RSS

दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव… माणूस माझे नाव !

18 ऑक्टोबर

 

मीमराठीच्या पुस्तक परिचय स्पर्धेसाठी जेव्हा हा लेख/परिचय लिहायला घेतला तेव्हाच मनोमन भीती वाटत होती की हे शिवधनुष्य आपल्याला पेलवेल की नाही? हे असं बर्‍याचवेळी, बर्‍याच जणांना हा अनुभव येत असावा, निदान हे पुस्तक वाचताना तरी नक्कीच. शक्यतो पुस्तक-परिचय लिहीताना लेखक, परिचयासाठी / समीक्षेसाठी घालुन दिलेल्या नियमानुसार, प्रवाहाबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो, कारण अन्यथा स्वतःचे विचार मांडण्याच्या ओघात वाहवत जाण्याचा, पुस्तकाच्या मुळ विचारधारेच्या विपरीत जाण्याचा संभव असतो. त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न होता. पण काही पुस्तके हीच मुळी वादळी स्वभावाची असतात, कारण त्यांना प्रत्यक्ष अनुभवाचा, लेखकाने स्वतः भोगलेल्या वेदनांचा स्पर्श लाभलेला असतो. ही पुस्तके तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी कुठल्यातरी एखाद्या बेसावध क्षणी तुमच्यावर ताबा मिळवतात आणि प्रवाहाबरोबर चालण्याची धडपड करणारे तुम्ही त्या पुस्तकाच्या वेगाबरोबर भरकटायला लागता. आपली ढोबळ वाट सोडून स्वतःला त्या पुस्तकाच्या स्वाधीन करुन टाकता. मग ते नेइल ती आपली वाट ठरते. पण गंमत म्हणजे हे अशा प्रकारे प्रवाहपतीत होणंही आपल्याला एक मनस्वी आनंद देवून जातं. ही त्या पुस्तकाची ताकद असते, हे त्या लेखकाचं, त्या कविचं सामर्थ्य असतं. उचल्या, बलुतं, कोसला, पांगिरा, झाडाझडती तसेच जी.ए. किंवा चिं.त्र्यं.च्या सगळ्याच कथा-कादंबर्‍या या प्रकारात मोडतात. ही प्रस्तावना मांडण्याचं कारण म्हणजे ‘या पुस्तक परिचय स्पर्धेसाठी’ मी हे पुस्तक निवडलय खरं पण कुठल्या क्षणी मी माझं अस्तित्व विसरून या पुस्तकाच्या, त्यातल्या अफाट लेखनाच्या ताब्यात जाईन, प्रवाहाबरोबर चालणे सोडून भरकटायला लागेन हे मलाच माहीत नाही. तेव्हा तसे झाल्यास आधीच क्षमा मागतो.

****************************************************************************

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व द्वारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन् चालली माझी लढाई

सुर्‍या मनापासून अगदी एकाग्र होवून ऐकवत होता. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर जणु काही आसवांची, रक्ताची शाई करुन लिहील्याप्रमाणे अंगावर येत होते. १९९३ साली, कॉलेजच्या कँटीनमध्ये सात जणांमध्ये तीन चहा आणि या हातातून त्या हातात फिरणारी सिगारेट यांच्या साक्षीने सर्वात प्रथम थरारून सोडणारा हा अनुभव घेतला होता.

सुर्‍या, साल्या कुठल्या तरी क्रांतिकारकाची कविता दिसत्येय ही. बाय द वे, तुझ्यासारख्या दिलफेक आशिककडून ही कविता ऐकताना काहीतरी विचित्रच वाटतय यार. पण काही म्हण, साला दम है इस कविमें. कसले अफाट ताकदीचे शब्द आहेत यार. “माझिया रक्तासवे अन् चालली माझी लढाई” ! साला नुसती ही कल्पना ऐकुनच शहारायला होतय.

“दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही, ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले” …

काहीतरी अतिशय भयाण असं दु:ख आलेलं आहे या माणसाच्या नशीबात. नक्कीच कोणातरी देशभक्त क्रांतिकारकाची कविता आहे ही. कोण आहे बे? अजुन काही कविता आहेत का त्याच्या. दे ना, जबराट प्रकरण दिसतय यार.

“विशल्या, क्रांतिकारक तर हा माणुस आहेच यार ! पण खरंतर तो त्याहीपेक्षा खुप मोठा आहे. अगदी हिमालयदेखील त्यांच्यापुढे खुजा वाटेल यार. सुर्‍या उर्फ सुरेश खेडकरने आपल्या झोळीतुन एक पुस्तक काढले आणि माझ्या हातात दिले. ते पुस्तक हातात घेऊन त्यावरचे कविचे नाव वाचले आणि पहिला विचार मनात आला….

“बरोबर, दुसरं कोणी असुच शकत नाही. या माणसापुढे हिमालयच काय तो आकाशातला देव सुद्धा खुजाच ठरेल !”

त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं,आहे “ज्वाला आणि फुले” आणि कविवर्यांचं नाव आहे “बाबा आमटे”

JAF

कशी गंमत आहे बघा, कुठल्याही आदरणीय , पुज्यनीय व्यक्तीबद्दल बोलताना आपण त्या व्यक्तीच्या नावापुढे माननीय, आदरणीय, पुज्यनीय, श्रीमान, राजमान्य राजेश्री अशी किंवा यासारखी संबोधने वापरतो. पण बाबांबद्दल बोलताना या असल्या औपचारिक संबोधनांची गरजच राहत नाही. उलट मी तर म्हणेन या वरच्या सर्व संबोधनांना सन्मान द्यायचा झाल्यास त्यामागे ‘बाबा’ लावावे, त्याने त्या आदराच्या भावनेचाच सन्मान होइल. मुळातच ‘बाबा’ या दोन अक्षरी आकारांत शब्दात सगळ्या विश्वाचे आर्त सामावले आहे आणि बाबांनी तर या संबोधनाला जणुकाही सार्थकताच प्राप्त करुन दिली आहे. जगातलं सगळं पावित्र्य, सगळं मांगल्य, सगळं सामर्थ्य या साडेपाच फुटी माणसात सामावलेलं होतं. मला त्या क्षणापर्यंत ‘बाबा’ माहीत होते ते फक्त कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व, आपलं सगळं आयुष्य वाहणारा एक निस्वार्थ, निष्काम सेवाव्रती म्हणुन ! पण सुर्‍याने बाबांची ही नवी ओळख करुन दिली.

बाबा नेहमी म्हणायचे ” आनंदवनातील रोगापेक्षा आनंदवनातील लोकांचा आत्मविश्वास अधिक लागट आहे.” त्यांचा तो आत्मविश्वासच जणु त्यांच्या वर दिलेल्या ‘गतीचे गीत’ या कवितेतुन ओसंडून वाहताना दिसतो. सद्ध्याच्या बिकट स्थितीचे भान राखुन, तिच्याशी सामना करत उद्याच्या भविष्याचे एक आशादायक चित्र उभे करणारे ‘बाबा’ नि:संशय एक द्रष्टे कवि होते. आपल्याला काय करायचेय हे त्या महामानवाने निश्चित ठरवलेले होते. त्यासाठी काय काय करावे लागेल, कुठली बलिदाने द्यावी लागतील याचे भान त्यांना नक्कीच होते. कदाचित म्हणुनच ते ‘आनंदवना’सारख्या सुदृढ आणि सशक्त वसाहतीची निर्मीती करु शकले. हो मी आनंदवनातल्या रहिवासींना सुदृढ आणि सशक्तच म्हणेन. शारिरीक दृष्ट्या भलेही ते अपंग असतील पण ‘बाबांच्या’ सहवासाने त्यांना जे प्रचंड असे मानसिक सामर्थ्य आणि आत्मविश्वास दिला आहे तो आपल्यासारख्या तथाकथीत निरोगी लोकांच्यासुद्धा नशीबात नसेल.

कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरु स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई….. दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही !!

पण अमुक एक गोष्ट करुन तिथे थांबणे बाबांचा स्वभावच नव्हे.

“मीच इथे ओसाडीवरती,
नांगर धरूनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती”

हा सार्थ अभिमान बाळगुनही त्यापाशी थांबणे हे बाबांना जमत नाही. आनंदवनाला त्याचे सामर्थ्य प्राप्त करुन दिल्यावर बाबा माडिया गोंडांच्या जिवनात आनंद फुलवण्याच्या मागे लागतात. त्यातुन ‘हेमलकसा प्रकल्प’ उभा राहतो. सतत नवनवी आव्हाने त्यांना खुणावत राहतात. “सुखेच माझी मला बोचती” असे म्हणत हा महामानव दिन-दुबळ्यांची दु:खे आपलीशी करतो. त्यांच्या वेदना स्वतः भोगून त्यांची त्या दु:खापासून, त्या वेदनांपासुन मुक्तता करण्याच्या पवित्र कार्यासाठी पुन्हा पुन्हा आपले जिवन, आपले सर्वस्व झोकून देत राहतो.

सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…
माणूस माझे नाव !

बाबांच्या कवितांबद्दल बोलताना पु.ल. म्हणतात “या संग्रहाला ‘ज्वाला आणि फुले’ असे नाव दिले आहे. पण मी ह्या काव्याला अग्निपुष्पच म्हणेन. हल्ली जिवंत शब्द कुठले आणि शब्दांचे पेंढे भरलेले सांगाडे कुठले हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे. शब्दांचा चलन फुगवटा वाढला आहे, नकली शब्दांच्या टांकसाळी जोसात आहेत. अशा काळात ज्या शब्दांना एखाद्या समर्पित जीवनाचे तारण असते तेच शब्द बावन्नकशी सोन्यासारखे उअजळून निघतात. या असल्या बंद्या नाण्यांचे मोल आणखी कशात करायचे? “ज्वाला आणि फुले” हे एकदा वाचुन हातावेगळे करायचे पुस्तक नाही. पुन्हा-पुन्हा वाचायचे आहे. इथे ‘स्वस्थ’ करणार्‍या वांगमयापेक्षा ‘अस्वस्थ’ करणारे वांड्^मय थोर मानले आहे. बाबा आमटे यांनी आमच्या सारख्यांच्या डोक्यातही विचारांची पिल्ले सोडली आहेत, ती आता थैमान घालीत राहणार! विचारांची पिल्ले ही सुर्याच्या पिल्लांसारखी डोळ्यापुढे काजवे चमकवतात.

या काव्यसंग्रहाची अक्षरशः पारायणे केली तेव्हा जाणवलं की पु.ल. ना नक्की काय म्हणायचं होतं? काय नाही बाबांच्या कवितेत ? त्यात तरल काव्य तर आहेच पण त्या काव्याला बाबांच्या ज्वलंत विचारांची, चिंतनाची आणि निष्काम तत्त्वज्ञानाची जोड आहे. स्वतःबद्दलचा, स्वतःच्या निश्चयाबद्दलचा अमोघ असा आत्मविश्वास आहे. आनंदवनात समाजाने त्याज्य ठरवलेल्या कुष्ठरोगी बांधवांचे दु:ख दुर करत त्यांचे दु:ख, त्यांची वेदना स्वतः जगताना त्या निर्मळ, निस्वार्थ योग्याच्या मनाला झालेल्या जखमांची सोबत त्या काव्याला आहे. समाजाने त्याज्य ठरवलेल्या त्या दुर्दैवी जिवांच्या वेदनेने स्वतःच व्याकुळ झालेल्या एका कोमल , मृदु मनाच्या संवेदना आहेत. पण बाबांची कविता त्यांच्या मनाप्रमाणे केवळ मृदु वा कोमल राहत नाही. तर प्रसंगी ती त्यांच्या स्वभावाप्रमाणे कठोर, निश्चयी बनते. एखाद्या विद्युलतेसारखी, एखाद्या लवलवत्या ज्वालेसारखी उफाळून येते.

आपल्या ‘शतकांचे शुक्र’ या कवितेत बाबा म्हणतात..

त्याने उठत नाही केवळ पेल्यातले तुफान
उठते त्यातून कधी मातृभुमीच्या वंदनेचे जयगान
जे दणाणून टाकते गुलामीच्या अंधारातही अस्मान

स्वातंत्र्य गर्जत छातीत गोळी घेता ती गीते
उठवतात सुस्त कबंधे आणि जागवतात प्रेते
याच स्वरांतून उठतात आझादीची आगेकुच करणारे
आणि मृत्यूला जिंकून मरणारे नेते

अतिशय कोमल, मृदु मनाचा हा कवि स्वतःच्या कविता संग्रहाला नाव देतो ‘ज्वाला आणि फुले’ ! पण जस-जसे आपण या कविता वाचत जातो तस-तसे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागते ती म्हणजे याचं नाव असायला हवं होतं “ज्वालांची फुले”!

कारण बाबांचे शब्द फुलांसारखे भासले तरी ती साधी सुधी फुले नाहीयेत. बाबांचे शब्द तेजस्वी ठिणगीचे रुप घेवून येतात. स्वतः तर जळतातच पण त्याबरोबर शतकानुशतके तथाकथीर रुढी-परंपरांच्या जाचक नियमांमुळे भरडल्या जाणार्‍या, स्वतःच्याच नियतीने लादलेल्या दुर्दैवाचे बळी ठरलेल्या शोषीतांची दु:खे, त्यांचे कष्ट, त्यांची संकटे जाळत सुटतात. स्वत्व गमावलेल्या मानवतेला तिच्या सर्वोच्च स्थानावर नेवून बसवतात. बाबांची कविता ही केवळ कल्पनाशक्तीची उड्डाणे नाहीयेत, बाबांच्या कविता म्हणजे तुमच्या माझ्याप्रमाणे यमक जुळवून रचलेल्या ओळी नाहीयेत. बाबांची कविता म्हणजे इंद्राचा विलासी इंद्रलोक नाहीये. बाबांची कविता म्हणजे वेदनेचा हुंकार आहे. अखंड वेदना, ती सुद्धा स्वतःसाठी नव्हे, तर समाजातील शोषीत वर्गासाठी स्वतः सोसून, तिचा स्वतः अनुभव घेवून मग त्या वेदनेला शब्दरुपात मांडायचे ही बाबांची पद्धत होती. त्यामुळे बाबांची कविता कधीच शब्दांचा खेळ वाटली नाही. ती थेट एखाद्या अग्नीशलाकेसारखी अंगावर येते. कै. साने गुरुजींनी लिहिले होते, ‘सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे’. बाबांनी आपले आयुष्य अशा दीन दुबळ्यांना हात धरून उठवण्यासाठी व जगाच्या व्यापारात आपल्या पायावर उभे करण्यासाठी व्यतीत केले. कोरडी भाकरी पळवून नेणाऱ्या कुत्र्याच्या मागे हातात तुपाची वाटी घेऊन संत एकनाथ धावत राहीले, अशी गोष्ट सांगितली जाते. अशा वागण्याला कोणी वेडगळपणा मानेल, पण अशा वेडातच मानवतावादाची बीजे मूळ धरत असतात. बाबांचे महारोग निवारणाचे कार्य असो, वा ‘जोडो भारत’चा मंत्र जपत देश पिंजून काढण्याचा उपक्रम असो, पंजाबमधील त्यांची शांतियात्रा असो वा सरदार सरोवर धरणाचा लढा, बाबांच्या या सर्व चळवळींना नैतिकतेचा आधार आणि मानवतावादाचा गाभा होता. त्यामुळेच त्यांच्या आंदोलनांबाबत ज्यांना शंका वा विरोध होता, त्यांनाही बाबांच्या प्रामाणिकपणाबद्दल व सद्हेतूबद्दल केव्हाही संदेह नव्हता.

फुकाची अवडंबरे करत बसण्यापेक्षा “सेवा हीच प्रार्थना” हा मंत्र बाबांनी मनाशी जपला आणि त्यानुसार स्वतःचे आयुष्य झोकून दिले. बाबांच्या कर्तुत्वाचे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे मुळ त्यांच्या प्रचंड अशा आत्मविश्वासात आणि प्रबळ इच्छाशक्तीत लपलेले आहे. अतिशय आशावादी असलेल्या बाबांना आपल्या शक्तीस्थळांबरोबरच आपल्या उणीवांचीही पुरेपूर जाणिव होती. पण उणीवांचा बाऊ करण्यापेक्षा आहे त्यात विकल्प शोधणे, समस्यांचे समाधान शोधणे याची सवय बाबांनी स्वतःला जडवून घेतलेली दिसते.

… निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान जेव्हा मी स्वीकारले
तेव्हाच त्याची चाहूल माझ्या पाठीशी असलेली मला जाणवली
अपयशांनी फेसाळलेला माझा चेहरा पाहून
आता मी कधीच हताश होत नाही
कारण जीवनाचा उबदार हात माझ्या पाठीवर फिरतच असतो

आपण कशाला हात घातलाय ते बाबांना माहीत होते. पिडीतांसाठी, दीनांसाठी, कुष्टरोग्यांसाठी ते एक नवे जग, एक नवी दुनीया निर्माण करायला निघाले होते. हाती घेतलेले हे काम सोपे नाही, तर सर्वस्वाचा होम करायला लावणारे आहे याची बाबांना जाणिव होती. पण त्या महामानवाने आपल्या आयुष्याच्या समीधा या यज्ञात अर्पिण्याचा दृढनिश्चयच केला होता. आता कुठलीही आपत्ती, कुठल्याही बाधा त्यांना अडवु शकणार नव्हत्या. कारण नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या विश्वामित्राच्या प्राक्तनात काय असते हे बाबांना पक्के ठाऊक होते. आपल्या ‘विश्वामित्र’ या कवितेत बाबा म्हणतात.

विश्वामित्राने इंच इंच सरकायचे असते
पाठीवर घेऊन आघातांच्या ऋणांचे ओझे
तो सातदा पडतो आणि आठदा उठतो
आणि त्याचा पल्ला सतत पुढेच आहे
प्रलोभने स्वीकारण्याचे साहस
आणि ती बाजूला सारण्याचा निर्धार
दोन्ही त्याच्या ठायी आहेत
म्हणून त्याला कधी पळवाट शोधावी लागत नाही.
शेवटचे शिखर त्याला कधी सापडत नाही
आणि प्रत्येक शिखरावर तो फक्त एक क्षण असतो
त्याच्या ह्या क्षणांनी मी माझी उंची मापीत असतो !

किती स्पष्ट आणि स्वच्छ विचारसरणी ! कुठलाही आणि कसलाही भाबडा आशावाद नाही. उगाच मनात आले म्हणून भावनांबरोबर वाहावत जाणे नाही. तर जे कार्य हाती घेतलय त्यात काय काय होवू शकेल याची अगदी स्पष्ट कल्पना बाबांना होती.

‘ज्वाला आणि फुले’ हा केवळ एक कवितासंग्रह नाही तर बाबांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या भविष्यातल्या वेगवेगळ्या संकल्पांची जणु रासच आहे. यात एकुण २३ दिर्घकविता आहेत. प्रत्येक कविता म्हणजे जणुकाही बाबांनी घेतलेल्या ज्वलंत, मुर्तीमंत अनुभवाचे शब्दरुपच आहे. या काव्यामध्ये रक्त सळसळवणारी धुंदी आहे, आयुष्याला आव्हान द्यायचे सामर्थ्य आहे. जगण्याच्या धडपडीला नवचैतन्य प्राप्त करुन देणारे सामर्थ्य आहे. या काव्यसंग्रहाला लिहीलेल्या प्रस्तावनेत वि. स. खांडेकर म्हणतात…

“पुरुषार्थाच्या सर्व प्रचलित अर्थांपेक्षा एक नवा खोल अर्थ बाबासाहेबांच्या जगावेगळ्या धडपडीत मला प्रतीत झाला. ज्या करुणेचे कृतीत रुपांतर होत नाही ती वांझ असते, हे लहानपणापासून अंधुकपणे मला जाणवत आले होते, पण करुणेच्या पोटी जन्माला आलेली कृती ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असुन चालत नाही, ती रोगाच्या विषारी मुळावर घाव घालणारी शस्त्रक्रियाच असायला हवी, ही तीव्र जाणीव ‘आनंदवना’ च्या मुळाशी असलेल्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने मला करुन दिली. आपल्या सार्‍या सामाजिक अनुभवाच्या संदर्भात हे तत्त्वज्ञान मोलाचे आहे, अशी माझी खात्री होऊन चुकली.”

आपलं हेच जिवनाचं तत्त्वज्ञान बाबांनी त्यांच्या कवितातुन मांडलेले आहे. ज्या आत्मविश्वासाने, ज्या जिद्दीने बाबांनी ‘आनंदवनात’ स्वर्ग उभा केला. तो सारा आत्मविश्वास, ती जिद्द बाबांच्या या ‘ज्वाला आणि फुले’ नावाच्या आत्मचिंतनपर लेखनात जणु काही त्यांच्या उत्कटतेची वसने लेवून कवितेच्या रुपात अवतरली आहे. पण या शलाकेचं वैशिष्ठ्य असं आहे की ज्याच्याकडे या विद्युलतेच्या शेजारी उभे राहून तिचा दाहक, पण संजीवक स्पर्श सहन करण्याचे सामार्थ्य आहे केवळ तोच या स्वच्छंद आत्म-चिंतनाचा मनसोक्त आस्वाद घेवु शकेल.

बाबांच्या या विद्युलतेबद्दल बोलायला माझे शब्द खुपच तोकडे आहेत. तो प्रयत्न करुन स्वतःचेच हात जाळुन घेण्याचे धाडस माझ्यात नाहीये, म्हणुन वि.स. खांडेकरांच्याच वाक्यांनी या लेखाचा समारोप करतो.

“एकाच वेळी शिंगे, तुतार्‍या, रणभेरी वाजाव्यात, तशा प्रकारचा शब्दांचा, कल्पनांचा आणि विचारांचा कल्लोळ आहे. हे शब्द आणि कल्पना, जीवन उत्कटपणे जगत असताना एका प्रज्ञावंताच्या हृदयाला झालेल्या जखमातल्या रक्ताने माखलेल्या आहेत. मात्र हे रक्त नुसते भळभळत वाहणारे नाही. चिळकांडी उडत असतानाच त्याचे ज्वाळेत रुपांतर होते. याचे कारण बाबासाहेबांची अनुभूती केवळ हळव्या भावनेच्या किंवा क्षणिक वेदनेच्या टप्प्यापाशी थांबत नाही. स्वतंत्र बुद्धीने ती त्या दु:खाच्या उगमाचा विचार करु लागते. इतिहास, पुराणे, नानाविध शास्त्रे, शतकानुशतके बदलत आलेले मानवी जीवन, हे विसावे शतक, त्यातले ज्ञान-विज्ञान आणि त्याच्या पुढल्या जटिल समस्या…”

या सगळ्यांचा उहापोह बाबांनी आपल्या या अग्निपुष्पांच्या साह्याने केलेला आहे. या सर्वांच्या साह्याने आजच्या उध्वस्त मानवाच्या पुनरुज्जीवनाचा ही अनुभूती शोध घेते. बाबासाहेब बोलू लागतात ते आपल्याला प्रज्ञेला घडलेल्या नव्या मार्गाचे दर्शन स्पष्ट करण्यासाठी. मानवाच्या शारिरिक, मानसिक, आर्थिक आणि आत्मिक पुनरुत्थानाचे कंकण हाती बांधलेला हा शूर समाजसेवक, शब्दांपासून विचारापर्यंत वापरून गुळगुळीत झालेली सारी नाणी दूर फेकून देतो. नवा विचार आणि नवे शब्द यांची या चिंतनात पडलेली सांगड चाकोरीतून जाणार्‍या वाचकांना अधूनमधून गोंधळात पाडील, नाही असे नाही, पण हा दोष केवळ लेखकाचा नाही. बाबासाहेबांच्या कार्याची ज्याला कल्पना नाही त्याला या चिंतनातला रस मुक्तपणे चाखता येणारच नाही.”

शेवटी माझं म्हणून एवढेच सांगेन ‘ज्वाला आणि फुले’ या केवळ कल्पित कविता नाहीत किंवा भावुक होवून शब्दात उतरवलेल्या पोकळ भावनाही नाहीत. तो एका मनस्वी, पवित्र मनाच्या महायोग्याला घडलेला जीवनाचा, त्यातल्या सुख्-दु:खाचा, वेदनेचा, तिच्या निराकरणाचा साक्षात्कार आहे. हे केवळ पोकळ शब्द नाहीत. तर आधी केले आणि मग सांगितले या इतिकर्तव्यतेच्या महन्मंगल भावनेतूल जन्माला आलेली एक ओजस्वी शिल्पकृती आहे. त्या महान आत्म्याचे, ज्याने आपल्या आयुष्यातली सर्व सुख्-दःखे कोळून प्यालेली आहेत , स्वतः नगरपालिकेचा उपाध्यक्ष असताना भंग्याची पाटी डोक्यावरून वाहून नेण्याची हिंमत दाखवली आहे अशा महात्म्याचे हे तेजस्वी बोल आहेत. हा झंझावात पेलण्याचं, हे वादळ तोलण्याचं बळ जर तुमच्या बाहूत असेल, या ज्वलंत विचारधारेची अग्निशलाका पेलण्याची ताकद जर तुमच्या मनात असेल तरच या पुस्तकाला हात घाला. एक मात्र नक्की, जर तुमच्यात हे वादळ पेलण्याची ताकद असेल तर तुम्हाला आपल्या तेजाचा छोटासा का होइना, पण अंश देण्याचे सामर्थ्य आणि खात्री या अग्निपुष्पात नक्कीच आहे.

पुस्तकाचे नाव : ज्वाला आणि फुले
चिंतन : बाबा आमटे
शब्दांकन : रमेश गुप्ता
प्रस्तावना : वि. स. खांडेकर
प्रकाशक : गायत्री प्रकाशन, पुणे
प्रमुख वितरक : रसिक साहित्य प्रा. लि. पुणे

(पुर्वप्रकाशन : मीमराठी.नेट)

 

9 responses to “दुर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव… माणूस माझे नाव !

 1. gouri0512

  ऑक्टोबर 18, 2012 at 4:50 pm

  विशाल, मी किती तरी महिन्यांपासून हे पुस्तक मिळवण्याच्या खटापटीत आहे. अगदी हेमलकश्याला प्रकल्पावरही नाही मिळालं हे मला. तुला कुठे मिळालं? दहावीत असतांना लायब्ररीमधून हे मिळालं होतं, तेंव्हा वाचलेल्या कित्येक कविता अजून अर्ध्यामुर्ध्या आठवतात मला! ती वटवृक्षाची कविता तर मला हवीच हवी आहे … वटवृक्षाच्या छायेत सिद्धार्थाचा गौतम होतो, माणसाच्या सावलीत वटवृक्षाचा बोन्साय होतो अश्या काहीतरी ओळी होत्या त्यात.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 18, 2012 at 8:08 pm

   मी आंतरजालावरुनच ऒर्डर केलं होतं. तू कुठे असतेस? पुण्यात सद्ध्या मीमराठीची पुस्तकजत्रा सुरू आहे माणिकबागेत, तिथे उपलब्ध आहे हे पुस्तक.

    
 2. Tanvi

  ऑक्टोबर 18, 2012 at 4:52 pm

  _/\_ …. 🙂

   
 3. pankaj k

  ऑक्टोबर 20, 2012 at 8:54 pm

  babanchya pustakacha yapeksha changla parichay kay asu shakato.mi nakki vachen….dhanyavad
  vishal..khup chan..

   
 4. अभिषेक

  ऑक्टोबर 23, 2012 at 10:44 सकाळी

  छान माहिती विशालदा!

   
 5. उमेश कोठीकर

  ऑक्टोबर 28, 2012 at 10:34 pm

  रमेश गुप्तांनी छान शब्दांकन केलंय! खुप वर्षांपासून वाचतोय.धन्यवाद विशाल.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: