थेट पाच वाजताच उठलो.

26

पुन्हा कोठ्यावर येवून गरमागरम चहा घेतला आणि हुरड्याला परत यायचं असं मनाशी पक्कं ठरवून परतीच्या वाटेला लागलो.

विशाल…

15 thoughts on “एक मस्त हिरवागार विकांत….”

      1. आजारी माणसं नाशकात फक्त दवाखान्यांच्या वाऱ्या करून परत येतात रे बाबा 😦 🙂

        Like

      2. डोंट वरी तायडे, पुढच्या वेळी लवकरच ठणठणीत होशील. मला नाही वाटत कुठलाही आजार तूला फ़ारकाळ चिकटून राहू शकेल म्हणुन. हसरी माणसं आजाराला फ़ारशी आवडत नाहीत. 😛

        Like

यावर आपले मत नोंदवा